संत एकनाथ महाराज

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला

॥ श्रीसद्‌गुरवे रामचंद्राय नमः ॥

जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।
प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं
बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥

श्रीगणेश वंदन

ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।
वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥
तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।
तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥
यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।
तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥
ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।
आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥
ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन ।
माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥
ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न ।
उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥

श्रीसरस्वती वंदन

आतां वंदूं सरस्वती । जे चित्तचेतना चैतन्यशक्ती ।
जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती । अमूर्ताची मूर्ति स्वरूप जिचें ॥ ७ ॥
हंसवाहिनी हा शब्द रूढ । परी तें परमहंसी आरूढ ।
गुह्यार्थ जे अति गूढ । ते दावी उघड ग्रंथार्थीं ॥ ८ ॥
परमहंस अंशाअंशीं । शोभा शोभे अहर्निशी ।
सत्त्वातीत शुद्धतेसीं । तोचि निजांगासी शुभ्रवर्ण ॥ ९ ॥
ॐकार तो तिचा वीणा । त्रिमात्रा तिन्हीं तंती गहना ।
वेदोपनिषद पुस्तक जाणा । अर्थवी अर्थना परमार्थता ॥ १० ॥
ऐसी अगाधत्वें अति सुंदर । प्रभा परमार्थै मनोहर ।
जेणें प्रकाशे चराचर । तो मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी ॥ ११ ॥
ऐसी ऐकोनी स्तुती । सुप्रसन्न सरस्वती ।
स्वभाएंतिची वदनीं वस्ती । या वचनोक्ती ते वदवी ॥ १२ ॥
ते म्हणे गा रामकथेतें वेगीं चालवीं भावार्थें ।
सद्‌भावें होईल सरतें । प्रिय संतांतें मी करीन ॥ १३ ॥

श्रीसंत वंदन

आता वंदूं संतसज्जन । जे आर्तचातकां चिद्‌घन ।
त्रिविध तापां उपशमन । जे निजजीवन साधकां ॥ १४ ॥
ज्यांची सहज झाल्या संगती । सकळ कर्मां होय निवृत्ती ।
स्वधर्म सच्छांती येती । भावार्थें प्राप्ती परमार्था ॥ १४ ॥
सत्संगाचे निजमेळीं । परमार्थ जाय पाल्हाळीं ।
लगडोनि ये स्वानंदफळीं । सर्वकाळीं सफळित ॥ १६ ॥
बीजत्वाचा ना फेडिजे देंठ । आदि मध्य नाकळे शेवट ।
स्वानंद रसाळ फळघोंट । अनुभव स्पष्ट सत्संगें ॥ १७ ॥
ऐसिया संतांचे महिमान । आकळे ऐसें कैंचें ज्ञान ।
बालत्वें वोलिलो तें न्यून । द्यावें अवधान कथेसी ॥ १८ ॥
ऐसें ऐकोनि वचनस्तवन । सुखावले संतसज्जन ।
तुझे मनोगतीं आमुचें मन । सदा सावधान ग्रंथार्थीं ॥ १९ ॥
आम्हांसी आवडे रामकथा । तेथेंही तूं रसाळ वक्ता ।
तरी स्तुती सांडोनि आतां । वदें ग्रंथार्था अर्थान्वयें ॥ २० ॥

श्रीकुलदेवता वंदन

आतां वंदूं कुळदेवतां । जे नामरूपें एकनाथा ।
एकपणादेही माथां । नांदवी निजभक्तां निजान्वयें ॥ २१ ॥
ऐकोनि सद्‌गुरूची बोली । बोधपरशुरामें निवटिली ।
अनेकत्व सोडोनि वहिली । स्वयें उठली एकत्वें ॥ २२ ॥
ते एकरूपें एकनाथा । मूळान्वयें कुळदेवतां ।
एकाकारावांचूनि सर्वथा । द्वैताची कथा करूं नेदी ॥ २३ ॥
एकपणजनीं वनीं । एकपण मनीं नयनीं ।
एकपण त्रिभुवनीं । नांदवीं म्हणोनि कुळदेवाअ ॥ २४ ॥
ब्रह्मा आणि हरि हर । त्रिगुणी तेन्ही अवतार ।
मी त्रिगुणांच परी प्रियकर । केलों साचार एकात्मता ॥ २५ ॥
ब्रह्मा आणि हरि हर तियेचें खेळणें जगडंबर ।
मज खेळावया चिदंबर । देवोनि प्रियकर कुळदेव्या केलों ॥ २६ ॥
ते जय जय जगदंबा । उदो म्हणे ग्रंथारंभा ।
श्रीरामकथेची शोभा । अति वल्लभा मजलागीं ॥ २७ ॥
तेंचि भावार्थरामायण । तुज करितां निरूपण ।
न्यून तें तें करीन पूर्ण । कथा संपूर्ण संपादी ॥ २८ ॥

श्रीसद्‌गुरु वंदन

आतां वंदूं सद्‌गुरू । जो स्वानंदबोधवज्रपंजरू ।
ज्याचेनि हा संसारू होय सुखकरू तरणोपाया ॥ २९ ॥
जेणें कस्तकीं ठेवितां हात । अहंभावा होय घात ।
सोहंभाव होय प्राप्त । दावी अप्राप्त अद्वयानंद ॥ ३० ॥
जन तोचि जनार्दन । जनार्दन सकळ जन ।
एका जनार्दना शरण । मीतूंपण विरालें चिदन्वयें ॥ ३१ ॥
जनार्दना पढिये एकपण । एका पढिये जनार्दन ।
स्वरूप एक नामें भिन्न । अनन्य शरण या नांव ॥ ३२ ॥
जनार्दन माझे मन । जनार्दन माझे नयन ।
जनार्दन वदतें वदन । वक्ता वचन श्रीजनार्दन ॥ ३३ ॥
जनार्दन गतीची गती । जनार्दन मतीची मती ।
जनार्दन स्फुरे स्फूर्तीं । सकळ व्युत्पत्ति जनार्दन ॥ ३४ ॥
निजांगें जो सकळ जन । यालांगी नांवे जनार्दन ।
लिंगदेहा करी मर्दन । यालांगी जनार्दन व्युत्पतिव्याख्या ॥ ३५ ॥
येथे तो कर्ता मी अकर्ता । हेंही बोलणें अति मूर्खता ।
मी कर्ता तो अकर्ता । हे परम मूर्खता सोलींव ॥ ३६ ॥
यापरी मीतूपण । दूरी दवडो जनार्दन ।
बोलवी भावार्थ रामायण । कथानिरूपण चालवी ॥ ३७ ॥

रामायणाचे मूळ कारण

अजापास्नि उत्पत्तिजेत । दशेंद्रियें अति समर्थ ।
जन्मला राजा दशरथ । अतिविख्यात तिहीं लोकीं ॥ ३८ ॥
मूळचे अजत्व लोपोनि चृष्टी । अजन्मा राम जन्मेल पोटीं ।
हे रामायणींची मूळ गोष्टी । शास्त्रपरिपाठी परमार्थ ॥ ३९ ॥
रावणाचे नित्यांकित । सुरवर झाले जी समर्थ ।
ब्रह्मादिकां चिंता अद्‌भुत । तिहीं रमानाथ प्रार्थिला ॥ ४० ॥
करावया राक्षसांचा घात । मी अवतरेन रघुनाथ ।
रमा मुख्य कलहा हेत । इचेनि अंत निशाचरां ॥ ४१ ॥
तुम्ही सकळही सुरवर । वेगीं व्हावें वानर ।
आम्ही दोघें धरोनि अवतार । सत्य करूं वचनार्थ ॥ ४२ ॥
फेडावया देवांची सांकडी । स्वधर्म वाढवावया वाढी ।
नामें मोक्षाची उभवावया गुढी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ४३ ॥

राजा दशरथाची कथा

ते सूर्यवंशीं अजाचा सुत । अहमात्मा जन्मला दशरथ ।
ऐका त्याचा वृतांत धर्मयुक्त स्वधर्मीं ॥ ४४ ॥
त्यासी तिघी राणिया प्रबुद्धा । लोकोत्तर अति प्रसिद्धा ।
धर्मपत्न्यां विशुद्धा । नामानुवावा अवधारा ॥ ४५ ॥
ज्येष्ठ कौसल्या ते सुद्विधा । सुमित्रा ते शुद्ध मेधा ।
कैकेयी ते अविद्या । मंथरा कुविद्या तीपासीं ॥ ४६ ॥
उदरा येईल आदिमूर्तीं । त्या आधी नव्हती संतती ।
अपुत्रपणें नृपती । पुत्रार्थीं उद्यत ॥ ४७ ॥
सुख नेदी राजभुवन । सुख नेदी सिंहासन ।
सुख नेदी भोगस्थान । मान सन्मान सुख नेदी ॥ ४८ ॥
सुख नेदी अलं कार वस्त्र । सुख नेदी भोग कलत्र ।
सुख नेदी छत्र चामर । स्तुतिस्तोत्र सुख नेदी ॥ ४९ ॥
राजा पोटांतून भोगीं विरक्त । यालागीं पोटा येईल रघुनाथ ।
जो अत्यंत विषयासक्त । त्यासी भगवंत स्पर्शेना ॥ ५० ॥
जेवीं आंधळे न देखे पिता । तेवी विषयी नेणती भगवंता ।
तोच त्यांचा प्रतिपाळिता । देखणी अवस्था त्यां नाहीं ॥ ५१ ॥
दशरथा न गमे जनस्थानीं । निघाला पारधीलागीं वनीं ।
विचरे एकाकी होऊनी । आवडे विजनीं रहिवास ॥ ५२ ॥
दुसरियाचा सहसा घात । सर्वथा न मानी दशरथ ।
हृदयीं कळवळला रघुनाथ । झाला विरक्त सर्वार्थीं ॥ ५३ ॥
वनीं एकाकी विहार । करी वनफळांचा आहार ।
नावडे राजोपभाग उपचार पुत्रार्थीं थोर साक्षेपीं ॥ ५४ ॥

श्रावणाची कथा

होणारासारखी बुद्धी । मांडली निशि अवस्था पारधी ।
अंधारीं श्रावणातें वधी । मातापिता खांदी कावडीसी ॥ ५५ ॥
लौकिकाची लोकवार्ता । श्रावणें पितरें कावडी ठेवतां ।
हे तंव समूळ अबद्ध कथा । तो मातापिता न विसंबे ॥ ५६ ॥
अंधारीं अंध माता-पिता । झाडीं ठेवी हे मिथ्या वार्ता ।
खांदीं घेवोनि ताता । जीवनार्थ तो आला ॥ ५७ ॥
बुडबुड कमंडलूच्या शब्दीं । ध्वनी उठली जळसंनिधी ।
दशरथ केवळ शब्दवेधी । बाणवेधी विंधिला ॥ ५८ ॥
धाव लागता संपूर्ण । काय बोलिला श्रावण ।
कोण्या सभाग्याचा बाण । रामस्मरणेंसी आला ॥ ५९ ॥
श्रावणासी बाण लागतां । नठवेचि मातापिता ।
नाठवेचि देहममता । राम स्मरतां देह त्यागी ॥ ६० ॥
अंतरीं श्रीरामस्मरण । परम भाग्य हें कल्याण ।
बाण नव्हे तो ब्रह्म पूर्ण । स्मरणेंसीं प्राण त्यागिला ॥ ६१ ॥
दशरथ बोलिला आपण । कोण्या साधूचें हें वचन ।
माझ्या पापाचें न्र्दळण । केलें संपूर्ण रामनामें ॥ ६२ ॥
श्रीरामनाम स्वयें ऐकतां । रायासी न बाधे ब्रह्महत्या ।
रामस्मरणें देह त्यागितां । नित्य मुक्तता श्रावणासी ॥ ६३ ॥
रामनामें नित्य निर्धूत । एक मुक्त एक पापातीत ।
ब्रह्महत्येसीं दशरथ । अति अलिप्त रामनानें ॥ ६४ ॥
दशरथ जंव येवोनि पाहे । तंव श्रावण बाणें विंधिला आहे ।
त्याच्या पितरें पुत्रमोहें । राजा लवलाहें शापिला ॥ ६५ ॥
आम्हांसी दिधले पुत्रदुःख । तूही पावसी पुत्रशोक ।
शापें रायासी परम हरिख । मी पुत्रमुख देखेन ॥ ६६ ॥
ब्राह्मणशाप नव्हे वृथा । मी पुत्र पावेन सर्वथा ।
परम आल्हाद दशरथा । आनंद चित्ता वोसंडे ॥ ६७ ॥
शाप नव्हे परमामृत । उल्हासे रायाचें चित्त ।
पोटीं प्रकटेल रघुनाथ । शाप दशरथा सुखरूप ॥ ६८ ॥
पुत्र झाले इत्थ्ंभूत । ऐसा मानिला निश्चितार्थ ।
हृदयीं संचरला रघुनाथ । उद्वेगरहित यालागीं ॥ ६९ ॥
शाप देवोनि दारुण । तिहीं दोघीं सांडिला प्राण ।
तिघांसी देवोनि दहन । उत्तरविधान करविले रायें ॥ ७० ॥

श्रावणाचा पूर्वजन्म वृत्तांत

जळचर पक्षियांचे युग्म । त्यांसी एका मीनासी मित्रत्व परम ।
तयां समकाळें मरणधर्म । झाला तो जन्म मागील ॥ ७१ ॥
आटतां देखोनि सरोवरा । शीतळ निशिये चंचुभारा ।
धरोनिया तया मकरा । अगाध नीरा स्नेहें नेत ॥ ७३ ॥
तंव मार्गीं वन तें नवखंड । तेथोनि उसळले बेलुकांड ।
तें मत्स्यांतें लागता चंड । पहिला दुखंड धरणिये ॥ ७३ ॥
तेणें दुःखे गृध्रीं दोघीं । देह ओपिले तयालागीं ।
तेचि ऋणानुबंधयोगी । धरिले तिघीं नरदेह ॥ ७४ ॥
मत्स्य तोचि श्रावण जनीं । पक्षिये ते जनक जननी ।
एके अवसरीं निमाले तिन्ही । ऐसी पुराणीं मूळकथा ॥ ७५ ॥

ब्रह्महत्येचे दुष्परिणाम

राजा रामनामें दोषातीत । तरी लोकप्रवृत्तिशास्त्रार्थ ।
अश्वमेध करी दशरथ । वसिष्ठयुक्तविधाने ॥ ७६ ॥
फेडावया ब्रह्महत्याडाग । केला अश्वमेधयाग ।
राजा शुद्ध झाला सांग । परी राष्ट्रीं भंग मांडिला ॥ ७७ ॥
जें राज्यीं ब्रह्महत्या घडे । ते राज्यीं पर्जन्य न पडे ।
शुक्रें धरियले पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ॥ ७८ ॥
तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले ।
वृक्ष शेंडियास वाळले । सरितांचे शोषिले जळस्रोत ॥ ७९ ॥
प्रजा घरोघरी आक्रंदती । गाई हंबरडा फोडिती ।
द्विजांची नित्यकर्में राहती । हाहाभूत क्षितीं प्राणिमात्र ॥ ८० ॥

दैत्यगुरूशी दशरथाचे युद्ध

देखोनि भूतांची दशा ऐसी । राजा कळवळला मानसीं ।
शुक्रें धरिलें पाणियाडासी । त्यासी युद्धासी निघाला ॥ ८१ ॥
दशरथाची शक्ति कैसी । रथ चालविला स्वर्गासी ।
कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे ॥ ८२ ॥
तुम्ही जाल स्वर्गाप्रती । मी पाहीन स्वर्गसंपती ।
वसिष्ठ म्हणें न्यावें निश्चिंती । भविश्यस्थिती जाणोनि ॥ ८३ ॥
रायासीं तिचे अति प्रीती । प्रीतीनें बैसविली रथीं ।
क्षणार्धें शक्रलोकप्रती । आला भूपति संग्रामा ॥ ८४ ॥
परम योद्धा श्रीरामजनक । देखोनि शुक्रें घेतला धाक ।
साह्य दैत्यसेना अनेक । दशरथें एकैक खिळिले बाणीं ॥ ८५ ॥
वृषपर्वा तेजोराशी । रायें विरथ केले त्यासी ।
मुकुट पाडोनि भूमीसीं । मोकळे केशीं पळविला ॥ ८६ ॥
वृषपर्वा जो दैत्यनाथ । युद्धीं झाला हताहत ।
देखोनि दैत्यसेना समस्त । पळे कुंथत रणघायीं ॥ ८७ ॥
शुक्रें युद्ध केलें अनेक । दशरथ योद्धा अति अचूक ।
सिंहनाद करोनि देख । शुक्रासंमुख लोटला ॥ ८८ ॥
शुक्रें केले अलोलिक । अचूक छेदिला रथाचा आंख ।
कैकेयीनें बाहु घातला देख । तेणें पराङ्‌मुख नव्हेचि राजा ॥ ८६ ॥
रामप्रताप दशरथ पोटीं । तेणें झांकली शुक्राची दृष्टी ।
धाकें पळे उठा‍उठीं । दिधली पाठीं संग्रामी ॥ ९० ॥

दशरथाचा विजय

ब्राह्मण म्हणोनि राखिला हात । येरवीं तत्काळ करिता घात ।
विजयी झाला जी दशरथ । हर्ष अद्‌भुत सुरनरां ॥ ९१ ॥
मोकळे झालें पाणियाडें । तत्काळ तेथें पर्जन्य पडे ।
फिटले गाईंचे साकडें । ब्राह्मणीं रोकडे मांडिले याग ॥ ९२ ॥
चालिले सावास्वधाकार । हरिखले देव पितर ।
दशरथावरी अपार । सुमनसंभार वर्षले ॥ ९३ ॥
अवघे करिती जयजयकार । इंद्रासी आल्हाद अपार ।
दैत्य पराहविले थोरथोर । तेणें अमरेंद्र संतोषला ॥ ९४ ॥
दिव्यांबरे अलंकार । रायासी दिधले अपार ।
इंद्रें सन्मान केला थोर । अवघे सुरवर संतुष्ट ॥ ९५ ॥
पराभविलें दैत्यगुरूसी । अति आनंद बृहस्पतीसीं ।
तेणें सन्मानिलें दशरथासी । धरिले पोटासीं स्वानंदे ॥ ९६ ॥

बृहस्पतींचा वर

देवगुरु वरद वदत । जे जे तुझे मनोरथ ।
सिद्धि पावतील समस्त । जाण निश्चित नृपनाथा ॥ ९७ ॥
तुज होईल पुत्रसंतती । ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती ।
याग करावा अयोध्येप्रती । विभांडकाहातीं पुत्रेष्टी ॥ ९८ ॥
विभांडक नित्य वनवासी । तो भेटी न देईल तुम्हांसी ।
मृगीसुत पुत्र त्यासी । ऋष्यशृंग तया नाम ॥ ९९ ॥
तो प्रमदामदें वेधवोन । नगरा आणावा छळून ।
येतांच त्याचें आपण । करावें लग्न निजकन्येसी ॥ १०० ॥
तुज नाहीं गा संतान । यालागीं तुझा निजमित्र शांतन ।
तेणें तुज दिधलें कन्यारत्नी । ते शांतनेसीं लग्न करावें ॥ १ ॥
इंद्र म्हणे दशरथासी । आणावया ऋष्यशृंगासी ।
अप्सरा धाडीन तुजपासीं । त्या तत्काळ त्यासी आणतील ॥ २ ॥

कैकयीला राजाचे वरदान

युद्धीं रथीं सूदलें बाहूसी । राजा तुष्टला कैकेयीसी ।
म्हणे देईन जें जें मागसी । ऐसी भाक तिसीं दिधली ॥ ३ ॥
तंव ते बोलली आपण । तुझेनि मज काय अपूर्ण ।
स्वर्गादि दिव्य भूषण । मी भोगी आपण तुझेनि ॥ ४ ॥
कल्पतरुपारिजातमाळा । तुझेनि शोभती माझिया गळा ।
स्वर्गसुखाचा सोहळा । भोगिजे स्वलीळा तुझेनि ॥ ५ ॥
येणेंचि शरीरें आपण । तुझेनि भोगी स्वर्गभुवन ।
तुझेनि आम्हा काय न्यून । मी सुखसंपन्न तुझेनि ॥ ६ ॥
हासोनी बोलली रायासी । तुम्हीं मज दिधले भाकेसी ।
ते मी मागेन काळविशेषी । यथाकाळेंसीं अनुकूल ॥ ७ ॥
राजा म्हणे सत्य वचन । हें माझें भाष्यवरदान ।
जेव्हा तूं मागसील आपण तत्काळ जाण मी देईन ॥ ८ ॥
ऐसी दशरथाची ख्याती । स्वर्गीं देव वानिताती ।
दिग्गज वर्णिती दिगंती । कीर्ति त्रिजगतीं विस्तारली ॥ ९ ॥
यश कीर्ति औदार्य । गुणगांभीर्य अति धैर्य ।
दशरथाचे वीर्य शौर्य । स्वर्गीं सुरवर वानिती ॥ ११० ॥
देवां दैत्यगुरु अदट । त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ ।
वीर दशरथ सुभट । प्रवाद पाठ तिहीं लोकीं ॥ ११ ॥
उदरा येईल रघुनाथ । सकळ संपदा आलिया तेथ ।
श्रिया विराजमान होत । श्रीमंत दशरथ यालागीं ॥ १२ ॥
स्वर्गीं दशरथ भूपाळ । इंद्रे राहविला बहुकाळ ।
अति प्रीतीचा कल्लोळ । दिव्य भोग सकळ भोगविले ॥ १३ ॥
अयोध्येत दशरथाचे अपूर्व स्वागत
येवढेनि बहुमानैश्वर्येंसीं । राजा आला अयोध्येसीं ।
मखरें तोरणें चौपासीं । नरनारींसी आल्हाद ॥ १४ ॥
घरोघरीं गुढिया उभारिती । पदोपदीं आरत्या करिती ।
बंदिजन कीर्ति गाती । ओंवाळिती धनधान्यें ॥ १५ ॥
ब्राह्मण जपती शांतिपाठ । भाट गर्जती उद्भ॥ट ।
नरनारी पाहती घनदाट । पायवाटे नेती घडिया ॥ १६ ॥
दशरथाचा प्रताप गहन । मी बोलिलो अल्प जाण ।
सकळ आकळिता निरूपण । कथा असाधारण वाढेल ॥ १७ ॥
अफाट न करावा ग्रंथ । ग्रंथीं बोलावा मुख्यार्थ ।
पदीं दावावा परमार्थ । हा निजस्वार्थ कवित्वाचा ॥ १८ ॥
एका जनार्दना शरण । दशरथप्रतापलक्षण ।
कथा झाली हे संपूर्ण । श्रीरामागमन अवधारा ॥ ११९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
दशरथविजयाभिगमनं नाम प्रथोमोऽध्याय ॥ १ ॥
॥ ओव्या ११९ ॥ श्लोक २ ॥ एवं १२१ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती 


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पहिला

View Comments