संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा

दशरथाचे प्राणोत्क्रमण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

गुहकाकडे सुमंताचा मुक्काम :

येरीकडे सुमंत गुहक । श्रीराम गेलियावरी देख ।
रामविरहें पावले दुःख । तोचि श्लोक अवधारा ॥१॥

कथयित्वा तु दुःखार्तः सुमंत्रेण चिरं सह ।
गंगपारे गते रामे जगाम स्वपुरं गुहः ॥१॥
भरद्वाजाभिगमनं प्रयागे च सभाजनम् ।
अगिरेर्गमनं तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् ॥२॥
अनुज्ञातःसुमंत्रोथ योजयित्वा हयोत्तमान् ।
अयोध्यामेव नगरीं प्रययौ गाढदुर्मनाः ॥३॥

पुसोनि सुमंता गुहकासी । श्रीराम बैसोनि नावेसीं ।
गेलिया गंगापरतीरासी । लागली दोघांसी टकमक ॥२॥
न लागतां पातया पातीं । दोघे श्रीरामासी पाहती ।
दृष्टी अंतरल्या रघुपती । दोघे पडती मूर्च्छित ॥३॥
जरी दोघे जाले सावधान । तरी रामविरहें अति दुर्मन ।
अश्रुधारा वाहती नयन । करिती स्मरण रामनामें ॥४॥
वाचे रामनामस्मरण । रामरूपी जडले नयन ।
हृदयीं धरलिया रघुनंदन । दुर्मन तें सुमन होय श्रीरामें ॥५॥
गुहक म्हणे सुमंतासी । राम भेटल्या एक निशी ।
आम्हांसी अवस्था जालि ऐसी । मग अयोध्येसी काय होय ॥६॥

दूतांतर्फे श्रीरामाच्या निवासाची माहिती :

गुहकें धाडिलें दूतासी । श्रीराम कोणे वनवस्तीसी ।
स्थिर होईल वनप्रदेशीं । त्या वार्तेसी आणावया ॥७॥
गुहकें आपुलिया ग्रामासी । आदरें आणिलें सुमंतासी ।
दूत आणितील वार्तेसी । तोंवरी त्यासी राहविलें ॥८॥
दूत सांगती गुहकासी । श्रीराम जावोनि प्रयागासी ।
भेटी देवोनि भारद्वाजासी । स्थिरनिवासी चित्रकूटीं ॥९॥
सुमंते ऐकोनि वार्ता । वेगी संजोगोनी रथा ।
गुहका पुसोनि तत्वतां । होय निघता अयोध्येसी ॥१०॥

सुमंत्रमभिधावंतः शतशोऽध सहस्त्रशः ।
क्व राम इति पृच्छतः सूतमभ्यद्रवन्नराः ॥४॥

सुमंताचे अयोध्येत परत येणे, तेथील विलाप :

सुमंत आला देखोन । धार्विनले नागरिक जन ।
सांग रामा कोणें स्थळीं सोडून । तुझें आगमन सुमंता ॥११॥
सुमंत एकासी सांगे गोष्टी । तंव आले शतसहस्त्र लक्षकोटी ।
रिता रथ देखोनि दृष्टीं । पडिले सृष्टीं मूर्च्छित ॥१२॥
नरनारी आक्रदंत । सुमंत नव्हे हा कुमंत ।
वनीं सांडोनि रघुनाथ । आला येथें काळतोंडा ॥१३॥
सुमंत आलियावरी । आकांत मांडिला नगरीं ।
चरफडित नरनारी । घरोघरीं आरडती ॥१४॥
जळॊ याचें काळें मुख । आला नगरा द्यावया दुःख ।
निंदिती सकळ लोक सन्मुख । अधोमुख सुमंत ॥१५॥
राजपत्‍न्या शतें सात । रिता देखोनियां रथ ।
त्याही सुमंताते निंदित । सोडोनि रघुनाथ हां कां आला ॥१६॥
रामापासून उफराटा । मी कां आलों करंटा ।
दुखें पिटित ललाटा । धिक् धिक् अद्दष्टा निर्लज्जा ॥१७॥
श्रीराम सांडिलियापाठीं । निंद्य होइजे सकळ सृष्टीं ।
रामरूपीं चळल्या द्दष्टी । पापें कोटी पदोपदीं ॥१८॥

सुमंताला पाहून राजा बेशुद्ध :

निजनिंद्यत्वें स्वयें निंदित । तेणेंचि दुःखे अति दुःखित ।
महाद्वारीं सोडून रथ । आला सुमंत राजभवना ॥१९॥
पुत्रदुःखे दुःखी पूर्ण । गेली कळा हीनदीन ।
कृष्णवर्ण दिसे विवर्ण । अति उद्विग्न नृपनाथ ॥२०॥
एकला देखोनि सुमंत । म्हणे नयेचि कां रघुनाथ ।
ऐसें बोलोनियां दशरथ । पडे मूर्च्छित धरणीये ॥२१॥

सुमंताकडून राजाला निवेदन :

मग सुमंतें आश्वासोन । राजा केला सावधान ।
आला सुमंत देखोन । काय आपण बोलत ॥२२॥

राजा तु रजसा सूतं ध्वस्तांगं समुपस्थितम् ।
अश्रुपूर्णमुखं दीनमुवाच परर्मातवत् ॥५॥
क्क नु वत्स्यति धर्मात्मा वृक्षमूलमुपाश्रितः ।
किमुवाच वचा रामः किमुवाच च लक्ष्मणः ॥६॥
सुमंत्र वनमासाद्य किमुवाच च मैथिली ।
आसितं शयितं भुक्तं सूत रामस्य कीर्तय ॥७॥

राजा म्हणे सुमंतासी । कोणे ठायीं कोणे वस्तीसीं ।
राम काय बोलुनी तुजपासीं । तुज मजपासीं पाठविलें ॥२३॥
काय बोलली सती सीता । श्रीरामाची अति पढियंता ।
लक्ष्मण काय जाला बोलता । ते समूळ कथा मज सांगे ॥२४॥
सांडोनि राजभोग निजकांता । सांडोनियां मातापिता ।
वनीं सेवूं गेला रघुनाथा । त्या लक्ष्मणापरता धन्य नाहीं ॥२५॥
धन्य ते सती सीता । धन्य तो लक्ष्मण भ्राता ।
धन्य जन्म श्रीरघुनाथा । पितृवचनार्था प्रतिपाळी ॥२६॥
त्यांसी कोठे मिळाले अन्न । तिहीं कोठे केलें भोजन ।
अश्रुधारा गळती नयन । मूर्च्छापन्न पुनः पुनः ॥२७॥
तिहीं कोठें केले शयन । काय आस्तरण प्रावरण ।
कोणें केले चरणसंवाहन । प्रातर्बोधन कोणीं केले ॥२८॥
त्यांची समूळ सांगे वार्ता । मी काय करूं रे सुमंता ।
धीर न धरवे माझ्या चित्ता । श्रीरघुनाथावांचोनी ॥२९॥
श्रीराम सीता चालती चरणीं । हे म्यां विरुद्ध केली करणी ।
म्हणोनि गडबडां लोळें धरणीं । कैकेयीवैरिणीं वैर केलें ॥३०॥
जंव जंव आठवी रघुनाथा । तंव तंव उभड न धरवे चित्ता ।
धीर न धरवे सर्वथा । हृदयस्फोटता होऊं पाहे ॥३१॥
त्यांचे वनवासाची वार्ता । वेंगी सांग रे सुमंता ।
काही सुख होईल चित्ता । श्रीरामकथा परिसोनी ॥३२॥

उत्तीर्णायां तु गंगायामहमामंत्र्य राघवम् ।
अनुज्ञातो निवृत्तोऽस्मि धार्मिकेण महात्मना ॥८॥

सुमंत सांगे रायासी । श्रीराम उतरतां गंगेसीं ।
रथ पाठविला तुम्हांपासीं । आपण वनवासी पदाभिगमन ॥३३॥
माझा पित अति वृद्ध जाण । माझे वियोगें दुःखे अति निमग्न ।
सुमंता त्यासी द्यावें आश्वासन । शीघ्र आगमन नेमांती ॥३४॥
चवदा वर्षे वनवासांती । मी येईन शीघ्र गतीं ।
ऐसें सांगविलें तुम्हांप्रती । मजहातीं श्रीरामें ॥३५॥

वनवासात निराहार राहून तीन रात्र जलपान :

त्यांचे वनवासलक्षण । तृपर्णांचें आस्तरण ।
वल्कमांचे प्रावरण । प्रातर्बोधन पक्ष्यांचे ॥३६॥
तिहीं नाहीं केलें भोजन । नाहीं केलें फळभक्षण ।
त्रिरात्रीं तिघें जण । केलें जळपान दिनांती ॥३७॥

दशराथाचा प्राणान्त करणारा विलाप :

ऐसी ऐकतांची गोष्टी । राय मूर्च्छित पडिला सृष्टीं ।
दुःखें होत हृदयस्फोटी । ललाट पिटी आक्राशें ॥३८॥
गळीं अडकला जेंवी मासा । तो जीवें न मरे चरफडी जैसा ।
दशरथाची तैसी दशा । मोहफांसीं विलपत ॥३९॥
सुमंता माझा पूर्वोपकार । तुज झाला असेल साचार ।
तरी रथीं घालोनि रघुवीर । आणीं सत्वर मजपासीं ॥४०॥
श्रीराम भाक न सांडी सर्वथा । तो परतोनि न ये मागुता ।
मजचि वाहोनियां रथा । नेईं तत्वतां वनवासा ॥४१॥
काय करूं मी सुमंता । श्रीरामासवें गेली गती ।
श्रीरामासवें गेली चित्तवृत्ती ।
श्रीरामासवें गेली मती । प्राण रामाप्रती जाऊं पाहे ॥४३॥
रामरूपीं जडेल नयन । रामरूंपीं जडेल मन ।
रामापासीं जातील प्राण । सत्य जाण सुमंता ॥४४॥

दशरथाचे ’राम राम’ म्हणतच दुःखद निधन :

श्रीरामाचे रुप गुण । आठवितां मूर्च्छा आली पूर्ण ।
मूर्च्छेसवें गेला प्राण । रामस्मरण करीतचि ॥४५॥
राम राम करितां स्मरण । स्वयें दशरथें सांडिला प्राण ।
मन बुद्धि इंद्रिये जाण । रामार्पण तेणें केलीं ॥४६॥
आवडी श्रीरामीं धरोइ पोटीं । राम राम जपतां वाक्पुटीं ।
देह त्यजोनि रामसृष्टीं । रिघे वैकुंठी दशरथ ॥४७॥
सप्रेम आवडीं धरिला राम । दृष्टीं न सोडी श्रीरामप्रेम ।
वाचें स्मरतां श्रीरामनाम । मरणधर्म दशरथा ॥४८॥
मनीं राम ध्यानीं राम । नयनीं राम वदनीं राम ।
ऐसा स्मरतां राम राम । प्राणोत्क्रमण रायासी ॥४९॥
करितां श्रीरामाचें स्मरण । विस्मरणासी आलें स्मरण ।
तंव श्रीरामीं जडला प्राण । देहनिर्वाण दशरथा ॥५०॥
श्रीरामाच्या अति प्रीतीं । देह त्यागिला भूपतीं ।
कौसल्या सुमित्रा जंव पाहती । तंव मरणप्राप्ती दशरथा ॥५१॥
जेंवी आरसा पालथा करितां । प्रतिरूप न दिसे पाहतां ।
तेंवी श्रीराम वना जातां । राया दशरथा निजमृत्यु ॥५२॥
निःशेष पाझरलिया घटजळ । जेवीं घटचंद्र लोपे तत्काळ ।
न देखतां श्रीराममुखकमळ । मरे तत्काळ दशरथ ॥५३॥
सूर्य पावतां अस्तमाना । जेंवी अंधकार कोंदे गगना ।
तेंवी अंतरता रघुनंदना । पावला मरणा दशरथ ॥५४॥

कौसल्येचा विलाप :

रामविरहें उठाउठीं । दशरथें सांडिली सृष्टी ।
राणिवसां बोंब उठी । कपाळ पिटी कौसल्या ॥५५॥
राम धाडिला वनसंकटीं । राय निघाला वैकुंठीं ।
कैकेयी पावली सुखसंतुष्टी । राज्यपटीं ते बैसो ॥५६॥
वना दवडिला श्रीरघुनाथा । निःशेष निमाला दशरथ ।
कैकेयीचा मनोरथ । सुखस्वार्थ पावला ॥५७॥

कैकेयीचा धिक्कार :

राज्यलोभें परम दुःख । त्याचा कैकेयीस हरिख ।
क्षुरें अभिषेका समस्तक । राज्यसुख भोगावया ॥५८॥
पतिअंतकाळीं काळें वक्त्र । त्यावरी मस्तकीं धरा छत्र ।
शीस बोडोनि साचार । युग्मचामरें ढाळावीं ॥५९॥
पतीस आगीं घालोनि आधीं । कैकेयी बैसवावी गजस्कंधीं ।
हाका बोंबांचिये पैं नादीं । राज्यपदीं अभिषेका ॥६०॥
पुत्र भोंवंडूनी दोन्ही । कैकेयी बैसवावी सिंहासनीं ।
रायासी पिंडदान देऊनी । राजभवनीं कैकेयी ॥६१॥
रायासी करोनि घटस्फोट । कैकेयीस विस्तारावें ताट ।
बत्तिस वाटियांचे उभ्दट । चोखट षड्रसीं ॥६२॥
रायासी देतां तिळोदक । गोत्रकुंटुंबासी दुःख ।
तंव तंव कैकेयीस हरिख । राज्यसुख भोगावया ॥६३॥
असो हें कैकेयीचें कथन । वना गेला रघुनंदन ।
राजा पावलासे निधन । सहगमन करीन मी ॥६४॥
कैकेयी राहील राज्यभोगासी । मी जाईन पतीसरसीं ।
क्षणार्ध राहतां वैधव्यांसी । पापरासी पदोपदीं ॥६५॥
पति जळतां धडाधडां । आगीं न रिघती रांडवा मूढा ।
तोडावी गळसरी फोडावा चुडा । सुखभोग पुढां तो ऐका ॥६६॥
काजळ कुंकूं नाहीं चंदन । दावूं नये काळें वदन ।
मासमासासी मूंडण । अति दंडण लाजेचें ॥६७॥
विधवा शोभनीं अशोभन । जीतप्रेत ते विधवा प्राण ।
विधवा मुख्य अपशकुन । सुख कोण जिण्याचें ॥६८॥
केवळ देहलोभासठीं । जे जे बैसे रांड पटीं ।
स्वप्नीं सुखासी नाहीं भेटी । दुःखकोटी अनिवार ॥६९॥
वैधव्याचें महादुःख । सोसूं शके कैकेयी एक ।
भोगावया राज्यसुख । अति कौतुक वैधव्या ॥७०॥

कौसल्या सहगमनार्थ सिद्ध , राण्यांचा शोक :

वैधव्यांचें दुःख दारुण । तें मी न साहे अर्धक्षण ।
करितां राजदेहदहन । सहगमन करीन मी ॥७१॥
देखोनि कौसल्येचे रुदन । राजपत्‍न्या घेती वदन ।
दुःखे तोडिती केश कान । मूर्च्छापन्न पैं एकी ॥७२॥
एकी कपाळ स्वयें घेती । एकी वक्षःस्थळ पिटिती ।
एकी अति दुःखे पडती । एकी रडती अति शोकें ॥७३॥
एक दुःखवियोग रघुनाथा । दुसरें मरण राया दशरथा ।
तिसरें वैधव्य आले माथां । मूळ अनर्था कैकेयी ॥७४॥
भोगावया राज्यपटा । कैकेयीची वरदनिष्ठा ।
तिघां केलिया ती वाटा । या मुख्य चेष्टा मंथरेच्या ॥७५॥
श्रीरामासी वनप्रयाण । दशरथासी त्वरित मरण ।
यासी मंथरा मुख्य कारण । तिचें कान नाक छेदावें ॥७६॥
राजपत्‍न्या अति प्रवळ । दुःखे करिती हलकल्लोल ।
आले नागरिक सहळ । अति कोलाहल नगरांत ॥७७॥
आक्रंदोनि नरनारी । शोक करिती घरोघरीं ।
बोंब पडली राजद्वारीं । सेनानी मंत्री चरफडती ॥७८॥

नागरिकांकडून कैकेयीचा धिक्कार :

श्रीराम घालितां बाहेरी । अवदसा आली नगराभीतरीं ।
राजा निमाला दुखेंकरीं । घरोघरीं आकांत ॥७९॥
कैकेयीचें काळें तोंड । तिणें वाढविलें वरदबंड ।
तीस मंथरा मिळोनि लंड । दुःख वितंड वाढविलें ॥८०॥
जिचेनि निमाला निजकांत । ते कैकेयीचा करावा घात ।
मंथरा घालोनि चुनखडियांत । राज्य़ीं रघुनाथ अभिषेकाचा ॥८१॥
वेगीं लक्ष्मण आणा येथ । तो साधील सर्वकार्यार्थ ।
ऐसें बोलती जन समस्त । तळमळीत अति दुःखें ॥८२॥
निर्लज्ज कैकेयीचा वृत्तांत । ना राम ना दशरथ ।
शेखीं ईसी त्यजील भरत । वृथा अनर्थ इणें केला ॥८३॥
भरत स्वधर्मशीळ सात्विक । सप्रेम श्रीरामाचा सेवक ।
तो न पाहे इचें काळें मुख । त्यासही दुःख इयें दिधलें ॥८४॥
कैकेयीनें केलें जें चरित्र । भरत मानील अपवित्र ।
पति निमाला त्यजील पुत्र । सखे सावत्र दुःखी केले ॥८५॥
श्रीराम गेला वनांतरीं । हे वार्ता ऐकिल्यावरी ।
भरत न राहेल क्षणभरी । तोही रानभरी इयें केला ॥८६॥
जळो तिचें काळे मुख । निजपति मारिला निःशेख ।
पुत्र दुराविले निर्दोष । जगासी दुःख इचेनि ॥८७॥
कैकेयी पाहे ज्यां समोर । ते म्हणती झांकीं मुख अपवित्र ।
सन्मुख थुंकती सर्वत्र । करिती मरमर नरनारी ॥८८॥
अवो रांडे अवो मूढे । अवो कैकेयी काळतोंडे ।
म्हणॊनि तिचे नांवे फोडिती धोंडे । अति उदंड निंदीती ॥८९॥
कैकेयी पावली परम दुःख । जगीं दाखवूं न शके मुख ।
दीवाभीताऐसीं देख । लपे निःशंक अंधारीं ॥९०॥
राजगृहीं कोलाहल । नरनारी दुःखी प्रबळ ।
तेथे पावले सुहृद सकळ । आले तत्काळ ऋषिवर्य ॥९१॥

मार्कंडेयोऽथ मौदल्यो वामदेवश्च कश्यपः ।
कात्यायनस्तु जाबालिगौतमश्च महायशाः ॥९॥

राजाच्या निधनानंतर अनेक ऋषींचे आगमन :

दशरथें थोर थोर । नगरीं राहविलें ऋषीश्वर ।
ते समस्त आले सत्वर । अति पवित्र ते ऐका ॥९२॥
मार्कंडेय मौद्रल्या उत्तम । कात्यायन जाबालि गौतम ।
कश्यप वामदेव परम । पवित्र नामें जयांची ॥९३॥
ते समस्तही ऋषी । वेगीं आले राजसभेसी ।
प्रधान आले तयांपाशी । राजदेहासी दहनार्थ ॥९४॥
एक म्हणती करावें दहन । एक म्हणती पुतत्रेंवीण ।
कोण देईल दाहो जीवन । अधिकार पूर्ण पुत्रासी ॥९५॥

प्रधानादिकांचे आगमन , दहनविधीची चर्चा :

रायाचे जे प्रधान । ते राजपुत्रासमान ।
निःसंतानियाचें दहन । अयोग्य प्रधान सपुत्रिका ॥९६॥
सिद्ध असतां धर्मपत्‍नी । तीस योग्यता पतिदहनीं ।
हा अधिकार वंध्येलागोनी । नाहीं पुत्रजननीस पैं योग्य ॥९७॥
ऋषी बोलती सज्ञान । येथ वसिष्ठाचें प्राधान्य ।
तो काहीं न बोले वचन । राजदहनसंस्कारा ॥९८॥
बुद्धिंवत बोलती गाढे । कैकेयीपुत्र येईल पुढें ।
तंव राजदेहा पडती किडे । दहन रोकडे करावे ॥९९॥
ऐसे ऋषींचे अनुवाद । करिती संवादविवाद ।
वसिष्ठ मर्यादा अगाध । कार्यावबोध तो जाणे ॥१००॥
जाणे कर्मधर्मज्ञान । जाणे वेधशास्त्र विधान ।
जाणे ब्रह्मसमाधान । त्यासमान आन नाहीं ॥१॥
जयाच्या वचनासाठीं । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
त्याचे ज्ञानाची अगाध गोष्टी । दुजा सृष्टीं असेना ॥२॥

वसिष्ठांनी तेलाने भरलेल्या नौकेत राजाचा देह ठेवला :

तेणें वसिष्ठें येवोनि आपण । तैलद्रोणींत राजा घालोन ।
जेणे देह निर्विकार जाण । केलें रक्षण अति यत्‍नें ॥३॥
शीघ्र भरताचें आगमन । यदर्थीं सुमंत अति सज्ञान ।
वसिष्ठें देवोनि सन्मान । त्वरें प्रयाण करवित ॥४॥

भरताला आणण्यास सुमंताला पाठविले :

सुमंता तुंवा येचि काळीं । तूं आप्त एक रायाजवळी ।
भरत आणावा तत्काळीं । मायामातुळीं जो आहे ॥५॥
शीघ्र बैसोनियां रथासीं । जावें गिरिव्रज नगरासी ।
भेटोनि कैकय भूपतीसी । भरत रातोरातीं आणावा ॥६॥
करोनि वसिष्ठासी नमन । सुमंतें शीघ्र केले गमन ।
मार्गी आठवितां श्रीरामाचे गुण । करी रुदन पुनः पुनः ॥७॥
श्रीरामाचे रूप गुण । आठवितां विरह पूर्ण ।
एकाजनर्दना शरण । पुढील निरूपण अवधारा ॥८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
दशरथप्राणोत्क्रमणं नाम दशमोऽधायः ॥ १० ॥
॥ ओव्या १०८ ॥ श्लोक ९ ॥ एवं ११७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय दहावा