संत एकनाथ अभंग

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८ – संत एकनाथ गाथा

श्रीनिवृत्तीनाथांची स्तुति 

३४८८.
विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥
ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥
तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥
‍३४८९.
केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥
कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥
ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला चित्तीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥
३४९०.
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥
शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥
समाधि त्र्यबंक शिखरीं । मागें शोभे ब्रह्मगिरी ॥३॥
निवृत्तिनाथाचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३४९१.
समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥
दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥
समाधि पाहतांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥
एका जनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥
३४९२.
निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥
निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥
निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥
निवृत्ति नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥
३४९३.
धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥
कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥
प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥
गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥
ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥
३४९४.
निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥
पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥
पुनरपि जन्माची । वार्ता नाहीं नाहीं साची ॥३॥
अनुभव धरावे वेगीं चित्तीं । एका जनार्दनीं करी विनंती ॥४॥
३४९५.
नाम जपतां निवृत्ति । न येचि पुनरावृत्ति ॥१॥
ऐसा अनुभव जीवा । चराचरीं सर्व देवां ॥२॥
एका जनार्दनीं शरण । निवृत्ति म्हणतां पावन ॥३॥
३४९६.
धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥
अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचें ॥२॥
नामें पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥
एका जनार्दनीं वाचे । नाम श्रीनिवृत्तीचें ॥४॥
३४९७.
आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥
जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥
मन इंद्रियांसहित । पायीं जडियेलें चित्त ॥३॥
समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पाहतां डोळां ॥४॥
एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामें जालों पावन ॥५॥
३४९८.
नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहतां डोळां ॥१॥
संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां ॥२॥
शास्त्र निवृत्ति पुराणें निवृत्ति । अंतर्बाह्य कीर्ति निवृत्तिचीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहतांचि निवृत्ति । होय सर्व शांति निवृत्तिनामें ॥४॥
३४९९.
कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥
धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥
व्यर्थ खटपट न करी पसार । निवृत्ति नामें साचार जप करीं ॥३॥
गुज गुह्य तुज सांगतों मना । निवृत्तिनाम जाणा ह्रदयीं धरीं ॥४॥
एका जनार्दनीं निवृत्ति नाम वाचे । संसाराचे साचें सार्थक जालें ॥५॥
३५००.
अहं सोहं कोहं सांडोनियां देई । निवृत्तीचे पायीं बुडी देखा ॥१॥
अकार उकार मकार निर्धार । सर्व चराचर निवृत्तिरुप ॥२॥
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । तें निवृत्तिनाम जाण सत्य होय ॥३॥
शुध्द बुध्द नाम निवृत्तीचे वाचे । एका जनार्दनीं साचें स्मरे मनीं ॥४॥
३५०१.
उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥
तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥
यातना तें कांही न पडे व्यसन । नाम उच्चारण निवृत्तीचें ॥३॥
निवृत्तिनामाचा लागलिया छंद । तुटे भवकंद नामें तोचि ॥४॥
एका जनार्दनीं निवृत्तिनाम धणी । गाईन मी वाणी सदोदित ॥५॥
३५०२.
साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥
तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥
एका जनार्दनीं निवृत्ति नाम सार । करीं रे उच्चार वेळोवेळां ॥३॥
३५०३.
प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥
तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥
योगयागादिक न लगे तीं साधनें । निवृत्तिनामें पेणें वैकुंठींचें ॥३॥
एका जनार्दनीं न करीं साधन । निवृत्ति म्हणतां जाण सर्व जोडे ॥४॥
३५०४.
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥
जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥
सुखरुप तूं होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥
एका जनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥
३५०५.
सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥
जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥
तीर्थ व्रत चाड न धरीं अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥
तीर्थाचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥
३५०६.
त्र्यंबक शिखरीं जीवन्मुक्त तुम्ही । नाथाचे ते धामीं गुप्तरुप ॥१॥
सर्वकाळ विठ्ठल विठ्ठल पैं वाचें । सार्थक देहाचें येणें करुनी ॥२॥
अखंड नामोच्चार समाधी सोहळा । आणिक न ये डोळां आड कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणावा आपुला । आसनीं शयनीं त्याला विसरुं नका ॥४॥


श्रीज्ञानदेवांची स्तुती 

३५०७.
विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥
तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥
सिध्देश्वर स्थान दरुशनें मुक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ॥३॥
चौर्‍यांयशी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥
तयासी नित्यतां घडतां प्रदक्षणा । नाहीम पार पुण्या वास स्वर्गीं ॥५॥
अमृतमय वाहे पुढें इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥
ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेवा । एका जनार्दनीं ठाव अलंकापूर ॥७॥
३५०८.
नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥
नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्‍हातटीं ॥२॥
समाधि वैभव पाहतां नयनीं । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥
एका जनार्दनीं म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥
३५०९.
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥
जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥
ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥
एका जनार्दनीं भावें । ज्ञानदेवा आठवावें ॥५॥
३५१०.
तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥
ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥
माझे चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥
आठवी तुमचे गुण । जाहलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥
वारंवार क्षणाक्षणा । माथा चरणां तुमचिया ॥५॥
भाकितों करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥
३५११.
मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥
दरुशनें नासे व्याधी पीडा । ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥
एका जनार्दनीं मापारी । नाचतसे अलंकापुरीं ॥४॥
३५१२.
जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात ॥१॥
एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥
आवडीं सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥
ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥
३५१३.
जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥
यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥
ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । लोळे ज्ञानदेवा चरणीं ॥४॥
३५१४.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
३५१५.
धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥
निवारला भाग शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥
भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहतां ॥४॥
समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥
३५१६.
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥
ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥
चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥
रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥
गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥
३५१७.
ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतां ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनीं वदे तो ॥
ध्रु० ॥ नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहतां उदक नव्हे भिन्न ।
नवल हेचि पशु ह्मौसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्वावें जपतां होय विज्ञान ॥२॥
देवाधीश देव भक्ताप्रती वर दे । देतां वर ब्रह्मांडा ब्रह्मा आनंद कोंदे ।
देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥
वक्ता श्रोता श्रवणेंपठणें पावती समभाव । वर्णूं जातां अघटित महिमा होतो जीवशिव ।
वंदुनी अनन्य एका जनार्दनीं धरी दृढभाव । वर्षती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ॥४॥
३५१८.
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
३५१९.
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥
शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥
ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३५२०.
तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥
आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणें ॥२॥
वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥
एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥
३५२१.
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥
सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ॥२॥
कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ॥३॥
ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥
३५२२.
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥
तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥
तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥
श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥
३५२३.
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥
इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥
सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥
पूर्व पश्चिम देवस्थान । मध्यें ज्ञानाबाई आपण ॥४॥
ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनीं शरण जाऊं ॥५॥
३५२४.
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥
ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥
एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
३५२५.
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥
तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥
निवृत्तिने गुज सांगितलें ज्ञानदेवा । होतां जो ठेवा गुह्य कांहीं ॥३॥
ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनीं नीट मार्ग सोपा ॥४॥
३५२६.
पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥
धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥
केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनियां ॥३॥
नेणती जाणती पडलीं जीं भुलीं । तयां शुध्दि केली त्रिअक्षरीं ॥४॥
एका जनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥
३५२७.
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥
श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥
सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥
मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
३५२८.
आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥
वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥
ऐसें हे कौतुक । आश्चर्य मानती लोक । एका जनार्दनाचा रंक । चरणारविंदींचा ॥३॥
३५२९.
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥
पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥
३५३०.
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥
केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥
३५३१.
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥
एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥
३५३२.
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्‍हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥
एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥
३५३३.
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥
तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥


श्रीसोपानदेवांची स्तुति 

३५३४.
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कर्‍हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपान देव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिध्द ती झाली सोपानदेवा ॥३॥
तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥
३५३५.
देव आणि भक्त करिती जयजयकार । नाम घोष अंबर गर्जतसे ॥१॥
आनंदे वैष्णव हरिकथा करिती । गाती नाचताती प्रेमछंदे ॥२॥
नारद तुंबर भक्त पुंडलिक । वैष्णव आणिक नाम गाती ॥३॥
सोपान आनंदे समाधि बैसला । एका जनार्दनीं केला जयजयकार ॥४॥
३५३६.
आनंद समाधि संत भक्त देव । करिती उत्साह संवत्सरीं ॥१॥
गरुड हनुमंत भक्त ते मिळाले । जयजयकार केलें सुरवरीं ॥२॥
पुष्पांचा वर्षाव विमानांची दाटी । सोपानदेवा भेटी येती देव ॥३॥
तो सुखसोहळा वर्णावया पार । नोहेचि निर्धार माझी मती ॥४॥
एका जनार्दनीं सोपानाचरणीं । मस्तक ठेवूनि निवांत राहीन ॥५॥
३५३७.
मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥
सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥
वारी पां सांकडें प्रपंच काबाड । घालूनियां आड नामशास्त्र ॥३॥
जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावें ॥४॥
३५३८.
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥
माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥
ब्रह्मा अवतार नाम हें सोपान । केलेंसे पावन चराचर ॥३॥
एका जनार्दनीं सोपानाच्या पायीं । ठेवितसे डोई काया वाचा ॥४॥
३५३९.
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥
आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥
वेदशास्त्रें भांडती ज्यालागीं कोडें । ते असे उघडे संवत्सर ग्रामीं ॥३॥
प्रत्यक्ष विष्णुमूर्ति श्रीविठ्ठल देव । समाधीचा गौरव करीतसे ॥४॥
करुनी सोहळा समाधीं बैसविला । एका जनार्दनीं राहिला पुढें मागे ॥५॥


श्रीमुक्ताईची स्तुति 

३५४०.
जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥
आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥
बाळलीला केली जगीं ख्याती मिरविली । चांगयाची हरली चौसष्ट कळा ॥३॥
कळा पासष्टावी ज्ञानदेवें दाविली । चांगयाची विराली अहं ममता ॥४॥
चांगदेव शरण कायावाचामनें । एका जनार्दनीं म्हणे तैशापरी ॥५॥
३५४१.
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
३५४२.
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥
जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥
लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥
३५४३.
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥१॥
महाकल्पवरी चिरंजीव शरीर । कीर्ति चराचर त्रिभुवनीं ॥२॥
आनंदे समाधि सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्नत ॥३॥
एका जनार्दनीं तुमचें नाम गोड । त्रैलोकीं उघड नामकीर्ती ॥४॥
३५४४.
अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें । तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती । ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पैं सार । येथें संशय नाहीं ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाहीं ॥५॥
३५४५.
तीन अक्षरें निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ती । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरें ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदीं ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान हीं तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसीं हीं चौदा अक्षरें । जो ऐके कर्णविवरें । कीं उच्चारीं मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन: नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥


गीतामाहात्म्य 

३५४६.
गीतेचें महिमान ऐकावें श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावें आतां ॥१॥
जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वतां ब्रह्मरुप ॥२॥
गीता म्हणतां ऐसें दोन्हीच अक्षरें । पाप तें निर्धारें दिशा लंघी ॥३॥
भगवदगीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशी मूर्तिमंत ॥४॥
गीता म्हणतां त्यासी काय पुण्य आहे । इतिहास पाहे पुराणींचा ॥५॥
पार्वतीयेप्रती शिवें सांगितलें । अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥’
ब्रह्मरुप त्याचें स्वयें चित्त झालें । बोलणें खुंटले आहे नाहीं ॥७॥
नित्य म्हणतां गीता वाचेसी स्मरण । केलिया पठण पुण्य काय ॥८॥
दोषाचे पर्वत भस्म होती तेणें । गीतेचे पठण केलियानें ॥९॥
श्रवण पठण गीतेचे पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥
पद्मपुराणीचें सांगितलें सार । गीता आहे थोर ब्रह्मविद्या ॥११॥
सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥
गीता अभ्यासितां कळे सारासार । महिमा आहे थोर पठणाचा ॥१३॥
गीता म्हणतां आहे पापा प्रायश्चिता । मुक्ति सायुज्यता वरी त्यासी ॥१४॥
गीता म्हणतां जाण भागीरथीं स्नान । पृथ्वीचि दान दिधली तेणें ॥१५॥
गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथें ॥१६॥
तीर्थक्षेत्रयात्रा देवाचें पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥
धरणी पारणी नित्य उपोषण । पृथ्वीचें भ्रमण निराहारी ॥१८॥
जप तप व्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥
पुराण श्रवण वेदशास्त्रीं जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥
ब्रह्मविद्या गीता सर्वांचें साधन । करी जो पठण नित्य काळीं ॥२१॥
एका जनार्दनीं नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तेणें ॥२२॥
३५४७.
वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥
ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥
ऐशी भगवदगीता कृष्णार्जुन संवादतां । तेंचि फ़ळ लाभे वाचितां ऐक्यभावें ॥३॥
गीतीचें महा नेमें करा श्रवण पठण । ऐसें एका जनार्दन सांगतसे ॥४॥
३५४८.
गीतेचें आवर्तन त्यांचे ऐका पुण्य । सावध अंत:करण करुनियां ॥१॥
गीतेच्या सुकृता मौनावला विधाता । हरिहरां तत्वतां बोध जाला ॥२॥
वैकुंठापासूनि जाण तेणें बांधलें सदन । त्रिलोकीचें तीर्थाटन घडलें त्यासी ॥३॥
वाराणशी यात्रा तेणें केल्या अपारा । लक्षलक्षांतरा द्विजभोजनें ॥४॥
आणिक मेरुसमान वांटिलें सुवर्ण । कोट्यान कोटी पूजन साधूचें केलें ॥५॥
एका जनार्दनीं जाण इतुकें घडे महा पुण्य । हे सत्य सत्य वचन गीता आवर्तनीं ॥६॥
३५४९.
गीतेंचें सुव्रत । ज्यासी जालें प्राप्त । त्याचे पितर मुक्त । सहजचि जाले ॥१॥
नष्ट चांडाळ दुर्जन । परदारी तस्कर मात्रागमन । त्यासी गीता आवर्तन । श्रवणें मोक्ष होय ॥२॥
सुवर्णस्तेय सुरापान । भूत पिशाच्च राक्षसगण । मित्रद्रोही कृतघ्न । गीता आवर्तनें मोक्ष त्यासी ॥३॥
एका जनार्दनीं गीतार्थी । पठणें श्रवणें सर्वांसी मुक्ती । ऐसें पार्वतीप्रती । शंभु सांगे ॥४॥
३५५०.
गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥
नित्य वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥
एका जनार्दनीं जयाचा हा नेम । तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥


श्रीनामदेवचरित्र 

३५५१.
पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥
तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥
घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥
भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं शरणागत ॥४॥
३५५२.
पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥
परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केलें कौतुक ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे मनोरथ । स्वयें रमानाथ पुरवितसे ॥३॥
३५५३.
तिसरे अवतारीं नामा उध्दव जन्मला । करुनी कृष्ण दास्यत्व मान्य पैं जाहला ॥१॥
ज्ञान वैराग्य भक्ति कृष्ण सांगे तयासी । तेणें चुकविलें शापबंधासी ॥२॥
भागवत मथितार्थ स्वयें सांगे आपण । कृष्णावेगळा न जाय अर्धक्षण ॥३॥
यापरी दास्यत्व तेथें निकट केलें । एका जनार्दनीं म्हणे वंदूं त्यांचीं पाउलें ॥४॥
३५५४.
द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥
दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥
तोचि नामदेव जन्म शिंपियाचे कुळीं । भक्तातें पाहुनी वेधला वनमाळी ॥३॥
एका जनार्दनीं परंपरा कथियेली । धन्य धन्य विठु अनाथाची माउली ॥४॥
३५५५.
पंच वरुषी नामा जाहला । छंद विठूचा लागला ॥१॥
जाऊनियां राउळांत । तेथें सावकाश बैसत ॥२॥
विठ्ठल हरि वाचे छंद । विठ्ठलें लाविलासे वेध ॥३॥
एका जनार्दनीं सार । मंत्र जपे त्रिअक्षर ॥४॥
३५५६.
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥
जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥
नाहीं प्रपंचाचा घोर । पुढें कैसा रे विचार ॥३॥
नको धरुं छंद मनीं । विनवी एका जनार्दनीं ॥४॥
३५५७.
विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥
संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥
वडिलाची गोष्टी । नामा सांगे जगजेठी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलें मन । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥
३५५८.
नावडे़चि आन । एका विठ्ठलावांचून ॥१॥
नावडे संसार सर्वथा । आवड बैसली पंढरीनाथा ॥२॥
नायके शिकविलें कोणाचें । विठ्ठल विठ्ठल साचें ॥३॥
एका जनार्दनीं मन । विठ्ठलीं लागलेसें ध्यान ॥४॥
३५५९.
दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥
न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥
एका जनार्दनीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥
३५६०.
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥
आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥
व्यापाराचा नाहीं धाक । सुखें बैसशी तूं देख ॥३॥
अन्नवस्त्र नाहीं घरीं । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥
३५६१.
कां रे नाम्या नायकशी । म्हणोनी ताडित तयासी ॥१॥
नको जाऊं राउळास । म्हणोनी कोंडिती तयास ॥२॥
अन्न उदकाविण पीडिती । परी तो विठू ध्याय चित्तीं ॥३॥
मनीं करीतसे खेद । एका जनार्दनीं गोविंद ॥४॥
३५६२.
नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥
अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥
आमुच्या पोरासी सवे । येणें लावियेली पाहें ॥३॥
करुं नेदी संसारकाम । एका जनार्दनीं हा निष्काम ॥४॥
३५६३.
येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥
प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥
घरीं कोंडोनियां ठेवितां नामयासी ।A आपण त्यापाशीं बैसतसे ॥३॥
जातो येतो कैसा न पडेचि दृष्टी । एका जनार्दनीं नाही विठु ऐसा ॥४॥
३५६४.
याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥
बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥
हरिश्चंद्र शिबी कोण यांची गती । आपण निवांत चित्तीं पाहतसे ॥३॥
एका जनार्दनीं याचा छंद नाहीं बरा । मैंद खरा वाळुवंटीं ॥४॥
३५६५.
घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥
भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥
ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनीं बोली काय बोलों ॥३॥
३५६६.
याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥
आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥
येणें आमुच्या पोरा लावियेला चाळा । आपण निराळा राहुतसे ॥३॥
एका जनार्दनीं ऐशियाची माव । न येतां नामदेव कींव भाकी ॥४॥
३५६७.
म्हणे नामयासी क्षण एक न पाहातां । होय माझ्या चित्ता कासाविशी ॥१॥
तुमचा पुत्र तुम्हांसी जैसा प्रिय । तैसा मज होय नामदेव ॥२॥
क्षणोक्षणीं येणें पुरविली पाठी । लाविली लंगोटी आम्हांलागीं ॥३॥
एका जनार्दनीं वारितां नायके । येऊनियां सुखें बैसतो घरीं ॥४॥
३५६८.
शिव्या देतां यासी हांसतसे सुखें । न मानी कांहीं दु:खें नाम्यासाठीं ॥१॥
ऐसें येणें मोहिलें आमुचिया बाळा । हा कोठोनि काळा आला येथें ॥२॥
एका जनार्दनीं पुरविली पाठी । काय याची गोठी सांगावी ते ॥३॥
३५६९.
आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥
आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥
आमुचें जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसें मनीं होतें साचें ॥३॥
एका जनार्दनीं कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥
३५७०.
आमुचिया पोरा । नाहीं बैसावया थारा ॥१॥
ऐसा याचा पायगुण । न मिळे खावयासी अन्न ॥२॥
हाटा बाजारासी जातां । जाऊं नेदी पैं सर्वथा ॥३॥
माझा नामा कोठें आहे । नामा नामा म्हणोनी वाहे ॥४॥
एका जनार्दनीं सवे । येणें लावियेली देवें ॥५॥
३५७१.
उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥
पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥
हा तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥
३५७२.
येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥
याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥
एका जनार्दनीं किती यासी बोलूं । नायके विठ्ठलु आमुचें तो ॥३॥
३५७३.
नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥
घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥
शिकविलें नायके व्यापारा न जाये । धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥
एका जनार्दनीं यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥
३५७४.
मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥
या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥
आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फ़ितविला काय करुं ॥३॥
या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥
एका जनार्दनीं कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥
३५७५.
कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥
नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥
येणें तो मनीं धरिला विठ्ठल । याजकडे नाहीं बोल प्रारब्धेंचि ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥
३५७६.
रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥
माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥
चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आतां गति नामयाची ॥३॥
येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनीं । एका जनार्दनीं काय करुं ॥४॥
३५७७.
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥
सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥
एका जनार्दनीं ऐसें ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥
३५७८.
येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥
उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥
व्यापार करावा तो कैसा मी नेणें । जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥
आलें जें भोगांसी ते करणें लागे । एका जनार्दनीं सांगे गुज देवा ॥४॥
३५७९.
ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥
तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥
लौकरी नामया यावें परतोनी । ऐसें चक्रपाणी बोलतसे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वतां घरीं आला ॥४॥
३५८०.
त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥
नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥
घेऊनि कापड जाईं बाजारासी । तेणें वडिलांसी समाधान ॥३॥
नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनीं आण वाहातसे ॥४॥
३५८१.
प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥
जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥
जेवूनियां जातों बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥
ऐसें बोलोनि नामा आला । एका जनार्दनीं जेवला ॥४॥
३५८२.
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥
व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥
माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करुं जातां ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥
३५८३.
जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥
देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥
धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरीं कापड दिलें ॥३॥
आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥
३५८४.
आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥
सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥
कापड विकिलें धोंडोबा गणोबासी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥
एका जनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥
३५८५.
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥
जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥
वंदूनि श्रीविठ्ठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥
एका जनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥
३५८६.
येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥
तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥
परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥
धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांहीं तुम्ही वहिलें बोलानाची ॥४॥
एका जनार्दनीं घेउनी धोंडोबासी । आपुले घरासी नामा आला ॥५॥
३५८७.
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥
दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥
देव म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । एका जनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥
३५८८.
धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥
उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥
गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥
एका जनार्दनीं ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥
३५८९.
ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥
ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥
बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणें ॥३॥
एका जनार्दनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥
३५९०.
येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥
चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥
तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥
एका जनार्दनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥
३५९१.
मालधनी घेउनी आलों असें घरा । तुम्ही कां दातार शिव्या देतां ॥१॥
द्रव्याचा मालक आणूनियां घरीं । ठेविला निर्धारीं काय भय ॥२॥
चलावें घरासी घ्यावी द्रव्यरासी । न देतां गणोबासी घेउन येतों ॥३॥
एका जनार्दनीं दामा पुढें आला । नामा विठोबाला कींव भाकी ॥४॥
३५९२.
जन्मांचा पोसणा तुझा मी पामर । काय आतां विचार केशिराजा ॥१॥
घरासी पैं जातां ताडतील मज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
म्हणे नाम्या न करीं काहीं चिंता । एका जनार्दनीं सर्वथा नुपेक्षी देव ॥३॥
३५९३.
नाम्या झडकरी जाई तूं घरासी । चिंता ती मानसीं करुं नको ॥१॥
तुझा छंद आहे माझिये मानसीं । तूं वेगीं घरासी जाय आतां ॥२॥
एका जनार्दनीं वंदुनी चरण । नामा आला जाण घरालागीं ॥३॥
३५९४.
दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी । आणिला तो मजलागुनी दावी आतां ॥१॥
वंदुनी चरण म्हणे चला आंत । जगीं हें प्रख्यात करुं नका ॥२॥
एका जनार्दनीं बोलोनियां मात । धरियेला हात वडिलांचा ॥३॥
३५९५.
जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य ॥१॥
तुमचें तें द्रव्य मोजूनियां घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥२॥
एका जनार्दनीं पाहूनियां दामा । आलिंगिला नामा सद्रदित ॥३॥
३५९६.
नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥
आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचा महिमा । वाढविणें पुरुषोत्तमा आपुलें काजा ॥३॥
३५९७.
आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं ॥१॥
ऐसा कृपाळू उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥
एका जनार्दनीं शरण । भक्ताचे मनोरथ पुरती जाण ॥३॥
३५९८.
नाम्याचें कारण देवें नवल केले । धोंडोबाचे जाहलें सुवर्ण तें ॥१॥
गोणाई दामशेटीतें आनंद पैं जाहला । म्हणती भला भला नामा आमुचा ॥२॥
न कळे लाघव देवाचें सर्वथा । म्हणती नामा आमुचा कर्ता जाहला आतां ॥३॥
एका जनार्दनीं द्रव्याचिया आशा । विसरले सर्वेशा पांडुरंगा ॥४॥
३५९९.
घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥
पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥
जन्माचा पोसणा दास तुझा दीन । तें त्वां वचन सत्य केलें ॥३॥
एका जनार्दनीं दासाचें धांवणें । देवाविण कोण करील तें ॥४॥
३६००.
मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥
माझियाकारणें पुरविलें धन । केलें माझें संरक्षण मायबाप ॥२॥
म्हणोनियां डोई ठेवियेली पायीं । प्रेमभरित पाहीं नामा जाहला ॥३॥
एका जनार्दनीं देवाचा एकुलता । नामयापरता कोणी नाहीं ॥४॥
३६०१.
नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥
हिंडतां भागलें मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥
पांडुरंग तेथें होउनी मजूर । शाकारिलें घर नामयाचें ॥३॥
एका जनार्दनीं उणें नेदी भक्ता । आपण तत्वतां अंगे राबें ॥४॥
३६०२.
शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥
दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथें ॥२॥
बिर्‍हाड तुर्ती माझें राउळाभीतरीं । विठूजी निर्धारी नाम माझें ॥३॥
तूमच्या नामयाची ममता मज असे फ़ार । एका जनार्दनीं निर्धारें ऋणी त्याचा ॥४॥
३६०३.
तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥
संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥
नामयाचें सांकडें वारीन मी वेगें । तुम्ही कांहीं अंगे शिणूं नका ॥३॥
एका जनार्दनीं वैकुंठींचा राणा । सांगतसे खुणा अंतरीच्या ॥४॥
३६०४.
नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी ॥१॥
नाहीं आपुले जवळी धन । कैसें होईल याचें लग्न ॥२॥
रात्रंदिवस गोणाईसी । निद्रा न ये पैं नेत्रांसी ॥३॥
माझ्या नामयाचें लग्न । एका जनार्दनीं करील कोण ॥४॥
३६०५.
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावें तें ॥१॥
जाऊनियां स्वयें देवें माव केली । सोयरीक आणिली नामयासी ॥२॥
लग्नाचें कारण मेळविलें देखा । एका जनार्दनीं ऐका नवल चोज ॥३॥
३६०६.
दामशेटीचा कारकुन । स्वयें झाला नारायण ॥१॥
लग्नतिथी धरली निकी । नोहे कोणा पैं ओळखी ॥२॥
विठ्ठलशेटी ऐसें नाम । एका जनार्दनीं प्रेम ॥३॥
३६०७.
कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥
सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥
एका जनार्दनीं करुनि पाणिग्रहण । निघाला तेथोनियां ॥३॥
३६०८.
प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥
विठ्ठलशेटी नाहीं परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥
एका जनार्दनीं राजाईचा भाव । कांहो देवाधिदेवो ठकविलें ॥३॥
३६०९.
न देतां दरुशन गेला चक्रपाणी । राजाई तों मनीं दु:ख करी ॥१॥
न कळे कवणासी अघटित करणी । करुनी चक्रपाणी कां हो गेला ॥२॥
एका जनार्दनीं राजाईचा हेत । नित्य आठवीत पांडुरंग ॥३॥
३६१०.
लग्नाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेगीं आला पंढरीसी ॥१॥
देऊनियां सर्व पाहती संपदा । येथें तो आपदा न मिळे आन ॥२॥
एका जनार्दनीं माता आणि पिता । राजाईचा तत्वतां शीण करिती ॥३॥
३६११.
उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥
मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥
एका जनार्दनीं राजाईची वाणी । ऐकतांच मनीं संतोषले ॥३॥
३६१२.
ऐसे कांही दिन लोटलेसे जाण । परिसा कारण देवाचें तें ॥१॥
नाम्यासी चौघे पुत्र पैं जाहले । नाम तें ठेविलें विठ्ठलरायें ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचा सोहळा । दावितसे डोळां उघड ऐका ॥३॥
३६१३.
नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले । आनंदे लागले हरिभजनीं ॥१॥
नित्यकाळ वाचे विठ्ठलाचा छंद । आठविती गोविंद वेळोवेळां ॥२॥
एका जनार्दनीं कायावाचामन । वेधलेंसे जाण विठ्ठलचरणीं ॥३॥
३६१४.
नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥
म्हणोनियां प्रिय देवासी पैं जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥
एका जनार्दनीं एकविधा भक्ति । तेथें राबे मुक्ति निशिदिनीं ॥३॥
३६१५.
एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं ॥१॥
संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाहीं मनीं ॥२॥
म्हणोनियां देव धांवे मागें मागें । सुख त्याचे संगें देवा होय ॥३॥
एका जनार्दनीं भक्त सुखासाठीं । हिंडे पाठोपाठीं देवराव ॥४॥
३६१६.
नामयाची जनी दासी पैं म्हणती । भावें तो श्रीपती वश केला ॥१॥
दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥
एका जनार्दनीं नामयाची दासी । प्रिय ते देवासी जाहली असे ॥३॥
३६१७.
नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥
नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥
आउबाई लेकी नाउबाई बहिणी । तिहीं चक्रपाणी वेधियेला ॥३॥
लाडी आणि येसी बहिना साकराई । एका जनार्दनीं पाही वंशावळी ॥४॥
३६१८.
नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें ॥१॥
उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥
तुम्हांसी तों देवें द्रव्य दिलें फ़ार । वस्त्र अलंकार शोभताती ॥३॥
एका जनार्दनीं बोलोनियां गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥
३६१९.
येऊनियां मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरीं ॥१॥
आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करुं त्याची ॥२॥
एका जनार्दनीं करुनि विचार । परीस तो साचार घेऊनि आली ॥३॥
३६२०.
येऊनियां घरा बोले राजाईस । या परिसें सुवर्णासी करीं आतां ॥१॥
आजाचिये दिन ठेवीं आपुले घरीं । आपदा ती हरी प्रपंचाची ॥२॥
सरलिया काम देईं मजलागीं । म्हणोनियां वेगें गृहां आली ॥३॥
एका जनार्दनीं झाली ऐसी मात । नामयासी श्रुत केली नाहीं ॥४॥
३६२१.
येऊनियां घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥
राजाई तो पुढें येऊनियां बोले । देवें नवल केलें आपुले घरी ॥२॥
जातां चंद्रभागें परीस सांपडला । आपुला तो गेला दैन्यकाळ ॥३॥
एका जनार्दनीं ऐकोनियां मात । क्रोधें पैं संतप्त मनीं नामा ॥४॥
३६२२.
राजाईस तेव्हां म्हणतसे नामा । दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं ॥१॥
आम्ही हरिदास कुबेर भांडारी । संपदा ती थोरी घरीं वसे ॥२॥
कृपावंतें मज नाहीं उपेक्षिलें । आम्ही का वहिले दैन्यवाणें ॥३॥
एका जनार्दनीं बोलोनियां मात । गेला राउळांत तेव्हां नामा ॥४॥
३६२३.
जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥
राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥
जाऊनि चंद्रभागे टाकूनियां दिला । नामदेव आला राउळासी ॥३॥
एका जनार्दनीं मस्तक चरणीं । ठेवूनि विनवणी करी नामा ॥४॥
३६२४.
आमुचिये घरीं । परीस पाहिला श्रीहरी ॥१॥
आवडीनें नामा सांगे । पांडुरंग हांसूं लागे ॥२॥
आमुचा दैन्यकाळ । गेला म्हणती सकळ ॥३॥
एका जनार्दनीं मात । नामा देवासी सांगत ॥४॥
३६२५.
देव म्हणे नाम्या परीस कोठें आहे । पाहूं लवलाहे दावी मज ॥१॥
हांसूनियां नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥
ऐसें प्रेमभरीत बोलताती दोघे । तों राजाई ती मागें त्वरें आली ॥३॥
घालूनि दंडवत देवासी आदरें । नामयासी उत्तरें बोलतसे ॥४॥
एका जनार्दनीं मागावया परीस । परिसा घरास त्वरित आला ॥५॥
३६२६.
येऊनियां परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देईं बाई ॥१॥
राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावें राउळासी ॥२॥
तुम्ही बसा घरीं मी जातें राउळीं । म्हणोनियां वेगीं आली राउळासी ॥३॥
घालूनियां नामा दंडवत देवा । सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥
एका जनार्दनीं नामदेव बोले । परिसा टाकियेलें चंद्रभागें ॥५॥
३६२७.
राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥
परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारीं ॥२॥
ऐकतांचि ऐसी मात । आलें भीमेसी धांवत ॥३॥
पुंडलीकासी नमस्कार । केला जयजयकार नामघोष ॥४॥
एका जनार्दनीं स्नान । नामा करितसे जाण ॥५॥
३६२८.
करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं ॥१॥
घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥
ऐकतांचि ऐसें नामयाचें बोलणें । परी कर जोडून विनवितसे ॥३॥
ऐसा आनंदसोहळा होतसे संपूर्ण । आनंद निमग्न सर्व जाहले ॥४॥
एका जनार्दनीं आनंद पैं जाहला । आनंदानें गेला परिसा घरीं ॥५॥
३६२९.
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥
प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥
कवित्व केलें शतकोटी । तारिले जीव कल्पकोटी ॥३॥
देव जेवीं सवें । ऐशी ज्याची देवासवें ॥४॥
धन्य धन्य नामदेवा । एका जनार्दनीं चरणीं ठेवा ॥५॥
३६३०.
जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥
चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥
लाडका तो नामा समाधी महाद्वारीं । समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥
पाळोनियां लळा समाधी ठेविला । एका जनार्दनीं झाला आनंदमय ॥४॥
३६३१.
लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणां दंडवत ॥१॥
भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फ़ार विठोबाचा ॥२॥
कवित्व करुनी तारिलें सकळ । निरभिमानी निर्मळ सदोदित ॥३॥
नामावांचुनी कांहीं नेणें तो नामा । तयाचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥
ऐसिया संतांसीं नमन माझें भावें । एका जनार्दनीं जावें वोवाळुनी ॥५॥
३६३२.
पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद । तोचि उध्दव प्रसिध्द कृष्णावतारीं ॥१॥
कलीमाजीं जाणा नामदेव म्हणती । लडिवाळ श्रीपति लळा पाळी ॥२॥
तीर्थयात्रा सर्व केलासे उध्दार । सर्व त्याचा भार चालविला ॥३॥
लडिवाळ नामा विठ्ठलचरणीं । एका जनार्दनीं नमन त्यातें ॥४॥


गोराकुंभारचरित्र 

३६३३.
सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥
नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥
उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥
एका जनार्दनीं ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदानें ॥४॥
३६३४.
प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥
मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥
एके दिनीं कांता ठेवुनी जवळी बाळ । उदकालागीं उताविळ जाती जाहली ॥३॥
एका जनार्दनीं मूल तें रांगत । आलें असे त्वरित मृत्तिकेजवळीं ॥४॥
३६३५.
लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥
नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥
अज्ञान तें बाळ धरित तें पायां । चित्त देवराया समरसलें ॥३॥
एका जनार्दनीं नाचतां समरसें । बाळ पायांसरसें चिखलीं आलें ॥४॥
३६३६.
नेणवेची बाळ कीं हे मृत्तिका । मन गुंतलेंसे देखा पांडुरंगीं ॥१॥
मृत्तिकेसम जाहला असे गोळा । बाळ मिसळला मृत्तिकेंत ॥२॥
रक्त मांस तेणें जाहला गोळा लाल । नेणवे तात्काळ गोरोबासी ॥३॥
एका जनार्दनीं उदक आणुनी कांता । पाहे तंव तत्वतां बाळ न दिसे ॥४॥
३६३७.
येवोनियां जवळीं बोभाट तो केला । धरुनी हाताला पुसती जाहली ॥१॥
ठेवूनियां बाळ जीवनालागीं गेलें । तुम्हीं काय केलें बाळ माझें ॥२॥
परि तो समाधिस्थ नायकेचि बोल । वाचे गाय विठ्ठल प्रेमभरित ॥३॥
नाचे आनंदानें गाय नामावळी । एका जनार्दनीं बोली कोण मानी ॥४॥
३६३८.
अट्टाहास शब्द करुनि कांता रडे । आहा मज येवढें बाळ होतें ॥१॥
जळो तें भजन आपुलेनि हातें । बाळ मृत्तिकेंत तुडविलें ॥२॥
ऐकोनियां शब्द जाहला पैं सावध । एका जनार्दनीं क्रोध आला मनीं ॥३॥
३६३९.
अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं ॥१॥
नेणवेची बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें दु:ख मनीं ॥२॥
घेऊनियां काष्ठ तांतडी धांवला । कां गे त्वा भंगिला नेम माझा ॥३॥
एका जनार्दनीं मारुं जाता घाय । तेव्हां कांता बोले काय गोरोबासी ॥४॥
३६४०.
स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे ॥१॥
जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥
ह्रदयी ध्यातसे रखुमाईचा पती । निवारिली भ्रांती संसाराची ॥३॥
एका जनार्दनीं चालविला नेम । परि पुरुषोत्तम नवलपरी ॥४॥
३६४१.
संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥
एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥
माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें चालत आलें । परि स्त्रियेनें केलें नवल देखा ॥४॥
३६४२.
आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥
पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥
महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥
धाकुटी ती मूल आपण पैं द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥
एका जनार्दनीं करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥
३६४३.
विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥
तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥
एक एकपणें न धरावें भिन्न । पाळावें वचन वडिलांचें ॥३॥
एका जनार्दनीं सांगूनियां मात । घातली शपथ विठोबाची ॥४॥
३६४४.
गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥
लिगाड तें आपोआप मावळलें । विषयांचे जाहलें तोंड काळें ॥२॥
विठ्ठलें करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचें ॥३॥
एका जनार्दनीं खुंटला वेव्हार । नाहीं आन विचार प्रपंचाचा ॥४॥
३६४५.
उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं ॥१॥
विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिलें पाळा तुम्ही ॥२॥
सांगूनियां बध्द आपुल्या ग्रामा गेला । पुढें काय विचार जाहला परियेसा ॥३॥
एका जनार्दनीं सुखरुप तिघें । कामधाम वेगें करिताती ॥४॥
३६४६.
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें ॥१॥
स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥
दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥
सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनीं त्याला शिक्षा करुं ॥४॥
३६४७.
चोरासी खंडन करावें हाचि धर्म । आणीक नाहीं वर्म दुजें कांहीं ॥१॥
माझ्या विठोबाची आज्ञा पैं मोडिली । शपथ पाळिलीं नाहीं दुष्टे ॥२॥
घेऊनियां शस्त्र केलें पैं ताडन । खंडिले कर जाण उभयतां ॥३॥
एका जनार्दनीं करितां सुपरीत । तों घडलें विपरीत स्त्रियेसीं हें ॥४॥
३६४८.
कामाचिया आशें घडला प्रकार । राहिला वेव्हार प्रपंचाचा ॥१॥
भाजन घडणें राहिलें सर्वथा । पडियेली चिंता अन्नवस्त्रा ॥२॥
उदरानिमित्त कष्ट बहु करिती । निर्भय तो चित्तीं असे गोरा ॥३॥
एका जनार्दनीं न सोडीच भजन । पाहूनि नारायण काय करी ॥४॥
३६४९.
रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥
माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज त्याचें ॥२॥
माझिया भक्ताची मज राखणें लाज । म्हणोनियां गुज तुज सांगितलें ॥३॥
एका जनार्दनीं उभयतां निघाले । सांगाते घेतलें गरुडासी ॥४॥
३६५०.
वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥
येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥
आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥
एका जनार्दनीं गोरियाचिया वाडां । आलासे उघडा देवराव ॥४॥
३६५१.
पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥
पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥
सांगतो कांता आहे बरोबरी । परिवार तरी एवढाचि ॥३॥
ऐकोनियां मात गोरा संतोषला । रहावें कामाला माझे घरीं ॥४॥
विठु म्हणे हाचि हेतु धरुनी आलों । एका जनार्दनीं जाहलों निर्भय आतां ॥५॥
३६५२.
राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें ॥१॥
उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥
भाजनें तीं नानापरी करी । नाटकी मुरारी चाळक जो ॥३॥
ऐसे सुखरुप राहिलें निर्धारे । न कळे विचार गोरोबासी ॥४॥
एका जनार्दनीं पुढें काय जाहलें । सर्व दैन्य गेलें गोरोबाचें ॥५॥
३६५३.
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ । निघाला संतमेळ पंढरीसी ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई । आणिकही अनुभवी संत बहु ॥२॥
येतां त्याची मार्गे तेरेसी ते आले । तिहीं पुशियेलें गोरोबासी ॥३॥
गावांतील जन सांगती प्रकार । गोरियाचा विचार जाहला सर्व ॥४॥
परदेशी कुंभार पंढरीचा विठा । राहिलासे वांटा करुनियां ॥५॥
ज्ञानदेव खूण आणितलीं मनीं । एका जनार्दनीं पाहूं त्यातें ॥६॥
३६५४.
इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर । चला पैं सत्वर पंढरीये ॥१॥
गरुडासहित वेगें पैं निघाले । पूर्ववत आले पंढरीये ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । ऐसे करुनी हरी उभा विटे ॥३॥
३६५५.
गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व ॥१॥
देउनी आसन बैसविलें संतां । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥
कर ते तुटले प्रपंच चाले कवणे परी । येरु म्हणे वांटेकरी पंढरीचा ॥३॥
ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा । तंव ते लगबगा धांवे कांता ॥४॥
स्त्रियेसहित नाहीं तेथें कुंभकार विठा । एका जनार्दनीं वांटा गेला कवणें ॥५॥
३६५६.
येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥
मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥
ऐकतांचि ऐसी ज्ञानदेवें गोठी । गोरियासी कंठी धरियेलें ॥३॥
परदेशी नोहे पंढरीपणा । केलेंसे कारणा कार्य तुझें ॥४॥
आमुतें न भेटे जाहला असे गुप्त । एका जनार्दनीं मात प्रगटली ॥५॥
३६५७.
ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप ॥१॥
उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥
सकळ ते संत गोरियासी म्हणती । धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यांत ॥३॥
एका जनार्दनीं पाक सिध्द जाहला । बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥
३६५८.
सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥
प्रात:काळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥
संतसमुदाय सवें पैं असती । पावलें त्वरित भीमातीरीं ॥३॥
एका जनार्दनीं करुनियां स्नान । घेतिलें दरुशन पुंडलिकाचें ॥४॥
३६५९.
संत ती मंडळी महाद्वारां आली । मूर्ति देखियेली विटेवरी ॥१॥
चरणावरी माथां ठेविती भक्तजन । आनंदले लोचन पाहुनी भक्त ॥२॥
महाद्वारी नामा कीर्तनीं उभा ठेला । मिळालासे मेळा सकळ संत ॥३॥
सद्रदित कंठ कीर्तन करतां । एका जनार्दनीं सर्वथा भक्त होती ॥४॥
३६६०.
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥
टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥
गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाहीं आपुल्याला टाळी वाहतां ॥३॥
वाटलेंसे दु:ख नयनीं नीर आलें । एका जनार्दनीं बोले नाम मुखीं ॥४॥
३६६१.
मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥
भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥
टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हां ॥३॥
एका जनार्दनीं पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥
३६६२.
गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥
रुक्मादेवी म्हणे न करा काहीं चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥
ऐसें भक्तचरित्र ऐकतां कान । होतसे नाशन महापापा ॥३॥
एका जनार्दनीं पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥
३६६३.
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥
प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥
नाम निरंतर वदतसे वाचे । प्रेम मी तयाचें काय वानूं ॥३॥
एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । भाजनें तीं करीं घरीं त्याच्या ॥४॥


सावतामाळी चरित्र 

३६६४.
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें ॥१॥
नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥
कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥
एका जनार्दनीं परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥
३६६५.
देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी । काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१॥
ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास । निघे ह्रषीकेश पाहुनी नाम्या ॥२॥
क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट । पाठीं लागे स्पष्ट नामदेव ॥३॥
दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण । तीं तें ओळखून नामा येत ॥४॥
एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । अभिमान बोहरी करितसे ॥५॥
३६६६.
संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥
समाधिसुखें तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥
माथां ठेवुनी हात केला सावधान । वदे नारायण सांवत्यासी ॥३॥
येतां तुझे भेटी चोर मागें आला । लपवी मजला लवलाही ॥४॥
एका जनार्दनीं ऐकोनियां बोल । सांवत्याने सखोल दृष्टी केली ॥५॥
३६६७.
त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥
तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥
एका जनार्दनीं दावुनी लाघव । सांवत्याचें वैभव प्रगट करी ॥३॥
३६६८.
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥
लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥
भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचें सिंहासन घालूनियां ॥३॥
एका जनार्दनीं नामा तेथें आला । माग तो वहिला नाहीं कांही ॥४॥
३६६९.
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥
चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥
का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥
एका जनार्दनीं रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हां सांवत्यानें ॥४॥
३६७०.
येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिले स्फ़ुंदन सदगदित ॥१॥
सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहले तुजसी सांग मज ॥२॥
नामा म्हणे देव पळोनियां आले । येथें गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३॥
एका जनार्दनीं करितसे खेद । कां हो तो गोविंद दुरी गेला ॥४॥
३६७१.
बैसोनी निकटीं सांवत्याजवळीं । कां हो वनमाळी न दिसे मज ॥१॥
कां हें कर्म आड आजी आलेंसें बाड । न दिसे उघड विठु माझा ॥२॥
कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । कां हो जगजेठी अंतरला ॥३॥
मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनीं मना कठिण केलें ॥४॥
३६७२.
आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥
जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥
अभिमानें नाडले प्रपंचीं भागलें । ते या श्रीविठ्ठलें उध्दरिले ॥३॥
नामदेव तुज तंव नाहीं अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४॥
एका जनार्दनीं सदगद होउनी । मिठी घाली चरणीं सांवत्याच्या ॥५॥
३६७३.
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥
तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥
तुम्ही संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचें मज करवा ॥३॥
एका जनार्दनीं ऐशी भाकी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥४॥
३६७४.
निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्यानें वहिलें धरिलें पोटीं ॥१॥
सांवत्याचें अंतरीं झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२॥
धरुनियां दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहूनियां देव । मिठी घाली नामदेव चरणासी ॥४॥
३६७५.
घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥
कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥
नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३॥
एका जनार्दनीं सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेलें ॥४॥
३६७६.
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥
त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥
पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥
एका जनार्दनीं सांवता तो धन्य । तयाचें महिमान न कळे कांहीं ॥४॥


चोखामेळाचरित्र 

३६७७.
अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही । अमरनाथा तेही गोड नसे ॥१॥
नारदातें प्रश्न करी अमरनाथ । शुध्द हें अमृत कोठें होय ॥२॥
सांगे तये वेळीं ऐका हें भूतळीं । सांगेन नव्हाळी तुम्हांपाशीं ॥३॥
पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी पुडलिकाचे द्बारीं देव उभा ॥४॥
अनाथाचा नाथ विटेवरी उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥५॥
३६७८.
पंढरीची मात सांगे नारदमुनी । संतांचे कीर्तनीं नाचे देव ॥१॥
नामाच्या गजरें नाचताती संत । सुरवरांचा तेथें काय पाड ॥२॥
तिहीं लोकां पाहतां ऐसें नाहीं कोठें । कैवल्याची पेठ पंढरी देखा ॥३॥
ऐकोनी अमरनाथ संतोषला मनीं । एका जनार्दनीं नारद सांगे ॥४॥
३६७९.
तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥
तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमान पंढरीं उतरलें ॥२॥
अमृताचें ताट घेउनी आला इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारें ॥३॥
देव सुरवर आले पंढरीसी । नामा कीर्तनासी उभा असे ॥४॥
सुरवर देव बैसले समस्त । कीर्तनीं नाचत नामदेव ॥५॥
एका जनार्दनीं देव कीर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥६॥
३६८०.
ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता ॥१॥
एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जाग्रण निशीमाजीं ॥२॥
तीन प्रहर जाहले उपवास जाग्रण । चोखामेळा म्हणे स्त्रीसी तेव्हां ॥३॥
तुझिया घरासी येऊं पारण्यासी । सांगून मजसी गेला देव ॥४॥
एका जनार्दनीं चोखा करी करुणा । तेव्हां नारायणा जाणवलें ॥५॥
३६८१.
चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना देवराव ॥१॥
नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियले ॥२॥
जाउनी नारद सांगे चोखियासी । तुझिया घरासी येती देव ॥३॥
ऋध्दिसिध्दि आल्या चोखियाचे घरीं । जाहला ते सामोग्री भोजनाची ॥४॥
रुक्मिणीसहित आला पंढरीनिवास । चोखियाचे घरास आले वेगीं ॥५॥
चोखामळा गेला पुढें लोटांगणी । उचलोनि देवांनी आलंगिला ॥६॥
एका जनार्दनीं ऐसा चोखियाचा भाव । जाणोनी आले देव भोजनासी ॥७॥
३६८२.
चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्री ते वाढिती चोखियाची ॥१॥
अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें । शुध्द पाहिजे केलें नारायणा ॥२॥
तेव्हां देवराव पाचारी चोखियासी । शुध्द अमृतासी करी वेगीं ॥३॥
चोखामेळा म्हणे काय हें अमृत । नामापुढें मात काय याची ॥४॥
अमृताचे ताट घेउनी आला इंद्र । हेतु गा पवित्र करी वेगीं ॥५॥
चोखियाची स्त्री चोखा दोघेजण । शुध्द अमृत तेणें केलें देखा ॥६॥
चोखियाच्या घरीं शुध्द होय अमृत । एका जनार्दनीं मात काय सांगू ॥७॥
३६८३.
बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणीं । जेवी शारंगपाणी आनंदानें ॥१॥
नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव नारदमुनी ॥२॥
चोखामेळा म्हणे दोन्ही जोडोनी कर । मज दुर्बळा पवित्र केलें तुम्हीं ॥३॥
यातीहीन मी अमंगळ महार । कृपा मजवर केली तुम्हीं ॥४॥
पंढरीचे ब्राम्हण देखतील कोण्ही । बरें मजलागुनी न पाहती जन ॥५॥
ऐसें एकोनियां हांसती सकळ । आनंदें गोपाळ हास्य करी ॥६॥
विडे देऊनियां देवें बोळविले । इंद्रिदिक गेले स्वस्थानासी ॥७॥
पंढरीचे ब्राम्हणी चोख्यासी छळिलें । तेंहीं संपादिलें नारायणे ॥८॥
एका जनार्दनीं ऐशी चोखियाची मात । जेवी पंढरीनाथ त्याचे घरीं ॥९॥
३६८४.
चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी ॥१॥
ढोरें वोढी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥
त्याचे स्त्रीचें बाळंतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥
ऐसी आवड भक्तासी देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥
नीच याती न मनीं कांहीं । एका जनार्दनीं भुलला पाही ॥५॥
१०. संकीर्ण
३६८५.
दामाजीचा भाव पाहूनी श्रीहरी । अनामिका निर्धारी स्वयें जाला ॥१॥
घेऊनियां द्रव्य निघाला तो हरी । जोहार जोहार करी बादशहातें ॥२॥
द्रव्य देऊनियां रसीच घेतली । भक्ताची माउली विठाबाई ॥३॥
एका जनार्दनीं भक्ताचियासाठीं । धांवे पाठोपाठीं भक्ताचिया ॥४॥
३६८६.
संत आले वरले दिंडीं । हातीं खुरक्या काखेंत मुंडी ॥१॥
पंढरपुरीं पडली होड । मुटक्या परीस धांगडगोड ॥२॥
आली वैष्णवांची मांदी । मेलें डुकर बांधलें खांदी ॥३॥
एका जनार्दनीं अर्थ उलटा । तो जाणे तो गुरुचा बेटा ॥४॥
३६८७.
मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥
सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥
बळें उडाला माझा घोडा । परि स्मरण नाहीं दगडा ॥३॥
उडीसरसी घागरी पडे । एका जनार्दनीं पाहुनी रडे ॥४॥
३६८८.
देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती ॥१॥
पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥
वरिल्या मंडपा मुंगीये धरिलें । त्रिभुवनीं व्यापिलें मकुड्यानें ॥३॥
एका जनार्दनीं मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *