भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सोळावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सोळावा

श्रीरामांकडून पिंडदानविधी

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

आघ्राय रामस्तं मूर्घ्नि परिष्वज्य च राघवं ।
अंके भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरं ॥१॥
क नु तेऽभूत्पिता तात यदरण्यं त्वमागतः ।
नहि त्वं जीवतस्तस्य वनमागतुमर्हासि ॥२॥
किंनु वीर महारण्ये तवागमनकारणं ।
कच्चिदॄशरथो राजा कुशली सत्यसंगरः ॥३॥
तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती ।
सुखिनी किच्चदार्या च देवी नंदती कैकेयी ॥४॥

श्रीराम भरतास अयोध्येचे कुशल विचारतातः

अति प्रीतीं रघुनंदन । भरत आणि शत्रुघ्न ।
हृदयी धरिले आलिंगोन । सुखसंपन्न तेणें दोनी ॥१॥
हृदया हृदय एक जालें । तेणें सुखाचें भरतें आलें ।
दुख निःशेष निमालें । सागर भरिले स्वानंदें ॥२॥
परमानंदें तृप्ति गाढी । द्वंद्वदुःखें देशोधडी ।
होत हरिखाचिया कोडी । जोडिला जोडी श्रीराम ॥३॥
मग भरतासी रघुनंदन । मस्तकीं करोनि अवघ्राण ।
अंकीं बैसवोनि जाण । काय आपण पूसत ॥४॥
तुज राज्याचें अभिषिंचन । न व्हावया काय कारण ।
तेथें पडिलें कोण विघ्न । तेंही संपूर्ण मज सांगें ॥५॥
दशरथ आमुचा पिता । सुखी आहे कीं स्वस्थचित्ता ।
मज वनवासा निघतां । बहु अवस्था तेणें केली ॥६॥
मज निघतां वनस्थळीं । तूं तेव्हां नव्हतासी जवळी ।
जळावेगळी मासोळी । तैसी तळमळी मजलागीं ॥७॥
देखोनि रायाच्या दुःखकोटी । मी निघालों उठाउठीं ।
नाही घेतली पुरती भेटी । नाहीं गोष्टी सांगितली ॥८॥
ऎसा राजा दुःखाभिभूत । तूं सांडोनि वना आलासी येथ ।
हें तंव तुझें गा अनुचित । बुद्धिवंत तूं नव्हेसी ॥९॥
दुःखित राजा स्वयें सांडून । दूरी पंथ अतिक्रमोन ।
तुम्हि कां दोघे आलेति जाण । तेंही कारण मज सांगा ॥१०॥
एक एकल्यावेगळे नव्हतां जाण । तुम्ही कां दोघीं घेतलें रान ।
कां राहीलें राज्याभिषिंचन । तेंही कारण मज सांगा ॥११॥
माझी तुझी सखी माता । आहेत कीं सुखें स्वस्था ।
सुमित्रा जे पतिव्रता । ते सुखरूपता आहे कीं ॥१२॥
स्वामी वसिष्ठ असतां तेथ । तुम्ही कां आलेति येथ ।
हा तुमचा निजवृत्तांत । इत्यंभूत मज सांगा ॥१३॥

भरत दिङमूढ झाल्यामुळे शत्रुघ्नाकडून वृत्त निवेदन :

ऎसे पुसतां रघुनंदन । ऎकतां भरता आलें रुदन ।
कांही नेदवे प्रतिवचन । मूर्छापन्न तो पडिला ॥१४॥
शत्रुघ्न सांगें दुःखावस्था । आम्ही अयोध्येसी न येतां ।
तुज वनवासासी जातां । प्राणांतव्यथा रायासी ॥१५॥
सुमंतें आणिला रिता रथ । देखोनि अति दुःखी दशरथ ।
श्रीरामा तुझी वार्ता पुसत पुसत । पडे मूर्छित धरणिये ॥१६॥
श्रीरामीं नव्हेचि गोष्टी भेटी । श्रीरामा न देखेचि दृष्टी ।
श्रीराम आठवितां कंठीं । पडिला सृष्टीं मूर्छित ॥१७॥
मूर्छेमाजि म्हणॆ आपण । श्रीरामा दाखवी कां वदन ।
श्रीराम स्मरतां संपूर्ण । स्मरणें प्राण सांडिला ॥१८॥
राम नयनीं राम वदनीं । राम मनीं राम ध्यानीं ।
श्रीराम धरोनि अनुसंधानीं । देह त्यजोनि गेला राव ॥१९॥
तुवां केलें वनप्रयाण । आम्ही जवळी नसतां जाण ।
करितां श्रीरमस्मरण । रायें प्राण सांडिला ॥२०॥

रामलक्ष्मण, सीता व सर्वांचा शोक :

ऎसें सांगतां शत्रुघ्न । दुखे मूर्छित पडिला पूर्ण ।
ऎकोनि पितयाचें मरण । मूर्छापन्न श्रीराम ॥२१॥
दुःखे सीता रुदनपर । दुःखे मूर्छित सौमित्र ।
चवघेही राजाचे राजपुत्र । जाले पात्र अति दुःखा ॥२२॥
पडतां श्रीरामाचे अश्रुबिंदु । दशरथासी सुखस्वानंदु ।
श्रीरामासी सुखवबोधु । परमानंदु दशरथा ॥२३॥
श्रीराम सुखरुप स्वतंत्र । करुणारुप उद्धरी पितर ।
दशरथ सुखी गेला साचार । सुखसागर श्रीराम ॥२४॥
श्रीराम जाला सावधान । त्यांसी सांगती भरत शत्रुघ्न ।
आम्ही केलें रायाचें विधान । स्नान पिंडदान तूं करीं ॥२५॥
तुवां करावें शीघ्र स्नान । पिंडदान तिळतर्पण ।
सपिंडी करोनियां जाण । कर्म पूर्ण करावें ॥२६॥
तुझी आवडी रघुनाथा । अत्यंत होती गा दशरथा ।
तुझेनि हातें पिंड देतां । सुखरुपता पावेल ॥२७॥
श्रीरामें करितां रुदन । समस्त पितर सनातन ।
अवघे जालें सुखसंपन्न । हें गुह्यज्ञान कळेना ॥२८॥

दशरथाची उत्तक्रिया :

श्रीरामाचे गुह्यज्ञान । नेणती कर्मवादी सज्ञान ।
त्यासी सांगती कर्मविधान । स्नान पिंडदान करीं श्रीरामा ॥२९॥
अगाधज्ञानी श्रीरघुपती । कर्मी ब्रह्मनिजप्रतीती ।
कर्मक्रिया जे वेदिक्तीं । ब्रह्मस्थिती प्रतिपाळी ॥३०॥
कर्मीं ब्रह्म ब्रह्मीं कर्म । ऎसें बोलती ते मूर्ख परम ।
कर्म तेंच निखिल परब्रह्म । ते जाणें वर्म श्रीराम ॥३१॥
श्रीरामें कर्मीं कर्मगती । श्रीरामें कर्मी ब्रह्मस्थिती ।
श्रीरामें कर्मी नित्यमुक्ती । श्रीराम निश्चितीं परब्रह्म ॥३२॥
ऎसा स्वयें श्रीराम ब्रह्ममूर्ती । तोहीं स्वधर्म पाळी वेदोक्तीं ।
ऎकता दशरथनिधनोक्ती । मंदिकिनीप्रति स्नानार्थ आला ॥३३॥
राम लक्ष्मण सीतेसहित । सर्वे श्तुघ्न आणि भरत ।
दशरथक्षयविधानार्थ । आले समस्त स्नानासी ॥३४॥
वसिष्ठ अत्यंत निजज्ञाता । तेणें कौसल्यासुमित्रादि श्रीरामाच्या माता ।
तेथें आणिल्या समस्ता । दुःखस्नानार्था एकत्‍न ॥३५॥
तिहीं देखतां रघुनाथा । दीर्घ रुदनें आक्रंदतां ।
श्रीरामा भेटलिया समस्ता । दुःखाभिभूत अति दुःखी ॥३६॥

कौसल्या वगैरे मातांच्या भेटी :

कौसल्येसी केले नमन । तिणें दिधलें दीर्घ आलिंगन ।
अश्रुधारा स्रवती नयन । प्रेम संपूर्ण मातेसी ॥३७॥
सुमित्रेचे चरणीं माथा । तितेंहि आलिंगिलें श्रीरघुनाथा ।
तैसीयाचि माता समस्ता । होय वंदित श्रीराम ॥३८॥
कौसल्येसी नमितां लक्ष्मण । तिणें सप्रेम दिधलें आलिंगन ।
तुझे केशीं झाडीन चरण । तूं संरक्षण करीं श्रीरामा ॥३९॥
सांडोनियां निजमातापिता । सांडोनि स्वभोग सुंदर कांता ।
वनीं रक्षीसी श्रीरघुनाथा । दासी सर्वथा मी तुझी ॥४०॥
श्रीरामीं अर्पिसी स्वादिष्ठ फळें । नित्य मस्तकीं वाहसी जळें ।
काष्ठें पुरविसी प्रबळें । दासी केवळ मी तुझी ॥४१॥
लक्ष्मण म्हणे अवो माते । मी तंव तुझें पोसणें येथें ।
मज उद्धरिलें श्रीरघुनाथें । पुढती चरणांतें वंदिलें ॥४२॥
सौमित्रें वंदिली सुमित्रा । तिणें आलिंगिलें निजपुत्रा ।
म्हणे तुवां उद्धरिलें उभय पितरां । श्रीरामचंद्रा सेवोनी ॥४३॥
सौमित्रे निजमाता । स्वयें वंदिल्या समस्ता ।
कौसल्यें आलिंगिली सीता । पतिव्रता होसी सर्वथा तूं माये ॥४४॥
सीतेनें घातलें लोटांगण । वंदिले सुमित्रेचे चरण ।
तिणें दिधलें आलिंगन । आक्रंदें रुदन त्या करिती ॥४५॥
आलिंगिता श्रीरघुनाथा । दुःख विसरल्या निजमाता ।
देखोनि वल्कलें जटा माथां । अति विस्मिता तटस्थ ॥४६॥
देखतां श्रीरामाचें मुख । विसरोनियां सकळ दुःख ।
माता पावल्या परम सुख । सुखदायक श्रीराम ॥४७॥
वसिष्ठ म्हणे श्रीरघुनंदना । शीघ्र करोनियां स्नाना ।
द्यावें दशरथासी पिंडदाना । जेष्ठविधान पितृप्रिय ॥४८॥
चवघे बंधु समस्त माता । सवें घेवोनियां सीता ।
श्रीराम झाला स्नान करिता । श्रीदशरथा उद्धरावया ॥४९॥

पिंडदान, गयागदाधरदर्शन :

श्रीरामें करावया पिंडदान । तिळ तांदूळ यव तूर्ण ।
भरतें आणिले आपण । ते रघुनंदन न घेची ॥५०॥
मी नाहीं सेवीत अन्न । करितों वनफळांचे भक्षण ।
त्या फळांचे पिंडदान । करीन आपण पितरार्थ ॥५१॥
मज वनवासाचें दृढव्रत । अन्न हातीं नाहीं स्पर्शित ।
इंगुदी पुन्नाग अति पवित्र । पिंड पितरार्थ देईन ॥५२॥

स्मृति-यदन्नाः पुरुषा लोके तदन्नास्तस्य देवताः ॥

जे काळीं पुरुषासी जें जें अन्न । तेणें करावें देवतायजन ।
तेणेंचि पितरांसी पिंडदान । स्मृतिवचन वेदोक्त ॥५३॥
सौमित्रें इंगुदीफळें मर्दून । सीता दे पिंड वळून ।
श्रीराम करी पिंडदान । कुशास्तरण याम्याग्र ॥५४॥
आणोनियां आरण्य तिळीं । अवघीं दिधल्या तिळांजुळी ।
तर्पण करितां कृष्णतिळीं । जालें ते काळी अपूर्व ॥५५॥
आब्रह्मादिभुवन । सर्व ऋषि पितृ मानव ।
ऎसें उच्चारितां राघव । अति अपूर्व तेथें जाले ॥५६॥
पिंड देतां श्रीरघुनाथ । गयागदाधर ओढवी हात ।
आब्रह्मादि कुळ समस्त । जालें नित्यतृप्त श्रीरघुनाथें ॥५७॥
तुवां देतां तिळोदक । अब्रह्मभुवनींचें लोक ।
तेहि झाले नित्यमुक्त । परम सुख पावले ॥५८॥
ऎसें बोलोनि उत्तर । अदृश्य जाला गदाधर ।
वसिष्ठें केला जयजयकार । तारिलें पितर श्रीरामें ॥५९॥
श्रीराम स्वयें आत्माराम । त्याचें कर्म तें परब्रह्म ।
तो उच्चारी जयाचें नाम । विश्रामधाम तो पावे ॥६०॥
जपतां रामनामोक्ती । चारी पुरुषार्थ पायां लागती ।
चारी मुक्ती आंदण्या येती । एवढी ख्याती नामाची ॥६१॥
श्रीरामाचें वनप्रयाण । करावया दीनोद्धारण ।
एका विनवी जनार्दन । पितृतर्पण सिद्ध जालें ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामदशरथसपिंडीकरण नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
॥ ओंव्या ६२ ॥ श्लोक ४ ॥ एवं ६६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सोळावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सोळावा

1 thought on “भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सोळावा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *