मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. ॥२-१॥
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ॥२-२॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे, परंतु त्यावेळी द्रवले. ॥२-३॥
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
म्हणून मोहाधीन झालेला तो आर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. ॥२-४॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. ॥२-५॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय ? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. ॥२-६॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
सांग तुला झाले तरी काय ? काय कमी पडले ? काय करावयाचे चुकले ? हा खेद कशाकरता ॥२-७॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी ।तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे ॥२-८॥
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. ॥२-९॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥
तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवातकवचांचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. ॥२-१०॥
पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच तुच्छ आहे असे वाटते. पार्था तुझा असा पराक्रम चांगला आहे. ॥२-११॥
तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें ।अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
पण तोच तू या वेळी आपला वीरपाणा टाकून, खाली मान घालून, रडत आहेस. ॥२-१२॥
विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु ।सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
विचार कर. तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करूणेने तुला दीन करून सोडावे ! सांग बरे अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय ? ॥२-१३॥
ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? ।पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥
अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय ? किंवा अमृताला मरण आहे का ? अरे विचार कर. लाकूडच अग्नीला गिळून टाकील काय ? ॥२-१४॥
कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? ।सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
किंवा मिठाने पाणी विरघळेल काय ? दुसर्याच्या संसार्गाने काळकूट मरेल काय ? सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय ? ॥२-१५॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? ।परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय ? असे अघटित कधी घडले आहे का ? पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास. ॥२-१६॥
म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥
म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. ॥२-१७॥
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युधाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची ? अशा भलत्यावेळी तिचे काय प्रयोजन ? ॥२-१८॥
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥
अरे तू चांगला जाणता आहेस. तर मग आता विचार करून का पहात नाहीस ? युद्धाच्यावेळी कारुण्य उचित आहे काय ? सांग बर. ॥२-१९॥
हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
श्रीकृष्ण (पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. ॥२-२०॥
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं ।हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुना हा खेद टाकून दे. ॥२-२१॥
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ॥२-२२॥
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे ।हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥
लढईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत ? ॥२-२३॥
तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? ।वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥
हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का ? किंवा या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का ? आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजिल कळवळा का ? ॥२-२४॥
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? ।हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥
आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का ? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहेमीचेच आहे. ॥२-२५॥
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें ।हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मग आताच काय झाले ? ही ममता कोठून उत्पन्न झाली ? हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. ॥२-२६॥
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील. ॥२-२७॥
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ह्यावेळी अंत:करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ॥२-२८॥
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला ? ॥२-२९॥
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
देवा, इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. की हे युद्ध आहे का ? ॥२-३०॥
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. ॥२-३१॥
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती ।तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
पहा आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा ? ॥२-३२॥
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
देवा, संतसमुदायाला वंदन करावे, अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी ? ॥२-३३॥
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ? ॥२-३४॥
जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं ।तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥
ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा, आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे ? ॥२-३५॥
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले ।जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
यापेक्षा आग लागो या जिण्याला ! सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे ? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची का ? ॥२-३६॥
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥
मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय ? ॥२-३७॥
जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासुर आहे ? ॥२-३८॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे ।परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो. तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. ॥२-३९॥
हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान ।परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
हे आकाश अमर्याद आहे खरे. पण कदाचित त्य़ाचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे. त्याचा ठाव लागणार नाही. ॥२-४०॥
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे ।परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥
एकवेळ अमृतही विटेल, किंवा कालवशात वज्रही भंगेल. पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. ॥२-४१॥
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. ॥२-४२॥
हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि ।विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
अर्जुन म्हणाला – हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहेत. ॥२-४३॥
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु ।आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
इतके हे मोठे आहेत. शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का ? सांग बरे ॥४४॥
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥
अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंत:करणापासून मनात येत नाही. ॥२-४५॥
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर ।ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
द्रोणाचार्यांसारख्यांना मारावे, तेव्हा आपण राज्यसुख भोगावे अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदादिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ॥२-४६॥
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे ।परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरिकंदरांचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. ॥२-४७॥
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं ।भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे ॥२-४८॥
ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? ।मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥
ते मिळवून तरी काय करायचे आहेत ? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे ? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ॥२-४९॥
ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥
त्यावेळी ‘कृष्णा ऐक’ असे अर्जुन म्हणाला. परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. ॥२-५०॥
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
हे जाणून अर्जुन भ्याला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत ? ॥२-५१॥
येर्हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो. परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. ॥२-५२॥
पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. ॥२-५३॥
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें ।या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. ॥२-५४॥
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
आम्हाला काय करणे उचित आहे, हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही. कारण मोहामुळे माझे चित्त व्याकूळ झाले आहे. ॥२-५५॥
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तु दिसेनाशी होते. ॥२-५६॥
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
देवा, तसे मला झाले आहे. कारण माझे मन भ्रांतीने गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. ॥२-५७॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तरी श्रीकृष्णा, तू (यासंबंधीचा) विचार करून पहा. आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग. कारण आमचा सखा, (आमचे) सर्व तू काही तूच आहेस. ॥२-५८॥
तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता ।तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
आमचा गुरु, बंधु, पिता, तू आमची इष्ट देवता, संकटसमयी नेहेमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस. ॥२-५९॥
जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु ।कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥
शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरूच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ? ॥२-६०॥
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये ।तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
किंवा कृष्णा ऐक. मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार ? ॥२-६१॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल ॥२-६२॥
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू. ॥२-६३॥
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं ।तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
हे सर्व कूळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशावाचून दुसर्या कशानेही जाणार नाही. ॥२-६४॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
या वेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ॥२-६५॥
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं ।तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्य़ास अंकुर फुटणार नाही. ॥२-६६॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे ।एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो ॥२-६७॥
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि ।एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे (श्रीकृष्णा), तुझी कृपाच माझा आधार आहे. (तीच उपयोगी पडेल). ॥२-६८॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥
जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला. पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. ॥२-६९॥
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणातात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे. त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे. ॥२-७०॥
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं ।लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥
मर्मस्थान जे हृद्यकमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत. ॥२-७१॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी ।तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. ॥२-७२॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
तशा त्या व्याकूळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण शोभत होताच. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. ॥२-७३॥
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. ॥२-७४॥
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा ॥२-७५॥
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता ॥२-७६॥
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
म्हणून स्वभावत: सुनीळ (अत्यंत सावळा) व कृपामृतरूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. ॥२-७७॥
तेथ सुदर्शनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
तेथे (श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी) सुंदर दंतावलीचे तेज हीच जणु काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. ॥२-७८॥
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥
आता तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ॥२-७९॥
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
ते पहा. ही कथा समाधानवृत्तीने ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥२-८०॥
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥
याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग त्याला म्हणाला राजा, अर्जुन पुन्हा शोकाकूल होऊन काय म्हणाला ते ऐक. ॥२-८१॥
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥
तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने ह्या वेळी लढणार नाही. ॥२-८२॥
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला ।तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
असे एकदम बोलला. मग स्तब्ध होऊन बसला. त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. ॥२-८३॥
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥
मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, याप्रसंगी याने हे काय आरंभले आहे ? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, याला काय करावे ? ॥२-८४॥
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी ।जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
हा आता कशाने उमजेल ? कशाने धीर धरेल ? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो ॥२-८५॥
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि ।वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥
किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्द्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोप योजना करतो ॥२-८६॥
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु ।जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. ॥२-८७॥
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥
श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते ॥२-८८॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं ।ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते. ॥२-८९॥
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
त्याप्रमाणे वर वर पहाता उदास (कठोर), पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले ॥२-९०॥
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले – हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. ॥२-९१॥
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस, पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणापणाच्या गोष्टी सांगतोस. ॥२-९२॥
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. ॥२-९३॥
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥
तू स्वत:ला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. ॥२-९४॥
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? ।हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
तर अर्जुना, सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय ? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय ? ॥२-९५॥
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥
तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच ? ९६॥
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें ।आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तेव्हा आता असे झाले का की हे जन्ममृत्यु तू उत्पन्न केलेस ? आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का ? ॥२-९७॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं ।तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत ? ॥२-९८॥
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. ॥२-९९॥
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥
ही सगळी (सृष्टी) अनादिसिद्ध आपोआप होते व जाते. तर मग तू शोक का करावास ? सांग बरे. ॥२-१००॥