भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय चवथा
॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥
कौसल्येचे डोहाळे :
ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।
नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥
स्कंड पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।
राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥
तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।
जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥
तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।
पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥
श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।
समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥
कोण श्रीरामाची ख्याती । श्रीरामाची कोण गती ।
श्रीरामाची कोण उत्पत्ती । कोण त्रिजगीं श्रीराम ॥ ६ ॥
जेथें सदाशिव स्वयें वक्ता । मुख्य पार्वती स्वयें श्रोता ।
ते ही शिवरामायणीं कथा । संदेहार्था पहावी ॥ ७ ॥
श्रीरामांची श्रीएकनाथांना भावार्थरामायणाची प्रेरणा :
तूं कैसा झालासी वक्ता । पुसाल माझी योग्यता ।
तेही मी सांगेन तत्वता । सावध श्रोतां परिसावी ॥ ८ ॥
मी नेणें मूळींच्या संस्कृतासी । मूर्खपण माझा मिरासी ।
त्या मूर्खाच्या मुखासी । श्रीराम ऐसी कथा वदवी ॥ ९ ॥
माझे अंगी मूर्खपण । माझें मी जाणे संपूर्ण ।
न करीं म्हणतां रामायण । श्रीराम आपण प्रथा पेरी ॥ १० ॥
प्रेरिताही मी न करीं जाण । तंव स्वप्नामाजी रामायण ।
श्रीराम विस्तारी संपूर्ण । ऊण खूण ग्रंथांची ॥ ११ ॥
जागृतीमाजी वर्ततां । पुढे प्रकाशे रामकथा ।
दुश्चितपणें ठेवों जातां । राम तत्वता रामायण दावी ॥ १२ ॥
करूं जातां फुकट गोष्टी । त्यांमाजी रामकथा उठी ।
रामें पुरविली पाठी । खिळिली दृष्टी रामायणीं ॥ १३ ॥
ऐसियांत न करीं म्हणता । राम चढे मीपणाचे माथां ।
मग तो आपुलिया निज सत्ता । वदवी कथा बलात्कारें ॥ १४ ॥
मज निजलों असता जाण । राम थापटी आपण ।
म्हणे उठी करीं रामायण । तेथे मी कोण न करायवा ॥ १५ ॥
यालागीं कथादूषण भूषण । माझें अंगीं न लागे जाण ।
कर्ता श्रीराम आपण । माझे मीपण तो जाला ॥ १६ ॥
ग्रंथ निंदिती अथवा वंदिती । ते दोघें आम्हां ब्रह्ममूर्ती ।
हे श्रीजनार्दनाची युक्ती । उपदेश एकांतीं निजगुह्यार्थ ॥ १७ ॥
असो अबद्धही रामकथा । पवित्र करी गातां ऐकता ।
हें न माने ज्यासी विकल्पता । त्यासी तत्वता लोटांगण ॥ १८ ॥
यद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो
यस्मिन् प्रतिश्लोकबद्धवल्यापि ।
नामान्यनंतस्य यशोंकितानि
यच्छृण्वति गायंति गृणांति साधवः ॥ १ ॥
अबद्ध रामकथा श्रवणीं । वक्ता पावन तत्क्षणीं ।
श्रोत्यांच्या पापा होय धुणी । अबद्ध वाणी पढतांही ॥ १९ ॥
अबद्धही रामचरित्र । महापातकियां करी पवित्र ।
तो राम गातां माझें वक्त्र । केवीं अपवित्र ज्ञाते म्हणती ॥ २० ॥
कथा नंदिती वंदिती जनीं । ते माउली माझे दोनी ।
निंदक ते सखी जननी । मजलागूनी कृपाळु ॥ २१ ॥
जैस्से जननीचे करतळ । वरीवरी क्षाळिती बाह्य मळ ।
निंदक सबाह्य कलिमळ । करी निर्मळ निजवदनें ॥ २२ ॥
यालागीं निंदकचि तत्त्वता । साह्य सखा परमार्था ।
त्या निंदकातें निंदितां । दोषी सर्वथा स्वयें होय ॥ २३ ॥
निंदा म्हणिजे परमामृत । निंदा निर्द्वंद्व सुखस्वार्थ ।
निंदक न पाहे निजस्वार्थ । अति समर्थ परोपकारी ॥ २४ ॥
जेथें निंदा सुखरूप समाय । त्याचे मस्तकीं वंदूं पाय ।
धन्य धन्य त्याची माय । जो निंदा साहे निर्द्वंद्व ॥ २५ ॥
आतां किती सुचवूं परिहार । परिहार तोचि अहंकार ।
मी होऊं पाहें कवीश्वर । हा अपराध थोर मजमाजी ॥ २६ ॥
आतां रामकथा रामायणीं । तो मी अपराध न गणीं ।
झणीं निवाराल तुम्ही कोणी । घेऊं द्या धणी कथामृताची ॥ २७ ॥
रामत्कथा पुढे सुरू करण्याविषयी श्रीनाथांना श्रोत्यांची विनवणी :
तंव श्रोते म्हणती नवलाहो । ग्रंथी साधला शुद्धान्वयो ।
परिहार्मिषें पहाहो । केला निःसंदेहो ग्रंथार्थ ॥ २८ ॥
याचे मराठी बोल । परी अमृतातें करिती फोल ।
क्षीराब्धीहूनि अति सखोल । नित्य नवी बोली स्वानंदसुखाची ॥ २९ ॥
श्रवणीं ऐकतांचि कथा । सुख उपजतसे चित्ता ।
धन्य धन्य तूं रसाळ वक्ता । कथा परमार्थ निजपूज्य ॥ ३० ॥
तुझेनि मुखें रामायण । श्रीराम वदविताहे आपण ।
परिहारें जालें ब्रह्म पूर्ण । कथा निरूपण चालवीं ॥ ३१ ॥
हें ऐकोनि संतवचन । निवाला एका जनार्दन ।
मस्तकीं वंदोनियां चरण । ग्रंथनिरूपण अवधारा ॥ ३२ ॥
पुढील कथेचे अनुसंधान । केलिया पिंडप्राशन ।
तिघी जणी सुखसंपन्न । गर्भसमाधान तिघींसी ॥ ३३ ॥
कैकयीचे डोहाळे विचारणासाठी दशरथांचे आगमन :
वसिष्ठ म्हणे रायासी । धर्ममर्यादा आहे ऐसी ।
डोहाळे पुसावे स्त्रियांसी । मागती त्यांसी तें द्यावें ॥ ३४ ॥
शिरी वंदोनि ब्रह्मवाक्यासी । राजा निघाला वेगेंसी ।
आला कैकेयी भुवनासीं । अति उल्लासीं पुत्रार्थीं ॥ ३५ ॥
राजाचें विपरीत स्वागत :
कैकेयी गर्भविलासी । बैसली होती मंचकासीं ।
येतां देखोनि रायासी । निजसेजेसी पहुडली ॥ ३६ ॥
जेथें भ्रतारा स्त्रियेसी वर्चस्वपण । तेथें मर्यादा राखे कोण ।
बरवेपणाचा गर्व पूर्ण । त्याहीवरी जाण् गर्भिणी ते ॥ ३७ ॥
अमावस्ये अंधारी रात्री पाहीं । त्याहीवरी दाटे धुई ।
गडदपणें न दिसे कांही । ते दशा पाहीं कैकेयीसी ॥ ३८ ॥
राजा पुसे डोहळे तिसी । ते हांसोनि म्हणे रायासी ।
जरी पुरवालनिश्चयेंसी । तरी मी तुम्हांसी सांगेन ॥ ३९ ॥
राजा बोले अति प्रीती । तुझी नुल्लंगितां वचनोक्ती ।
तुज म्यां नेले स्वर्गाप्रती । इंद्रादिकां हातीं गौरविलें ॥ ४० ॥
ऐसें मागे तुझें वचन । नाहीं उल्लंघिलें आपण ।
आजुइचा प्राप्त काळ पूर्ण । डोहळे संपूर्ण करीन तुझे ॥ ४१ ॥
येरी म्हणे रायासी । डोहळे माझ्या निजमानसीं ।
राज्य द्यावें कनिष्ठासी । ज्येष्ठा वनवसीं धाडावें ॥ ४२ ॥
दवडावे दूरी दुरंतरता । जेथें नायके अयोध्येची वार्ता ।
आणि या ज्येष्ठाची कथा । न ये सर्वथा अयोध्येसी ॥ ४३ ॥
ऐसें विपरीत करितां । तुम्ही म्हणाल हे अधर्मता ।
तो अधर्म ठेवा माझिये माथां । जो वेदशास्त्रार्था अनि निंद्य ॥ ४४ ॥
अति निंदेची निंद्य टाळी । तो वाजो माझिये कपाळीं ।
मज निंदिजे लोकीं सकळीं । ही आवडी नव्हाळी डोहळियां ॥ ४५ ॥
ऐकोनि तिचे डोहळे । राजा सर्वांगें कंटाळे ।
अश्रुपूर्ण जाले डोळे । होय तत्काळ कंपायमान ॥ ४६ ॥
मन बुद्धि चित्त चांचरे । निश्चयासी आले शहारे ।
बैसलीं इंद्रियांचीं द्वारें । प्रळयमहापूरें धैर्य गेलें ॥ ४७ ॥
इचे डोहळे पुरवितां । होईल स्वार्थ परमार्था ।
शेखीं नुरे उरी जीविता । सर्वीं सर्वथा अति घात ॥ ४८ ॥
ऐसी रायासी जाली व्यथा । मग तिसी न बोलेचि मागुता ।
अत्यंत वचकोनि चित्ता । हाये निघता कंटाळोनी ॥ ४९ ॥
राजाचे सुमित्रेकडून आनंदपूर्ण स्वागत :
सवेंचि निघे सुमित्रेमंदिरी । तंव ते आली सामोरी ।
मस्तक ठेविला चरणांवरी । आरती करी निंबलोण ॥ ५० ॥
आले देखोनि प्राणनाथ । जीवीं उल्हास अति अद्भुत ।
आनंदें पूर्ण भरित । प्रेमाचा अत्यंत पूर आला ॥ ५१ ॥
घालोनियां वरासन । भक्तिभावें चरणक्षाळण ।
करी चरणतीर्थप्राशन । सुमनादि चंदन यथोक्त पूजा ॥ ५२ ॥
सुगंध सुवास सुमनमाळा । घाली निजनाथाचिया गळां ।
जोडल्या करीं त्या काळा । उभी वेल्हाळा निकट ना दूरी ॥ ५३ ॥
गर्भें टवटवीत मुखकमळ । शोभे सर्वांग सोज्ज्वळ ।
गर्भतेजें निजनिर्मळ । मिरवे वेल्हाळ भक्तिभावें ॥ ५४ ॥
जोचि भावो निजनाथेंसी । तोचि भावोसमस्तेंसी ।
तेणेंचि भावे नृपनाथासी । पूजी उल्लासीं समसाम्ये ॥ ५५ ॥
भक्तिभावो तिचा वांटा । त्याच्या उदरीं केला सांठा ।
तैशाच रीतिच्या बाह्य चेष्टा । देखे द्रष्टा होवोनि रावो ॥ ५६ ॥
देखोनि सुमेत्रेचा भावों । अत्यंत सुखावला रावो ।
तिचे गर्भाचा निर्वाहो । देवाधिदेवो प्रतिपाळो ॥ ५७ ॥
कैकेयी डोहळियांचे दुःख । राजा विसरला निःशेष ।
तिचें चुंबोनियां मुख । पुसे कौतुक डोहळियांचे ॥ ५८ ॥
कोण आवडी तुझ्या पोटीं । ते सांगावी जीवींची गोष्टी ।
येरी सलज्ज अधोदृष्टी । न करी चावटी बहुबोल ॥ ५९ ॥
ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा । ते मज द्यावी नरदेवा ।
हेची आवडी माझिया जीवा । सत्यस्वभावा प्रीत्यर्थ ॥ ६० ॥
ज्येष्ठ सेवेच निजसुख । मज आहे आत्यंतिक ।
तुम्हीं द्यावें हेंचि एक । नावडे आणिक विषय मज ॥ ६१ ॥
नावडे वस्त्र दिव्यान्न । न आवडे राज्य त्रिभुवन ।
नावडे स्वर्ग ब्रह्मसदन । ज्येष्ठसेवेवाचूनी ॥ ६२ ॥
ऐसे स्वामी प्राणपती । तुझे पाय सेव्य असती ।
ज्येष्ठसेवेची अति प्रीती । डोहळे निश्चिती हे माझे ॥ ६३ ॥
ऐकोनि ऐसें वचन । रायाचें विस्मित मन ।
इचे डोहळे विलक्षण । दिसे सुलक्षण सर्वार्थीं ॥ ६४ ॥
एक पायसाचें ताट । वसिष्ठें भाग केलेचोखट ।
तिचे डोहाळे कां बिकट । इचे अति श्रेष्ठ परमार्थीं ॥ ६५ ॥
तिचे भाग नव्हती स्वतंत्र । पोटींचा गर्भ तो सावत्र ।
यालागीं ते अपवित्र । डोहाळे होती कैकेयीसी ॥ ६६ ॥
सावत्र छळिती मातेसीं । शनि लाता हाणीं छायेसीं ।
ठावके पडलें सूर्यासी । तूं माता नव्हेसी सर्वथा ॥ ६७ ॥
तैसे सावत्र गर्भ नियेसी । यालागीं अधम डोहळे इयेसी ।
निंद्य व्हावें मी जगासी । वदे गर्भवासी सावत्र ॥ ६८ ॥
सुमित्राभाग स्वतंत्र । यालागीं डोहळे अति पवित्र ।
रायाचें निवालें जिव्हार । हर्षें निर्भर तो जाला ॥ ६९ ॥
मग उठोनि उल्लासेंसीं । सुमित्रा आलिंगी हृदयेण्सी ।
जे जे डोहळे निजमानसीं । ते ते पावसीं मद्अनुग्रहें ॥ ७० ॥
नाना अलंकारभूषण । राजा त्यागी ओवाळून ।
तिसी करवी निंबलोण । द्विजां दे दान नाना वस्त्रें ॥ ७१ ॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय चवथा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय चवथा
बालकांडाच्या चवथ्या आध्यायचा ७१व्याओवीच्या पुढचा भाग उपलब्ध नाही.
पूर्ण अध्याय आला नाहीं.
पूर्ण अध्याय आला नाहीं.