स्वात्मसुख  

आनंदलहरी

आनंदलहरी – संत एकनाथ 

आनंदलहरी – मंगलाचरण

श्रीगणेशाय नमः
। ॐ नमो सच्चिदानंदघना । ॐ नमो सकळ सुखांचिया निधाना । ॐ नमो परात्पर निर्गुणा । जगज्जीवना मूळबीजा ॥१॥
ॐ नमो सकळ व्यापका । आनंदा आनंद तुझेनि देखा । सकळातें तूंचि प्रतिपाळिता । तो तूं लोकां प्रतक्ष ॥२॥
ॐ नमो अव्यक्त परब्रह्मा । सर्व सुखांचिया धामा । ॐ नमो भक्तांच्या कल्पद्रुमा । तुज उपमा आनु नाहीं ॥३॥
ॐ नमो आदिपुरुषा आदिदेवता । ॐ नमो उत्पत्ति प्रळय रहिता । पाहतां तूं सकळांचा नियंता । सकळभूतां सत्ता तुझी ॥४॥
ॐ नमो ज्ञानसागरा । ॐ नमो त्रैमूर्ती अवतारा । ॐ नमो मोक्षाचिया निजधरा । विश्वंभरा तुज नमो ॥५॥
तुझें निजरुप पाहतां दृष्टीं । निजानंद न समाये दृष्टी । तुटल्या जन्ममरणाच्याः गांठी । निर्भय पोटीं मी जालों ॥६॥
बंधमुक्तीची अटाअटी । संचरली होती माझ्या पोटीं । होतां तुझी कृपादृष्टी । उठाउठी पळाली ॥७॥
तुझें निजरुप पाहतां कांहीं । बद्धमुक्त दोन्ही नाहीं । व्यापक तूं सर्वां देहीं । आनंदडोहीं जेवी तरंग ॥८॥
बंधमुक्तीची कहाणी । ऐकिली होती जेवीं स्वप्नी । जागृतीमाजी येउनी । साच मानी कोण तीतें ॥९॥


आनंदलहरी – सद्‍गुरुकृपा

स्वर्गनर्क दोन्ही बंध । हा अज्ञानाचा अनुवाद । सदगुरु कृपा जालिया बोध । जालें सर्व चैतन्य ॥१०॥
सगुण आणि निर्गुण । हें शब्दाचेंचि लाघव जाण । जेथ शब्दा पडिलें मौन । गुणागुण उरले कोठें ॥११॥
तुझी इच्छा जे मायाशक्ति । जाली अनंत ब्रह्मांडें रचिती । करी पंचभूतांची व्यक्ति । संतति जैसी वांझेची ॥१२॥
जैसा कल्पनेचा विस्तारु । हदयीं करितु अपारु । पाहतां न दिसे साचारु । तैसा विचारु मायेचा ॥१३॥
आहर्निशीं तुझ्या स्वरुपीं असती । तयांसी कळली मायेची स्थिती । सकळ मिथ्यात्वें देखती । अज्ञान भ्रांती तयां नाहीं ॥१४॥
बंधमुक्तीचा वळसा । तेचि अज्ञानाची दशा । निद्रिस्त वोसणाये जैसा । भ्रांतीचा फांसा पडिलासे ॥१५॥
ज्यातें तुझी कृपा झाली । त्याची भ्रांति निरसली । कल्पना विरोनि गेली । वृत्ती बुडाली तुझ्या रुपीं ॥१६॥
परिस लागलियां लोहातें । दूरी केलें काळीमेतें । श्रेष्ठत्व आणिलें नीचातें । परी अळंकाराते न मुके ॥१७॥
पूर्वकर्म जें घडलें । तेणें तें नांव पावलें । लोहोपणासी मुकलें । न मोडतां झालें सुवर्ण ॥१८॥
तैसें त्वां कृपावंतें । निरसिलें भ्रांति काळिमेतें । निरसूनि ज्ञानाअज्ञानातें । निजसुखातें मेळविलें ॥१९॥
वरी देहाचिये माथां । आहे कर्मरेखेची सत्ता । तें न चुकेगा गुरुनाथा । सुखदुःख भोगवी ॥२०॥
पूर्वी कर्म जें घडलें । तें अळंकारातें आटिलें । तें नांवपणासी मुकलें । केवळ जालें सुवर्ण ॥२१॥
जैसा वृक्ष छेदिलिया समूळ । आर्द्रता न तुटे तात्काळ । आंगीं असोनि अल्पकाळ । मग केवळ काष्ठ होय ॥२२॥
घालुनी आशेचा पाश । हिंडवी नाना देश । हिंपुटी करुनी देहास । संचित तैसें भोगवी ॥२३॥
पत्रें आणि पुष्पें फळ । सहित वाळला समूळ । अग्निसंगें केवळ । भस्म होय ॥२४॥
तैसी सदगुरुकृपा होय । तोडी विवेकाचेनि घायें । देहे वृक्ष पाडिला पाहे । अर्द्रता राहे संचिताची ॥२५॥
जैसा अनुभवें तो वाळतु । संचित क्रियमाणासहितु । वृक्षाची खुंटली मातु । पावलियां देहांतु शून्य होये ॥२६॥
भस्म जालिया नंतरें । वृक्षाचाही ठाव नुरे । तैसा देह अनुभवें विंरे । पुढें वोसरे जन्ममरण ॥२७॥
तैसें देह पावलिया लय । पूर्वकर्म सहजेंचि जाय । संचितासि नुरे ठाय । सहजें होय सुखरुप ॥२८॥
पूर्वकर्माचिये ऐशी परी । गुरुभक्त नेघे आपणावरी । राहोनि आनंदाभीतरीं । साक्षित्वें व्यवहारी वर्तत ॥२९॥
जैसें जळामाजीं पद्मपत्र । जळीं असोनि अलिप्त । तैसा मुक्त व्यवहारी वर्तत । सुखें भोगित स्वानंदें ॥३०॥
भवभ्रमातें निरसिलें । जन्ममरणातें चुकविलें । देहीं असतां मुक्त केलें । स्वरुपीं मेळविलें आपुलिया ॥३१॥
तुझिया स्वरुपाचा अनुभव । जाणती संत सज्जन प्रभव । निरसूनि देहाचा देहभाव । स्वानुभव भोगिती ॥३२॥
जो अमृताचे सागरीं । अहिर्निशीं क्रीडा करी । जन्ममरणाचें भय घरी । हें कैशापरी घडेल ॥३३॥
जेथ जन्ममरण जालें वावो । तेथें बद्धमुक्ता कैचा ठावो । जीव गिळूनि आपुला उगवो । विसरला पाहाहो दुजेपण ॥३४॥
ऐसी तुझे कृपेची करणी । भवभ्रम निरसिला ततक्षणीं । निद्रींस्त वोसणावे स्वप्नी । तया उठवूनी सावध केलें ॥३५॥
पुरुषोत्तम नाम पंचाक्षर । जो भावें भजे निरंतर । तेथें कैचें भवभय संचार । न चले व्यापार पंचभूतांचा ॥३६।।


आनंदलहरी – सद्‍गुरुचरण

सदगुरुचरणीं जयाचा भावो । तया बंधमुक्तता जाल्या वावो । त्यातें काळ विसरला पाहाहो । तया ठावो ब्रह्मपदीं ॥३७॥
भावार्थी जे निज गडे । तयां बद्धमुक्तता केवीं घडे । यमपुरी वोस पडे । ह्नणोनी रडे प्रेतनाथ ॥३८॥
जैं पतंग भक्षी वाडवानळासी । दर्दुरीं गिळिजे शेषासी । जैं खद्योतें गिळिजे रविबिंबासी । तैं गुरुभक्तांसी बद्धता ॥३९॥
जैं वायसें युद्ध कीजे खगपतींसी । पिपिलिका सप्तसागर शोषी । कीं मुर्कुटें गिळिजे ब्रह्मांडासी । तैं गुरुभक्तांसी बद्धता ॥४०॥
जैं चित्रीचिया हुताशनें । दग्ध होती महावनें । कीं रज्जूसर्पाचिया पानें । मृत्य पावे कृतांतू ॥४१॥
किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शके । किंवा प्रेताचेनि धाकें । झडपों शके महाकाळ ॥४२॥
किंवा वांझेचेनि सुतें । रणी जिंकीजे इंद्रातें । किंवा कांसवीचेनि घृतें । कुंभकर्णासीं तरळ होय ॥४३॥
हेंहि ईश्वर इच्छा घडे । परी गुरुभक्तांसी बद्धता न घडे जन्ममरणाचें फिटलें कोडें । तुटलें बिरडें मायेचें ॥४४॥


आनंदलहरी – मायेची करणी

जे माया त्रिभुवनें व्यापिलीं । निमिष्यमात्रें ब्रह्मांडे रचिली । सगुणत्वें विस्तारिली । सृष्टी केली स्वइच्छा ॥४५॥
तयेचा नेणती पारुं । ब्रह्मादी हरिहरु । उत्पत्ति स्थिति संहारु । हा व्यापारु मायेचा ॥४६॥
त्रिमूर्तींची जे सत्ता । जे मूळमायेची प्रतापता । शक्तीवीण कार्य कर्ता । हें सर्वथा न घडेचि ॥४७॥
अगाध मायेचें करणें । रचूनि नाना विंदानें । करुनि अवघेंचि विसर्जनें । अदृश्यपणें वर्तत ॥४८॥
जें स्वरुपीं इच्छा जाली । तैं हे माया नांव पावली । सकळ भूतांतें प्रसवली । सृष्टी निर्मिली पळमात्रें ॥४९॥
शिवा आणुनी जीवपण । तयासी लाविलें जन्ममरण । सुखदुःखादि भोग दारुण । करुनि आपण निराळी ॥५०॥

सदगुरुभक्तापुढें माया म्हणजे मृगजळ

ऐसी ये माया सबळ । एवढें रचिलें जगडवाळ । तें गुरुभक्तापुढें केवळ । मिथ्या मृगजळ होऊनि ठेली ॥५१॥
शिव विरंची नारायण । आणि साधूसंत योगीजन । हे स्वरुपी जाले निमग्न । यातें माया वदन दाऊं नशके ॥५२॥
जेथ अज्ञानाचा सुकाळ । तेथें मायेचा गोंधळ । जो ज्ञाता अनुभवी केवळ । तेथ विटाळ मायेचा ॥५३॥
जरी ह्नणाल मायेचा विटाळ । तरी कां देह धरिला स्थूळ । ऐसें ह्नणती ते केवळ । आज्ञानी समूळ जाणावे ॥५४॥

मायेचा सूत्रचालक नारायण

मायेसी नाहीं स्वतां चळण । इसी चाळिता आदिनारायण । मायापटळ आड लावून । भूतातें आपण चेष्टवी ॥५५॥
जैसा छायामंडपाभीतरी । एकला बैसोनि सूत्रधारी । वस्त्र लावूनि माझारी । प्रभा अंतरीं दीपाची ॥५६॥
नाना अचेतन पुतळियां । स्वइच्छा नाचवी तयां । हावभाव दाऊनियां । जन भुलवावया खेळतु ॥५७॥
एक एकातें मारवित । आपणचि शंखध्वनी करित । काय जालें ह्नणोनि पुसत । आणि हांसत आपणचि ॥५८॥
भंडभंडातें दावी । नाना पातकें करवी । गाईपाठी व्याघ्र लावी । आणि मारवी तयेतें ॥५९॥
अनंत पुतळीयांतें दावित । संहार स्वइच्छा करीत । अज्ञानातें साच दिसत । नसे मेले जीत ते ठाई ॥६०॥
दाखवी नाना सुखदुःखातें । हें होय कवण कवणातें । एकाविण दुजें नाहीं तेथें । पापपुण्या ठाव कैचा ॥६१॥
तैसा भगवंत लीलावतारी । चिदाकाशींच्या मंडपाभीतरीं । माया पट लाऊनी माझारीं । प्रभा अंतरीं स्वरुपाची ॥६२॥
नानायती नानावर्णं । नानाकर्में पापपुण्य । सुखदुःखादि भोग दारुण । करुनि आपण निराळा ॥६३॥
तो जैंसे जैसे चेष्टवित । तैसीं तैसीं भुतें नाचत । सर्वही करविता भगवंत । पापपुण्य हें कवणासी ॥६४॥
पापपुण्य बोलणें । जैसें शेतामाजीं बुजवणें । तेथें नसे साचपणें । वृथा भिणें वनचरीं ॥६५॥
तैसे ते अज्ञानी जन । तयांसी दिसे पाप पुण्य । जे जीवन्मुक्त सज्ञान । तयांसी त्रिभुवन मुक्त दिसे ॥६६॥
जो केवळ जाणता । तो मायेचा नेणता । साधु भगवंताच्या ये समता । ह्नणोनि बद्धता न घडे त्यासी ॥६७॥
त्यासी माया मिथ्या कळली पाही । तो देहीं असोनी विदेही । जन्ममरणाचें भय नाहीं । सच्चिदानंदडोहीं क्रीडतु ॥६८॥
जयासी नाहीं आत्मज्ञान । तयासी देहाचें बंधन । नाना दुःखें भोग दारुण । जन्ममरण भोगवी ॥६९॥
जे सदगुरुचे अंकित । तयांसी देह दुर्लभ बहुत । स्वरुपीं होऊनियां रत । सुखें भोगित स्वानंद ॥७०॥
जैसे द्रव्याचेनि गुणें । एकीं विष घेऊनी भक्षणें । एकीं उपभोग भोगणें । एक दानधर्म करिती ॥७१॥
तेथ द्रव्यासी नाहीं दूषणें । आपुलें संचित भोगणें । तैसें देहाचेनि गुणें । बद्धमुक्तपण भोगिजे ॥७२॥
जे नाना पातकें करित । त्यांसी देह काय करा ह्नणत ? कां जो श्रीहरीसी शरणागत । तयासी सांगत देह काई ॥७३॥
देह पाहतां अचेतन । देहासी कैचें दूषण । जो देहासी चेष्टवी जाण । सुखदुःख भोग त्यालागीं ॥७४॥
जैसी काष्ठाची पुतळी केली । सर्व इंद्रियें निर्मिली । परी चाळितेविण जाली । प्रेतरुप ॥७५॥
चाळिता वैसे अंतरीं । वोढी इंद्रियाची दोरी । मग प्रवर्ते व्यापारीं । सूत्रानुक्रमें ॥७६॥
तेथ सुखदुःख अवस्था । कैसी घडे पुतळ्यांच्या माथां । जो अंतरीं चेष्टविता । तोचि कर्ता सर्वही ॥७७॥
तैसे देह अचेतन । त्यातें चालवितें मन । सर्वइंद्रियें त्याचे आधीन । स्वामी जाण तयांचा ॥७८॥
पापपुण्याची कल्पना । संकल्पविकल्प उठती मना । विसरोनि आत्मज्ञाना । जन्ममरण भोगिती ॥७९॥


आनंदलहरी – मनाचें मनपण

ज्यासी सदगुरुकृपा होय । त्याचें मनपण विरोनि जाय । संकल्पविकल्पां नुरे ठाय । मिरासी होय मोक्षाचा ॥८०॥
सदगुरुचे कृपेवीण । नव्हे मोक्षाचें साधन । जन्ममरणाचें बंधन । नचुके जाण सर्वथा ॥८१॥
एक गुरुभक्तांतें निंदिती । एक गुरु ह्नणजे काय ह्नणती । जे जे गुरुतें सेविती । तयांसी प्राप्ती काय जाली ॥८२॥
सदगुरुभजनीं लाधलें सुख । तें नेणती अज्ञान मूर्ख । विषयसुखें मातले देख । जन्ममरणाचें दुःख भोगिती ॥८३॥
जैसी नपुंसकासी पद्मिणी । आलिया सुख नुपजे अंतः करणीं । किंवा उलूकास दिनमणी । देखतां नयनीं सुख काय ? ॥८४॥
गर्भांघासी लावण्यता । गर्दभासी सुगंधता । सुकरु मिष्टान्न भोक्ता । हें सर्वथा नघडेचि ॥८५॥
श्वानासी शेज सुमनाची । बधिरासी गोडी कीर्तनाची । रोगियासी मिष्टान्नाची । लागे रुची हें न घडेचि ॥८६॥


आनंदलहरी – गुरुभजनाची गोडी

तैसी अभक्तांसी गुरुभक्ती । हें नघडे हो कल्पांतीं । अनंता जन्माची पुण्यें फळतीं । तरीच प्राप्ती सदगुरुभजन ॥८७॥
मूर्खासी सदगुरुभजन । हे सर्वथा नघडे जाण । जन्ममरणाचें अधिष्ठान । संचितस्थान पापाचें ॥८८॥
मुके शब्दाची चातुर्यता । ह्नैसा होईल पुराणवक्ता । किंवा पांगुळ जाईल तीर्था । हें सर्वथा न घडेचि ॥८९॥
मर्कटासी सिंहासन । किंवा कागासी अमृतपान । वांझेसी वरमायपण । सर्वथा जाण न घडेचि ॥९०॥
जे जीव तदंश होती । तेचि पावती सदगुरुभक्ती । निजसुखातें भोगिती । इतरा भ्रांती जन मूढां ॥९१॥
श्रोतीं न मानावा खेद । म्यां आपुल्या मनासी केला बोध । भावें भजावा आनंदकंद । मोक्षाचें पद पावावया ॥९२॥
सुख धरोनी प्रपंचाचें । संचित होतसे पापाचें । भरतें दाटे भवसिंधूचें । जन्ममरणाचें भय थोर ॥९३॥
प्रपंचीं जरी सुख जोडे । तरी कां सेविती गिरीकडे । राज्य टाकुनी गेले थोडे । ते काय वेडे ह्नणावे ? ॥९४॥
भर्तुहरीनें राज्य टाकिलें । तेणें श्रीगोरखातें पुसिलें । राज्य टाकुनि मुंडित जालें । कितेक गेले भूपती ॥९५॥
मग श्रीगोरक्षनाथ बोलती । नव्याणव कोटी भूपती । इतरांची नाहीं गणती । योगाप्रती निघाले ॥९६॥
भवसिंधूच्या डोहीं । विषयाचा गळ घातला पाहीं । काळ लक्षी दिशा दाही । जीव सर्वही भक्षावया ॥९७॥


आनंदलहरी – सदगुरुशरण

जो सदगुरुसी शरण जाये । तो काळाचाही काळ होये । काळ तयासी शरण जाये । ऐसें बोलताहे वेदांत ॥९८॥
नलगे योगयाग साधन । नलगे व्रत तीर्थ अनुष्ठान । नलगे वैराग्य तप दान । एक सदगुरुभजन करावें ॥९९॥
अनेक कर्में केलीं पाहे । तपें राज्य प्राप्त होये । राज्यांतीं नर्क होय । ऐसें बोलताहे वेदशास्त्र ॥१००॥
स्वर्गी काय सांगों सुख । पुण्य सरलियां लोटिती देख । मागुती पाहावया मृत्युलोक । स्वर्गनर्क भोगावया ॥१०१॥
नर्क ह्नणजे गर्भवास । गर्भी पचावें नवमास । नाना दुःखें होती जिवास । त्याहूनि विशेष दुःख काय ॥१०२॥
जेणें मृत्यूचें मूळ तुटे । जन्म मरणाचें खत फाटे । पापपुण्याची वाढी खुंटे । धरणें उठे काळाचें ॥३॥
ऐसा होवावया एक उपावो । भावें भजावा सदगुरुरावो । जन्ममरणा पुसी ठावो । स्वरुपीं जीव मेळवीं ॥४॥
येथून नाहीं जीव नेला । आणि स्वरुपीं मेळविला । देही असतां मुक्त केला । उगव दाविला जीवासी ॥५॥
जीव आपुला उगव पाहे । इंद्रियांसहित तल्लीन होय । तेथें काळ करील काय । जन्ममरण अपाय खुंटले ॥६॥
जैसे भूपतिचिया बाळें । अनिवार अन्याय केले । तें मातेपुढें जाऊनि बैसलें । मग काय चाले कोणाचें ॥७॥
तैसा जीव स्वरुपीची असे । नाना कर्मे केलीं बहुवसें । तो स्वरुपीं जालिया समरसें । तेथें काळासी रीघ कैचा ॥८॥
स्वरुप अखंडदंडायमान । सर्वां ठाई परिपूर्ण । तेथें जिवासी कैचें जीवपण । समरसोनि एक जालें ॥९॥
जैसें सागरीहुनी लवण । जळापासूनि निर्माण । सगुणत्वें जालें कठीण । ह्नणोनि भिन्न नघडे त्यासी ॥११०॥
तेंचि जळामाजीं घालितां । जळचि होय तत्त्वतां । तें परतोन येईल हाता । हें सर्वथा न घडेचि ॥११॥


आनंदलहरी – सद‍गुरुला शरण

यालागीं सदगुरुचें भजन । सर्वांहूनि वरिष्ठ जाण । अवतारादिक आपण । सदगुरुसी शरण रिघावें ॥१२॥
रामराम स्मरतां घोष । तेणें तुटती भवपाश । तोहि शरण श्रीवसिष्ठास । गुरुभक्तीस सादर ॥१३॥
पूर्णब्रह्म श्रीकृष्णनाथ । तोहि ह्नणवी गुरुभक्त । दुर्वास ऋषीची सेवा करित । नित्यमुक्तीलागीं ॥१४॥
मुक्तपद आलें हातां । भय न घरी कर्म करितां । भोग भोगोनि अभोक्ता । कर्मे करुनि अलिप्तता यालागीं ॥१५॥
ब्रह्मपदाचा अधिकारी । ह्नणोनि विश्वातें उद्धरी । स्मरणमात्रें दुरितें हरी । तो श्रीहरी गुरुभक्त ॥१६॥
जैसी कासवीची उत्पत्ती । गर्भांध जाली संतती । ते चक्षुविण वाढती । हें कल्पांती घडेना ॥१७॥
तैसें सदगुरुकृपेवीण । पावले मोक्षाचें सदन । भूत भविष्य वर्तमान । ऐकिलें नाही जनी कोठें ॥१८॥


नामदेवांचें उदाहरण

नामया शरण भगवंतासी । भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी । हरी शिकवी नामयासी । सदगुरुविण सुखासी न पाविजे ॥१९॥
तेणें मानूनिया वचन । रिघाला सदगुरुसी शरण । रुप पाहावया निर्गुण । पंढरीनाथाचे ॥१२०॥
तेणें खेचरविसा केला गुरु । तेव्हां जाला साक्षात्कारु । तेणें केला ब्रह्मपूर्णपरु । निजसुखाचें घरु पावला ॥२१॥
एक सदगुरुकृपेवीण । न तुटे जिवाचें बंधन । सदभावी जे भाविक जन । तयांसी हें वचन मानलें ॥२२॥
जे या वचनातें मानिती । भावें सदगुरुते वंदिती । त्यांचे घरीं चारी मुक्ती । दास्य करिती अनायासीं ॥२३॥
बहुत बोलोनियां काय । ज्याचे पदरीं पुण्य होय । तोचि सदगुरुसी शरण जाय । मुक्ती लाहे येचि देहीं ॥२४॥
याचि देहीं याच डोळां । भोगिजे मुक्तीचा सोहळा । ऐसा कोणीएक विरळा । तोचि जिव्हाळा स्वरुपाचा ॥२५॥
त्यासी देखिल्या दृष्टीं । मुक्ती लाहिजे उठाउठीं । मा त्यासी पडल्या गांठी । आनंद सृष्टीं न समाये ॥२६॥
तो म्यां देखिला जनार्दन । देखतांच गेला भवभ्रम । सुख जालें अनुपम्य घन । पावलों सदन मोक्षाचें ॥२७॥


गुरुस्वरुपाची अगम्यता

मस्तकीं लागतां तयाचा करु । न मोडतां सुष्टीचा वेव्हारु । सर्व जालें शून्याकारु । तेजें अंबर दाटलें ॥२८॥
तया तेजाचा पारु । नेणती ब्रह्मा हरि हरु । वेद राहिले मौन्याकारु । श्रुतीसी विचारु पडिलासे ॥२९॥
तयातें काय वाणावें । कवणा उपमेतें आणावें । त्यावीण दुजें देखावें । तरी सांगावें साक्षित्वें ॥१३०॥
जो निर्गुण निराकार । निरुपम्य निराधार । परब्रह्म निर्विकार । विश्वंभर अव्यक्त ॥३१॥
अखंडतेजें सदोदित । उत्पत्तिप्रळया विरहित । व्यापुनी सर्वांसी आलिप्त । त्यावीण रिता ठाव नाहीं ॥३२॥
जो कां वस्तु परात्पर । सगुण निर्गुणाचें उदर । वेदां नकळे जयाचा पार । शब्दाचा विचार खुंटला ॥३३॥
मनें जयातें देखिजे । तयातें शब्दें वानिजे । जेथें मनें मनपणा मुकिजे । तो शब्दें बोलिजे कवणे परी ॥३४॥
मन सकळांतें चाळितें । तेथें ठाव नाहीं मनातें । यावरी कैंचे इंद्रियातें । देखतां स्वरुपातें पावतील ॥३५॥
जरी म्हणाल स्वरुप निराकार । तरी कोठूनि जाला विस्तार । या शब्दाचा विचार । श्रोतीं सादर परिसावा ॥३६॥
जरी उपसाहित्यें सांगावें । तरी साहित्य कवणातें द्यावें । त्याचिया समता दुजें देखावें । तरी बोलावें साहित्य ॥३७॥
परी बोलतों अल्पमती । भावें परिसावें सज्जन श्रोतीं । रविकिरणापुढें काडवाती । तैसें मतीं बोलतों ॥३८॥
जैसें पाहतां वटबिजासी । सूक्ष्मत्वें नये दृष्टीसी । निराकार असतां तयासी । तेथें द्रुमासी ठाव कैंचा ॥३९॥
बिजामाजीं असतां अंकुर । बिजीं होता बीजाकार । सूक्ष्मत्वें निघाला बाहेर । मग अपार वाढला ॥१४०॥
त्वचा काष्ठें फळें पत्रें । बिजीं होतें बीजाकारें । तोचि महावृक्ष विस्तारे । मग पसरे स्वइच्छा ॥४१॥
नाहीं ह्नणतां विस्तारला । आहे ह्नणों तरी नाहीं देखिला । बीजामाजीं होता संचला । तोचि विस्तारला सगुणत्वें ॥४२॥
तैसें निर्गुण स्वरुपा माझारीं । अनंतब्रह्माडांची भरोवरी । स्वरुपाकार असतां अंतरीं । तेंचि बाहेरीं निघालें ॥४३॥
बीजें व्यापिलें वृक्षासी । तैसें निर्गुणें व्यापिलें सगुणासी । शब्दें आणिलें भिन्नपणासी । जैसें कनकासी अळंकारनामें ॥४४॥
माया स्वरुपीं तदंश होती । ते इच्छेगुणें आणिलें व्यक्ती । सर्व गुणातें जाली प्रसवती । करी मूर्ती त्रिगुणाची ॥४५॥
करी नाना रचनेतें । परी भिन्नत्व नाहीं स्वरुपातें । स्वरुपें व्यापिलें सर्वातें । जैसें अलंकारातें सुवर्ण ॥४६॥
ऐसा स्वरुपाचा विस्तारु । होऊनि उरला अपारु । तया स्वरुपाचा विस्तारु । ब्रह्मादिहरिहरु वेडावले ॥४७॥
त्यातें मौन्येंचि पाहिजे । रसनेवीण गोडी घेइजे । भाग्येंवीण सुख भोगिजे । पद पाविजे गुरुखुणें ॥४८॥
आतां बोलणें खुंटलें । शब्दाचें चातुर्यं राहिलें । दृष्टीचें देखणें उरलें । तेंहि निमालें शेवटी ॥४९॥
सदगुरुचे निजदास । तेचि पावती ये खुणेस । परिसतां कानडे येरास । जैसे पक्षियासी नारेळ ॥१५०॥


मोक्षाधिकारी

सकळां साष्टांग नमन । तुह्मी जावें सदगुरुसी शरण । चुकवावें जन्ममरण । पावावें सुख मोक्षाचें ॥५१॥
सदगुरुमंत्रउपदेश तत्त्वतां । मोक्ष तत्काळ पावे त्वरिता । ऐसें असे यथार्थता । सदगुरुसमान नाहीं सत्यत्वें ॥५२॥
मन असतां आनंदाभीतरीं । उठती सुखाचिया लहरी । ह्नणोनि वदली वैखरी । प्रेम आनंदलहरी या नांव ॥५३॥
एकाजनार्दनी एकनाथ । एक ह्नणते विश्वभरित । तो होउनी कृपावंत । प्रेमे आनंदलहरी वदविली ॥१५४॥

इतिश्रीआनंदलहरी समाप्ता ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्री एकनाथ महाराज कृत
आनंदलहरी समाप्त.

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती

आनंदलहरी


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *