भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवदावा
श्रीरामांकडून दुष्ट कावळ्याला शिक्षा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
चित्रकूटावर श्रीरामांची दैनंदिन चर्या, लक्ष्मणाची सेवा :
येरीकडे श्रीरघुनाथ । चित्रकूट पर्वताआंत ।
अग्निहोत्र सीता समवेत । नित्य वेदोक्त प्रतिपाळी ॥१॥
श्रीरामसेवेसी सौमित्र । पर्णशाळा केली विचित्र ।
श्रीरामाचें अग्निहोत्र । अहोरात्र संरक्षी ॥२॥
विचित्र आणी फळें मुळें । नित्य निर्वाह पुरवी जळें ।
काष्ठें आणोनियां प्रबळें । अग्नि सोज्ज्वळ स्वयें रक्षी ॥३॥
रामसीतेचें चरणक्षाळण । नित्या नेमें करी लक्ष्मण ।
जैसीं लक्ष्मीनारायण । या बुद्धीं पूर्ण पूजित ॥४॥
विधिविधान जाणे श्रीराम । दर्शपौर्णमासिक होम ।
मृगमांसें होमसंभ्रम । चालवी नेम सौमित्र ॥५॥
श्रीरामाचे सेवेवरी । शरीर वंचीना तिळभरी
धनुष्यबाण घेवोनि करीं । मृगें मारी होमार्थ ॥६॥
धन्य त्या मृगांचें जीवित । त्यांचे मासें होम करी श्रीरघुनाथ ।
ज्यांची फळें स्वयें सेवित । ते वृक्ष नित्यमुक्त श्रीरामे ॥७॥
इध्माबर्हिकुशास्तरण । श्रीरामें उद्धरले तृण ।
पायांतळी येती पाशाण । तेहि जाण नित्यामुक्त ॥८॥
सन्मान करिता निर्मळ नीरें । तेथे उद्धरिलीं मत्स्य मगरें ।
वनवासी श्रीरामचंद्रें । वनी वनचरें उद्धरिलीं ॥९॥
करावया जगदुद्धारण । श्रीरामाचें वनप्रयाण ।
ज्या ज्या घडलें रामदर्शन । ते ते जाण उद्धरिलीं ॥१०॥
श्रीराम देखावया दृष्टीं । पाहिजेत भाग्याचिया कोटी ।
धन्य धन्य तेचि सृष्टीं । ज्यांसी भेटी श्रीरामीं ॥११॥
श्रीरामकथा नित्य श्रवण । सावध परिसे तो धन्य धन्य ।
निर्लोभ रामकथा-पठन । त्याचेनि पावन जडमूढ ॥१२॥
त्याचे मुखीं श्रीरामनाम । धन्य धन्य त्याचा जन्म ।
भक्तीनें नित्य स्मरती नाम । त्यांसी श्रीराम उद्धरी ॥१३॥
ऐसा श्रीराममहिमा गहन । बोलतां वेदां पडे मौन ।
तं मी केंवी बोलों दीन । कथानिसंधान अवधारा ॥१४॥
श्रीरामाचें अग्निहोत्र । चालवावया अति तत्पर ।
मृग मारोनि अति पवित्र । आणिले सत्वर लक्ष्मणें ॥१५॥
पूर्णिमाअमावास्यादि याग । श्रीराम ते वधी मृग ।
यागार्थ केले विभाग । मांसार्थी काग तेथें आले ॥१६॥
सीतेला आश्रमात ठेवून लक्ष्मण फळे आणावयास वनात
गेला असता सीतेवर गंधर्वरूपी कावळ्याचे आक्रमण :
लक्ष्मण आणावया गेला फळें । मासार्थी टपती कावळे ।
राम सीतेसी म्हणे अबळे । हीं पक्षिकुळें निवारी ॥१७॥
तद्रामवचनात्सीता काकेभ्यः पर्यरक्षत ।
इतश्चेतश्च तां काको वारयंती पुननुनः ॥१॥
यरया हारांतरचरः कामचारी विहंगमः ।
काकेनारोध्यमानां तां सा मुमोह तदातुरम् ॥२॥
पक्षतुंडनखाग्रैश्च कोपायामास कोपनाम् ।
सीतामभिपपातैव ततश्चुक्रोध राघवः ॥३॥
सीता रामाचे आज्ञेवरी । सवेग येवोनि बाहेरी ।
स्वयें कागातें निवारी । राजकुमारी सुकुमार ॥१८॥
सुंदर देखोनियां तिसी । सुदसुव गंधर्व अभीलाषी ।
धरोनियां कागवेषासी । सीतेपासीं तो आला ॥१९॥
स्वयें हांकिता सीता सती । इतर काग तत्काळ पळती ।
तो पळेना कामासक्ती । पुढतपुढती झेंपावे ॥२०॥
काग हांकितां सरोखें । सुटलें कंचुकीचें पाखें ।
पालव चळला अंगझोकें । तंव हृदय देखे तो काग ॥२१॥
मुक्तकुच दिसे सुंदरी । हार रुळे कुंचावरी ।
देखोनि काग कामाचारी । हृदयावरी झेंपावी ॥२२॥
पांखें झडपोनियां तिसी । नखें ओरबाडिलें कुचासी ।
चंचूनें चुंबोनि मुखासी । केली कामाचारी अधर्मीं ।
हृदयाआरामीं वचरत ॥२४॥
काग बैसला हृदयावरी । सीता कराग्रें निवारी ।
चंतुक्षतें करितां करीं । हाका मारी आक्रोशें ॥२५॥
सीतेचा आक्रोश ऐकून श्रीरामांनी कावळ्यावर इषीकास्त्र ( दर्भाचे अस्त्र ) सोडले :
ऐकोनि सीतेची दीर्घ हांक । वेगीं आला रघुकुळटिळक ।
दुष्ट देखोनियां काक । दर्भशिखा देख मोकलिली ॥२६॥
सोभिमंत्र्य शरैषीकामैषीकास्त्रेण वीर्यवान् ।
काकं तमभिहतः ससर्ज पुरुषर्षभः ॥४॥
स तेनाभिहतः काकास्त्रींल्लोकान्पपर्यगात्ततः ।
यत्र यत्रागमत्काकस्त्रत्र तत्र ददर्श ह ॥५॥
इषीकां भूतसंकाशा स राम पुनरागमत् ।
सीतायास्तत्र पश्यंत्या मानुषीमैरयद्रिरम् ॥६॥
ते श्रीरामाची दर्भशिखा । इषीकामंत्रें मंत्रोनि देखा ।
सोडितां पाठी लागली काका । धगधगीत अर्कसमप्राय ॥२७॥
सवेग पळतां काका । पाठी लागली इषीका ।
परिभ्रमता तिहीं लोकां । पाठीलाग देखा सोडीन ॥२८॥
तो कावळा हतबल, आगतिक होऊन शेवटी नारदांच्या सागण्यावरून श्रीरामांना शरण :
श्रीरामइषीका देखोन । इंद्र सांडी सिंहासन ।
तेथें काकासी राखे कोण । करी पलायन देवांपासीं ॥२९॥
श्रीरामइषीका देखोन । इंद्र कुबेर वरुण ।
धाकें करिती पलायन । यमही आपण चळीं कांपे ॥३०॥
श्रीरामइषीका देखोन । कुळाचळ कंपायमान ।
इषीका वंदी चतुरानन । घाली लोटांगण शिव भवानी ॥३१॥
काग जाय जे जे ठायीं । इषीका पावे लवलाहीं ।
काक हिंदतां लोकीं तिहीं । ठाव नाहीं रहावया ॥३२॥
धाकें काक रिघे पाताळीं । तेथें दैत्यदानव कांपती चळीं ।
श्रीरामइषीका करील होळी । तिहीं तत्काळीं दवडिलें ॥३३॥
काक हिंडतां दशदिशीं । अत्यंत जाला कासाविसी ।
कोठें न लभे आश्रय त्यासी । तेणें नारदांसी देखिलें ॥३४॥
धरिलें नारदाच्या पायांसी । म्हणे इषीका निवारीं देवऋषी ।
तो म्हणे शरण रिघें रामासी । तो शरणागतासी न मारी ॥३५॥
ऐकोनि नारदाचें वचन । काकें केलें पुनरागमन ।
श्रीरामा तुझ्या चरणां शरण । माझें प्राण वांचवी ॥३६॥
वंदोनि श्रीराम लोटांगणी । काक बोलें मनुष्यवाणी ।
इषीका धगधगती देखोनी । आश्चर्य मानी जानकी ॥३७॥
कावळा मनुष्यवाणीने श्रीरामांची प्रार्थना करतो :
काम म्हणे गा रघुनाथा । थोर अपराधा माझें माथां ।
शरण आलों मी तुज सर्वथा । न मारावें आतां राघवा ॥३८॥
नारदसद्गुरूचें वचन । तेणें मी तुज आलों शरण ।
शरणागताचें रक्षण । माझें मरण तें निवारीं ॥३९॥
मरणाभेणें जी पळतां । थोर शिणलों गा रघुनाथा ।
सद्गुरूने हांत ठेविला माथां । म्हणोनि आता शरण आलों ॥४०॥
नारदे सांगितलें कानीं । जानकीं माता जगज्जननी ते ।
म्यां अभिलाषिली कामेंकरूनी । मातृगमनी महादोषी ॥४१॥
महापातकें ज्याच्या माथां । तोही श्रीराम स्मरतां ।
पातकें जावोनि तत्वता । होय सरता वैकुंठी ॥४२॥
श्रीराम दों अक्षरांसाठी । पातकें जळती कोट्यानुकोटी ।
तो नर सरता होय वैकुंठीं । बैसे पाटीं ब्रह्मयाच्या ॥४३॥
श्रीरामनामाचा प्रताप । पापें निर्दळती आकल्प ।
माझें तंव पाप अल्प । मी निष्पाप श्रीरामें ॥४४॥
श्रीरामनाम स्मरतां वाक्पुटीं । कलिकल्मषां होय तुटी ।
तो श्रीराम देखतां दृष्टीं । पापाची गोष्ट मज नाहीं ॥४५॥
श्रीराममूर्ति आणितां ध्यानीं । सकळ पापा होय धुणी ।
तो श्रीराम देखिला नयनीं । पाप त्रिभुवनीं मज नाहीं ॥४६॥
ऐसें बोलोनि आपण । काकें वंदिले श्रीरामचरण ।
सीतेसी घातलें लोटांगण । म्हणे कृपा पूर्ण मज करीं ॥४७॥
सीतेच्या स्तनांचे चुंबन घेतल्याबद्दल कावळ्याची क्षमायाचना :
म्हणे कुचाग्रीं लावितां हात । बाळकाची सत्ता बहुत ।
तैसें मी तुझें ज्येष्ठ अपत्य । जाण निश्चित जानकी ॥४८॥
एक कुच धरोनि हातीं । दुजा घाली मुखाप्रती ।
बाळसत्तेची ख्याती । तें तुजप्रती म्यां केले ॥४९॥
पतीस कुचसता एकांती । बाळकासी कुचसता लोकांती ।
ते म्यां केलें तुजप्रती । जाण निश्चिती जानकिये ॥५०॥
पतीस कुचसता मध्य रात्रीं । बाळकाची सत्ता अहोरात्रीं ।
तें म्यां केलें तुजप्रती । जाण निश्चितीं जानकिये ॥५१॥
रजस्वला जालिया कांता । पतीने शिवों नये सर्वथा ।
तेथेंही बाळक होय झोंबता । तैसे तत्वतां म्यां केलें ॥५२॥
करेकरोनियां जाण । बाळक करी कुचप्राशन ।
म्हाही करेंकरोनि पूर्ण । केलें स्तनपान तुझें मातें ॥५३॥
गाईचा गोरा गाईवरी उडे । तरी मातेसी कोप न चढे ।
ते म्हणे तान्हें बाळक वेडें मजकडे पाहीं माते ॥५४॥
तूं तंव चराचरजननी । आम्हीं अपत्यें पशुसमानी ।
क्षोभ न धरावा मनीं । सखी जननी तूं आम्हां ॥५५॥
सीतेची दयाबुद्धी व श्रीरामास प्रार्थना :
ऐकोनि काकाचें बोलणें । सीता कळवळिली निजमनें ।
यासी राखावें जीवें प्राणें । कृपा करणें श्रीरामा ॥५६॥
तुझेनियां बोले । म्यां यावरी निर्वाण केलें ।
तें नवचे निवारिलें । अटक पडिलें जानकिये ॥५७॥
ऐकें स्वामी रघुनाथा । मारूं नये शरणागता ।
कैसेनि याच्या करिसी घाता । यासी सर्वथा रक्षावें ॥५८॥
सर्वशक्तीं सर्वसत्ता । स्वयें रक्षावें शरणागता ।
ऐसी ब्रीदें तुझी रघुनाथा । कैशापरी आतां या वधिसी ॥५९॥
इषीका अनिवार निश्चित । तरी राखावा शरणागत ।
तैंच तुझें सत्य व्रत । प्रताप यथार्थ पैं तुझा ॥६०॥
जिणें मारविलें कागातें । तेंचि म्हणे वाचवां त्याते ।
ऐसें लाघव केलें रघुनाथें । स्वयें कर्मातें अलिप्त ॥६१॥
कळला काकाचा वृत्तांत । जाणॊनि सीतेचें मनोगत ।
काय बोलिला श्रीरघुनाथ सावचित अवधारा ॥६२॥
अमोघं क्रियतामस्त्रमेकमंग परित्यज ।
किमंग शातयतु ते शरैषीका ब्रवीहि मे ॥७॥
एतावद्धि मया शक्यं तव कर्तुं प्रियं खग ।
एकांगहीन ह्यस्त्रेण जीवितं मरणाद्वरम् ॥८॥
अस्त्रांचे अमोघत्व रक्षण करण्यासाठी कावळ्याचा एक डोळा नष्ट केला :
ऐकोनि सीतेचा वचनार्थ । काकासी नाभीं म्हणे श्रीरघुनाथा ।
तुझें वांचवावया जीवित । ऐक हितार्थ सांगेन ॥६३॥
इषीका अनिवार निश्चित । तिणें करावा तुझा प्राणांत ।
परी तूं जालासी शरणागत । यालागीं तिष्ठत राहिलीसे ॥६४॥
इषीका अनिवार दारूण । तुवां वांचवावया प्राण ।
एकांग देसी आपण । तेणें निवारण चालेल ॥६५॥
तुझ्या हितालागीं जाण । तुज मी सांगतों आपण ।
एकांग करोनि क्षीण । आपुला प्राण वांचवीं ॥६६॥
काक म्हणे श्रीरघुनाथा । तुझी आज्ञा मी वंदिन माथां ।
एकांग घे सुखरूपता । इषीकाघात चुकवावें ॥६७॥
श्रीराम म्हणे काकासी । कोण अंग तूं देतोसी ।
तें देवोनि इषीकेसी । तुज निश्चयेंसी राखीन ॥६८॥
काक म्हणे ऐक आतां । माझे इंद्रियांची व्यवस्था ।
अपराध असेल ज्याचे माथां । त्याचे करीं घाता इषीकास्त्रें ॥६९॥
उजव्या डोळां जानकी माता । डावेनि अभिलाषिली तत्वतां ।
इषीका घालोनि त्याचे माथां । त्यासी रघुनाथां दंडावें ॥७०॥
ऐसी ऐकतांची वाणी । इषीका प्रवेशे वामनयनीं ।
काम मुर्च्छित पडे रणीं । रामें तत्क्षणीं सावध केला ॥७१॥
घेतला माझा वाम नयन । हें कागासी नाहीं ज्ञान ।
मी जालों अंगहीन । हेहीं चिन्ह तो नेणें ॥७२॥
मागें पाहताचि त्या काका । न देखतांचि इषीका ।
हर्षें वंदी रघु्कुळटिळका । माझ्या मरणदुःखा निवारिलें ॥७३॥
अद्यापि काकदेहीं नवलाहो । जराजर्जरित न पवे क्षयो ।
श्वापदीं धरितां कां लागली घावो । तोचि पहाहो मृत्यु काका ॥७४॥
श्रीरामांची कृपा लाभल्यामुळे दोन डोळ्यांचे कार्य एका डोळ्याकडे आले :
यापरी श्रीरामराव । काकाचा वारिला मृत्युभाव ।
समस्तां वाटला नवलाव । कृपाळु पहा हो श्रीराम ॥७५॥
जो तो म्हणे काक काणा । हें दुःख काकाचिये मना ।
जग निंदितें मज जाणा । श्रीरामें व्यंकणा मी केलों ॥७६॥
कृपेनें वांचविलें संपूर्ण । ते कृपेस आलें व्यंकणपण ।
ऐकोनि हांसला रघुनंदन । काय वचन बोलिला ॥७७॥
सामर्थ्य देतों उजव्या बुबुळा । एकचि बुबुळ दोहीं डोळां ।
तुझी वाढेल देखणी कळा । देखणा सकळांमाजि होसि ॥७८॥
कृपेचें जें देखणपण जाण । जो तो जाण स्वयें वानी ॥७९॥
दशाहाच्या पिंडासी । देखणेपण आहे काकासी ।
त्यातें देखे पापराशी । त्यां पिंडासी नातळे ॥८०॥
श्रीरामकृपेस्तव जाण । पापपुण्याचे देखणेपण ।
काकासी पावलें संपूर्ण । दशाहचिन्ह जग देखे ॥८१॥
कावळ्याने सीतेच्या स्तनांचे चुंबन घेतल्याबद्दल नरकतुल्य किळसवाणी घाण भक्षण करण्याचा त्याला शाप :
चंचूनें चुंबिलें सीतेसी । तेणें मुखें भक्षितो निरयासी ।
रामें देखणें दिधल्या डोळ्यासी । पापपुण्यासी तेणे देखे ॥८२॥
ऐसियापरी रघुनंदनें । काकाचें निवारिलें मरणें ।
वाचचिला देखणेपण । समाधानें सुखी केला ॥८३॥
शरण आणोनी काकासी । श्रीरामें सुखी केलें सीतेसी ।
काका वांचवोनि कृपेसी । महादोषियासी सुखी केलें ॥८४॥
तंव येरीकडे निजभरत । श्रीरामभेटीसी उद्यत ।
गजभारेंसीं असे येत । तोही कथार्थ अवधारा ॥८५॥
श्रीरामभरतां आलिंगन । तेणें जीवशिवां समाधान ।
एकाजनार्दना शरण । आनंदघन श्रीरामकथा ॥८६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
काकनिग्रहो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
॥ ओव्या ८६ ॥ श्लोक ८ ॥ एवं ९४ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवदावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवदावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवदावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय चवदावा