सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

। अथ द्वितीयोऽध्यायः – अध्याय दुसरा

साङ्ख्ययोगः

(ओवी १ ते १२२ ध्वनीमुद्रण )

(ओवी  १२३ ते 249 ध्वनीमुद्रण )

(ओवी 250 ते 3७५ ध्वनीमुद्रण )

वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. ॥२-१॥
 
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्‍भुत ।तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ॥२-२॥
 
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्‍याने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे, परंतु त्यावेळी द्रवले. ॥२-३॥
 
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
म्हणून मोहाधीन झालेला तो आर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. ॥२-४॥
 
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. ॥२-५॥
 
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय ? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. ॥२-६॥
 
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
सांग तुला झाले तरी काय ? काय कमी पडले ? काय करावयाचे चुकले ? हा खेद कशाकरता ॥२-७॥
 
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी ।तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे ॥२-८॥
 
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. ॥२-९॥
 
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥
तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवातकवचांचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. ॥२-१०॥
 
पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच तुच्छ आहे असे वाटते. पार्था तुझा असा पराक्रम चांगला आहे. ॥२-११॥
 
तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें ।अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
पण तोच तू या वेळी आपला वीरपाणा टाकून, खाली मान घालून, रडत आहेस. ॥२-१२॥
 
विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु ।सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
विचार कर. तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करूणेने तुला दीन करून सोडावे ! सांग बरे अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय ? ॥२-१३॥
 
ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? ।पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥
अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय ? किंवा अमृताला मरण आहे का ? अरे विचार कर. लाकूडच अग्नीला गिळून टाकील काय ? ॥२-१४॥
 
कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? ।सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
किंवा मिठाने पाणी विरघळेल काय ? दुसर्‍याच्या संसार्गाने काळकूट मरेल काय ? सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय ? ॥२-१५॥
 
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? ।परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय ? असे अघटित कधी घडले आहे का ? पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास. ॥२-१६॥
 
म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥
म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. ॥२-१७॥
 
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युधाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची ? अशा भलत्यावेळी तिचे काय प्रयोजन ? ॥२-१८॥
 
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥
अरे तू चांगला जाणता आहेस. तर मग आता विचार करून का पहात नाहीस ? युद्धाच्यावेळी कारुण्य उचित आहे काय ? सांग बर. ॥२-१९॥
 
हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
श्रीकृष्ण (पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. ॥२-२०॥
 
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं ।हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुना हा खेद टाकून दे. ॥२-२१॥
 
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ॥२-२२॥
 
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे ।हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥
लढईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत ? ॥२-२३॥
 
तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? ।वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥
हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का ? किंवा या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का ? आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजिल कळवळा का ? ॥२-२४॥
 
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? ।हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥
आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का ? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहेमीचेच आहे. ॥२-२५॥
 
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें ।हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मग आताच काय झाले ? ही ममता कोठून उत्पन्न झाली ? हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. ॥२-२६॥
 
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील. ॥२-२७॥
 
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ह्यावेळी अंत:करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ॥२-२८॥
 
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला ? ॥२-२९॥
 
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
देवा, इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. की हे युद्ध आहे का ? ॥२-३०॥
 
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. ॥२-३१॥
 
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती ।तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
पहा आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा ? ॥२-३२॥
 
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
देवा, संतसमुदायाला वंदन करावे, अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी ? ॥२-३३॥
 
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ? ॥२-३४॥
 
जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं ।तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥
ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा, आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे ? ॥२-३५॥
 
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले ।जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
यापेक्षा आग लागो या जिण्याला ! सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे ? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची का ? ॥२-३६॥
 
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥
मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय ? ॥२-३७॥
 
जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासुर आहे ? ॥२-३८॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे ।परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो. तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. ॥२-३९॥
 
हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान ।परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
हे आकाश अमर्याद आहे खरे. पण कदाचित त्य़ाचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे. त्याचा ठाव लागणार नाही. ॥२-४०॥
 
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे ।परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥
एकवेळ अमृतही विटेल, किंवा कालवशात वज्रही भंगेल. पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. ॥२-४१॥
 
स्‍नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. ॥२-४२॥
 
हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि ।विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
अर्जुन म्हणाला – हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहेत. ॥२-४३॥
 
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु ।आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
इतके हे मोठे आहेत. शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का ? सांग बरे ॥४४॥
 
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥
अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंत:करणापासून मनात येत नाही. ॥२-४५॥
 
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर ।ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
द्रोणाचार्यांसारख्यांना मारावे, तेव्हा आपण राज्यसुख भोगावे अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदादिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ॥२-४६॥
 
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे ।परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरिकंदरांचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. ॥२-४७॥
 
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं ।भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८
देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे ॥२-४८॥
 
ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? ।मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥
ते मिळवून तरी काय करायचे आहेत ? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे ? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ॥२-४९॥
 
ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥
त्यावेळी ‘कृष्णा ऐक’ असे अर्जुन म्हणाला. परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. ॥२-५०॥
 
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
हे जाणून अर्जुन भ्याला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत ? ॥२-५१॥
 
येर्‍हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो. परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. ॥२-५२॥
 
पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. ॥२-५३॥
 
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें ।या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. ॥२-५४॥
 
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
आम्हाला काय करणे उचित आहे, हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही. कारण मोहामुळे माझे चित्त व्याकूळ झाले आहे. ॥२-५५॥
 
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तु दिसेनाशी होते. ॥२-५६॥
 
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
देवा, तसे मला झाले आहे. कारण माझे मन भ्रांतीने गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. ॥२-५७॥
 
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तरी श्रीकृष्णा, तू (यासंबंधीचा) विचार करून पहा. आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग. कारण आमचा सखा, (आमचे) सर्व तू काही तूच आहेस. ॥२-५८॥
 
तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता ।तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
आमचा गुरु, बंधु, पिता, तू आमची इष्ट देवता, संकटसमयी नेहेमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस. ॥२-५९॥
 
जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु ।कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥
शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरूच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ? ॥२-६०॥
 
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये ।तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
किंवा कृष्णा ऐक. मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार ? ॥२-६१॥
 
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल ॥२-६२॥
 
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू. ॥२-६३॥
 
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं ।तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
हे सर्व कूळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशावाचून दुसर्‍या कशानेही जाणार नाही. ॥२-६४॥
 
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
या वेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ॥२-६५॥
 
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं ।तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्य़ास अंकुर फुटणार नाही. ॥२-६६॥
 
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे ।एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो ॥२-६७॥
 
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि ।एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे (श्रीकृष्णा), तुझी कृपाच माझा आधार आहे. (तीच उपयोगी पडेल). ॥२-६८॥
 
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥
जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला. पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. ॥२-६९॥
 
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणातात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे. त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे. ॥२-७०॥
 
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं ।लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥
मर्मस्थान जे हृद्यकमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत. ॥२-७१॥
 
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी ।तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. ॥२-७२॥
 
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
तशा त्या व्याकूळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण शोभत होताच. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. ॥२-७३॥
 
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. ॥२-७४॥
 
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा ॥२-७५॥
 
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता ॥२-७६॥
 
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
म्हणून स्वभावत: सुनीळ (अत्यंत सावळा) व कृपामृतरूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. ॥२-७७॥
 
तेथ सुदर्शनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
तेथे (श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी) सुंदर दंतावलीचे तेज हीच जणु काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. ॥२-७८॥
 
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥
आता तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ॥२-७९॥
 
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
ते पहा. ही कथा समाधानवृत्तीने ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥२-८०॥
 
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥
याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग त्याला म्हणाला राजा, अर्जुन पुन्हा शोकाकूल होऊन काय म्हणाला ते ऐक. ॥२-८१॥
 
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥
तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने ह्या वेळी लढणार नाही. ॥२-८२॥
 
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला ।तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
असे एकदम बोलला. मग स्तब्ध होऊन बसला. त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. ॥२-८३॥
 
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥
मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, याप्रसंगी याने हे काय आरंभले आहे ? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, याला काय करावे ? ॥२-८४॥
 
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी ।जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
हा आता कशाने उमजेल ? कशाने धीर धरेल ? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो ॥२-८५॥
 
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि ।वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥
किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्द्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोप योजना करतो ॥२-८६॥
 
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु ।जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. ॥२-८७॥
 
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्‍नेह आथी ॥ ८८ ॥
श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते ॥२-८८॥
 
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं ।ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते. ॥२-८९॥
 
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
त्याप्रमाणे वर वर पहाता उदास (कठोर), पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले ॥२-९०॥
 
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले – हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. ॥२-९१॥
 
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस, पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणापणाच्या गोष्टी सांगतोस. ॥२-९२॥
 
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. ॥२-९३॥
 
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥
तू स्वत:ला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. ॥२-९४॥
 
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? ।हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
तर अर्जुना, सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय ? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय ? ॥२-९५॥
 
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥
तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच ? ९६॥
 
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें ।आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तेव्हा आता असे झाले का की हे जन्ममृत्यु तू उत्पन्न केलेस ? आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का ? ॥२-९७॥
 
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं ।तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत ? ॥२-९८॥
 
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. ॥२-९९॥
 
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥
ही सगळी (सृष्टी) अनादिसिद्ध आपोआप होते व जाते. तर मग तू शोक का करावास ? सांग बरे. ॥२-१००॥
परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी ।आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. ॥२-१०१॥
 
देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती ।जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥
हे पहा जन्म, मृत्यु ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत नाहीत. ॥२-१०२॥
 
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
अर्जुना, सांगतो ऐक. पहा, येथे आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहो ॥२-१०३॥
 
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी ।हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥
ते आपण हल्ली आहो, असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुत: या दोन्ही गोष्टी खर्‍या नाहीत. ॥२-१०४॥
 
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे ।एर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥
जन्म व मृत्यु हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तु (आत्मा) जी आहे ती अविनाशीच आहे. ॥२-१०५॥
 
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥
वार्‍याने पाणी हलवले, त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल ? ॥२-१०६॥
 
