भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा

श्रीरामपादुकांना पट्टाभिषेक

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांची त्यागबुद्धी पाहून सुमंताची अवस्था :

श्रीरामाचें वनप्रयाण । ते काळींचे निर्लोभपण ।
सुमंत आठवी आपण । श्रीरामीं मन दृढ जडलें ॥१॥
त्या त्यागाची निजगती । दावोनी गेला श्रीरघुपती ।
ते सुमंत स्मरे अति प्रीतीं । त्यागस्थिती ते ऐसी ॥२॥
असत्य त्यजिजे जेंवी पवित्रें । तेंवी त्यागी राज्यालंकार वस्त्रें ।
वना निघतां श्रीरामचंद्रे । केलें वल्कलांबर परिधान ॥३॥
जेवीं निंदा त्यजिजे साधुसंतीं । तेंवी राज्यवैभवसंपत्ती ।
सर्वही त्यजोनि रघुपती । निघे वनाप्रती वल्कलांबरीं ॥४॥
रजकस्पर्शाचें जीवन । जेंवी नातळती साधुजन ।
तेंवी सांडोनि राज्यादि धनमान । निघे रघुनंदन वनवासा ॥५॥
राज्यातील अणुप्रमाण । श्रीराम काहीच नेघे जाण ।
त्यजोनियां पादत्राण । निघाला आपण वनवासा ॥६॥
देखोनि श्रीरामनिर्याण । त्यापूर्वीच सीता लक्ष्मण ।
करोनि वल्कलें परिधान । वनाभिगमनीं उल्हासी ॥७॥
जंव जंव तपे सूर्य तीव्रता । तंव तंव कमळीं शोभा अधिकता ।
तेंवी एकाकी राम वना जातां । लक्ष्मण सीता उल्हासी ॥८॥

लक्ष्मण व सीतेला श्रीरामसेवेचे भाग्य लाभेल ते आपणास न लाभल्यामुळे सुमंताला विषाद :

देखोनी पूर्णिमापूर्णचंद्र । चकोरां आल्हाद अपार ।
तेंवी वना रिघतां श्रीरामचंद्र । सीता सौमित्र उल्हासी ॥९॥
एकाकी राम वना जातां । सफळ सेवा आमची आतां ।
येणें भावार्थै लक्ष्मण सीता । उल्हासता वना गेलीं ॥१०॥
जेंचि रघुनाथाचें गमन । दशरथाचें प्राणोत्क्रमण ।
स्थळींचें आटतां जीवन । प्रतिबिंब पूर्ण हारपे ॥११॥
पुढोनि नेतांचि दर्पण । स्वयें हारपे प्रतिवदन ।
तेंवी वना जातां रघुनंदन । दशरथें प्राण सोडिला ॥१२॥
निःशेष आटतां जळ । मीन मरे न लागतां पळ ।
तैसा राम वना जातां केवळ । दशरथें तत्काळ प्राण सांडिला ॥१३॥
श्रीराम जगाचें जीवन । तोचि दशरथा मृत्युकारण ।
राम राम म्हणतां जाण । रायें निजप्राण सांडिला ॥१४॥
राम प्रवेशतां वनस्थळीं भरत शत्रुघ्न मायामातुळीं ।
तेही जरी असते जवळी । जाते तत्काळीं वनवासा ॥१५॥
मीच अभाग्यें अभाग्य पूर्ण । श्रीरामनिजसेवा सांडून ।
कां अयोध्ये आलों परतोन । म्हणोन रुदन करी मार्गीं ॥१६॥
श्रीरामसेवा होय प्राप्त । त्याचें भाग्य अति समर्थ ।
मी अभागीं घेवोनि आलों रथ । म्हणॊनि रडत मार्ग क्रमी ॥१७॥

मातुलगृही भरताला दुःस्वप्न :

पुढील कथानुसंधान । मातुळीं भरत शत्रुघ्न ।
भरतासी जालें दुष्ट स्वप्न । तेहीं कथन अवधारा ॥१८॥
भरतें मातुळीं देखिलें स्वप्न । अशिरीं तैलाभ्यंजन ।
भरत स्वप्नलक्षणाचें जाणे चिन्ह । आक्रंदे रुदन मांडिलें ॥१९॥
गजबजोन आला मातुळ । पुसे व्यर्थ रुदना काय मूळ ।
येरु म्हणे अति प्रबळ । दुःखमूळ आम्हां झालें ॥२०॥
जें म्यां देखिलें आजि स्वप्न । त्याचें आहे ऐसें लक्षण ।
आम्हां पांचांमाजि एक जण । निश्चयें मरण पावेल ॥२१॥
माझें स्वप्न नव्हे व्यर्थ । राजा अथवा रघुनाथ ।
लक्ष्मण शत्रुघ्न कां मी भरत । एकाचा जीवघात होईल ॥२२॥
आणि निजसज्जनांची भेटी । बहुकाळ होईल तुटी ।
बोलतां बाष्प दाटे कंठी । पडिला सृष्टीं मूर्च्छित ॥२३॥
कैसेनि राम देखेन दृष्टीं । आक्रंदे हांक दिधली मोठी ।
केंवी दशरथेंसीं होईल भेटी । म्हणोनि पिटी ललाट आक्रंदोन ॥२४॥
मातुळ म्हणे सुमुहूर्त कुमुहूर्त कवणातें ॥२५॥

वसिष्ठांनी केलेली योजना :

तंव अयोध्येसी श्रीवसिष्ठ कुळगुरु अति वरिष्ठ ।
अर्थ परमार्थ जाणे श्रेष्ठ । विचार चोखट तेणें केला ॥२६॥
भरतासी राज्याभिषिंचन । न करितां नव्हे राजदहन ।
यालागीं भरताचें आगमन । अति त्वरेनें पाहतसे ॥२७॥
न सांगावे राजमरण । विशेषें श्रीरामाचें गमन ।
अवचटें ऐकतांचि जाण । तत्काळ प्राण सांडील ॥२८॥
उत्तम वस्त्रें अलंकारांसी । देवोनि सुमंत प्रधानासी ।
त्वरेंने भेटावें भरतासी । अति शीघ्रतेसीं आणावें ॥२९॥

सुमंताचे भरताकडे आगमन :

भरतासी रसिक वचनीं । मातुळ करी संबोखणी ।
तंव सुमंत पावला तेच क्षणीं । अयोध्यापाटणीं कुशल सर्वां ॥३०॥
भरते पाहिलें सुमंताकडे । तुझी शोभा कां क्षीण पडे ।
हृदयीं दुःख दाटलें गाढें । तें मुखापुढे दिसतसे ॥३१॥
अश्रुपूर्ण तुझे नयन । मार्गीं आलासी करीत रुदन ।
वार्ता सांगसी लज्जायमान । हीन दीन मुख तुझें ॥३२॥
अंगुष्ठ धरूनि मस्तकावरी । तुज सुख नाहीं तिळभरी ।
बुडालासी दुःखसागरीं । चांचरी वैखरी दुःखाभिभूत ॥३३॥

सुमंताबरोबर भरतशत्रुघ्नांचे अयोध्येकडे प्रयाण :

असो तुझ्या दुःखाची कथा । मजचि जाणें आहे आता ।
विलंब करूं नये सर्वथा । शत्रुघ्नेंसीं रथारूढ जाला ॥३४॥
रथ प्रेरिला त्वरेसीं । ठाकोनि आले अयोध्येसी ।
अयोध्या पाहतां चौपासीं । दुःख भरतासी आसंडलें ॥३५॥
जेथें श्रियेसीं श्रीरामनिवास । जेथें दशरथ वसे क्षितीज ।
ते अयोध्या दिसे उद्वस । जैसें कां ओस शकुंतनीड ॥३६॥

अयोध्येचे बदललेले स्वरूप :

पहातां अयोध्येची शोभा । आरक्त धुईं दाटली नभा ।
रोहिणी मृग भेदोनि वृषभा । ग्रहचकीं उभा शनि भौम वक्र ॥३७॥
अयोध्यामंडळीं असाधाराण । क्रूर भासती ग्रहहणा ।
तेणें अयोध्येचें लक्षण । अति विलक्षण दुर्भगत्वें ॥३८॥
तंव राजद्वारी छत्रभंग । मृत्युप्राय लोकलिंग ।
राजभवनीं अति उद्वेग । सौभाग्यभंग राजपत्‍न्यां ॥३९॥
पुढें पाहे राजभवनीं । राजा देखिला तैलद्रोणीं ।
थोर गजबजला मनीं । अश्रु नयनीं लोटले ॥४०॥
राजा गेला सांडोनि सृष्टी । आतां श्रीरामीं घालीन मिठी ।
म्हणोनि धावला उठाउठीं । तंव तोही दृष्टी दिसेना ॥४१॥

सुमंताकडून वृत्तांतकथन, भरताचा विलाप :

मंत्री गुह्य सांगे कानीं । कैकेयीयें राम दवडिला वनीं ।
हे मुख्यत्वें मंथ्रेची करणी । सीता चरणीं धाडिला वना ॥४२॥
मग आक्रंदें दिधली हाक । श्रीरामा दाखवीं रे निजमुख ।
माझे सुखाचें तूं निजसुख । मज वंचोनि देख गेलासी ॥४३॥
म्यां सांडोनियां तुझी संगती । गेलों मायामातुळाप्रती ।
हे देखोनि माझी अभक्ती । मज तुवां निश्चितीं त्यागिलें ॥४४॥
सांडोनि तुझा निजसंग । मायामातुळीं भोगितां भोग ।
तेणें तुजसीं जाला वियोग । मी परम अभाग्य श्रीरामा ॥४५॥
जितुकी विषयांची आसक्ती । तितुकीं विघ्नें श्रीरामप्राप्ती ।
विषय तेचि भवबंधनप्राप्ती । नरकगती निजविषयें ॥४६॥
विष विषय समानस्थिती । परंतु विषया अधिक शक्ती ।
विष भक्षिल्या एकदां मरती । जन्ममरणपंक्तीं विषयेंची ॥४७॥
विषयांचे जे विषयभोग । तोचि इंद्रादिकां पदभंग ।
विषय तोचि मुख्य क्षयरोग । नित्य आघात तो विषय ॥४८॥
असो इतरांची इतर गती । मीच ठकलो विषयासक्तीं ।
राम अंतरला हातोहातीं । मायामातुळाथितीं विषयत्वें ॥४९॥
मायामातुळविषयस्थिती । श्रीरामें त्यजिली निश्चितीं ।
जेथवरी विषयप्रीती । त्या रामप्राप्ती । कदा न घडे ॥५०॥
जेथवरी मानाभिमान । जयासी ज्ञानगर्व गहन ।
त्यासी न भेटती श्रीरामचरण । प्रत्यक्ष प्रमाण मज घडलें ॥५१॥
मज घडलें अति दूषण । अंगीं आदळलें लाछन ।
जळो माझें बंधुपण । श्रीरामचरण अंतरले ॥५२॥
जो मी होतो निजाअत्मबंधु । तो मी जालों अति अबंधु ।
राम अंतरला कृपासिंधु । मी भाग्यमंद अति दुःखी ॥५३॥
कैकेयी अविद्येचा बाधु । बंधु तें केलें अबंधु ।
लाविला सापत्‍नसंबंधु । राम कृपासिंधु अंतरला ॥५४॥
अंतरला सुखावबोधु । अंतरला स्वानंदकंदु ।
अंतरला निजात्मबंधु । राम परमानंदु अवतरला ॥५५॥
दशरथें केले परलोकप्रयाण । श्रीरामसवें दिधला प्राण ।
मी वाचलों असें पाषाण । अति कठिण उलगडेना ॥५६॥
वना जातां श्रीरामरावो । राजा गेला सांडूनि देहो ।
मी महापातकी उरलों पहाहो । देहमोहो छेदवेना ॥५७॥
दूरी जातां रघुनाथ । तत्काळ देह त्यागिला दशरथे ।
मी पापी उरलों भरत । अद्यापी मृत्यु मज नये ॥५८॥
दूरी जातां श्रीरामासी । दशरथें सांडिलें देहासी ।
मी उरलो पापराशी । द्वंद्वदुःखासी भोगावया ॥५९॥
अद्यापी मज नये मरण । तरी मृत्यु निमाला आपण ।
काळाचें जालें काळें वदन । माझें देहबंधन छेदवेना ॥६०॥
रामविरहें धडफुडा । मृत्यु निमाला बापुडा ।
मी राहिलो काळाचा काकडा । दुःखाचा हुडा अतिदुःखी ॥६१॥
श्रीराम वना जाता जाण । मृत्युनें सांडिला आपुला प्राण ।
आतां मजला मारील कोण । मी पापी पूर्ण उरलोंसें ॥६२॥
जीतां जीववेना रामाविण । काळ निमाला न ये मरण ।
माझें अति शयें दुःख दारुण । निवारी कोण रघुनाथा ॥६३॥

भरताचा रामवियोगामुळे आक्रोश :

ऐसी बोलत बोलतां बोली । धरणीवरी अंग घाली ।
श्रीराम माझी निजमाउली । केउती गेली चुकवोनी ॥६४॥
श्रीरामा मजला देईं भेटी । सांगेन जीवींच्या गुह्यगोष्टी ।
श्रीरामचरण न देखें दृष्टीं । म्हणॊनि पिटी लल्लाट ॥६५॥
राम माझा निजात्मा । राम माझा जिवात्मा ।
राम माझा परमात्मा । तो कां आम्हा विसरला ॥६६॥
केउता गेलासी श्रीरामा । भेटी देइजे मेघश्यामा ।
धांव पाव लवडसवडी ।
मजलागीं घालोनि उडी । माझ्या दुःखकोडी निवारीं ॥६८॥
राघवा वेगें येरे येरे । मजलागीं तूं कडिये घेरे ।
मी तुझें लडिवाळ कीं रे । अतिदुःखभरें पीडिलों ॥६९॥
राम माझी गतीची गती । राम माझी स्थितीची स्थिती ।
राम माझी मुक्तीची मुक्ती । तो हातोहातीं अंतरला ॥७०॥
श्रीरामसंगती अति गोड । लक्ष्मण परिपाकें अति सुरवाड ।
मी रामसंगतीवांचून मूढ । उरलों कांकडमूग जैसा ॥७१॥
रघुनाथाचा निजसांगती । धन्य लक्ष्मण त्रिजगतीं ।
मी मायामातुळ संगतीं । दुःखावर्ती अति दुःखी ॥७२॥
लक्ष्मण बंधुत्वें अति अभाग्य ।
सकळ दुःखीं व्यापिलें अंग ।
तरी अंगभंग नव्हे माझा ॥७३॥
तुंबिणीच्या फळाची स्थिती । एका होती यंत्रीपात्र हातीं ।
एका दुस्तरीं तारक होती । एकक प्राशिती रुधिरातें ॥७४॥
एक शुद्धसंगती । मधुरवचनीं देती विश्रांती ।
तैसी अशुचिही गती । संगप्राप्तिपरिपाक ॥७५॥
लक्ष्मण शत्रुसंगती । तारक विश्रांति त्रिजगतीं ।
मी मायामातुळस्थिती । दुःख प्राप्ती रुधिरप्राय ॥७६॥

कैकेयीची निर्भर्सत्‍ना :

राम मज नित्य निवनी । राम जीवाशिवांचा गोसावी ।
राम सुखानंद जान्हवी । कैकेयीयें अवघी केरडी केली ॥७७॥
राम मज निजीं निजवी । राम जीवेंवीण जीववी ।
राम माझी स्वानंदपदवी । तें कैकेयीयें अवघी वंचिली भेदें ॥७८॥
राम माझें मुख्य मुदल । राम माझें नित्य भांडवल ।
राम माझें निजबळ । तें कैकेयीयें केवळ भेदें वंचिलें ॥७९॥
राम माझें निजजीवन । राम माझें निजांजन ।
राम माझें निजधान । तें कैकेयीयें चोरोन नेलें भेदें ॥८०॥

मंथरेवर क्रोधदृष्टी :

आम्ही सखे निजात्मबंधु । ते कैकेयीयें केला व्यर्थ भेदु ।
मुख्यत्वें सापत्‍नविरोधु । मंथरे सुबद्ध वाढविला ॥८१॥
भोळी कैकेयी बापुडी । मंथरें बुद्धी दिधली कुडी ।
श्रीराम केला देशोधडी । अयोध्या रोकडी घातली दुःखी ॥८२॥
तिच्या करीन मी घातासी । म्हणोनि धावन्नला वेगेंसीं ।
मंथरा धरोनि आणिली केशीं । क्रोधें हातवसी खर्गातें ॥८३॥
इचेनी वनवासी रघुनाथ । इचेनी निमाला दशरथ ।
इचेनि अयोध्येसी आकांत । जगा दुःखावर्त इचेनि ॥८४॥
सवतीमत्सराचें बंड । इणें वाढविलें प्रचंड ।
इचेनि कैकेयीचें काळें तोंड । इसी दुखंड करीन मी ॥८५॥
हे सूर्यवंशासी दुःखाची आगी । हे सख्यां सुहृदां योगभंगी ।
इचेनि अंतरला लक्ष्मण भ्राता ।
इणें दशरथ गिळिला पिता । ते मी आतां छेदीन ॥८७॥
इणें केलें थोर अनर्था । इचेनि वैधव्य मायेच्या माथां ।
माजही घातलें दुःखावर्ता । ते मी आतां छेदीन ॥८८॥
इचेनि आम्हां रामीं तुटी । इचेनि आम्ही पोरें पोरटीं ।
इचेनि आम्ही दीन सृष्टीं । ते मी उठाउठीं वधीन ॥८९॥

वसिष्ठ त्यापासून भरताला परावृत्त करतात, गो-ब्राह्मण-स्त्री अवध्य :

तिचा करावया प्राणांत । भरत खर्गेसीं उद्यत ।
वसिष्ठे धांवोनि धरिला हात । म्हणे स्त्रीघात करू नये ॥९०॥
करूं नये स्तियेच्या घाता । उपेक्षूं नये निजमाता ।
मूर्ख म्हणों नये पिता । जरी तत्वतां अपंडिता ॥९१॥
मानों नये द्विजाचा विटाळ । अतीत दवडूं नये भुकाळ ।
साधूस करूं नये छळ । नये करूं शत्रकल्लोळ स्त्रियेसी ॥९२॥
गो ब्राह्मण स्त्री बंधू । वधायोग्य केलिया अपराधू ।
तरी करूं नये यांचा वधू । तूं भरता प्रसिद्धु विवेकी ॥९३॥
गुरुवाक्य नुल्लंघावें सर्वथा । नावरेचि क्रोधावस्था ।
मंथरे हाणितल्या लाथा । अति निघाता निष्ठुरत्वें ॥९४॥
लाथेसरसी तळीं पडे । निघातें तिचा माज मोडे ।
शरीर तीं ठायीं वांकडें । तेणें त्रिवक्रा पडे नाम तीस ॥९५॥
जिणोनियां राक्षसांसी । राम आलिया अयोध्येसीं ।
मंथरा लागेल पायांसी । मज दशा ऐशी श्रीरामस्वामी ॥९६॥
राम म्हणेल तुज उजू करितां । विषम वाटेल बंधु भरता ।
स्वभावें मज मथुरे जातां । तुझ्या मनोगता मी करीन ॥९७॥
ते राम जपे अहर्निशीं । तेणे सुवासिक आणिलें चंदनासी ।
कृष्णें चचोर्नियां निजांगासी । कुब्जा नीचदासी उभ्दरिली ॥९८॥
हे बोलिलों प्रसंगता । मंथरा ते कुब्जा तत्वतां ।
पुढे काय वर्तलें भरता । तेही कथा अवधारा ॥९९॥

अभिषेक करून घेण्यास भरताचा वसिष्ठांना नकार :

वसिष्ठ बोलिला वचन । न करितां राज्याभिषिंचन ।
करू नये राजदहन । राज्याभिषिंचन तुज करूं ॥१००॥
ऐसें ऐकताचि वचन । भरतासी चालिलें सुदन ।
दुःखभरितें आलं दारुण । तत्काल प्राण त्यजूं पाहे ॥१॥
श्रीराम गेलियापाठीं । जरी मी बैसेन राज्यपटी ।
अवघ्या ब्रह्महत्या ज्या सृष्टी । त्या माझ्या लल्लाटीं निक्षेपोत ॥२॥
वना गेलिया रघुनाथा । पट्टाभिषिंचन होय भरता ।
महादोषांच्या ज्या ज्या वार्ता । त्या त्या समस्ता म्यां केल्या ॥३॥
रामचंद्र गेलिया वना । जरी मी घेईन अभिषिंचना ।
तरी शूद्र भागी द्विजविधवांगना । त्या गर्भस्थाना मी जाय ॥४॥
सकळ रजस्वलेचें रुधिर । तेणें अभिषेका माझें शरीर ।
परी राज्याभिषेकाचें नीर । तें मी अणुमात्र स्पर्शेना ॥५॥
श्रीरामाची राजधानी । ते जाणा माझी जननी ।
ते जैं भोगिजे अभिषिंचनीं । तैं मातृगमनी मी जालों ॥६॥
वसिष्ठा स्पर्शतों तुझें चरण । वाहतॊं रघुनाथाची आण ।
राज्याचें अभिषिंचन । प्राणातींही करूं नेदीं ॥७॥

शत्रुघ्नाची अवस्था :

वसिष्ठ पाहे शत्रुघ्नाकडे । तंव तो बोलेना पैं रडे ।
श्रीरामविरहें झालें वेडें । मागें पुढे स्मरेना ॥८॥
विसरला तो घरदार । विसरला तो इंद्रियव्यापार ।
विसरला निजशरीर । तदाकार होवोनि ठेला ॥९॥
आठवितां श्रीरामचंद्र । शत्रुघ्ना लागली योगमुद्रा ।
विसरला तो निद्रा तंद्रा । कृपा रामचंद्रस्वामीची ऐशी ॥११०॥
दृष्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म क्रिया कर्तेपण ।
शत्रुघ्नासीं नाठवे जाण । आपणा आपण विसरला ॥११॥
करणें न करणें कांही । उठेना शत्रुघ्नाचे ठायीं ।
धैर्य श्रीराम स्मरता पाहीं । देहीं विदेही तो जाला ॥१२॥
बोलिला भरत तो भावार्थ । त्याचा भाव दाविला यथार्थ ।
शत्रुघ्न तो धैर्य मूर्त । तो धैर्यवृत्तांत निरुपिला ॥१३॥
शत्रुघ्नाची ऐसी स्थिती । भरताची तैसी गती ।
आतां राज्याची कोण गती । वसिष्ठ चित्ती विचारी ॥१४॥

वसिष्ठांनी उपाय सुचविला :

वसिष्ठ म्हणे भरतातें । व्यर्थ खेद कां करिसी येथें ।
जें मी सांगेन यथार्थे । तें त्वा निश्चितें करावें ॥१५॥
अभिषेकरामपादुकांसी । करूनि दहन द्यावा रायासी ।
मग आम्ही रामापासीं । जाऊं वनासी भेटावया ॥१६॥
ऐकोनि वसिष्ठांचे वचन । भरता जालें अमृतपान ।
मग साष्टांगे करोनि नमन । मस्तकीं चरण वंदिलें ॥१७॥

कौसल्येचा सहगमनाचा विचार, श्रीरामभेटीचे कुलगुरूंचे वचन, त्यामुळे तिला मनःशांती :

भरतें करितां राजदहन । कौसल्या करूं पाहे सहगमन ।
मग वसिष्ठें येवोनि आपण । निवारण तीस केलें ॥१८॥
सहगमन पतिसंकटीं । त्याहूनि अधिक श्रीरामभेटी ।
येरी म्हणे चवदा वर्षापाठीं । जिण्याची गोष्टी दुर्लभ ॥१९॥
नगरा न येतां रघुनाथ । मध्येंचि मजला आलिया मृत्य ।
ना श्रीराम ना दशरथ । ऐसा अपघात मज होईल ॥१२०॥
ऐकोनि कौसल्येची गोष्टी । वसिष्ठ कळवळला पोटीं ।
रायाचें उत्तरकर्मापाठीं । करीन भेटी श्रीरामा ॥२१॥
कौसल्या म्हणे जी गुरुनाथा । अवश्य भेटवीन रघुनाथा ।
ऐसी मज भाक द्यावी आता । तरी मी जीविता राखीन ॥२२॥
श्रीराम देखतांच दृष्टीं । मावळती द्वंद्वदुःखाच्या कोटी ।
आनंद न समाये सृष्टीं । सुखसंतुष्टीं श्रीरामें ॥२३॥
श्रीरामासी होय भेटी । तैं भाग्य दुर्लभ अति संकटीं ।
तें पाविजे सद्‌गुरुकृपादृष्टीं । तैं मी सृष्टीं अति धन्य ॥२४॥
कौसल्येचें सत्व चोख । देखोनि वसिष्ठासी पर सुख ।
उल्हासें देवोनिया भाक । राहविली निष्टंक राममाता ॥२५॥

श्रीरामपादुकांवर अभिषिंचन, दशरथाची उत्तरक्रिया :

भरते उठोनि आपण । रामपादुका अभिषिंचून ।
करोनि रायाचें दहन । और्ध्वदेहिक पूर्ण तेणें केलें ॥२६॥
भरताचें अयोध्येसी गमन । तंव श्रीरामाचें दूरी गमन ।
एकाजनार्दना शरण । रसाळ निरुपण अवधारा ॥१२७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामपादुकापट्टाभिषेको नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
॥ ओव्यां १२७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा

2 thoughts on “भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अकरावा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *