भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा
रावण व मारीच यांची भेट :
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावण व मारीच यांची भेट :
सीताप्राप्त्यर्थ उद्विग्न । रथारुढ रावण ।
मारीचाश्रमा ठाकोन । आला आपण सवेग ॥ १ ॥
तत्र कृष्णानिजधरं जटामंडलधारिणम् ।
ददर्शं नियताहारं मारीचं नाम राक्षसम् ॥ १ ॥
तं रावणः समागम्य विधिवत्स्वेन तेजसा ।
कुशलं परिपृच्छ्यार्थ ययाचे तेज पूजितः ॥२॥
मारीचातें देख रावण । जटाधारी वल्कलाजिन ।
आणि नेमस्थ फळाभोजन । एकांतस्थान वनवासी ॥ २ ॥
ऐसा मारीच रावणें देखोन । दोघीं दिधलें आलिंगन ।
मग त्यासी कुशळ पुसोन । केलें पूजन यथाविधि ॥ ३ ॥
आलेल्या संकटांचे मारीचाला निवेदन व सीता हरणाची इच्छा :
मग बैसवून एकांतीं । रावण सांगे मारीचाप्रती ।
रामें गांजिलें बहुतां रीतीं । सांगूं किती तुजपायीं ॥ ४ ॥
पद्मपुराणीं माझें ठाणांतर । दूषण त्रिशिरा आणि खर ।
चवदा सहस्र निशाचर । अति दुर्धर तिहीं लोकीं ॥ ५ ॥
श्रीरामें वर्षोनि शर । मारिला खर दुषण त्रिशिर ।
चवदा सहस्र निशाचर । बाणाधारा निवटिले ॥ ६ ॥
आणि शूर्पणखा भगिनी धाकटी । सकर्ण नासिकें ते केली नकटी ।
लाजविल्या राक्षसकोटी । लाज मोठी हे आम्हां ॥ ७ ॥
कर्णनासापहारेण भगिनी मे विरुपिता ।
अस्य भार्यां जनस्थानात्सीतां सुरसुतोपमाम् ॥ ३ ॥
आनयिष्यामि विक्रम्य सहायस्तत्र मे भव ।
त्वया ह्यहं सहायेन पार्श्वस्थेन महाबल ॥ ४ ॥
भ्रातृभिश्चासुरान्सर्वान्नाहमत्राभिचिंतये ।
तत्सहायो भव त्वं मे समर्थो ह्यसि राक्षस ॥ ५ ॥
एतदर्थमहं प्राप्तस्त्वत्समीपं निशाचर ।
शृणु तत्कर्म साहाय्ये यत्कांर्य वचनान्मम ॥ ६ ॥
सौवर्णस्त्वं मृगो भूत्वा चित्रो रजतबिंदुभिः।
आश्रमे तस्य रामस्य सीतायां प्रमुखे चर ॥ ७ ॥
शूर्पणखेचें नासिक कर्ण । छेदोनि केलें विरुपपण ।
तितें मी व्हाया उत्तीर्ण । करीन हरण श्रीरामकांता ॥ ८ ॥
सीता स्वरुपवर्णन :
सीतासौंदर्याची थोरी । मज पाहतां चरचरीं ।
तीसमान नाहीं दुसरी । परम सुंदरी श्रीरामप्रिया ॥ ९ ॥
सीता लावण्यमंजरी । उमा रमा न पवे सरी ।
माझ्या अंतरंगींची नारी । तिच्या नखाग्रीं खद्योत ॥ १० ॥
मुख्य मंदोदरी जाण । नव्हे तिच्या अंगुष्ठासमान ।
तिंचे मी करुं पाहें हरण । तरी सहाय आपण मज व्हावें ॥ ११ ॥
मारिचाकडे साहाय्याची मागणी व त्याची दिशा :
तुजपायीं विचित्र गती । धरुं जाणसी नानाव्यक्ती ।
सुवर्णमृगाची आकृती । धरुन सीतेप्रती त्वां जावें ॥ १२ ॥
सीता सांडोनि पंचवटीं । सुवर्णमृगवधार्थदृष्टी ।
राम धांवेल पाठोपाठीं । ऐसी गोष्टी साधावी ॥ १३ ॥
दूरी नेवोनियां राघव । हाक मारावी अति अपूर्व ।
लक्ष्मणां वेगीं धांव पाव । हेंहीं लाघव साधावें ॥ १४ ॥
मारीच श्रूयतां तात वचनं मम भाषत ।
आर्तोऽस्मि मम चार्तस्य भवान्हि परमा गतिः॥८॥
मारीचा तूं माझा निजमंत्री । तुझी मी जाणें अगाध थोरी ।
तूं मज जालिया सहकारी । मी चराचरीं निजविजयी ॥ १५ ॥
सीताहरणी मी अति आर्त । तरी आर्त पुरवावया तूं समर्थ ।
माझे पुरवावे मनोरथ । कृतकार्यार्थ साधावा ॥ १६ ॥
तूं साह्य जालिया संपूर्ण । देव दानव दैत्यगण ।
जिणों शकें मी रावण । तेथें श्रीराम कोण बापुडें ॥ १७ ॥
तरी पर्णकुटिका सांडोन । तुवां नेलिया रामलक्ष्मण ।
मागें मी करीन सीताहरण । मग नको कोण मज म्हणे ॥ १८ ॥
राहुग्रासी चंद्रकळा । तैसी हरीन जनकबाळा ।
मारिचसाह्याचा सोहळा । मी कळिकाळा नाटोपें ॥ १९ ॥
मारीचावरची प्रतिक्रिया :
ऐकतां श्रीरामाचें नांव । मारीचाचा दचकला जीव ।
विसरला वाग्वैभव । भयोद्भव अनिवार ॥ २० ॥
तस्य रामकथा श्रुत्वा मारीचस्य महात्मनः ।
शष्कमासीच्च वदनं परित्रस्तो बभूव सः ॥९॥
वना आला रघुनंदन । ऐकतां मारीच भ्रांतमन ।
तोडीचें पाणी गेलें पळून । मूर्च्छापन्न तो पडिला ॥ २१ ॥
नांव ऐकोनि रघुनाथा । मारीचास प्राणांतावस्था ।
मग बोलणें चालणें खुंटली वार्ता । तेणें लंकानाथा आश्चर्य ॥ २२ ॥
मारीच महावीर शूर । रणामाजी रणरंगधीर ।
योद्ध्यांमाजी मुख्य जुझार । विचारसमुद्र पैं मारीच ॥ २३ ॥
भय ओढवल्या थोर । मज मारीचाचा आधार ।
याचेनि बळें म्यां सुरासुर । चराचर जिंकिलें ॥ २४ ॥
कार्य मांडल्या अति अवघड । समूळ साधी अर्थ गूढ ।
तैसाचि निधडा योद्धा दृढ । विचारप्रौढ विवेकी ॥ २५ ॥
त्याचे कारण :
धावो फार न लगतां । केवळ श्रीरामनाम ऐकतां ।
मारीचास मरणावस्था । भयकंपता कां जाली ॥ २६ ॥
श्रवणीं ऐकतां श्रीरघुनंदन । धाकें चेतना गेली पळोन ।
निर्जीव भासे प्रेतवदन । प्राणस्फुरण पळालें ॥ २७ ॥
जैसा जड मूढ पाषाण । तैसा मारीच मूर्च्छापन्न ।
त्यासी वेगीं दशानान । सावधान स्वयें करी ॥ २८ ॥
मारिचास पुसे लंकानाथ । न लागातां घावो ना आघाअ ।
नांव ऐकतां श्रीरघुनाथ । मुर्च्छा मरणात कां आली ॥ २९ ॥
रावणास कळकळीचा उपदेश, शूर्पणखेचा धिक्कार :
मारीच होवोनि सावधान । रावणासी घाली लोटांगण ।
श्रीरामासीं विरुद्धपण । सर्वथा आपण न करावें ॥ ३० ॥
क्षोभलिया श्रीरामचंद्र । ससैन्य सबंधु सपुत्र ।
सप्रधान निशाचर । तुजसहित निर्दळील ॥ ३१ ॥
सहितसैन्य चवदा सहस्र । जैसें वधिले त्रिशिरा खर ।
तैसें तुम्हांसी समग्र । बाणीं रघुवीर बधील पै ॥ ३२ ॥
सुटल्या श्रीरामाचा बाण । तुम्हांमाजी निवारील कोण ।
राक्षसकुळाचें निर्दळण । न लागतां क्षण तो करील ॥ ३३ ॥
तरी तुझें सद्बुद्धीचें हरण । कोणे क्रूरें केलें संपूर्ण ।
जे श्रीरामाचें दारहरण । केंवी आपणा करवेल ॥ ३४ ॥
शेषमाथीचा निजमणी । आणूं शकेल सांग कोणी ।
तेंवी सीता श्रीरामापासोनी । केंवी आमुचेनि आणवे ॥ ३५ ॥
श्रीसूर्याची प्रभावळी । हरुं न शके महाबळी ।
तेंवी श्रीरामावेगळी जनकबाळीं । न करवेची पैं आम्हां ॥ ३६ ॥
जैसी सर्वांगीं पडली व्योमा । वेगळीं न करवे नीळिमा ।
तेंवी सीता वेगळी श्रीरामा । सर्वथा आम्हां न करवे ॥ ३७ ॥
ऐसेनि करितां सीताहरण । आम्हां तुम्हां आले मरण ।
सकळ कुळाचें निर्दळण । होईल जाण लंकेशा ॥ ३८ ॥
नकटीं होवानियां आधीं । ससैन्येंसी खरु वधिला युद्धीं ।
तरी शूर्पणखेची मूढ बुद्धी । ऐकतां त्रिशद्धीं निमशील ॥ ३९ ॥
परस्त्रीहरणाचे दुष्परिणाम :
सहस्रबाहु गर्वेकरीं । ऋषींची धेनु बळें हरी ।
त्यातें ब्रह्मचारी मारी । क्षणामाझारी ससैन्य ॥ ४० ॥
करितां परदारहरण । अवश्य आम्हां आलें मरण ।
म्हणोनि मारीच रावणचरण । धरी तंव रावण क्षोभला ॥ ४१ ॥
रावणाचा क्षोभ व मारीचावर राग :
दोघें माणसें वनवासी । नाहीं सैन्यसामुग्री त्यांसी ।
त्यांचें भय मज दाविसी । तरी तूं जालासी नपुसंक ॥ ४२ ॥
तूं तंव बळिष्ठ संपूर्ण । ते काय जाली आंगवण ।
होतां श्रीरामनामस्मरण । कंपायमान कां होसी ॥ ४३ ॥
मी तंव रावण दुर्धर । बंदीं घातले ग्रह सुरवर ।
श्रीराम बापुडें किंमात्र ॥ ४४ ॥
त्याचें भय थोर धुरा । तेथे कोण पाड श्रीरामचंद्रा ।
धाकुटा हाही निशाचरा । धरीं धीर पुरा मारीचा तूं ॥ ४५ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । मारीच जाला हास्यवदन ।
रावणा न धरीं गर्वाभिमान । पूर्ण कथन अवधारीं ॥ ४६ ॥
पुरा वीर्यादहं राजन्पर्यटन्पृथिवीमिमाम् ।
बलं नागसहस्त्रस्य धारयन्पर्वतोपंमः ॥१०॥
अवजानन्न संमोहाद्वालोऽयमिति राघवम् ।
विश्वामिरस्य तां वेदिमभ्यधावं कृतत्वरः ॥११॥
मारीच स्वतःचा अनुभव सांगतो :
तुझ्याच ऐसा लंकानाथा । मज पूर्वी बळदर्प होता ।
जे बाळ मानोनि रघुनाथा । त्याच्या विघाता करु गेलों ॥ ४७ ॥
अंगी नागायुतबाळ । श्रीरम सगळें गिळीन बाळ ।
विश्वामित्रादि ऋषी सकळ । मारोनि तत्काळ भक्षीन ॥ ४८ ॥
ऐसी धरोनियां हांव । आश्रमीं घेतली धांव ।
तंव निःशंक धनुर्वाडा राघव । बाणलागव अनिवार ॥ ४९ ॥
मारीच सुबाहु महावीर । सवें निधडे निशाचर ।
मारुं जातां श्रीरघुवीर । बाण दुर्धर सुटले ॥ ५० ॥
राक्षस देखोनियां क्रूर । डळमळीना श्रीरामचंद्र ।
सुटला बाणांचा महापूर । वीरें वीर खोंचले ॥ ५१ ॥
माझा मुद्गल केला कूट । सुबाहूचें ओढणें केलें पीठ ।
वीर पाडिलें उद्भट । ऐसा रणसुभट श्रीराम ॥ ५२ ॥
श्रीरामें बाण सोडिला तिधारा । तो म्यां तोडिला खर्गधारा ।
भल्लानें सुबाहु केला पुरा । मज पिसारा लागला ॥ ५३ ॥
पिसारा लागला ब्रह्मांडी । तेणें डोळां आली झांपडी ।
अंगीं भोवंडी अशुद्ध नाकीं तोंडीं । बळे भुरकुंडी हातां पायां ॥ ५४ ॥
बाण पिसार्याचा दुर्धर वारा । घायें उडविले अंबरा ।
शतयौजनें समुद्रतीरा । मूर्च्छापन्न पुरा पाडिलों ॥ ५५ ॥
बटारिले नेत्रवाट । घरघरीत वाजे कंठ ।
धाकें धुकधुकितसे पोट । प्राणसंकट मज आलें ॥ ५६ ॥
अर्धोन्मीलित जाले नयन । प्राण जाला अति सुलीन ।
शरीर जालें अचेतन । बाणार्धखंडें मरण मज आलें ॥ ५७ ॥
उरला होता आयुष्यकण । तेणें मी जालों सावधान ।
घायें गेली आंगवण । धैर्य संपूर्ण पळालें ॥ ५८ ॥
श्रीरामबाणाचा भेदरा । थोर लागला दशशिरां ।
सर्वत्र देखोनि श्रीरामचंद्रा । चराचरामाझारीं ॥ ५९ ॥
वृक्षे वृक्षे हि पश्यामि चीरकृष्णाजिनांवरम् ।
गृहीतधनुषं रामं पाशहस्तमिवान्तकम् ॥१२॥
अपि रामसहस्राणि भीतः पश्यमि रावण ।
राभूतमिदं सर्वमरण्यं प्रतिभाति मे ॥१३॥
राममेव हि पश्यामि रहिते राक्षसेश्वर ।
दृष्ट्वा स्वप्नगतं राममुभ्द्रमामीव चेतनः ॥१४॥
चीरकृष्णाजिनांबर । जटामुकुटधर्नुधर ।
देखें वृक्षोवृक्षीं श्रीरामचंद्र । प्रळयरुद्र मारक ॥ ६० ॥
भयभीत चकितदृष्टी । श्रीराम देखें कोट्यनुकोटी ।
श्रीराममय ही सृष्टी । धाक पोटीं बाणाचा ॥ ६१ ॥
पक्षी सावज वनीं फडके । श्रीराम म्हणोनी मी वचकें ।
लहान थोर जें जें देखें । तें तें श्रीराम देखें धगधगीत ॥ ६२ ॥
देखतां वृक्षाची दाटी । श्रीरामचि देखें दृष्टीं ।
धाकें गजबजिलों पोटीं । ऐसी श्रीरामें पाठी पुरविली ॥ ६३ ॥
स्वप्नाचिये परिपाटीं । श्रीराम देखे दृष्टीं ।
श्रीरामाचा धाक पोटीं । श्रीरामें पाठी पुरविली ॥ ६४ ॥
श्रीरामबाणाचा पिसारा । तेणें ऐसा लाविला भेदरा ।
तरी विरोधितां श्रीरामचंद्रा । उरी निशाचरां उरेना ॥ ६५ ॥
श्रीरामधाक मज मानसी । त्या मज धाडितां रामापासीं ।
जीव जाईल देखतां त्यासी । निश्चयेंसीं रावणा ॥ ६६ ॥
रकारादि वर्णजल्प । ऐकतां मजला थोर कंप ।
श्रीरामनामाचा अलाप । तेणें सकंप सर्वदा ॥ ६७ ॥
रावणाला परावृत्त करण्याचा कळकळीने प्रयत्न :
श्रीरामाच्या पूर्वार्धबाणें । जीव चांचला दैवगुणें ।
आतां त्यांपासीं जाणें । तैं तो मज प्राणें सोडीना ॥ ६८ ॥
जैं मज मागें विधिला बाण । तैं रामा होते बाळपण ।
आतां रारुण्य संपूर्ण । घायें प्राण घेईल ॥ ६९ ॥
देखतांचि श्रीरघुनाथ । माझे जिवित्वाचा अंत ।
मी सर्वथा नवचें तेथ । त्रिसत्य सत्य मद्वाणी ॥ ७० ॥
रावणाचे प्रलोभन :
ऐसें सांगोनि रावणासी । मारीच रडे उकसाबुकसीं ।
मग रावणें धरोनि पोटासीं । काय त्यासी बोलत ॥ ७१ ॥
मनुष्य खाजुकें आम्हांसी । त्या रामातें तूं कां भीसी ।
सीता साधल्या मजसीं । अर्धराज्यासी देईन ॥ ७२ ॥
जैसा माझा ज्येष्ठ कुमरु । त्याहूनि करीन राजधरु ।
तुज मी देईन छत्र चामरु । सैन्यसंभारु गज वाजी ॥ ७३ ॥
साडी रामभयाची धुकधुक । अर्धराज्य देईन देख ।
निधडा होई निःशंक । माझी भाक तूं घेईं ॥ ७४ ॥
मारीचाचे उत्तर :
तरी मेल्यामागें पिंडदान । तें भक्षितीं कागश्वान ।
श्रीरामें घेतलिया माझा प्राण । राज्य कोण भोगील ॥ ७५ ॥
तुझी बुद्धि ऐकतां जाण । ना मारीच ना रावण ।
ऐसें करीन श्रीरामबाण । कुळनिर्दळण राक्षसां ॥ ७६ ॥
नकटीची केवळ दुर्बुद्धी । तिणें भेदिली तुझी बुद्धी ।
परदारहरणविधी । करी तो त्रिशुद्धि महामूर्ख ॥ ७७ ॥
देखतां नकटीचा मुखवट । तत्काळ बुद्धीस होय पालट ।
जालासी परदारलंपट । शठ नष्ट महापापी ॥ ७८ ॥
होतां नकटीचें दर्शन । निमाला त्रिशिरा खर दुषण ।
आतां निर्दाळावया रावण । नकटें वदन आणिलें ॥ ७९ ॥
स्वयंवरीं वरावया सीतेतें । धनुष्य वाहतां अति स्वार्थें ।
धनुष्य न उचलतां तूतें । तें श्रीरामें भंगिलें ॥ ८० ॥
तैं काय झाली आंगवण । कां न केलें सीताहरण ।
सभेसी जालें काळें वदन । घेवोनि प्राण पळालासी ॥ ८१ ॥
तूं पळसी विराधाभेणे । तो श्रीरामें मारिला न लागतां क्षण ।
तेथें तू बापुडें रावण । मशक कोण संग्रामीं ॥ ८२ ॥
शूर्पणखेची दृष्ट बुद्धीं । श्रीरामदारहरणविधी ।
बाणीं दाही मस्तकें छेदी । तेणें त्रिशुद्धी निमशील ॥ ८३ ॥
स्वामीची वासना पुरवित । संवादीं मिळतील बहुत ।
परी यथार्थ धर्म परमार्थ । सांगता आप्त दुर्लभ ॥ ८४ ॥
ऐक बापा लंकनाथा । म्यां सांगितलें यथार्थता ।
तें जैं न माने तुझीया चित्ता । तैं माझी कथा अवधारी ॥ ८५ ॥
होतां श्रीरामदर्शन । तत्काळ जाईल माझा प्राण ।
तेथे मी न वचें वाहिली आण । तेणें रावन क्षोभला ॥ ८६ ॥
रावणाचा संताप व मारीचाला ठार करण्याचा मानस :
श्रीराम तुझा घेईल प्राण । ती मी मारितां राखेल कोण ।
वर्मी खोंचला रावण । तुझें निर्दळन माझेनी ॥ ८७ ॥
आज्ञाभंगो नरेंद्राणां । राजाज्ञेचें उल्लंघन ।
करिता रायें करावें हनन । संदेह जाण न करावा ॥ ८८ ॥
सेवक मोडी स्वामिचें वचन । यदर्थ शास्त्रविधिविधान ।
सेवकासी करावें हनन । हें तुझें मुख्य मरण माझेनि ॥ ८९ ॥
श्रीराम मानव रंक तापसी । त्याचे भय मज दाविसी ।
तो मी गिळीन एका घासीं । लक्ष्मणासीं समवेत ॥ ९० ॥
मी तंव क्षोभल्या रावण । धाकें निमती राम लक्ष्मण ।
मग सीतेचें पाणीग्रहण । मी करीन प्रतापें ॥ ९१ ॥
मारीचाचा कराव्या घात । कोपें खवळला लंकानाथ ।
तंव मारीच पडला विचारांत । उभयथा मृत्यु मज आला ॥ ९२ ॥
रामादपि च मर्तव्यं मर्त्यव्यं रावणादपि ।
उभाभ्यामपि मर्तव्य वरं रामो न रावणः ॥१५॥
रावणाच्या हस्ते मरण्यापेक्षा श्रीरामांच्या हातून मरण येणे उत्तम म्हणून मारीचाची कबुलीः
जातां पंचवटीआंत । अवश्य वधील श्रीरघुनाथ ।
आणि तेथें न वचतां अनर्थ । लंकानाथ वधील ॥ ९३ ॥
रावणाचे हातें मरण । तैं मज जाले अधःपतन ।
आणि लागतां श्रीरामबाण । कृतकल्याण मज तेणें ॥ ९४ ॥
अति दुर्धर श्रीरामबाण । घायें वारील जन्ममरण ।
ज्यासी लागें तो सुखसंपन्न कृतकल्याण रामबाणें ॥ ९५ ॥
ऐसें विचारोनि चित्ता । मारीच म्हणे लंकानाथा ।
बोलिलों श्रीरामभयाची वार्ता । तुझ्या पुरुषार्था पहावया ॥ ९६ ॥
करावया श्रीरामासीं रण । तुझी कैसी आंगवण ।
तूं तंव अति पुरुषार्थी रावण । तरी साह्य पूर्ण मी तुज ॥ ९७ ॥
हरावया श्रीरामकांता । सर्वस्वें वेंचीन जीविता ।
निमेषें प्रलोभोनि सीता । मृगवेषतावैभवें ॥ ९८ ॥
ऐसें ऐकोनि मारीचवचन । सुखावला दशानन ।
मग धांवोन दिधले आलिंगन । आणि कंठाभरण अर्पिलें ॥ ९९ ॥
ऐशा दोघीं करोनि गुजगोष्टीं । ठाकोनि आलें पंचवटी ।
श्रीरामजगजेंटठी जे ठायीं ॥ १०० ॥
मागें ठेवोनि सारथि रथ । दोघे आले वनाआंत ।
मग मारिचासी म्हणे लंकानाथ । कृतकार्यार्थ साधावा ॥ १ ॥
कामीकमनीय मृग रुपता । धरोनि सवेग प्रलोभोनि सीता ।
दरी न्यावें श्रीरघुनाथा । सौमित्रभ्रात्यासमवेत ॥ २ ॥
येतां देखोनि रामबाणासी । अदृश्य व्हावें लाघवेंसीं ।
तव मी हरीन जानकीसी । मग लंकेसी जाऊं दोघे ॥ ३ ॥
ऐसी आप्तवें सागोनि गोष्टी । हरिखें त्याची पाठी थापटी ।
परम प्रीती धरोनि पोटीं पंचवटीं प्रवेशले ॥ ४ ॥
करीतां जानकीचें हरण । धाकती मारीच आणि रावण ।
एकाजनार्दना शरण । कथाविंदान अवधारा ॥ ५ ॥
पुढील श्रीरामचरित्र । अति गुह्य आणि विचित्र ।
श्रवणें पातकी होती पवित्र । चिदचिन्मात्र श्रीराम ॥ ६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
मारीचरावणपंचवट्यागमनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
॥ ओंव्या १०६ ॥ श्लोक १५ ॥ एवं १२१ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेरावा