येणें छंदे छंद लागली नव्हाळी । हा कान्हो वनमाळी वेध याचा ॥१॥
सरितां सरेना बैसला हृदयीं । तो आतां ठाईचें ठायीं जडलासे ॥२॥
एका जनार्दनी नोहेची परता । संपूर्ण पुरता भरला देहीं ॥३॥
१०४
चंद्राहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ तेणे मज केवळ वेधियलें ॥१॥
वेध कैसा मज लागला वो बाई ॥धृ॥
अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेंविण आनंद देखिला बाई ॥२॥
ऐका जनार्दनी आनंदु परिपूर्ण । काया वाचा मनें वेधिलें वो बाई ॥३॥
१०५
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥
गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥
दुडीया माझारी कान्होंबा झाला भरी । उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥
एका जनार्दनी सबलस गौळणी । ब्रह्मानदु न समाये मनीं ॥४॥
१०६
गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं । तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ॥१॥
कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं । तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ॥धृ॥
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ॥२॥
आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां । कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ॥४॥
१०७
ऐक एक सखये बाई नवल;अ मी सांगुं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥
देवकीने वाईला यशोदेनें पाळिला । पांडवाचा बंदिजन होऊनियं राहिला ॥२॥
ब्रह्माडाची साठवन योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी । राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनीं कैवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥५॥
१०८
भिंगाचे भिगुलें खांद्यावर आंगुलें । नाचत तान्हुलें यशोदेचें ॥१॥
येती गौळणी करीती बुझावणी । लागती चरणी कान्होबाच्या ॥२॥
गोविंद बाळिया वाजविती टाळिया । आमुचा कान्हया देवराज ॥३॥
कडदोरा बिंद्ली वाघनखें साजिरी । नाचत श्रीहरी यशोदेचा ॥४॥
पायीं घागरीया वाक्य साजरीया । कानीच्या बाळ्या ढाळ देती ॥५॥
एका जनार्दनी एकत्व शरण । जीवें निबंलोण उतरती ॥६॥
१०९
कृष्णमूर्ती होय गे काळी आली सोयं गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगुं काय गे ॥१॥
तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । आर्धांगी रुक्मिणी विंझणे वरित गोपी बाळा गे ॥२॥
पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे । नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गें ॥३॥
भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनीं विटे जोदियेले पाय गे ॥४॥
११०
ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥
निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥
घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥
एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥
१११
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥
यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
नंदजी तुमचा कृष्ण लाडका हाका मरितो मोठ्यानें ॥२॥
वेताटी घेउनी नावेंत बैसला । वांचविले देवानें ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । नाहीं ऐकिलें मातेनें ॥४॥
११२
देखिला अवचिता डोळा सुखाचा सागरु । मन बुद्धी हारपला झाले एककारु । न दिसे काया माय कृष्णी लागला मोहरु ॥१॥
अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियल्या कामिनी अद्वया आनंदा रे ॥२॥
खुटले येणें जाणें घर सासुर । नाठवे आपपर वेधियलें सुंदर । अति सब्राह्म व्यापिलें कृष्ण पराप्तर नागर वो ॥३॥
सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा । एका जनार्दनीं कृपा केली परिपुर्णा । गगनीं गिळियलें येणें उरी नुरेचि आपणा ॥४॥
११३
दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती अगणीत लावण्या तेज प्रभा दिसती गे माये ॥१॥
कानडा वो सुंदर रुपडा गे । अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ॥२॥
आलिंगनालागीं मन उताविळ होय । क्षेम द्तां माझें मीपण जाय ॥३॥
मागें पुढें चहुकडे उघडे पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई ॥४॥
बाहेरी पाहुं जातां आतंरी भासे । जें जें भासेम तें तें येकीयेक समरसें ॥५॥
एका जनार्दनीं जिवीचा जिव्हाळा । एक पणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ॥६॥
११४
सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका ।
सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥
कृष्णा नाव रे व्यापका । म्हणाताती गोपिका ॥धृ॥
दणदण मेदनी वाजत वाम चरणनिघातें । थोंगीत थोंगीत थाक तोडीत चित्त अनुकारें संगीतें ।
टाळछंदें मन वेधें टाळी वाजे अनुहातें । धिम धिम धिमतांग थोंकीत ताळछंदें सांवळें नाचतें ॥२॥
गुप्त प्रगटीत थाक दावित स्थुळ सुक्ष्म आनंदें । धिगीतां धिगीतां वाजती गजरें शास्त्राचेनी विवादें ।
घटतन घटतनं शब्दे बोलती तार्किक गेले भेदें । गर गर गर गर भोवरी देत अवतार संबंधे ॥३॥
रणुझुणु रणझुणु वाजती श्रुति नेति नेति उअच्चारी । आत्मा हा व्यापक नाटक त्रैलोक्य पडलें फेरी ।
यशोदा रोहिणी वृद्ध गौळणी नाचत देह विसरी । पक्षी चारा विसरलें पवन मुख पसरे अंबरी ॥४॥
देव विमानीं पहाती गगनीं ब्रह्मा नाचताहे येउनी । इंद्र ऐरावत नाचत जवळील ब्रह्मास्पती तो मुनी ।
गण गधर्व देव सर्व तेहतीस कोटी मिळोनी । कुबेर पोटा नाचत मोठा कृष्णांछंन घेउनी ॥५॥
शेष वासुकि नाचत वेंगीं चवदा भुवनें माथां । वराह गाढा पृथ्वी दाढां नाचे विसरुनि चिंता ।
तृणें तरुवरें पर्वत कुंजर लाचावले अनंता । सगुण निर्गुण अजंगम स्थावर वेधले अच्युता ॥६॥
घुळु घुळु घुळु घुळु कंकण वाजती बाहुभूषित भूषणां । तो परात्पर त्रैलोक्य सुंदर जगाचिया जीवना ।
खुण खुण संतबोलती संत घांगुरले हरिचरणा । दृष्टी देखिला सबाह्म निवाला एकशरण जनार्दना ॥७॥
११५
गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी ।
मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।
गळां वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥
नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ॥
नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण ।
आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।
क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥
सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ।
वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥
नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरें । उखळें जाती मुसळें पाळीं आणि देव्हारें ।
धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरें । गौळणी अवघ्या विस्मित ।
देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥
शिणलासी नाचतां आतां पुरें करी हरी । विश्वरुप पाहतां गोपी विस्मित अंतरीं ।
यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव ।
अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ॥६॥
११६
न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥
गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥
एके घटिकेवरी सोळा सहस्त्र घरीं । नोवरा श्रीहरी शोभतो कैसा ॥३॥
आंगनंविण अंगे गोपी भोगिल्या श्रीरंगें । तो कृष्ण निजांगें शोभतो कैसा ॥४॥
सच्चिदानंदाघन तान्हुलें आपण । एका जनार्दन शोभतो कैसा ॥५॥
११७
प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥
उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥
द्वितीय अवतारीं आपण कच्छरुप झाला । सृष्टी धरुनी पृष्ठी शेवटी सांभाळ केला ॥३॥
तृतीय अवतारीं आपण वराहरुप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ॥४॥
चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रुप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ॥५॥
पांचवें अवतारीं आपाण वामन झाला । बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ॥६॥
सहावे अवतारीं आपण परशुराम झाला । धरुनी परशु हातीं सहस्त्रभुजा वध केला ॥७॥
सातवें अवतारी आपण दाशरथी राम । वधोनी राव्ण कुंभकर्ण सुखी देव परम ॥८॥
आठवें अवतारी आपण अवसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असुर मारिले भारीं ॥९॥
नववे आवतारीं आपन बौद्धरुप झाला । धरुनियां मौन भक्तघरीं राहिला ॥१०॥
दहावए अवतारीं आपण झालासें वारु । एका जनार्दनीं वर्णिला त्याचा बडिवारु ॥११॥
११८
अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार ।
सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥
आला रे आला रे म्हणती पहा कृष्ण । जैसा निर्जीवा मीनला जीवप्राण ।
श्रुती परतल्या आत्मासाक्षात्कार देखोनि । तैशा विव्हळ गोपिका हरि पाहुन वो ॥२॥
कृष्णापाशीं मिनल्या व्रजनारी । कां हो निष्ठुर तूं जालासी हरी ।
स्नेह धरिती तयासी होसी दुरी । लोभु सांडीती त्यापाशी निरंतरी वो ॥३॥
थोर शिणलाती तुम्हीं मजविण । माझे स्वरुपीं ठेविला जीव प्राण ।
माझे भेटीसी तंव नाहीं खंडन । सब्राह्मा अंतरी माझे अधिष्ठान वो ॥४॥
ऐसें वचन ऐकोनि हरिमुखें थोर चकल्या वियोगाचे दुःखे ।
आम्हांमारिले शस्त्राविण वचन तिखें । शेखी हें ना तें केले संगदोषें वो ॥५॥
कृष्णां गोपिका वेधल्या एका मनें । माना मुरडिती प्रीति प्रेमाचें रुसणं ।
जेवी श्रुति परतल्या नेति या वचनें । एका जनार्दनी धरुनी ठेल्या मौन्ये वो ॥६॥
_____________________________________
विरहावस्था
११९
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा ।
काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥
कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं ।
कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥
हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय ।
एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥
१२०
वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।
जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥
ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥
समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया ।
तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥
आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।
एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥
१२१
कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती ।
श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥
येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण ।
विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥
येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम ।
एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥
१२२
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥
रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥
रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥
एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥
१२३
विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें ।
वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥
ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा ।
पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥
नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले ।
एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥
१२४
नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं ।
मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥
पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद ।
द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥
विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां ।
दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥
१२५
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥
सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥
१२६
आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला ।
जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥
धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना ।
आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥
छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें ।
एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥
१२७
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।
दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥
येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत ।
मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥
दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार ।
एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥
१२८
काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥
नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी ।
आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥
तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी ।
एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥
१२९
मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥
आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥
एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥
१३०
बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥
चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥
विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥
१३१
येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥
सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥
स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥
संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥
१३२
भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥
अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥
एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥
१३३
विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥
मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥
यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥
१३४
ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥
एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
१३५
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥
विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥
संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥
धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥
१३६
आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥
मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥
विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥
नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥
ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥
संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥
१३७
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥
विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥
घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥
महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥
१३८
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥
दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥
विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥
वनक्रीडा
१३९
उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्मा ॥
सवें मिळालें चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥
एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥
१४०
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥
मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥
नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥
एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥
१४१
आनंद सोहळा वृंदावनीं पाहों । नंदजीचा कृष्ण तेणें केला नवलावो ॥१॥
धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥
एका जनार्दनीं वेधलें मन । पाहतां पाहतां चित्त जालें उन्मन ॥३॥
१४२
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥
सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥
यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥
एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥
१४३
विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥
गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥
विटी दांडु चेंडु लागोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥
एका जनार्दनीं पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥
१४४
जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥
पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥
एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
१४५
जयाच्या दरुशनें शिवादिकां तृप्ती । योगी हृदयीं जया ध्याती ।
सहा चारा अठरा जया वर्णिता । सहस्त्रमुखा न कळे जायाची गती ॥१॥
तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । संवगदे गोपाळ म्हणती कान्हा ।
पराश्ययंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥
आष्टांग साधन साधितां अटी । नोहे नोहे मुनिजना ज्यांची भेटी ।
एका जनार्दनी हातीं घेऊनी काठी । गोधनें चारी आवडीं जगजेठी ॥३॥
१४६
परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥
कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥
नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥
१४७
उठोनि प्रातःकाळीं म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारीं । शिदोरी घेउनि वेगीं जाय रानीं ॥१॥
यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ॥
मागे पुढे गोपाळ मध्यें चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥
मुरलीचा नाद समाय त्रिभुवनीं । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनीं ॥३॥
खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मनें शरण एका जनार्दनीं ॥४॥
मुरली
१४८
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥
भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदें धाला ॥३॥
भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनीं निमाला ॥४॥
१४९
नंदनवन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥
प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥
पती सुताचा विसर पडिला । याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥
स्थावर जंगम विसरुनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥
समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐक्तां मना विश्रांती ॥५॥
एका जनार्दनी मुरलीचा नाद । ऐकता होती त्या सदगद ॥६॥
१५०
मुरली मनोरह रे माधव ॥धृ॥
श्रीवत्सलांछन हृदयीं विलासन । दीन दयाघन रे ॥१॥
सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥
एका जनार्दनीं त्रिभुवनमोहन । राखी गोधन रे ॥३॥
१५१
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥
तुझ्या मुरलीचा सुर तान । मी विसरले देहभान । घर सोडोनि धरिलें रान । मी वृंदावना गेले ॥३॥
एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंद । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
१५२
तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥
मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥
सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा नाहीं सांसारासी थारा । भेदाभ्रम गेला । कमलनयना ॥२॥
ध्वनि मंजुळ ऐकिली कानीं । सर्व सुखां जाली धनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । एकपणा जगजीवना ॥३॥
१५३
मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥
तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥
स्थूल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्त्वतां । आगमांनिगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय ॥३॥
अचोच अवेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रं नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥
१५४
भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥
पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥
तृणचरें लुब्ध जालीं । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥
१५५
कशी जाऊं मी वृंदावन । मुरली वाजवी कान्हा ॥धृं॥
पैलतीरीं हरी वाजवीं मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करु बाई कोणाला सांगुं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनीं म्हणा । देवा महात्म्य कळेना कोणा ॥५॥
१५६
तुझी संगती नाहीं कामाची । मी सुदंरा कोवळ्या मनाची । मज दृष्टी होईल साची । मग तुझी घेइन चर्या ॥१॥
कसें वेड लाविलें कान्हों गोवळियां ॥धु॥
माझा वंश आहे मोठ्याचा तुं तंव यातीहीन गौळ्याचा । ऐक्य जालीया नांवरुअ पाचा । ठावाचि पुसलिया ॥२॥
तुझ्या अंगेची घ्रट घाणी । तनु काय दिसती वोगळवाणी । मुरली वाजविसी मंजुळवाणी । मनमोहन कान्हया ॥३॥
तुझ्या ठिकाणी अवगुणा मोठा । चोरी करुनी भरिसी पोटा । व्रजनारी सुंदरा चावटा । अडविसी अवगुणीया ॥४॥
सर्व सुकहची कृष्णासंगती । वेणुनादें गाई गोप वेधती । एका जनार्दनी हरिरुपी रमतीं । त्या व्रज सुंदरीया ॥५॥
१५७
सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं ।
गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥
मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ ॥
चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदें ।
श्रुतिशास्त्रें वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥
ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खातां कांहीं न धरी शंका ।
एका जनार्दनीं भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥
१५८
काळी घोंगडी हातीं काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥
अरे हरी व्रज वांकुंडा कीं तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥
राधा गोरटीं हातीं वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥
एका जनार्दनीं झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥
१५९
भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥
स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥
आकंठ मग्न सुनीळ निरी । घनसांवळा देखोनि वरी । येथोनि निघतां लाज मोठी । विनोद न करी रे ॥३॥
लाज सांडोन धरा चरण । तंव मी होईन प्रसन्न । एका जनार्दनीं निःशंक झाल्या । जीवींची जाणुनि खुण वो ॥४॥
१६०
यमुनेचे तीरीं नवल परि वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयं झाला हरी वो ॥१॥
नवल देखा ठक तिन्हीं लोकां । भुली ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥
कृष्णवत्साची ध्वनी गाइ पान्हा । तेथें वोळलें निराळे विस्मयो गौळीजनां ॥३॥
गोपाळांचे वचनीं सुखें सुखा भेटी । तेथें वोसंडला आनंद माय कृष्णीं भेटी ॥४॥
ऐसा रचिला आनंद देखोनि निवाडा । तेथे सृष्टिकर्ता तोहि झाला वेडा ॥५॥
ऐसें अचोज पै मना नये अनुमाना । अचुंबीत करनें एका जनार्दना ॥६॥
१६१
कृष्णारुपीं भाळल्या गोपिका नारी । नित्य नवा कृष्ण जीवा आवडतो भारी ।
पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद भावें भोगावा श्रीहरीं ॥१॥
वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी ।
प्रातः काळी जाती यमुनातीरीं । कृष्णप्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥
एकमेकींतें खुणाविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी ।
समयीं एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगुं गुज गोष्टी ॥३॥
कृष्नारुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन ।
रात्र आणि दिवस कृष्नाचें ध्यान । एका जनार्दनीं चरणी वेधलें मन ॥४॥
१६२
देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी ।
कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥
जीवीं लागलें हरीचें ध्यान । कांही केलिया न राहें मन ।
प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं तें वेधिलें मन वो ॥२॥
लाज सांडोनि जालें निर्लज्ज । सासू सासर्यांसी नाहीं मज काज ।
माया माहेर अंतरलें सहज । हरिचरणीं तो वेधलें निज वो ॥३॥
चिदाकाशींचे स्वच्छ चंदिणे । कृष्ण प्रभा ते चंद्र परिपुर्ण ।
ध्येय ध्याता खुंटले तेणें गुणे । एका जनार्दनीं सहज एकपणें वो ॥४॥
१६३
गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी ।
कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥
यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥
राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाहीं वो मजपाशी ।
परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥
यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसतां क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनीं विनवीं श्रीहरी । नाम घेतां पातकें जती दुरी ॥४॥
१६४
कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी ।
कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥
कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धृ॥
एकाएकी एक हा एकटु । माझ्या संसारा झाला शेवटु ।
मी पतिव्रता तो झोंबतो आलगटु । आपपर नाहीं तुं होसी क्रियानष्टु ॥२॥
दृश्य न दिसे तंव जाली दुपारी । रळीया वासना ते वास फेडी हरी ।
सुटली लिंग देह गाठी अभ्यंतरीं । सर सर निर्लज्जा मी परात्परा नारी वो ॥३॥
कृष्णा मागे मागे ते माया आली जाणा । पुसे यशोदा बा काय जालें कान्हा येऊ ।
स्फुंदस्फुंदे करितो रुदना । भावचेंडु चोरिला गोपांगंना वो ॥४॥
गोपी म्हणती हा कर्मनष्ट कुडा । क्रिया प्रमाणेंसी बोल याचा खुडा ।
हा बोलतसे अवाडीच्या चाडा । कृष्ण म्हणे तु माग इसी झाडा वो ॥५॥
वासना वास तें फेडी प्रमदा । भाव चेंडुवातें तंव देखें यशोदा ।
हरी कृष्ण येरु हांसे खदाखदां । स्वेदु रोमांचित वरी कांपत गदागदां वो ॥६॥
नष्ट गवळणी विजन व्यभिचारी । परा रातली या निर्लज्ज निर्धारी ।
दैवें आलीये मा चुकली कुमरी ॥७॥
कृष्णें लाधव तें कैसें केलें पाहें । गोपी उपरमोनि पाठिमोरी राहे ।
माथा वंदीतसे कान्हयाचे पाय । एका जनार्दनीं दोष नाहीं वो माय ॥८॥
१६५
ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं ।
अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥
सर सर निर्गुणा तु अगुणाचा हरी । जवळीं असतां जालासीं कैसा दुरी ।
चित्त उतटे चितिंता निरंतरी । मन मावळलें न दिसे दृश्यकारी ॥२॥
तुजलागी सांडिला देहसंग । तुजविण विटला विषयभोग ।
जळो तुझा उपदेश सांगसी योग । आम्हा देई सप्रेम संयोग ॥३॥
एक म्हणती गे सांडा शब्द आटी । शब्दा नातुडे कोरड्या ज्ञानगोष्टी ।
आजिचा सुदीन श्रीकृष्नीं झाली भेटीं । हरुषें निर्भर स्वानंद भरली सृष्टी ॥४॥
एक म्हणती गे सांडा शब्दज्ञान । ध्येय जोडलें कोईसें आतां ध्यान ।
भज्य भजन एक झालें भजन । गेली त्रिपुटी मिथ्या मोक्षबंधन ॥५॥
एक म्हणती गे चला मांडु रासु । म्हणे उगवेल मायामय दिवसु ।
दैवें जोडला गे कृष्ण परमहंसु । शोधा निजतत्व सांडोनि आळसु ॥६॥
गोपी मंडळी मिळाली कृष्णापाशीं । जैशीं रश्मि मिनल्या रविबिंबासी ।
कृष्ण भोगितां नाठवे दिननिशीं । एका जनार्दनीं ऐक्यता प्रेमेसी ॥७॥
रासक्रीडा
१६६
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥
जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥
जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥
एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥
१६७
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥
न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥
उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥
एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥
१६८
चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणें केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पायां ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायीं हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
१६९
पहा हो पहा वृदांवनीं आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥
गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥
रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनियां धरी राधिकेची वेणी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहतां अवघें स्वप्नवत वाव ॥४॥
१७०
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥
राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥
एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥
एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥
१७१
गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥
सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥
गोपिका कामातुर त्या मनीं । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥
षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनीं कळा न कळे कोण्हा ॥४॥
१७२
रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥
न कळेची कवणा कैसें हें विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥
तें काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
१७३
रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥
जें जें दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥
आसनीं शयनीं भोजनीं गमनागमनीं सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥
एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडीं ॥४॥
____________________________________________
दळण
१७४
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥
वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥
स्थुळ सूक्ष्म दळियलें देहकारणसहित महाकारण दळियलें औट मत्रेसहित । येई ॥२॥
दशा दोनी दाळिल्या द्वैत अद्वैतासहित । दाही व्यापक दळियेंले अहं सोहं सहितं ॥येई ॥३॥
एकवीस स्वर्ग दळियेलें चवदा भवनासंहित । सप्त पाताळें दलियेंलीं सप्त सागरांसहित । येई ॥४॥
बारा सोळा दळियल्या सत्रावीसहित । चंद्र सुर्य दळियलें तारागणांसहित ॥येई ॥५॥
नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहांसहित । तेहतीस कोटी देव दळियेलें ब्रह्मा विष्णुसहित ॥येई ॥६॥
ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानसहित । मीतुंपण दळियेलें जन्ममरणसहित । येई ॥७॥
ऐसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित एका जनार्दनीं कांहीं नाहीं उरलें द्वैत ॥येई ॥८॥
१७५
माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई ।
समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥
येई गे येई गे येई गे कान्हाई हात लावी तु वहिली । जातीये जातां शिणलीये किती दळुम एकली ।
विसावा निजाचा तूं माझा विश्रांती साऊली । येइ गे येई गे कान्हाई ॥१॥
ब्रह्माहमस्मि टाकिया उकटी द्वैत दळी । अधिष्ठान खुंटा निश्चय दोहीं एकची बोली ।
पाहिले चारी निरसोनी निज नित्य न्याहाळीं । सहासी वैरण वेरुणी अठराही दळी ॥२॥
पंच भुतें पंच धान्यें दळियेलें जातां । शशी सुर्य दोन्हीं दाळिले प्राण्याच्या समता ।
ध्येय ध्याता ध्यान दळियेलें धारणा धरितां । पंचविषय तेही दळियेलें वैराग्य राहतां ॥३॥
वैकुठं कैलास दळिलें गती एक देशी । क्षीरसागर तोही दळियेला शेषशयनेसी ।
ध्रुव तोही जातां वैरिला अढळ पदेशी । जें जें देखें तेही दळियलें दृश्या दृश्यासी ॥४॥
वासना मिथ्या भाजुनि वैरिलिया जातां । मेळवणी गुण घातले समान समता ।
गुणा गुणातेंहि दळियेलें पहातें पाहाता ।ब्रह्मा विष्णु रुद्र दळिलें ओवीया गातां ॥५॥
कर्माकर्मा कैसें दळिलें जन्ममरणेसी । मीतुपण दोन्ही दळियलें जीवाशिवेसी ।
पुडे वैरिणिया कांहीं न दिसे पाहतां चौपाशी । मायो तेहीं जाता दळिली दळते दळणेसी ॥६॥
वृत्तीए तेहि निवर्तली पडियली ठका । समाधि उत्थाना दळियलें देहबुद्धीसी देखा ।
दळितें जातें तेंहि दळियलें कवतुक देखा । स्वभावें लीला हे खेळे जनार्दनी एका ॥७॥
________________________________________________________
कांडण
१७६
विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥
देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥
एका जनार्दनीं कांडन कांडितां । ब्रह्मा सायुज्यता प्राप्त झाली ॥३॥
_________________________________________________________
पिंगा
१७७
पिंगा बाई पिंगा गे । अवघा धांगडधिंगा गे ॥१॥
सांडोनी संतांची गोडी गे । कासया पिंगा जोडी गे ॥१॥
नको घालूं पिंगा गे । तुम्हींरामरंगी रंगा गे ॥३॥
एका जनार्दनीं पिंगा गे । कायावाचा गुरुचरणीं रंगा गे ॥४॥
१७८
निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥
माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ॥
पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्यानें धक्का दिला । माझा ॥२॥
पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला ॥माझा ॥३॥
पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्नें घेऊन आला ॥माझा ॥४॥
पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला ॥ माझा ॥५॥
पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला ॥ माझा ॥६॥
पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला ॥ बळी पाताळीं घातला ॥ माझा ॥७॥
पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचें शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें ॥ माझा ॥८॥
पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिलें । रावण कुंभकर्ण मरिले ॥ माझा ॥९॥
पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला ॥ गोकुळ सोडुन मथुरेसी आला ॥ माझा ॥१०॥
पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिलें जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला ॥ माझा ॥११॥
ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनीं पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥
_______________________________________
फुगडी
१७९
फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥
चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥
फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥
एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥
_______________________________________________
गोपांचे खेळ
१८०
खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥
पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥
एका जनार्दनी खेळ मांडिला । शाहाणा तो येथें नाही गुंतला वो ॥३॥
१८१
यमुने तटीं मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥
जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥
खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्या उदंडु ॥३॥
ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनीं जाणे खुणा ॥४॥
_______________________
टिपरी
१८२
खेळसी टिपर्या घाईं रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जातां भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्हीं गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥
वायं खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहें डोला रे । एक एका जनार्दनी शरण जातां । चुकशील कळिकाळारे ॥३॥
१८३
अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे ।
असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥
जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे ।
आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥
तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे ।
भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पुर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥
_________________________________
विटीदांडू
१८४
आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥
सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥
ब्रीदबळें खेळ खेळूं लक्ष लावीतिसी । मूर्खापाशीं युक्ति नाहीं उडोनि गेली उशी ॥३॥
वकट लेंड मूंड नाल पुढें आणी लेका । भावबळें खेळ खेळ जनार्दन एका ॥४॥
१८५
बारा सोळा अठरा गडियांचा मेळा । मांडियेला डाव कोण आवरीं तयाला ॥१॥
खेळा भाई विटिदांडु । खेळा भाई विटिदांडु । खेळ खेळतां परी बरा नोहे सहज दांडु ॥२॥
पांच सात बारा नव तेरा यांची नका धरुं गोडी । खेळ खेळता दांत विचकुन पडाल घशींतोंडीं ॥३॥
एका जनार्दनीं काय वाचा शरण रिघां पायीं । खेळ तो अवघा सोपा मग प्रेमा उणें नाहीं ॥४॥
१८६
एक पांच सात मिळोनि खेळती विटिदांडु । डाव आलिया पळूणि जातां तया म्हणती गांडु ॥१॥
खेळों विटिदांडु खेळॊं विटिदांडु ॥धृ ॥
मुळींचा दांडुं हातीं धरुनि भावबळें खेळूं खेळा । भक्तिबळें टोला मारुं नभिऊं कळिकाळा ॥२॥
आपुली याची सांडोनि आस जावें गुरुसी शरण । काया वाचा मनें चरणींलोळे एका जनार्दन ॥३॥
१८७
विटिदांडु खेळसी वांया । चौर्यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥
नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥
किती वेरझारी करीसी पा वायां । शरण रिघे एका जनार्दन पायां ॥३॥
१८८
विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥
खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥
सहा चारएकत्र करुनी अवघे पुढें रहा । सावध होऊनि धरा चेंडु कोणी कोणाकडे न पहा ॥२॥
प्रपंचाचे घाई धन वित्त म्हनता भाई । हातीचा चेंडु सोडुनी देई पुढें मारील डोई ॥३॥
खेळ खेळा परी मनीं धरा जनार्दन । तेणे चुके जन्ममरण शरण एका जनार्दन ॥४॥
______________________________
चेंडूफळी
१८९
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥
खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥
यंदु यरडु मारु नाकु मिळालेती गडी । जनार्दनीं शाण अनुपम्य धरा गोडी ॥३॥
१९०
सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥
झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ ॥
अवघे गडी समान रहा । येतां यावा सावध पहा ॥२॥
सुटे सुटाए तंव सरिसाचि पावे । लक्ष जाणें तो माघारा नव्हें ॥३॥
गडियांने गडियची न धरावी आस । आपुलिया बळें घालावी कास ॥४॥
अभिमाना चढे तो बाहेरी पडे । हतींचे जाय मग उगलाचि रडे ॥५॥
एका जनार्दनी येकची बोली । भावार्थी तो सदगुरुवचनें झेली ॥६॥
___________________________________
लगोरी
१९१
खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥
देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥
बरोबर करुं गडी । नाहीं विषमता जोडी । चेंडु हाणती तांतडी । येती हरिया बैसती गडी ॥३॥
एका जनार्दनी कान्होबा भला । खेळा गोविलें कीं सकळां । आपण असेचि निराळा । नवल कळा पाहे डोळा ॥४॥
१९२
त्रिगुणात्मक माडियेला डाव । सहा चार अठरा गडी वांटिले एका त्यांचे नाव ॥१॥
कान्होबा खेळूं लागोरीचा खेळ । तुम्ही आम्ही मिळूं एका ठायीं सहज होईलमेळा ॥२॥
चौदा बारा सोला पंचविसाचा करुनी मेळ । एक एका पुढे पळती अवघा हलकलोळ ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे कन्होबा खेळ अतु आवरीं । खेळ खेळतां शिणलों आम्हीं पुरे बा वेरझारी ॥४॥
__________________________________
भोंवरा
१९३
भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्याशीं घरां ॥१॥
पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥
एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥
एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥
मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥
१९४
खेळें भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ॥
माझ्या भोंवर्यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरां । राधिकेचा नवरा ॥ खेळे॥१॥
भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥ खेळे०॥२॥
एका जनार्दनीं खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा ॥ खेळे॥३॥
______________________________
लपंडाई
१९५
कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥
कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥
लपुं ममतेच्या पोटीं । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुझे देखणें लागलें पाठीं ॥२॥
लपुं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणें मोडली खेळायाची आशा ॥३॥
१९६
उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥
नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥
उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥
शरण एका जनार्दनीं जातां चुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥
___________________________________________
सुरकांडी
१९७
घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥
खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरें लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥
धरीं एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वायां खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥
_____________________________
वावडी
१९८
अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥
भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥
औट हात सोडोनी दोरा । मध्यें कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥
साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनीं त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥
_____________________________________________________
एकीबेकी
१९९
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥
नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥
एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥
एक ब्रह्मा पुर्ण तेथें फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावीं पायां ॥ एकी ॥ ३॥
२००
खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥
एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥
एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझें पायीं लाऊं ॥४॥
२०१
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥
आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥
एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥
एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥
________________________________