भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा

जटायूचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेच्या शोधासाठी मार्गक्रमण चालू असता अद्‍भुत राक्षसाचा पाय आढळतो :

उमा गेली महेशापाशीं । श्रीराम लक्ष्मण वनवासी ।
निघाले सीतागवेषणासी । मार्गचिन्हांसी पहाताचि ॥ १ ॥

ददर्श भूमौ निष्क्रातं राक्षसस्य पदं महत् ।
स समीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥ १ ॥
संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ।
इह लक्ष्मण पश्य त्वं राक्षसस्य महत्पदम् ॥ २ ॥
मिथ्यामे तर्जितःशैलो न सीता गिरिगह्नरे ।
तदद्दष्टवा लक्ष्मणो भितःपदं विकृतमद्‍भुतम्॥ ३ ॥

मार्गी माग पहात जात । तंव राक्षसपद अत्यद्‍भुत ।
देखोनि श्रीरामा आनंद । मार्गी माग शुद्ध लागला ॥ ३ ॥
लक्ष्मणा धांव धांव आतां । राक्षस घेवोनि जातो सीता ।
मार्ग ओळख तूं तत्वतां । झणीं दुश्चित होशील ॥ ४ ॥
राक्षसपद अति विक्रांत । देखोनि लक्ष्मण विस्मित ।
सवेंचि जाहला भयभीत । सीता भक्ष्यार्थ न वधावी ॥ ५ ॥
मार्गी देखिला जो माग । त्याचा दोघीं धरोनियां लाग ।
धांवणें धांवतां सवेग । जटायु भग्नांग देखिला ॥ ६ ॥

अथ पर्वतसंकाशं छिन्नपक्ष व्दिजोत्तमम् ।
ददर्श पतितं भूमौ क्षतजार्द्रं जटायुषम् ॥ ४ ॥
तं द्दष्टवा गिरिशृंगाभं रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
अनेन सीता वैदेही भक्षिता नात्र संशयः ॥ ५ ॥

अधिक पुढे गेल्यावर रक्ताने माखलेला असा एक अति भव्य देह आढळलाः

जैसा कां महापर्वत । शेंदूरें न्हाणिला धगधगित ।
तैसा जटायु भासत । रक्तें आरक्त सर्वांगें ॥ ७ ॥
त्यासी देखोनि श्रीरघुनाथ । सौ‍मित्रासी स्वयें सांगत ।
सीता भक्षोनि पाशिलें रक्त । दिसे आरक राक्षस ॥ ८ ॥
त्याचा करीन मी घात । बाण सज्जोनि रघुनाथ ।
कोपें चालिला कृतांत । सीतासाह्यार्थ प्रतापी ॥ ९ ॥
माझी भक्षोनियां कांता । तूं कोण रे वनीं वसता ।
तुझ्या मी करीन निजघाता । होय गर्जता श्रीराम ॥ १० ॥
ऐकोनि श्रीरामाची वाणी । जटायु घायवट धरधीं ।
काय बोले दीनवचनीं । सावधानीं अवधारा ॥ ११ ॥

स दिनो दीनया वाचा सफेनं रुधिरं वमन् ।
अभ्यभाषत पक्षीशो राम रामेति राघव ॥ ६ ॥
यामोषधिमिवायुष्मन्नन्वेषसि महावने ।
सा देवी मम च प्राणा रावणेनोभयं हृतम् ॥ ७ ॥

जटायूने स्वतःची ओळख देऊन वृत्तांत निवेदन केला :

ऐकोनि श्रीरामांचे वचन । जटायु म्हणे मी धन्य धन्य ।
करावया माझें दीनोद्धरण । स्वयें आपण श्रीराम आला ॥ १२ ॥
श्रीरामाचें आगमन । सीताशुद्ध्यर्थ नव्हे जाण ।
करावया दीनोद्धरण । वनाभिगमन श्रीरामा ॥ १३ ॥
सफेन रुधिर वमून । जटायु सांडीत होता प्राण ।
ऐकोनियां श्रीरामवचन । जाला सावधान भावार्थे ॥ १४ ॥
श्रीराम जय राम जयजय राम । जटायु स्मरे रामनाम ।
माझा छेदावया देहभ्रम । अंतीं श्रीराम पावला ॥ १५ ॥
धन्य धन्य वृक्षवल्ली औषधी । श्रीराम विचरे ज्यांसन्निधीं ।
ते पावन गा त्रिशुद्धी । कृपानिधि श्रीराम ॥ १६ ॥
ऐकें श्रीराम रघुपती । वनीं विचरसी जीचे अर्थीं ।
ते म्यां देखिली सीता सती । नेली निश्चतीं रावणें ॥ १७ ॥
सीता मज पूज्य गुरुपत्‍नी । गुरुत्वें प्रिय प्राणांहूनी ।
तुम्ही आश्रमीं नव्हतां कोणी । नेली चोरोनी रावणें ॥ १८ ॥

त्वया विरहिता देवी लक्ष्मणेन च राघव ।
हियमाणा मया दृष्टा रावणेन बलीयसा ॥ ८ ॥

आश्रमातून रावणाने सीतेला पळविलीः

तुज गेलिया मृगापाठीं । लक्ष्मणें सांडिली पर्णकुटी ।
वेगें येवोनि रावण कपटी । सीता गोरटी नेली तेणें ॥ १९ ॥
सीता बळें हरिली रावणें । तुचचें नव्हेचि धांवणें ।
आक्रंदत नेली तेणें । ते म्यां देखणे देखिली ॥ २० ॥
ऐसें ऐकोनि श्रीरघुनाथा । मज मानिसी नपुंसकता ।
तरी सीतेनिमित्त लंकानाथा । केलें तें आतां ऐका स्वामी ॥ २१ ॥

सीतामभ्यवपन्नोऽहं रावणश्च रणे प्रभो ।
विध्वंसितरथच्छत्रः पातितो धरणीतले ॥ ९ ॥
एतदस्य धनुर्मघ्नमेते चास्य शरास्तथा ।
अयमस्य रणे राम भग्नः सांग्रमिको रथः ॥ १० ॥
अत्र युद्धं मया दत्तं रावणस्य पुनःपुनः ।
पक्षपातैर्नखैर्घौरेर्गात्राण्यारुह्य वैरिणः ॥ ११ ॥

तें मी प्रत्यक्ष पाहिल्याने त्याच्याशी युद्ध केले :

रावणें हरितां सीतेसी । मी गेलों होतों वनक्रीडेसी ।
तंव सीता आक्रंदत आक्रोशीं । मी वेगेंशी पावलों ॥ २२ ॥
घोर युद्ध केलें रणीं । पैल पाहें रक्तांकित धरणी ।
रावणातें म्या जाचूनीं । छत्र भंगोनी पाडिलें ॥ २३ ॥
त्याचे जे कां धनुष्यबाण । नखें म्यां केले चूर्ण ।
रथींचे खर पिशाचवदन । तेही सप्राण निर्दाळिले ॥ २४ ॥
युद्ध जालें कडकडाट । ध्वज भंगिला अति उद्भट ।
रथ सारथि करोनि पीठ । शिरीचा मुकुट पाडिला ॥ २५ ॥

जटायूसमोर रावणाचे सामर्थ्य निष्फळ ठरते :

युद्धों भंगिला रावण । मजसीं न चाले आंगवण ।
मग मज ठकवोनि जाण । सीता घेवोनि निगाला ॥२६ ॥
राक्षसमावा गुप्तत्वेंसीं । सीता घेवोनि काखेसीं ।
कळों न देतां पशुपक्ष्यांसी । निघे आकाशीं अति गुप्त ॥ २७ ॥
मजही हडबड जाली मोठी । हातींची नेली सीता गोरटी ।
काय श्रीरामा सांगूं गोष्टी । लाज पोटीं सलज्ज ॥ २८ ॥
मग पाहतां खुंटल्या दृष्टी । रावणें सीता नभाचे पोटीं ।
देखोनि धांविनलों उठाउठीं । झडपेसाठीं सांडविली ॥ २९ ॥
वेगीं धांवोनि सत्वर । घायीं घायवट केलें शरीर ।
नखें विदारितां दशशिर । वाहे पूर रुधिराचा ॥ ३० ॥

रावणाने घाबरुन सीतेला मुक्त केली :

मुखीं नखीं पाखीं झडपित । रावण केला अस्ताव्यस्त ।
सीता सांडोनि त्वरित । पळे लंकनाथ अति धाकें ॥ ३१ ॥
पक्षें सांडविली सीता । हे मज लाज लंकानाथा ।
मग युद्धा प्रवर्तला मागुता । सलज्जता अभिमानें ॥ ३२ ॥
तो मज रागें हाणी लाता । म्यां चुकविल्या तळपतां ।
तेणे मज हाणितां मुष्टिघाता । अति झडपितां झडपिला ॥ ३३ ॥
ऐसा पक्षवातावर्त । त्यामाजी नखमुखांचे आघात ।
रावणा करोनि अस्ताव्यस्त । रणीं मूर्च्छित पाडीला ॥ ३४ ॥
उभय पांखांच्या अति वाता । गगनीं उडविलें लंकानाथा ।
तेथोनि तळीं पडतपडतां । उडोनि मागुता झडपिला ॥ ३५ ॥
देखोनि माझी आंगवण । रावणें दांतीं धरिले तृण ।
येथोनि पुरे पुरे रण । दीनवदन अति दुःखी ॥ ३६ ॥

रावणाची मानहानी, त्यामुळे युद्धासाठी त्याचे पुनरागमन :

पक्षी नावरे रणांगणीं । रावणा जाली मानहानी ।
मुख दाखविता लाज जनीं । आला परतोनि रणासी ॥ ३७ ॥
मज छळावया पाहीं । रावण आला लवलाहीं ।
दोघे झुंजूं उसण्या घायीं । तें म्यां पाहीं मानिलें ॥ ३८ ॥

रावणाचे कपटाचरण :

मज तुझी घालोनि आण । रावण पुसे माझें मरण ।
असत्य न वदें गेलिया प्राण । तुझी आण नुल्लंघीं ॥ ३९ ॥
रावणाचे निजमरण । म्यांही पुसिलें आपण ।
मिथ्यावादी पापी पूर्ण । प्रतारोन बोलिला ॥ ४० ॥
तुझेनि भजनें सत्यसात्विकी । मृत्यु सांगितला दोहीं पाखीं ।
रावण सांगे वामांगुष्ठनखीं । महापातकीं अनृतवादी ॥ ४१ ॥
खग खेचर अति आवेशीं । दोघे मिनलों संग्रामासीं ।
लक्ष ठेवोनियां वर्मासी । युद्ध आकाशी । निराधारीं ॥ ४२ ॥
पांखीं झडपोनि दशानन । वामांगुष्ठा केलें छेदन ।
तेणें न मरेचि रावण । कपटी पूर्ण अनृतवादी ॥ ४३ ॥
रावण बोलिला भावार्थ । ऐसा माझे मनीं मनोरथ ।
यालागीं करोनि पुरुषार्थ । अंगुष्ठ तरित छेदिला ॥ ४४ ॥
छेदितां वामांगुष्ठनख । हातातळीं आले पांख ।
रावणें उपडिले देख । परम दुःख मज जालें ॥ ४५ ॥

डोळ्यांसमोर सीता पळविल्यामुळे जटायूला दुःख :

उपडिलें तेणें निजपांख । त्याचें मज नाहीं असुख ।
सीता नेली मज प्रत्यक्ष । परम दुःख श्रीरामा ॥ ४६ ॥
ऐशी रावणा लाविली ख्याती । तूं न पावसीच रघुपती ।
यश न ये माझ्या हातीं । सीता सती नेली तेणें ॥ ४७ ॥
पांख छेदिल्याचें दुःख कोण । वेगीं न येसीच तूं आपण ।
सीता घेवोनि गेला रावण । दुःख दारुण मज जाहलें ॥ ४८ ॥
मजचि देखतदेखतां । रडत रावणें नेली सीता ।
थोर दुःख हें रघुनाथा । किती आतां मी सांगूं ॥ ४९ ॥

रामस्तस्य तु विज्ञान सीतासक्तां प्रियां कथाम् ।
गृधराजं परिष्वज्य रुरोद सहलक्ष्मणः ॥ १२ ॥

जटायूचे वृत्त ऐकून रामलक्ष्मणास दुःख :

ऐसे ऐकोनि जटायुवचन । अत्यंत कृपें रघुनंदन ।
त्यासी देतां आलिंगन । आलें रुदन श्रीरामा ॥ ५० ॥
सखा बंधु पुत्र आप्त । घायीं पडलिया रणांत ।
तैसियापरी श्रीरघुनाथ । असे स्फुंदत कृपाळु ॥ ५१ ॥
युद्धीं गांजोनि रावण । सीता सोडविली जाण ।
तो जटायु मारिला छळून । दुःखें लक्ष्मण विलपत ॥ ५२ ॥
जरी हा युद्धसमयीं येता । तरी कैसैनि रावण सीता नेता ।
माझा जटायु वांचता । अतिदुःखिता सौमित्रा ॥ ५३ ॥
कोणी न सांगेचि धडपुढें । यालागीं हिंडों मागें पुढें ।
मार्ग लागता निवाडें । तरी कैवाडें धांवतो ॥ ५४ ॥
देखोनि जटायूच्या घाता । लक्ष्मणासी परम व्यथा ।
सखा निमाला सर्वथा । दुःखावस्था विलपत ॥ ५५ ॥

जटायोयदि शक्रोषि वाक्यं व्याहरितुं पुनः ।
सीतामाख्याहि भद्रं ते वधमाख्याहि चात्मनः॥ १३ ॥

जटायू बेशुद्ध असल्यामुळे सीतेला कोठे नेली हे माहीत नव्हते :

श्रीराम पुसे जटायूसी । जरी शक्ति असेल बोलावयासी ।
तरी सीतासुद्धि ये वेळेसीं । पुसेन तैसी मज सांगें ॥ ५६ ॥
सीता हरुनी रावण । कोणे दिसे केलें गमन ।
कोण त्याचें स्थान भुवन । हें संपूर्ण मज सांग ॥ ५७ ॥
ऐसी श्रीराम पुसतां गोष्टी । जटायूसी आनंद पोटीं ।
धन्य धन्य आजी मी सृष्टीं । श्रीराम दृष्टीं देखिला ॥ ५८ ॥
रावणें नेली सीता गोरटी । हे समूळ सांगावया गोष्टी ।
आत्मा म्यां धरिला कंठीं । तुझे चरण दृष्टीं देखावया ॥ ५९ ॥
मी पडलों मूर्च्छापन्न । केउतें रावणें केले गमन ।
तेणें त्याचें स्थान आणि भुवन । सांगतां नयन लाविले ॥ ६० ॥
सत्य जाण श्रीरघुनाथा । येथोनि न बोलवे आतां ।
तुझे चरणीं ठेवोनि माथा । मी निजजीविता त्यागितों ॥ ६१ ॥

रामाची त्यास बरा करण्याची इच्छा व तसे आश्वासन :

सीताहरणाचें असुख । तैसें मज नाहीं आत्यंतिक ।
जटायुमरणाचें दुःख । परम शोक सौ‍मित्रा ॥ ६२ ॥
मदर्थे येणें वेंचिला प्राण । याचें व्हावया उत्तीर्ण ।
जटायूस आश्वासून । श्रीराघुनंदन अनुवादे ॥ ६३ ॥
कृपा उपजली श्रीरघुनाथा । नाभीं म्हणोनि जाला बोलता ।
तुज मीं वांचवीन गा आतां । झणीं जीविता सांडिसी ॥ ६४ ॥
तुझें निवारीन दुःख । तुज मी देईन दोनी पांख ।
वांचवीन वर्षे असंख्य । मरनोन्मुख कां होसी ॥ ६५ ॥
आम्ही तुम्ही तिघे जण । शोधून मारुं वैरी रावण ।
तूं युद्धा साह्यकारी संपूर्ण । झाणीं प्राण सोडिसी ॥ ६६ ॥
स्वर्गी नमुचीच्या युद्धार्था । साह्य जालासी दशरथा ।
तैसा साह्य होई आतां । लंकानाथा वधावया ॥ ६७ ॥

जटायूने हास्य करुन मुक्तीची इच्छा व्यक्त केली :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । जटायु जाला हास्यवदन ।
वांचविसी हें नवल कोण । तूं स्रष्टा संपूर्ण सृष्टीचा ॥ ६८ ॥
तुझिया संकल्पसत्ते आंत । जगा उत्पत्ति स्थिति अंत ।
ब्रह्मा विष्णु शिव आज्ञा वंदित । ऐसा तूं समर्थ श्रीरामा ॥ ६९ ॥
तुज मारितां रावण । निमेषार्ध न लागे जाण ।
तेथें मशक मी साह्य कोण । विज्ञापन अवधारीं ॥ ७० ॥
मज आयुष्य आकल्प पूर्ण । परि हेंचि नित्य चिंतन ।
जे ठाकोनियां श्रीरामचरण । माझें जन्ममरण छेदावें ॥ ७१ ॥
श्रीराम भेटावा अंतगतीं । योगी संन्यासी चिंतिती ।
तो तूं भेटलासी कृपामूर्ती । देहलोभे चित्ती मज नाहीं ॥ ७२ ॥

असे तुझ्या सान्निध मरण येणे फार दुर्लभ :

ऐकें श्रीरामा सावधान । आतांच्या ऐसें मज मरण ।
पुढें सर्वथा न लाभे जाण । हेंही लक्षण अवधारीं ॥ ७३ ॥
वाचे श्रीरामनामस्मरण । दृष्टीं श्रीरामदर्शन ।
हृदयीं श्रीरामाचें ध्यान । ऐसें मरण मग कैंचें ॥ ७४ ॥
अंतीं तूंतें श्रीरामा स्मरतां । चारी मुक्ती देसी भक्तां ।
तें तूं पूर्ण ब्रह्म भेटलें असतां । देहलोभता मज नाहीं ॥ ७५ ॥
माझ्या पूर्व भाग्याच्या कोटी । तेणें श्रीराम परब्रह्म देखिला दृष्टीं ।
माझा देह लोभ निवटी । कृपादृष्टीं मज पाहें ॥ ७६ ॥
रावणें केलें पक्षच्छेदन । छेदिला उभयपक्षाभिमान ।
तेणें तुष्टला श्रीरघुनंदन । वांचलेपण पुरे श्रीरामा ॥ ७७ ॥
माझ्या भाग्याची निजगती । श्रीराम पावला कृपामूर्ती ।
आतां नको देह संगती । कृपामूर्ति श्रीरामा ॥ ७८ ॥
म्हणोनि धरले दोनी चरण । माझें निवारीं जन्ममरण ।
ऐकोनि जटायूंचे वचन । श्रीरघुनंदन तुष्टला ॥ ७९ ॥

या च भूमिप्रदातृणामाहिताग्नेश्च या गतिः ।
गोहिरण्यप्रदातृणां या गतिः शरणार्थिनाम् ॥ १४ ॥

श्रीरामांची त्या जटायूला उत्तम गती दिली :

श्रीरामकाज लक्षून । सीतार्थी वेंचिला प्राण ।
त्यासीं श्रीराम संतोषोन । गति संपूर्ण स्वयें देत ॥ ८० ॥
सोमयाग श्येनयाग । अश्वमेधादि नाना याग ।
अग्निहोत्राची गति सांग । जटायूस योग्य न मानीच राम ॥ ८१ ॥
गोदान भूमिदान तिळदान । हिरण्यादि नाना दान ।
जटायूअर्थी ते गति गौण । रघुनंदन स्वयें मानी ॥ ८२ ॥
शरणार्थ्याची शरणागती । धर्मशिलाची धर्मगती ।
अपुनरावृत्तियाची गती । तेही रघुपति गौण मानी ॥ ८३ ॥
संन्याश्या ब्रह्मसदनप्राप्ती । आणि योग्यांची योगमुक्ती ।
जटायूप्राप्त्यर्थ निश्चितीं । श्रीरघुपति स्वयें गौण मानी ॥ ८४ ॥
या अवघियां गतींवरती । उत्तमोत्तम उत्तम स्थिती ।
परात्पर परम गती । ममाज्ञाशक्ती जाय वेगीं ॥ ८५ ॥
तुझे आज्ञेची निजशक्ती । तुझी आहे तुजप्रती ।
म्यां तेथें जावें कैशा रीतीं । विकल्प चित्तीं धरुं नको ॥ ८६ ॥
योगयाग धर्मस्थितीं । धार्मिक जे गति पावती ।
ते भोगक्षयें क्षया जाती । पुनरावृत्ति सर्वांसी ॥ ८७ ॥
माझिया दर्शनाचें पुण्य । कल्प गेलिया नव्हे क्षईण ।
तें तूं पावसी शाश्वत स्थान । सत्य वचन हें माझें ॥ ८८ ॥
जटायु ऐकें सावधान । जैसें बोलती साधारण ।
तैसें नव्हे माझें वचन । त्वरित गमन तूं करीं ॥ ८९ ॥
ऐसें बोलतां श्रीरामचंद्र । वैकुंठवासी चतुर्भुज नर ।
पीतांबरधारी शंखचक्रधर । आले सत्वर विमानस्थ ॥ ९० ॥
विमानस्थ चतुर्भुज नर । शंखचक्र गदाधर ।
सांष्टांगी वंदिला श्रीरामचंद्र । जोडोनि कर उभे ठेले ॥ ९१ ॥
श्रीराम म्हणे त्या पुरुषांसी । जटायु माझा पुण्यराशी ।
त्यासी न्यावें वैकुंठासी । अक्षयवासीं स्थापावा ॥ ९२ ॥
विमान देखतांची पाहीं । जटायू जाला दिव्यदेही ।
लागला श्रीरामाच्या पायीं । म्हणे मी कायी वंदूं आतां ॥ ९३ ॥
तुझें करितांचि स्तवन । वेदशास्त्रां पडलें मौन ।
तेथे मी पक्षी अति दीन । गुणवर्णन काय वदूं ॥ ९४ ॥
कांही न वदणें हेंचि स्तवन । कांही न करणे हेंचि भजन ।
कांही न होणें हे प्राप्ति पूर्ण । परिपूर्णे श्रीराम ॥ ९५ ॥

जटायूने श्रीरामांना तीन वेळा प्रदक्षिणा करुन विमानारोहण केले :

त्रिवार करोनि प्रदक्षिणा । लागोनि श्रीरामाच्या चरणां ।
जटायू आरुढोनि विमाना । वैकुंठभुवना निघाला ॥ ९६ ॥
वैकुंठवासिये पुरुषासी । स्वामित्व आहे रामापासीं ।
जटायु विस्तिम मानसीं । निघे उल्लासीं वैकुंठा ॥ ९७ ॥
पुढतापुढतीं प्रदक्षिणा । पुढतपुढतीं लागे चरणां ।
मग आरुढोनि विमाना । वैकुंठभुवना निघाला ॥ ९८ ॥

तात त्वं निजतेजसैव गमितः स्वर्गं व्रज स्वस्ति ते ।
ब्रूमस्त्वेकमिमां वधूहृतकथां तातांतिके मा कृथाः ।
रामोऽहं यदि तद्दिनैः कतिपयैर्बीजानि सत्कंधरा ।
सार्द्धं बंधुजनेन सेंद्रविजयी वक्ता स्वयं राघवः ॥ १५ ॥

निजतेजें विराजमान । तेजस्वी देदीप्यमान ।
क्षणें पावसी वैकुंठभुवन । कृतकल्याण जतायु ॥ ९९ ॥

स्वर्गात राजे दशरथाची भेट झाल्यावर त्यांना
सीताहरणाचे वृत्त न सांगण्याची श्रीरामांची जटायूला विनंती :

श्रीरामें जटायु पुनीत । वैकुंठा धाडी श्रीरघुनाथ ।
अगाध कथा वैकुंठांत । होईल ख्यात तिहीं लोकीं ॥ १०० ॥
तुज भेटेल माझा पिता । माझी पुसेल वनवार्ता ।
तरी रावणें हरोनि केली सीता । हें सर्वथा नको सांगूं ॥ १ ॥
श्रीरामें उद्धरिले जटायूसी । परम आल्हाद दशरथासी ।
परी हारविली वनवासीं । ऐकतां त्यासी अति दुःख ॥ २ ॥
जन्मोनियां सूर्यवंशीं । सीता हारविली वनवासीं ।
लाज लाविली सूर्यवंशासी । अति आवेशीं क्षोभेल ॥ ३ ॥
मग वधावया लंकानाथ । येथें येईल दशरथ ।
एवढा होईल अनर्थ । सीताहरणार्थ नको सांगूं ॥ ४ ॥
तंव जटायु म्हणे श्रीरघुनाथा । भली हे सांगितली व्यवस्था ।
येर्‍हवीं मी सांगतो दशरथा । या गुह्यार्था न कळोनि ॥ ५ ॥
एवढें चरित्रकथन । कैसेनि पितयास होईल ज्ञान ।
तरी मागून येवोनि रावण । स्वमुखें आपण सांगेल ॥ ६ ॥

ते वृत्त स्वतः रावण मागाहून सांगेल :

ज्याचें मी करीन उद्धरण । तोचि येवोनि आपण ।
सांगेल सीतेचें हरण । कुळनिर्दळणप्रसंगें ॥ ७ ॥
सपुत्रबंधुप्रधान । ससैन्येंसीं दशानन ।
रामें वधिला विंधोनि बाण । सीताहरण करितांचि ॥ ८ ॥
ऐसी ऐकतांचि वार्ता । सुख होईल श्रीदशरथा ।
आनंद पूर्वजां समस्तां । माझ्या पुरुषार्था देखोनि ॥ ९ ॥
श्रीराम ज्ञानविज्ञापघन । ब्रह्मलिखित तुझें वचन ।
जटायु घालोनि लोटांगण । केलें गमन वैकुंठा ॥ १० ॥
श्रीराम स्वयें ब्रह्म पूर्ण । जटायू भक्त संपूर्ण ।
करोनि पितर सनातन । जटायु सुखसंपन्न पैं केला ॥ ११ ॥
एकाजनार्दना शरण । जालें जटायुउद्धरण ।
पुढें निर्दाळावया रावण । रघुनंदन चालिला ॥ १२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जटायद्धरणं नामैकविंशतितमोऽध्यायः ॥ २१ ॥
॥ ओंव्या ११२ ॥ श्लोक १५ ॥ एवं १२७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय एकविसावा