भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय आठवा

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय आठवा

विश्वामित्रांचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीराम सच्चिदानंदघन । तोही वैराग्यलक्षण ।
लोकलक्षणार्थ दावी आपण । दीन जन तारावया ॥१॥
सकळ वैराग्याचे फळ । स्वयें श्रीराम केवळ ।
तोही वैराग्याचें शीळ । दावी प्रबळ लोकोपकारा ॥२॥

श्रीरामांची अनासक्ती :

तीर्थाहूनि आलिया रघुनाथ । नावडे राज्य राज्यार्थ ।
नावडे लोक लोकार्थ । विषयस्वार्थ नावडे ॥३॥
नावडे इंद्रियांचा संग । नावडे इंद्रियांचा भोग ।
नावडे देहादि देहधर्म ।
नावडे विलाससंभ्रम । वैराग्य परम अनुतापी ॥५॥
नावडे स्त्रियांची भेटी । नावडे स्त्रियांसीं गोष्टी ।
नावडे स्त्रियां पाहों दृष्टी । वैराग्य पोटीं विषयांचें ॥६॥
नावडे शाब्दिक चावट । नावडे चातुर्य वटवट ।
नावडे अतिवाद खटपट । मौननिष्ठ अनुतापी ॥७॥
नावडे कळा कौतुक चांग । नावडे गीत नृत्य शुभांग ।
नावडे पारधी राजरंग । वैराग्य सांग अनुतापी ॥८॥
नावडे संग्रहो धनधान्य । नावडे संपदा पदाभिमान ।
नावडे मान सन्मान । वैराग्य पूर्ण अनुतापी ॥९॥
नावडे तया कल्पतरू । तो तंव कल्पनेचा सागरू ।
कल्पना सबळ संसारू । अति दुस्तरू जन्ममरण ॥१०॥
केवळ चिंतायुक्त चिंतामणी । चिंता चिता समान दोनी ।
चिता निर्जीवा दाहिनी । चिंता अनुदिनीं जित्यातें जाळी ॥११॥
नावडे परिस धातु अर्थ । अर्थ तितुका होय अनर्थ ।
ज्याचे पोटीं अर्थस्वार्थ । त्यासी परमार्थ कदा न भेटे ॥१२॥
कामधेनु नावडे मनींहून । तें कामनेचें अधिष्ठान ।
कामकामें भवबंधन । वैराग्य पूर्ण नावडे तेंही ॥१३॥
ऐसे दिव्य भोग समस्त । त्यांसी श्रीराम अनासक्त ।
सदा वसवी एकांत । अनंत अव्यक्त रहिवासी ॥१४॥

विश्वामित्रांचे आगमन :

दशरथाचे सुपुत्र । ऐकोनियां विश्वामित्र ।
ऋषीश्वरांमाजि पवित्र । आला सत्वर यज्ञसिध्यर्था ॥१५॥
आला ऐकोनि विश्वामित्र । सामोरा धांवे नृपवर ।
लोटांगणीं नमस्कार । हर्षे निर्भर गृहा आणी ॥१६॥
घालोनियां वरासन । मधुपर्क विधिविधान ।
सुवर्णसुमनें केले पूजन । सुखसंपन्न ऋषि जाला ॥१७॥
वसिष्ठविश्वामित्रां भेटी । आलिंगनीं पडली मिठी ।
दोघांची एकात्वें एक दृष्टी । दोघांचे पोटीं सुख एक ॥१८॥
दोघांचे एक कर्माचरण । दोघांचे एक अनुष्ठान ।
दोघांचे एक ब्रह्मज्ञान । एकत्वें पूर्ण दोघे जण ॥१९॥
दशरथाचे सभास्थानीं । दोघे बैसले एकासनीं ।
तेणें शोभली ते अवनी । जेवीं गगनी शशिसूर्य ॥२०॥
दशरथ म्हणे विश्वामित्रा । तूं होसी प्रतिसृष्टिचा धात्रा ।
उद्धरावया कुळगोत्रा । परम पवित्रा आलासी ॥२१॥
धन्य भाग्याचे आजी आम्ही । धन्य अयोध्येची भूमी ।
जे कृपेनें आलेती तुम्ही । जे व्रत जपें न भेटां ॥२२॥
जेथे संतोषोनि साधु आले । तेथें कल्याण मुसावलें ।
तीर्थांचे फळ तेंही पावले । भवाब्धीचें भलें पार उतारूं ॥२३॥
जेथें तुमची कृपादृष्टि पाहे । तेथे भगवंत अवश्य आहे ।
जगद्वंद्य तुझे पाय । बहु मी काय अनुवादूं ॥२४॥

दशरथाचे विश्वामित्रांन अभिवचन :

संतोषोनि बोले दशरथ । विश्वामित्रा तुझें मनोगत ।
सिद्धी पाववीन समस्त । हें निश्चितार्थ मद्‌वाक्य ॥२५॥
जे जे तुझे मनोरथ । ते ते जाण म्यां केले कृतार्थ ।
तेणें वाक्यें संतोषयुक्त । स्वयें बोलत विश्वामित्र ॥२६॥

दशरथाची स्तुती :

दशरथा तुझें औदार्य । धैर्य वीर्य गुण गांभीर्य ।
तुझ्या पुरुषार्थाचें शौर्य । सुरवर स्वर्गी वानिताती ॥२७॥
रणीं जिंकोनि शुक्रासी । सुखी केले देवगुरुसी ।
यश दिधलें इंद्रासी । तूं सूर्यवंशासी मंडण ॥२८॥
ऐकोनि ऋषीची वचनोक्ती । राजा सुखावला चित्तीं ।
त्या सुखाची सुखस्फूर्ती । काय ऋषीप्रती बोलत ॥२९॥
होवोनि अति विनित । जोडोनियां दोनी हस्त ।
ऋषीचा कृतकार्यार्थ । असे पुसत स्वानंदे ॥३०॥
गायत्रीमंत्र कृतकार्या । विश्वामित्रा ऋषीवर्या ।
तूं आलासी कोणा कार्या । महाधैर्या मज सांग ॥३१॥

विश्वामित्रांची पुत्रयाचना :

म्हणे सूर्यवंशी महावर्या । ऐकें नृपा परोपकारिया ।
सुरसिद्धकृतकार्या । मागणें राया अवधारीं ॥३२॥
माझें मागणें नव्हे वित्त । माझें मागणें नव्हे प्राकृत ।
माझें मागणे रघुनाथ । यज्ञसिद्धर्थ कृतकार्या ॥३३॥
ऐकोनि ऋषींचें वचन । गजबजिले रायाचें मन ।
वीर्य गेलें हरपोन । कंपायमान सर्वांगीं ॥३४॥
सर्पकाळीं कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे ।
मासा जळावेगळा फुटे । तैसे दुःख वाटे रायासी ॥३५॥
चणे वानरा गालींचे । कां धन जैसें कृपणाचें ।
भाणें नेले भगणाचें । तैसे मन रायाचें श्रीरामीं ॥३६॥
प्राण जातां देह विकळ । मन मूर्च्छित इंद्रियें बरळ ।
राम जातांचि तत्काळ । रायासी केवळ दैन्य तैसें ॥३७॥
वाचेसी पडले दृढ मौन । ऋषीसी नेदी प्रतिवचन ।
समयाचें चातुर्यज्ञान । विचारून बोलत ॥३८॥

दशरथाचे उत्तर :

म्हणे यज्ञा विघ्न करिती राक्षस । मनुष्यमारक कर्कश ।
राम केवळ बाळवेष राजस । धनुर्विद्याभ्यास नाहीं केला ॥३९॥
नाहीं रणांगण देखिलें । नाहीं पूर्वी युद्ध जाले ।
त्यासी राक्षसासी पहिले । युद्ध करविलें केवीं जाय ॥४०॥
मी केवळ पुत्रकृपण । श्रीराम माझें निजनिधान ।
श्रीराम माझें जीवन धन । तो न देववे दान राक्षसभक्षा ॥४१॥
मी श्रीरामाचा प्रथम संबंध । तोही राक्षसासी द्वंद्वयुद्ध ।
तुम्ही विचारविशद । ज्ञानप्रबुद्ध तुम्ही आहा ॥४२॥
श्रीराम केवळ बाळ । नाहीं शस्त्रविद्याप्रबळ ।
नाहीं मंत्रास्रशुद्धशीळ । त्यासी युद्ध प्रबळ राक्षसांसी केवीं ॥४३॥
जें जे मागाल तुम्ही समर्थ । देई राज्य राजपदार्थ ।
शेखी देईन जीवित्व । परि रघुनाथ न देववे ॥४४॥

विश्वामित्रांचा संताप :

ऐकोनि रायांचे वचन । विश्वामित्र जाला कोपायमान ।
अत्यंत क्षोभोनियां जाण । काय वचन आपण बोलत ॥४५॥
अरे मी भेटलों दशरथ । द्विजा तुझे मनोरथ ।
आजीच जालें कृतकार्यार्थ । ऐसें सभेआंत जल्पसी ॥४६॥
तेंचि मागतां दान । न देववे म्हणसी आपण ।
हेंचि मुख्यत्वें कुळदूषण । दिधलें दान न देववे म्हणसी ॥४७॥

प्रतिज्ञापूर्तीसाठी प्राणार्पण केलेल्या सूर्यकुलोत्पन्न राजांची दशरथाला आठवण देतात :

सूर्यवंशी राजे जाण । जे जे जाले धर्मभूषण ।
त्यांमजी तूं धर्मदूषण । दिधले दान न देववे म्हणसी ॥४८॥
हरिश्चंद्रे स्वप्नदान । जागृती सत्य केले संपूर्ण ।
आपणा विकिलें आपण । दक्षिणावचनसत्यत्वें ॥४९॥
त्या वंशी तूं जन्मलासी । दिधले दान तें न देसी ।
हें सामर्थ्य तुजचिपासीं । सूर्यवंशासी निंदका ॥५०॥
येच वंशी शिबी जाण । पक्षियाचेनि समसमान ।
मांस तुकिलें आपण । परी मिथ्या वचन न करीच ॥५१॥
येचि वंशी मुचकुंद जाण । इंद्रा साह्य केलें आपण ।
तेणें युद्ध केलें दारुण । रणकंदन तारकेंसीं ॥५२॥
ते वंशी तूं जन्मोनि जाण । दान न देववे म्हणसी आपण ।
ते वंशीच्या यशासी पूर्ण । तुवा दूषण लाविलें ॥५३॥
रुक्मांगद येच वंशीं । मोहिनींने छळितां त्यासी ।
पुत्रांचे शीर देवोनि तिसी । व्रत एकादशी उद्धारु ॥५४॥
तूंही तेचि वंशी जन्मलासी । पुत्र न देववे स्वयें म्हणसी ।
लाज लाविली पूर्वजांसी । उणे सूर्यवंशासी तुझेनि ॥५५॥
ककुत्स्थ बैसला इंद्राचे स्कंधी । दैत्य पराभविले युद्धीं ।
तें वंशींचा तूं त्रिशुद्धी । म्हणसी पुत्र नेदीं युद्धार्थ ॥५६॥

श्रीरामांना बालक म्हटल्याबद्दल राजाला दोष :

तूं रामासी म्हणसी बाळ । हे मूर्ख बुद्धि अति स्थूळ ।
श्रीराम अवतार निर्मळ । जाण केवळ सुरसाह्या ॥५७॥
श्रीराम नव्हे बाळक । राक्षसकुळासी अंतक ।
स्वधर्माचा संस्थापक । साधूंचा आवश्यक साहाकारी ॥५८॥
धनुर्विद्या नेणे रघुनंदन । हें वचनचि अति अप्रमाण ।
राम सकळ विद्यां जन्मस्थान । शस्त्रास्त्रजीवन निजबीज राम ॥५९॥
श्रीराम रणरंगधीर । गुणागुणगुणगंभीर ।
वीराधिराज महावीर । परम शूर श्रीराम ॥६०॥
श्रीराम मनुष्य नव्हे पाहीं । राम देहींच विदेही ।
श्रीराम चैतन्यविग्रही । राम स्वदेहीं परब्रह्म ॥६१॥
राया तूं नेणसी निश्चित । श्रीरामा मानिसी प्राकृत ।
वसिष्ठासी पुसें हा वृत्तांत । तो यथार्थ सांगेल ॥६२॥
आतां स्वस्ति असो तुम्हांसी । सकळ कल्याण श्रीरामासी ।
मी जाईन स्वाश्रमासी । म्हणोनी ऋषि निघाला ॥६३॥

कुलगुरुंचा उपदेश व विश्वामित्रांना पुत्रसमर्पण :

तंव वसिष्ठ म्हणे नृपवरा । क्षोभवूं नको विश्वामित्रा ।
हा प्रतिसृष्टीचा धात्रा । भस्म कुळगोत्रा क्षणार्धें करील ॥६४॥
धन्य वसिष्ठाचा भाव । सूक्ष्म सुचविला निर्वाह ।
जेणें सुखावे ऋषि आणि राव । तैसा उपाय चिंतिला ॥६५॥
वसिष्ठ गुह्य सांगें रायासी । शांत करी विश्वामित्रासी ।
दोघे पुत्र द्यावे त्यासी । दोघे पुत्र तुम्हांपासी क्रीडनार्थ ॥६६॥
गुरुआज्ञा वंदूनि शिरसीं । लोटांगण विश्वामित्रासी ।
रामलक्ष्मण दिधले तुम्हांसी । दोघे मजपासीं राहूं द्या ॥६७॥
विश्वामित्र म्हणे भले जालें । एके रामें काय नव्हें केलें ।
सवें लक्ष्मणासी दिधले । भाग्य फळले पैं माझे ॥६८॥

विश्वामित्रांचा संतोष व सर्वत्रांना आनंद :

विश्वामित्र म्हणे वसिष्ठासी । तू सत्य सद्‌गुरु सूर्यवंशीं ।
रक्षिलें दोहींच्या धर्मासी । ज्ञाता होसी सज्ञानत्वें ॥६९॥
वसिष्ठ विश्वामित्र आणि रावो । स्वस्थांनीं बैसले पाहो हो ।
गाधिसुत झाला निःसंदेहो । परम उत्साह स्वानंदें ॥७०॥
राजा म्हणे जिवलगासी । राम पाचारा ऋषिभेटीसी ।
येरु पातला राजाज्ञेंसीं । अति वेगेंसी विनीत ॥७१॥
लोटांगण वसिष्ठासी । साष्टांग नमन रायासी ।
चरणीं माथा विश्वामित्रासी । येरे हृदयासी आलिंगले ॥७२॥
ॠषी रामा जाली भेटी । आनंद विश्वामित्राच्या पोटीं ।
जयजयकारे गर्जता उठी । श्रीराम दृष्टी देखोनि ॥७३॥
एका जनार्दना शरण । जालें गुरुशिष्यदर्शन ।
येथोनि श्रीराम आपण । वैराग्य पूर्ण निरुपी ॥७४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
विश्वामित्राहमनं नाम अष्टमो॓ऽध्यायः ॥८॥
॥ ओंव्या ७४ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती 


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय आठवा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय आठवा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय आठवा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *