भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा
भरताचे चित्रकूटावर आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स्नानसंध्या व त्रिवेणीला साष्टांग प्रणिपात :

भरतें गंगा उतरोन । केलें स्नान संध्या तर्पण ।
आजींची वस्ती प्रयागस्थान । म्हणोनि निशाणें त्राहाटिलीं ॥१॥
रथ गज वाजी वीरश्रेणी । चालातां मार्ग न पुरें धरणीं ।
पुढे देखिली त्रिवेणी । दूत गर्जोनी सांगती ॥२॥
देखोनी त्रिवेणी भरत शत्रुघ्न । दोघी घातले लोटांगणा ।
त्यजोनियां पादत्राण । चरणचालीं निघालें ॥३॥
वसिष्ठादि ऋषीश्वर । चरणीं चालती सत्वर ।
देखोनि त्रिवेणींचे तीर । जयजयकार तिहीं केला ॥४॥

गोदान, पिंड्दान, धनदान :

देवोनि लक्षानुलक्ष गोदानें । भरतशत्रुघ्नें केलीं स्नानें ।
तीर्थश्राद्ध पिंडदानें । पितृर्पणें तिहीं केली ॥५॥
तीर्थ उअपवास मुंडन । रायासी नाही हे बंभन ।
वसिष्ठ गुरु सज्ञान । तीर्थ विधान तो करवी ॥६॥
मागतयांचे निवे मन । तैसें वाटविलें धन ।
सुखी केले तीर्थवासी ब्राह्मण । दीनजन सुखी केलें ॥७॥
द्रव्य वांटिता भरत । मागते जाले कृतार्थ ।
सुखी केले तीर्थस्थ । श्रीरघुनाथ भेटो मज ॥८॥
द्विज बोलती द्विजापासीं । श्रीराम आला होता तीर्थासी ।
निःशेष द्रव्य नाहीं त्यापासीं । वल्कलवासी जटाधारी ॥९॥
त्याचे देखतां श्रीमुख । तीर्था सकळां जालें सुख ।
त्यापुढें द्रव्य तुच्छ देख । अलोलिक सुख रामीं ॥१०॥

भरद्वाज सामारे येताच भरताचे वंदन :

भरद्वाज येवोनि साउमा । तेनें आश्रमा नेलें श्रीरामा ।
तोचि जाणे श्रीराममहिमा । मूर्खा आम्हां न कळेचि ॥११॥
तीर्थींचे ब्राह्मण लोलुप बहुत । वल्कधारी श्रीरघुनाथ ।
द्रव्य वांटिल हा राजसुत । असेल गुप्त धन यापासीं ॥१२॥
अति समर्थ श्रीरघुपती । वना नवचे रित्या हातीं ।
द्रव्य वांटील हा तीर्थीं । द्रव्य लोभार्थीं ब्राह्मण ॥१३॥
जेथवरी द्रव्यद्वारांअभिमान । जेथवरी ज्ञानगर्व गहन ।
त्यासी श्रीरामचें महिमान । स्वप्नीही जाण लक्षेना ॥१४॥
लोभेही श्रीरामाचें मुख । पाहतां जालें आम्हां सुख ।
परी महिमा आम्ही नेणों मुर्ख । सुखदायक श्रीराम ॥१५॥
वाल्मीकीपाशीं संपूर्ण । ज्ञानकांडाचें श्रवण ।
भरद्वाजें केलें आपण । अति सावधान श्रद्धेनें ॥१६॥
जालिया श्रवणनिष्पत्ती । श्रीराम देखे सर्वाभूतीं ।
यालागीं त्याची श्रीरामीं भक्ती । भावे श्रीरघुपति स्वाश्रमा नेला ॥१७॥
ऐसिया ब्राह्मणांची कथा । ऐकोनि भरताची अवस्था ।
श्रीराम सर्वांसी सुखदाता । मज अभाग्यता मायेची ॥१८॥
करोनि वसिष्ठासी नमन । भरत बोलिला आपण ।
भरद्वाजें पूजिला रघुनंदन । त्याचें दर्शन आम्ही घेऊं ॥१९॥
वसिष्ठ म्हणे धन्य वाणी । हेंचिं होते माझे मनी ।
भरद्वाज ऋषिशिरोमणी । चला तत्क्षणीं भेटीसी ॥२०॥
कटक ठेवोनी गंगातीरीं भरतवसिष्ठादिऋषीश्वरीं ।
भरद्वाजाश्रमाभीतरीं । आले झडकरी भेटीसी ॥२१॥

गैरसमजामुळे भरद्वाजांचा भरतावर दोषारोप :

भरद्वाज उठोनि आपण । वसिष्ठा घातलें लोटांगण ।
वसिष्ठें दिधलें आलिंगन । सामाधान दोघांसी ॥२२॥
इतर ॠषिजन । भरद्वाज वंदी आपण ।
भरत आणि शत्रुघ्न । घालिती लोटांगण भरद्वजा ॥२३॥
भरद्वाजें त्या दोघांसी । आलिंगिले हृदयासीं ।
स्वागत पुसोनि तयांसी । काय त्यांपासीं बोलत ॥२४॥

भरद्वाज उवाच-
कच्चिन्न तस्य रामस्य धार्मिकस्य क्षमावतः ।
त्यक्तस्नेहो राज्यलोभान्न निहंतुमिहागतः ॥१॥
कच्चिन्न तस्यपापस्य पापं कर्क्तुमिहेच्छसि ।
अकंटकं भोक्तुमना राज्यं तस्यनुजनस्यच ॥२॥
न खल्वकार्यं कार्यं ते पाप तस्मिन्महात्मनि ।
यदसौ त्वद्यते पित्रा वनवासे विवासितः ॥३॥

भरद्वाज म्हणे भरता । सज्जूनियां सेना समस्ता ।
वनीं वधूं जासी रघुनाथा । राज्यलोभार्था लक्षोनी ॥२५॥
राज्य भोगवया निष्कंटक । वधू पाहसी रघुकुळटिळक ।
पापकारी तूं अति मूर्ख । परम दुःख पावसी ॥२६॥
मिळाल्या देवदैत्यदानव । यक्ष राक्षस आणि मानव ।
रणीं न जिंके श्रीराघव । तो तू बाळभावें केवी वधिसी ॥२७॥
श्रीरामची क्रोधभॄकुटी । रणी आटील सकळ सृष्टी ।
तेथें तुझी कायसी गोष्टी । रुद्रे संकटीं राहू न शके ॥२८॥
सैन्य श्रीरामाचें सूपर्ण । तें तंव युद्ध न करी जाण ।
क्षोभालिया लक्ष्मण । घेईल प्राण दोघांचा ॥२९॥
भरता मानीं माझें वचन । तूं अयोध्येसी जाय परतोन ।
चौदा वर्षै राज्य करोन । रिघावे शरण श्रीरामा ॥३०॥

ते ऐकून भरत उद्विग्न :

भरद्वाजाचें वचन । वज्रपाय अति तीक्ष्ण ।
हृदयीं भेदलें दारुण । भरत प्राण सोडूं पाहे ॥३१॥
ऐकतां भरद्वाजाचें वचन । भरत पडें मूर्छापन्न ।
म्हणे मज कां नये मरण । करी रुदन अति दुःखे ॥३२॥
कैकेयी राज्यलोभाची थोरी । जगीं मीं केलों रामाचा वैरी ।
भरत जाविनि वनांतरी । श्रीरामातें मारी जग बोले ॥३३॥
कैकेयी मातेचा अति अनर्थ । वना जावोनियां भरत ।
करील श्रीरामाचा घात । जगाआंत अपवादू ॥३४॥
तुम्हासारिखे साधुसंत । म्हणती वना जावोनियां भरत ।
करील श्रीरामाचा घात । तरी देहांत नव्हे माझा ॥३५॥
मी काय वज्राचा घडियेलों । कीं अपेशाचा ओतियेलों ।
दुःखा दुर्धर जन्मलों । निंदेचा जालों मेरू जैसा ॥३६॥
मी तंव अपेशाचं आतयन । अपकिर्तीचें अधिष्ठान ।
जळो माझें काळें वदन । देहबंधन छेदवेना ॥३७॥
श्रीरामद्वेषी पापी परम । राज्यलोभी अति अधम ।
शाप देवोनि दुर्गम । मज भस्म करीं वेगीं ॥३८॥
ऐसें म्हणोन भरतें आपण । ध्रिल भरद्वाजाचे चरण ।
माझिया पापा पुरश्चरण । शाप दारुण स्वामीचा ॥३९॥
ऐसें बोलतां आले रुदन । भरत पडिला मूर्छापन्न ।
देखोनि भरताचे प्रेम पूर्ण । आलें स्फुंदन भरद्वाजा ॥४०॥

भरताच्या निर्मळ हृदयाचा परिचय होताच भारद्वाजांना संतोष :

सर्वांग जालें रोमांकित । प्रेमें चळचळां कांपत ।
म्हणे धन्य धन्य तूं भरत । प्रेम अद्‌भुत श्रीरामीं ॥४१॥
उचलोनियां दोहीं हातीं । आलिंगिला अति प्रीतीं ।
रामभक्ताचे पायींची माती । अहोराती मी वंदी ॥४२॥
श्रीरामीं ज्याची अनन्य प्रीती । श्रीरामीं ज्याची अनन्य गती ।
श्रीरामी ज्याची परम भक्ती । निजसांगाती तो माझा ॥४३॥
श्रीरामीं ज्याचें अनन्य भजन । त्याचें आम्ही करूं ध्यानपूजन ।
त्याचेनि आम्हा समाधान । सत्व वचन हें माझें ॥४४॥
भरता भरद्वाजा प्रेम पूर्ण । देखोनि हर्षले ऋषिगण ।
जयजयकारें केलें गर्जन । सुख संपूर्ण वसिष्ठा ॥४५॥

वसिष्ठांची हमी :

वसिष्ठा बोलिला आपण । भरता राज्य मी देतां जाण ।
तेणें शिवोन माझे चरण । निर्वाण आण वाहिली ॥४६॥
सांडोनियां रघुनाथा । राज्याभिषेक होय भरता ।
ते म्यां वधिली निजमातापिता । सदगुरुघाता म्यां केलें ॥४७॥
श्रीरामाची जे राजधानी । ते तंव माझी सखी जननी ।
ते जैं भिगी अभिषिंचनीं । तैं मातृगमनी मी जालों ॥४८॥
ऐसी वाहोनियां आण । भरत राज्य न घेचि जाण ।
शीघ्र करावया वनप्रयाण । तेंही कारण अवधारा ॥४९॥
भरत जावोनि रामाप्रती । राज्य द्यावया रघुपती ।
अयोध्ये आणावा मागुती । ऐशा प्रीतीं जातसे ॥५०॥

वसिष्ठवाणीमुळे भारद्वाजांचे मतपरिवर्तन :

ऐकोनि भरताचें निर्वाण । भरद्वाजा विस्मय पूर्ण ।
हेरिखे नाचोनि आपण । दिधलें आलिंगन भरतासी ॥५१॥
पुढती नमन पुढती आलिंगन । पुढती त्याचे वंदी चरण ।
भरद्वाजासी प्रेम पूर्ण । आपणा आपण विसरला ॥५२॥
वाल्मीकिगुरूची आज्ञा पूर्ण । भगवद्‌भक्तां द्यावें आलिंगन ।
तेणें शरीर अति पावन । समाधान जीवाशिवां ॥५३॥
ऐसिया अनन्य प्रीतीं । भरतपूजनीं वाढली भक्त्ती ।
वसिष्ठ पूजावा ब्रह्ममूर्ती । उल्हास चित्तीं भरद्वाजा ॥५४॥
वसिष्ठ केवळ ब्रह्म पूर्ण । परम भाग्यें त्याचें आगमन ।
भरत रामभक्त अनन्य । करूं पूजन यथोक्त ॥५५॥

भारद्वाजांचे भरत,वसिष्ठांना सैन्यासह स्वागताचे निमंत्रण :

केलें वसिष्ठासी नमन । आजी माझें घ्यावे पूजन ।
माझें आश्रमीं निजभोजन । ऋषि जनसनयोगें ॥५६॥
वसिष्ठांसवें ऋषिगण । आले असती कोण कोण ।
ज्याचें करितां नामस्मरण । पुनश्चरण महादोषां ॥५७॥
कश्यप कात्यायन वामदेव । जाबालि मुद्गल मार्कंडेय ।
गौतम ऋषि महानुभाव । ऋषिसमुदाव निमंत्रिला ॥५८॥
मग बोलिला भरताप्रती । भोजना यावें तुम्हीं समस्तीं ।
आम्ही दिघे येऊं ऋषिपंक्ती । चाड बहुतीं तुज काय ॥५९॥
भरता जितुके तुझें कटक । अश्व गज अवघे रामसेवक ।
ते मज पूज्यापूज्य आवश्यक । त्या समस्तां देख आणावें ॥६०॥
समग्र सेना उतरावयासी । माझें आश्रमीं अवकाश त्यांसी ।
प्रेमें आज्ञापी भरतासी । अति उल्हासीं भरद्वाज ॥६१॥

पूर्वी जमदग्नींनी कामधेनूला पाचारण केले असता जो विपरीत अनुभव

आला तसा या वेळी येऊ नये म्हणून तपःसामर्थ्याने स्वागताची तयारी :

करावया ऋषींचे पूजन । जरी आणावी कामधेनु मागोन ।
तरी होईल जमदग्नीचें चिन्ह । राजे देखोनि अभिलाषिती ॥६२॥

समाधिमवलब्याथ भरतस्य तु पुजनें ।
वसिष्ठप्रमुखा विप्राः संप्राप्ता मेऽघ चाश्रमं ॥४॥
परमं रत्‍नमासाद्य दिव्यज्ञानान्वितो मुनिः ।
आतिथ्यार्थे भरद्वाजः स्वर्गभोगान्समानयत ॥५॥

स्वागत समारंभाचे सविस्तर वर्णन :

भरद्वाज महामुनी । बैसोनियां अनुष्ठानीं ।
स्वर्ग आणिला आकर्षूनी । पूजेलोगोनी अश्रामा ॥६३॥
घरें चत्वरें पट्टशाळा । अश्वशाळा गजशाळा ।
जनां बैसावया विश्रामशाळा । अति विशाळा विचित्र ॥६४॥
चित्रवन नंदनवन । तेथें आणिलें खांडववन ।
तेणें आश्रम शोभायमान । राजे ऋषिजन विस्मित ॥६५॥
घृतकुल्या मधुकुल्या । आम्ररसें वापी भरल्या ।
द्राक्षारसें नद्या वाहूं लागल्या । सरिता भ्रल्या दधिदुग्धें ॥६६॥
नानापरींच्या शिखरिणी । तेणें भरल्या पुष्करिणी ।
शर्करेचे पर्वत धरणीं । फळश्रेणी स्वादिष्ट ॥६७॥
चंपक कल्पद्रुम मांदार । पारिजातादि विचित्र हार ।
पूजावया ऋषि राजकुमर । सुमनसंभार सुवासी ॥६८॥
उगाळोनि शुद्ध चंदन । भरिले कनकाचे रांजण ।
षड्रसेंसीं दिव्यान्न । नानापक्वान्नपरवडी ॥६९॥
ऐसीं दिव्यान्नें पूर्ण सुवर्णताटीं । नानारसीं भरिल्या वाटी ।
परमानंदे पडे मिठी । शाखा गोमटीं लोणचीं ॥७०॥
ठायीं ठायीं अति निर्मळ । सुवासिक शीतळ जळ ।
सेवितांचे पै तत्काळ । सबाह्य सकळ निवताती ॥७१॥
दिव्यांगना अति सुंदरी । विंझणे घिवोनियां करीं ।
वीजिताति ढाळें करी । त्यासी जेवणारीं भाळिजी ॥७२॥
पाहतां त्यांच्या तोंडाकडे । जेवणें अंतरलें पुढें ।
जेवणार झाले वेडे । अंगनांकडे पाहतांचि ॥७३॥
त्याच्या मुखाची पाहतां वास । देखतां हावभावविलास ।
हातींचे हातीं राहिले घांस । जाला स्पर्श वायसाचा ॥७४॥
जेवण अंतरलें पुढे । सचैल स्नान करणें घडे ।
सकामी ठकले रोकडे । अति तफफडें तडफडतीं ॥७५॥
श्रीरामाचे निजभक्त । अंगनामुखीं नव्हती आसक्त ।
ग्रासोग्रासीं राम स्मरत । जाले तृप्त स्वानंदें ॥७६॥

कवले कवले रामं स्मृत्वां भुजंति योगिनः ।
तत्र भोक्ता हरिःसाक्षान्मुक्तः स्यान्नात्र संशयः ॥६॥

पंक्तीचा लाभ घेणारे रामनामस्मरणाने जन्ममरण मुक्त झाले :

ग्रासोग्रासीं श्रीराम स्मरत । त्या भोजनीं भोक्ता श्रीरघुनाथ ।
जेवणार ते नित्यमुक्त । श्रुतिसंमत शास्त्रार्थे ॥७७॥
ऐसिये भोजनाची स्थिती । सकाम हे निष्कामप्रयुक्ती ।
जे जे रसीं जी आसक्तीं । तो तो सेविती रस ॥७८॥
वसिष्ठताटीं परवडी चोख । तैसेचि ताट सेविती रंक ।
उंच नीच नाहीं देख । जेविलें कट्क समतृप्ती ॥७९॥
नलगे मागणें नाहीं वाढणे । ठायींचीं सरों नेणती अन्नें ।
जें जें आवडे ज्याकारणें । तें तें सेवणें तेणें गोडी ॥८०॥
क्षुधा हरपली तेथ । तृष्णा तृष्णेसी जाली तृप्त ।
तृप्त जालें सैन्य समस्त । कोणी अतृप्त असेना ॥८१॥
अश्व गज न खाती तृण । त्यासीही ओगरिले मिष्टान्न ।
कोरडे न पाजिती जीवन । करिती क्षीरपान स्वादिष्ठ ॥८२॥
चाटे भाटे उदमी लोक । वाणी वेव्हारे सकळिक ।
रजक आदिकरूनि चर्मक । एकैक तृप्त जाले ॥८३॥
वसिष्ठ भरत आणि शत्रुघ्न । ऋषींनीं केलें शुद्धाचमन ।
सभा बैसली प्रसन्नवदन । सुख संपूर्ण सर्वांसी ॥८४॥
टिळे माळा गंधाक्षता । विडे दिधले समस्तां ।
पूजिता श्रीरामाच्या भक्तां । उल्हासता भरद्वाजा ॥८५॥

या देवाभिलषित समारंभाला भ्रमर,शुक,सारीका,कोकिळा व वनसोभेची सुसंवादी सुरेल साथ :

वनश्री मघमघीत मनोहर । परागें उधळ्ती सपूर ।
सामगायनें अति मधुर । तैसे भ्रमर रुण्झुणती ॥८६॥
कोकिळा वेदवादें कूजती । वेदांत पारवीं घुमघुमिती ।
तांडव नाचे उमापती । तैसी नाचती मयूरें ॥८७॥
ब्रह्मज्ञानाच्या निजयुक्ती । फळाशा सांडोनि शुक बोलती ।
पिंगळे त्यासीं संवादती । संतोषती सारिका ॥८८॥
विवेकद्राक्षांचे पैं घड । देखतां डोळ्यांचें पुरे कोड ।
सकळ गोडियां ते गोड । सुखसुरवाड सेवलिया ॥८९॥
हाहाहूहू गंधर्व दिन्ही । मधुरस्वरें गाती गाणीं ।
रंभी उर्वशी विलासीनि । रंगी नाचणी नाचती ॥९०॥
प्रकाश न लोपे सुर्यापुढें । ऐसे रत्‍नदीप चोखडे ।
उजळले वाडेंकोडें । चहूंकडे लखलखित ॥९१॥
ज्या दीपांची जळजळ । पुढें काजळी माथां काजळ ।
ते मालवोनि सकळ । चिद्रत्‍नांचे उजळिले दीप ॥९२॥
प्रतिपुरुषा भिन्न ओवरी । रत्‍नमंचक त्यामाझारीं ।
पुरुषाप्रती पांच नारी । सेवेवरी तिष्ठती ॥९३॥
एकी करिती चरणक्षाळण । ऐकि त्या चरणां संवाहन ।
एकी चंदन एकी दिव्यव्यंजन । विडिया जाण एकी देती ॥९४॥
अप्सरा पुरुषांसी बोलती । आम्ही न येऊं अयोध्येप्रती ।
आजींची क्रमिलिया राती । जाऊं मागुती स्वर्गासी ॥९५॥
भरद्वाजाचे ध्यानज्ञानें । आमचें येथें आगमन ।
दिवस उगवताची जाण । स्वर्ग्गमन आम्हांसी ॥९६॥
जवळी असतां अप्सरांसी । श्रीरामभक्त उदास त्यांसी ।
भूतीं देखतां भगवंतासी । स्त्रीपुरुषांसी अभावो ॥९७॥
मुळीं आत्मा आत्मीं नाहीं तेथें स्त्रीपुरुष मिथ्या पाहीं ।
स्त्रीपुरुषभास भासे देहीं । ते देहबुद्धि नाहीं हरीभक्ता ॥९८॥
विषयी पुरुष सहितनारी । स्वर्ग भोगिती घरोघरीं ।
भरद्वाज ऐसियेपरी । पूजा करी भरताची ॥९९॥

सर्व उपस्थितांची तृप्ती :

कोणी नाहीं मळिन वास । कोणी नाहीं मळिनकेश ।
कोणी नाहीं मळिनभास । स्वर्गौल्हास सर्वांसी ॥१००॥
अश्व गज खर उष्ट्र । मिष्टान्ने भक्षिती तृणचर ।
जळप्राशनीं प्राशिती क्षीर । केले विचित्र भरद्वाजे ॥१॥
वाल्मीकिरामायणाआंत । स्वर्गभोग लिहिले बहुत ।
तितुका नाहीं वाढविला ग्रंथ । संकळितार्थ बोलिलों ॥२॥
भरद्वाजाचें परम ज्ञान । स्वगृहीं क्षणैक धरोनि ध्यान ।
स्वर्गभोगा आकर्षून । केले पूजन समस्तां ॥३॥
राव रंक समसमान । भरद्वाजें केले पूजन ।
आश्चर्य करिती सकळजन । भरत शत्रुघ्न विस्मित ॥४॥
स्वर्गी केवळ अमृतपान । देवांसी स्वर्गी न मिळे अन्न ।
अमृतासहित मिष्टान्न । दिधलें भोजन भरद्वाजें ॥५॥
नाहीं आणिली कामधेनू । नाहीं वेंचिले संचित धनू ।
स्वर्ग आणिला आकर्षूनू । क्षणार्ध ध्यान धरोनियां ॥६॥
ऐसे ऋषिवर्य बोलती । भरत शत्रुघ्न चकित चित्तीं ।
संवाद करिता सरली राती । उदयप्राप्ती होऊं आली ॥७॥

भारद्वाजांचा भरताला प्रेमाशीर्वाद :

भरत पुसे भरद्वाजासी । स्वामींनी आज्ञा द्यावी आम्हासी ।
जाऊं श्रीरामभेटीसी । म्हणोनि पायांसी लागला ॥८॥
भरद्वाजें आल्हादयुक्त । प्रीतीनें आलिंगिला भरत ।
चित्रकुटीं श्रीरघुनाथ । तुज निश्चित भेटेल ॥९॥
ऐकोनि भरद्वाजाची गोष्टी । भरतें बांधिली शकुनगांठी ।
चरण वंदिले लल्लाटीं । पाठी थापटी भरद्वाज ॥११०॥

भारद्वाजांचे सर्व ऋषींना वंदन, वसिष्ठांचा आशिर्वाद :

भरद्वाजें येवोनि आपण । वसिष्ठादि ऋषिगण ।
त्यांसी घातलें लोटांगण । वंदिले चरण वसिष्ठांचे ॥११॥
वसिष्ठाचे निजचरण । स्वर्गासी वोळणे पाकशासन ।
तुझनि चरणप्रभावें जाण । केलें पूजन भरताचें ॥१२॥
वसिष्ठ म्हणे भरद्वाजासी । सकळ्सिद्धि निगर्वापासीं ।
तेणें निगर्वें तूं नांदसी । वंद्य सर्वांसी तिहीं लोकीं ॥१३॥

सर्वांचे चित्रकुटी प्रयाण :

अनुमोदोनि भरद्वाजासी । ऋषि निघाले पुसोनि त्यासी ।
भरतें रथीं बैसवोनि समस्तांसी । निजसैन्यासी सिद्ध केलें ॥१४॥
शिबिके बैसवूनियां जननी । रथीं बंधु बैसले दोनी ।
लागली वाजंत्राची ध्वनी । गाडगर्जनी निघाले ॥१५॥
उअतरोनियां यमुनातीर । ठाकिला चित्रकुट गिरिवर ।
अवघीं केला जयजयकार । हर्षनिर्भर श्रीरामें ॥१६॥
देखोनि चित्रकुट पर्वत । भरत आनंदे नाचत ।
आजि भेटेल रघुनाथ । उल्हासयुक्त शत्रुघ्न ॥१७॥
भरता श्रीरामदर्शन । तें सुख बोलूं शकेल कोण ।
एकाजनार्दना शरण । जीवप्राण येरयेरां ॥१८॥
भरतां श्रीरामासीं भेटी । हरिखें ओसंडेल सृष्टी ।
सुख न बोलवे गोष्टी । पडे मिठी परब्रह्मीं ॥१९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
भरद्वाजाश्रमगमनभरतचित्रकूटपर्वतप्रवेशो नाम त्रयोदशोध्यायः ॥ १३ ॥
॥ ओंव्या ११९ ॥ श्लोक ६ ॥ एवं १२५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय तेरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *