ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे.) हे सर्वांचे मूळ असणार्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असाणार्या ॐकारा, तुला नमस्कार असो. व स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणार्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो. ॥१-१॥
देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
वरील विशेषणांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, महाराज ऐका. ॥१-२॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच त्या (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. ॥१-३॥
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. (मन्वादिकांच्या स्मृति हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने (ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥१-४॥
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥
अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत. ॥१-५॥
पदबंध नागर । तेंचि रंगाथिलेअंबर ।जेथ साहित्य वाणें सपूर ।उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकित तलम तंतु आहेत. ॥१-६॥
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥
पहा, कौतुकाने काव्य-नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागर्या असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. ॥१-७॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥ ८ ॥
कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामधेही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. ॥१-८॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी (त्या गणपतीच्या) कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. ॥१-९॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
पहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. ॥१-१०॥
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
तरी कणादशास्त्ररूपी हातामधे अनुमानरूपी परशु आहे. गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाण-प्रमेयादि षोडष पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्र्ह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. ॥१-११॥
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
बौद्धमताचे निदर्शन करणार्या बौद्धवार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित झालेला दात तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे. ॥१-१२॥
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
मग (बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर) सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. ॥१-१३॥
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
पहा. त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बरेवाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे ॥१-१४॥
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
तर प्रश्नोत्ताररूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ॥१-१५॥
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥
(ज्ञानदेव म्हणतात) पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनि हे भ्रमर त्याचे सेवन करतात. ॥१-१६॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥
वर संगितलेल्या श्रुति-स्मृति वगैरेत प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहेत. ॥१-१७॥
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद्रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात ॥१-१८॥
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
ॐकाराची प्रथम अकारमात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. ॥१-१९॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो. ॥१-२०॥
आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी ।ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥
आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे. व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो. ॥१-२१॥
मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत. म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. ॥१-२२॥
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग (भूमिगत) द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. ॥१-२३॥
कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहेमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तिनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत. असे ज्ञानदेव म्हणतात. ॥१-२४॥
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
एवढ्यासाठी अहो ज्ञातेपुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते ॥१-२५॥
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥
अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, ॥१-२६॥
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥
त्याप्रमाणे (श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे) मी त्याच श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले. (कारण की) तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. ॥१-२७॥
आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥
(श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर) आता (ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची) खोल विचारांनी भरलेली कथा. तिचे माहात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे. किंवा विचाररूपी वृक्षांचा बगिचा आहे. ॥१-२८॥
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥
अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. ॥१-२९॥
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥
किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमधे ही श्रेष्ठ आहे. ॥१-३०॥
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार ।लावण्यरत्न भांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
किंवा ही (कथा) सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. ॥१-३१॥
नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥
अथवा व्यासांच्या विशाल बुद्धिमध्ये स्फुरूण पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. ॥१-३२॥
म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥
म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥१-३३॥
तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥
त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. ॥१-३४॥
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥
येथे (या महाभारतग्रंथात) चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. ॥१-३५॥
माधुर्यीं मधुरता । शृंगारीं सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥
गोडीचा गोडपणा, श्रृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. ॥१-३६॥
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥
येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच (महाभारताच्या पठणाने) जनमेजयाचे दोष हरले. ॥१-३७॥
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमधे सुरंगतेची वाढ झाली आहे. (आनंदाला विशेष मनोहरता आली आहे). त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. ॥१-३८॥
भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ॥
सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. ॥१-३९॥
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामधे चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ॥१-४०॥
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥
अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्वल (स्पष्ट) झाल्या आहेत. ॥१-४१॥
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो ॥१-४२॥
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
किंवा बगिच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते ॥१-४३॥
नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते (डोळ्यात भरत नाही) पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते ॥१-४४॥
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. ॥१-४५॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
अथवा जगामधे पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वत:च्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला. ॥१-४६॥
म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
एवढ्याकरता महाभारतामधे जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. (म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसन्या घेतल्या आहेत.) ॥१-४७॥
ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. ॥१-४८॥
जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
ऐका हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. ॥१-४९॥
आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. ॥१-५०॥
ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥
अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. ॥१-५१॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥
मग ते (भारतरूप) लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवले. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला. (त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले.) ॥१-५२॥
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥
वैराग्यशील लोक ज्या (गीतारूपी तुपाची) इच्छा करतात, संत जे नेहेमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी ‘तेच मी आहे’ (म्हणजे सोऽहंभावाने) जेथे रममाण होतात ॥१-५३॥
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥
भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. ॥१-५४॥
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥
जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात, व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात, ॥१-५५॥
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदु मनाने वेचतात, ॥१-५६॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून (वासनांचा जडपणा टाकून) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. ॥१-५७॥
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥
हिची चर्चा शब्दावाचून करावी. (मनातल्या मनात हिचा विचार करावा.) इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. ॥१-५८॥
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते त्याप्रमाणेच या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. ॥१-५९॥
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते, हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते. ॥१-६०॥
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें ।आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥ ६१ ॥
त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंत:करणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. ॥१-६१॥
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥
अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. ॥१-६२॥
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें ।प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥ ६३ ॥
(ज्ञानदेव म्हणतात) अहो महाराज, आपले अंत:करण गंभीर आहे. म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी लडिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. ॥१-६३॥
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४ ॥
लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो ॥१-६४॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला ।तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगिकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू ? ॥१-६५॥
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें ।तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥ ६६ ॥
परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. ॥१-६६॥
हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७ ॥
हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे ? ॥१-६७॥
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं ।मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
किंवा टिटवीने समुद्र आटावण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे.॥१-६८॥
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥
हे पाहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. ॥१-६९॥
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥ ७० ॥
या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वत: शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने ‘आपण एकसारखा विचार कशाचा करता’ असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. ॥१-७०॥
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें ।तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१ ॥
त्यावर शंकर म्हणाले, “हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीतातत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. ॥१-७१॥
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु ।तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या सर्वश्वराचे घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वत: प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ॥१-७२॥
ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद ।तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥ ७३ ॥
असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तेथे माझा पाड कसा लगणार ? ॥१-७३॥
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें ।गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार ? सूर्याला कोणी उजळावे ? चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे ? ॥१-७४॥
परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु ।जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तिराय यांची अनुकूलता आहे त्याअर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. ॥१-७५॥
येर्हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥
एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे. व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी संतकृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखीत तेवत आहे. ॥१-७६॥
लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे ।कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परीसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. ॥१-७७॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती ।एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥ ७८ ॥
जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ति आहे, यात आश्चर्य ते काय ?॥१-७८॥
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे ।म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे ? आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. ॥१-७९॥
तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें ।करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥ ८० ॥
तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे. ॥१-८०॥
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥
आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत अहात) म्हणून मी बोलतो. (गीतेचे व्याख्यान करतो.) ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते ॥१-८१॥
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु ।ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२ ॥
त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. (ते सांगतील ते काम करणारा आहे.). आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. ॥१-८२॥
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं ।आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥ ८३ ॥
श्रीगुरु म्हणाले थांब. हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. (लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर,) ॥१-८३॥
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४ ॥
श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तिनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले ते मी सांगतो. मोकळ्या मनाने ऐका. ॥१-८४॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकिकत काय आहे ती मला सांग. ॥१-८५॥
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥ ८६ ॥
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. ॥१-८६॥
तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७ ॥
तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लौकर सांग ॥१-८७॥
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें ।जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥
त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडवसैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. ॥१-८८॥
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट ।जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥ ८९ ॥
अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला (तेव्हा त्याला कोण आवरणार ?) जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे ? ॥१-८९॥
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला ।सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९० ॥
अथवा वडवानल (समुद्राच्या पोटातील अग्नी) एकदा पेटला तशात त्याला वार्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो ॥१-९०॥
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर ।अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥ ९१ ॥
त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ॥१-९१॥
तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें ।जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. ॥१-९२॥
मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला ।कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥
नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. ॥१-९३॥
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते ।रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्यद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत. जसे काय डोंगरी किल्लेच. ॥१-९४॥
जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला ।तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥ ९५ ॥
ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने (धृष्टद्युम्नाने) हा सैन्यसिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खर. ॥१-९५॥
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६ ॥
आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. ॥१-९६॥
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥ ९७ ॥
जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. ॥१-९७॥
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. ॥१-९८॥
चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु ।उत्तमौजानृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
चेकितान, धृष्टकेतु, पराक्रमी असा काशिराजा. नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. ॥१-९९॥
हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे ।आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥ १०० ॥
हा कुंतिभोज पहा. येथे हा युधामन्यु आला आहे. आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत, ते पहा ॥१-१००॥
View Comments
खूप छान विवेचन आहे.
संत साहित्य वाचन करती असताण खूप छान वाटते पण मला एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे संत साहित्य या aap वर येशू चे बायबल ची जाहिरात का येते ती पण खूप वेळा
अश्या जाहिराती येऊ नये त्यासाठी ज्या काय उपाय योजना असतील त्या कराव्यात पण हे येशु किंवा इतर धर्माच्या पुस्तका च्या जाहिरात येऊ नये
रामकृष्ण हरी
माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी छान अर्थ दिलाय व थोडक्यात आहे
khup chan ani samjnayas sope,jay dhaneshwar mauli
धन्यवाद माउली??
खूप खूप आभार. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
थोडक्यात व समजण्याजोगे आहे. अती सुंदर विवेचन. माउली.
खुप छान खूप दिवसांपासून याच्या शोधात होतो शेवटी काल सापडलं धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी ????
धन्यवाद माउली??
आपले फार मोठे आभार! आपल्या संपुर्ण टिमला अनेकानेक धन्यवाद|||????????
राम कृष्ण हरी
&anaoSvarI saaqa- KraoKr ekdma sarL AaiNa saaoPyaa BaaYaot Aaho. sava- saaQaarna maanasaalaa samaJanaarI Aaho.
jaya jaya ram ÌYNa hrI.
jaya jaya ram ÌYNa hrI.
Thank you very much
राम कृष्ण हरी
very nice mauli thank youuuuuu so muct
jay jay Ramkrishna Hari
very good app.
Kharach atyant uttam aahe. amha sarva bhaktansathi hi ratnapeti khuli kelyabaddal khup khup dhanyavad ?