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें ।तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर. ॥२-१०७॥
 
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
आणखी असे पहा की, शरीर तर एकच आहे पण वयपरत्वे त्याच अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा आहे. ॥२-१०८॥
 
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. ॥२-१०९॥
 
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दु:ख कधीही होत नाही. ॥२-११०॥
 
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण ।तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंत:करणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो. ॥२-१११॥
 
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात. ॥२-११२॥
 
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥
ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व काही थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते). ॥२-११३॥
 
देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
पहा की निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात. ॥२-११४॥
 
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात. ॥२-११५॥
 
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात. ॥२-११६॥
 
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥
सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात. ॥२-११७॥
 
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. ॥२-११८॥
 
देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो. ॥२-११९॥
 
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही. ॥२-१२०॥
 
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो ॥२-१२१॥
 
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस, ॥२-१२२॥
 
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती ।आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख-दु:ख ही दोन्ही नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. ॥२-१२३॥
 
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा ।जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. ॥२-१२४॥
 
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक ।जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥
आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. ॥२-१२५॥
 
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
या देहादी प्रपंचामधे सर्वत्र चैतन्य गुप्तरूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. ॥२-१२६॥
 
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे ।परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥
दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे ते निवडून वेगळे करतो ॥२-१२७॥
 
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥
अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून घेतात ॥२-१२८॥
 
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥
अथवा बुद्धिचातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते ॥२-१२९॥
 
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥
किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाणले असता धान्य जाग्यावर रहाते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते ॥२-१३०॥
 
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥
त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निरास होतो (जो मिथ्या ठरतो) असा प्रपंच (देहादिउपाधी) ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व (ब्रह्म) मात्र उरते. ॥२-१३१॥
 
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
म्हणून ज्यांनी दोहोंमधील (उपाधी व चैतन्य) सार ओळखले त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. ॥२-१३२॥
 
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता ।तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥
पहा सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज व सार हे स्वभावत:च नित्य आहे असे जाण. ॥२-१३३॥
 
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाहीत. ॥२-१३४॥
 
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥
जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. ॥२-१३५॥
 
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें ।म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥
आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावत:च नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावे हे योग्य आहे. ॥२-१३६॥
 
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें ।मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥
तू देहाचा अभिमान धरून व या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. ॥२-१३७॥
 
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी ।तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वत: विचार करून पहाशील तर तू मारणारा नाहीस व हे मारले जातील असेही नाहीत. २-१३८॥
 
जैसें स्वप्‍नामाजीं देखिजे । तें स्वप्‍नींचि साच आपजे ।मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
ज्याप्रमाणे जे स्वप्नात स्वप्न पहावे, ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते आणि मग जागे होऊन पहावे तर काही एक नसते. ॥२-१३९॥
 
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां ।शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ हिचा भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, ॥२-१४०॥
 
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥
किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो ॥२-१४१॥
 
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥
किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळरूपाने रहाते ॥२-१४२॥
 
तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥
त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ॥२-१४३॥
 
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
आपण जुने वस्त्र टाकावे व मग नवीन धारण करावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. ॥२-१४४॥
 
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
हा आत्मा अनादी, नित्यसिद्ध (शाश्वत असणारा), उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही.॥२-१४५॥
 
हा प्रळयोदकें नाप्‍लवे । अग्निदाहो न संभवे ।एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥
हा आत्मा प्रलयकाळाच्या पाण्यानेही बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही. तेथे वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही. ॥२-१४६॥
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥
हा आत्मा अर्जुना, तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते. ॥२-१४७॥
 
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी ।ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा मनाला नेहेमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. ॥२-१४८॥
 
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना ।निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा सत्वादी तीन गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. ॥२-१४९॥
 
हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु ।व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥
अर्जुना, हा आत्मा नित्य स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहेमी भरलेला असा आहे. ॥२-१५०॥
 
अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा ।मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥
अर्जुना, असा हा आहे असे लक्षात घे. हा सर्वव्यापी आहे हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक सहजच नाहीसा होईल. ॥२-१५१॥
 
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी ।तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥
अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. ॥२-१५२॥
 
जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु ।जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥
कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंड आहे. ॥२-१५३॥
 
तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें ।आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥
ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, (त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते) व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वहात राहिलेले दिसते, ॥२-१५४॥
 
इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥
त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ही तिन्ही बरोबरच असतात, असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत. ॥२-१५५॥
 
म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें ।जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥
म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचे तुला येथे कारण नाही. कारण मुळापासूनच स्वभवत: अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ॥२-१५६॥
 
ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना ।जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥
अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे (वरील म्हणणे) तुझ्या मनाला येत नसेल ॥२-१५७॥
 
तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं ।हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥
तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण असे पहा की हे जन्ममृत्यु हे टाळता न येणारे आहेत. ॥२-१५८॥
 
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
जे उपजते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. ॥२-१५९॥
 
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें ।हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥
अथवा उदय व अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जातात, त्याप्रमाणे जन्ममृत्यु हे जगात न चुकवता येणारे आहेत. ॥२-१६०॥
 
महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे ।म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥
महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ति-नाश टळत नाही ॥२-१६१॥
 
तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? ।काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥
असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करत आहेस ? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस ? ॥२-१६२॥
 
एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां ।दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥
या ठिकाणी अर्जुना, आणखी एका तर्‍हने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दु:ख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. ॥२-१६३॥
 
जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें ।मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥
शकारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ॥२-१६४॥
 
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती ।देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
ते जेथे नाश होऊन जातात तेथे नि:संशय वेगळे असत नाहीत. पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. ॥२-१६५॥
 
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्‍न जैसें ।तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त, साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे आहे. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ॥२-१६६॥
 
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥
अथवा पाण्याला वार्‍याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसर्‍याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो ॥२-१६७॥
तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥
त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली (मायेमुळे भासमान झाली) आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, ॥२-१६८॥
 
तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी ।तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥
त्याप्रमाणे जे मुळात नाहीच त्याकरता तू का रडत बसला आहेस ? निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. ॥२-१६९॥
 
जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत ।जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥
ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ (संताच्या ठिकाणी) उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात. जे विरक्त आहेत ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात. ॥२-१७०॥
 
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥
त्याच्यावर नजर ठेऊन मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात ॥२-१७१॥
 
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ ।विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥
कित्येक स्थिर अंत:करणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पहाताच सर्व संसार विसरून जातात ॥२-१७२॥
 
एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता ।निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥
कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. ॥२-१७३॥
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले ।एक अनुभवें पातले । तद्‌रूपता ॥ १७४ ॥
कित्येक त्याचे रूपवर्णन ऐकूताच शांत होतात व त्यांची देहभवना सुटते. कित्येक त्याच्या अनुभवाने (साक्षात्काराने) तद्रूपता पावतात. ॥२-१७४॥
 
जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत ।परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥
सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही. ॥२-१७५॥
 
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती ।परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥
त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन: देहतादात्म्यावर येत नाहीत. ॥२-१७६॥
 
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥
जे सर्वत्र सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी चैतन्य तू लक्षात घे. ॥२-१७७॥
 
जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें ।तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥
हे सर्व जग स्वभावत: उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर सांग, येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे ? ॥२-१७८॥
 
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥
हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये, हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. ॥२-१७९॥
 
तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥
तू अजून ह्याचा का विचार करत नाहीस ? हे काय मनात घेऊन बसला आहेस ? ज्याच्या योगाने तरून जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. ॥२-१८०॥
 
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें ।कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥ १८१ ॥
या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा या वेळी युगांत जरी ओढवला ॥२-१८१॥
 
तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥
तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरून जाता येईल काय ? ॥२-१८२॥
 
अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. ॥२-१८३॥
 
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
अरे दूध जरी गाईचे असले, तरी ते पथ्यास घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितले असताही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विषवत् मारक होते. ॥२-१८४॥
 
तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता ।म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥
त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो. एवढ्याकरता तू आता सावध हो. ॥२-१८५॥
 
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥
तू विनाकारण शोकाकुल का होतोस ? ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावयाचा नाही त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ॥२-१८६॥
 
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥
ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही ॥२-१८७॥
 
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां ।सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥
त्याप्रमाणे पार्था, स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुर्‍या होतात. ॥२-१८८॥
 
म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं ।संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥
म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. ॥२-१८९॥
 
निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें ।हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
मनात कपट न धरता, मार्‍याला मारा करून आवेशाने लढावे पण हे बोलणे असो. प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे ? ॥२-१९०॥
 
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें ।कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥
अर्जुना सांप्रतचे युद्ध पहा. हे कार्य म्हणजे जणु काय तुमचे दैवच फळले आहे. अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे उघडा झाला आहे. ॥२-१९१॥
 
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥
याला काय युद्ध म्हणावे ? युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे. अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे. ॥२-१९२॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें ।हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥
अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्य़ास आली आहे. ॥२-१९३॥
 
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे ।जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥
क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पहावे तर तो चिंतामणी आढळावा ॥२-१९४॥
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥
अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडावे व अकस्मात अमृत त्यात पडावे, त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे आलेले आहे असे समज. ॥२-१९५॥
 
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे ।तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥
आता असा हा संग्राम टाकून नाही त्या भलत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसलास तर असे करण्यात हे अर्जुना, आपणच आपले अकल्याण करून घेतो.॥२-१९६॥
 
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें ।जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥
आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल. ॥२-१९७॥
 
असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल ।आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥
इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठातील. ॥२-१९८॥
जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा ।तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याप्रमाणे स्वधर्मत्यागाने जीविताची तशी दशा होते. ॥२-१९९॥
 
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे ।तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥
अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहो बाजूंनी गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. ॥२-२००॥
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील ।आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही. ॥२-२०१॥
 
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥
अपकीर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे येथून परत कसे फिरावे ? ॥२-२०२॥
 
तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता ।परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥
तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. ॥२-२०३॥
 
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील ।तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
म्हणून हे चारही बाजूंनी तुला घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्याप्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. ॥२-२०४॥
 
ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे ।तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच. ॥२-२०५॥
 
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी ।आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥
आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास ॥२-२०६॥
 
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां ।कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥
तर अर्जुना तुझे ते दयाळूपण या दुष्ट वैर्‍यांच्या मनाला खरे वाटेल का ? सांग बरे मला. ॥२-२०७॥
 
हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥
ते म्हणतील, हा पळाला रे पळाला. अर्जुन आम्हाला भ्याला. असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का ? सांग बरं. ॥२-२०८॥
 
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें ।परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण अर्जुना कीर्ती वाढवतात. ॥२-२०९॥
 
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे ।हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
ती तुला अनायासे पुरी लाभली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे ॥२-२१०॥
 
तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम ।तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. ॥२-२११॥
 
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
देशोदेशीचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात. ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते. ॥२-२१२॥
 
ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट ।जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥
अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगातील मी मी म्हणणारे वीर चकित होतात. ॥२-२१३॥
 
तें पौरुष तुझें अद्‍भुत । आइकोनियां हे समस्त ।जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥
तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे ॥२-२१४॥
 
जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा ।तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥
ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रळयकाळ होतो त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. ॥२-२१५॥
 
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें ।तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात. ॥२-२१६॥
 
तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल ।जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥
जर तू न लढताच परत निघशील तर तुझे ते महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हीनपणा येईल. ॥२-२१७॥
 
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती ।न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत, तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असतांना तुझी अमर्याद निंदा करतील. ॥२-२१८॥
 
मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? ।हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥
मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये ? ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. ॥२-२१९॥
 
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥
अथवा या समरांगणावर युद्ध करतांना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल. ॥२-२२०॥
 
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी ।आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१॥
एवढ्याकरता हे अर्जुना, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन ऊठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. ॥२-२२१॥
 
देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता ।तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥
पहा, या स्वधर्माचे आचारण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला ? ॥२-२२२॥
 
सांगैं प्‍लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अर्जुना सांग, होडीने कोणी बुडेल का ? किंवा चांगल्या वाटेने जातांना ठेच लागेल का ? पण कदाचित चालताच येत नसेल तर तेही होईल. ॥२-२२३॥
 
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे ।तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
दूधच पण जर विषासह सेवन केले तर त्या दुधानेही मरण येईल, त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. ॥२-२२४॥
 
म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा ।तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥
म्हणून पार्था, फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर. म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. ॥२-२२५॥
 
सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें ।आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥
सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दु:खाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानि मनात धरू नये. ॥२-२२६॥
 
एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल ।हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
या युद्धामधे जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल, या पुढच्या गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये. ॥२-२२७॥
 
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां ।जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण, तेच करीत असतांना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. ॥२-२२८॥
 
ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
अशी मनाची तयारी होईल तर सहजच पाप घडणार नाही. म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस भे योग्य आहे. ॥२-२२९॥
 
हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ ।आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. ॥२-२३०॥
 
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था।कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥
अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मायोगातील बुद्धी मुळीच बाधत नाही. ॥२-२३१॥
 
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥
ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होताच विजयी होऊन रहाता येते ॥२-२३२॥
 
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच, पण मोक्षाचीही प्राप्ती होते. ॥२-२३३॥
 
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणाणार्‍याला भुताची बाधा होत नाही ॥२-२३४॥
 
तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि ।हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
त्याप्रमाणे सुबुद्धी (अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी) एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणाजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. ॥२-२३५॥
 
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
ज्या बुद्धीत पुण्य-पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी (विचाराने) सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो ॥२-२३६॥
 
अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. ॥२-२३७॥
 
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी ।तैसी सद्‍बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी, पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे ह्या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही. ॥२-२३८॥
 
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ॥२-२३९॥
 
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
ज्याप्रमाणे इतर वस्तु हव्या तितक्या मिळतात, पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो. ॥२-२४०॥
 
तैसी दुर्लभ जे सद्‍बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
अमृत जसे दुर्लभ त्याचप्रमाणे परमात्मा हाच जिचा शेवट (अंतिम ध्येय) आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्या प्रमाणे समुद्रावाचून निखलास अन्य गती नाही ॥२-२४१॥
 
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं ।ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून अन्य आश्रयस्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. पहा. ॥२-२४२॥
 
येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति ।तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
ह्याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहेमी आसक्त होतात. ॥२-२४३॥
 
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
म्हणून पार्था, त्यांना (दुर्बुद्धीयुक्तांना) स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात. पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ॥२-२४४॥
 
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥
वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलांचा लोभ धरतात ॥२-२४५॥
 
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे ।मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
ते म्हणतात, मृत्युलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. ॥२-२४६॥
 
येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
यावाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना पहा. ॥२-२४७॥
 
देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
पहा केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. ॥२-२४८॥
 
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. ॥२-२४९॥
 
परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥
परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात. ॥२-२५०॥
 
जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे ।कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे ॥२-२५१॥
 
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. ॥२-२५२॥
 
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे ? ।परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखें ॥ २५३ ॥
मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी ? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे ? ॥२-२५३॥
 
जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी ।तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्य़ाप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. ॥२-२५४॥
 
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।तया वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥
म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव. ॥२-२५५॥
 
तिन्हीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत ।म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्विक तें ॥ २५६ ॥
तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत. ॥२-२५६॥
 
येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक ।जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥
आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. ॥२-२५७॥
 
म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण ।एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥
म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस. ॥२-२५८॥
 
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥
तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. ॥२-२५९॥
 
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥ २६० ॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. ॥२-२६०॥
 
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥ २६१ ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जावयाचे ? सांग बरे मला. ॥२-२६१॥
 
कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असें महीतळ ।तरी आपण घेपें केवळ । आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥
किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. ॥२-२६२॥
 
तैसें ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती ।मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥
त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचेच ग्रहण करतात. ॥२-२६३॥
 
म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥
म्हणून अर्जुना, ऐक. याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे. ॥२-२६४॥
 
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें ।जें न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. ॥२-२६५॥
 
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥
परंतु कर्मफालाच्या ठिकाणी आशा ठेऊ नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ति होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. ॥२-२६६॥
 
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी ।मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥
अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफालाचा अभिलाष टाकून मग मन:पूर्वक विहित कर्मे करावीस. ॥२-२६७॥
 
परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥ २६८ ॥
परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष काही संतोष मानावा हेही नको. ॥२-२६८॥
 
कीं निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥
किंवा काही कारणामुळे ते आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसेच अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. ॥२-२६९॥
 
आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाची कीर आलें ।परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले कामच झाले. पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. ॥२-२७०॥
 
देखैं जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥ २७१ ॥
कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज. ॥२-२७१॥
 
देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥
आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती आहे. (निष्काम कर्मयोग). तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात. ॥२-२७२॥
 
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाणैं योगाचें ।जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥
अर्जुना, (यशापयशी) चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. (मनाचा संकप व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो). ॥२-२७३॥
 
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था ।दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥
पार्था बुद्धियोगाचा (निष्काम कर्मयोगाचा) विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमीप्रतीचा दिसतो. ॥२-२७४॥
 
परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥ २७५ ॥
परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे की करता करता सकामकर्मातून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेषकर्म ती सहजच योगस्थिती होय. ॥२-२७५॥
 
म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।मनें करीं अव्हेरु । फलहेतूचा ॥ २७६ ॥
म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. ॥२-२७६॥
 
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥
जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसारसागराच्या पलिकडे जातात, त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून सुटका होते. ॥२-२७७॥
 
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥
ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतातच पण कर्मफलाला मनाने शिवतही नाहीत. म्हणून अर्जुना जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. ॥२-२७८॥
 
मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥
अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. ॥२-२७९॥
 
ूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी ।आणि वैराग्य मानसीं । संचरैल ॥ २८० ॥
अर्जुना ज्यावेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू असा वरीलप्रमाणे होशील. ॥२-२८०॥
 
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥
मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरिच्छ होईल ॥२-२८१॥
 
तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें ।हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥
तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवलेले आहे ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना, केवळ जागच्या जागीच राहील. ॥२-२८२॥
 
इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति ।ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥
इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फाकते म्हणजेच चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल ॥२-२८३॥
 
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥
मग केवळ समाधीच्या सुखात (शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी) ज्यावेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. ॥२-२८४॥
 
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥ २८५ ॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच अभिप्राय मी आता विचारतो, हे करुणासागरा श्रीकृष्णा तो तू सांग. ॥२-२८५॥
 
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥
मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. ॥२-२८६॥
 
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥
या बोलण्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे सांग बर. ॥२-२८७॥
 
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे ।जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥
आणि ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात व जो समाधिसुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे ? ॥२-२८८॥
 
तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे ।देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तो कोणत्या स्थितीत असतो ? कोणत्या प्रकारे वागतो ? हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा, मला सांगावे. ॥२-२८९॥
 
तंव परब्रह्म अवतरणु । जो षडगुणाधिकरणु ।तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥
तेव्हा ऐश्वर्यादी सहा गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला श्रीकृष्ण काय बोलता झाला ते ऐका. ॥२-२९०॥
 
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥ २९१ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ऐक मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. ॥२-२९१॥
 
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु ।परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंत:करण नेहेमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमधे पतन होते ॥२-२९२॥
 
तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे ।तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न रहाते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. ॥२-२९३॥
 
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥
कितीही दु:खे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही ॥२-२९४॥
 
अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥ २९५ ॥
अर्जुना, त्याचे ठिकाणी स्वभावत:च कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते. असा तो परिपूर्ण होय. ॥२-२९५॥
 
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥
असा जो अमर्याद आहे व जो (देहप्रपंचादी) उपाधि सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिरबुद्धी होय असे समज. ॥२-२९६॥
 
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा ।अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देतांना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वत्र सारखा, समबुद्धीने वागतो ॥२-२९७॥
 
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥ २९८ ॥
ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूतमात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही ॥२-२९८॥
 
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे ।जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥
काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणार्‍या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही ॥२-२९९॥
 
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥
याप्रमाणे जो हर्षशोकरहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिरबुद्धी होय असे अर्जुना जाण. ॥२-३००॥
ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥
किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असतांना आपले अवयव पसरते किंवा मनास वाटल्यास आपल्या आपण आवरून धरते ॥२-३०१॥
 
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. ॥२-३०२॥
 
अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
अर्जुना आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, ॥२-३०३॥
 
श्रेत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती ।ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥
जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात, पण जिभेला आळा घालत नाहीत त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. ॥२-३०४॥
 
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरची पालवी वरवर खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार ? ॥२-३०५॥
 
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके ।तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारत जाते त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषयवासना मनात पोसतात. ॥२-३०६॥
 
येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥
ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे रस, खाणे पिणे हा जिभेचा विषय निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्यावाचून जगणेच व्हावयाचे नाही. ॥२-३०७॥
 
मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे ।जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो तेव्हा त्याला अशाही रसनेचे सहजच नियमन करता येते. ॥२-३०८॥
 
तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।जैं सोहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ३०९ ॥
ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. ॥२-३०९॥
 
येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।जे राहटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥
एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून नेहेमी जपून वागतात ॥२-३१०॥
 
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥
जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे (मनाला) कुंपण घालतात व जे मनाला नेहेमी मुठीत धरून असतात ॥२-३११॥
 
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥
त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते, ॥२-३१२॥
 
देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
त्याप्रमाणे पहा, हे विषय ऋद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारा साधकाला ग्रासून टकतात. ॥२-३१३॥
 
तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगु होऊन रहाते. (त्याचा अभ्यास जागच्या जागीच रहातो). इंद्रियांचा जोर हा असा आहे. ॥२-३१४॥
 
म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा ।सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ ३१५ ॥
म्हणून अर्जुना, ऐक. सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे सर्वस्वी दमन करतो, ॥२-३१५॥
 
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥
ज्याचे अंत:करण विषयसुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे, असे तू समज. ॥२-३१६॥
 
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥
तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे त्याला माझे परमात्म्याचेसुद्धा अंत:करणातून विस्मरण होत नाही. ॥२-३१७॥
 
येर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं ।तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥
एरवी एखाद्याने बाह्यत: विषयांचा त्याग केला पण मनात जर काही विषयवासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. ॥२-३१८॥
 
जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु ।मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥
ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग नि:संशय प्राणाची हानी करतो ॥२-३१९॥
 
तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा ।घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥
त्याचप्रमाणे पहा, या विषयांची नुसती शंका (सूक्ष्म संस्कार) जरी मनात राहिली तरी ती संपूर्ण विचारमात्राचा घात करते. ॥२-३२०॥
 
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥
अंत:करणात विषयांची नुसती जर आठवण असेल तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते. व त्या विषयासक्तीमुळे विषयप्रीतीची इच्छा निर्माण होते. ॥२-३२१॥
 
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥
जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. ॥२-३२२॥
 
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।चडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृति नाश पावते. ॥२-३२३॥
 
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्य तेजातें ग्रासी ।तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥
किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृति नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते. ॥२-३२४॥
 
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्‍लविजे सकळ ।तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
मग सर्वत्र अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. ॥२-३२५॥
 
जैसें जात्यंधा पळणीं पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥ ३२६ ॥
जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरा वैरा धावू लागतो तसे अर्जुना, बुद्धीला मग भ्रमण होते. ॥२-३२६॥
 
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥
अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला की बुद्धीची सर्वप्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. ॥२-३२७॥
 
चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी ।तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥ ३२८ ॥
प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते असे समज. ॥२-३२८॥
 
म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना ।मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥
म्हणून अर्जुना ऐक. लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते ॥२-३२९॥
 
तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन ।तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥ ३३० ॥
त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधीत येते. ॥२-३३०॥
 
म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥
म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग रागद्वेष (आवडनावड) आपोआप नष्ट होतील. ॥२-३३१॥
 
पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष ।तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
अर्जुना, आणखी एक गोष्ट ऐक. रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी (ते विषय) बाधक होत नाहीत. ॥२-३३२॥
 
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु ।तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिचेनि ॥ ३३३ ॥
ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय ? ॥२-३३३॥
 
तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥
त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो ॥२-३३४॥
 
तरी विषयां तयां कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं ।मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५ ॥
आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपावाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय ? आणि कसली कोणाला बाधा करणार ? ॥२-३३५॥
 
जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे ।तरी विषयसंगे आप्‍लविजे । परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥
जर पाणी पाण्यात बुडेल, किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. ॥२-३३६॥
 
ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु ।तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन रहातो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू नि:संशय मान. ॥२-३३७॥
 
देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
पहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथे कोणत्याही संसारदु:खाचा प्रवेश होत नाही. ॥२-३३८॥
 
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
ज्या प्रमाणे अमृताचा झराच ज्याच्या पोटात उत्पन्न होतो त्याला तहानभुकेची भीती कधीच नसते. ॥२-३३९॥
 
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? ।तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाले तर मग दु:ख कसले आणि कोठले ? त्यावेळी परमात्मस्वरूपाचे ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ॥२-३४०॥
 
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥
ज्याप्रमाणे निवार्‍याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ॥२-३४१॥
 
ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं ।तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥
योगयुक्त होऊन रहाण्याचा हा विचार ज्याच्या अंत:करणात नाही, त्याला शब्दादि विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. ॥२-३४२॥
 
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥
अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर अशी केव्हाच होत नाही. आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. ॥२-३४३॥
 
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखैं मना ।तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥
आणि पहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? ॥२-३४४॥
 
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
ज्याप्रमाणे पापी मनुष्याचे ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकत नाही. ॥२-३४५॥
 
देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरूढती ।तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥
पहा विस्तवात घातलेले बी जर उगवेल तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. ॥२-३४६॥
 
म्हणौनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥
म्हणून मनाची चंचलता हेच दु:खाचे सार आहे, याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले. ॥२-३४७॥
 
इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥
ही इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. ॥२-३४८॥
 
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥
ज्याप्रमाणे नाव तीरावर येउन लागल्यावरही जर वादळात सापडली तर ज्या अपायाला ती चुकवून आली तोच अपाय तोच अपाय तिला मागून पोचतो. ॥२-३४९॥
 
तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।तरी आक्रमिला जाण दुःखें । संसारिकें ॥ ३५० ॥
त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे लाड केले तर तो देखिल पुन: संसार-दुखाने व्यापला जातो, पहा. ॥२-३५०॥
 
म्हणौनि आपुलीं आपणपेया । जरी इंद्रियें येती आया ।तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ? ॥ ३५१ ॥
म्हणून आपल्याला आपली इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना, दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय ? ॥२-३५१॥
 
देखैं कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥
पहा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असतांना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आखडून घेते, ॥२-३५२॥
 
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज. ॥२-३५३॥
 
आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।अर्जुना तुज सांगैन । परिस पां ॥ ३५४ ॥
आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो ऐक. ॥२-३५४॥
 
देखैं भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।आणि जीव जेथ चेइलें । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
पहा, सर्व प्राणिमात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले (अज्ञानी) असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते (म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते) आणि जीव ज्या (देहादी प्रपंचाच्या) ठिकाणी जागे (विषयसुख अनुभवणारे असतात) त्या ठिकाणी जो निजलेला असतो (विषयांपासून निवृत्त असतो) ॥२-३५५॥
 
तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥
तोच खरा निरुपाधि होय. अर्जुना, त्याचीच बुद्धि स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. ॥२-३५६॥
 
पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं ।जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥
अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. तो प्रकार ऐक. पहा, जशी समुद्रात निरंतर शांतता असते ॥२-३५७॥
 
जर्‍ही सरितावोघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।तर्‍ही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥
सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून (त्या समुद्राला) मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडत नाही. ॥२-३५८॥
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥
किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यामुळे जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना, समुद्र मुळीच ओसरत नाही. ॥२-३५९॥
 
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥
त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झालेल्या असताही ज्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही. ॥२-३६०॥
 
सांगैं सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।कां न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥
सांग बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का ? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून ठेवता येईल का ? ॥२-३६१॥
 
देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥
पहा त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि आल्या की गेल्या, याचे त्याला भानही नसते. तो अंत:करणाने महासुखात निमग्न असतो. ॥२-३६२॥
 
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।तो केवीं रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥
जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो, तो भिल्लाच्या पालांच्या खोपटावर कसा खूष होईल ? ॥२-३६३॥
 
जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
जो अमृताला नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो ऋद्धीचा भोग घेत नाही. ॥२-३६४॥
 
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥
अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा, जेथे स्वर्गसुखाची खिजगणती नाही, तेथे बापड्या ऋद्धिसिद्धीचा काय पाड ? ॥२-३६५॥
 
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥
असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धी आहे. असे तू समज. ॥२-३६६॥
 
तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी ।विचरे विश्व होऊनी । विश्वामाजीं ॥ ३६७ ॥
तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. ॥२-३६७॥
 
हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।ते पावले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥
ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासे परब्रह्माला पोचतात. ॥२-३६८॥
 
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीचि व्याकुळता ।आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
कारण की चिद्रूपी म्हणजेच ज्ञानस्वरूपी मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही ॥२-३६९॥
 
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥
तीच ही स्थिती, श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. ॥२-३७०॥
 
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।आतां आमुचियाचि काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥
शअसे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले. ॥२-३७१॥
 
जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणौनियां ॥ ३७२ ॥
कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले. तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबेल. ॥२-३७२॥
 
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवाइला ।आतां प्रश्नु करील भला । आशंकोनी ॥ ३७३ ॥
श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील ॥२-३७३॥
 
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु ।कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. जणु काय तो सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. ॥२-३७४॥
 
जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु ।ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥
सर्वज्ञ जो श्रीकृष्ण तोच स्वत: जे निरूपण करील ती हकिकत निवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. ॥२-३७५॥

 

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥

साभार :satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *