संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा

मंदकर्णी ऋषींचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मंदकर्णी ऋषींचा उद्धार

शरभंगे दिवं प्राप्ते मुनिसंघाः समंततः ।
अभ्यगच्छंत ककुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥

ब्राह्मण आश्रयार्थ श्रीरामांकडे येतात :

विराध वधिला अति दारुण । केलें शरभंगोद्धरण ।
तें देखोनि मुनिगण । आले ठाकून श्रीरामा ॥ १ ॥
वैखानस वालखिल्य । अग्निहोत्री शुद्धशीळ ।
राक्षसभयें अति व्याकुळ । आले सकळ श्रीरमापासीं ॥ २ ॥
जळाहारी फळाहारी । जताधारी ब्रह्मचारी ।
पत्राहारी वायुआहारी । निरहारी ऋषी आले ॥ ३ ॥
एक भगवे एक नागवे । वल्कलधारी मळिन लेवे ।
राक्षसभयें आले आघवे । आम्हां राघवें रक्षावें ॥ ४ ॥
एकांगुष्ठाव्रत एकांसी । एक ते वृक्षाग्रनिवासी ।
एक ते एकपाद तापसी । भयें संन्यासी येवों सरले ॥ ५ ॥
जळवासी आकाशवासी । विवरवासी अहर्निशीं ।
एक ते सदा शमशानवासी । तेही धाकेंसीं येवों सरले ॥ ६ ॥
राक्षसधाकाची धुकधुक । सपत्‍नीक अपत्‍नीक ।
विधुर आले पैं अनेक । रघुकुळटिळक संरक्षी ॥ ७ ॥
वृक्षवृद्धें श्रीरामाप्रती । अतिशयें येती काकुळती ।
राक्षसमहामार अती । आम्हां रघुपती रक्षावें ॥ ८ ॥
एक बोचरें उखळें हातीं । फळें ठेंचठेंचोनि खाती ।
तेही आले श्रीरामाप्रती । राक्षयभयें महाभीत ॥ ९ ॥
ज्ञानी ध्यानी समाधानी । राक्षसभयें भिवोनी ।
आले श्रीरामा ठाकोनि । अवघे मुनी एकत्र ॥ १० ॥

एवं वयं न मृष्यामो विप्रकारं तपस्विनाम् ।
क्रियमाणं वने घोरं रक्षोभिर्भीकर्मभिः ॥ २ ॥
ततस्त्वां शरणार्थ च शरण्यं समुपस्थिताः ।
परिपालय नो राम वध्यमानान्निशाचरैः॥ ३ ॥

ब्रह्मवृंदाची गा‍‍र्‍हाणी :

सांगती राक्षसांच्या कडोविकडी । मारिल्या तापसांच्या कोडी ।
मांस खावोनि सांडिली मढीं । लोळती बापुडीं असंस्कारें ॥ ११ ॥
जे संस्कार करुं जाती । त्यांसी राक्षस येवोनि खाती ।
ऐसीं मढीं नेणों किती । लोळती क्षितीं श्रीरामा ॥ १२ ॥
आम्ही आलों तुजपासीं । राक्षसीं बहुत केली कासाविसी ।
शरण आलों तुझ्या चरणांसी । आतां संरक्षीं श्रीरामा ॥ १३ ॥
आम्हांसी रक्षिता नाहीं कोणी । दैवें आलासी तूं धनुष्यपाणी ।
आम्ही घालितों लोटांगणी । आमच्या रक्षणीं सज्ज होई ॥ १४ ॥
आम्ही तुझे शरणागत । शरण आलों गा समस्त ।
तूं कृपाळु श्रीरघुनाथ । दिननाथें अनाथ रक्षावे ॥ १५ ॥
आम्ही केवळ गोब्राह्मण । काया वाचा मनसा शरण ।
आमचें करावें संरक्षण । अवघे जण प्रार्थिती ॥ १६ ॥

श्रीरामांचे विनम्र उत्तर :

ऐसें ब्राह्मणाचें दीन भाषण । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
कळवळोनियां संपूर्ण । काय आपण बोलत ॥ १७ ॥

रामस्तेषां वचःश्रुत्वा तापसानां तपस्विनाम् ।
इदं प्रोवाच धर्मात्मा सर्वानेव तपस्विनः॥ ४ ॥
नैवमर्हथ मां वत्कुमहमेवं सलक्ष्मणः ।
तपोवृद्धान्वयोवृद्धान्शरण्यान्शरणागतः ॥ ५ ॥
भवतामर्थसिध्यर्थमागतोऽहं यदृच्छया ।
तस्य मेऽयं वने वासो भविष्यति महाफलः ॥ ६ ॥
तपस्विनां रणे शत्रून्हन्तुमिच्छामि राक्षसान् ।
पश्यंतु विर्यमृषयः सभ्रातुर्मे तपोधनः ॥ ७ ॥

श्रीराम म्हणे मी किंकर कोण । नव्हे तुमच्या दासासमान ।
त्या मज म्हणा आलों शरण । हें नव्हे वचन तुम्हां योग्य ॥ १८ ॥
तुम्ही वयोवृद्ध तपोवृद्ध । सज्ञान ज्ञानी अति प्रबुद्ध ।
जेष्ठ महासिद्ध । सन्मानवाद न वदावा ॥ १९ ॥
तुम्हांपासूनि घ्यावा मान । तेचि आम्हांसी विषप्राशन ।
तुम्ही माझें देवतार्चन । साधुसज्जन मज पूज्य ॥ २० ॥
आमुचा धर्म द्विजरक्षण । वना आलों याचि कारण ।
खरदूषणनिर्दळण । संरक्षण साधूंसी ॥ २१ ॥
तुमचे आशीर्वादजोडीं । रणांगणीं निजपरवडीं ।
मारीन राक्षसांच्या कोडी । अर्धघडी न लागतां ॥ २२ ॥
ऐसी ऐकोनि श्रीरामवाणी । जयजयकार केला ब्राह्मणीं ।
हर्ष पावोनि मुनिगणीं । आशीर्वचनी अभिषेक ॥ २३ ॥

स राघवःसह भ्रात्रा वैदेह्या च परंतपः ।
सुतीक्ष्णस्याश्रमपदं जगाम सहितो द्विजैः ॥ ८ ॥

सीता लक्ष्मण रघुनाथ । सांगतें मुनिगण समस्त ।
शरभंगानें धाडिले जेथ । त्या आश्रमा जात सुतीक्ष्णाच्या ॥ २४ ॥

सर्वजण सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमी जातात :

सुतीक्ष्ण ऋषि महाश्रेष्ठ । तपस्तेजें अति तेजिष्ठ ।
त्याच्या आश्रम सुखोद्दिष्ट । दुःखसंकट असेना ॥ २५ ॥
नवल आश्रमाची लीला । सुवास सुस्वाद फळमूळां ।
आचमन करितां तेथींच्या जळा । भ्रमा सकळा निवारी ॥ २६ ॥
आश्रमा येतांचि देख । अवघ्यां आलें परम सुख ।
सुखावोनि रघुकुळटिळक । ऋषिसन्मुख तो आला ॥ २७ ॥

श्रीरामांचे स्वागत :

आला देखोनि रघुनंदन । ऋषीनें सांडिलें आसन ।
सांडोनियां जप ध्यान । अति सावधान भेटीसी ॥ २८ ॥
ज्यालागीं कीजे जप ध्यान । ज्यालागीं कीजे तपःसाधन ।
ज्यालागीं किजे अनुष्ठान । तें हें चिद्रत्‍न श्रीराम ॥ २९ ॥
ज्यालागीं कीजे वेदपठण । ज्यालागीं कीजे शास्त्रश्रवण ।
ज्यालागीं कीजे योगसाधन । तें हें चिद्रत्‍न श्रीराम ॥ ३० ॥
ज्यालागीं कीजे व्रत तप । ज्यालागीं कीजे रुद्रजप ।
ज्यालागीं धैर्य आकल्प । तें हें चित्स्वरुप श्रीराम ॥ ३१ ॥
ज्यालागीं शिवभवानी । नित्य चिंतिती अनुदिनी ।
तो हा श्रीराम देखिला नयनीं । जो त्रिभुवनीं परमात्मा ॥ ३२ ॥
ज्यालागीं आम्ही नित्य तापसी । ज्यालागीं आम्ही वनवासी ।
तो हा श्रीराम अनायासीं । भाग्यें आश्रमासी स्वयें आला ॥ ३३ ॥
ऐसें ऋषींचें मनोगत । जाणोनिया सुनिश्चित ।
श्रीराम उल्हासयुक्त । चरण वंदित ऋषींचे ॥ ३४ ॥
श्रीराम ऋषींचें मनोगत । हृदयीं जाणतो हृदयस्थ ।
श्रीराम परब्रह्म निश्चित । ऋषि जाणत निजज्ञानें ॥ ३५ ॥
देखणें देखोनि अति तिक्ष्ण । यालागीं नांवे सुतीक्ष्ण ।
त्याचे श्रीरामें वंदिलें चरण । दिधलें अलिंगन ऋषीनें रामा ॥ ३६ ॥

स निरीक्ष्य तो धीरं रामं दशरथात्मजम् ।
मूघ्नर्यवघ्राय चाश्लिष्य बाढं वचनमब्रवीत्॥ ९ ॥
उपजिघ्रन्नतो मूर्घ्निं वचनं चेढमब्रवीत ।
मत्प्रसादात्सभार्यस्त्वं विहरस्व सलक्ष्मणः ।
रामस्तु सहसौमित्रिः सुतीक्ष्णेनाभिपूजितः ॥ १० ॥

स्वयें सुतीक्ष्णें आपण । आलिंगोनि श्रीराम लक्ष्मण ।
करोनि मस्तकीं अवघ्राण । आल्हादें वचन बोलत ॥ ३६ ॥
माझा आश्रम दंडकारण्य । येथें नाहीं भयबंधन ।
श्रीराम सीता लक्ष्मण । सुखसंपन्न वसावें ॥ ३७ ॥
माझिया निजआश्रमाआंत । न चले राक्षसांचा घात ।
सुखे वसावें श्रीरघुनाथ । सीतासमवेत स्वानंदें ॥ ३८ ॥
अति प्रेमें सुतीक्ष्ण । पूजोनियां श्रीरामलक्ष्मण ।
देवोनि वनफळीं भोजन । षण्मास पूर्ण राहविले ॥ ४० ॥

तमुग्रतपसा दिप्तं महर्षि सत्यवादिनम् ।
आवासं त्वहमिच्छामि प्रदिष्टमिह कानने॥ ११ ॥
एवमुक्तस्तु रामेण महर्षिर्लोकाविश्रुतः ।
अब्रवीन्मधुरं वाक्यं हर्षेण महता युतः ॥ १२ ॥

दंडकारण्यात कोठे राहाणे योग्य ? :

सुतीक्ष्ण तपस्तेजोराशी । श्रीराम पुसे स्वयें त्यासी ।
मज रहाव्या आश्रमासीं । स्थान नेमेंसीं सांगावें ॥ ४१ ॥
शरभंगाची आज्ञा ऐसी । सुतिक्ष्ण सत्यवादी तापसी ।
स्थाननेम पुसोनि त्यासी । त्या आश्रमासी वसावें ॥ ४२ ॥
ऐकतां श्रीरामाचें वचन । ऋषि झाला सुखसंपन्न ।
दिधलें श्रीरामा अलिंगन । सर्वांगीं पूर्ण निवाला ॥ ४३ ॥
हर्षे सांगे श्रीरामासी । दंडकारण्यनिवासी ऋषी ।
पाहें त्याच्या आश्रमांसी । देखतां तुम्हांसी आल्हाद ॥ ४४ ॥
जे जे आश्रमीं तुम्हांसी । विश्रांति वाटेल अतिशयेंसी ।
त्याचिया निवासस्थानासी । नेमस्तेंसी नेमीन ॥ ४५ ॥
करोनि ऋषिआश्रमदर्शन । शीघ्र येथें यावें आपण ।
मग मी निवासाचें स्थान । नेमस्त जाण नेमीन ॥ ४६ ॥
ऐकोनि ऋषीचें वचन । श्रीराम सीता लक्ष्मण ।
तिघीं करोनियां नमन । केलें गमन दंडकारण्या ॥ ४७ ॥

जाण्याचा क्रम बदलण्याची लक्ष्मणाची सूचना :

तंव बोलिला लक्ष्मण । मागें सीता चालतां जाण ।
विराधें केलें होतें हरण । तैसें आपण न करावें ॥ ४८ ॥
पुढें श्रीराम मागें सौमित्र । मध्यें घालोनियां सीता सुंदर ।
वेगीं निघाले सत्वर । धनुर्धर महाबळी ॥ ४९ ॥
सीतेपासीं ऋषिगण । तापस ब्रह्मचारी ब्राह्मण ।
श्रीरामासवें निघाले जाण । त्यांसही रक्षण श्रीराम ॥ ५० ॥
वनें उपवनें शुभ काननें । ऋषिआश्रम अगाध स्नानें ।
तापस करिताती अनुष्ठानें । वेदाध्ययनें अगिन्होत्रें ॥ ५१ ॥
पाहतां ऋषींचे महिमान । आलोडिती दंडकारण्य ।
तंव पुढें तडागी सुगायन । श्रीराम लक्ष्मण ऐकतातई ॥ ५२ ॥
श्रेष्ठ तडाग अति पुनीत । त्यामाजीं मनोहर नृत्यगीत ।
परी गातें नाचतें न दिसे तेथ । तेणें विस्मित श्रीराम ॥ ५३ ॥

पंचाप्सर सरोवरावर नृत्यगीत ऐकून त्याचा वृत्तान्त विचारतात :

सवें चालती ऋषिगण । त्यांसी श्रीराम पुसे आपण ।
येथें गीत नृत्य करी कोण । मग ते पूर्वकथन सांगती ॥ ५४ ॥

ऋषभ ऊवाच :
इदं पंचाप्सरो नाम तटाकं पूर्वकालिकम् ।
निर्मितं तपसा राम मुनिना मांडकर्णिना ॥ १३ ॥
स हि तेपे तपस्तीव्रं मांडकर्णिर्महामुनिः ।
दशवर्षसस्त्राणि वायुभक्षो जलाशये ॥ १४ ॥

या तडागा नाम पंचाप्सर । पुरातन हें सरोवर ।
निर्मिता मांडकर्णि ऋषीश्वर । तेणें तप तीव्र केलें ॥ ५५ ॥

मंदकर्णीचा तपोभंग करण्यासाठी अप्सरा :

येथें दहासहस्त्र वर्षी । निराहारी वायुभक्षी ।
त्याची स्थिर बुद्धि कैसी । काम मानसीं स्पर्शेना ॥ ५६ ॥
कर्मठ म्हणती स्वर्ग चांग । ऋषि म्हणे तो क्षयरोग ।
सत्यलोकींचे जे जे श्रेष्ठ भोग । तो मरणमार्ग तयाचा ॥ ५७ ॥
जेथवरी विषयासक्ती । तेथवरी पुनरवृत्ती ।
ऐसें जाणोनि निश्चितीं । तीव्र तपस्थिति मांडकर्णि ॥ ५८ ॥
त्याच्या देखोनि तीव्र तपासी । स्वर्गीं हाहाकार सुखरांसी ।
इंद्रें विघ्न मांडिले त्यासीं । पंचाप्सरांसी धाडिलें ॥ ५९ ॥
रुप यौवन मनोहर । गीत नृत्य सालंकार ।
तें देखोनियां ऋषीश्वर । कामतत्पर पैं जाला ॥ ६० ॥
त्याची देखोनि कामासक्ती । अप्सरा नागव्या नाचती ।
तोही लिंग धरोनियां हातीं । निजकामार्थी नाचत ॥ ६१ ॥

ऋषींचा प्रक्षोभव अप्सरांचे पलायन :

त्यांसी झोंबोनि मागातां रती । त्या निघाल्या ऊर्ध्वगती ।
त्यांसी ऋषि येत काकुळती । कृपेनें रती मज द्यावी ॥ ६२ ॥
मज रत्यर्थी अतीतासी । विमुख होतां नये तुम्हांसी ।
मी लागतों तुमच्या पायांसी । कृपेनें रतीसी मज द्यावें ॥ ६३ ॥
मी तुमचा धर्मसांगती । परमार्थी मज द्यावी रती ।
त्यांचें अंगुष्ठ धरी दातीं । तंव त्या जाती उपेक्षोनी ॥ ६४ ॥
तंवचि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता न देखे दृष्टीं ।
एकांती तीस जालिया भेटीं । विरक्तही उठी भोगार्थीं ॥ ६५ ॥
हो का कामिनी एकदा मनीं । एकांतींच देखतां नयनीं ।
धांवोनि झोंबती जपी ध्यानी । तपोनिर्दळणी स्त्रीसंग ॥ ६६ ॥
जंव पुरुषासी अति विरक्ती । तंवचि सिद्धी ओळंगती ।
पुरुष जालिया कामासक्ती । सिद्धी जाती थुंकोनी ॥ ६७ ॥
स्त्रीगीत पडतां कानीं । वैराग्य गेलें हरपोनी ।
यालागीं नांवें मंदकर्णी । श्रुतिपुराणीं अभिधान ॥ ६८ ॥
प्रमदागाणें ऐकोनि कानीं । प्रसाद पावला तत्क्षणीं ।
वैराग्य विवेक गेलिया दोनी । मंदकर्णि तेणें नाम ॥ ६८ ॥

नीतो मदनवश्यत्वं सुराणामर्थसिद्धये ।
ताश्चैवाप्सरसः पंच मुनिपत्‍नीत्वमागताः ॥ १५ ॥
तटाके निर्मितं तासां तस्मिन्नंतर्हितं गृहम् ।
तत्रैवाप्सरसः पंच निवसंत्या यथासुखम् ॥ १६ ॥
रमयंति तपोयोगान्मुनिं यौवनमास्थितम् ।
तासां संक्रीडमनानामेष वाढित्रनिस्वनः ॥ १७ ॥
तडागे निर्मितं तासां तस्मिन्नंतर्हिततं गृहम् ॥ १८ ॥

इंद्राचे वरप्रदान । तिहीं अप्सरीं पांचा जणीं ।
सुरकायार्थ साधोनी । ऋषि मोहिला स्त्रीमोहनी । कामगाणीं संतप्त ॥ ७० ॥
इंद्रें करविलें विघ्नासी । ऐसें कळलिया तया ऋषीसी ।
कोपोनि देईल शापाशी । तेणें इंद्रासी महाभय ॥ ७१ ॥
भूत भविष्य वर्तमान । ऋषीस होय त्रिकाळज्ञान ।
अपूर्ण कामें कोपायमान । शाप दारुण देईल ॥ ७२ ॥
ऋषि तापसी महाक्रूर । दहा सहस्त्र वर्षे तप अत्युग्र ।
शात देईल अति दुर्धर । धाकें सुरेंद कांपत ॥ ७३ ॥
शापभयें अतिसत्वर । ऋषीपासीं आला इंद्र ।
मागसी तो देईन वर । आज्ञाधार मी स्वामी ॥ ७४ ॥
तंव ऋषि म्हणे इंद्रासी । पंचाप्सरा लावण्यराशी ।
त्या मज द्याव्या नित्यभोगासी । इंद्रें ऋषीसी दीधल्या ॥ ७५ ॥
दहासहस्त्र वर्षीं । तपें जरठ जर्जर ऋषी ।
तो नावडे अप्सरांसी । म्हणोनि त्यासी उपेक्षिती ॥ ७६ ॥
जाणोनि अप्सरांचे मन । ऋषि सामर्थ्ये अति संपन्न ।
जाला स्वरुपें मदनमोहन । विराजमान तारुण्यें ॥ ७७ ॥
देखोनि ऋषीच्या रुपासी । अप्सरा भुललिया सर्वस्वेंसी ।
आन पुरुष नावडे त्यांसी । जीवभावेंसीं विनतल्या ॥ ७८ ॥
ऋषि सामर्थ्यें अत्यंत थोर । ते तडागजळीं जळांतर ।
उभारोनि निजमंदिर । क्रिडातत्पर पंचाप्सरीं ॥ ७९ ॥
त्यांचे गीतनृत्यध्वनी । श्रीराम पडिले तुझे श्रवणीं ।
ऐसे सांगती सकळ मुनी । विस्मित मनीं श्रीराम ॥ ८० ॥
तेथील करितां आचमन । श्रीराम देखे ऋषिभुवन ।
मंदकर्णीस आल्हाद पूर्ण । श्रीरघुनंदन देखोनि ॥ ८१ ॥

मंदकर्णीचे स्वागत :

अति आदरेंकरोनि ऋषीं । श्रीराम नेला निजभवनासी ।
सीता राम लक्ष्मण त्रिवर्गांसी । वर्षानुवर्षी राहविलें ॥ ८२ ॥
मंदरर्णी ऋषीश्वर । श्रीरामसेवेसी तत्पर ।
पंचाप्सरा अति सादर । श्रीरामचंद्रनिजभजना ॥ ८३ ॥
पूर्वीं निष्काम तपोवृत्ति । त्या तपाची फलप्राप्ति ।
घरा आली श्रीरामामूर्ति । हृष निश्चितीं सभाग्य ॥ ८३ ॥
त्याचें भाग्य वानूं किती । चढती वाढती नित्यप्रीती ।
श्रीरामाची आवडे भक्ति । अहोरात्रीं उल्हास ॥ ८४ ॥
जपतां श्रीरामनाम वाक्पुटीं । उद्धरले कोट्यनुकोटी ।
श्रीरामप्रेम धरितां पोटीं । ब्रह्मसंतुष्टी ऋषिवर्या ॥ ८५ ॥
करितां श्रीरामाची भक्ती । मंदकर्णि पावला मुक्ती ।
पंचाप्सरा त्याचे संगतीं । निजात्ममुक्ती पावल्या ॥ ८६ ॥
श्रीरामनामें जड तरती । तो श्रीराम देखतां अति प्रीतीं ।
चारी मुक्ती दासी होती । श्रीरामभक्तिप्रतापें ॥ ८७ ॥
ऋषीस ब्रह्मसमाधान । अप्सरा जाल्या सुखसंपन्न ।
करोनियां दीनोद्धरण । रघुनंदन निघाला ॥ ८८ ॥

उषित्वा स सुखं तत्र पूज्यमानो महर्षिभिः ।
जगाम चाश्रमांस्तेषां पर्यायेण तपस्विनाम्॥ १९ ॥
क्वचित्परिदशान्मासानेकसंवत्सरं क्वचित् ।
क्वचिच्च चतुरो मासान्पज्च षट् च परान्क्व्चित॥ २० ॥
अपरत्राधिकान्मासानध्यर्धमधिकं क्वच्चित् ।
त्रीन्मासानष्टमासांश्च राघवो न्यवसत्सुखम् ॥ २१ ॥
तत्र संवसतस्तस्य मुनीनामाश्रमेषु वै ।
रमतश्वानुकूल्येन ययुः संवत्सरा दश ॥ २२ ॥
प्ररिसृत्य च धर्मज्ञो राघवःसह सीतया ।
सुतीक्ष्णस्याश्रमपदं पुनरेवाजगाम ह ॥ २३ ॥

आश्रमाचे निरिक्षण करीत सुतीक्ष्णाचे पुनः आमगन :

मंदकर्णीचें देखोनि प्रेम । त्या आश्रमीं सुखी जाला श्रीराम ।
ऋषिही सुखी जाला परम । सुखसंभ्रम अप्सरां ॥ ८९ ॥
सुखी जालीं लक्ष्मण सीता । मग ऋषीस पुसोनि तत्वतां ।
पहावया आश्रमां समस्तां । होय निघता श्रीराम ॥ ९० ॥
ऋषिआश्रम सावकाश । कोठे मास कोठें दोन मास ।
कोठें नेमस्त पंच मास । कोठें षण्मास श्रीराम राहे ॥ ९१ ॥
कोठें वर्ष दीड वर्षी । कोठें राहे चतुर्मासीं ।
ऐसा विचरता वनवासीं । सुतिक्ष्णापासीं राम आला ॥ ९२ ॥
श्रीरामाचें पुनरागमन । तेणें हरिखला सुतीक्ष्ण ।
आलिंगिले श्रीराम लक्ष्मण । आल्हाद पूर्ण ऋषिवर्या ॥ ९३ ॥
नित्य श्रीरामपूजन । देवोनि वनफळें भोजन ।
राहविला श्रीरघुनंदन । किंचिन्न्यून अर्धाब्द ॥ ९४ ॥

अगस्ति-आश्रमाला प्रयाण :

श्रीराम बैसोनि सावकासीं । सादरें पुसे सुतीक्ष्णासी ।
अगस्त्याश्रम जये प्रदेशीं । तेथें आम्हांसी धाडावें ॥ ९५ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सुतीक्ष्ण म्हणे धन्य धन्य ।
अगस्त्याश्रम परम पावन । वश्य गमन तेथें किजे ॥ ९६ ॥
वन लागलेंसे घनदाट । सहसा मार्ग न कळे स्पष्ट ।
स्वामींनीं दाखवावी वाट । अवस्था उत्कट गमनार्थी ॥ ९७ ॥
श्रीरामा मी सांगूं किती । तूं आमच्या गतीची गती ।
मार्ग पुससी आम्हांप्रती । आश्चर्य किती सांगावें ॥ ९८ ॥
येथोनि असे अर्धयोजन । अगस्तीचें आश्रमस्थान ।
येणें मार्गें करावे गमन । ऐसें सुतीक्ष्ण बोलिला ॥ ९९ ॥
सीता राम लक्ष्मण । ऋषीस करोनियां गमन ।
तिघीं जणीं केलें गमन । अगस्तिस्थान लक्षूनी ॥ १०० ॥

अगस्तीचा महिमा :

अगस्तीचें निजमहिमान । ऐकें श्रीराम सावधान ।
वातापी इल्वल ब्राह्मणघ्न । त्यांचे निर्दळण तेणें केलें ॥ १ ॥

इहैकदा किल क्रूरो वातापिरपि चेल्वलः ।
भ्रातरौ सहितावास्तां ब्राह्मणघ्नौ महसुरौ ॥ २४ ॥
वातापी ब्राह्मणं रुपमिल्वलः संस्कृतौदनम् ।
आमंत्रयति विप्रान्स श्राद्धमुद्दिश्य निर्घृणः ॥२५॥

वातापी इल्वलांचा नाशः। वातापी ब्राह्मण होय आपण ।
इल्वल कपटें होय अन्न ।
्राह्मण निमंत्रोनि जाण । श्राद्धभोजन संतृप्त देती ॥ २ ॥
वातापी बोभाय बंधूसी । येरु निघे फोडोनि द्विजकुशी ।
यापरी तिहीं ब्राह्मणांसी । छळोनि राक्षसीं मारिजे ॥ ३ ॥
ऐसें जाणोनि ब्राह्मणघाती । त्यांपासीं स्वयें आला अगस्ती ।
इल्वलओदनान्नप्रयुक्ती । दिधलें संतृप्त भोजन ॥ ४ ॥
अगस्ती प्रतिग्रासोग्रासीं । भस्म करी जठराग्नीसी ।
ठाव नाहीं इल्वकासी । कवणें कुशी फाडावी ॥ ५ ॥
वातापी बोभाय इल्वलासी । तंव अगस्ति म्हणे म्यां जिरविलें त्यासी ।
कोप आला वातापीसी । अगस्तीसी गिळूं धांवे ॥ ६ ॥
विकट धरोनि राक्षसवेष । दारुण देवोनियां हाक ।
धांवला अगस्तिसन्मुख । विक्राळ मुख पसरोनी ॥ ७ ॥
अगस्तिनेत्रींचा कोपाग्नी । वातापी सांडिला जाळोनी ।
भस्म केला अर्धक्षणीं । जो कां ब्राह्मणीं छळघाती ॥ ८ ॥
ऐसे पापा राक्षस दोनी । अगस्तीनें सांडिलें जाळोनी ।
ऐसा प्रतापी महामुनी । अवश्य दर्शनीं जावें तुम्हीं ॥ ९ ॥

अयमाख्यामि ते राम यत्रागस्त्यो महमुनिः ।
योजनान्याश्रमात्तात याहि चत्वारि वैततः ॥ २६ ॥
दक्षिणेन महान्श्रीमानगस्त्यभ्रातुराश्रमः ।
तत्रैकां रजनीं व्युष्य प्रभाते राम गभ्यताम् ॥ २७ ॥

मार्गात अगस्तीचे धाकटे बंधू महामतींची भेटः

स्वयें सागें सुतीक्ष्ण । पुढें वन अति गहन ।
सहसा न टाकीं अगस्तिस्थान । सांगेन खूण ते ऐका ॥ ११० ॥
ज्येष्ठ बंधु नांवे अगस्ती । कनिष्ठा नाम महामती ।
तेथोनि अर्धयोजनांतीं । आश्रमस्थिति तयाची ॥ ११ ॥
जावोनि त्याच्या आश्रमाप्रती । आजिची तेथें क्रमोनि राती ।
प्रातःकाळीं श्रीरघुपती । तुम्हां अगस्ति भेटल ॥ १२ ॥
महामतीची वनस्थळी । न पेरितां साळी केळी ।
पिंपळी नागवेली पोफळी । आश्रमाजवळी शोभती ॥ १३ ॥
ऋषिसत्तम महमती । तुम्हांसी भेटावया अगस्ती ।
ज्या ज्या सांगेल गमनगती । त्या त्या स्थितीं तुम्हीं जावें ॥ १४ ॥
सुतीक्ष्णा करोनि नमन । तिघीं जणीं केले गमन ।
वने उपवनें शोभायमान । वसतिस्थान महामतीचें ॥ १५ ॥
आश्रमा आला श्रीरघुपती । परम आल्हाद महामती ।
राहवोनियां अति प्रीतीं । सीतपति पूजिला ॥ १६ ॥
एकाजनार्दना शरण । वधावया त्रिशिरा खर दूषण ।
अगस्तीसी श्रीरामदर्शन । अस्त्रगहण ऋषिवरदें ॥ १७ ॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामपंचाप्सरामंदकर्ण्यद्धरणं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
॥ ओंव्या ११७ ॥ श्लोक २७ ॥ एवं १४४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौथा