भावार्थरामायण युद्धकांड अध्याय 21

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय 21 आरंभ


॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकविसावा ॥
रावण व कुंभकर्ण यांचा संवाद
॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भयानक कुंभकर्णाला पाहून वानर सैन्याची अस्वस्थता :
प्रबोधोनि कुंभकर्णा । भेटों जातां पैं रावणा ।
भय उपजलें वानरगणा । त्याच्या उग्रपणा देखोनी ॥ १ ॥

जगाम तत्रांजलिमालया वृतः शतक्रतुर्गेहमिव स्वयंभुवः ।
तं मेरुशृंगप्रतिमं किरीटिनं स्पृशंतमादित्यमिवात्मतेजसा ॥१॥
वनौकसः प्रेक्ष्य विवृद्धमद्‍भुतं भयार्दिता दुदुविरे समंततः ।
केचिच्छरण्यं शरणं स्म रामं वज्रांति केचिद्व्यथिताः पतंति ॥२॥
कैविद्दिशश्च त्वरिताः प्रयांति केचिद्‌भयार्ता भुवि शेरते स्म ॥३॥

मेघांचिया मेघमाळा । शोभती कुंभकर्णाच्या गळां ।
मुकुट टेंकला नभोमंडळा । तेजें रविकळा लोपती ॥ २ ॥
कराळ विक्राळ भयानक वदन । प्रळयतेजें अत्युग्र नयन ।
देखोनि त्याचें भ्यासुरपण । वानरगण त्रासले ॥ ३ ॥
उग्र देखोनि कुंभकर्ण । वानर श्रीरामा आले शरण ।
एक पडले मूर्च्छापन्न । एकांचे प्राण निर्बुजले ॥ ४ ॥
एकांची वळली बोबडी । एकां भरली अरडीदरडी ।
एक पडलीं उबंडीं । तोंडे कोरडी एकांचीं ॥ ५ ॥
एक वानर त्वरेंकरीं । गेलें समुद्रपरतीरीं ।
एक झालीं रानभरीं । एक धरेवरी लवंडली ॥ ६ ॥
नावानिगे जे जुत्पत्ती ।वानरवीर भद्रजाती ।
कुंभकर्णाच्या युद्धार्थी । आज्ञा पुसती श्रीरामा ॥ ७ ॥

ततो रामो महातेजा धनुरादया वीर्यवान् ।
किरीटिनं महाकायं ददर्शातिभयंकरम् ॥४॥
यं दृष्ट्वा विद्रुता दिग्भ्यो वानराणां महाचमूः ।
सुविस्मितभिदं रामो बिभीषणमुवाच ह ॥५॥
कोयं पर्वतसंकाशः किरीटी हरिलोचनः ।
आचक्ष्व मे महान्कोऽसौ राक्षसो यदि वा सुरः ॥६॥
न मयैवंविधं भूतं द्दष्टपूर्वं कदाचन ।
संपृष्टो राजपुत्रेण रामेणाक्लिष्टकर्मणा ॥७॥
बिभीषणो महाप्राज्ञः काकुत्स्थमिदमब्रवित् ॥८॥

बिभीषण रामांना कुंभकर्णाचे वर्णन सांगतो :

दीर्घ मुकुट अति दारुण । भयानक कुंभकर्ण ।
श्रीरामें देखोनि आपण । धनुष्यीं बाण सज्जिला ॥ ८ ॥
नाहीं पूर्वी ऐकिला । नाहीं पुराणीं परिसिला ।
अकस्मात दीर्घ दादुला । रामें देखिला एकाएकीं ॥ ९ ॥
तेणें अतिशयें विस्मित । बिभीषणा पुसे श्रीरघुनाथ ।
अति दिर्घ लंकेआंत । कोण दिसतो विक्राळ ॥ १० ॥
ज्याचे देखतां उग्रपण । पळाले माझे वानरगण ।
मुकुट कुंडले पिंगट नयन । सांग हा कोण मजपासीं ॥ ११ ॥
ऐसें पुसतां रघुनाथ । बिभीषण बुद्धिमंत ।
कुंभकर्णाचा पूर्ववृत्तांत । असें सांगत श्रीरामा ॥ १२ ॥

सैष विश्रवसः पुत्रः कुंभकर्णो निशाचरः ।
एतेन जातमात्रेण क्षुधितेन महात्मना ॥९॥
भक्षितानि सहस्त्राणि सत्वानि सुमहान्त्यपि ।
प्रजाभिः सह शक्रस्तुययौ स्थानं स्वयंभुवः ॥१०॥
कुंभकर्णस्य दौरात्म्यं शशंसुस्ते प्रजापतेः ।
प्रजानां भक्षणं चैव शशंसुस्ते दिवौकसः ॥११॥
एवं यदि प्रजा नित्यं भक्षयिष्यति राक्षसः ।
अचिरेणैव कालेन शून्यो लोको भविष्यति ॥१२॥

तो हा विश्रव्याचा पुत्र जाण । नांवे विख्यात कुंभकर्ण ।
येणें उपजातांचि जाण । केलें भक्षण प्रजेचें ॥ १३ ॥
शतसहस्र भूतावळी । प्रजा भक्षिल्या जन्माळीं ।
तरी तृप्ति नव्हे आतुर्बळी । जिव्हा लळलळी हळहळित ॥ १४ ॥
स्वर्गीचे भक्षी देवगण । मृत्युलोकींचे मानव जाण ।
सर्व पक्षी सिद्ध चारण । भक्षी संपूर्ण जीवजात ॥ १५ ॥
ऐसा देखोनि भूतावर्त । प्रजा शक्रसमवेत ।
ब्रह्मयासीं गार्‍हाणें देत । भूतें भक्षित कुंभकर्ण ॥ १६ ॥
करावया भूतांचा घात । भला निर्मिला कुंभकर्ण नात ।
ब्रह्मसृष्टीचा क्षयार्थ । भोजनावर्त कुंभकर्ण ॥ १७ ॥
कुंभकर्ण भोजनासाठीं । त्रिसप्तरात्रीं शून्य सृष्टी ।
हा करील उठाउठीं । शक्र परमेष्ठी प्रार्थिला ॥ १८ ॥
नित्य भक्षिता भूतानुकोटी । तृप्ति नव्हे याचे पोटीं ।
भूतशून्य करील सृष्टी । पोटासाठीं कुंभकर्ण ॥ १९ ॥

वासवस्य वचः श्रुत्वा सर्वलोकपितामहः ।
रक्षः समाह्वयामास कुंभकर्ण ददर्श च ॥१३॥
कुंभकर्णं समीक्ष्यैव विस्मितोऽभूत्प्रजापतिः ।
कुंभकर्णं महावीर्यं स्वयंभूरिदमब्रवीत् ॥१४॥
शयितो ह्येष षण्मासमेकाहं जागरिष्यति ।
असौ तु वीर एकान्हा क्षुधितो विचरन्मुवि ॥१५॥
आत्मना व्यसनेनाद्य कुंभकर्णो विबोधितः ।
त्वपराक्रमभीत्श्च राजा संप्रति रावणः ॥१६॥

कुंभकर्णाच्या अधाशीपणाला निर्बध म्हणून ब्रह्मदेवाचा शाप :

ऐसी एकोनि इंद्राची गोष्टी । सादर जाला परमेष्ठी ।
कुंभकर्ण पहावया दृष्टीं । उठाउठीं आणविला ॥ २० ॥
कराल विक्राळ दारुण । अति उग्र कुंभकर्ण ।
त्याचें देखोनि चतुरानन । विस्मयापन्न स्वयें जाला ॥ २१ ॥
पोटासाठीं भूतविघाती । निर्माण केला हा पौलस्ती ।
कुंभकर्णासीं प्रजापती । शापोन्मुक्ती स्वयें वदला ॥ २२ ॥
मृतकल्प अति असोस । नित्य निद्रा तुज षण्मास ।
जागा होशी एक दिवस । त्यामाजी त्रास क्षुधेचा ॥ २३ ॥
ब्रह्मशापें निद्रा पूर्ण । तो हा जाण कुंभकर्ण ।
तुजसीं करावया रण । स्वयें रावण उठविता झाला ॥ २४ ॥
तुझेनि संग्रामें रावण । धाकेंचि सोडूं पाहे प्राण ।
म्हणोनि तुजसीं करावया रण । कुंभकर्ण उठविला ॥ २५ ॥
त्यासीं देखताचि जाण । वानर पळती घेवोनि प्राण ।
त्यासीं संमुख करावया रण । नाहीं आंगवण कपींसीं ॥ २६ ॥
इंद्र चंद्र कुबेर वरुण । विद्याधर सिद्ध चारण ।
कुंभकर्णे करोनि रण । रणीं सुरगण जिंकिले ॥ २७ ॥
दैत्य दुर्धर दानव । यक्ष राक्षस गणगंधर्व ।
पाताळपन्नग मानव । येणें सर्व जिंतिलें ॥ २८ ॥
या कुंभकर्णाची पाठी । कोणी देखिली नाहीं सृष्टी ।
देव दैत्य दानवकोटी । येणें रणसंकटी गांगिले ॥ २९ ॥
ऐसा दुर्धर कुंभकर्ण । क्षुधेनें पीडिला दारुण ।
भक्षावया वानरगण । येईल आपण आक्रोशें ॥ ३० ॥

स एष क्षुधितो वीरो निर्गतः शिबिरात्खलु ।
वानरान्भृशसंक्रुद्धो भक्षयिष्यति वीर्यवान् ॥१७॥
विभीषणवचः श्रुत्वा हेतुमत्सुमुखोदतम् ।
उवाच राघवो वाक्यं नीलं सेनापतिं तदा ॥१८॥
गच्छ सैन्यानि सर्वाणि व्युह्य तिष्ठस्व पावके ।
द्वाराणि संक्रमांश्चैव लंकाया यूथपैः सह ॥१९॥
राघवेण समादिष्टो नीलो हरिचमूपतिः ।
शशास वानरानीकं यथावत्कपिकुंजरः ॥२०॥

लंकेचे निरोधन :

साक्षेंपें सांगे बिभीषण । अति खादाड कुंभकर्ण ।
भक्षावया वानरगण । येईल आपण संग्रामा ॥ ३१ ॥
ऐकोनि बिभीषणवचन । हासिन्नला रघुनंदन ।
मी असतां कुंभकर्ण । वानरगण केंवी भक्षी ॥ ३२ ॥
एक एक वानरगण । गांजू शकती कुंभकर्ण ।
सर्व याची आंगवण । करितां रण कळेल ॥ ३३ ॥
देखोनियां मांसें मोठा । म्हणसी कुंभकर्ण लाठा ।
लागतां वानरचपेटा । धाटामोटा घोळसिती ॥ ३४ ॥
आणोनि नीळ सेनापती । स्वमुखें सांगे रघुपती ।
वानरभार वीर जुत्पत्ती । सन्नद्ध स्थितीं सज्जावें ॥ ३५ ॥
शिळा शिखरें द्रुम पाषाण । पर्वतपाणी वानरगण ।
सन्नद्ध बद्ध सावधान । लंकाभवन रोंधावें ॥ ३६ ॥
आलिया रावण कुंभकर्ण । इंद्रजितासगट सैन्य ।
अवघ्यां करीन रणकंदन । रघुकंदन गर्जत ॥ ३७ ॥
पळत्या देवोनि नाभिकार । दृढ सज्जिला वानरभार ।
अरे मी असतां श्रीरामचंद्र । कपींसी मारुं कोण शके ॥ ३८ ॥
नीलें ऐकतां श्रीरामवचन । पळत्या आलें अति स्फुरण ।
भ्याडा शतधा आंगवण । रणी रावण गांजावया ॥ ३९ ॥
नीळ सेनापति आपण । स्वमुखें करितां गर्जन ।
ऐकोनि श्रीरामवचन । वानरगण हरिखले ॥ ४० ॥
श्रीरामांचें आज्ञापन । दृढ रोधावें लंकाभवन ।
वानरीं करोनि उड्डाण । त्रिकुटीं जाण वळंघले ॥ ४१ ॥
येरीकडे लंकेआंत । भेटावया लंकानाथ ।
हरिखें कुंभकर्ण जात । तोही कथार्थ अवधारा ॥ ४२ ॥

सौऽभिगम्य गृहं भ्रातुः कक्षामभिविगाह्य च ।
ददर्शसीनमाविष्टं विमाने पुष्पके गुरुम् ॥२१॥
अथ दृष्ट्वा दशग्रीवः कुंभकर्णमुपस्थितम् ।
तूर्णमुत्थाय संहष्टः सन्निकर्षमुपानयत् ॥२२॥
अथासीनस्य पर्यंके कुंभकर्णो महाबलः ।
स जग्राह तदा भ्रातुः पाढौ राक्षसपुंगवः ॥२३॥
उत्पत्य चैव मुदितो रावणः परिषस्वजे ।
स भ्रात्रा संपरिष्वत्को यथावच्चाभिनंदितः ॥२४॥
कुंभकर्णस्ततो दिव्यं प्रतिपेढे वरासनम् ।
स तदासनमश्रित्य कुंभकर्णो महाबलः ॥२५॥
संरत्कनयनः कोधाद्रावणं वाक्यमब्रवीत् ॥२६॥

कुंभकर्ण रावणाला भेटतो :

कुंभकर्ण महाबळ । भ्रातृभेटीस उतावेळ ।
जातां सप्त द्वारपाळ । पायां सकळ लागती ॥ ४३ ॥
विमानसदृश सिंहासन । तेथें बैसला दशानन ।
त्यासी देखोनि कुंभकर्ण । लोटांगण घातलें ॥ ४४ ॥
रावणें उठोनि आपण । हातीं धरोनि कुंभकर्ण ।
आपणाजवळी आणून । आलिंगन दीधलें ॥ ४५ ॥
पर्यंकारुढ रावण । त्याचे कुंभकर्णे आपण ।
मस्तकी वंदिले चरण । प्रेम संपूर्ण बंधूचें ॥ ४६ ॥
अतित्वरेनें रावण । सिंहासनींचा उठोन ।
पुढती दिधलें आलिंगन । समाधान दोघांसीं ॥ ४७ ॥
कुंभकर्ण दशानन । दोघीं देतां आलिंगन ।
दोघें जाले सुखसंपन्न । समाधान दोघांसीं ॥ ४८ ॥
ते वेळीं रावण उल्लासोन । आपल्या समसमान ।
कुंभकर्णासी वरासन । संतोषोन दीधलें ॥ ४९ ॥
तया आसनीं कुंभकर्ण । बैसोनियां सावधान ।
संमुख करोनि दशानन । सादर प्रश्न पूसत ॥ ५० ॥

किमर्थमहामत्राद्य त्वया राजन्प्रबोधितः ।
शंश कस्मद्‌भयं तेऽद्य को वा प्रेतो भविष्यति ॥२७॥
पर्वतांश्चूर्णयिष्यामि दारायिष्यमि मेदिनीम् ।
देवान्विद्धि वधिष्यामि त्रैलोक्ये पार्थिवानपि ॥२८॥
अद्य पश्यंतु भूतानि भक्ष्यमाणानि सर्वशः ।
सोऽद्य तृप्ति गमिष्यामि भक्षयित्वा सुरासुरान् ॥२९॥
कुम्भकर्णवचः श्रुत्वा जहषे रावणस्तदा ।
पुनर्जातमिवात्मानं मेने स रजनीचरः ॥३०॥

रावणाला कुंभकर्ण उठविण्याचे कारण विचारतो :

रावणांसी पुसे कुंभकर्ण । मज उठवावया काय कारण ।
कोण भय आलें दारुण । मजलागून तें सांगें ॥ ५१ ॥
तुजलागीं लंकानाथा । सुरासुरांच्या करीता घाता ।
चूर्ण करींन पर्वतां । पृथ्वी आतां विदारीन ॥ ५२ ॥
जरी एक अपराध केला । तो जाण पां प्रेतत्वा गेला ।
माझेनि हातें रणीं निमाला । संशय या बोला धरुं नको ॥ ५३ ॥
देव दानव मानव । यक्ष किन्नर गंधर्व सर्व ।
भूतें गिळोनि सावयव । प्रतापगौरव पाहें माझें ॥ ५४ ॥
सुरासुर भक्षून येथ । सहसा मी नव्हें तृप्त ।
पुढें माझा कार्यार्थ । सावचित्त अवधारीं ॥ ५५ ॥
तुझें वैरी जे समस्त । भक्षावया मी अति क्षुधित ।
जें जें भक्षूं सांगसी येथ । तें तेंस त्वरित गिळीन ॥ ५६ ॥
ऐकोनि कुंभकर्णाचें वचन । हरखिला दशानन ।
मरोनि वांचलों आपण । नवा जन्म जाण कुंभकर्णा ॥ ५७ ॥

अयं ते सुमहन्कालः शयानस्य निशाचर ।
स्वपितस्त्वं न जानीषे मम रामान्महद्‌भयम्॥३१॥
एष दाशरथी रामः सुग्रीवसहितो बली ।स
मुद्रं लंघयित्वा तु कुलं नः परिकृंतति ॥३२॥
न देवासुरनागेभ्यो गंधर्वेभ्यःकदाचन ।
भूतपूर्वं भयं तादृग्यादृशं मानुषादिदम् ॥३३॥

रावणाचे कुंभकर्णाला कथन :

ऐकें कुंभकर्णा सावधान । तुवां निद्रा केलिया जाण ।
मज श्रीरामभय दारुण । जागृति स्वप्न सुषुप्तीं ॥ ५८ ॥
श्रीरामबाणीं रणर्दित । अहर्निशी धुकधुकित ।
श्रीरामें माझा प्राणात । जाण निश्चित कुंभकर्णा ॥ ५९ ॥
अश्व ध्वज रथ सारथी । छेदोनि मुकुत पाडिला क्षितीं ।
विरथी केलें मज क्षीणशक्ती । रणीं रघुपति न मारीच ॥ ६० ॥
श्रीराम कृपा संपूर्ण । सांपडला न घेच प्राण ।
देवोनियां जीवदान । रणीं रावण सोडिला ॥ ६१ ॥
अति गर्वी मी लंकानाथ । मोकळा केशीं करोनि विरथ ।
आणि नागवा हळहळित । लंकेआंत धाडिला ॥ ६२ ॥
पूर्वी ऐसा अपमान । दानव मानव सुरगण ।
त्याहीपासून अति दारुण । नाहीं अपमान देखिला ॥ ६३ ॥
न भूतपूर्व अपमान । स्वप्नी न देखे दशानन ।
तैसाही श्रीरामें गांजून । तृणासमान मज केलें ॥ ६४ ॥
आणिक एक नवल जाण । समुद्रीं तारुन पाषाण ।
करोनियां सेतुबंधन । आला आपण लंकेसीं ॥ ६५ ॥
त्याच्या सेतूच्या परिपाठीं । लंके आल्या वानरकोंटी ।
दूर्ग वेढिले मर्कटीं । आपले दृष्टी पाहें पां ॥ ६६ ॥
वनीं उपवनीं वानरथाटी । दुर्गी झोंबती कोट्यनुकोटी ।
पैल पाहें लंकात्रिकटीं । वीर जगजेठी वळंघले ॥ ६७ ॥
करितां वानरांसी रण ।विरुपाक्ष अकंपन ।
प्रहस्त मारिला प्रधान । न लागतां क्षण वानरीं ॥ ६८ ॥
येवढाले महावीर । युद्धा आलिया दुर्धर ।
नुठी श्रीराम ना सौमित्र । केला रणमार वानरीं ॥ ६९ ॥
सुग्रीव अंगदादि कपिपती । हेही नाहीम् आले युद्धार्थी ।
वानरीं लावोनियां ख्याती । तिघे पुरुषार्थी मारिले ॥ ७० ॥
विरुपाक्ष अकंपन । एकें हनुमंतें मारिले जाण ।
नीळें प्रहस्त प्रधान । न लागतां क्षण निर्दळिला ॥ ७१ ॥
नीळें मजसीं करिता रण । मज केलें तृणासमान ।
गाढी वानराची आंगवण । निधडे दारुण संग्रामीं ॥ ७२ ॥

ये राक्षसा मुख्यतमा हतास्ते युधि वानरैः ।
वानराणां क्षयं युद्धे न पश्यामि कदाचन ॥३४॥

रावणाचे आश्चर्य कथन :

मुख्य धुरेंसी निशाचर । वानरीं मारिले अपार ।
एकही न मरेचि वानर । रण दुर्धर करितांही ॥ ७३ ॥
घायीं जर्जर वानरभुज । लाविती श्रीरामचरणरज ।
सवेंचि उठोनि कपिसमाज । नाचती भोजें रणरंगी ॥ ७४ ॥
अपार मरती निशाचर । एकही न मरेचि वानर ।
हेंचि मज आश्चर्य थोर । दशशिर सांगत ॥ ७५ ॥
तुम्हां श्रीरामामाजी जाण । वैर पडावया काय कारण ।
ऐसें पुससी जरी आपण । तरी समूळ निरुपण ऐकावें ॥ ७६ ॥

पुरा त्वं नाभिजानीषे यदा सीता मया हृता ।
सीताहरणसंतप्ताद्रामान्मे सुमहद्‌भयम् ॥३५॥
हंतावेक्षस्व लंकाया वनान्युपवनानि च ।
सेतुना सुखमागम्य वानरैकार्णवं कृतम् ॥३६॥
नगरं शत्रुणा रुद्धं हता युद्धे सुहृज्जनाः ।
कोशश्च क्षयितः सर्व स त्वमद्य प्रपश्यताम् ॥३७॥
त्रायस्वेमां पुरीं लंकां बालवृद्धवशेषिताम् ।
भ्रातुरर्थे महाबाहो कुरु साहाय्यमुत्तमम् ॥३८॥
मयैवं नोत्कपूर्वी हि भ्रातः कश्चित्परंतप ।
त्वय्यस्ति तु मम स्नेहःपरा संभावना च मे ॥३९॥

सीताहरण केल्याने श्रीराम ससैन्य लंकेवर
चालून आल्याचे रावण कुंभकर्णाला सांगतो :
तुंवा निद्रा केलिया जाण । पंचवटीं जावोनि आपण ।
मारीच मृगे करोनि छळण । सीताहरण म्यां केलें ॥ ७७ ॥
तेणे रागें रघुनंदन । मेळवोनि वानरसैन्य ।
करोनियां सेतुबंधन । बळवाहन लंके आला ॥ ७८ ॥
लंके यावया रघुनंदन । मुख्य द्वंद्वी वायुनंदन ।
विध्वंसोनि अशोकवन । राक्षसकंदन तेणें केलें ॥ ७९ ॥
मारिले वनकर किंकर । पंच सेनानी प्रधानपुत्र ।
मारिला जंबुमाळी महावीर । अखया कुमर मुख्यत्वें ॥ ८० ॥
अखया कुमरकैवारार्थ । युद्धा जातां इंद्रजित ।
रणीं करोनि हताहत । केला निःपात सैन्याचा ॥ ८१ ॥
ब्रह्मपाशाचिये गती । लंके आणिला मारुती ।
तेणें केली अति ख्याती । सांगों किती सुबंधो ॥ ८२ ॥
जाळोनियां लंकाभवन । मजही देवोनि अपमान ।
असंख्य राक्षस मारुन । गेला निघोन किष्किंधे ॥ ८३ ॥
किष्किंधे जावोनि आपण । घेवोनि आला रघुनंदन ।
निरोधोनि लंकाभवन । माझें कंदन करुं आला ॥ ८४ ॥
पूर्वी ऐसा काकुलती । नाहीं आलों कोणाप्रती ।
तूं सखा बंधु रणसाह्यार्थी । यालागीं तुजप्रती सांगितलें ॥ ८५ ॥
सेतुद्वारा वानरवीर । येवोनि वेढिलें स्वनर ।
विध्वंसिलें लंकापुर । द्वारें द्वार रोधूनी ॥ ८६ ॥
विध्वंसोनि लंकाभवन । रणीं मारिले सुहृज्जन ।
ठेविले ठायीं भांडार क्षीण । जालें जाण सुबंधो ॥ ८७ ॥
दुर्धर आम्हां आलें विघ्न । माझे करीं पां संरक्षण ।
लंका रक्षावी आपण । बाळें वृद्धजन कुळ रक्षीं ॥ ८८ ॥
तुझ्या भुजांची मज आस । तुझा अति विश्वास ।
शत्रुसमुदाय करोनि ग्रास । दुःखक्लेश निवारीं ॥ ८९ ॥
रणीं गांगिलों संपूर्ण । त्वां साह्य करावें आपण ।
ऐसे सांगतां रावण । आलें रुदन अनिवार्य ॥ ९० ॥
तूं तव पराक्रमी परम । माझा निरसीं सकळ श्रम ।
साह्य करीं अति उत्तम । सुखसंभ्रम जेणें वाढे ॥ ९१ ॥
ऐसी हे समूळ कथा । सांगितली यथार्थता ।
वैरासी मुख्य कारण सीता । जाण तत्वतां सुबंधो ॥ ९२ ॥
प्रयासीं केले सीताहरण । ते त्वां भोगिली आपण ।
नाहीं म्हणतां रावण । पुसे कुंभकर्ण छळणोक्ती ॥ ९३ ॥

किं कार्यं प्रतिबोधितो वद सखे रामांगनास्त्याहृता ।
सा भक्ता नहि किं यतो न रमते रामात्परं जानकी ॥
रामाः किं भवितासि नो शृणु सखे तारामलं श्यामलम् ।
रामांगं भजतो ममापि कपटो भावो हि संशाम्यति ॥

कुंभकर्णाचे प्रतिवचन व सूचना :

कुंभकर्ण म्हणे लंकानाथा । मज उठविलें कोण्या अर्था ।
सीताहरण दुःखावस्था । तुज तत्वतां सांगावया ॥ ९४ ॥
हरुनि आणिली जे सीता । ते त्वां भोगिली लंकानाथा ।
रामावांचून सर्वथा । आणिकेंसीं सीता रमेना ॥ ९५ ॥
रुपरेखा लक्षलक्षण । हावभाव कताक्ष गुण ।
चाप सज्जोन ठाणमाण । गंभीर गहन विन्यासें ॥ ९६ ॥
श्यामसुंदर कमलनयन । श्रीराम होवोनि आपण ।
सीता न भोगावया काय कारण । कुंभकर्ण पूसत ॥ ९७ ॥
नानापरींच्या लंकानाथा । मावा जाणसी समस्ता ।
श्रीराम होवोनि भोगितां सीता । विलंबता का केली ॥ ९८ ॥
कुंभकर्णा ऐक आतां । तुज मी सांगेन तत्वतां ।
माव न चले श्रीरघुनाथा । छळणें सीता न भोगवे ॥ ९९ ॥
मज स्वयें श्रीराम होतां । कैंचा राम कैंची सीता ।
ठाव नाहीं लंकानाथा । भोग्य भोक्ता असेना ॥ १०० ॥
नाहीं तेथें ध्येय ध्याता । नाहीं तेथें कर्म कर्ता ।
समूळ तेथें नाहीं सीता । नाहीं भोक्ता रावण ॥ १ ॥
नाहीं द्रष्टा दृश्य दर्शन । नाहीं धर्माधर्मलक्षण ।
नाहीं कर्म क्रिया आचरण । मीतूंपण असेना ॥ २ ॥
श्रीराम होतां इत्यंभूत । जनीं विजनीं श्रीरघुनाथ ।
भूतमहाभूतें समस्त । सदोदित श्रीराम ॥ ३ ॥
श्रीराम जीवन पावन । श्रीरामही हुताशन ।
श्रीराम दशदिशा आपण । जग संपूर्ण श्रीराम ॥ ४ ॥
ऐसें मज श्रीराम होतां । समूळ तेथें नाहीं सीता ।
काय म्यां भोगावें गा आतां । रावण भोक्ता असेना ॥ ५ ॥
ऐकतां रावणाचें वचन । कुंभकर्णा आलें रुदन ।
श्रीराम परब्रह्म परिपूर्ण । कुळनिर्दळण विरोधें ॥ ६ ॥
माया बाधेना श्रीरघुनाथा । कपटें भोगवेंना सीता ।
ऐसें कळोनि लंकानाथा । विरोध वृथा कां करिसो ॥ ७ ॥
कपटें श्रीराम स्वयें होतां । पावली पूर्ण अगाधता ।
त्यांसीं सप्रेम भावें भजतां । स्वानंदता सुखवास ॥ ८ ॥
समुद्रीं तारिले पाषाण । त्यांसी अवश्य रिघावें शरण ।
सखा करोनि रघुनंदन । सुखसंपन्न नांदावें ॥ ९ ॥
श्रीरामस्वरुपाची प्रतीती । तुज बाणली लंकापती ।
विरोध सांडोनियां चित्तीं । शरण रघुपती निघावें ॥ १० ॥
रामासीं निघाल्या शरण । स्वप्नी नाहीं जन्ममरण ।
विघ्नचि हो निर्विघ्न । सुखसंपन्न नांदावे ॥ ११ ॥
शरण रिघाल्या श्रीरघुनाथा । भयचि होय निर्भयता ।
सख्य केलिया काकुत्स्था । अति श्लाघ्यता तिहीं लोकीं ॥ १२ ॥

स तु श्रुत्वा महाराजः कुम्भकर्णस्य भाषितम् ।
भृकटिं चैव संचके क्रुद्धश्चैवमुवाच ह ॥४१॥
मान्यो गुरुरिवाचार्यः किं मां त्वमनुशाससि ।
किंवा कृच्छ्रगतं कर्तुंकालयुक्तं विधीयताम् ॥४२॥
अस्मिन्काले तु यद्युक्तं तदिदानीं विचिन्त्यताम् ।
ममापनयजं दुःखं विक्रमेण समीकुरु ॥४३॥
क्रुद्धोऽयमिति विज्ञाय शनैः श्लक्ष्ण्मुवाच ह् ।
कुम्भकर्णः शनैर्याक्यं बभाषे परिसांत्वयन् ॥४४॥

रावणाचा उद्वेग व क्रोधाविष्कार :

शत्रु मर्दिंल कुंभकर्ण । उल्लासें प्रबोधी रावण ।
तो म्हणे रामा निघावें शरण । तेणें उद्विग्र लंकेश ॥ १३ ॥
श्रीरामा निघावें शरण । निश्चय वदला बिभीषण ।
तैसेंचि वदला कुंभकर्ण । तेणें रावण अति दुःखी ॥ १४ ॥
ऐकतां कुंभकर्ण‍उत्तर । रावण कोपला दुर्धर ।
नेत्र भोवंडी चक्राकार । भृकुटी विक्राळ सक्रोध ॥ १५ ॥
कुंभकर्णी सुनी दृष्टी । रावणें भंवयां दिधली गांठी ।
क्रोधें खवळला पोटीं । वदतां गोष्टी साशंक ॥ १६ ॥
क्रोधानुवादें कुंभकर्ण । बिभीषणाऐसा आपण ।
श्रीरामासीं गेलिया शरण । मग रक्षण मज कैंचें ॥ १७ ॥
यालागीं स्वयें दशानन । निजक्रोधातें आंवरुन ।
कुंभकर्णासी मृदु वचन । कोपयामान अनुवादे ॥ १८ ॥
जेंवी का शिष्यांसी नेमून । सद्‌गुरु करी आज्ञापन ।
तैसाचि तूं मजलागून । निग्रहून वदतोसी ॥ १९ ॥
मी ज्येष्ठ तूं कनिष्ठ । ही सांडोनि नीट वाट ।
धरोनि जाणिवेचा लोट । गुरुत्वें स्पष्ट नेमिसी मज ॥ २० ॥
शत्रु निर्दाळिसी करोनि रण । तुझा भरंवसा होता पूर्ण ।
शेखीं श्रीरामा निघावें शरण । निग्रहून वदतोसी ॥ २१ ॥
बहु बोलाचें काय कारण । उचित काळ अनुलक्षुन ।
माझिया साह्यालागीं जाण । करावें रण रामासीं ॥ २२ ॥
बहुतां दिवसांचा क्षुधित । उठलासि निद्रिस्थ ।
श्रीरामवानरांचा घात । करीं निःपात निजभक्षें ॥ २३ ॥

कुंभकर्णाचे रावणाला प्रत्युत्तर :

कुंभकर्ण अति सज्ञान । कोपला देखोनि रावण ।
त्यासी द्यावया समाधान । काय आपण अनुवादे ॥ २४ ॥
श्रीरामेंसी नरवानरां । देखोनियां दशशिरा ।
मीच कांपतो थरथरां । मृत्यु खरा हा आम्हां ॥ २५ ॥
नारदाचे त्रिसत्य सत्य वचन । सुटल्या श्रीरामाचे बाण ।
रावण इंद्रजित कुंभकर्ण । कुळनिर्दळण राक्षसां ॥ २६ ॥
त्रिसत्य सत्य नारदवचन । तुज त्यासीं कोठें दर्शन ।
कैसें केलें संभाषण । पुसे रावण साक्षेपें ॥ २७ ॥
एका जनार्दना शरण । नारद‍इतिहासलक्षण ।
हें मुळींचे रामायण । सावधान अवधारा ॥ २८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणकुंभकर्ण संवादो नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥
ओव्या ॥ १२८ ॥ श्लोक ४४ ॥ एवं ॥ १७२ ॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:transliteral 

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय 21 समाप्त