देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धि ।जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥ ११९ ॥
पहा निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो ॥ ११९ ॥
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥ १२० ॥
गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो ॥ १२० ॥
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥
वर सांगितलेल्या विहितकर्माचरणारूप यज्ञाने यज्ञपुरुषाचे ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील ॥ १२१ ॥
तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी ।कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥
त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ॥ १२२ ॥
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं ।जयापरीं महारोगी । अमृतसिद्धि ॥ १२३ ॥
ते यज्ञ करून राहिलेले शेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता मोठाले रोग रोग्याला सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात. ॥ १२३ ॥
कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥
अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष भ्रांतीला (देहतादात्म्याला) यत्किंचितही वश होत नाहीत त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. ॥ १२४ ॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे ।मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥
म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे. व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. ॥ १२५ ॥
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥ १२६ ॥
अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसर्या रीतीने वागू नये. अशी ही सृष्टीआरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. ॥ १२६ ॥
जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती ।यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ १२७ ॥
आपण देहच आहोत, असे मानून जे लोक विषय हे भोग्यवस्तु आहेत असे समजतात आणि ज्यास या पलिकडे दुसरी काहीच कल्पना नसते ॥ १२७ ॥
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ ।अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
ते भ्रमिष्ट लोक आपल्या जवळ असलेली संपत्ति वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात. ॥ १२८ ॥
इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके ।ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात, ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुत: पापच सेवन करतात असे समज. ॥ १२९ ॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें ।मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥ १३० ॥
वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ति आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. ॥ १३० ॥
हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख ।निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
अशा रीतीने वागायचे टाकून, पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वत:करता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात. ॥ १३१ ॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥ १३२ ॥
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही ॥ १३२ ॥
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥
ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ॥ १३३ ॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें ।मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
ही सर्व भूते अन्नापासून वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो. ॥ १३४ ॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥
तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. ॥ १३५ ॥
मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर ।म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
दूर व जवळ असणारे (सर्वत्र असणारे) जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. ॥ १३६ ॥
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति ।ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥ १३७ ॥
अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदाचे निरंतर रहाणे आहे. ॥ १३७ ॥
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा ।सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥ १३८ ॥
अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली कार्यकारणाची मालिका तुला या यज्ञाकरता थोडक्यात सांगितली. ॥ १३८ ॥
म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्मरूप यज्ञाचे साद्यंत आचरण करणार नाही ॥ १३९ ॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ।जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥
जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे. असे समज. ॥ १४० ॥
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ ।जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥ १४१ ॥
जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना, त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत ॥ १४१ ॥
कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें ।जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥
किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. ॥ १४२ ॥
म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥
म्हणून अर्जुना ऐक. आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया-वाचा-मने करून ह्या एकाचेच आचरण करावे. ॥ १४३ ॥
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें ।मग उचित कां आपुलें । ओसंडावें ? ॥ १४४ ॥
अरे, हे जे शरीर प्राप्त झाले आहे, ते तरी पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे ? ॥ १४४ ॥
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ १४५ ॥
अर्जुना, ऐक, मनुष्यशरीर मिळाले असता जे कर्मांचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. ॥ १४५ ॥
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात गढलेला आसतो, तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. ॥ १४६ ॥
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला ।म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. ॥ १४७ ॥
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं ।देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥ १४८ ॥
पहा, ज्याप्रमाणे पोट भारल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. ॥ १४८ ॥
जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना ।तंवचि यया साधना । भजावें लागे ॥ १४९ ॥
अर्जुना जोपर्यंत अंत:करणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. ॥ १४९ ॥
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु ।होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाग. ॥ १५० ॥
जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था ।ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥ १५१ ॥
अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वत: श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. ॥ १५१ ॥
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख ।न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. ॥ १५२ ॥
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था ।हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥ १५३ ॥
अर्जुना यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल. ॥ १५३ ॥
जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया ।तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥ १५४ ॥
कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल. आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. ॥ १५४ ॥
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळावले व म्हणून जे निरिच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता, कर्म करणे प्राप्त आहे. ॥ १५५ ॥
मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा ।अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ १५६ ॥
रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस, आंधळ्यास सांभाळून घेऊन, त्याचे बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञान्याने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. ॥ १५६ ॥
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे ? ।तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गातें या ? ॥ १५७ ॥
असे जर (ज्ञानी पुरुषाने ) केले नाही तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकाराने समजेल ? ॥ १५७ ॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात, आणि सामान्य प्रतीचे इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात. ॥ १५८ ॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें ।विशेषें आचरावें । लागे संतीं ॥ १५९ ॥
अशी ही स्थिती असल्यामुळे (ज्ञानी पुरुषाने) कर्म सोडणे बरोबर नाही. (इतकेच काय पण) संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. ॥ १५९ ॥
आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी ।देखैं मीच इये राहाटी । वर्तत असें ॥ १६० ॥
अर्जुना, आता दुसर्याच्या गोष्टी कशाला सांगू ? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. ॥ १६० ॥
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें ।आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥
मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील ॥ १६१ ॥
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं ॥ १६२ ॥
तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तर्हेचे सामर्थ्य माझा अंगात आहे, हे तुला माहीत आहे. ॥ १६२ ॥
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥
मी आपल्या गुरूचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस. असा मी देखिल निपूटपणे कर्मे करत असतो. ॥ १६३ ॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा- । लागोनियां ॥ १६४ ॥
परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील, तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की – ॥ १६४ ॥
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥ १६५ ॥
सर्व प्राणिसमूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे. तेव्हा तो भडकू नये म्हणून ॥ १६५ ॥
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिति राहुनी ।तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ? ॥ १६६ ॥
आम्ही निरीच्छ होऊन आपल्या स्वरूपस्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तर्हेने भवसागरातून पार पडेल ? ॥ १६६ ॥
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी ।ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥ १६७ ॥
यांनी आमच्या मार्गाकडे पहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे (आम्ही कर्म सोडून राहिलो तर) ती लोकांची रहाणीच बिघडेल. ॥ १६७ ॥
म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते ।तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥ १६८ ॥
म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल, त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. ॥ १६८ ॥
देखैं फळाचिया आशा । आचरे कामकु जैसा ।कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
पहा फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. ॥ १६९ ॥
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था ।रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥ १७० ॥
कारण अर्जुना, लोकांचीही वागणूकीची रीत सर्व प्रकारे नेहेमी कायम ठेवणे योग्य आहे. म्हणून ॥ १७० ॥
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांशी लोकबाह्य वागू नये. ॥ १७१ ॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥
तैशी कर्मीं जयां अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता ।न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ १७३ ॥
त्याप्रमाणे ज्यांना कर्मे चांगल्या तर्हेने करण्याचीही पूर्ण योग्यता आली नाही, त्यांना लीलेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. ॥ १७३ ॥
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥
त्यास योग्य कर्माची वागणूक लाऊन द्यावी हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. ॥ १७४ ॥
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं ।तो कर्मबंधु आंगीं । वाजैल ना ॥ १७५ ॥
लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही. ॥ १७५ ॥
जैसी बहुरुपियांचीं रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं ।परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
बहुरूपी जेव्हा राजाराणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्रीपुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची यथास्थितपणे लोकात बतावणी करतात. (त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांना कर्माचे बंधन प्राप्त होत नाही.) ॥ १-१७६ ॥
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे ।तरी सांगैं कां न दटिजे । धनुर्धरा ? ॥ १७७ ॥
अर्जुना, पहा, दुसर्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का ? सांग बरं ॥ १७७ ॥
तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में ।तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. ॥ १७८ ॥
ऐसा अहंकारादिरूढ । एकदेशी मूढ ।तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥
अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वत:स मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्य़ास हे गूढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये. ॥ १७९ ॥
हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित ।तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥
हे राहू दे, अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. ॥ १८० ॥
जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । प्रकृतिभावो नाहीं ।जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥
ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात, तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ॥ १८१ ॥
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनि ।साक्षीभूत होउनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥
ते देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे, त्यांचे उल्लंघन करून, देहामध्ये उदासीनतेने रहातात. ॥ १८२ ॥
म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती ।जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
म्हणून सूर्याच्या प्रकशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात, तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्माने लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. ॥ १८३ ॥
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।प्रकृतीचेनि आटोपे । वर्ततु असे ॥ १८४ ॥
या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मानी बद्ध होतो. ॥ १८४ ॥
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसर्यांनी (गुणांनी) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो (तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो.) ॥ १८५ ॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं ।परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥
सर्व विहित कर्मे करून, ती तू मला अर्पण कर. परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. ॥ १८६ ॥
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था ।ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं ॥ १८७ ॥
हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता, अथवा अमूक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात येईल तर तो येऊ देऊ नकोस. ॥ १८७ ॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥
तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. ॥ १८८ ॥
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं ।देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥
आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. ॥ १८९ ॥
जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं ।इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥
या जगात तू आपली कीर्ती वाढव व आपल्या धर्माचा मान वाढव. आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. ॥ १९० ॥
आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं ।एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥ १९१ ॥
आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरे काही बोलू नकोस ॥ १९१ ॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे ।श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥
अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ॥ १९२ ॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना, तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ॥ १९३ ॥
नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी ।जें हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥
नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून, ते टाकून देतात ॥ १९४ ॥
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥
जे याला एक साधारण गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पहातात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पितवाणी म्हणतात ॥ १९५ ॥
ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले ।अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामधे फसलेले आहेत असे नि:संसय समज. ॥ १९६ ॥
देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें ।नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
पहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही ॥ १९७ ॥
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा न वचे वायसा ।मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥
किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांना उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. ॥ १९८ ॥
तैसे जे पार्था । विमुख या परमार्था ।तयांसी संभाषण सर्वथा । करावेना ॥ १९९ ॥
अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाला पाठमोरे असतील, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ॥ १९९ ॥
म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती ।सांगैं पतंगु काय साहती । प्रकाशातें ? ॥ २०० ॥
ते या उपदेशाला मानीत नाहीत आणि उलट त्याची निंदा देखील करतात. म्हणून त्यांना न सांगणेच बरे. सांग बरं, पतंग प्रकाशाला सहन करू श्कतील का ? ॥ २०० ॥