सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ऑडिओ आणि विडिओ सहित
(ओव्या १ ते १००)
(ओव्या १०१ ते २००)
(ओव्या २०१ ते ३००)
(ओव्या ३०१ ते ४००)
(ओव्या ४०१ ते ५००)
(ओव्या ५०१ ते ६००)
(ओव्या ६०१ ते ७००)
(ओव्या ७०१ ते ८००)
(ओव्या ८०१ ते ९००)
(ओव्या ९०१ ते १०००)
(ओव्या १००१ ते ११००)
(ओव्या ११००१ ते १२००)
(ओव्या १२०१ ते १३००)
(ओव्या १३०१ ते १४००)
(ओव्या १४०१ ते १५००)
(ओव्या १५०१ ते १६००)
(ओव्या १६०१ ते १७००)
(ओव्या १७०१ ते १८११)
वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।
जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ १ ॥
हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याणरूप असलेल्या (कल्याण करणार्या) आणि जन्म व म्हातारपणरूपी मेघांच्या फळीची धूळधाण करणार्या वायुरूपी हे श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-१॥
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ ।
निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥ २ ॥
हे अतिशय सामर्थ्यवान (अहंकारादि) अशुभांच्या समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे अशा वेदशास्त्ररूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फालाची प्राप्ती करून देणार्या हे श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-२॥
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल ।
कलितकाळकौतूहल । कलातीत ॥ ३ ॥
हे स्वरूपत: पूर्ण असणार्या, विषयवासना दवडलेल्यांचे कैवार घेणार्या, कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या, अंशादि विभागापलीकडे असलेल्या, हे श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-३॥
जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल ।
जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥ ४ ॥
हे निरुपाधिका, ज्याचे ठिकाणी जोराचा व विपुल आनंद प्रगट आहे अशा, संपूर्ण दोष नेहेमीच नाहीसे केलेल्या व सर्वास कारण असलेल्या श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-४॥
जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ ।
नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥ ५ ॥
हे स्वयंप्रकाशा, जगद्रूपी ढगाचा गर्भ ज्यात संभवतो, अशा आकाशा स्वर्गादि लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या तसेच संसाराचा फडशा पाडणार्या श्रीगुरो, तुमचा जयजकार असो. ॥१८-५॥
जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ ।
भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥ ६ ॥
हे स्थिर असणार्या, चंचल चित्तास पिऊन पोट मोठे झालेल्या, जगत प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-६॥
जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद ।
शमदम-मदनमदभेद । दयार्णव ॥ ७ ॥
हे अत्यंत शुद्धा, ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती (म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे) अशा, तसेच शमदमेकरून कामाच्या भयाचा नाश करणार्या, दयासागरा, श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-७॥
जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प ।
भक्तभावभुवनदीप । तापापह ॥ ८ ॥
हे विकारी अशा मदनरूपी सापाच्या घमेंडीचा धुव्वा उडवणार्या भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणार्या व तापांचा नायनाट करणार्या, श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-८॥
जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय ।
निजजनजित भजनीय । मायागम्य ॥ ९ ॥
हे अद्वितीया, परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचेच काय ते प्रेम असलेल्या, आपल्या दासांच्या स्वाधीन होऊन बसलेल्या, भजन करण्य़ास योग्य असलेल्या, मायेच्या ताब्यात न सापडणार्या, श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-९॥
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो ।
स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥ १० ॥
कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा (परमात्म स्वरूपास देणार्या कल्पवृक्षा, स्वस्वरूपज्ञानरूपी वृक्षाचे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा, श्रीगुरो, तुमचा जयजयकार असो. ॥१८-१०॥
हे काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें ।
स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ॥ ११ ॥
हे भेदरहित गुरो, असे तुम्ही पृथक् पृथक् अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुति तरी काय करावी ? ॥१८-११॥
जिहीं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें ।
हें जाणें मी म्हणौनि लाजें । वानणा इहीं ॥ १२ ॥
ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करावे त्या त्या विशेषणांनी दाखवलेले जे जे दृश्यस्वरूप ते ते तुमचे रूप नाही, हे मी समजतो व म्हणूनच या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला शरम वाटते. ॥१८-१२॥
परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु ।
जंव न देखे सुधाकरु । उदया आला ॥ १३ ॥
समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही, अशी त्याची प्रसिद्धी आहे, परंतु जोपर्यंत त्याने पूर्णचंद्र उदयाला आलेला पाहिला नाही, तोपर्यंतच ती प्रसिद्धी खरी असते. ॥१८-१३॥
सोमकांतु निजनिर्झरीं । चंद्रा अर्घ्यादिक न करी ।
तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ॥ १४ ॥
महाराज, ऐका, चंद्रकांत मणी आपल्या पाझराने (पाण्य़ाने) चंद्रास आपण होऊन अर्घ्य वगैरे देत नाही, तर ते अर्घ्यादिक देवविण्याचे काम चंद्रच त्या चंद्रकांतमण्याकडून करवितो. ॥१८-१४॥
नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें ।
फुटती तैं हे तयांहि जोगें । धरणें नोहे ? ॥ १५ ॥
वसंत ऋतूच्या संबंधात, झाडांच्या फांद्यास कशी अकस्मात पालवी फुटते, हे कळत नाही, परंतु जेव्हा वसंत ऋतु येतो, तेव्हा ते पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्याही स्वाधीन नसते. ॥१८-१५॥
पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण ? ।
कां जळें शिवतलें लवण । आंग भुले ॥ १६ ॥
सूर्यविकासिनी कमळाला सूर्यकिरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून रहाणार ? अथवा पाण्याच्या संसर्गात आलेले मीठ आपल्या शरीराला विसरते (विरघळते). ॥१८-१६॥
तैसा तूतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें ।
मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा ॥ १७ ॥
त्याप्रमाणे मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मीपणा विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकरेने व्यापला असता त्यास आपली ढेकर आवरून धरता येत नाही ॥१८-१७॥
मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण दवडूनि देशें ।
स्तुतिमिषेंच पां पिसें । बांधलें वाचे ॥ १८ ॥
महाराज, मला तुम्ही तसे केले आहे. आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावले आहे. ॥१८-१८॥
ना येर्हवीं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी ।
तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं ॥ १९ ॥
अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन तेव्हाच माझे हातून गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. ॥१८-१९॥
तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग ।
मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥
आणि महाराज, तुमचे स्वरूप एकरस आहे. मग तुमच्या ठिकाणी गुण व गुणातीत यांची निवड कशी करता येईल ? हे पहा मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले किंवा ते आहे तसेच सबंध ठेवणे चांगले ? ॥१८-२०॥
आणि बाप तूं माय । इहीं बोलीं ना स्तुति होय ।
डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ॥ २१ ॥
आणि तू बाप आहेस, तूच आई आहेस, अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही. कारण की त्या प्रतिपादनात ‘लेकरू’ या उपाधीचा विटाळ आहे. ॥१८-२१॥
जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें ? ।
ऐसें उपाधी उशिटलें । काय वर्णूं ॥ २२ ॥
महाराज, दुसरी एखादी व्यक्ति दास झाल्याने आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्रतिपादण्यात काय अर्थ आहे ? असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टे झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू ? ॥१८-२२॥
जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा ।
तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासी ॥ २३ ॥
हे स्वामिन, तू अंतर्बहि एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस., असेही म्हटले असता आत असणारा जो तू त्या तुला बाहेर घालविला असे होईल. ॥१८-२३॥
म्हणौनि सत्यचि तुजलागीं । स्तुति न देखों जी जगीं ।
मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ॥ २४ ॥
म्हणून महाराज, आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या खर्या स्वरूपायोग्य स्तुतिकरता लागणारी विशेषणे जगामधे मला दिसत नाहीत. कारण की मौनावाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालत नाही. ॥१८-२४॥
स्तुती कांहीं न बोलणें । पूजा कांहीं न करणें ।
सन्निधी कांहीं न होणें । तुझ्या ठायीं ॥ २५ ॥
तुमच्या संबंधाने काही न बोलणे ही स्तुति होय, काही न करणे ही पूजा होय आणि साधकाने आपण जीव व शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे, हीच तुमची जवळीक होय. ॥१८-२५॥
तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली ।
तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां ॥ २६ ॥
तरी पण भ्रमाने भुलून वेडा झालेला मनुष्य जसा बडबडतो, त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो. ते हे गुरुमाऊली तू सहन कर. ॥१८-२६॥
आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावीं माझिये वाग्वृद्धी ।
जे माने हे सभासदीं । सज्जनांच्या ॥ २७ ॥
आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारास ह्यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमति दाखवणारा मोत्यांच्या आंगठीचा मोर्तब (शिक्का) करा. कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतास मान्य होईल. ॥१८-२७॥
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नको हें पुढतपुढती ।
परीसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळां कीजे गा । ॥ २८ ॥
यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे सोने होण्याकरता परिसावर लोखंड किती वेळा घासावयास पाहिजे ? (एकदा घासले की पुरे). ॥१८-२८॥
तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।
तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥
तेव्हा ज्ञानदेव विनंति करून म्हणतात, महाराज, आपली आज्ञा हा आपला प्रसादच आहे. तर आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. ॥१८-२९॥
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।
सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥
(या ओवीपासून ४९ व्या ओवीअखेर अठराव्या अध्यायाचे महत्व सांगतात) महाराज, गीतारूपी रत्नमंदिराचा हा जो अठरावा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा (बनवलेला) कळस आहे व सर्व गीतेचे दर्शन घडविणारा अठरावा अध्याय हा वाटाड्या आहे. ॥१८-३०॥
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥
लोकात तरी अशी समजूत आहे की दूरूनच देवळाचा कळस दिसल्याबरोबर त्या देवळातील देवतेची भेटच (दर्शनच) हस्तगत झाली असे होते. ॥१८-३१॥
तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।
आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥
येथेही (म्हणजे अठराव्या अध्यायाच्या बाबतीतही) तसेच आहे. कारण की या एकाच अध्यायाने सर्व गीताशास्त्र पाहिले असे होते. ॥१८-३२॥
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।
उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥
म्हणून याच कारणाकरता श्रीव्यासांनी गीतारूपी मंदिरावर अठरावा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो. ॥१८-३३॥
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।
तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥
मंदिर बांधण्यात कळसापलीकडे काही काम उरत नाही असे नव्हे काय ? तीच गोष्ट गीतादेखील आपल्या समाप्तीने सांगत आहे. ॥१८-३४॥
व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।
उपनिषदार्थाची माळी- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥
व्यास हे स्वभावत: मोठे बुद्धिमान कारागीर (मोठे सूत्रकार) होते. त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर (असलेल्या) उपनिषदर्थरूपी पठारावर खणावयास आरंभ केला (म्हणजे उपनिषदर्थाचा विचार करण्यास आरंभ केला). ॥१८-३५॥
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।
तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥
तेव्हा धर्म, अर्थ व काम हा त्रिविध पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा असार चाराचुरा निघाला त्याचा महाभारतरूपी कोट गीतामंदिरासभोवती केला. ॥१८-३६॥
माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।
घडिलें पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥
या खाणीमधे आत्मज्ञानरूपी एकजीवाचा (अखंड) दगड निघाला. तो चातुर्याने साफसूफ करून त्याचा श्रीकृष्ण-अर्जुन-संआदरूपी चांगला चिरा तयार केला. ॥१८-३७॥
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया ।
आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥ ३८ ॥
निवृत्तिरूपी ओळंबा पावून सर्व शास्त्रार्थाची पुरणी घालून व्यासांनी त्या चिर्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. ॥१८-३८॥
ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा ।
भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥ ३९ ॥
अशा तर्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असतांना जमीन शुद्द्ध करण्यापासून तो पंधरावा अध्याय संपेपर्यंतचे पंधरा अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले. ॥१८-३९॥
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो ।
सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥ ४० ॥
वरती सोळावा अध्याय हा गळ्यावरील डेर्याचा आकार होय आणि सतरावा अध्याय तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. ॥१८-४०॥
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु ।
उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥ ४१ ॥
त्याच्याही वर अठरावा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस होय. त्यावर गीतादिक शास्त्रांमुळे व्यास हे ध्वजेचे ठिकाणी लागले. (म्हणजे श्रीव्यासांनी गीतादिक शास्त्र केले. या कीर्तीचा वर ध्वज लागला आहे). ॥१८-४१॥
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये ।
तयांचें पुरें दाविताहे । आपुल्या आंगीं ॥ ४२ ॥
म्हणून पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते वढत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे अठरावा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवीत आहेत. ॥१८-४२॥
जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी ।
तेवीं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥ ४३ ॥
मंदिराचे पुरे झालेले काम, कळसाच्या योगाने चोरटे (अपुरे) राहिले नाही (तर पुरे झाले) हे उघड होते. त्याप्रमाणे अठरावा अधाय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवतो. ॥१८-४३॥
ऐसा व्यासें विंदाणियें । गीताप्रासादु सोडवणिये ।
आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥ ४४ ॥
याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदीर मोक्षाकरता तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. ॥१८-४४॥
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया ।
एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ॥ ४५ ॥
कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तनरूपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीतामंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. ॥१८-४५॥
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां ।
घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या ॥ ४६ ॥
कित्येक पुरते अवधानरूपी विडापैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभार्यात प्रवेश करतात. ॥१८-४६॥
ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी ।
परी मोक्षप्रासादीं सरी । सर्वांही आथी ॥ ४७ ॥
ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात. परंतु (या गीतारूपी मंदिराचे ठिकाणी) मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखाच मिळतो. ॥१८-४७॥
समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें ।
तेवीं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ॥ ४८ ॥
(खर्या) श्रीमंताच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पक्वान्न असते, त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो. ॥१८-४८॥
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु ।
म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ॥ ४९ ॥
हे वरील मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णवमंदिर आहे व अठरावा अध्याय हा कळस आहे, असे मी स्पष्ट म्हटले. ॥१८-४९॥
आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी ।
तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥ ५० ॥
आता सतराव्या अध्यायानंतर अठराव्या अध्यायाची उत्पत्ति कशी झाली, तो संबंध डोळ्याला दिसेल असे सांगतो. ॥१८-५०॥
का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक ।
दावी होऊनि एक । पाणीपणें ॥ ५१ ॥
शरीराचे एकत्व न बिघडविता त्याच्यावर स्त्री व पुरुष असे दोन आकार बनवलेले आहेत, हे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसते. ॥१८-५१॥
न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर ।
हें अर्धनारी नटेश्वर- । रूपीं दिसें ॥ ५२ ॥
अथवा गंगायमुना यांचे पाणी ओघाकडे दृष्टी दिली असता वेगवेगळे दिसून येते. परंतु त्या दोन्ही नद्यांचे उदक पाणी या दृष्टीने पाहिले असता एक होऊन दाखवते. (एकच आहे असे दिसते). ॥१८-५२॥
नाना वाढिली दिवसें । कळा बिंबीं पैसे ।
परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नाहीं ॥ ५३ ॥
अथवा चंद्रबिंबाचे ठिकाणी (शुक्ल पक्षातील तिथींच्या मानाने) प्रत्येक दिवसाला अधिक अधिक कला प्राप्त होत असते. परंतु (पौर्णिमेचे दिवशी पाहिले तर) जसे चंद्रबिंबाच्या ठिकाणी तितक्या निरनिराळ्या कलांचे वेगळे थर दिसत नाहीत. ॥१८-५३॥
तैसीं सिनानीं चारीं पदें । श्लोक तो श्लोकावच्छेदें ।
अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर ॥ ५४ ॥
त्याप्रमाणे (या गीतेत) एकापासून एक चरण पृथक् केल्याने, एका श्लोकाचे चार चरण झाले. तसेच एका अध्यायात एका श्लोकाहून दुसरा श्लोक निराळा असा तोडल्याने एकाच अध्यायाचे अनेक श्लोक झाले. त्याचप्रमाणे एक अध्याय संपून दुसर्या अध्यायास आरंभ केला म्हणून (गीतेचे) पुष्कळ निरनिराळे अध्याय झाल्यासारखे खरोखर जरी वाटतात ॥१८-५४॥
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी ।
नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ॥ ५५ ॥
परंतु (पदे, श्लोक व अध्याय यांच्या अनेकतेमुळे ग्रंथात प्रतिपादलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात अनेकत्व येत नाही. रत्नाच्या हारात अनेक रत्ने असली तरी दोरी जशी एकच असते, ॥१८-५५॥
मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे ।
परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥ ५६ ॥
पुष्कळ मोती मिळून एकपदरी हार केला असता त्यास ठिकाणी मोती जरी अनेक असली तरी शोभा एकच असते. ॥१८-५६॥
फुलांफुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।
श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ॥ ५७ ॥
फुले व फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजण्याकरता एक, दोन अशी बोटे घालता येणार नाहीत. या गीतेतील श्लोक व अध्यायांचे तसेच समजावे. (म्हणजे या गीतेत जरी श्लोक व अध्याय वेगवेगळे आहेत तरी त्या सर्वांतून सिद्धांत एकच आहे). ॥१८-५७॥
सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख ।
परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ॥ ५८ ॥
या गीतेत सातशे श्लोक आहेत व अध्यायांची संख्या अठरा आहे. परंतु देवांनी जे सांगितले ते एकच तत्व (ज्ञान) सांगितले, दुसरे नाही. ॥१८-५८॥
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे ।
प्रस्तुत तेणें निर्वाहे । निरूपण आइका ॥ ५९ ॥
आणि मीही ती संगति न सोडता ग्रंथाचे विवरण केले आहे व सांप्रत माझे अठराव्या अध्यायाचे निरूपण तुम्ही याच धोरणाने ऐका. ॥१८-५९॥
तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो ।
जें संपतां श्लोकीं देवो । बोलिले ऐसें ॥ ६० ॥
तर सतराव्या अध्यायाच्या शेवट होण्याच्या वेळी, शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ॥१८-६०॥
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं ।
कर्मे कीजती तितुकीं । असंतें होतीं ॥ ६१ ॥
तरी ब्रह्मनामाविषयीश्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात. ॥१८-६१॥
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु ।
म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ॥ ६२ ॥
हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुना डोलू लागला व मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्यास देवांनी कमी प्रतीचे लेखले आहे असे मला वाटते. ॥१८-६२॥
तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा ।
तेथ नामचि एक पुढां । कां सुझे तया ॥ ६३ ॥
अज्ञानाने आंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या (सर्वव्यापक) ईश्वराला पहात नाही तर अशा स्थितीत त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे ईश्वराचे एक नाव व त्यावर अवललंबून असलेल्या पुढच्या श्रद्धादिक गोष्टी कशा कळणार ? ॥१८-६३॥
आणि रजतमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी ।
ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ? । ॥ ६४ ॥
आणि मनुष्याच्या अंत:करणातून रजोगुण व तमोगुण हे नाहीसे झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल ? ॥१८-६४॥
मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धावणें ।
सांडी पडे खेळणें । नागिणीचें तें ॥ ६५ ॥
(ब्रह्मनामाच्या श्रद्धेशिवाय कर्म करणे, हे कसे घातक असते ते अर्जुन सांगतो). मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे, दोरीवर धावणे अथवा नागिणीबरोबर खेळणे, ह्या गोष्टीदेखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील. ॥१८-६५॥
तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे ।
दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ॥ ६६ ॥
ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय कर्मे तशी घातक आहेत. शिवाय त्या कर्माची प्रवृत्ति दुसरे जन्म देण्याकडे असते. एवढे सर्व कुयोग कर्मात असतात. ॥१८-६६॥
ना विपायें हें उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे ।
येर्हवीं येणेंचि जाये । निरयालया ॥ ६७ ॥
अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाराला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते व कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो. ॥१८-६७॥
कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी ।
आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे ॥ ६८ ॥
कर्मामधे इतक्या पुष्कळ अडचणी आहेत. असे जर आहे तर कर्मठाला मोक्षाकडे जाणे कोठून घडणार ? ॥१८-६८॥
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु ।
आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥ ६९ ॥
तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होवो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो. ॥१८-६९॥
कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोठी नाहीं ।
तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ॥ ७० ॥
जेथे कर्मबाधेच्या (जन्ममरणाच्या) भयाचे मुळीच नाव देखील नसते असे आत्मज्ञान ज्या योगांनी स्वाधीन होईल ॥१८-७०॥
ज्ञानाचें आवाहनमंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र ।
ज्ञान आकर्षितें सूत्र । तंतु जे का ॥ ७१ ॥
ते ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहेत व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सुताचे दोर आहेत ॥१८-७१॥
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग ।
तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ॥ ७२ ॥
असे जे दोन संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास ह्याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू. ॥१८-७२॥
ऐसें म्हणौनि पार्थें । त्यागसंन्यासव्यवस्थे ।
रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ॥ ७३ ॥
असे अर्जुनाने मनात म्हणून त्याग व संन्यास यांचे ज्ञान पृथक्त्वाने व चांगले स्पष्ट कळण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला ॥१८-७३॥
तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली ।
तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥ ७४ ॥
तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णांनी जे भाषण केले, त्यात अठरावा अध्याय प्रगट झाला. ॥१८-७४॥
एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे ।
आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥ ७५ ॥
याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका. ॥१८-७५॥
तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें ।
जाणोनि अंतःकरणें । काणी घेतली ॥ ७६ ॥
तरी त्या पंडुराजाच्या मुलाने (अर्जुनाने) देवाचे बोलणे (सतराव्या अध्यायात) संपलेले पाहिले व तो मनात खिन्न झाला. ॥१८-७६॥
येर्हवीं तत्त्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला ।
परी देवो राहे उगला । तें साहावेना ॥ ७७ ॥
वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता. परंतु आता देव स्वस्थ बसतील हे त्याला सहन होईना. ॥१८-७७॥
वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी ।
अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥ ७८ ॥
वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये (असे त्या वासरास वाटते). एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार असाच आहे. ॥१८-७८॥
तेणें काजेवीणही बोलावें । तें देखीलें तरी पाहावें ।
भोगितां चाड दुणावे । पढियंतयाठायीं ॥ ७९ ॥
त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसतांनाही बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटाते. आवडता विषय एकदा उपभोगला तरी त्याचे उपभोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. ॥१८-७९॥
ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तंव तेचि मूर्ती ।
म्हणौनि करूं लाहे खंती । उगेपणाची ॥ ८० ॥
प्रेमाचा हा प्रकार असा आहे. (आणि) अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे. म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनास बरे वाटेना. ॥१८-८०॥
आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे ।
ते भोगिजे कीं जैसें । आरिसां रूप ॥ ८१ ॥
आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात पाहता येते, त्याप्रमाणे (देणे, घेणे, बोलणे, ऐकणे वगैरे) व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तु प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते. ॥१८-८१॥
मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणें थोके ।
हें कां साहवेल सुखें । लांचावलेया ? ॥ ८२ ॥
मग तो संवाद जर बंद पडला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाचा अनुभव घेत असतांना, ते अनुभव घेणे मधेच बंद पडेल तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटावलेल्या अर्जुनास हे (आत्मवस्तूचे भोगणे बंद पडणे) कसे सहन होईल ? ॥१८-८२॥
यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस ।
मग उपलविलें दुस । गीतेंचें तें ॥ ८३ ॥
याकरता त्याग व संन्यास विचारण्याच्या निमित्ताने ते गीतारूपी वस्त्र (अर्जुनाने) पुन्हा उलगडावयास लावले. ॥१८-८३॥
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे ।
जैं वांसरुचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥
हा अठरावा अध्याय नाही तर ही एका अध्यायाची गीताच आहे. ज्यावेळेला वासरूच दूध काढायला लागेल त्यावेळेला पान्हा सोडण्यास गाईस कितीसा वेळा लागेल ? ॥१८-८४॥
तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं ।
स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥ ८५ ॥
त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीताव्याख्यानाचा आरंभ करावयास भाग पाडले. (यात काही आश्चर्य नाही. कारण) गुरुशिष्यांचा संवाद काय करणार नाही ? ॥१८-८५॥
परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे ।
म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो ॥ ८६ ॥
परंतु तूर्त हे राहू द्या. अर्जुन याप्रमाणे विचारावयास लागला. तो म्हणाला हे जगाच्या नाथा माझी विनंती ऐकावी. ॥१८-८६॥
अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हृषीकेशा, केशिनिषूदना, संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व पृथक्पणे जाणण्याची माझी इच्छा आहे. ॥१८-१॥
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोहीं एक अर्थीं लागु ।
जैसा सांघातु आणि संघु । संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥
अहो महाराज, संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते. संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच (समुदायाचे) जसे ज्ञान होते ॥१८-८७॥
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे ।
आमचेनि तंव मानसें । जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥
त्याग या शब्दाने त्याप्रमाणेच संन्यास या शब्दाने, त्यागच सांगावयाचा आहे, अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत आहे. ॥१८-८८॥
ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु ।
तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं ॥ ८९ ॥
अथवा त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या दोन शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. ॥१८-८९॥
तरी अर्जुना तुझ्या मनीं । त्याग संन्यास दोनी ।
एकार्थ गमलें हें मानीं । मीही साच ॥ ९० ॥
एरवी अर्जुना, तुझ्या मनामधे त्याग व संन्य़ास हे दोन्ही एकार्थवाचक आहेत असे वाटले व एका दृष्टीने हे मीही खरे मानतो. ॥१८-९०॥
इहीं दोहीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी ।
परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि ॥ ९१ ॥
खरोखर त्याग व संन्यास या दोन शब्दांनी निश्चयेकरून त्यागच म्हटला जातो. परंतु यांच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण इतकेच आहे – ॥१८-९१॥
जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे ।
आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥ ९२ ॥
अर्जुना, मुळी कर्मच करावयाचे नाही, ह्या कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणावे आणि कर्म करून त्या कर्माचे जे केवळ फळ टाकणे त्याला त्याग म्हणावे. ॥१८-९२॥
तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ ।
हेंही सांगों विवळ । चित्त दे पां ॥ ९३ ॥
परंतु कोणत्या कर्माचे फल टाकावयाचे व कोणते कर्म मुळीच करायाचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो. तू लक्ष दे. ॥१८-९३॥
तरी आपैसीं दांगें डोंगर । झाडें डाळती अपार ।
तैसें लांबे राजागर । नुठिती ते ॥ ९४ ॥
तरी रानात व डोंगरात आपोआप भिकार (वाईट) झाडे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे चांगल्या बागा व भाताची पिके सहज उगवत नाहीत. ॥१८-९४॥
न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें ।
नाहीं गा राबाउणें । जियापरी ॥ ९५ ॥
ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवते, त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकास पेरणी व राब ही लागतात. ॥१८-९५॥
कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे ।
नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवीं ॥ ९६ ॥
अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात, नदीचा ओघ स्वाभाविक झालेला असतो परंतु विहिर मुद्दाम खणून तयार करावी लागते. ॥१८-९६॥
तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक ।
परी न कामितां कामिक । न निफजे जें ॥ ९७ ॥
त्याप्रमाणे नित्य (स्नानसंध्यादिक) कर्म व नैमित्तिक (श्राद्ध करणे वगैरे कर्म) ही कर्मे स्वाभाविक रीतीने (वेदाज्ञेप्रमाणे) होत असतात. परंतु जे काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता होत नाही. ॥१८-९७॥
श्रीभगवानुवाच
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, काम्यकर्मांचा त्याग म्हणजेच ‘संन्यास’ होय असे ज्ञात्यांचे मत आहे. सर्व कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे ‘त्याग’ होय असे ज्ञाते म्हणतात. ॥१८-२॥
कां कामनेचेनि दळवाडें । जें उभारावया घडे ।
अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥ ९८ ॥
ज्या काम्यकर्मांची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधादिक यज्ञ आहेत ॥१८-९८॥
वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम ।
आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥ ९९ ॥
(आणखी) ज्या काम्यकर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी, गाव वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात व मोठाले गाव वसवतात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे ॥१८-९९॥
ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ ।
जें केलें भोगवी फळ । बांधोनियां ॥ १०० ॥
अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत. त्यांचा उगम केवळ एक फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्यकर्माचे आचरण आपले फळ (कर्मकर्त्यास) अगदी बांधून बळेच भोगावयास लावते. ॥१८-१००॥
देहाचिया गांवा आलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया ।
ना म्हणों नये धनंजया । जियापरी ॥ १०१ ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्ममरणाचे सोहळे भोगण्य़ास नाही म्हणता येत नाही ॥१८-१०१॥
का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें ।
काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे ॥ १०२ ॥
अथवा (ब्रह्मदेवाने) कपाळी जे लिहिलेले असते, ते अरे, जसे काही केले असता पुसता येत नाही, अथवा, कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही ॥१८-१०२॥
केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसे ।
न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ॥ १०३ ॥
ज्याप्रमाणे कर्ज फेडले नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फच्छेने केलेले कर्म फल भोगविण्याकरता धरणे घेऊन बसते. ॥१८-१०३॥
कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता ।
तरी वायकांडें न झुंजतां । लागे जैसें ॥ १०४ ॥
अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहजच काम्यकर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी (समरांगणात) गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो ॥१८-१०४॥
गूळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी ।
आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥ १०५ ॥
गूळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच. ॥१८-१०५॥
काम्यकर्मी हें एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक ।
म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥ १०६ ॥
जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्यकर्मामधे स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्य कर्मांचे ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेऊ नये. ॥१८-१०६॥
किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे ।
तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ॥ १०७ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना पोटात गेलेले विष जसे (वांतीचे औषध घेऊन) ओकून टाकावे, त्याप्रमाणे जे काम्य कर्म आहे त्याचा साधकांनी त्याग करावा. ॥१८-१०७॥
मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसया भंगीं ।
बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ॥ १०८ ॥
मग त्या त्यागाची या जगतामधे अंतरंगी सर्व द्रष्टे लोक (साधु) ‘संन्यास’ या सदरात गणाना करतात. ॥१८-१०८॥
हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें ।
द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें ॥ १०९ ॥
भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे, त्याप्रमाणे हे काम्यकर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय. ॥१८-१०९॥
आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें ।
का मातापितरमरणें । अंकित जे दिवस ॥ ११० ॥
आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन, ती पार्वण नावाची श्राद्धे करण्याचे प्रसंग आणतात अथवा आईबापांच्या मरणाने निश्चित झालेले (श्राद्धाचे) जे दिवस ॥१८-११०॥
अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें ।
तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा ॥ १११ ॥
अथवा अतिथि जेव्हा येतो (तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते ते) अशा अशा वेळी जे करावे लागते ते ते नैमित्तक कर्म समजावे. ॥१८-१११॥
वार्षिया क्षोमे गगन । वसंतें दुणावे वन ।
देहा श्रृंगारी यौवन- । दशा जैसी ॥ ११२ ॥
ज्याप्रमाणे वर्षा ऋतु आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतु आला की वनाची शोभा दुप्पट वाढते अथवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते ॥१८-११२॥
का सोमकांतु सोमें पघळें । सूर्यें फांकती कमळें ।
एथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ॥ ११३ ॥
अथवा चंद्रकांतमणी जसा चंद्राच्या योगाने पझरतो अथवा सूर्यविकासी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, या वरील दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते. दुसरे बाहेरून कोठून येत नाही. ॥१८-११३॥
तैसें नित्य जें का कर्म । तेंचि निमित्ताचे लाहे नियम ।
एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय ॥ ११४ ॥
त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणांचे नियम प्राप्त झाले असता ते नित्यकर्म वाढते व त्या योगाने त्याला ‘नैमित्तिक कर्म’ असे नाव येते. ॥१८-११४॥
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें कां करणीय प्रतिदिनीं ।
परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ॥ ११५ ॥
आणि जे कर्म सकाळी, दोन प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते (यावरून ते अधिक आहे असे वाटेल) परंतु डोळ्यातील दृष्टि जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही, ॥१८-११५॥
कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी ।
नातरी ते दीप्ती । दीपबिंबीं ॥ ११६ ॥
अथवा गति (बाहेरून कोठून) संपादन न करता ती जशी पायात (स्वाभाविक) आहे, अथवा दिव्याच्या ज्योतीमधे प्रकाश जसा स्वाभाविक आहे, ॥१८-११६॥
वासु नेदितां जैसे । चंदनीं सौरभ्य असे ।
अधिकाराचे तैसें । रूपचि जें ॥ ११७ ॥
चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याचे अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणेच स्वरूप आहे. ॥१८-११७॥
नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं ।
एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ॥ ११८ ॥
अर्जुना लोकांमधे नित्यकर्म जे म्हणतात ते हे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. ॥१८-११८॥
हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक ।
म्हणौनि म्हणों पाहती एक । वांझ ययातें ॥ ११९ ॥
हेच नित्यनैमित्तिक कर्म (वर्णाश्रमधर्मानुरूप) करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक निष्फल आहे असे प्रतिपादण्याचा प्रयत्न करतात. ॥१८-११९॥
परी भोजनीं जैसें होये । तृप्ति लाहे भूक जाये ।
तैसे नित्यनैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ॥ १२० ॥
परंतु तृप्ति प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे, ही सर्व अंगांनी फलद्रूप आहेत. ॥१८-१२०॥
कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे ।
यया कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ॥ १२१ ॥
हिणकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग (कस) वाढतो. त्यासारखे या नित्यनैमित्तिक कर्माचे फल आहे असे समजावे. ॥१८-१२१॥
जे प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे ।
तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥ १२२ ॥
कारण की असलेले दोष जडून जातात व आपल्या अधिकाराला (योग्यतेला) चांगला उजाळा चढतो. त्यामुळे तो नित्यनैमित्तिक कर्म करणारा) ताबडतोप सद्गतीला प्राप्त होतो. ॥१८-१२२॥
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ ।
परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्रीं जैसें ॥ १२३ ॥
नित्यनैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके भारी फल आहे. परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो, तसे ते फळ टाकणे जरुर आहे. ॥१८-१२३॥
लता पिके आघवी । तंव च्यूत बांधे पालवीं ।
मग हात न लावित माधवीं । सोडूनि घाली ॥ १२४ ॥
वसंत ऋतु येतो तेव्हा सबंध वेलीला फळे येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते. परंतु वसंतऋतु त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो ॥१८-१२४॥
तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका ।
पाठीं फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥ १२५ ॥
त्याप्रमाणे (कर्माची) मर्यादा न सोडता नित्यनैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. नंतर त्या कर्माचे सर्व फल ओकारीसारखे मानावे ॥१८-१२५॥
यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते ।
एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले ॥ १२६ ॥
अशा या कर्मफलत्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकवले आहेत. ॥१८-१२६॥
हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे ।
निषिद्ध तंव स्वभावें । निषेधें गेलें ॥ १२७ ॥
असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्मांची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहजच टाकले गेले आहे. ॥१८-१२७॥
आणि नित्यादिक जें असे । तें येणें फलत्यागें नसे ।
शिर लोटलिया जैसें । येर आंग ॥ १२८ ॥
आणि नित्य-नैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते. ते कसे तर मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो ॥१८-१२८॥
मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात ।
आत्मज्ञान गिंवसीत । अपैसें ये ॥ १२९ ॥
मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते, त्याप्रमाणे कर्ममात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधीत येते. ॥१८-१२९॥
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं ।
पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ॥ १३० ॥
अशा रीतीने हे दोन्ही, त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. ॥१८-१३०॥
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें ।
तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे ॥ १३१ ॥
अथवा ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला, तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यात पडतो. ॥१८-१३१॥
जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख ।
कां अन्न न मानितां भूक । मारी ना काय ? ॥ १३२ ॥
रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते, ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते. अथवा (भुकेचे वेळी) जर अन्नाचा आदर केला नाही तर भूक मारणार नाही काय ? ॥१८-१३२॥
म्हणौनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें ।
त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ॥ १३३ ॥
म्हणून त्याग करण्य़ास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये. व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा धरू नये. ॥१८-१३३॥
चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझें ।
न देखती सर्वत्र दुजें । वीतराग ते ॥ १३४ ॥
त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते. (म्हणजे त्या त्यागानेच तो कर्मबंधात पडतो). (टाळावयाच्या गोष्टीस) सर्व वेळी तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टींकडे बघतही नाहीत. (म्हणजे निषिद्ध कर्मांकडे वळतही नाहीत). ॥१८-१३४॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥ ३ ॥
कर्म दोषवत् (बंधक) म्हणून त्याज्य होय से कित्येक पंडित सांगतात, यज्ञ, दान, तप हे कर्म त्याज्य नाही असे दुसरे कोणी सांगतात. ॥१८-३॥
एकां फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधकें ।
जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ॥ १३५ ॥
कित्येकास फलाची इच्छा केल्यावाचून राहवत नाही. (ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी) लोक कर्माला बंधनकारक असे म्हणतात. (त्यास जग हसले म्हणजे) तो जगाला भांडखोर म्हणतो. ॥१८-१३५॥
कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया ।
आंगा न रुसे कोढिया । मासियां कोपे ॥ १३६ ॥
अथवा अर्जुना, जिव्हेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो अथवा रक्तपितीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागावता उलट माशांवर रागावतो ॥१८-१३६॥
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ ।
मग निर्णयो देती केवळ । त्यजावें ऐसा ॥ १३७ ॥
त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय देतात. ॥१८-१३७॥
एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक ।
जे यावांचूनि शोधक । आन नसे ॥ १३८ ॥
कित्येक (पूर्व-मीमांसक) असे म्हणतात की यज्ञादिक कर्मे अवश्य करावीतच. कारण यावाचून शुद्धि घडवून आणणारे दुसरे साधन नाही. ॥१८-१३८॥
मनशुद्धीच्या मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं ।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ॥ १३९ ॥
मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याचे कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याचे कामी आळस करू नये ॥१८-१३९॥
भांगार आथी शोधावें । तरी आगी जेवी नुबगावें ।
कां दर्पणालागीं सांचावें । अधिक रज ॥ १४० ॥
(हिणाकस) सोने जर शुद्ध करावयाचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये. अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ, चुना वगैरे साठवून ठेवावी. ॥१८-१४०॥
नाना वस्त्रें चोख होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं ।
तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥ १४१ ॥
अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल, तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून चालणार नाही. ॥१८-१४१॥
तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणौनि न न्यावीं अव्हेरें ।
कां अन्नलाभें अरुवारें । रांधितिये उणें ॥ १४२ ॥
त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ कसा होईल ? ॥१८-१४२॥
इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधिती बुद्धी ।
ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ॥ १४३ ॥
अशा अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्माच्या ठिकाणी बुद्धीस जखडून टाकतात. (म्हणजे कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात) अशा रीतीने अमेळात पडून राहिला (म्हणजे त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच झाला नाही). ॥१८-१४३॥
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे ।
तैसें बोलों गोमटें । अवधान देईं ॥ १४४ ॥
तर आता ज्या योगाने हा त्यागासंबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो. तू चांगले लक्ष देऊन ऐक. ॥१८-१४४॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥ ४ ॥
हे भरतोत्तमा, त्यापैकी त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा त्याग तीन प्रकारचा सांगितला आहे. ॥१८-४॥
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा ।
तया त्रिविधाही बरवा । विभाग करूं ॥ १४५ ॥
तरी अर्जुना, या कर्मात्यागाच्या बाबतीत त्याग तीन प्रकारचा आहे असे समज. या तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. ॥१८-१४५॥
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर ।
तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ॥ १४६ ॥
त्यागाचे तीन प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगावयाचे आहेत, तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्यार्थाचे सार एवढे आहे असे समज. ॥१८-१४६॥
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जें अलोट माने त्रिशुद्धी ।
निश्चयतत्त्व तें आधीं । अवधारीं पां ॥ १४७ ॥
जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ, त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पटते, ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. ॥१८-१४७॥
तरी आपुलिये सोडवणें । जो मुमुक्षु जागों म्हणे ।
तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ॥ १४८ ॥
तर (संसारबंधनापासून) आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षु म्हणतो, त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे. ॥१८-१४८॥
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ ५ ॥
यज्ञ, दान, तप हे कर्म त्याज्य नाही, ते केलेच पाहिजे. (कारण) यज्ञ, दान व तप ही फलेच्छा टाकून करणार्यांना चित्त शुद्ध करणारी आहेत. ॥१८-५॥
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें ।
तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ॥ १४९ ॥
ते हे की यज्ञ, दान, तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत, ती कर्मे टाकू नयेत, ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणार्याने पाऊला पुढे पाऊल टाकणे (चालणे) सोडू नये. ॥१८-१४९॥
हारपलें न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे ।
कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणें जेवीं ॥ १५० ॥
हरवलेली वस्तु जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये. अथवा तृप्ति झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये ॥१८-१५०॥
नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां ।
कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ॥ १५१ ॥
(नदीच्या किनार्याला न पोहोचता जसा होडीचा त्याग करू नये अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये, किंवा आपली ठेवलेली वस्तु दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा त्याग करू नये ॥१८-१५१॥
तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी ।
तंव नोहावें यागादिकीं । उदासीन ॥ १५२ ॥
त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही, तोपर्यंत यज्ञादिक कर्मांविषयी उदासीन होऊ नये. ॥१८-१५२॥
तरी स्वाधिकारानुरुपें । तियें यज्ञदानें तपें ।
अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिकेंवर ॥ १५३ ॥
(ती टाकू तर नयेत पण) आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ, दान, तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीतच. ॥१८-१५३॥
जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये ।
तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागीं ॥ १५४ ॥
कारण की चालणे जसे जलद होईल, तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता (विश्रांतिकरताच) कारण होतो, त्याचप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरता असतो. ॥१८-१५४॥
अधिकें जंव जंव औषधी । सेवनेची मांडी बांधी ।
तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥ १५५ ॥
(एखादा रोगी मनुष्य) औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. ॥१८-१५५॥
तैसीं कर्में हातोपातीं । जैं कीजती यथानिगुती ।
तैं रजतमें झडती । झाडा देऊनी ॥ १५६ ॥
त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा (चित्तावरचे) रजोगुण व तमोगुण (चंचलता व पापवासना) साफ नाहीसे होतात. ॥१८-१५६॥
कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे ।
तैं कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥ १५७ ॥
अथवा हिणकस सोन्याला वरचेवर क्षाराची पुटे देणे जेव्हा घडते, तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. ॥१८-१५७॥
तैसें निष्ठा केलें कर्म । तें झाडी करूनि रजतम ।
सत्त्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ॥ १५८ ॥
त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म (चित्तावरील) रजतम नाहीसे करून अंत:करणशुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभावाला आणते. ॥१८-१५८॥
म्हणौनियां धनंजया । सत्त्वशुद्धी गिंवसितया ।
तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ॥ १५९ ॥
अर्जुना, म्हणून अंत:करणशुद्धीची इच्छा करण्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. ॥१८-१५९॥
तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे ।
एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मेचि ॥ १६० ॥
तीर्थाच्या योगाने बाहेरील (शरीरावरील) मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते, त्याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. ॥१८-१६०॥
तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसीं ।
कीं अंधालागीं डोळ्यांसी । सूर्यु आला ॥ १६१ ॥
तहानेने पीडलेल्या मनुष्यास मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळईबरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयीकरता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रगट व्हावा ॥१८-१६१॥
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली ।
निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ॥ १६२ ॥
नदीत बुडणार्याचे रक्षण करण्याकरता नदीच जशी धावून यावी अथवा पडणाराविषयी जसा पृथ्वीसच कळावळा यावा किंवा मरणाराला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे ॥१८-१६२॥
तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता ।
जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ॥ १६३ ॥
अर्जुना, मारक जे विष, ते रसायनरूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मांनीच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवले जाते. ॥१८-१६३॥
तैसीं एके हातवटिया । कर्में कीजती धनंजया ।
बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ॥ १६४ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यत: बंधच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे. त्या हातवटीने केलेली कर्मे सोडविण्याला (मुक्त करण्याला) कारणीभूत होतात. ॥१८-१६४॥
आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी ।
जया कर्मातें किरीटी । कर्मचि रुसे ॥ १६५ ॥
अर्जुना, ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच कर्माला नाहीसे करते, ती चांगली हातवटी आता तुला सांगू. ॥१८-१६५॥
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ ६ ॥
मात्र हे पार्था, ही कर्मे आसक्ति (कर्तृत्वमद) आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असा हे पार्था, माझा निश्चित व उत्तम निरोप आहे. ॥१८-६॥
तरी महायागप्रमुखें । कर्मे निफजतांही अचुकें ।
कर्तेपणाचें न ठाके । फुंजणें आंगीं ॥ १६६ ॥
तर पंचमहायज्ञादि कर्मे बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामधे मुळीच रहात नाही. ॥१८-१६६॥
जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे ।
ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवीं ॥ १६७ ॥
जो मोलाने तीर्थयात्रेला जातो, त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो (म्हणून) त्याच्या अंत:करणात आनंद होत नाही ॥१८-१६७॥
कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया ।
तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥ १६८ ॥
अथवा (आपल्या) राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी नोकर (दुसर्या) राजाशी लढतो, त्याच्या मनात ‘मी त्या राजास जिंकणारा’ असा अभिमान येत नाही. ॥१८-१६८॥
जो कासें लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे ।
पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ॥ १६९ ॥
जो दुसर्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व रहात नाही, अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय ‘मी दान करणारा’ असा गर्व मिरवत नाही ॥१८-१६९॥
तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें ।
कृत्यजातांचें मोहरें । सारीजती ॥ १७० ॥
त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणरे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. ॥१८-१७०॥
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा ।
तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ॥ १७१ ॥
आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते, त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये. ॥१८-१७१॥
आधींचि फळीं आस तुटिया । कर्मे आरंभावीं धनंजया ।
परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ॥ १७२ ॥
अर्जुना, आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा, ते कसे तर ज्याप्रमाणे दुसर्याच्या मुलाकडे दाई ज्या (निर्हेतुक) दृष्टीने पहाते त्याप्रमाणे. ॥१८-१७२॥
पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा ।
तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ॥ १७३ ॥
पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही, त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत. ॥१८-१७३॥
सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी ।
किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ॥ १७४ ॥
ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गाई सांभाळतो. फार काय सांगावे ? कर्मफलाचे ठिकाणी तसे करावे. (कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न धरता कर्मे करावीत). ॥१८-१७४॥
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी ।
आपणा आपुलिया गांठी । लाहेची तो ॥ १७५ ॥
अशा युक्तीने जे कर्म घडते, त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. ॥१८-१७५॥
म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु ।
कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ॥ १७६ ॥
म्हणून फलाचा संबंध (इच्छा) सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत, हा माझा (सर्वांना) चांगला निरोप आहे. ॥१८-१७६॥
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला ।
तेणें पुढतपुढतीं या बोला । आन न कीजे ॥ १७७ ॥
जो जीव संसारबंधाने दु:ख पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खपट करीत आहे, त्याने या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरे काही करू नये, असे वारंवार सांगणे आहे. ॥१८-१७७॥
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥ ७ ॥
नित्यकर्माचा संन्यास करणे योग्य नाही, मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग असे म्हणतात. ॥१८-७॥
नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें ।
तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी ॥ १७८ ॥
अथवा अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावीत, त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो ॥१८-१७८॥
तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें ।
शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें ॥ १७९ ॥
त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसे डोकेच तोडावे तसे हे करणे आहे. ॥१८-१७९॥
हां गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये ।
कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ॥ १८० ॥
अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तर तो रस्ता पाय चालून संपवतील, ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे पायच तोडावेत काय ? ॥१८-१८०॥
भुकेलियापुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह ।
तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हल्या ॥ १८१ ॥
भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने लंघनाचा विचार न करता जसे ते ताटा लाथेने उडवावे, ॥१८-१८१॥
तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में ।
हे तामसु नेणें भ्रमें । माजविला ॥ १८२ ॥
त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य, कर्माचे बंधन, कर्म करण्याच्या हातवटीने कर्मे करून नाहीसे करावे, हे जाणत नाही. ॥१८-१८२॥
कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा ।
तरी झणें आतळा त्यागा । तामसा तया ॥ १८३ ॥
तर उलट वर्णाश्रमधर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. ॥१८-१८३॥
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८ ॥
कर्म दु:खरूप आहे म्हणून त्याचा शरीरत्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो (राजस त्याग होय), त्या राजस त्याग करणार्यास त्यागाचे फळ मिळात नाही. ॥१८-८॥
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे ।
परी करितया उमजे । निबरपणा ॥ १८४ ॥
अथवा आश्रमधर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्यास सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमजते, परंतु करण्याच्या त्रासाला कंटाळतो. ॥१८-१८४॥
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड ।
जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥ १८५ ॥
कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहात असतांना (प्रथम) जशी जड वाटते. ॥१८-१८५॥
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु ।
तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥ १८६ ॥
प्रथम (कडू) लिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माचा अलिकडला शेवट (आरंभाची बाजू) त्रासदायक असतो ॥१८-१८६॥
कां धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग ।
भोजनसुख महाग । पाकु करितां ॥ १८७ ॥
गाय स्वरूपत: चांगली असते, परंतु शिंगाचा (मारकेपणाचा) दोष तीत आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्यांच्या फांद्यांची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. ॥१८-१८७॥
तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अति विषम ।
म्हणौनि तो तें श्रम । करितां मानी ॥ १८८ ॥
त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते. म्हणून तेच तेच वारंवार करतांना तो श्रम मानतो. ॥१८-१८८॥
येर्हवीं विहितत्त्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं ।
तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही ॥ १८९ ॥
वास्तविक पहाता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्म करण्यास आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले, तर जसा अग्नीने पोळालेला मनुष्य अग्नीला टाकून देतो, त्याप्रमाणे आरंभलेलेही कर्म तो मध्येच टाकतो. ॥१८-१८९॥
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुतीं भाग्यविशेखीं ।
मा जाचूं कां कर्मादिकीं । पापिया जैसा ? ॥ १९० ॥
तो म्हणतो, देहासारखी वस्तु फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्मादिकांचा शीण का करू ? ॥१८-१९०॥
केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें ।
आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग ? ॥ १९१ ॥
केलेले कर्म काही फल देईल परंतु तसले उधार मला नको. सांप्रत हातात असलेले (उपलब्ध) उत्तम भोग भोगावेत, हेच बरे नाही काय ? ॥१८-१९१॥
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा ।
सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥ १९२ ॥
वीरश्रेष्ठा अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो, हे पहा तो राजस त्याग होय. ॥१८-१९२॥
येर्हवीं तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे ।
जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा ॥ १९३ ॥
वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खर्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ॥१८-१९३॥
कां बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकीं निमाले ।
हें म्हणों नये जाहलें । दुर्मरणचि ॥ १९४ ॥
अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले, ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये. तर त्यांचा तो मृत्यु वाईट प्रकरणातच जमा होय. ॥१८-१९४॥
तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभे ।
तेणें साच न लभे । त्यागाचें फळ ॥ १९५ ॥
त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याचे हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत. तो त्यावर पाणी सोडतो. (तो कर्मे टाकतो). परंतु ह्या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खर्या त्यागाचे फळ मिळत नाही. ॥१८-१९५॥
किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें ।
तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ॥ १९६ ॥
फार काय सांगावे ? आत्मज्जानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रात:काळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो. ॥१८-१९६॥
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया ।
तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥ १९७ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, सर्व क्रिया आपल्या कारणांसह (अज्ञानासह) नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ॥१८-१९७॥
तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना ।
म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥ १९८ ॥
ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणार्याला (राजस त्याग्याला) मिळत नाही. म्हणून तो राजस त्याग होय. तो खरा त्याग आहे असे मानू नका. ॥१८-१९८॥
तरी कोणे पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे ।
हेंही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥ १९९ ॥
तर कोणत्या त्यागाने ते मोक्ष फळ घरात घुसते (आपण होऊन मिळाते) हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. ॥१८-१९९॥
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९ ॥
हे अर्जुना, कर्तव्य म्हणून, जे नित्यकर्म आसक्ति (कर्तृत्वमद) सोडून आणि फलाकांक्षा सोडून केले जाते, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. ॥१८-९॥
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें ।
तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ॥ २०० ॥
तरी आपल्या वर्णाश्रमधर्मानुसार जे कर्म स्वाभविक रीतीने आपल्या वाट्याला आले असेल, ते कर्म, शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार तो त्या कर्मावर चढवून (शास्त्राला मान देऊन यथासांग आचरतो). ॥१८-२००॥
परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें ।
तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥ २०१ ॥
परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही मनातून टाकतो व त्याच प्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. ॥१८-२०१॥
पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायीं अर्जुना ।
केलिया दोनी पतना । कारण होती ॥ २०२ ॥
अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अध:पाताला कारणीभूत होतात. ॥१८-२०२॥
तरी दोनीं यें त्यजावीं । मग माताची ते भजावी ।
वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ? ॥ २०३ ॥
तरी या दोन्ही गोष्टी आईसंबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गाईचे एक मुख अपवित्र, म्हणून सगळी गायच टाकावी का ? ॥१८-२०३॥
आवडतियेही फळीं । असारें साली आंठोळीं ।
त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ? ॥ २०४ ॥
आपल्या आवडत्या फळात साल व आठोळी (बी) ही दोन्ही असार आहेत, तेव्हा या दोन असार गोष्टींकरता सर्व फळाचा त्याग कोण करील काय ? ॥१४-२०४॥
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु ।
या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥ २०५ ॥
त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार व आणि कर्मफलाची लालसा या दोहोंचेच नाव कर्मबंध आहे. ॥१५-२०५॥
तरी या दोहींच्या विखीं । जैसा बापु नातळे लेंकीं ।
तैसा हों न शके दुःखी । विहिता क्रिया ॥ २०६ ॥
तर ज्याप्रमाणे बाप लेकीसंबंधाने विषयवासना टकून तिचे सांगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यास दु:खी होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्वमद व फलास्वाद टाकून केवल कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दु:खी होत नाही. ॥१८-२०६॥
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु ।
सात्विक ऐसा डगरु । यासींच जगीं ॥ २०७ ॥
ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते, तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे व अर्जुना सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. ॥१८-२०७॥
आतां जाळूनि बीज जैसें । झाडा कीजे निर्वंशें ।
फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ॥ २०८ ॥
जसे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे, त्याप्रमाणे ज्याने फल टाकून कर्म टाकले आहे ॥१८-२०८॥
लोह लागतखेंवो परीसीं । धातूची गंधिकाळिमा जैसी ।
जाती रजतमें तैसीं । तुटलीं दोन्ही ॥ २०९ ॥
त्या परिसाला लोखंड लागताक्षणीच जशी त्याची गंज व काळेपणा ही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. ॥१८-२०९॥
मग सत्त्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे ।
तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ॥ २१० ॥
मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. तेव्हा मृगजलाची अवस्था संध्याकाळी जशी होते (ते कोठेच दिसेनासे होते) ॥१८-२१०॥
तैसा बुद्ध्यादिकांपुढां । असतु विश्वाभासु हा येवढा ।
तो न देखे कवणीकडां । आकाश जैसें ॥ २११ ॥
जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही ॥१८-२११॥
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १० ॥
बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी, अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्माचे ठिकाणी आसक्त होत नाही. ॥१८-१०॥
म्हणौनि प्राचिनाचेनि बळें । अलंकृतें कुशलाकुशलें ।
तियें व्योमाआंगीं आभाळें । जिरालीं जैसीं ॥ २१२ ॥
म्हणून प्रारब्धकर्माच्या बळाने बरीवाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाचे अंगी जसे ढग विरून जातात ॥१८-२१२॥
तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरीटी ।
म्हणौनि सुखदुःखीं उठी । पडेना तो ॥ २१३ ॥
त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात. म्हणून तो सुखदु:खाच्या योगाने हर्षविषादाला पावत नाही. ॥१८-२१३॥
तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षें करावें ।
कां अशुभालागीं होआवें । द्वेषिया ना ॥ २१४ ॥
त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे अथवा (अशुभ कर्म जाणावे व मग) त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना ? ॥१८-२१४॥
तरी इयाविषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं ।
जैसा स्वप्नाच्या ठायीं । जागिन्नलिया ॥ २१५ ॥
तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदु:खे ही दोन्ही जशी मिथ्याच असतात, त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका (भ्रांति) नसते. ॥१८-२१५॥
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता ।
नेणें तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥ २१६ ॥
म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म व कर्ता या द्वैतभावाची वार्ता देखील कानावर येत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. ॥१८-२१६॥
ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा ।
अधिकें बांधिती अन्यथा । सांडिलीं तरी ॥ २१७ ॥
अर्जुना, अशा रीतीने कर्मे टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्यरीतीने टाकली असता ती अधिक बांधतात. ॥१८-२१७॥
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ ११ ॥
पूर्णपणे त्याग करने देहधार्६यास सक्य नाही. परंतु जो कर्माफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. ॥१८-११॥
आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ २१८ ॥
आणि अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्य़ाला कंटाळा करतात, ते खेडवळ (अज्ञानी) होत. ॥१८-२१८॥
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? ।
केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥ २१९ ॥
मातीचा त्याग करून मडके काय करील ? वस्त्र तंतूचा त्याग कसा करील ? ॥१८-२१९॥
तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी ।
कीं तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्नीपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल ? (अथवा) तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय ? ॥१८-२२०॥
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी ? ।
द्रवपण सांडूनि पाणी । कें राहे तें ? ॥ २२१ ॥
हिंग जरी घाणीला कंटाळला तरी सुवासिकपणा कोठून आणील ? पाणी ओलेपणा सोडून कसे राहील ? ॥१८-२२१॥
तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे ।
तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ? ॥ २२२ ॥
त्याचप्रमाणे (हा विहितकर्माचा त्याग करणारा) जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे, तोपर्यंत कर्मत्यागाचे वेड तरी काय कामाचे ? ॥१८-२२२॥
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसों ये वेळोवेळा ।
मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ? ॥ २२३ ॥
आपण आपल्या कपाळाला गंध लावलेले असते. म्हणून ते (वेडेवाकडे असले तर) वारंवार पुसता येते. परंतु (कपाळाच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे) कपाळ काढून दुसरे नीट बसवता येईल काय ? ॥१८-२२३॥
तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें ।
परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडील गा ? ॥ २२४ ॥
त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते, परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे, तेव्हा ते कर्म टाकता येईल काय ? ॥१८-२२४॥
जें श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी ।
कांहीं न करणेंयाचि परी । होती जयाची ॥ २२५ ॥
जे (स्वाभाविक कर्म) श्वासोच्छ्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यात सारखा चालू असतो, ॥१८-२२५॥
या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें ।
जितां मेलया न ठाके । इया रीती ॥ २२६ ॥
अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच (जीवाच्या मागे) लागले आहे (ते इतके की) जिवंत असतांना अथवा मेल्यावरही बंद पडत नाही. ॥१९-२२६॥
यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं ।
जे करितां न जाइजे हारीं । फळाशेचिये ॥ २२७ ॥
या विहित कर्माला टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे, ऐक. तो हा की विहित कर्म करीत असतांना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये. ॥१८-२२७॥
कर्मफळ ईश्वरीं अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपें ।
तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका ॥ २२८ ॥
कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रगट होते व त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो ॥१८-२२८॥
तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नाशे ।
पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय ॥ २२९ ॥
त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा (कर्माचा) त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. ॥१८-२२९॥
म्हणौनि इयापरी जगीं । कर्में करितां मानूं त्यागी ।
येर मुर्छने नांव रोगी । विसांवा जैसा ॥ २३० ॥
म्हणून जगामधे जो या प्रकाराने कर्म करणारा असेल, त्याला आम्ही त्यागी मानू. याहून इतर त्याग म्हणजे रोग्याला मूर्च्छा आली असता रोगी विसावा घेतो असे म्हणण्यासारखे आहे. ॥१८-२३०॥
तैसा कर्मीं शिणे एकीं । तो विसांवो पाहे आणिकीं ।
दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें ॥ २३१ ॥
त्याप्रमाणे एका कर्माचे ठिकाणी दु:ख झाले असता तो दुसर्या कर्मात विसावा घेण्यास पहातो, हे त्याचे करणे म्हणजे जसा दांडक्याचा मार बुक्क्यांच्या मारावर घालवावा तसे आहे. ॥१८-२३१॥
परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं ।
जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म ॥ २३२ ॥
परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्मपलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म्यस्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खराखरा त्यागी होय. ॥१८-२३२॥
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२ ॥
जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर अनिष्ट (नरकादि) इष्ट (स्वर्गादि) अथवा मित्र (मनुष्यलोकादि) असे तीन प्रकारचे कर्मफल मिळते. पण जे (ज्ञानप्रधान) संन्यासी आहेत त्यांना ते कर्लफम कधीच बाधू शकत नाही. ॥१८-१२॥
येर्हवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया ।
समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥ २३३ ॥
अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे कर्मफलाची आशा सोडीतच नाहीत तेच या तीन प्रकारच्या कर्माच्या फलाला भोगावयास पात्र होतात. ॥१८-२३३॥
आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता ।
तो सुटे कीं प्रतिग्रहीता । जांवई शिरके ॥ २३४ ॥
आपणच मुलीला जन्म देऊन (कन्यादानाचे वेळी ही मुलगी) आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो (कन्यादानाच्या वेळी असे म्हणून) तो (मुलीला जन्म देणारा बाप तिच्या मायापाशातून) मुक्त होतो व दान घेणारा जावई (आपली म्हणून तिला पत्करल्यामुळे मायापाशात) अडकतो. ॥१८-२३४॥
विषाचे आगरही वाहती । तें विकितां सुखें लाभे जिती ।
येर निमालें जे घेती । वेंचोनि मोलें ॥ २३५ ॥
जे विषाच्या शेतांचीही लागवड करतात, ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात आणि दुसरे जे पैसे खर्च करून (ते विष, अफू वगैरे) विकत घेतात ते मरतात. ॥१८-२३५॥
तैसें कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू ।
एथ न शके आवरूं । दोहींतें कर्म ॥ २३६ ॥
त्याप्रमाने कर्तृत्व- अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा सोडून कर्म करो तथापि त्या दोघांसही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही. ॥१८-२३६॥
वाटे पिकलिया रुखाचें । फळ अपेक्षी तयाचें ।
तेवीं साधारण कर्माचें । फळ घे तया ॥ २३७ ॥
रस्त्यावरील पिकलेल्या (आम्र) वृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फल असते (म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते ॥१८-२३७॥
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामीं न रिघे ।
जे त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें ॥ २३८ ॥
परंतु (तीन प्रकारचे कर्म) करून जो फलाशा ठेवीत नाही, तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही, कारण की त्रिविध जग हे सर्व कर्माचे फल आहे. ॥१८-२३८॥
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर ।
आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे ॥ २३९ ॥
देव, मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात आणि हे तीन प्रकार तर मूर्तिमंत कर्मफलच आहे. ॥१८-२३९॥
तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट ।
आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें ॥ २४० ॥
तेच कर्मफल एक अनिष्ट आहे. एक ते केवळ इष्ट आहे व एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे तीन प्रकारचे कर्मफल आहे. ॥१८-२४०॥
परी विषयमंतीं बुद्धी । आंगीं सूनि अविधी ।
प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं ॥ २४१ ॥
परंतु जे विष्यासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवळणी पडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात ॥१८-२४१॥
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट ।
तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ ॥ २४२ ॥
तेव्हा (त्या पुरुषास) जंत, किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात, त्यास अनिष्ट कर्माचे फळ म्हणावे. ॥१८-२४२॥
कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां ।
सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें ॥ २४३ ॥
अथवा स्वधर्माला मान देऊन जे पुण्यकर्म केले जाते ॥१८-२४३॥
तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची ।
तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥ २४४ ॥
हे अर्जुना, तेव्हा इंद्रादि देवांचे देह प्राप्त होतात, त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे. ॥१८-२४४॥
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें ।
उठी दोंही वेगळें । दोहीं जिणतें ॥ २४५ ॥
आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते, तेथे आंबट व गोड या दोन्ही रसांहून वेगळा पण या दोन्हीला स्वादाने मागे टाकणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. ॥१८-२४५॥
रेचकुचि योगवशें । होय स्तंभावयादोषें ।
तेवीं सत्यासत्य समरसें । सत्यासत्यचि जिणिजे ॥ २४६ ॥
जसे योगमार्गात योगाभ्यासाने रेचक (वाहणारा वायूच) थांबवला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास (वायूच्या निश्चलतेस) कारणीभूत होतो, तसेच सत्य व असत्य यांची सरभेसळ झाली असता म्हणजे असत्यास जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते. ॥१८-२४६॥
म्हणौनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें ।
तेणें मनुष्यत्व लाभे । तें मिश्र फळ ॥ २४७ ॥
म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो. ते मिश्र फल होय. ॥१८-२४७॥
ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेसें जगीं ।
हें न सांडी तयां भोगीं । जें सूदले आशा ॥ २४८ ॥
याप्रमाणे तीन प्रकारच्या रीतीने जगामधे कर्मफळ मांडलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहेत त्यास हे कर्मफल सोडीत नाही. ॥१८-२४८॥
जेथें जिव्हेचा हातु फांटे । तंव जेवितां वाटे गोमटें ।
मग परीणामीं शेवटें । अवश्य मरण ॥ २४९ ॥
जीभेचे स्वाद घेणे जसजसे वाढत जाते तसतसे गोड वाटते. परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे (अजीर्ण होऊन) मरणाची बिनचूक प्राप्ति हा होय, ॥१८-२४९॥
संवचोरमैत्री चांग । जंव न पविजे तें दांग ।
सामान्या भली आंग । न शिवे तंव ॥ २५० ॥
जेथपर्यंत अरण्य लागले नाही, तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या चांगली. ॥१८-२५०॥
तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी ।
पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥ २५१ ॥
त्याप्रमाणे शरीराने कर्मे करीत असतांना मोठेपणाची भरभराट होते, नंतर मरणाचे वेळी त्यास केलेल्या कर्मांची फले एकदम प्राप्त होतात. ॥१८-२५१॥
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया ।
न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥ २५२ ॥
समर्थ असून सावकार आहे आणि तो मुदतीला पैसे मागावयास आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय जात नाही, त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. ॥१८-२५२॥
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे ।
पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥ २५३ ॥
मग कणासातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते. पुन्हा त्या कणसातील दाणे जमिनीवर पडतात. पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात ॥१८-२५३॥
तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय ।
चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ॥ २५४ ॥
त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसर्या कर्मफलांना उत्पन्न करीत रहातात. चालू लागले की एक पाय जसा दुसर्या पायाला जिंकून पुढे जात असतो ॥१८-२५४॥
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ।
तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥ २५५ ॥
उताराची होडी ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडील काठ होय ( कारण तिला पुन्हा दुसर्या तीराकडे जावयाचे असते), त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही. ॥१८-२५५॥
पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे ।
एवं गोंविले संसारें । अत्यागी ते ॥ २५६ ॥
अगा अर्जुना, कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत रहाते, याप्रमाणे कर्मफालाची आशा न सोडल्यास जन्ममरणाचे चक्र आपल्या फेर्यात गुरफटून घेते. ॥१८-२५६॥
येर्हवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें ।
तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ॥ २५७ ॥
एरवी जाईच्या फुलाचे उमलणे म्हणजेच जसे त्या फुलाचे सुकणे होय त्याप्रमाणे ज्यांना फलाशा टाकून कर्मे करून (फलभोगाच्या दृष्टीने) कर्मे केली नाहीत असे केले. ॥१८-२५७॥
बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे ।
तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ॥ २५८ ॥
बियाचे धान्य जेव्हा पोटगीस खर्च होते, तेव्हा वाढणारा शेतकीचा उदीम नाश पावतो, त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम (फलाची वाढ) संपवून टाकले आहे ॥१८-२५८॥
ते सत्त्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें ।
सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ॥ २५९ ॥
तेव्हा त्यांना अंत:करणशुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्रीगुरूंच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला म्हणजे भरभराटीस आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते. ॥१८-२५९॥
तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे ।
एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ॥ २६० ॥
जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे तीन प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते, ते त्यावेळी नाहीसे होते. त्यावेळी स्वाभाविकपणेच भोक्ता व भोग्य हे सर्व प्रकार पार तेथे मावळलेले असतात. ॥१८-२६०॥
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा ।
तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥ २६१ ॥
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास (कर्मत्याग) साधला ते कर्मफलभोगाच्या (जन्ममरणाच्या) त्रासापासून मुक्त झाले. ॥१८-२६१॥
आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे ।
तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ? ॥ २६२ ॥
आणि त्या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टि (वृत्ति) पोहोचते, तेव्हा कर्म हे एक असे आहे, अशी दृष्टि शिल्लक रहाते काय ? म्हणजे तेव्हा कर्म म्हणून काही एक निराळे आहे असे कोठे दिसते ?) ॥१८-२६२॥
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती ।
कां पाहालेया राती । आंधारें उरे ? ॥ २६३ ॥
भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची केवळ माती होते. अथवा रात्र उजाडल्यावर काळोख राहातो काय ॥१८-२६३॥
जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे ? ।
दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां ? ॥ २६४ ॥
जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो, तेव्हा सावली कशाची शोभेल ? आरशावाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे ? ॥१८-२६४॥
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? ।
मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥ २६५ ॥
झोपेचा ठावठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कोठला ? मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल ? ॥१८-२६५॥
तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें ।
मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ? ॥ २६६ ॥
त्याप्रमाणे ज्ञानप्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे ? किंवा सोडावे ? ॥१८-२६६॥
म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल काई ।
परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां ॥ २६७ ॥
म्हणून असे पहा की या ज्ञानप्रधान संन्यासामधे कर्माची गोष्ट केली जाईल काय ? परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहात असते ॥१८-२६७॥
जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें ।
दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ॥ २६८ ॥
जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बर्यावाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ति द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते ॥१८-२६८॥
तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा ।
अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ॥ २६९ ॥
मर्मज्ञ अर्जुना, त्यावेळेलाही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामधे जसा अतिशय वेगळेपणा असतो, तसाच आत्मा आणि कर्म यामधे अतिशय वेगळेपणा असतो. ॥१८-२६९॥
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा ।
बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥ २७० ॥
अथवा आकश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी व वायु यात जसा वेगळेपणा आहे ॥१८-२७०॥
पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक ।
परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥ २७१ ॥
नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक (दगड) जसा नदीमधेच असतो परंतु नदी व दगड यामधे अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे. ॥१८-२७१॥
हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी ।
काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ? ॥ २७२ ॥
पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असेना का ? परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच आहे. दिव्याच्या सांगतीला असल्यामुळे (त्या दिव्यातील) काजळीला दिवा म्हणता येईल काय ? ॥१८-२७२॥
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु ।
आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला ॥ २७३ ॥
चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो, तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टि आणि डोळा (चर्मगोलक) यामधे जसा फरक आहे ॥१८-२७३॥
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया ।
आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला ॥ २७४ ॥
अथवा वाट आणो वाटेने जाणारा, नदीचे पात्र आणि त्यात पात्रात वहाणारे पाणी, आरसा व आरशात पहाणारा, यांच्यामधे जितका विलक्षण फरक आहे ॥१८-२७४॥
पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें ।
परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ॥ २७५ ॥
अर्जुना, तितक्या मनाने आत्म्याहून कर्म वेगळे आहे. परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते ते खरोखर असे आहे. ॥१८-२७५॥
विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी ।
ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥ २७६ ॥
कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने सूर्याचा उदय झाल्याचे सुचवते व परागातील सुगंध भुंग्यांकडून भोगविते. कमलिनीलडून त्या क्रिया झालेल्या दिसतात परंतु ती तर आपल्याकडून काही न करता सरोवरात स्तब्धच असते. ते सर्व सूर्यच करतो आणि त्यावे कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते. ॥१८-२७६॥
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया ।
करूं पांचांही तयां । कारणां रूप ॥ २७७ ॥
पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणार्या क्रिया या वस्तुत: दुसर्या कारणांकडूनच घडून येतात. ती कारणे पाच आहेत. त्यांचे स्वरूप तुला सांगतो. ॥१८-२७७॥
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३ ॥
हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्द्धीला आवश्यक अशी ही पाच कारणे सांख्य सिद्धांतामधे सांगितलेली आहेत. ती तू माझ्यापासून ऐक. ॥१८-१३॥
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें ।
जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते ॥ २७८ ॥
आणि कर्माची ती पाच कारणे तूही कदाचित जाणत असशील. कारण की शास्त्रे हात वर करून (उघडपणाने) ती कारणे सांगतात. ॥१८-२७८॥
वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं ।
निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें ॥ २७९ ॥
वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांतसांख्यरूपी मंदिरात व्याख्यानरूप नौबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. ॥१८-२७९॥
जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं ।
तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ॥ २८० ॥
ते असे की जगामधे सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरता ही पाच कारणे कारण आहेत. या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये. ॥१८-२८०॥
ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी ।
म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज ॥ २८१ ॥
अर्जुना, अशा वर्णानाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली. म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. (तू ऐकून ठेव). ॥१८-२८१॥
आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें ।
मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं ॥ २८२ ॥
आणि मी (श्रीकृष्ण) ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असतांना दुसर्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला ? ॥१८-२८२॥
दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां ।
मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ॥ २८३ ॥
आरसा पुढे मांडला असतांना आपले सौंदर्य पहाण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशाला किंमत द्यावी ? ॥१८-२८३॥
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी ॥ २८४ ॥
भक्त ज्या भावनेने जेथे पाहील, त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो. असा जो मी तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे. ॥१८-२८४॥
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे ।
तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ॥ २८५ ॥
प्रेमाच्या भराने असे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. ॥१८-२८५॥
चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु ।
विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ॥ २८६ ॥
चंद्रकांत मण्याच्या डोंगरांवर चांदण्याचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावयास लागते ॥१८-२८६॥
तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती ।
आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥ २८७ ॥
त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैतभावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले ॥१८-२८७॥
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा ।
मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ॥ २८८ ॥
तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात विरणार्या अर्जुनाची मनापासून कीव केली. (त्य़ास देहभानावर आणण्याची खटपट केली) ॥१८-२८८॥
अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे ।
आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ॥ २८९ ॥
अर्जुनाएवढे मोठे प्रस्थ, पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते. त्यातून त्यास बाहेर काढून नंतर ॥१८-२८९॥
देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा ।
तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ॥ २९० ॥
देव म्हणतात, अरे अर्जुना, तू चांगला शुद्धीवर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलावले. (देहभानावर आला). ॥१८-२९०॥
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा ।
उबगला आजी एकाहारा । येवों पाहें ॥ २९१ ॥
अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून, तुझी (तुझ्या शरीराची) संगति करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पहात होतो ॥१८-२९१॥
तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा ।
तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा ? ॥ २९२ ॥
त्या माझीही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवीत अहात तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच (जीवदशा ही) आडकाठी का घालीत अहात ? ॥१८-२९२॥
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें ।
वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ?॥ २९३ ॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, वाहवा ! (तुझे आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला) अजून माहीत नाही काय ? वेड्या, चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे काय ? ॥१८-२९३॥
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों ।
जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें ॥ २९४ ॥
आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भय वाटते. कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते, तसे हे तुमच्या व आमच्या मधील प्रेम आहे. ॥१८-२९४॥
एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें ।
म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ॥ २९५ ॥
अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे, तोपर्यंतच तुझे आमचे जगणे शक्य आहे. (म्हणजे मी देव, तुला उपदेश करणारा व तू भक्त, उपदेश ऐकणारा अशा द्वैतभावाने असणे शक्य आहे). म्हणून याविषयीचे (परमार्थत: ऐक्याविषयीचे) बोलणे राहू दे. ॥१८-२९५॥
मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता ।
सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ॥ २९६ ॥
अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे, हे आता आपण कसकसे बोलत होतो ? ॥१८-२९६॥
तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें ।
प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ॥ २९७ ॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवांनी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय, तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरवात केली आहे. ॥१८-२९७॥
जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज ।
सांगेन ऐसी पैज । घेतली कां ॥ २९८ ॥
सर्व कर्माचे बीज (कारण) जी पाच कारणे, ती तुला मी सांगेन’ अशी आपण प्रतिज्ञा केली. ॥१८-२९८॥
आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं ।
हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें ॥ २९९ ॥
आणि कर्माच्या कारणाशी आत्म्याचा काही एक संबंध नाही हे जे तू बोललास, तो माझा आवडीचा विषय मला सांग. ॥१८-२९९॥
यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे ।
इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे ? ॥ ३०० ॥
या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण ते मोठ्या समाधानाने म्हणाले, या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा (माणूस) कोठे मिळाणार आहे ? ॥१८-३००॥
तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल ।
परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥ ३०१ ॥
तर अर्जुना, तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल. परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल. ॥१८-३०१॥
तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? ।
इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी ? ॥ ३०२ ॥
तेव्हा अर्जुन म्हणाला. देवा, आपण मागे (२९३ व्या ओवीत) बोललात ते सर्व विसरलात वाटते. अहो महाराज, या गोष्टीत अजून आपण मीतूपणा ठेवलातच की. ॥१८-३०२॥
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका ।
करूनियां आइका । पुढारलों तें ॥ ३०३ ॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे आहे काय ? तर मी जे सांगेन म्हणून म्हाणालो, ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका. ॥१८-३०३॥
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा ।
होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥ ३०४ ॥
तर अर्जुना, खरोखरच, सर्व कर्माची उभारणी या पाच कारणांनी (आत्मस्वरूपाच्या) बाहेर होते. ॥१८-३०४॥
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे ।
ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥ ३०५ ॥
आणि ज्या पाच कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरवात होते, तीच कारणे हेतु असल्यामुळे ते हेतूही उघड उघड पाच आहेत. ॥१८-३०५॥
येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान ।
ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें ॥ ३०६ ॥
या कारणांहून वेगळा जो आत्मा, तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्तकारण अथवा उपादान कारण तो होत नाही अथवा तो स्वत: कर्म पार पाडण्याचे कामी साहाय्य करत नाही. ॥१८-३०६॥
तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं ।
राती दिवो आकाशीं । जियापरी ॥ ३०७ ॥
ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस ह्यांचा संबंध नसूनही ती आकाशात उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे (संबंधाशिवाय) उत्पन्न होतात. ॥१८-३०७॥
तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु ।
जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें ॥ ३०८ ॥
पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध आला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते, पण आकाशाला तर त्या ढगांच्या उत्पत्तीची खबरही नसते. ॥१८-३०८॥
नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे ।
चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ॥ ३०९ ॥
अनेक लाकडांनी होडी तयार होते व ती होडी नवाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वार्याकडून चालवली जाते. (हा सर्व व्यवहार पाण्यात होतो) पण पाणी (त्या सर्व व्यवहाराला) केवळ आधारभूत असते. ॥१८-३०९॥
कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें ।
मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ॥ ३१० ॥
अथवा पृथ्वी एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून, ज्या चाकावर तो गोळा टाकला त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरत रहाते व त्यातून मडके तयार होते. ॥१८-३१०॥
आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें ।
आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां । ॥ ३११ ॥
आणि त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनविण्यात एक आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते ? विचार कर बरे. ॥१८-३११॥
हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया ।
कोण काम सवितया । आंगा आलें ? ॥ ३१२ ॥
हेही राहू दे. सूर्याच्या उदयाने लोकांचे व्यवहार होत असतांना सूर्याकडे कोणत्या कामाचे (प्रत्यक्ष) कर्तृत्व आले ? ॥१८-३१२॥
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं ।
कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥ ३१३ ॥
त्याप्रमाणे हे पाच हेतु एकत्र आल्यावर या पाचच कारणांकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणांहून व क्रियेहून निराळा आहे. ॥१८-३१३॥
आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं ।
तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ॥ ३१४ ॥
आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावीत, त्याप्रमाणे ही पाच कारण आता तुला निरनिराळी खुलासेवार बारकाईने सांगतो. ॥१८-३१४॥
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १४ ॥
शरीर, जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, (प्राणापानादिकांचे) निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांची अधिष्ठात्री देवता ह्या होत. ॥१८-१४॥
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म-कारणें ।
तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥ ३१५ ॥
त्या (मोत्यांच्या वजनाच्या बारकाईप्रमाणे) कर्माची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो, ती ऐक. आता या पाच कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे, असे माझे म्हणणे आहे. ॥१८-३१५॥
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें ।
जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥ ३१६ ॥
या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोक्ता जो जीव तो आपल्या सुखदु:खादि भोगांसह (येथे) या देहात रहातो. ॥१८-३१६॥
इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती ।
सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें ॥ ३१७ ॥
इंद्रियरूपी दहा हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदु:खे प्रकृतिकडून मिळवली जातात ॥१८-३१७॥
तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा ।
म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥ ३१८ ॥
ती (सुखदु:खे) भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही, म्हणून देहास अधिष्ठान म्हणतात. ॥१८-३१८॥
हें चोविसांही तत्त्वांचें । कुटुंबघर वस्तीचें ।
तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ ॥ ३१९ ॥
चोवीस तत्वरूपी कुटुंबाच्या राहाण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंधमोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. ॥१८-३१९॥
किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया ।
म्हणौनि देहा यया । हेंचि नाम ॥ ३२० ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जागृति, स्वप्न व सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे, म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. ॥१८-३२०॥
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे ।
प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥
आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला (जीवाला) चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात, ॥१८-३२१॥
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर ।
मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२ ॥
आकाशच पाण्याची वृष्टि करते. त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते. मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते ॥१८-३२२॥
कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे ।
मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ॥ ३२३ ॥
अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही. मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. ॥१८-३२३॥
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें ।
आभासोनि आविष्करें । देहपणें जें ॥ ३२४ ॥
त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून ‘मी देह आहे’ असे मानावयास लागते. ॥१८-३२४॥
जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी ।
जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं ॥ ३२५ ॥
अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींविषयी शपथपूर्वक करारमदार केला आहे. ॥१८-३२५॥
प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें ।
येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥ ३२६ ॥
प्रकृति जी कर्मे करते, ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणूनच जीवास कर्ता असे म्हणतात. ॥१८-३२६॥
मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी ।
मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥ ३२७ ॥
मग ज्याप्रमाणे एकच दृष्टि पापण्यावाचून केसांतून बाहेर पडली असता ती अखंड असते, परंतु चवरीच्या केसांप्रमाणे चिरलेली वाटते ॥१८-३२७॥
कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु ।
गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
घरात असणार्या दिव्याचा एकच प्रकश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते ॥१८-३२८॥
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां ।
नवविधु ऐसा । आवडों लागे ॥ ३२९ ॥
त्याप्रमाणे बुद्धीचे (एकच) ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादि इंद्रियांच्या द्वारा वेगेवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते. ॥१८-३२९॥
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें ।
बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥ ३३० ॥
हे राजपुत्रा अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे, असे समज. ॥१८-३३०॥
तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण ।
तिसरें गा जाण । नृपनंदना ॥ ३३१ ॥
आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्वपश्चिम वाहणार्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते ॥१८-३३१॥
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी ।
होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥ ३३२ ॥
अथवा श्रृंगारादि नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे वाटावयास लागते, ॥१८-३३२॥
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी ।
ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥ ३३३ ॥
त्याप्रमाणे प्राणवायूमधे जी अखंड क्रियाशक्ति आहे ती एकच शक्ति निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते. ॥१८-३३३॥
जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें ।
हाता आली तरी घेणें । देणें होय ॥ ३३४ ॥
ती क्रियाशक्ति जेव्हा वाचेत येते, तेव्हा तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्याघेण्याचे व्यवहार तीच होते. ॥१८-३३४॥
अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं ।
अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि ॥ ३३५ ॥
अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गति तरी तीच होय. ॥१८-३३५॥
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी ।
करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे ॥ ३३६ ॥
नाभिकमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असतांना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात. ॥१८-३३६॥
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा ।
उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥ ३३७ ॥
मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावरच्या येण्याजाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान नाव आले. ॥१८-३३७॥
अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे ।
व्यापकपणें होये । व्यानु तेचि ॥ ३३८ ॥
खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ति व्यान झाली आहे. ॥१८-३३८॥
आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें ।
आणि न सांडितां असे । सर्वसंधीं ॥ ३३९ ॥
भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमधे ती भरलेली असते. ॥१८-३३९॥
ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं ।
समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥ ३४० ॥
अर्जुना, अशा या व्यापारामुळे मग नंतर त्याच क्रियेला समान असे म्हणतात. ॥१८-३४०॥
आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार ।
नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥ ३४१ ॥
आणि जांभई, शिंक, ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ति नाग, कूर्म, कृकल वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते. ॥१८-३४१॥
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा ।
वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥ ३४२ ॥
याप्रमाणे अर्जुना, वायूची ही क्रियाशक्ति एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ॥१८-३४२॥
तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें ।
कर्मकारण चौथें । ऐसें जाण ॥ ३४३ ॥
ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ति हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज. ॥१८-३४३॥
आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु ।
चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥
आणि सर्व ऋतूंमधे शरदऋतु चांगला, त्यातल्या त्यात शरदऋतूतील चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय ॥१८-३४४॥
कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु ।
संगमीं आगमु । उपचारांचा ॥ ३४५ ॥
अथवा वसंत ऋतूत बाग जसा आल्हाददायक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगले व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ति व्हावी ॥१८-३४५॥
नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा ।
विकासींही यावा । परागाचा ॥ ३४६ ॥
अथवा अर्जुना, कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला ॥१८-३४६॥
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व ।
रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥
जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशि सुरसतेची बहार असावी, व ह्या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मवर्णनाचा संबंध यावा ॥१८-३४७॥
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी ।
बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥
त्याप्रमाणे मनादि सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. ॥१८-३४८॥
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा ।
जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ॥ ३४९ ॥
इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता, हीच एक सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे. ॥१८-३४९॥
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें ।
सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ॥ ३५० ॥
म्हणून चक्षुरादि दहा इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादि देवतांचा समुदाय आहे. ॥१८-३५०॥
तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें ।
अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥ ३५१ ॥
अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे एक पाचवे चांगले कारण आहे, असे समज. असे देव म्हणाले. ॥१८-३५१॥
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी ।
पंचविध आकर्णीं । निरूपिली ॥ ३५२ ॥
याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल तशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही पाच प्रकारच्या कारणांची खाण तुला सांगितली, ती ऐक. ॥१८-३५२॥
आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे ।
जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ॥ ३५३ ॥
आता ज्या हेतूच्या योगाने ही पाच कारणरूपी खाण वाढते व मग सर्वकर्माची रचना होते ते पाच हेतु देखील तुला स्पष्ट करून सांगतो. ॥१८-३५३॥
शरीरवाण्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥ १५ ॥
न्यायाला अनुसरून (विहित) अथवा (न्यायाला) सोडून (निषिद्ध) असे जे जे कर्म, मनुष्य शरीर, वाणी व मन यांच्या योगाने करीत असतो, त्या त्या कर्माचे हे पाच हेतु आहेत. ॥१८-१५॥
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं ।
पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ॥ ३५४ ॥
हे पहा वसंत ऋतु अकस्मात आला तर तो वृक्ष वेलींना पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले, फलांची प्राप्ति करून देतात. ॥१८-३५४॥
कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु ।
वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥ ३५५ ॥
अथवा वर्षाऋतु मेघांना आणतो, मेघांच्या योगाने वृष्टि होते आणि वृष्टिमुळे धान्यापासून मिळाणार्या सुखाचा भोग होतो. ॥१८-३५५॥
नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये ।
सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ॥ ३५६ ॥
अथवा पूर्वदिशा अरुणाला विते, अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो. ॥१८-३५६॥
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा ।
तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥ ३५७ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतु आहे व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो (म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो). ॥१८-३५७॥
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा ।
तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या ॥ ३५८ ॥
मग वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते तेव्हा कर्ता (जीव) कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. म्हणजे कर्ता कर्तृत्वबुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तेपणा येतो). ॥१८-३५८॥
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे ।
लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ३५९ ॥
तेथे शरीरादि समुदाय शरीरादिकांस हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तु लोखंडानेच तयार करावी ॥१८-३५९॥
कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा ।
तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥ ३६० ॥
अथवा हे चतुरा अर्जुना, तंतूच्या ताण्यामधे आडवा तंतु भरीला घातला असता तोच तंतु वस्त्र होतो ॥१८-३६०॥
तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे ।
रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ॥ ३६१ ॥
रत्नाचा आकार (पैलू वगैरे) जसा रत्नानेच तयार केला जातो, त्याप्रमाणे मन, वाचा आणि देह यांचे कर्म मन-वाचा वगैरे हेतुंकडून तयार होते. ॥१८-३६१॥
एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें ।
अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ॥ ३६२ ॥
येथे शरीरादिक कारण तीच हेतु कशी होतात, हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. ॥१८-३६२॥
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा ।
कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ॥ ३६३ ॥
ऐका. सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतु जसा सूर्यच आहे, अथवा उसाचे एक कांडे जसे दुसर्या कांड्याच्या वाढीला हेतु असते. ॥१८-३६३॥
नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी ।
कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं ॥ ३६४ ॥
अथवा वाचेच्या देवतेचे (सरस्वतीचे) जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचा मोठेपणा (जसा) वेदांनीच सांगावा ॥१८-३६४॥
तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें ।
परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ॥ ३६५ ॥
त्याप्रमाणे शरीर, वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत, हे सर्वास पक्के माहीत आहे. परंतु ही अधिष्ठानादिकात येऊन गेल्यामुळे हेतुही होतात, यातही काही चूक नाही. ॥१८-३६५॥
आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं ।
होय जया उभारणी । कर्मजातां ॥ ३६६ ॥
आणि पूर्वी सांगितलेल्या देवादि पाच कारणांना शरीर, वाणी व मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ति होते ॥१८-३६६॥
तें शास्त्रार्थें मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया ।
तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥ ३६७ ॥
ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्यायमार्गच न्याय्य कर्माला हेतु होतो. ॥१८-३६७॥
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु ।
तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥ ३६८ ॥
ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो, परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो. ॥१८-३६८॥
कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे ।
तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें ॥ ३६९ ॥
अथवा एखादा घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात् द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील हे खरे, पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. ॥१८-३६९॥
तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें ।
तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे ॥ ३७० ॥
त्याप्रमाणे हेतु व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे (शास्त्राला न जाणून झालेले) कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टि प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्यावेळेस त्याला न्याय्य (पुण्यकर्म) असे म्हणतात. ॥१८-३७०॥
ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें ।
तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें ॥ ३७१ ॥
अथवा दूध वाढावयाची वेळ आली आणि तोच ते आपोआप उतास गेले. तोही दुधाचा खर्च झालाच, पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. ॥१८-३७१॥
तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण ।
तरी लागो कां नागवण । दानलेखीं ॥ ३७२ ॥
त्याप्रमाणे शास्त्राच्या साहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल. (म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या सहाय्यावाचून केलेले कर्म सफल होत नाही). ॥१८-३७२॥
अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता ।
कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी ? ॥ ३७३ ॥
अर्जुना, बावन वर्णांपलीकडे कोणता मंत्र आहे ? आणि बावन वर्णांचा उच्चार केल्यशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय ? ॥१८-३७३॥
परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी ।
तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं ॥ ३७४ ॥
परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्रांची हातवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही, ॥१८-३७४॥
तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे ।
तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ॥ ३७५ ॥
त्याप्रमाणे कारण व हेतु यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही (म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही) ॥१८-३७५॥
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं ।
तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥ ३७६ ॥
तेव्हा देखील कर्म होतेच, परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे. पहा. तो अन्याय्य मार्ग आहे व तो अन्याय्य कर्मालाच हेतु आहे असे समजावे. ॥१८-३७६॥
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥ १६ ॥
असे असतांना, असंस्कृत बुद्धि असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच कर्ता असे समजतो तो मूढबुद्धि होय. त्याला (काही यथार्थज्ञान) समजत नाही. ॥१८-१६॥
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा ।
आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ? ॥ ३७७ ॥
हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे पाच कारणे असलेल्या कर्माला हे पाचही हेतु आहेत, तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कोठे गोवला गेला आहे काय ? ॥१८-३७७॥
भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी ।
आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ॥ ३७८ ॥
ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो (कर्माचे कारण आणि) कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. ॥१८-३७८॥
पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा ।
दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥ ३७९ ॥
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, असे पहा की आरशात पहाणारा, हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होऊन या दोन्हीला प्रकाशतो, ॥१८-३७९॥
कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता ।
तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥ ३८० ॥
अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा कर्ता न होऊन त्या दोघांचे प्रकाशन करतो. ॥१८-३८०॥
परी देहाहंआन भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली ।
तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा ॥ ३८१ ॥
परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्द्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याला आत्म्याविषयी मध्यरात्र झाली आहे, (ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे) ॥१८-३८१॥
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा ।
तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥ ३८२ ॥
ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म ह्यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले त्याची आत्मा कर्ता आहे, अशा प्रकरची दृढ समजूत होऊन बसते. ॥१८-३८२॥
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्त्वतां ।
देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥ ३८३ ॥
आत्माच कर्मकर्ता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. तो देहच मी आहे असे समजतो व म्हणून सर्व कर्मांचा कर्ता आपणच आहो, असे तो खरोखर मानतो. ॥१८-३८३॥
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु ।
हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ॥ ३८४ ॥
कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे ही जी आपल्या खर्या स्वरूपाची हकीकत ती तो कानांनी कधी ऐकतच नाही. (आपल्या अकर्तृआत्मभावाची त्यास खबरही नसते). ॥१८-३८४॥
म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें ।
विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी ? ॥ ३८५ ॥
म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मोजावे (देशकालवस्तुपरिच्छेदरहित आत्म्याला परिच्छिन्न अशा साडेतीन हाताच्या देहाने मर्यादित करावे), यात नवल ते काय ? घुबड दिवसाला धडधडीत रात्र मानीत नाही काय ? ॥१८-३८५॥
पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं ।
तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे ? ॥ ३८६ ॥
ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानणार नाही काय ? ॥१८-३८६॥
थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें ।
त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू ॥ ३८७ ॥
(तो प्रतिबिंबित सूर्य खरा मानून मग) डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ति मानतो. त्या डबक्याच्या नाशाने सूर्याला नाश मानतो व त्या डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कापतो आहे असे मानतो ॥१८-३८७॥
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे ।
रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ? ॥ ३८८ ॥
अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जेथेपर्यंत जागा झाला नाही, तेथेपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. (एखदा मनुष्य) ही दोरी आहे असे न जाणून (त्या दोरीला) साप असे समजून भ्यायला तर त्यात आश्चर्य ते कोणते ? ॥१८-३८८॥
जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कीं पिंवळा ।
काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं ? ॥ ३८९ ॥
डोळ्यांमधे जोपर्यंत काविळीचा विकार आहे, तोपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार, मृगजळाला पाहून हरिणांनी मोहित होऊ नये काय ? ॥१८-३८९॥
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें ।
केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ॥ ३९० ॥
त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरूच्या नावाने (त्यांच्याकडून आलेला) वाराही आपल्या गावच्या शिवेवर टेकू देत नाही, (शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानत नाही) व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगला आहे ॥१८-३९०॥
तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें ।
जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं ॥ ३९१ ॥
जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो, (ढग पळत असतांना चंद्र पळतो असे मानतो) तसा देहालाच तो आत्मा मानीत असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते. (तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पहातो). ॥१८-३९१॥
मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी ।
कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो ॥ ३९२ ॥
अर्जुना, मग तो जीव त्या मनण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. ॥१८-३९२॥
पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा ।
काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥ ३९३ ॥
पहा की नळीवरील तो बापुडा राघु, त्याचे पंजे मोकळे असताही ‘आपण बांधले गेलो आहो असे त्यास वाटत नाही काय ?) ॥१८-३९३॥
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी ।
तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में ॥ ३९४ ॥
म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या मिथ्या आरोप करतो तो कोट्यावधि कालपर्यंत कर्मातच गुंडाळलेला रहातो. ॥१८-३९४॥
आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे ।
वडवानळातें जैसें । समुद्रोदक ॥ ३९५ ॥
आता वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्शही करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामधे असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही (कर्मपाशाने बांधला जात नाही) ॥१८-३९५॥
तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें ।
तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो ॥ ३९६ ॥
वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो, तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा (असे विचारशील) तर सांगतो. ॥१८-३९६॥
जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता ।
जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु ॥ ३९७ ॥
कारण की ज्याप्रमाणे (अंधारातील) आपली वस्तु दिव्याच्या सहाय्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. ॥१८-३९७॥
नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे ।
कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं ॥ ३९८ ॥
अथवा पोलादाचा आरसा जसजसा घासावा तसतसे आपणास आपल्याला भेटता येते, (म्हणजे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते) अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले असता पाणी होते. ॥१८-३९८॥
हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें ।
तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय ॥ ३९९ ॥
हे राहू दे. प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन: बिंबाला पहाते, तेव्हा पाहाण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे प्रतिबिंब रहाते, ॥१८-३९९॥
तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें ।
म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥ ४०० ॥
त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर संतांसंबंधीचा विचार केला असता तो (आत्मभाव) त्यास शोधित येतो. म्हणून नेहेमी संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे. ॥१८-४००॥
परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें ।
चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥ ४०१ ॥
तर कर्मात असून बर्यावाईट कर्माने लिप्त होत नाही, ते कसे तर ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टि असून ती त्याने लिप्त होत नाही. ॥१८-४०१॥
तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें ।
उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ॥ ४०२ ॥
त्याप्रमाणे जो सर्व कर्मांच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो, पहा. ॥१८-४०२॥
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमा.ण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥ १७ ॥
ज्याचे ठिकाणी (मी कर्मकर्ता) हा अहंकार नाही, ज्याची बुद्धि अलिप्त असते, त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारीत नाही. (घात केल्याच्या पातकाने) बद्ध होत नाही. ॥१८-१७॥
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा ।
भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥ ४०३ ॥
तर जागे असलेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमधे विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार (अनुभव) जो अनादिकालापासून भोगीत होता, म्हणजे करीत होता ॥१८-४०३॥
तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें ।
माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥ ४०४ ॥
त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने, गुरूंनी त्याचे मस्तकावर हात ठेविला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले, ॥१८-४०४॥
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया ।
सहसा चेइला अद्वया- । नंदपणें जो ॥ ४०५ ॥
अर्जुना, त्या क्षणी विश्वरूप स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन, जो अद्वयानंदपणे सहज जागा झाला (म्हणजे मी अद्वयानंदरूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला) ॥१८-४०५॥
तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर ।
हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ॥ ४०६ ॥
त्यावेळी मृगजळाचे नेहेमी एकसारखे दिसणारे पूर, चंद्रकिरणे फाकताक्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, ॥१८-४०६॥
कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय ।
पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं ॥ ४०७ ॥
अथवा बालपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ रहात नाही, किंवा लाकुड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही ॥१८-४०७॥
नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी ।
तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥ ४०८ ॥
अथवा जागृति आल्यावर नंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, त्याला मी व माझे हे उरत नाही. ॥१८-४०८॥
मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं ।
परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा ॥ ४०९ ॥
मग सूर्य अंधाराकरता वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्यास येतच नाही, ॥१८-४०९॥
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें ।
तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ॥ ४१० ॥
त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे, तो ज्या त्या दृश्य पदार्थाला पाहील, तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. ॥१८-४१०॥
जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें ।
दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ॥ ४११ ॥
ज्याप्रमाणे अग्नि ज्या पदार्थाला लागतो, तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारा व जळणारे असा भेद शिल्लक रहात नाही ॥१८-४११॥
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया ।
आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ॥ ४१२ ॥
त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मांमुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता, तो आरोप गेल्यावर जे काहीबाही (शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे) उरते ॥१८-४१२॥
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो ? ।
काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥ ४१३ ॥
त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे, तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय ? (तो ‘मी देह’ असे मानील काय ?). प्रलयकालच्या पाण्याची भरती ‘आपण एक आहोत’ असे आपल्याला मानील काय ? ॥१८-४१३॥
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता ।
आवरे काई सविता । बिंबें धरिला ? ॥ ४१४ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता (सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे’ अशी व्यापक अहंता) देहभावाने आवरली जाईल काय ? जगाचे प्रकाशन करणार्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे विंब जितके असते, तितका मर्यादित होईल काय ? ॥१८-४१४॥
पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे ।
तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ? ॥ ४१५ ॥
ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन: ते ताकात घातले असता, ते लोणी ताकात अलिप्तपणाने असल्यामुळे, त्या ताकात मिसळेल काय ? ॥१८-४१५॥
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा ।
राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ? ॥ ४१६ ॥
अथवा हे वीरश्रेष्ठा अर्जुना, काष्ठापासून अग्नि वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय ? ॥१८-४१६॥
कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु ।
तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥ ४१७ ॥
अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला सूर्य, तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय ? ॥१८-४१७॥
तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं ।
तया देह मी ऐसी । अहंता कैंची ? ॥ ४१८ ॥
त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे (हे ज्यांच्या अनुभवात नाहीसे झाले आहे) त्याला ‘मी देह’ अशी अहंता कोठून असणार ? ॥१८-४१८॥
आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी ।
म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ॥ ४१९ ॥
आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते (आकाश) भरलेलेच असते कारण ते आकाश स्वभावत: सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. ॥१८-४१९॥
तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें ।
मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें ? ॥ ४२० ॥
त्याप्रमाणे ज्याने जे काही कर्म करावयाचे असते, ते कर्म स्वभावत: त्याचेच रूप आहे, मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे ? (म्हणजे कोणत्या कर्मासंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा ? कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही). ॥१८-४२०॥
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो ।
नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ॥ ४२१ ॥
आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून जाणे माहीत नाही त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली ॥१८-४२१॥
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो ।
तर्ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ ४२२ ॥
याप्रमाणे देहाहंकाराचे असणे, त्याच्या बोधात (स्वरूपानुभवात) बाधीत झाले आहे. तरीपण जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत कर्मे आहेत. (म्हणजे शरीर आहे तेथपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात). ॥१८-४२२॥
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे ।
कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२३ ॥
अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वार्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी रहातो. अथवा करंडीतील कापुर जरी संपला, तरी त्याचा वास रहातो. ॥१८-४२३॥
कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु ।
भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥ ४२४ ॥
गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल रहाते ॥१८-४२४॥
अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके ।
ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी ॥ ४२५ ॥
अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज सहज दिसते, ॥१८-४२५॥
पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी ।
जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥ ४२६ ॥
लक्ष्य भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे तेथपर्यंत बाण सारखा पुढे पुढे जातच रहातो ॥१८-४२६॥
नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें ।
परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें ॥ ४२७ ॥
अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहाते, ॥१८-४२७॥
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया ।
जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ॥ ४२८ ॥
त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या स्वभावाने (प्रारब्धाने) झाला आहे, ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच. ॥१८-४२८॥
संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन ।
न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ॥ ४२९ ॥
आपणास अमूक एक स्वप्न पडावे, अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्वनगर कोणी तयार न करता (आपोआप) उत्पन्न होते ॥१८-४२९॥
आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण ।
होय आपणयां आपण । क्रियाजात ॥ ४३० ॥
त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादि पाच कारणांकडून आपोआप कर्ममात्र होतात. ॥१८-४३०॥
पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें ।
कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ॥ ४३१ ॥
प्रारब्ध संस्काराच्या शेषामुळे, शरीर-वाचादिहेतुसह देहादि पाच कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात ॥१८-४३१॥
तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग ।
अथवा नवें चांग । अनुकरो ॥ ४३२ ॥
मग त्या कर्मांमधे सर्व जगाचा नाश होवो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न होवो ॥१८-४३२॥
परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके ।
हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥ ४३३ ॥
परंतु चंद्रविकासी कमल कसे संकोचित होते व सूर्यविकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही ॥१८-४३३॥
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ ।
अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥ ४३४ ॥
अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकर्या ठिकर्या होवोत अथवा मेघ पर्जन्याची वृष्टि करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाको ॥१८-४३४॥
तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें ।
तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ॥ ४३५ ॥
परंतु त्या दोहोंची जशी आकाशास खबरही नसते त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमानरहित स्थितीने असतो ॥१८-४३५॥
तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी ।
न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥ ४३६ ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पहात नाही, त्याप्रमाणे देहादिकाच्या कर्मांनी सृष्टि उत्पन्न झाली किंवा नाश पावली, तरी देखील त्याला त्याची खबर नसते. ॥१८-४३६॥
येर्हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी ।
ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ॥ ४३७ ॥
एरवी कातड्याच्या डोळ्यांनी (स्थूल दृष्टीने) जे त्याला देहधारी अशा बुद्धीने पहातात, ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात. ॥१८-४३७॥
कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला ।
तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥ ४३८ ॥
गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवलेले असते, ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानीत नाही काय ? ॥१८-४३८॥
पिसें नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें ।
ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय ॥ ४३९ ॥
वेडा मनुष्य (वस्त्र) नेसलेला आहे की नागवा आहे, हे लोकांनी येऊन जाणवयाचे अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसर्यांनी मोजावयाच्या (त्याला जखमांची खबरही नसते) ॥१८-४३९॥
कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग ।
परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥ ४४० ॥
अथवा सती जावयास निघालेल्या परिव्रता स्त्रीचे भोग ( शृंगारादि) सर्व लोक खरोखर पहातात, परंतु त्या सती जाणार्या स्त्रीस अग्नि, स्वत:चे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते. ॥१८-४४०॥
तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला ।
तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु ॥ ४४१ ॥
त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. ॥१८-४४१॥
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें ।
एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जर्ही ॥ ४४२ ॥
अरे अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असतांना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मानले ॥१८-४४२॥
तर्ही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई ।
तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ॥ ४४३ ॥
तरी पाण्याच्या दृष्टीने पहा, कोण कोणाचा ग्रास करत आहे ? त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला तो अद्वैतभानावर आल्यामुळे) असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही, की ज्याला तो मग मारील. ॥१८-४४३॥
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा ।
सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥ ४४४ ॥
हे पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. ॥१८-४४४॥
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा ।
वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें ॥ ४४५ ॥
हा व्यवहार पुजार्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला, तरी वास्तविक पाहता शूळ, महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे. (मग कोणी कोणाला व कशाने मारले ?) ॥१८-४४५॥
पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु ।
पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ॥ ४४६ ॥
चित्रातील पाणी व अग्नि हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे. चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत. ॥१८-४४६॥
मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें ।
तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥ ४४७ ॥
त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्धसंस्काराने हालत (कर्मे करीत) असतांना पाहून मूर्ख लोक त्याला कर्ता असे म्हणतात. ॥१८-४४७॥
आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातु ।
परी तेणें केला हे मातु । बोलों नये ॥ ४४८ ॥
आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामधे तिन्ही लोकांचा नाश होवो, पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये, ॥१८-४४८॥
अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे ।
तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी । ॥ ४४९ ॥
आधी जर तेजाने (सूर्याने) अंधार पहावा (पण तेजापुढे अंधार येतच नाही) मग तेज अंधाराचा नाश करते हे कोठे बोलता येईल काय ? त्याप्रमाणे ज्ञान्याला जर दुसरे काही नाही मग तो काय करणार ? ॥१८-४४९॥
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी ।
गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥ ४५० ॥
म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धि पापपुण्याचा मळ जाणत नाही. ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा (पूर्वीचा) अपवित्रपणा रहात नाही ॥१८-४५०॥
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया ।
कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥ ४५१ ॥
अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील ? का शस्त्र आपल्याला रुतेल काय ? ॥१८-४५१॥
तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें ।
तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ॥ ४५२ ॥
त्याप्रमाणे जो कर्ममात्राला आपणाहून वेगळे समजत नाही, तेथे (अशा स्थितीत) कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील ? ॥१८-४५२॥
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया ।
नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु ॥ ४५३ ॥
म्हणून कार्य, कर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे, त्याला शरीरादींकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही. ॥१८-४५३॥
जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी ।
घडित आहे करणीं । आउतीं दाहें ॥ ४५४ ॥
आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्वान जो जीवात्मा, तो कर्माची कारणे असलेले शरीरादिक पाच ह्या खाणी काढून इंद्रियरूपी दहा औताच्या सहाय्याने (कर्ममात्र) तयार करीत आहे. ॥१८-४५४॥
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो ।
उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ॥ ४५५ ॥
तेथे न्याय व अन्याय (विधिनिषेध) असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावीत नाही. ॥१८-४५५॥
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा ।
परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥ ४५६ ॥
या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर साह्य होत नाही. पण तो (या कामाच्या) आरंभाला हात लावतो असे म्हणशील (तर तेही नाही). ॥१८-४५६॥
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु ।
उठी तो कां निरोपु । आपणचि दे ? ॥ ४५७ ॥
ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा, तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो काय ? (नाही). ॥१८-४५७॥
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं ।
जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥ ४५८ ॥
तर कर्मप्रवृत्तिकरता आत्म्याला स्वत:ला काही श्रम पडत नाहीत. कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे लोक (देहबुद्धावान जीवच) आहेत. ॥१८-४५८॥
म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ ।
तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे ॥ ४५९ ॥
म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला, त्याला हा कर्माचा तुरुंग नाही. ॥१८-४५९॥
परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी ।
तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ॥ ४६० ॥
परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे (स्थूल, सूक्ष्म प्रपंचाचे) चित्र उमटते तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे ॥१८-४६०॥
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥ १८ ॥
ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्तित्रय आहे, करण (इंद्रिये), कर्म व कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंचय आहे. ॥१८-१८॥
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय ।
ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥
तीच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेयरूपी त्रिपुटी होय. ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि हीच कर्माची नि:संशय प्रवृत्ति आहे. (म्हणजे खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटी करते) असे समज. ॥१८-४६१॥
आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया ।
आइकें धनंजया । करूं रूप ॥ ४६२ ॥
अर्जुना, आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलासेवार वर्णन करू, ऐक. ॥१८-४६२॥
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें ।
धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥ ४६३ ॥
तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्रादि पाच इंद्रियरूपी करणे, ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करतात. ॥१८-४६३॥
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें ।
विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ॥ ४६४ ॥
अथवा जीवरूपी राजाचे बिन खोगिराचे (मोकळ्या पाठीचे) मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदु:खाची लूट आणातात ॥१८-४६४॥
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे ।
तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान ॥ ४६५ ॥
हे राहू दे, जे ज्ञान ह्या इंद्रियांच्याद्वाराने आपला व्यवहार चालवते व जे ज्ञान सुषुप्तिकाली जेथे लीन होऊन रहाते, ॥१८-४६५॥
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां ।
तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥ ४६६ ॥
त्या (सुषुप्त्यभिमानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात. आणि अर्जुना, आता (मागील ओवीत) जे हे ज्ञान सांगितले तेच ज्ञान होय, असे समज. ॥१८-४६६॥
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी ।
आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥
अर्जुना, ते जीवाचे ज्ञान (विपरीत ज्ञान) अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच आपलेच तीन भाग करते. ॥१८-४६७॥
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा ।
उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥
आपल्या धावेपुढे ज्ञेयाचा धोंडा (बांध) घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला (ज्ञात्याला) उभारते. (अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते, येथे विषयांची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते). ॥१८-४६८॥
मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा ।
माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ॥ ४६९ ॥
जे ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय यांचे मधे असल्यामुळे ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो. ॥१८-४६९॥
ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव ।
सकळ पदार्थां नांव । सूतसे जें ॥ ४७० ॥
ज्ञेयाच्या (विषयाच्या) हद्दीवर प्राप्त झाले असता, ज्या ज्ञानाची धाव संपते, (जे ज्ञान केवल विषयांनाच जाणते आणि विषयांच्या पुढे ज्याची जाणण्याची गती नाही) आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते, ॥१८-४७०॥
तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन ।
ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां ॥ ४७१ ॥
अर्जुना, ते सामान्य ज्ञान होय, यात अन्यथा नाही. आता ज्ञेयाचेही लक्षण ऐक. ॥१८-४७१॥
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु ।
हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥ ४७२ ॥
तरी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध . असे पाच प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात. ॥१८-४७२॥
जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे ।
रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें ॥ ४७३ ॥
ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगेवेगळे भोग द्यावेत, रसाने जिव्हेला, वर्णाने डोळ्यांना परिमळाने घ्राणाला व स्पर्शाने त्वचेला भेटावे. (अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते, परंतु फळ एकच असते). ॥१८-४७३॥
तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें ।
घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें ॥ ४७४ ॥
याप्रमाणे ज्ञेय (विषय) एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या पाच इंद्रियद्वारा करून घेतो, म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे त्या ज्ञेयाचे पाच प्रकार झाले आहेत. ॥१८-४७४॥
आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें ।
कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं ॥ ४७५ ॥
आणि ज्याप्रमाणे ओघाचे वहाणे समुद्रात थांबते अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाराचे चालणे बंद पडते अथवा धान्यादि पिकांची वाढ कणसे आली की खुंटते. ॥१८-४७५॥
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी ।
होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥ ४७६ ॥
त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणार्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो, अर्जुना, तो विषय ज्ञेय होय. ॥१८-४७६॥
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया ।
हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥ ४७७ ॥
अर्जुना, याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिघांचे वर्णन केले. ही त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज. ॥१८-४७७॥
जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय ।
तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ॥ ४७८ ॥
शब्दादि विषय हे पाच प्रकारचे ज्ञेय आहे. तेच प्रिय व अप्रिय या दोन प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचे असो. ॥१८-४७८॥
ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया ।
तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥ ४७९ ॥
अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखवते न दाखवते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा (प्रिय असल्यास) स्वीकार अथवा (अप्रिय असल्यास) त्याग करण्यास प्रवृत्तच होतो. ॥१८-४७९॥
परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु ।
कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥ ४८० ॥
परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो, अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो ॥१८-४८०॥
जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं ।
नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां ॥ ४८१ ॥
ज्याप्रमाणे पाणी उताराकडे धावते अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो अथवा धार काढावयाच्या वेळेला सोडलेले वासरू जसे (गाईकडे) धावते ॥१८-४८१॥
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं ।
वराता लावीजती आकाशीं । यागांचिया ॥ ४८२ ॥
अरे अर्जुना, स्वर्गलोकीची उर्वशी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात, ॥१८-४८२॥
पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं ।
पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ॥ ४८३ ॥
अर्जुना, आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्यावर लोटून देतो, ॥१८-४८३॥
हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा ।
ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ॥ ४८४ ॥
अथवा हे राहू दे, ढगांच्या गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता (जीव) तिकडे धावच घेतो. ॥१८-४८४॥
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता ।
होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥
म्हणून अर्जुना, ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रवृत्ति प्रेरणा करणारे आहेत. ॥१८-४८५॥
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये ।
तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥
परंतु तेच ज्ञेय (तोच विषय) जर कदाचित ज्ञात्याला (जीवाला) प्रिय असेल, तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञात्यास सहन होत नाही. ॥१८-४८६॥
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे ।
तरी युगांत वाटे । सांडावया ॥ ४८७ ॥
अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकीपर्यंत, प्रलयकाल आल्यासारखे दु:ख होऊन, त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. ॥१८-४८७॥
व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा ।
हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥ ४८८ ॥
एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून नीलमण्यांचा हार आह अशी जर त्याची समजूत झाली की लगेच त्यास हर्ष होतो, पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळाले की तत्क्षणीच त्याचे ठिकाणी भीती उत्पन्न होते. ॥१८-४८८॥
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये ।
मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें ॥ ४८९ ॥
ज्ञेयाविषयी प्रियाप्रिय बुद्धि झाल्याने ज्ञात्याची त्याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. ॥१८-४८९॥
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा ।
रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥ ४९० ॥
तेव्हा (रथावर बसून जाणारा) जोडीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापति ज्याप्रमाणे समोर येणारा पहिलवान पाहून, त्याचे बरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून (जमिनीवर) पवित्र्यात दंड थोपटून उभा रहावा, ॥१८-४९०॥
तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे ।
जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं ॥ ४९१ ॥
त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो, तोच (त्याग स्वीकाराच्या) क्रियेमुळे कर्ता अशा हीन अवस्थेला येतो. (अशा कर्ता ह्या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होते. ती कशी तर) ज्याप्रमाणे (आयत्या) जेवणार्या माणसाने स्वयंपाक करावयास बसावे ॥१८-४९१॥
कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा ।
नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥ ४९२ ॥
अथवा भुंग्यानेच जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा (सराफ) जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला (देऊळ बांधण्याच्याआ कामाला) लागावे ॥१८-४९२॥
तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा ।
राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥ ४९३ ॥
अर्जुना त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता (जीव) इंद्रियसमुदायास व्यापार (कर्मे) करायला लावतो, तेव्हा तो कर्ता होतो. ॥१८-४९३॥
आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता ।
तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय ॥ ४९४ ॥
आणि ज्ञाता आपण कर्ता होऊन, ज्ञानाला कारणता (साधनपणा) आणतो, तेव्हा ज्ञेय हे स्वभावत:च कार्य (क्रियेचे फल) होते. ॥१८-४९४॥
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति ।
डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी ॥ ४९५ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वत:च्या गतीला पालट पडतो (ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता, करण व कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय हीही बदलतात). ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते (त्यांचे तेज कमी होते) त्याप्रमाणे ॥१८-४९५॥
कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु ।
पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा ॥ ४९६ ॥
अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती कळा लागते, ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते (दिवसेंदिवस त्याची एकेक कला कमी होते). ॥१८-४९६॥
तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें ।
तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां ॥ ४९७ ॥
त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियद्वारा व्यवहार करावयास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्तेपणाने व्यापला जातो. आता ज्ञाता हा जेव्हा कर्ता होतो, त्यावेळची लक्षणे ऐक. ॥१८-४९७॥
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन ।
हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें ॥ ४९८ ॥
तर बुद्धि, मन, चित्त व अहंकार, हे अंत:करणाचे चार प्रकार आहेत. ॥१८-४९८॥
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण ।
हें पंचविध जाण । इंद्रियें गा ॥ ४९९ ॥
(अंत:करणाच्या बाहेर) त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक ही पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये आहेत, असे समज. ॥१८-४९९॥
तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें ।
मग तैं जरी जाणें । सुखा येतें ॥ ५०० ॥
तेव्हा कर्ता जो जीव, तो आतल्या इंद्रियांनी (अंत:करण चतुष्टयाने) कर्तव्याचा (कर्माचा) हिशोब घेतो. (म्हणजे विचार करतो) व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले ॥१८-५००॥
तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही ।
उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ॥ ५०१ ॥
तर बाहेरील त्या चक्षु वगैरे दहा इंद्रियांना लगबगीने उठवून व्यापाराला लावतो. (कर्म करावयास लावतो). ॥१८-५०१॥
मग तो इंद्रियकदंबु । करविजे तंव राबु ।
जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥ ५०२ ॥
मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रियसमुदायाकडून मेहनत करवितो. ॥१८-५०२॥
ना तें कर्तव्य जरी दुःखें । फळेल ऐसें देखे ।
तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही ॥ ५०३ ॥
अथवा त्या कर्तव्याचे दु:ख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच दहाही इंद्रिये त्या कर्तव्याच्या त्यागाकडे लावतो. ॥१८-५०३॥
मग फिटे दुःखाचा ठावो । तंव राहाटवी रात्रिदिवो ।
विकणवातें कां रावो । जयापरी ॥ ५०४ ॥
मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसार्याबद्दल राबवतो, त्याप्रमाणे मग तो दु:खाचा ठावठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रियसमुदायाला राबवतो. ॥१८-५०४॥
तैसेनि त्याग स्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी ।
ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे ॥ ५०५ ॥
अर्जुना, ऐक. त्याप्रमाणे त्यागस्वीकाराच्या क्रियेत (कर्मात) इंद्रियांचे जूं वहात असतांना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात. ॥१८-५०५॥
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी ।
म्हणौनि इंद्रियांतें आम्ही । करणें म्हणों ॥ ५०६ ॥
आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये ही औताप्रमाणे (कर्म करण्यास) समर्थ असतात, म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो ॥१८-५०६॥
आणि हेचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी ।
तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ ॥ ५०७ ॥
आणि ह्याच इंद्रियांच्या योगाने कर्ता ज्या क्रिया उभारतो, त्या क्रियाकडून जे व्यापले जाते, ते येथे (या जगात) कर्म होय. (कर्त्याच्या क्रियेने जे तयार होते त्याला कर्म म्हणतात). ॥१८-५०७॥
सोनाराचिया बुद्धि लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदणें ।
कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी ॥ ५०८ ॥
सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो, अथवा चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो, ॥१८-५०८॥
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु ।
हें असो अवकाशु । आकाशीं जैसा ॥ ५०९ ॥
अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो अथवा उसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो, हे राहू दे, अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो ॥१८-५०९॥
तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया ।
तें कर्म गा बोलावया । आन नाहीं ॥ ५१० ॥
अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय. या प्रतिपादनात अन्यथा नाही. ॥१८-५१०॥
एवं कर्म कर्ता करण । या तिहींचेंही लक्षण ।
सांगितलें तुज विचक्षण- । शिरोमणी ॥ ५११ ॥
हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता, कर्म व करण या तीहीचेही तुला लक्षण सांगितले. ॥१८-५११॥
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय ।
तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥ ५१२ ॥
येथे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्माची प्रेरणा करणारे आहेत त्याचप्रमाणे कर्ता, करण व कार्य हा कर्माचा साठा आहे. ॥१८-५१२॥
वन्हीं ठेविला असे धूमु । आथी बीजीं जेवीं द्रुमु ।
कां मनीं जोडे कामु । सदा जैसा ॥ ५१३ ॥
जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामधे झाड जसे ठेवलेले आहे अथवा मनामधे काम जसा सदा प्राप्त आहे ॥१८-५१३॥
तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचें आहे जिंतवणीं ।
सोनें जैसें खाणी । सुवर्णाचिये ॥ ५१४ ॥
त्याप्रमाणे कर्ता, क्रिया व करण (इंद्रिये) ही सर्व कर्मांचे जीवन आहेत. ॥१८-५१४॥
म्हणौनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता ।
तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासीं ॥ ५१५ ॥
म्हणून अर्जुना येथे हे कार्य व मी कर्ता असा भाव आहे, त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो. ॥१८-५१५॥
यालागीं पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती ।
आतां असो हे किती । जाणतासि तूं ॥ ५१६ ॥
हे सुमति अर्जुना, एवढ्याकरता आत्मा कर्मापासून वेगळा आहे. आता हे पुन्हा किती सांगावे ? आता हे राहू दे. हे तू जाणतच आहेस. ॥१८-५१६॥
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसण्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥ १९ ॥
ज्ञान, कर्म व कर्ता ही तीन देखील (सत्व, रज व तम अशा) गुणभेदाने तीन प्रकारची आहेत, असे सांख्यशास्त्रामधे सांगितले आहे. त्या प्रत्येकाचे तीन तीन प्रकार जसेच्या तसे मी सांगतो, तू ऐक. ॥१८-१९॥
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन ।
ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाती ॥ ५१७ ॥
परंतु ज्ञान, कर्म व कर्ता हे जे तुला तीन सांगितले, या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत. ॥१८-५१७॥
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया ।
जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥
म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वसू नये. कारण राजसिक व तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडवण्यास समर्थ आहे. ॥१८-५१८॥
तें सात्विक ठाऊवें होये । तो गुणभेदु सांगों पाहे ।
जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला ॥ ५१९ ॥
तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा, म्हणून सांख्यशास्त्रामधे जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो. पहा. ॥१८-५१९॥
जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र ।
ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें ॥ ५२० ॥
जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे, आत्मज्ञानरूपी (चंद्रविकासिनी) कमलाचा (विकास करणारा) चंद्र आहे व जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे ॥१८-५२०॥
कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनीं ।
तियें निवडितां त्रिभुवनीं । मार्तंडु जें ॥ ५२१ ॥
अथवा प्रकृति व पुरुष हीच जणुकाय एकमेकात मिसळालेली दिवसरात्र होत, यास वेगवेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते ह्या तिन्ही लोकात सूर्यच आहे. ॥१८-५२१॥
जेथ अपारा मोहराशी । तत्त्वाच्या मापीं चोविसीं ।
उगाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे ॥ ५२२ ॥
ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे (संसाराचे) चोवीस तत्वांच्या मापाने मोजमाप करून (संसार जरी अपार आहे तरी तो चोवीस तत्वांचा आहे. असे सांख्यशास्त्राने ठरवले आहे. त्याप्रमाणे विचार करून त्या तत्वांचा निरास करून) परतत्वासह सुखी होऊन रहाता येते. ॥१८-५२२॥
अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र ।
तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे ॥ ५२३ ॥
अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते, त्या गुणभेदाचा प्रकार असा आहे. ॥१८-५२३॥
जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें ।
दृश्यजात तितुकें । अंकित केलें ॥ ५२४ ॥
की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी (जेवढे दृश्य तितके सर्व) चिन्हित केले. (सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला). ॥१८-५२४॥
एवं सत्त्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा ।
जें त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ॥ ५२५ ॥
याप्रमाणे सत्व, रज, तम या तिघांचा महिमा एवढा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो अखेर किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत. ॥१८-५२५॥
परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं ।
पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो ॥ ५२६ ॥
परंतु जे (ज्ञान) भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले, ते ज्ञान अगोदर सांगतो. ॥१८-५२६॥
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे ।
तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ॥ ५२७ ॥
कारण की दृष्टि निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते. ॥१८-५२७॥
म्हणौनि तें सात्विक ज्ञान । आतां सांगों दे अवधान ।
कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥ ५२८ ॥
म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो. लक्ष दे, असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण ते म्हणाले. ॥१८-५२८॥
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २० ॥
भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांचे ठिकाणी एकच, अविनाशी व अविभक्त असा आत्मा (मनुष्य) ज्याच्या योगाने पहातो, ते ज्ञान तू सात्विक असे समज. ॥१८-२०॥
तरी अर्जुना गा तें फुडें । सात्विक ज्ञान चोखडें ।
जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं ॥ ५२९ ॥
तर अर्जुना, ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय, की ज्याच्या उदायात ज्ञात्यासह ज्ञेय बुडते, (म्हणजे नाहीसे होते). ॥१८-५२९॥
जैसा सूर्य न देखे अंधारें । सरिता नेणिजती सागरें ।
कां कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥ ५३० ॥
ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्रास नद्यांची खबरही नसते, किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तरी आपली सावली पकडली जात नाही ॥१८-५३०॥
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना ।
इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥ ५३१ ॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत. ॥१८-५३१॥
जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां ।
कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय ॥ ५३२ ॥
ज्याप्रमाणे (पाटीवर काढलेले) चित्र पाटीवर हात फिरवून पाहू लागले असता ते चित्र नाहीसे होते, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते. ॥१८-५३२॥
तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें ।
जाणता ना जाणणें । जाणावें उरे ॥ ५३३ ॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असता तेथे जाणता (ज्ञाता) अथवा जाणणे (ज्ञान करून घेण्याची क्रिया) अथवा जाणावे (ज्ञेयविषय) ही उरत नाहीत ॥१८-५३३॥
पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी ।
कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें ॥ ५३४ ॥
बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढीत नाहीत, (तर मग त्या दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहेत असे समजतात) अथवा (शहाणे लोक) लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत (तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात) ॥१८-५३४॥
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा ।
तें ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥ ५३५ ॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही, ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज. ॥१८-५३५॥
आरिसा पाहों जातां कोडें । जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें ।
तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें ॥ ५३६ ॥
कौतुकाने आरसा पहावयास गेले असता, पहाणाराच जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभावास येतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा पाहू जाता ज्ञेयाच्या रूपाने (ज्ञेय दूर करून) ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभावास येते. ॥१८-५३६॥
पुढती तेंचि सात्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन ।
हें असो ऐक चिन्ह । राजसाचें ॥ ५३७ ॥
असे जे तेच सात्विक ज्ञान होय, तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे. आता पुढे राजस ज्ञानाचे वर्णन ऐक. ॥१८-५३७॥
पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१ ॥
सर्व भूतांचे ठिकाणी, हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत, असा (अद्वितीय आत्म्याविषयी) भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय असे जाण. ॥१८-२१॥
तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस ।
जें भेदाची कांस । धरूनि चाले ॥ ५३८ ॥
तर अर्जुना ऐक. जे ज्ञान द्वैताचा आश्रय करून चालते, ते ज्ञान राजस होय. ॥१८-५३८॥
विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया ।
बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ॥ ५३९ ॥
भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वत: तुकडे होऊन, ज्या ज्ञानाने ज्ञात्याला (जीवाला) बराच भ्रमिष्टिपणा आणला ॥१८-५३९॥,
जैसें साचा रूपाआड । घालूनि विसराचें कवाड ।
मग स्वप्नाचें काबाड । ओपी निद्रा ॥ ५४० ॥
ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खर्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लाऊन, झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते ॥१८-५४०॥
तैसें स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या महीं खळीं ।
तिहीं अवस्थांचिया वह्याळी । दावी जें जीवा ॥ ५४१ ॥
त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखवते. ॥१८-५४१॥
अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें ।
तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया ॥ ५४२ ॥
अलंकाररूपाने असणारे सोने, जसे मुलाला सोने वाटत नाही त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही ॥१८-५४२॥
अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।
वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ॥ ५४३ ॥
गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती तिची मूर्खाला (जशी) अनोळख झाली, अथवा दीपपणामुळे अग्नि जसा (मूर्खाला) दुर्बोध झाला ॥१८-५४३॥
कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे ।
नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥ ५४४ ॥
अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतु (सूत) नाहीसा होतो अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला (मूर्खाच्या दृष्टीला) आपण नाहीसे होते, (म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही) ॥१८-५४४॥
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना ।
ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥ ५४५ ॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूतव्यक्ति (प्राणिमात्रांचे आकार) निरनिराळ्या आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते, ॥१८-५४५॥
मग इंधनीं भेदला अनळु । फुलांवरी परीमळु ।
कां जळभेदें शकलु । चंद्रु जैसा ॥ ५४६ ॥
मग अनेक काष्ठांनी जसा अग्नि भेदला जावा अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा अथवा निरनिराळ्या लाटांतील पाण्यांनी जसा चंद्र भेदला जावा, (अग्नि, सुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधिभेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात), ॥१८-५४६॥
तैसें पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष ।
आंतलें तें राजस । ज्ञान येथ ॥ ५४७ ॥
त्याप्रमाणे पदार्थांचे जे अनेक प्रकार जाणून जे लहानथोर आकार बनले आहे (अनेकत्वाला पावले आहे) ते येथे राजस ज्ञान होय. ॥१८-५४७॥
आतां तामसाचेंही लिंग । सांगेन तें वोळख चांग ।
डावलावया मातंग- । सदन जैसें ॥ ५४८ ॥
ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे (तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता) तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन ते चांगले समजून घे. ॥१८-५४८॥
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥ २२ ॥
एका कार्याचे ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले, प्रमाणरहित (वेदबाह्य), तत्वार्थशून्य व क्षुद्र असे जे ज्ञान, त्याला तामस ज्ञान असे म्हणतात. ॥१८-२२॥
तरी किरीटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन ।
श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥ ५४९ ॥
तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते म्हणून (सर्वांची माऊली) जी श्रुति, ती त्याला पाठमोरी झाली. (म्हणजे श्रुतीने ज्या ज्ञानाचा अव्हेर केला आहे), ॥१८-५४९॥
येरींही शास्त्र बटिकरीं । जें निंदेचे विटाळवरी ।
बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माच्या ॥ ५५० ॥
इतरही (श्रुतीच्या) कासी असलेल्या (श्रुतीच्या अनुरोधाने चालणार्या) शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने (तामस ज्ञान निंद्य आहे असा दोष देऊन ) म्लेंच्छधर्माच्या डोंगरावर घालवून दिले आहे (ज्याच्यावर बहिष्कार घातला आहे), ॥१८-५५०॥
जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें ।
घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥ ५५१ ॥
अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाचाने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, ॥१८-५५१॥
जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे ।
निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥
जे ज्ञान (विषयोपभोगाकरता) नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे ॥१८-५५२॥
तया तोंडीं जें नाडळे । कां खातां जेणें पोळे ।
तेंचि येक वाळे । येर घेणेचि ॥ ५५३ ॥
(म्हणजे मग) त्याच्या तोंडाच्या आटोक्य़ात जो पदार्थ सपडत नाही अथवा जो पदार्थ खातांना तोंड पोळते, त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते. इतर सर्व पदार्थ घेतेच. ॥१८-५५३॥
पैं सोनें चोरितां उंदिरु । न म्हणे थरुविथरु ।
नेणे मांसखाइरु । काळें गोरें ॥ ५५४ ॥
पहा की उंदीर (लाखेचा डाक वगैरे लागलेले) सोने चोरीत असता चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नही. ॥१८-५५४॥
नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेवीं न करी ।
कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी ॥ ५५५ ॥
अथवा ज्याप्रमाणे रानामधे वणवा (जळतांना) बरे वाईट अशी निवड करत नाही अथवा माशी पदार्थावर बसतांना तो जिवंत आहे की मेलेला आहे याचा विचार करत नाही. ॥१८-५५५॥
अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया ।
विवेकु कावळिया । नाहीं जैसा ॥ ५५६ ॥
अरे अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके, हा विचार जसा कावळ्याला नाही, ॥१८-५५६॥
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें ।
हें विषयांचेनि नांवें । नेणेंचि जें ॥ ५५७ ॥
त्याप्रमाने निषिद्धाचा त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही. ॥१८-५५७॥
जेतुलें आड पडे दिठी । तेतुलें घेचि विषयासाठीं ।
मग तें स्त्री-द्रव्य वाटी । शिश्नोदरां ॥ ५५८ ॥
जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे, असे मानून त्याचा जे ज्ञान आदराने स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री, व द्रव्य शिस्नाकडे व पोटाकडे वाटून देते. ॥१८-५५८॥
तीर्थातीर्थ हे भाख । उदकीं नाहीं सनोळख ।
तृषा वोळे तेंचि सुख । वांचूनियां ॥ ५५९ ॥
पाण्याने तहान भागेल ते सुख, यावाचून हे पाणी पावित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदकासंबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते. ॥१८-५५९॥
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य ।
तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु ॥ ५६० ॥
त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्यानिंद्य हे ते (तामस ज्ञान) म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते. ॥१८-५६०॥
आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे ।
तियेविषयीं सोयरिकें । एकचि बोधु ॥ ५६१ ॥
आणि जितकी स्त्रीजात आहे, तितकी त्वगिंद्रियाने ओळखते (स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असे समजतो.) आणि त्या स्त्रीजातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते. ॥१८-५६१॥
पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें ।
देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं ॥ ५६२ ॥
जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल, त्याचेच नाव नातलग, आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. ॥१८-५६२॥
मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन ।
तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना ॥ ५६३ ॥
सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे सरपण आहेत, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले भोग्य आहे असे वाटते. ॥१८-५६३॥
ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषयोचि मानिलें केवळ ।
तया एक जाण फळ । देहभरण ॥ ५६४ ॥
अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते. व त्या तामस ज्ञानास देहाभरण हे एकच फळ आहे असे समज. ॥१८-५६४॥
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा ।
तैसें कृत्यजात उदरा- । लागिंचि बुझे ॥ ५६५ ॥
आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्ममात्र पोटाकरताच आहे असे समजते. ॥१८-५६५॥
वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती ।
इये आघवियेचि राती । जाणिवेची जें ॥ ५६६ ॥
याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतु प्रवृत्ति व निवृत्ति आहेत. (विहित कर्माकडे प्रवृत्ति असणे हे स्वर्गाला हेतु आहे व विहित कर्मापासून निवृत्ति या विषयीचे तामस ज्ञानामधे पूर्ण अज्ञान असते). ॥१८-५६६॥
जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा ।
ययापरौती प्रमा । ढळों नेणें ॥ ५६७ ॥
कारण की हा साडेतीन हात देह म्हणजे आत्मा व पाषाणाची मूर्ति हाच ईश्वर होय या पलिकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. ॥१८-५६७॥
म्हणे पडिलेनि शरीरें । केलेनिसीं आत्मा सरे ।
मा भोगावया उरे । कोण वेषें । ॥ ५६८ ॥
म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठावठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास उरेल ? ॥१८-५६८॥
ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये ।
तरी देवचि खाये । विकूनियां ॥ ५६९ ॥
अथवा विचार करून कोणी असे म्हटले तर की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास पावतो, तर तो तामसज्ञानी तो (मानलेले दगडाचे, धातूचे) देवच जर विकून खातो, ॥१८-५६९॥
गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार ।
तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ? ॥ ५७० ॥
गावातील देवळातले देव जर खरोखर (सृष्टीचे) नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का रहातील ? ॥१८-५७०॥
ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।
आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ॥ ५७१ ॥
कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच (दगडाची मूर्तीच) समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. ॥१८-५७१॥
येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें ।
हित मानी अग्निमुखे । चरणें जें कां ॥ ५७२ ॥
इतर जे पापपुण्य वगैरे ते सर्वच झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे (पापपुण्य, बरेवाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे) ते तो हित मानतो. ॥१८-५७२॥
जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती ।
तेंचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥ ५७३ ॥
चामड्याचे डोळे जे दाखवतील (स्थूल दृष्टीला जे दिसून येईल) व इंद्रिये ज्याची गोडी लावतील, तेच खरे ही ज्याची पक्की खात्री असते, ॥१८-५७३॥
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था ।
धूमाची वेली वृथा । आकाशीं जैसी ॥ ५७४ ॥
अर्जुना फार काय सांगावे ? असा हा (व्यर्थच) वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थच वाढत जातो, ॥१८-५७४॥
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला ।
तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥ ५७५ ॥
जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष, तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा. ॥१८-५७५॥
नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें ।
वन लागलें जैसें । साबरीचें ॥ ५७६ ॥
अथवा उसाची कणसे अथवा नंपुसक माणसे अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात. ॥१८-५७६॥
नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन ।
अथवा गळास्तन । शेळियेचे ॥ ५७७ ॥
अथवा मुलांचे मन, अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरूपयोगी असतात, ॥१८-५७७॥
तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें ।
तयातें मी म्हणें । तामस ज्ञान ॥ ५७८ ॥
त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. ॥१८-५७८॥
तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा ।
जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु ॥ ५७९ ॥
त्या तामस ज्ञानासही ‘ज्ञान’ असे म्हणतात. त्यातील हेतु हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावयाचा ॥१८-५७९॥
कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान ।
तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया ॥ ५८० ॥
अथवा बहिर्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना (मद्यादिकांना) जसे पान (पिण्यास योग्य) म्हणावयाचे त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. ॥१८-५८०॥
हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें ।
तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ॥ ५८१ ॥
हे राहू दे. आता आणखी या संबंधाने किती सांगावे ? तर असे हे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे. ॥१८-५८१॥
एवं तिहीं गुणीं । भेदलें यथालक्षणीं ।
ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज ॥ ५८२ ॥
हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, याप्रमाणे तीन गुणांनी तीन प्रकारचे झालेले ज्ञान ज्यांचे लक्षण होते, तशा लक्षणांनी तुला सांगितले. ॥१८-५८२॥
आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा ।
प्रकाशें होती गोचरा । कर्तयांच्या क्रिया ॥ ५८३ ॥
अर्जुना, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. ॥१८-५८३॥
म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरे तिहीं भागां ।
मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥ ५८४ ॥
म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वहाणार्या ओघांशी मिळाले की त्या त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे (ज्ञानाच्या तीन प्रकारांमुळे कर्म तीन प्रकारचे होते ॥१८-५८४॥
तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे ।
तेथ सात्विक तंव ऐसें । परीसे आधीं ॥ ५८५ ॥
तेच प्रकारच्या योगाने जे कर्म तीन प्रकारचे झालेले आहे, त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे, तो सांगतो, तू प्रथम ऐक. ॥१८-५८५॥
नियतं सण्गरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३ ॥
नित्य (व नैमित्तिक पावेल तेव्हा तेही) आसक्तिरहित, प्रीति अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणार्या मनुष्याने केलेले जे कर्म त्याला सात्विक (कर्म) असे म्हणतात. ॥१८-२३॥
तरी स्वाधिकाराचेनि मार्गें । आलें जें मानिलें आंगें ।
पतिव्रतेचेनि परीष्वंगें । प्रियातें जैसें ॥ ५८६ ॥
तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवर्याला संतोष होतो, त्याप्रमाणे वर्णाश्रमाच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते त्यास स्वभावत:च मानवते. (म्हणजे त्याचे आचरण संतोषाने केले जाते). ॥१८-५८६॥
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनीं अंजन ।
तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें ॥ ५८७ ॥
सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे. ॥१८-५८७॥
तें नित्य कर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें ।
सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें ॥ ५८८ ॥
सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा, त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला शोभा येते, ॥१८-५८८॥
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनि बाळाची करी पाळती ।
परी जीवें उबगणें हें स्थिती । न पाहे माय ॥ ५८९ ॥
आणि शरीर व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते. परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही, ॥१८-५८९॥
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी ।
उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी ॥ ५९० ॥
त्याप्रमाणे सर्व प्रकाराने कर्माचे अनुष्ठान करतो परंतु फळावर लोभदृष्टी ठेवीत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. ॥१८-५९०॥
आणि प्रिय आलिया स्वभावें । शंबळ उरे वेंचे ठाउवें ।
नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी ॥ ५९१ ॥
प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्याजवळील अन्नसामुग्री सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे, याचे जसे स्वाभाविकच भान रहात नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग (सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग) प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले ॥१८-५९१॥
तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे ।
जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें ॥ ५९२ ॥
तरी नित्यकर्म करावयाचे राहिले याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही अथवा नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तरी त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही. ॥१८-५९२॥
ऐसऐसिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया ।
जाण सात्विक हें तया । गुणनाम गा ॥ ५९३ ॥
अर्जुना, अशा अशा हातवटीने जे कर्म घडते, त्याला ‘सात्विक कर्म’ हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे, असे समज. ॥१८-५९३॥
ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें ।
न करीं अवधानाचें । वाणेंपण ॥ ५९४ ॥
यानंतर राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल. तर तू लक्ष देण्याचे कामी कसूर होऊ देऊ नकोस. ॥१८-५९४॥
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥ २४ ॥
कर्मफलेच्छु अथवा अहंकारयुक्त मनुष्याकडून मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म करण्यात येते , त्याला राजस (कर्म) असे म्हणतात. ॥१८-२४॥
तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा ।
येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥ ५९५ ॥
तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आईबापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही, परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो ॥१८-५९५॥
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापें सिंतोडा ।
द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥ ५९६ ॥
अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला तर रोज दूधच लोटीत असतो ॥१८-५९६॥
तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें ।
तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं ॥ ५९७ ॥
त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे, जी अवश्य आचरणीय आहेत, ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही. ॥१८-५९७॥
येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें ।
वेचितांही न मनवे । बहु ऐसें ॥ ५९८ ॥
इतर काम्य कर्मांच्या नावांनी तर धन, देह वगैरे सर्व खर्च करीत असताही, आपण फार खर्च केला असे त्यास वाटत नाही. ॥१८-५९८॥
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे ।
पेरितां पुरें न म्हणिजे । बीज जेवीं ॥ ५९९ ॥
अरे अर्जुना, जेथे वाढीदिढीची प्राप्ती होते, तेथे द्रव्य देतांना तृप्ति होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असतांना पुरे म्हणवत नाही. ॥१८-५९९॥
कां परीसु आलिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ती ।
वेचितां ये उन्नती । साधकु जैसा ॥ ६०० ॥
अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ति खर्च करतांना जसा (पैसा हे ज्याचे साध्य आहे अशा) साधकास उत्साह वाटत असतो. ॥१८-६००॥
तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें ।
करी परी तें थोकडें । केलेंही मानी ॥ ६०१ ॥
त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठिण अशी काम्य कर्मे करतो, परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो. ॥१८-६०१॥
तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें ।
काम्य कीजे तितुकें । क्रियाजात ॥ ६०२ ॥
त्या फालाची इच्छा करणाराकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत, तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधिप्रमाणे बरोबर केली जातात. ॥१८-६०२॥
आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचें ।
कर्मी या नांवपाटाचें । वाणें सारी ॥ ६०३ ॥
आणि ते काम्य कर्म केल्याचेही लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो, ते असे की मी अमूक एक कर्म केले, अशा या नावाचा उच्चार करून (केलेल्या कर्माचे सर्व) प्रकार संपवून टाकतो. (व्यर्थ घालवतो). ॥१८-६०३॥
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु ।
ते न मनी काळज्वरु । औषध जैसें ॥ ६०४ ॥
तसा त्याला ‘मी कर्म करणारा’ असा गर्व चढतो. मग बाप अथवा गुरु त्यांना तो मानीत नाही. ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानीत नाही, ॥१८-६०४॥
तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें ।
कीजे गा आदरें । जें जें कांहीं ॥ ६०५ ॥
तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा धरणारा मनुष्य, जे जे काही आदराने करतो. ॥१८-६०५॥
परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा ।
जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥ ६०६ ॥
परंतु ते करणे देखीळ पुष्कळशा सायासांवर स्वार होऊन करतो. (म्हणजे थोड्याशा फायद्याकरता जिवापाड कष्ट करतो). ते कसे तर ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे. ॥१८-६०६॥
एका कणालागीं.ण् उंदिरु । आसका उपसे डोंगरु ।
कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥ ६०७ ॥
धान्याच्या एका कणा करता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाचे हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो, ॥१८-६०७॥
पैं भिकेपरतें न लाहे । तर्ही गारुडी सापु वाहे ।
काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां ॥ ६०८ ॥
पहा की भिकेपलीकडे काही प्राप्ति होत नाही, तरी गारुडी साप वागवतो. काय करावे ? एखाद्याला शीणच (कष्टच) गोड वाटतो. ॥१८-६०८॥
हे असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे ।
तैसें स्वर्गसुखलोभें । विचंबणें जें ॥ ६०९ ॥
हे राहू दे. परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे ॥१८-६०९॥
तें काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस ।
आतां चिन्ह परिस । तामसाचें ॥ ६१० ॥
ते त्रासाने भारलेले काम्यकर्म येथे राजस कर्म असे समजावे. आता तामस कर्माचे लक्षण ऐक. ॥१८-६१०॥
अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५ ॥
भावी परिणाम, नाश, प्राणिपीडा आणि (आपले कर्म करण्याचे) सामर्थ्य याकडे लक्ष न देता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो, त्याला तामस कर्म असे म्हणतात. ॥१८-२५॥
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम ।
निषेधाचें जन्म । सांच जेणें ॥ ६११ ॥
तरी जे निंदेचे काळे (दोष असणारे) वसतिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत, अर्जुना, ते तामस कर्म होय. ॥१८-६११॥
जें निपजविल्यापाठीं । कांहींच न दिसे दिठी ।
रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥
जे तामस कर्म उत्पन्न झाल्याबरोबर पाण्यावर रेघ काढली असता काही दिसत नाही, तसे (ज्याचे फल) दृष्टीला काहीच दिसत नाही. ॥१८-६१२॥
कां कांजी घुसळलिया । कां राखोंडी फुंकलिया ।
कांहीं न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥ ६१३ ॥
अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा विझलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामधे वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झलेले दिसत नाही. ॥१८-६१३॥
नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश ।
नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥ ६१४ ॥
अथवा भूस वार्यावर धरणे अथवा आकाशाचे बाणाने भेदन अथवा वार्याला धरण्याकरता फास लावणे ॥१८-६१४॥
हें आवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे ।
जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय ॥ ६१५ ॥
हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते, त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यावर वायाच जाते जाते. ॥१८-६१५॥
येर्हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे ।
जें कर्म निफजवितां मोडे । जगाचें सुख ॥ ६१६ ॥
एरवी तामस कर्म करण्यात नरदेहाएवढे धनही नाहीसे होते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो. ॥१८-६१६॥
जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु ।
आपण झिजे नाशु । कमळां करी ॥ ६१७ ॥
ज्याप्रमाणे कमलाच्या वनावरून काट्याचा फास ओढीत नेला असता, तो फास आपण स्वत: झिजतो व कमळांचा नाश करतो, ॥१८-६१७॥
कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे ।
पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ॥ ६१८ ॥
अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे (दिव्यावर उडी टाकून) आपण स्वत: जळतो व लोकांच्या डोळ्यांना दिसेनासे करतो, ॥१८-६१८॥
तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो ।
परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें ॥ ६१९ ॥
त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय (स्वत:च्या) देहालाही इजा झाली तरी बेहत्तर, परंतु ज्याच्या योगाने दुसर्यास अपाय उत्पन्न होतो ॥१८-६१९॥
माशी आपणयातें गिळवी । परी पुढीला वांती शिणवी ।
तें कश्मळ आठवी । आचरण जें ॥ ६२० ॥
माशी आपल्या स्वत:ला गिळवते, परंतु दुसर्याला (माशी गिळणाराला) ओकारीने शिणवते, त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची (आपपरपीडक अशा कृत्याची) जे तामस कर्म आठवण करून देते, ॥१८-६२०॥
तेंही करावयो दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे ।
हेंहीं पुढील तैसें । न पाहतां करी ॥ ६२१ ॥
तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न पहाता कर्म करतो, ॥१८-६२१॥
केवढा माझा उपावो । करितां कोण प्रस्तावो ।
केलियाही आवो । काय येथ ॥ ६२२ ॥
माझे सामर्थ्य केवढे आहे ? कर्म करीत असतांना प्रसंग कोणता आहे ? आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे ? ॥१८-६२२॥
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें ।
पुसोनियां होये । साटोप कर्मीं ॥ ६२३ ॥
या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून ‘मी हे कर्म करणार’ अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो. ॥१८-६२३॥
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही ।
कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥ ६२४ ॥
आपला आश्रय जाळून जसा अग्नि फैलावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा ॥१८-६२४॥
मग नेणें बहु थोडें । न पाहे मागें पुढें ।
मार्गामार्ग येकवढें । करीत चाले ॥ ६२५ ॥
मग (तो अग्नि अथवा समुद्र) थोडे फार जाणत नाही व मागेपुढे पहात नाही. मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो. ॥१८-६२५॥
तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित ।
कर्म होय तें निश्चित । तामस जाण ॥ ६२६ ॥
त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परके याचा विचार न करता, जे कर्म होते, ते खरोखर तामस कर्म आहे असे समज. ॥१८-६२६॥
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना ।
हे केली विवंचना । उपपत्तींसीं ॥ ६२७ ॥
अर्जुना, तीन भिन्न गुणांमुळे तीन भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे असे उपपत्तिसहित विवेचन केले. ॥१८-६२७॥
आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता ।
तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥ ६२८ ॥
आता याच कर्माचे आचरण करत असतांना कर्माभिमानी कर्ता जो जीव, तो देखील तीन प्रकारचा झाला आहे. ॥१८-६२८॥
चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे ।
कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें ॥ ६२९ ॥
ज्याप्रमाणे (ब्रह्मचर्यादि) चार आश्रमांच्या योगाने एक पुरुष चार प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारांमुळे कर्ता तीन प्रकारचा झाला आहे. ॥१८-६२९॥
तरी तयां तिहीं आंतु । सात्विक तंव प्रस्तुतु ।
सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं तूं ॥ ६३० ॥
परंतु त्या तिहींपकी आता सात्विक कर्ता तुला सांगेन, तू लक्ष देऊन ऐक. ॥१८-६३०॥
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६ ॥
आसक्तिरहित, अहंकाररहित, धैर्य व उत्साह यांनी युक्त, (कर्माची) सिद्धि अथवा असिद्धि या संबंधाने (सुख किंवा दु:खरूपी) विकाररहित, अशा कर्त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात. ॥१८-२६॥
तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढती जेवीं सरळिया ।
शाखा कां चंदनाचिया । बावन्नया ॥ ६३१ ॥
तर ज्याप्रमाणे बावन नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतु टाकून नीट वाढतात. (चंदन हा सर्व अंगांनी फलरूप असल्यामुळे त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही). ॥१८-६३१॥
कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका ।
तैसिया करी नित्यादिकां । क्रिया जो कां ॥ ६३२ ॥
अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येताच त्या सफल आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्यादिक कर्मे करतो ॥१८-६३२॥
परी फळशून्यता । नाहीं तया विफळता ।
पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायिसी । ॥ ६३३ ॥
(जर तो फालेच्छा टाकून कर्मे करतो, तर त्याच्या त्या नित्यादिक कर्माला फल नसेल, तर तसे नाही हे या ओवीत सांगतात) परंतु त्याच्या नित्यादिक कर्मांना मुळीच फल नाही असे नाही, अथवा त्या नित्यादिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही (तर ती नित्यादिक कर्मे स्वभावत:च फलरूप आहेत, असे जर आहे तर मग) अर्जुना, फळालाच फले कसली ? ॥१८-६३३॥
आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे ।
वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ॥ ६३४ ॥
आणि नित्यादिक कर्मे फार आदराने करतो. परंतु ज्याप्रमाणे वर्षाऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाने तो ‘मी नित्यादिक कर्मे केली’ असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. ॥१८-६३४॥
तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा ।
कर्मकलापु पैं गा । निपजावया ॥ ६३५ ॥
त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता ॥१८-६३५॥
तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें ।
कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥
त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल, त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने (दृष्टीने) पहाणे ॥१८-६३६॥
वृत्ति करणें येकवळा । चित्त जावों न देणें फळा ।
नियमांचिया सांखळा । वाहणें सदा ॥ ६३७ ॥
कर्माची व वृत्तीची सांगड घालणे (कर्मावाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे), कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणासंबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने (मर्यादा) पाळणे ॥१८-६३७॥
हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं ।
चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां ॥ ६३८ ॥
हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो, ॥१८-६३८॥
आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं ।
देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे ॥ ६३९ ॥
आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता, तो देहसुखाची पर्वा करीत नाही ॥१८-६३९॥
आळसा निद्रा दुर्हावे । क्षुधा न बाणवे ।
सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥ ६४० ॥
याप्रमाणे नित्यादिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते, भुकेची आठवण रहात नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही, ॥१८-६४०॥
तंव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक ।
सोनें जैसें पुटीं तुक । तुटलिया कसीं ॥ ६४१ ॥
तसतसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते, त्याप्रमाणे ॥१८-६४१॥
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच ।
आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये । ॥ ६४२ ॥
स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहाणेही तिला लाजिरवाणे वाटते. म्हणून पति मृत झाला असता सती जाणार्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालत असतांना (भीतीचे) रोमांच दृष्टीस पडतील काय ? ॥१८-६४२॥
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया ।
देहही सिदतां तया । काय खेदु होईल ? ॥ ६४३ ॥
अर्जुना, तर मग आत्म्याएवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे (त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्म करीत असतांना जर) त्याच्या देहाला सुद्धा कितीही दु:ख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल काय ? ॥१८-६४३॥
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे ।
तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया ॥ ६४४ ॥
म्हणून जो जो विषयसुख कमी होईल व देहाहंकार नाहीसा होईल, तो तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो, ॥१८-६४४॥
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरीं ।
तें ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥ ६४५ ॥
अशा रीतीने जो कर्मे करतो आणि एखादेवेळी ते कर्म करणे बंद पडते असा प्रकार जर घडून आला ॥१८-६४५॥
तरी कडाडीं लोटला गाडा । तो आपणपें न मनी अवघडा ।
तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां ॥ ६४६ ॥
तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कड्यावरून खाली येतांना मोडतो, तेव्हा तो (गाडा) जसा आपणावर कठिण प्रसंग आला असे मानीत नाही, त्याप्रमाणे कर्मे करीत असतांना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही. ॥१८-६४६॥
नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें ।
तरी तेंही जिंतिलें । मिरवूं नेणें ॥ ६४७ ॥
अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला, असे मिरवावयाचे तो जाणत नाही ॥१८-६४७॥
इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता ।
तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्विकु कर्ता ॥ ६४८ ॥
अर्जुना, अशा मर्माने जो कर्मे करतांना दिसतो, त्याला खरोखर सात्विक कर्ता असे म्हणावे. ॥१८-६४८॥
आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया ।
जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥ ६४९ ॥
अर्जुना, आता राजस कर्ता ओळाखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो. ॥१८-६४९॥
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७ ॥
अभिलाषी, कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, परपीडा देणारा, (बाह्य व आंतर) शुद्धिविरहित, (सिद्धि व असिद्धि यांच्यामुळे) हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस कर्ता असे म्हणतात. ॥१८-२७॥
जैसा गावींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा ।
कां स्मशानीं अमंगळा । आघवयांची ॥ ६५० ॥
ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात, ॥१८-६५०॥
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा ।
पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला ॥ ६५१ ॥
त्याप्रमाणे सर्व जो सर्व जगातील हावेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे, पहा. ॥१८-६५१॥
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु ।
तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ॥ ६५२ ॥
म्हणून ज्या कर्मामधे सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पहातो, त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो. ॥१८-६५२॥
आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी ।
क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥ ६५३ ॥
आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्चू देत नाही. आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो. ॥१८-६५३॥
कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला ।
बकु जैसा खुतला । मासेयासी ॥ ६५४ ॥
कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामधे सावध असतो अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो. त्याप्रमाणे राजसकर्ता दुसर्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो. ॥१८-६५४॥
आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी ।
फळें तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥ ६५५ ॥
ज्याप्रमाणे खाट्या (आंबट) बोरीचे झाडाजवळून गेले असता ते झाड जवळून जाणार्यास गुंतवते, जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाडते व कदाचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला पोळतात. ॥१८-६५५॥
तैसें मनें वाचा कायें । भलतया दुःख देतु जाये ।
स्वार्थु साधितां न पाहे । पराचें हित ॥ ६५६ ॥
त्याप्रमाणे जो मनाने, वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवीतच जातो व जो स्वार्थ साधीत असता दुसर्याचे हित पाहात नाही. ॥१८-६५६॥
तेवींचि आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी ।
न निघे मनोधर्मीं । अरोचकु ॥ ६५७ ॥
त्याचप्रमाणे आरंभलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो व (जरी ते मोठे काम्यकर्म शक्तीच्या बाहेर असले तरी त्या) कर्मासंबंधाने त्याच्या मनात अरुचि उत्पन्न होत नाही. ॥१८-६५७॥
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा ।
तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो ॥ ६५८ ॥
ज्याप्रमाणे धोतर्याच्या फळाला आत माज (कैफ) आणणार्या बिया असतात व बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आतबाहेर पवित्रपणाचे बाबतीत दरिद्री असतो. ॥१८-६५८॥
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया ।
तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥
आणि अर्जुना कर्मे केल्यावर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो. ॥१८-६५९॥
अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें ।
तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ॥ ६६० ॥
अथवा आरंभलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो. ॥१८-६६०॥
कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी ।
तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥ ६६१ ॥
ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तो राजसकर्ता होय असे पक्के समज. ॥१८-६६१॥
आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु ।
तोही करूं गोचरु । तामस कर्ता ॥ ६६२ ॥
आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस कर्ता, तोही स्पष्ट सांगू. ॥१८-६६२॥
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८ ॥
नियमरहित, असंस्कृतबुद्धि, फुगलेला, कपटी, दुसर्याच्या कर्माला विघ्न आणणारा, आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस कर्ता म्हणतात. ॥१८-२८॥
तरी मियां लागलिया कैसें । पुढील जळत असे ।
हें नेणिजे हुताशें । जियापरी ॥ ६६३ ॥
तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही, ॥१८-६६३॥
पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे ।
कां नेणिजे काळकूटें । आपुलें केलें ॥ ६६४ ॥
आपल्याकडून दुसर्याचा जीव कसा घेतला जातो, त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते, अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषाला कल्पना नसते, ॥१८-६६४॥
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया ।
आदरी वोखटिया । क्रिया जो कां ॥ ६६५ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसर्याच्या व आपला घात करणार्या असतील, त्या वाईट क्रिया करण्यास आरंभ करतो. ॥१८-६६५॥
तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी ।
चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥
त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्यांचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो, त्याप्रमाणे तो स्वैर रीतीने वागतो. ॥१८-६६६॥
पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया ।
तो पाहुनी पिसेया । कैंचीं त्राय ? ॥ ६६७ ॥
अर्जुना, त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्यापुढे वेड्याची ती काय किंमत ? ॥१८-६६७॥
आणि इंद्रियांचें वोगरिलें । चरोनि राखे जो जियालें ।
बैलातळीं लागलें । गोचिड जैसें ॥ ६६८ ॥
आणि ज्याप्रमाणे बैलाच्या वृषणाला गोचीड लागलेले असतात, त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित रक्षण करतो. ॥१८-६६८॥
हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु ।
राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥ ६६९ ॥
ज्याप्रमाणे मूल योग्यायोग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो तामसकर्ता स्वैर वागतो ॥१८-६६९॥
जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे ।
फुगे केरें धालेपणें । उकरडा जैसा ॥ ६७० ॥
जो तामसकर्ता प्रकृतीच्या आधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुगतो, तसा जो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुगतो. ॥१८-६७०॥
म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे ।
स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी ॥ ६७१ ॥
म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा, हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा (तामसकर्ता) मान्यपणाच्या नावाने (ईश्वर सर्वंना मान्य मान्य असून देखील) ईश्वरापुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगरांचीही ज्यापुढे किंमत नाही. ॥१८-६७१॥
आणि मन जयाचें विषकल्लोळीं । राहाटी फुडी चोरिली ।
दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥ ६७२ ॥
आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते ॥१८-६७२॥
किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें ।
तें जिणें कीं जुंवाराचें । टिटेघर ॥ ६७३ ॥
फार काय सांगावे ? त्याचा देहच कपटाचा बनविलेला असतो व त्याचे जगणे म्हणजे द्युत कर्माच्या तिवाठ्यावरचे घरच आसते. ॥१८-६७३॥
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो ।
म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा ॥ ६७४ ॥
त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भारलेल्या लुटारू भिल्लांचे प्रत्यक्ष वसतिस्थानच नव्हे काय ? म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये. ॥१८-६७४॥
आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें ।
जैसें अपेय पया मिनलें । लवण करी ॥ ६७५ ॥
आणि दुसर्याचे बरे केलेले (झालेले) पाहून ज्याला आपणावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असे वाटते. ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्यास अयोग्य करते. ॥१८-६७५॥
कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु ।
तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय ॥ ६७६ ॥
अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडित अग्नि होतो. ॥१८-६७६॥
नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं ।
होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवीं ॥ ६७७ ॥
अथवा अर्जुना, चांगले पदार्थ पक्वान्ने पोटात गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन रहातो. ॥१८-६७७॥
तैसें पुढिलाचें बरवें । जयाच्या भीतरीं पावे ।
आणि विरुद्धचि आघवें । होऊनि निगे ॥ ६७८ ॥
त्याप्रमाणे दुसर्याचे बरे (झालेले) ज्याला कळून चुकले की (तत्क्षणीच) ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. ॥१८-६७८॥
जो गुण घे दे दोख । अमृताचें करी विख ।
दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥ ६७९ ॥
पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्प दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसर्याचे गुण घेतो व त्यास नावे ठेवतो. ॥१८-६७९॥
आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें ।
तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये ॥ ६८० ॥
आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गति मिळेल, असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो ॥१८-६८०॥
तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी ।
दुर्व्यवहारीं जैसी । विटाळें लोटे ॥ ६८१ ॥
त्यावेळेला तर त्याला स्वाभाविक झोप कशी ठेवल्यासारखी येते आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की तीच झोप (विटाळशी) विटाळामुळे दूर रहाते तशी त्यास सोडून दूर रहाते. ॥१८-६८१॥
पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा ।
कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥ ६८२ ॥
ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याचे वेळी कावळ्याचे तोंड सडते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात. (त्याला दिसेनासे होते) ॥१८-६८२॥
तैसा कल्याणकाळु पाहे । तैं तयातें आळसु खाये ।
ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें ॥ ६८३ ॥
त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी, तो म्हणेल तसे होते. (प्रमाद करतांना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते). ॥१८-६८३॥
जेवींचि सागराच्या पोटीं । जळे अखंड आगिठी ।
तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो ॥ ६८४ ॥
ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नि अखंड जळत असतो त्याप्रमाणे जो अंत:करणात खेद अखंड वहातो. ॥१८-६८४॥
लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि ।
तैसा जो जीवितावधि । विषादें केला ॥ ६८५ ॥
ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारावाटे येणार्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो ॥१८-६८५॥
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा ।
सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥ ६८६ ॥
हे वीरा अर्जुना, जो कल्पांतांच्या पारापलीकडेही अभिलाषाने व्यापाराचे सूत्र धरतो (कल्पाच्या अंतांनंतरही फलप्राप्ती व्हावी, अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो). ॥१८-६८६॥
अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं ।
करितां विषीं हातीं । तृणही न लगे ॥ ६८७ ॥
अरे जगाच्या पलीकडल्या गोष्टींविषयी अंत:करणात चिंता वहातो, पण अशी चिंता करीत असता, ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला एका गवताच्या काडीचाही लाभ होत नाही. ॥१८-६८७॥
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु ।
देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥ ६८८ ॥
असा जो लोकांच्या पापची मूर्तिमान राशी आहे असे तू पहाशील, तो निर्विवाद तामस कर्ता होया. ॥१८-६८८॥
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचें त्रिधा चिन्ह ।
दाविलें तुज सुजन । चक्रवर्ती ॥ ६८९ ॥
हे सुजनांच्या राजा, अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिहींचे तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले. ॥१८-६८९॥
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९ ॥
आता आविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगवर घालून ॥१८-६९०॥
आतां अविद्येचिया गांवीं । मोहाची वेढूनि मदवी ।
संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं ॥ ६९० ॥
जी बुधि म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पहाण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची ही प्रवृत्ति तीन प्रकारची आहे. ॥१८-६९१॥
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव ।
तिये बुद्धीचीही धांव । त्रिधा असे ॥ ६९१ ॥
बुद्धि आणि धैर्य यांचे सत्व, रज व तम या गुणांमुळे होणारे मी पूर्णपणे वेगवेगळे सांगतो, हे धनंजया ऐक. ॥१८-२९॥
अगा सत्त्वादि गुणीं इहीं । कायी एक तिहीं ठायीं ।
न कीजेचि येथ पाहीं । जगामाजीं ॥ ६९२ ॥
अरे अर्जुना, विचार कर. या सत्वादि तिन्ही गुणांनी या जगामधे कोणती म्हणून एक वस्तु तीन ठिकाणी केलेली नाही ? ॥१८-६९२॥
आगी न वसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टीं ।
तैसें तें कैंचें दृश्यकोटीं । त्रिविध जें नोहे ॥ ६९३ ॥
ज्याप्रमाणे पोटात अग्नि नसलेले लाकूड जगात कोठे आहे ? त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी तीन प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामधे वस्तु कोठे आहे ? ॥१८-६९३॥
म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी ।
धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥ ६९४ ॥
म्हणून तीन गुणांनी, बुद्धि तीन गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच (तीन गुणांनी केलेले तीन भाग आहेत. ॥१८-६९४॥
तेंचि येक वेगळालें । यथा चिन्हीं अळंकारलें ।
सांगिजैल उपाइलें । भेदलेपणें ॥ ६९५ ॥
तीच एक बुद्धि व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या (तीन गुणांनी केलेल्या) भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल. ॥१८-६९५॥
परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागामाजीं धनंजया ।
आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं ॥ ६९६ ॥
परंतु अर्जुना, बुद्धि, धैर्य या दोन गोष्टींमधे प्रथम बुद्धीचे तीन प्रकार सांगू. ॥१८-६९६॥
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा ।
प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी ॥ ६९७ ॥
(नित्य व नैमित्तिक ही) करणीय व (काम्य व निषिद्ध ही) अकरणीय, त्यांचे ठिकाणी (अनुक्रमे) प्रवृत्ति व निवृत्ति (यापासून उत्पन्न होणारे जन्ममरणाचे) भय व अभय, बंध व मोक्ष हे जी जाणते ती सात्विकी बुद्धि होय. ॥१८-३०॥
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध ।
संसारभयें सबाध । जीवां ययां ॥ ६९८ ॥
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणार्या प्राण्याला उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा तीन वाटा आहेत. ॥१८-६९७॥
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३० ॥
कारण की विहिताचे न करणे, काम्य व निषिद्ध हे तीन मार्ग आहेत. व त्यापासून या जीवांना संसारभय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. ॥१८-६९८॥
म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें ।
तें एकचि येथ भलें । नित्य कर्म ॥ ६९९ ॥
म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्यकर्म, तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे. ॥१८-६९९॥
तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ ।
कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहनें ॥ ७०० ॥
ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागवण्याकरता पाणी प्यावे (त्याशिवाय पाणी पिण्यात दुसरा हेतूच नाही) त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टि ठेऊन ते शास्त्रविहित नित्यकर्म करावे. ॥१८-७००॥
येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम ।
करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥ ७०१ ॥
एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. ॥१८-७०१॥
ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला ।
करणीयत्वें आला । मुमुक्षुभागा ॥ ७०२ ॥
असे जो कर्म करतो, तो संसारभयाकडून चांगल्या रीतीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षूच्या योग्यतेला आला. ॥१८-७०२॥
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरंवसा ।
मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥ ७०३ ॥
त्या मुमुक्षुस्थितीत जी बुद्धि असा बळकट भरवंसा बांधते की अशा रीतीने (केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टि ठेऊन कर्म करण्याने) मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल. ॥१८-७०३॥
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळीं ।
इये कर्मीं बुडकुळी । द्यावीं कीं ना ? ॥ ७०४ ॥
म्हणून (ती बुद्धि म्हणजे) प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ति मांडली आहे. (अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ति दिसते तरी आतून खरी निवृत्तीच आहे). अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच (अशा रीतीने कर्म करण्याचा बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच) ॥१८-७०४॥
तृषार्ता उदकें जिणें । कां पुरीं पडलिया पोहणें ।
अंधकूपीं गति किरणें । सूर्याचेनि ॥ ७०५ ॥
तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव (होडी) मिळाली असता जगतो व अंधार्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जगतो. ॥१८-७०५॥
नाना पथ्येंसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये ।
का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥ ७०६ ॥
अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जगतो अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला ॥१८-७०६॥
तरी तयाच्या जीविता । नाहीं जेवीं अन्यथा ।
तैसें कर्मीं इये वर्ततां । जोडेचि मोक्षु ॥ ७०७ ॥
तर तो जगेलच यात अन्यथा नाही, त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. ॥१८-७०७॥
हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें ।
आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ॥ ७०८ ॥
करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान (ज्या बुद्धीला) आहे व जी बुद्धि अकरणीय कर्म असे (पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे) आहे हे पक्के जाणते ॥१८-७०८॥
जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें ।
अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ॥ ७०९ ॥
ती काम्यादिक कर्मे संसारभयदायक आहेत. म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत (जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरलेली आहेत) ॥१८-७०९॥
तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं ।
प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ॥ ७१० ॥
त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते. ॥१८-७१०॥
पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घालवे ।
धगधगीत नागवे । शूळ जेवीं ॥ ७११ ॥
अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही, ॥१८-७११॥
कां काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु ।
न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥ ७१२ ॥
अथवा फूं फूं करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही अथवा वाघाच्या गुहेत जाववत नाही, ॥१८-७१२॥
तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय ।
उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥ ७१३ ॥
त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत नि:संशय मोठे भय उत्पन्न होते ॥१८-७१३॥
वाढिलें रांधूनि विखें । तेथें जाणिजे मृत्यु न चुके ।
तेवीं निषेधीं कां देखे । बंधातें जे ॥ ७१४ ॥
विष मिळवून तयार करून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यु चुकणार नाही, जे जसे पक्के जाणावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पहाते ॥१८-७१४॥
मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्ती ।
विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥ ७१५ ॥
मग ते बंधभयाने भारलेले निषिद्ध कर्म प्राप्त असता, त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोग जी बुद्धि जाणते ॥१८-७१५॥
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी ।
खरा कुडा पारखी । जियापरी ॥ ७१६ ॥
ज्याप्रमाणे रत्नपारखी खर्याखोट्या रत्नाची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ति-निवृत्तीच्या मापाने कार्याकार्याचा निर्णय करते. ॥१८-७१६॥
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी ।
सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण ॥ ७१७ ॥
त्याप्रमाणे कृत्याकृत्याचा विचार जी अखंड जाणते, तिलाच सात्विक बुद्धि असे म्हणतात, असे तू समज. ॥१८-७१७॥
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१ ॥
ज्या बुद्धीने धर्म व अधर्म, किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही, ती बुद्धी हे पार्था राजस होय. ॥१८-३१॥
आणि बकाच्या गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी ।
कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे ॥ ७१८ ॥
आणि बगळ्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते (कारण बगळ्यास दूध व पाणी वेगळे करता येत नाही) अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताडा जाणत नाही ॥१८-७१८॥
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे ।
परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवीं ॥ ७१९ ॥
जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो, तो लाकडे कोरण्याकरता धावतो. परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही ॥१८-७१९॥
तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें ।
तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ॥ ७२० ॥
त्याप्रमाणे जी बुद्धि ही जी धर्माधर्मरूप कृत्याकृत्ये, त्यांची निवड न करता सरसकट आचरण करते ॥१८-७२०॥
अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें ।
न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें ॥ ७२१ ॥
अरे अर्जुना, मोत्यांच्या परीक्षेची दृष्टि नसता मोती घेतले तर सौदा झाला तरी तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखेच व्हावयाचे. ॥१८-७२१॥
तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे ।
येर्हवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां ॥ ७२२ ॥
त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे रहाते, एरवी जी बुद्धि दोन्ही (अकरणीय व करणीय) सरसकट सारखीच समजते ॥१८-७२२॥
ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी ।
अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥ ७२३ ॥
लग्नसमारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडानिवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी (त्याप्रमाणे कार्याकार्याची निवड जाणत नाही) अशी ती राजस बुद्धि आहे, असे तू चांगल्या रीतीने ओळख. ॥१८-७२३॥
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥
हे पार्था, अधर्माला जी धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते, ती तमाने आच्छादलेली बुद्धि तामसी बुद्धी होय. ॥१८-३२॥
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राती होऊनि ॥ ७२४ ॥
आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते, अथवा राक्षसांना दिवस, रात्र होऊन उजाडतो (त्यास दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते. ॥१८-७२४॥
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा ।
पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें ॥ ७२५ ॥
अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते. ॥१८-७२५॥
तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें ।
साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥
त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल, तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असेच जी बुद्धि मानते ॥१८-७२६॥
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ ।
गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥ ७२७ ॥
जी बुद्धि सर्वच अर्थ अनर्थ असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते. ॥१८-७२७॥
किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें ।
तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी ॥ ७२८ ॥
फार काय सांगावे ? जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे, तितकेही जी बुद्धि उलट जाणते ॥१८-७२८॥
ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावी पंडुसुता ।
रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥ ७२९ ॥
अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धि तामसी आहे, असे समजावे आणि ज्या बुद्धीला धर्मार्थाची खरी खरी रात्र आहे (म्हणजे धर्म व अर्थ यांचे खरे अज्ञान आहे) त्या बुद्धीला काय करावयाचे ? ॥१८-७२९॥
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद ।
सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ॥ ७३० ॥
हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणार्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले. ॥१८-७३०॥
आतां ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजातीं ।
खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥ ७३१ ॥
आता याच तीन प्रकारच्या बुद्धीने कर्ममात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या तीन प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो ॥१८-७३१॥
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग ।
सांगिजती चांग । अवधान देईं ॥ ७३२ ॥
त्या धैर्याचेही तीन प्रकार त्यांच्या योग्य लक्षणांसह सांगण्यात येतील. तू चांगले लक्ष दे. ॥१८-७३२॥
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥
हे पार्था, योगाला सोडून न जाणार्या ज्या धृतीने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया (मनुष्य) आवरून धरीत असतो, ती सात्विकी धृति होय. ॥१८-३३॥
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु ।
कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्यकर्मासकट अंधार थांबतो, नाहीसा होतो अथवा राजाचा हुकुम (ज्याप्रमाणे) निंद्यकर्म थांबवतो ॥१८-७३३॥
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु ।
आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ ॥ ७३४ ॥
अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपणहून नाहीसे होतात. ॥१८-७३४॥
कां अगस्तीचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें ।
चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती ॥ ७३५ ॥
किंवा अगस्ति ऋषी दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून रहातात अथवा सूर्यविकासिनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटातात ॥१८-७३५॥
हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां ।
गर्जोनि पुढां जाला । सिंहु जरी ॥ ७३६ ॥
हे राहू दे, मदोन्मत्त हत्ती जात असतांना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवीत नाहीत. ॥१८-७३६॥
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु ।
मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
त्याप्रमाणे जे धैर्य अंत:करणात उत्पन्न झाल्यावर मनादिक इंद्रिये आपापला व्यापार उभ्याउभ्याच टाकून देतात. ॥१८-७३७॥
इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी ।
मन मायेच्या पोटीं । रिगती दाही ॥ ७३८ ॥
अर्जुना, इंद्रियाच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात व दहाही इंद्रिये आपल्या मनरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात (आपआपल्या विषयांचा संबंध सोडून अंतर्मुख होतात) ॥१८-७३८॥
अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी ।
बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥
जे धैर्य खालील अपानवायु व वर वहाणारा प्राणवायु, या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त ह्या नऊही वायूंची एक जुडी करून नंतर सुषुम्नेमधे उडी घालते. (ज्या धैर्याच्या योगाने नऊही वायु सुषुम्नेत उडी घालतात). ॥१८-७३९॥
संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें ।
बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥ ७४० ॥
ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प-विकल्पाचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच बसते. ॥१८-७४०॥
ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें ।
स्वचेष्टांचीं संभाषणें । सांडविजती ॥ ७४१ ॥
जो धैर्यरूपी राजा, याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपआपल्या कर्माची बोलणी टाकायला लावतो॥१८-७४१॥
मग आघवींचि सडीं । ध्यानाच्या आंतुल्या मढीं ।
कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥ ७४२ ॥
मग अष्टांगयोगाच्या युक्तीने त्या एकट्या आपआपल्या कर्मांचा संबंध सुटलेल्या) सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते ॥१८-७४२॥
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं ।
तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया ॥ ७४३ ॥
परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा, त्याच्या स्वाधीन होईपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता ती धरली जातात (त्यांचा निग्रह केला जातो) ॥१८-७४३॥
ते गा धृती येथें । सात्विक हें निरुतें ।
आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥
अरे अर्जुना, ऐक. ते धैर्य खरोखर या जगात सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला म्हणाले. ॥१८-७४४॥
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसण्गेन फलाकाण्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥
हे अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने (मनुष्य) धर्म, अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ती प्रसंगवशात् फलाची आकांक्षा धरणारी धृति, हे पार्था राजसी होय. ॥१८-३४॥
आणि होऊनियां शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं ।
नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥
आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी स्वर्गसंसाररूपी दोन्ही घरात आनंदाने रहातो, ॥१८-७४५॥
तो मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी ।
जेणें धैर्यबळें करी । क्रिया-वणिज ॥ ७४६ ॥
मनोरथरूपी सागरामधे धर्म, अर्थ व कामरूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार, तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळावर करतो, ॥१८-७४६॥
जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे ।
येवढें सायास साहे । जया धृती ॥ ७४७ ॥
त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो, त्याची निदान चौपट तरी (प्राप्ति) होईल असे धोरण बांधतो, एवढे सायास तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो. ॥१८-७४७॥
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस ।
आतां आइक तामस । तिसरी जे कां ॥ ७४८ ॥
अर्जुना, ते या जगात राजस धैर्य होय. आता तिसरे धैर्य जे तामस ते ऐक. ॥१८-७४८॥
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥
जिच्या योगाने निद्रा, भय, शोक, असंतोष आणि मद ही दुर्बुद्धि (मनुष्य) सोडत नाही तिला तामसी धृति समजतात. ॥१८-३५॥
तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें ।
कोळसा काळेपणें । घडला जैसा ॥ ७४९ ॥
तर कोळासा हा काळेपणाचा बनला आहे, त्याप्रमाणे ज्या तामसी धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण, त्या गुणाने रूपाला येणे असते. ॥१८-७४९॥
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु ।
तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ?॥ ७५० ॥
अहो जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे, त्याला देखील गुणपणाची पदवी कशी ? तर राक्षस हे दुष्ट, पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय ? ॥१८-७५०॥
पैं ग्रहांआजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु ।
तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥
नवग्रहामधे जो विस्तव (विस्तवासारखा) आहे त्याला मंगळ (कल्याण करणारा) म्हणतात, त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी ‘गुण’ हा शब्द अविचारी (अविचाराने लावलेला) आहे. ॥१८-७५१॥
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा ।
उभारिला आंगवठा । जया नराचा ॥ ७५२ ॥
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण, तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, (तयार झाले आहे). ॥१८-७५२॥
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कहीं न मुके ।
पापें पोषितां दुःखें । न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥
ज्याप्रमाणे पापे पोषिली असता (एकसारखे पापेच करीत गेले असता) त्या पाप करणाराला दु:ख कधीच सोडीत नाही, त्याप्रमाणे तो (तमोगुणी पुरुष) आळस खाकेत बाळगून असतो, म्हणून निद्रा त्याला कधीच सोडीत नाही. ॥१८-७५३॥
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी ।
विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥
आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठिणपणा सोडणे शक्य नाही, त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडीत नाही. ॥१८-७५४॥
आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो ।
केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥
आणि ज्याप्रमाणे कृतघ्न पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थाच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो, म्हणून शोकाने त्यास आपले घर केलेले असते. (शोक त्याच्यापासून जाऊ शकत नाही). ॥१८-७५५॥
आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं ।
म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली ॥ ७५६ ॥
आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जिवाशी धरून राहिला, म्हणूण खेदाने त्याच्याशी मैत्री केली. ॥१८-७५६॥
लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी ।
तैसी केली मरणावधी । विषादें तया ॥ ७५७ ॥
ज्याप्रमाणे लसुणाला घाण कधीच सोडीत नाही, अथवा पथ्य न करणाराला रोग सोडीत नाही, त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही. ॥१८-७५७॥
आणि वयसा वित्तकामु । ययांचा वाढवी संभ्रमु ।
म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला ॥ ७५८ ॥
आणि तारुण्य, द्रव्य व विषयेच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्व वाढवतो, म्हणून मदाने त्यास आपले रहाण्याचे ठिकाण केले आहे. ॥१८-७५८॥
आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु ।
कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥ ७५९ ॥
ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडीत नाही अथवा जातिवंत सर्प जसा वैर सोडीत नाही अथवा भय जसे नेहेमी जगाचा शत्रु आहे. ॥१८-७५९॥
नातरी शरीरातें काळु । न विसंबे कवणे वेळु ।
तैसा आथी अढळु । तामसीं मदु ॥ ७६० ॥
अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणात्याही वेळेला विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचा असतो. ॥१८-७६०॥
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख ।
जिया धृती देख । धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
पहा, याप्रमाणे हे निद्रादिक पाच दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरलेले आहेत ॥१८-७६१॥
तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें ।
म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी ॥ ७६२ ॥
अर्जुना, त्या धृतीला या जगात तामस धृति असे म्हणातात, असे तू समज. असे त्या जगाच्या देवाने (श्रीकृष्णाने) म्हटले. ॥१८-७६२॥
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि ।
तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥ ७६३ ॥
याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्मनिश्चय केला जातो, तो या जगात (या तीन प्रकारच्या) धैर्याने सिद्धीस नेला जातो. ॥१८-७६३॥
सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये ।
परी चालणें तें आहे । धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥
सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, ॥१८-७६४॥
तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी ।
परी निफजावया होआवी । धीरता जे ॥ ७६५ ॥
त्याप्रमाणे बुद्धि कर्माला दाखवते आणि इंद्रियसमुदाय ते कर्म घडवून आणतो, परंतु घडवून आणण्याला धैर्य लागते. ॥१८-७६५॥
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती ।
यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥ ७६६ ॥
अर्जुना, ते तीन प्रकारचे धैर्य तुला सांगितले. या धैर्याने तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग ॥१८-७६६॥
येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे ।
तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ॥ ७६७ ॥
या तीन प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, ज्याला सुख असे म्हटले जाते, तेही (सुख) कर्माच्या आधीन असल्यामुळे तीन प्रकारचे आहे असे समजावे. ॥१८-७६७॥
तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख ।
विवंचूं आतां चोख । चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥
तर त्रिगुणांनी तीन प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू, पहा. ॥१८-७६८॥
परी चोखी ते कैसी सांगे । पैं घेवों जातां बोलबगें ।
कानींचियेही लागे । हातींचा मळु ॥ ७६९ ॥
परंतु आमच्या सांगण्याचा चोखापणा विचारशील तर तो असा आहे, की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करीत असतांना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल. ॥१८-७६९॥
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें ।
तेणें आइक हो आंतरें । जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥
म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल, अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंत:करणाने ऐक. ॥१८-७७०॥
ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो ।
मांडला तो निर्वाहो । निरूपित असें ॥ ७७१ ॥
असे बोलून देवांनी तीन प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला, तो प्रकार आता सांगतो. ॥१८-७७१॥
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६ ॥
हे भरतश्रेष्ठा, तीन प्रकारचे सुख माझ्याकडून ऐक. ज्याचे ठिकाणी जीव अभ्यासाचे योगाने रममाण होतो व ज्या योगाने जीवाच्या (जीवपणाच्या) दु:खाचा नाश खात्रीने होतो. ॥१८-३६॥
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगों म्हणौनि प्रतिज्ञा ।
बोलिलों तें प्राज्ञा । ऐक आतां ॥ ७७२ ॥
देव म्हणतात, तीन प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू, म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती, ते तीन प्रकारचे सुख आता ऐक. ॥१८-७७२॥
तरी सुख तें गा किरीटी । दाविजेल तुज दिठी ।
जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥ ७७३ ॥
तर अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने (अनुभावाने) जीवास होते, ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येईल. (म्हणजे समजेल असे सांगण्यात येईल). ॥१८-७७३॥
परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपें ।
कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं ॥ ७७४ ॥
परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते, ॥१८-७७४॥
नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु ।
देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचें जेवीं ॥ ७७५ ॥
अथवा मिठाचे पाणी होण्याकरता जसे दोन चार वेळ त्या मिठास पाण्याचे हापके देऊन टाकावे लागतात. ॥१८-७७५॥
तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें ।
जीवपणाचें नासे । दुःख जेथें ॥ ७७६ ॥
त्याप्रमाणे आत्मा आणि जीव, यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने (गोडी लाऊन) जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली असता, ज्या (आत्मसुखाचे) ठिकाणी जीवपणाचे दु:ख नाश पावते. ॥१८-७७६॥
तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक ।
तेंही सांगों एकैक । रूप आतां ॥ ७७७ ॥
ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो. ॥१८-७७७॥
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ ३७ ॥
जे आरंभी विषासारखे (पण) परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असते, जे आत्मबुद्धि-प्रसादाने उत्पन्न होते, त्या सुखास सात्विक सुख असे म्हणतात. ॥१८-३७॥
आतां चंदनाचें बूड । सर्पी जैसें दुवाड ।
कां निधानाचें तोंड । विवसिया जेवीं ॥ ७७८ ॥
आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे (प्राप्त होण्यास) अवघड झालेले असते, अथवा ठेव्याचे तोंडावरील पिशाचामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठिण झालेले असते ॥१८-७७८॥
अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें ।
कां बाळपण दासटें । त्रासकाळें ॥ ७७९ ॥
अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञारूपी संकटाची अडचण असते. अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपणदेखील पीडाकारक झालेले असते. ॥१८-७७९॥
हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधीं ।
नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो ॥ ७८० ॥
हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा आहे, अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु ते सेवन करतेवेळी जिभेला त्रासदायक असते. ॥१८-७८०॥
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा ।
विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥ ७८१ ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठिण असतो (जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो) ॥१८-७८१॥
देत सर्वस्नेहा मिठी । आगीं ऐसें वैराग्य उठी ।
स्वर्ग संसारा कांटी । काढितचि ॥ ७८२ ॥
ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्ग व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच. ॥१८-७८२॥
विवेकश्रवणें खरपुसें । जेथ व्रताचरणें कर्कशें ।
करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥ ७८३ ॥
ज्या ठिकाणी नित्यानित्यविवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठिण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे भोकसे जातात (लचकेच्या लचके तोडले जातात) ॥१८-७८३॥
सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे ।
बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ ॥ ७८४ ॥
सुषुम्नेच्या तोंडाने प्राण व अपानांचे लोंढे गिळावे लागतात, ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात, ॥१८-७८४॥
जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वस्त काढितां ।
ना भणंगु दवडितां । भाणयावरुनी ॥ ७८५ ॥
चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कसेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जसे होते, हे काहीच नाही, तर वाढलेल्या पानावरून अन्नार्थी दरिद्री मनुष्याला हाकून देत असता जसे होते ॥१८-७८५॥
पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां एकुलतें एक ।
होय कां उदक । तुटतां मीना ॥ ७८६ ॥
आईपुढून काळाने जे एकुलते एक मूल नेत असतां अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दु:ख होते ॥१८-७८६॥
तैसें विषयांचें घर । इंद्रियां सांडितां थोर ।
युगांतु होय तें वीर । विराग साहाती ॥ ७८७ ॥
त्याप्रमाणे विषयांच्या घराचा (विषयरूपी घराचा) त्याग करतांना इंद्रियांना मोठा युगान्त होतो (म्हणजे मोठे संकट ओढवल्यासारखे वाटते), तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात. ॥१८-७८७॥
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु ।
मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥
ज्या सुखाचा आरंभ अशा कठिणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ (देव-दावानांना झाला) ॥१८-७८८॥
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा ।
तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ॥ ७८९ ॥
या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विष जे निघाले, त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला (ते प्राशन केले). मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रगट झाला ॥१८-७८९॥
पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवेपण असे ।
तें परीपाकीं कां जैसें । माधुर्य आते ॥ ७९० ॥
हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते. परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण (अत्यंत आंबटपणा) गोडपण होते, ॥१८-७९०॥
तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें ।
मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात ॥ ७९१ ॥
त्याप्रमाने वैराग्यादिक आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यसह सर्व अविद्या नाहीशी होते ॥१८-७९१॥
तेव्हां सागरीं गंगा जैसी । आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी ।
अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥ ७९२ ॥
तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते (व समुद्र होते) त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धि मिळाल्यावर (ती आत्मरूप होते आणि मग) अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. ॥१८-७९२॥
ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे ।
तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख ॥ ७९३ ॥
याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांतिरूपाने परिणामाला पावते त्यास सात्विक सुख असे समजावे. ॥१८-७९३॥
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८ ॥
विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे, आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य (पण) परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे. ॥१८-३८॥
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया ।
जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥ ७९४ ॥
आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते (म्हणजे ज्या सुखाचा अंत:करणात अफाट पूर येतो). ॥१८-७९४॥
अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो ।
कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥ ७९५ ॥
सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काडून लग्नाचा पसारा मांडावा. ॥१८-७९५॥
नाना रोगिया जिभेपासीं । केळें गोड साखरेसीं ।
कां बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥ ७९६ ॥
अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते ॥१८-७९६॥
पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र ।
कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥ ७९७ ॥
प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्याप्रथम (कृत्रिम) मैत्री असते किंवा बाजारातील कुटुंबाची (वेश्येची) जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरूप्याचे विनोद जसे विचित्र असतात. ॥१८-७९७॥
तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी ।
मग उपडिला खडकीं । हंसु जैसा ॥ ७९८ ॥
त्याप्रमाणे विषय व इंद्रिये यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोसते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व) खडकावर आपटून मरतो. ॥१८-७९८॥
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे ।
सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी ॥ ७९९ ॥
त्याप्रमाणे (धन वगैरे मिळवलेली) सर्व कमाई संपते, जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते. (पुण्याचा क्षय होतो). ॥१८-७९९॥
आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं ।
मग हानीच्याचि घाईं । लोळावें उरे ॥ ८०० ॥
आणि जे काही विषयसुख भोगले ते स्वप्नासारखे (भोगल्याबरोबर) नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते, (नाशाचे तडाखे सोशीत बसावे लागते). ॥१८-८००॥
ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख ।
परत्रीं कीर विख । होऊनि परते ॥ ८०१ ॥
ते राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते, पहा. आणि पर लोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते. परलोकप्राप्तीचा सर्वस्वी नाश करते.). ॥१८-८०१॥
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा ।
जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥ ८०२ ॥
कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा (शेत) जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो. ॥१८-८०२॥
तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो ।
जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा ॥ ८०३ ॥
तेव्हा पातकास बल येते व ती (विषयसुख भोगणारास) नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो. ॥१८-८०३॥
पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें ।
तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥ ८०४ ॥
बचनाग हे विष नावाला गोड आहे, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते ॥१८-८०४॥
पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें ।
म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ॥ ८०५ ॥
अर्जुना ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे. म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. ॥१८-८०५॥
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९ ॥
जे आरंभी आणि परिणामी अंत:करणाला मोह पाडणारे, निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख, त्याला तामस सुख म्हणतात. ॥१८-३९॥
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें ।
स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख ॥ ८०६ ॥
आणि अपेयाच्या (मद्य वगैरेच्या) पिण्याने व अखाद्याच्या (मांस वगैरेच्या) भोजनाने अथवा स्वैर स्त्रीच्या (वेश्येच्या) संगतीने जे सुख होते ॥१८-८०६॥
का पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें ।
जें सुख अवतरे । भाटाच्या बोलीं ॥ ८०७ ॥
अथवा जे सुख दुसर्यास ठार मारण्याने होते अथवा दुसर्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या (स्तुतिपाठकांच्या बोलण्याने प्रगट होते ॥१८-८०७॥
जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे ।
जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ॥ ८०८ ॥
जे सुख आळसाने वाढते व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडते ॥१८-८०८॥
तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा ।
हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ॥ ८०९ ॥
अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करत नाही. कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. ॥१८-८०९॥
ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें ।
तें हें यथागमें केलें । गोचर तुज ॥ ८१० ॥
याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते तीन प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही तीन प्रकारचे झाले आहे. ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे. ॥१८-८१०॥
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ ।
वांचूनि कांहींचि नसे स्थूल । सूक्ष्मीं इये ॥ ८११ ॥
या प्रकृतिजन्य तीन गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमधे स्वर्गामधे अथवा देवांमधे नाही. ॥१८-४०॥
आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणीं इहीं किरीटी ।
गुंफिली असे पटीं । तांतुवीं जैसी ॥ ८१२ ॥
ते कर्ता, कर्म व कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीवाचून या स्थूलसूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. ॥१८-८११॥
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥
आणि अर्जुना ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामधे तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे तीन गुणांनी गुंफलेली आहे. ॥१८-८१२॥
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्त्वादिकीं ।
तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ॥ ८१३ ॥
म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वादिक गुणांनी गोवली जात नाही, अशी वस्तु स्वर्गात अथवा मृत्युलोकात आहे असे नाही. ॥१८-८१३॥
कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा ।
का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ? ॥ ८१४ ॥
लोकरिशिवाय घोंगडी कोठली ? मातीशिवाय मोदळा (चिखालाचा गोळा) कोठला ? अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय ? ॥१८-८१४॥
तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे ।
ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात ॥ ८१५ ॥
त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीमधे जो तयार होतो, अर्जुना, असा खरोखार प्राणी नाही. ॥१८-८१५॥
यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ ।
घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥ ८१६ ॥
याकरता हे सर्व जग केवळ तीन गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. ॥१८-८१६॥
गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली ।
चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥
(गुणांची अशी अचाट शक्ति आहे की) गुणांनी देवाच्या पाठीमागे (ब्रह्मा, विष्णु, शंकर असे) तीन प्रकार लावले, गुणांनी लोकात तीन (स्वर्ग, मृत्युलोक व पाताळ असे) भेद उत्पन्न केले व या चार गुणांनी चार निरनिराळे व्यवसाय लाऊन दिले. ॥१८-८१७॥
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१ ॥
हे शत्रुतापना, स्वभावज गुणांचे योगाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत. ॥१८-४१॥
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण ।
तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ॥ ८१८ ॥
तेच चार वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या चार वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. ॥१८-८१८॥
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी ।
जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥
इतर जे दोन वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने (बरोबरीचे मानावेत. कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. ॥१८-८१९॥
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया ।
तर्हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥
अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे, त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही. तरी त्याची वृत्ति तीन वर्णांच्या आधीन आहे. ॥१८-८२०॥
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां ।
शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥ ८२१ ॥
अहो त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणादिक तीन वर्णांबरोबर शूद्र देखील चौथा वर्ण झाला पहा. ॥१८-८२१॥
जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें ।
तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥
ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादि तिन्ही वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. ॥१८-८२२॥
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था ।
करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥ ८२३ ॥
अर्जुना, ही चातुर्वर्ण्यव्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाच्या कर्मामार्गाचे स्वरूप सांगू. ॥१८-८२३॥
जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी ।
चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥ ८२४ ॥
की ज्या गुणांनी (स्वाभविक कर्मांनी) ते चारी वर्ण, जन्ममृत्यूच्या कात्रीतून चुकवून, ईश्वराचे ठिकाणी पोहोचतील. ॥१८-८२४॥
जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं ।
कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥
ज्या आत्मप्रकृतीच्या (मायेच्या) या सत्वादि तीन गुणांनी चार वर्णांना चार ठिकाणी कर्मे वाटून दिली ॥१८-८२५॥
जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका ।
नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥ ८२६ ॥
ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलास वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरास जशी कामे वाटून द्यावीत ॥१८-८२६॥
तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी ।
केली आहे वर्णीं । चहूं इहीं ॥ ८२७ ॥
त्याप्रमाणे प्रकृतीच्या या चार वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे, ॥१८-८२७॥
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन-निमीन भागीं ।
दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥
तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने (कमीजास्तपणाने) ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे अधिकारी केले. ॥१८-८२८॥
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक ।
रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥
आणि रजोगुण, परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळलेला आहे, तेथे वैश्य लोक ठेवले आहेत, आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत. ॥१८-८२९॥
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा ।
गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥ ८३० ॥
हे बुद्धिमंता अर्जुना, याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच चार वर्णांचा भेद केला आहे असे तू समज. ॥१८-८३०॥
मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे ।
गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तु दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते. ॥१८-८३१॥
तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण ।
हें सांगों ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥
तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवणसौभाग्यनिधि अर्जुना ऐक. ॥१८-८३२॥
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२ ॥
शम (चित्ताची शांती), दम (इंद्रियदमन), तप, शुद्धि (बाह्य व अंतर), क्षमा, सरळपणा, ज्ञान (शास्राचाराने एक ईश्वराची प्राप्ती करून घेणे), अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्यबुद्धि (शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार), ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत. ॥१८-४२॥
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हातीं ।
बुद्धि आत्मया मिळे येकांतीं । प्रिया जैसी ॥ ८३३ ॥
तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवर्याच्या ठिकाणी अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ति आपल्या हातामधे घेऊन बुद्धि आत्म्याला भेटाते. ॥१८-८३३॥
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु ।
तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥ ८३४ ॥
याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव ‘शम’ असे आहे. तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे. ॥१८-८३४॥
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें ।
नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों ॥ ८३५ ॥
आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे ॥१८-८३५॥
तो पैं गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा ।
आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां ॥ ८३६ ॥
अरे, अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम, हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे ॥१८-८३६॥
सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती ।
तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा ॥ ८३७ ॥
त्याचप्रमाणे सटवीच्या (पांचवीच्या) रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत, त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे. ॥१८-८३७॥
तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप ।
आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥ ८३८ ॥
त्याला तप असे नाव आहे व हे तिसर्या गुणाचे स्वरूप आहे. आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मात दोन प्रकारचे आहे. ॥१८-८३८॥
मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें ।
ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां ॥ ८३९ ॥
मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहितकर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आतबाहेर चांगले जगणे ॥१८-८३९॥
तया नाम शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा ।
आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें ॥ ८४० ॥
अर्जुना, त्याला शौच असे नाम आहे. तो ज्या कर्मामधे चौथा गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे ॥१८-८४०॥
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा ।
स्वरांआजीं सुहावा । पंचमु जैसा ॥ ८४१ ॥
अरे अर्जुना, ती क्षमा होय. तो गुण जेथे पाचवा आहे, तो कसा तर जसा सप्त सुरात पंचम मधुम आहे त्याप्रमाणे. ॥१८-८४१॥
आणि वांकडेनी वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी ।
कां पुटीं वळला ऊसीं । गोडी जैसी ॥ ८४२ ॥
आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वहाते अथवा पाठीकडे वळलेल्या (वाकडा असलेल्या) उसात गोडी जशी सरळ असते. ॥१८-८४२॥
तैसा विषमांही जीवां- । लागीं उजुकारु बरवा ।
तें आर्जव गा साहावा । जेथींचा गुण ॥ ८४३ ॥
त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यासंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे ॥१८-८४३॥
आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचे झाडामुळीं ।
परी तें आघवेंचि फळीं । जाणे जेवीं ॥ ८४४ ॥
आणि माळी हा प्रयत्नाने नेहेमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे (एक) फालाच्या ठिकाणी पहातो. ॥१८-८४४॥
तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येकु पावणें ।
हें फुडें जें कां जाणणें । तें येथ ज्ञान ॥ ८४५ ॥
त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वररप्राप्तीच होणे, हे जे पक्के जाणणे, ते या कर्मात ज्ञान आहे ॥१८-८४५॥
तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये ।
आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप ॥ ८४६ ॥
ते ज्ञान ज्या कर्मामधे सातवा गुण आहे आणि विज्ञान हे अशा (पुढे सांगितलेल्या) स्वरूपाचे आहे. पहा. ॥१८-८४६॥
तरी सत्त्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें ।
ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥ ८४७ ॥
तर अंत:करणशुद्धीच्यावेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वरतत्वामधेच बुद्धी निश्चयेकरून मिळते. ॥१८-८४७॥
हें विज्ञान बरवें । गुणरत्न जेथ आठवें ।
आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ॥ ८४८ ॥
अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे, ते या गुण कर्मात आठवे गुणारत्न आहे. आणि आस्तिक्य हा नववा गुण आहे असे समजावे. ॥१८-८४८॥
पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया ।
तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें ॥ ८४९ ॥
राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना ॥१८-८४९॥
आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणें ।
तो नववा गुण जेणें । कर्म तें साच ॥ ८५० ॥
जे आदराने मानणे, त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मणकर्मातील नववा गुण होय. आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मणकर्म खरे (घडणे शक्य) होते. ॥१८-८५०॥
एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख ।
तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ॥ ८५१ ॥
याप्रमाणे शमादिक नऊ निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. ॥१८-८५१॥
तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु ।
न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥ ८५२ ॥
तो ब्राह्मण या नऊ गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो, तसा तो ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. ॥१८-८५२॥
नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला ।
कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेवीं ॥ ८५३ ॥
अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी पुजलेला असतो, (चाफ्याच्या झाडाखाली जसी नेहेमीच फुले असतात), चंद्र जसा चांदण्याने नेहेमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहेमी चोपडलेला असतो ॥१८-८५३॥
तेवीं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग ।
कहींचि न संडी आंग । ब्राह्मणाचें ॥ ८५४ ॥
त्याप्रमाणे नवगुणांनी जडीत असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडीत नाही. ॥१८-८५४॥
आतां उचित जें क्षत्रिया । तेंहीं कर्म धनंजया ।
सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥ ८५५ ॥
अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो, तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. ॥१८-८५५॥
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३ ॥
शौर्य, तेज (पाणीदारपणा), धैर्य, दक्षता, युद्धामधे पराङ्मुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वभावज कर्मे आहेत. ॥१८-४३॥
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजे ।
कां सिंहें न पाहिजे । जावळिया ॥ ८५६ ॥
हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसर्याची अपेक्षा करीत नाही अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करत नाही ॥१८-८५६॥
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु ।
ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥ ८५७ ॥
तसा जो स्वभावत:च अंगानेच जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला आहे, असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण होय. ॥१८-८५७॥
आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपे ।
ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं ॥ ८५८ ॥
आणि सूर्याच्या प्रकशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात. परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्या कडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही ॥१८-८५८॥
तैसेनि आपुले प्रौढीगुणें । जगा या विस्मयो देणें ।
आपण तरी न क्षोभणें । कायसेनही ॥ ८५९ ॥
त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने ह्या जगाला चकित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल होऊ न देणे ॥१८-८५९॥
तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा ।
आणि धीरु तो तिजा । जेथींचा गुण ॥ ८६० ॥
ते पाणीदारपणारूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे. ॥१८-८६०॥
वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस ।
झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथें ॥ ८६१ ॥
आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते या क्षत्रियकर्मात धैर्य होय. ऐक. ॥१८-८६१॥
आणि पाणी हो कां भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके ।
कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें ॥ ८६२ ॥
आणि पाणी वाटेल तितके खोल असो परंतु त्या पाण्याच्या वर येऊन ते कमल विकासते अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. ॥१८-८६२॥
तेवीं विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था ।
प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें ॥ ८६३ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे फळणारे अर्थ जे हर्ष, भय, शोकादि त्याचे बुद्धीने जे भेदन करणे असे जे बुद्धीचे स्थिर असणे ॥१८-८६३॥
तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख ।
आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥ ८६४ ॥
ते चांगले दक्षत्व अर्जुना, क्षत्रियकर्मातील चौथा गुण आहे असे समज. आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. ॥१८-८६४॥
आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें जें कां ॥ ८६५ ॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रुपुढे नेहेमी समोर होणे (शत्रूला कधी पाठ न दाखवणे) ॥१८-८६५॥
माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी ।
रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं ॥ ८६६ ॥
ज्या प्रमाणे गरोदर स्त्रीस तिच्या पतीने आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हरप्रयत्न करून टाळावे, त्याप्रमाणे युद्ध भूमीवर असतांना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. ॥१८-८६६॥
हा क्षत्रियाचेया आचारीं । पांचवा गुणेंद्रु अवधारीं ।
चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी ॥ ८६७ ॥
अर्जुना, ऐक. धर्म अर्थादि चार पुरुषार्थाच्याही वरचढ जशी भक्ति ही एक पाचवी आहे, त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे. ॥१८-८६७॥
आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसीं मोकळे ।
कां उदार परीमळें । पद्माकरु ॥ ८६८ ॥
आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात. ॥१८-८६८॥
नाना आवडीचेनि मापें । चांदिणें भलतेणें घेपे ।
पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें ॥ ८६९ ॥
अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसर्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे ॥१८-८६९॥
तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न ।
आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां ॥ ८७० ॥
ते अपरिमित दान जेथे (ज्या क्षत्रियाच्या कर्मात) सहावे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे (म्हणजे ज्याची आज्ञा सर्वंनी ऐकणे) ॥१८-८७०॥
पोषूनि अवयव आपुले । करविजतीं मानविले ।
तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें ॥ ८७१ ॥
आपले हस्तपादादि अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्या कडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने (कौशल्याने) ज्या प्रजेमधे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे ॥१८-८७१॥
तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो ।
तो गुणांआजीं रावो । सातवा जेथ ॥ ८७२ ॥
त्याचे नाव ईश्वरभाव (नियामकशक्ति) होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियाच्या आचारात सातवा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ॥१८-८७२॥
ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं ।
अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें ॥ ८७३ ॥
ज्याप्रमाणे आकाश हे सप्त ऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादिक उत्तम सात गुणांनी सुशोभित असते ॥१८-८७३॥
तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र ।
तें सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचें ॥ ८७४ ॥
जे कर्म या सात अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियाचे सहज क्षात्रकर्म आहे असे समज. ॥१८-८७४॥
नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु ।
म्हणौनि गुणस्वर्गां आधारु । सातां इयां ॥ ८७५ ॥
अथवा ज्याच्या अंगी सात गुण आहेत) तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्त्वगुणरूपी सोन्याचा मेरुपर्वत आहे. म्हणूनच तो हा सात गुणरूपी सप्तवर्गाला आधार आहे. ॥१८-८७५॥
नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी ।
हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥ ८७६ ॥
अथवा हे कर्म नव्हे तर सात गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. ॥१८-८७६॥
कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं ।
तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी ॥ ८७७ ॥
अथवा या सात गुणरूपी सात ओघांनी युक्त वहाणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. ॥१८-८७७॥
परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक ।
कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥ ८७८ ॥
परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना, पहा शौर्यादि गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. ॥१८-८७८॥
आतां वैश्याचिये जाती । उचित जे महामती ।
ते ऐकें गा निरुती । क्रिया सांगों ॥ ८७९ ॥
हे विशालबुद्धि अर्जुना, आता वैश्याच्या जातील योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक. ॥१८-८७९॥
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४ ॥
शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावज कर्मे आहेत. सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावज कर्म आहे. ॥१८-४४॥
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु ।
घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ॥ ८८० ॥
तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे ॥१८-८८०॥
किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।
कां समर्घीची विकणें । महर्घीवस्तु ॥ ८८१ ॥
फार काय सांगावे ? शेतकीने जगणे, गायी बाळगून रहाणे अथवा स्वस्त वस्तु घेऊन महाग विकणे ॥१८-८८१॥
येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा ।
हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥ ८८२ ॥
अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्म समुदाय वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज. ॥१८-८८२॥
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण ।
ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥
आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. यांची सेवा करणे, ते शूद्राचे कर्म आहे. ॥१८-८८३॥
पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें ।
एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥
द्विजसेवेपलीकडे शूद्राला जाणे नाही (कर्म करणे नाही). याप्रमाणे चार वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली. (सांगितली). ॥१८-८८४॥
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५ ॥
आपापल्या कर्मामधे पूर्णपणे रत असलेला मनुष्य सिद्धि (वैराग्य) पावतो. स्वकर्मरत (मनुष्य) कोणात्या प्रकारे सिद्धी पावतो ते ऐक. ॥१८-४५॥
आतां इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा ।
उचित जैसें करणां । शब्दादिक ॥ ८८५ ॥
हे चतुरा अर्जुना, आता हीच (आम्ही सांगितलेली कर्मे) या वेगवेगळ्या (चार) वर्णांना योग्य आहेत. (ती कशी तर) ज्याप्रमाणे शब्दादि विषय श्रोत्रादि इंद्रियांना योग्य आहेत. ॥१८-८८५॥
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता ।
सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥ ८८६ ॥
अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना, नदीला समुद्र योग्य आहे ॥१८-८८६॥
तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे ।
गोरेया आंगा जैसें । गोरेपण ॥ ८८७ ॥
गोर्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो, त्याप्रमाणे वर्णाश्रमधर्माप्रमाणे हे कर्तव्यकर्म ज्याच्या भागाला आले असेल, ते (त्यालाच शोभते). ॥१८-८८७॥
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा ।
प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे ॥ ८८८ ॥
हे वीरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहितकर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ति होण्याकरता (शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची) आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. ॥१८-८८८॥
पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें ।
तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावीं ॥ ८८९ ॥
जसे मूळचे आपलेच रत्न (परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते) परीक्षकाच्या हातून) पारखून घ्यावे त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म, शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. ॥१८-८८९॥
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं । परी दीपेंवीण भोग नाहीं ।
मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय ? ॥ ८९० ॥
ज्याप्रमाणे दृष्टि आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिव्यावाचून (रात्री) तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार ? ॥१८-८९०॥
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु ।
तो आपुलिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे ॥ ८९१ ॥
म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार (आपणाला) खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. ॥१८-८९१॥
मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा ।
तरी घेतां काय पांडवा । आडळु असे ? ॥ ८९२ ॥
मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविला तर अर्जुना, तो घेण्यास काही अडथळा आहे काय ? ॥१८-८९२॥
तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें ।
तें विहित जो आपुलें । आचरे गा ॥ ८९३ ॥
त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरतो ॥१८-८९३॥
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी ।
आंगें जीवें मांडुनी । तेथेंचि भरु ॥ ८९४ ॥
परंतु आळस टाकून फळाची अपेक्षा सोडून, शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून, तेथेच सर्व भर ठेवावा. ॥१८-८९४॥
वोघीं पडिलें पाणी । नेणें आनानी वाहणी ।
तैसा जाय आचरणीं । व्यवस्थौनी ॥ ८९५ ॥
(जसे) प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वहाण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन (शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र) आचरण करीत रहातो, ॥१८-८९५॥
अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी ।
तो मोक्षाच्या ऐलद्वारीं । पैठा होय ॥ ८९६ ॥
अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वत: करतो, तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला (वैराग्याप्रत) प्राप्त होतो. ॥१८-८९६॥
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा ।
म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥ ८९७ ॥
कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्मे करणे या दोहींच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून (तो विरुद्ध संसाराला (दु:खयोनीला) मुकला. ॥१८-८९७॥
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडें ।
तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥ ८९८ ॥
आणि तो काम्य कर्मांकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादि फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच. (म्हणजे तो काम्यकर्मे करीत नाही, म्हणून सुखकर दिसणार्या स्वर्गादिक गतीला जात नाही). ॥१८-८९८॥
येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व ।
म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे ॥ ८९९ ॥
दुसरे जे नित्यकर्म, ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते. म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ॥१८-८९९॥
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं ।
वौराग्यमोक्षद्वारीं । उभा ठाके ॥ ९०० ॥
ऐक. अशा रीतीने तो पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा रहातो. ॥१८-९००॥
जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा ।
नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥ ९०१ ॥
जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे (ज्या वैराग्याने मोक्ष खात्रीने मिळेल असे कळते) अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो. ॥१८-९०१॥
मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल ।
तयें वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥ ९०२ ॥
जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय, व जे पुण्यरूप वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. ॥१८-९०२॥
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा ।
उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥ ९०३ ॥
अर्जुना हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडला आहे, म्हणून अगाऊच वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य, हा अरुणोदयाचा उदय होय. त्यावैराग्याची त्यास प्राप्ती होते. ॥१८-९०३॥
किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान ।
तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो ॥ ९०४ ॥
फार काय सांगावे ? आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. ॥१८-९०४॥
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता ।
अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥ ९०५ ॥
अर्जुना, या विहितकर्माला अनुसरल्यामुळे येणेप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. ॥१८-९०५॥
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।
आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥
ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ति होते व ज्याने जे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धि (वैराग्य) मिळवतो. ॥१८-४६॥
पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं ।
कीं तयाचीं नामें जैसीं । तपें तियां केलीं ॥ ९०७ ॥
अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एक जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच, मी जो सर्वात्मक, त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. ॥१८-९०६॥
कां बाळका एकी माये । वांचोनि जिणें काय आहे ।
म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ॥ ९०८ ॥
पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय. ॥१८-९०७॥
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा ।
सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥ ९०९ ॥
अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे ? म्हणून तिची सेवा करावी (आश्रय करावा) हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे. ॥१८-९०८॥
तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां ।
ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे ॥ ९१० ॥
अथवा केवळ पाणी म्हणून (आपले जीवन म्हणून) गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्वतीर्थांच्या सहवासाला (समुद्राला) सहज प्राप्त झाला. ॥१८-९०९॥
अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।
म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ॥ ९११ ॥
त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगाच्या मालकासही (देवासही) त्याचे ओझेच वाटेल. ॥१८-९१०॥
पैं जीवाचे कसीं उतरली । ते दासी कीं गोसावीण जाली ।
सिसे वेंचि तया मविली । वही जेवीं ॥ ९१२ ॥
अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितलेले आहे, तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे, म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर नि:संशय प्राप्त होतो. ॥१८-९११॥
तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ॥ ९१३ ॥
एखादी बटीक एखाद्याच्या जीवाच्या (मनाच्या) कसोटीस उतरली असता ती प्रथमची दासी खरी, पण पुढे मालकीण बनते. अथवा स्वामिकार्यार्थ जो आपले डोके देणारा (मरणारा) त्याला स्वामी (मालक) जसा इनामपत्र देऊन त्याचा दाखला आपल्या दफ्तरी ठेवतो ॥१८-९१२॥
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६ ॥
त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्यावाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना, तो केवळ व्यापार होय. ॥१८-९१३॥
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली ।
जयापसूनि कां आलीं । आकारा भूतें ॥ ९१४ ॥
म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले असे नाही तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळाली असे होय. ॥१८-९१४॥
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया ।
खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥ ९१५ ॥
तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवरूपी बाहुल्या, त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवत आहे. (म्हणाजे जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवीत आहे). ॥१८-९१५॥
जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित ।
जालें आहे दीपजात । तेजें जैसें ॥ ९१६ ॥
ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आतबाहेर एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आतबाहेर पूर्णपणे भरलेले आहे, ॥१८-९१६॥
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ ९१७ ॥
हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता, ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. ॥१८-९१७॥
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें ।
वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥ ९१८ ॥
म्हणून त्या पूजेने संतुष्ट झलेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्यसिद्धि हा प्रसाद दिला जातो. ॥१८-९१८॥
जिये वैराग्यदशें । ईश्वराचेनि वेधवशें ।
हें सर्वही नावडे जैसें । वांत होय ॥ ९१९ ॥
त्या वैराग्यामधे ईश्वराचा वेध लागल्याकारणाने हे सर्व (स्वर्ग, संसार वगैरे) ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होते. ॥१८-९१९॥
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी ।
तैसें सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥ ९२० ॥
नवर्याच्या ध्यासामुळे (नवर्याचा वियोग झालेल्या) स्त्रीस जगणे देखील त्रासदायक वाटते, त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत, ती दु:खाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. ॥१८-९२०॥
सम्यक्ज्ञान नुदैजतां । वेधेंचि तन्मयता ।
उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥ ९२१ ॥
यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेधानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. ॥१८-९२१॥
म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहातसें आंगीं ।
तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥ ९२२ ॥
म्हणून मोक्ष्याच्या प्राप्ती करता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो, त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. ॥१८-९२२॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७ ॥
परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि त्यापेक्षा आपला धर्म (वर्णाश्रमास अनुसरून सलेले कर्म) सदोष जरी आसला, तरी तोच श्रेयस्कर आहे. जातिस्वभावाने येणारे कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. ॥१८-४७॥
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥ ९२३ ॥
अरे अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठिण असला तरी ज्या परिणामाने तो फालद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टि ठेवावी. ॥१८-९२३॥
जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया ।
तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥ ९२४ ॥
अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होत आहे, तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. ॥१८-९२४॥
फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे ।
ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥
फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले (केळीच्या घडासारखे) कोठे मिळेल ? ॥१८-९२५॥
तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु ।
तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥ ९२६ ॥
त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठिण आहे, असे पाहून तो जर कडू केला (म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला) तर मोक्षाचे सुख अंतरलेच. ॥१८-९२६॥
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे ।
तरी जीये तें नोहे । स्नेह कुर्हें कीं ॥ ९२७ ॥
आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर काही वाकडे नाही. ॥१८-९२७॥
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया ।
तिया काय कराविया । बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥
इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी अशा त्या मुलाने त्या काय कराव्या ? ॥१८-९२८॥
अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे ।
परी मीना काय होये । असणें तेथ ॥ ९२९ ॥
अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात रहाणे माशाला काय कामाचे ? ॥१८-९२९॥
पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख ।
आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥
सगळ्या जगाला जे विष ते विष (विषातील) किड्यांना अमृत (जीवन) असते. आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड, तो त्या विषतील किड्यांना मारक असतो. ॥१८-९३०॥
म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें ।
क्रिया कठोर तर्ही तेणें । तेचि करावी ॥ ९३१ ॥
म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल, ते विहितकर्माचरणाच करावे. ॥१८-९३१॥
येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया ।
पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ॥ ९३२ ॥
आपल्या विहित कर्मावाचून इतरांच्या दुसर्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. ॥१८-९३२॥
यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें ।
तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ॥ ९३३ ॥
याकरता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे, ते जो करतो त्याने (पुण्यपापरूप) कर्मबंधाला जिंकले. ॥१८-९३३॥
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा ।
हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥
आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व दुसर्याचा धर्म असेल तो टाकावा, हा नियम पाळला जर नाही ॥१८-९३४॥
तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये ? ।
आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ॥ ९३५ ॥
हे कौंतेया (आपल्या) जन्माबरोबर उत्पन्न झालेले (आपले) कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नि धूमाने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत. ॥१८-४८॥
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८ ॥
तर जोपर्यंत आत्मा अनुभावाला आला नाही, तोपर्यंत कर्म करणे थांबते काय ? (नाही). आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. ॥१८-९३५॥
म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जर्ही उपक्रमीं ।
तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें ? ॥ ९३६ ॥
म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामधे कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे ? सांग. ॥१८-९३६॥
आगा उजू वाटा चालावें । तर्ही पायचि शिणवावे ।
ना आडरानें धांवावें । तर्ही तेंचि ॥ ९३७ ॥
अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात अथवा आडरानाने धावले तरी तेच. (तेथेही पायच शिणावावे लागतात). ॥१८-९३७॥
पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया ।
परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥
अर्जुना दगड वा दशमी, या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी जे सुखकर होईल त्याचे ओझे वागवावे हे बरे. ॥१८-९३८॥
येर्हवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा ।
जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी ॥ ९३९ ॥
सहज पाहिले तर दाणे कांडणे व भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहेत व कुत्र्याकरता मांसाला जितके शिजवावे लागते, तितकेच अग्नीला आहुति देण्याकरता लागणार्या अन्नालाही शिजवावे लागते. अर्थात दोहोंतही कष्ट सारखेच आहेत. ॥१८-९३९॥
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा ।
वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ॥ ९४० ॥
हे चतुरा अर्जुना, दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. ॥१८-९४०॥
पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया ।
फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि ॥ ९४१ ॥
अर्जुना, नित्यहोम करण्याकरता अथवा स्वैर अग्नि घालण्याकरता (आग लावण्याकरता) विस्तव फुंकून तयार करण्याचे कामी धूर सोसणे सारखेच आहे. ॥१८-९४१॥
परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी ।
तरी कां अपरवडी । आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥
परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखेच श्रम पडतात तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा ? ॥१८-९४२॥
हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं ।
तरी समोरला काई । आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥
अर्जुना, असे पहा की (शत्रूला पाठ दाखवली असता त्याने तरवार वगैरे मारल्याने) पाठीला झालेल्या जखमेमुळे मरण जर चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून (शत्रूशी सामना करून) अधिक पराक्रम का करू नये ? ॥१८-९४३॥
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे ।
तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं । ॥ ९४४ ॥
वाईट कुलातील स्त्री (आपल्या नवर्याचा त्रास चुकवावा म्हणून त्यास सोडून) दुसर्याच्या घरी शिरली असताही टिकुर्याचे तडाखे जर सहन करत राहिली तर तिने आपल्या नवर्याला व्यर्थ सोडले नाही काय ? ॥१८-९४४॥
तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें ।
तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ? ॥ ९४५ ॥
त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही (असे जर आहे) तर बाबा विहितकर्म करणे कोणत्या शब्दांनी कठिण आहे असे म्हणावे ? ॥१८-९४५॥
वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता ।
जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ॥ ९४६ ॥
अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळाते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का ? (सर्वस्व खर्च झाले तरी काही हरकत नाही, पण थोडेसे मिळाले तरी अमृतच घ्यावे) ॥१८-९४६॥
येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें ॥ ९४७ ॥
जे प्यायले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष, द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे ? ॥१८-९४७॥
तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये ।
सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥
त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दु:खावाचून काही दुसरा परिणाम आहे का ? ॥१८-९४८॥
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु ।
उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥
म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष, त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. ॥१८-९४९॥
याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी ।
न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥
अर्जुना, या कारणस्तव जसे संकटकाली सिद्धमंत्राला विसरू नये, त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. ॥१८-९५०॥
कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी ।
न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥
महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये, त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. ॥१८-९५१॥
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा ।
तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥ ९५२ ॥
हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर, चित्तावरच्या तमरजाचा नाश करून ॥१८-९५२॥
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा ।
भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥ ९५३ ॥
आपली स्वकर्म करणाराची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत, असे वाटावयास लावतो. ॥१८-९५३॥
जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें ।
किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ॥ ९५४ ॥
फार काय सांगावे ? ज्या संसिद्धीची पूर्वी (याच अध्यायात श्लोक ४५ मधे) वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली, त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्य़ा साधकास आणतो. ॥१८-९५४॥
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये ।
कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों ॥ ९५५ ॥
ज्याचे अंत:करण कोठेच सक्त नाही (एवढेच नव्हे तर) ज्याचे ताब्यात ते येऊन राहिले आहे, आणि ज्याची इच्छा नि:शेष नाहीशी झाली आहे, अशा पुरुषस संन्यासाच्या (अज्ञानाच्या त्यागाच्या) योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. ॥१८-४९॥
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९ ॥
मग ही (वैराग्यरूपी) भूमिका जिंकल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र (देहादि प्रपंच्याच्या ठिकाणी जसा होतो, आणि तसा झाला असताही, त्याला जे प्राप्त होते, ते आता सांगतो. ॥१८-९५५॥
तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें ।
तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा ॥ ९५६ ॥
तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही, तसा तो साधक हा जो देहादिक संसाररूपी पसरलेला गुंताडा आहे, त्यात (असूनही) सापडत नाही. ॥१८-९५६॥
पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें ।
न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ॥ ९५७ ॥
ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरत नाही, अथवा देठ फळास धरत नाही, त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लुळी पडते ॥१८-९५७॥
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र ।
माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ॥ ९५८ ॥
ज्याप्रमाणे विषयुक्त अन्नाने वाढलेले ताट (त्यातील अन्न विषयुक्त आहे असे कळल्यावर) त्याला कोणी माझे म्हणत नाही (भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करत नाही) त्याप्रमाणे पुत्र, धन, कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना ‘माझे’ असे म्हणत नाही. ॥१८-९५८॥
हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती ।
पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥
हे राहू दे. ज्याप्रमाणे कढत पदार्थास हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो. त्याप्रमाने बुद्धि, पोळाल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून, हृदयाच्या एकांतात प्रवेश करते. (अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते). ॥१८-९५९॥
ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण ।
न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥ ९६० ॥
राजाने दासीस शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडीत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर (विषयांकडे) जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे’ अशी अंत:करणास शपथ घातली असता ते अंत:करण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडत नाही. ॥१८-९६०॥
तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी ।
करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या ॥ ९६१ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे ऐक्याच्या मुठीमधे चित्त धरून (चित्त एकाग्र करून) त्यास आत्म्याच्या वेधात जोराने लावतो. ॥१८-९६१॥
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे ।
आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ॥ ९६२ ॥
तेव्हा राखेने अग्नि दडपला असता जसा धूर थांबतो, त्याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच ॥१८-९६२॥
म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं ।
किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥ ९६३ ॥
म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावे ? तो साधक अशा (आता सांगितलेल्या) भूमिकेला प्राप्त होतो. ॥१८-९६३॥
पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा ।
बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ॥ ९६४ ॥
अर्जुना, त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंत:करणाचा निश्चय स्थिर होतो. (तो कसा होतो हे पुढे सांगतात). ॥१८-९६४॥
धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे ।
नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं ॥ ९६५ ॥
साचलेले पाणी जसे खर्चून संपते, तसे भोगून प्रारब्ध संपते. आणि नवे (क्रियमाण) तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही. (त्या साधकाला पुढचा जन्म देण्याला उपयोगी पडत नाही). ॥१८-९६५॥
ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा ।
मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥ ९६६ ॥
अरे वीरश्रेष्ठ अर्जुना त्यावेळी अशी कर्मासाम्य अवस्था होते, तेव्हा मग श्रीगुरु आपण होऊन खात्रीने भेट देतात. ॥१८-९६६॥
रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं ।
डोळ्यां तमारी । मिळे जैसा ॥ ९६७ ॥
अर्जुना, ऐक. रात्रीचे चार प्रहर संपल्यानंतर जसा , अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच ॥१८-९६७॥
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु ।
श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥
अथावा फळाचा घड येऊन जशी केळीची वाढ बंद करतो, त्याप्रमाणे त्या जिज्ञासु पुरुषाला (साधकाला) गुरु भेटून तसा प्रकार करतात. (साधकाचे कर्मकर्तृत्व बंद करतात). ॥१८-९६८॥
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥
पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्या साधाकाला गुरुकृपेने (पूर्णत्व प्राप्त) होते. ॥१८-९६९॥
तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे ।
तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय ॥ ९७० ॥
तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञानमात्र असते ते सर्व अज्ञान तर त्या गुरुकृपेने नाश पावते. तेव्हा रात्रीबरोबर जसा काळोख नाहीसा होतो, ॥१८-९७०॥
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी ।
त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥
त्याप्रमाणे (अज्ञानाबरोबर) अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होती (तीही नाहीशी होते, अथवा) जशी गर्भिणी मारावी (ज्याप्रमाणे गरोदर स्त्री मारली असता गर्भाला वेगळे मारावे लागत नाही तर तो गर्भ आपोआपच मरतो) ॥१८-९७१॥
तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें ।
ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥ ९७२ ॥
त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्ममात्र नाश पावते. याप्रमाणे हा समूळ (कर्माचे कारण जे अज्ञान, त्या अज्ञानासह) कर्मत्याग होतो. ॥१८-९७२॥
येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे ।
तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ॥ ९७३ ॥
याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठावठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे आत्मतत्व जाणावयाचे ते स्वभावत: तोच आहे. ॥१८-९७३॥
चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं ।
आपणयातें काई । काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥
अर्जुना, असे पहा की, स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडतांना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर, स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणे जरूर आहे काय ? ॥१८-९७४॥
तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न ।
जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥ ९७५ ॥
तेव्हा मी (आपल्या स्वरूपाला) जाणत नव्हतो, आता (मी आपल्या स्वरूपाला) जाणेन, हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय या भेदावाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. ॥१८-९७५॥
मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा ।
पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥ ९७६ ॥
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो; ॥१८-९७६॥
तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें ।
मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥
त्य्प्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवल ज्ञानमात्रच, ते राहिले. ॥१८-९७७॥
तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया ।
म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥
अर्जुना, त्या ज्ञानमात्र स्वरूपस्थितीस नैष्कर्म्य (कर्मशून्यता) असे म्हणतात. ॥१८-९७८॥
तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे ।
तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥
ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन रहातो. ते कसे तर वार्याच्या नाशाने जशी लाट आपल्या मूळच्या समुद्ररूपाने रहाते तसे. ॥१८-९७९॥
तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे ।
सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि ॥ ९८० ॥
वर सांगितल्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्यसिद्धि असे म्हणावे व हीच सिद्धि सर्वही सिद्धीत स्वभावत:च श्रेष्ठ आहे. ॥१८-९८०॥
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु ।
कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥ ९८१ ॥
देऊळाच्या कामाला जशी कळस ही शेवटली मर्यादा आहे, अथवा गंगेस जसा समुद्रप्रवेश ही शेवटली हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात सोळावा कस (शंभर नंबरी कस) हा शेवटला कस आहे. ॥१८-९८१॥
तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें ।
तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥
त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाआचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे, अशी जी अवस्था ॥१८-९८२॥
तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं ।
म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥
त्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलिकडे या जगात (परमार्थाने) काही मिळावण्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही नैष्कर्म्य सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. ॥१८-९८३॥
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५० ॥
हे कौंतेया, ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म, ते ब्रह्म सिद्धि पावलेला आत्मैश्वर्य भोगण्याची योग्यता पावलेला मंद अधिकारी पुरुष, कोणत्या क्रमाने मिळवतो, ते संक्षेपाने माझ्यापासून श्रवण कर. ॥१८-५०॥
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।
श्रीगुरुकृपालब्धि- । काळीं पावे ॥ ९८४ ॥
परंतु जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला असा पुरुष, सद्गुरुकृपेचा लाभ होण्याच्या वेळी, ही आत्मसिद्धि पावतो, ॥१८-९८४॥
उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु ।
कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥ ९८५ ॥
सूर्य उगवताक्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो ॥१८-९८५॥
तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका ।
उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥ ९८६ ॥
हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन रहातो. ॥१८-९८६॥
कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां ।
जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥ ९८७ ॥
अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन, तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो ॥१८-९८७॥
तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें ।
द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥
त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीसे होऊन वृत्ति आत्मस्वरूपी स्थिर होते, ॥१८-९८८॥
तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें ।
आकाशा येणें जाणें । आहे काई ? । ॥ ९८९ ॥
अर्जुना गुरूने केलेला महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकताक्षणीच, जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो ॥१८-९८९॥
म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं ।
परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥ ९९० ॥
त्याला मग काही एक कर्तव्यकर्म आहे असे कोणी म्हणावे ? येणे, जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहे काय ? ॥१८-९९०॥
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी ।
वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥ ९९१ ॥
म्हणून असा जो वस्तुरूप झालेला, त्याला निश्चयेकरून काही कर्तव्यकर्म उरत नाही. परंतु ज्या मंद अधिकार्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, (अशा मंद अधिकार्याला बुद्धीवरील असंभावनादिक ज्ञानप्रतिबंधक दोषनिवारणार्थ कर्मादिक करावे लागते). ते कसे ते पुढे ९९२ व्या ओवीपासून सांगतात). ॥१८-९९१॥
येर्हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं ।
रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥
त्याहून उलट ज्या मंद अधिकार्याने (म्हणजे ज्याला बुद्धिदोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने) स्वधर्मरूपी अग्नीमधे काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम (चित्तावरील) रज, तम (विक्षेप व मल) हे दोष जाळले. ॥१८-९९२॥
पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु ।
घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥ ९९३ ॥
शिवाय पुत्र, द्रव्य आणि स्वर्गादिक लोक या तिहींच्या विषयीची इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या आधीन होऊन राहिलेली असते. हेही त्याच्याकडून झाले. (इतर लोक इच्छेच्या आधीन असतात, परंतु याने इच्छा आपल्या आधीन ठेवलेली असते). ॥१८-९९३॥
इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं ।
तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥
इंद्रियांनी विषयांविषयी त्याज्यात्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती. त्या इंद्रियांना (तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता) प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घातले. ॥१८-९९४॥
आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ ।
घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥ ९९५ ॥
आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून, त्याच्या मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे बल मागून घेऊन वैराग्यपद अढळ केले. ॥१८-९९५॥
ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी ।
ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥ ९९६ ॥
ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल, त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची, अशी ही (वर सांगितल्याप्रमाणे) सर्व साधन सामुग्री त्याने खरोखर मिळवली. ॥१८-९९६॥
आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं ।
तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥ ९९७ ॥
आणि पहा, त्याचवेळी सद्गुरु भेटले. व त्याचप्रमाणे (साधकाच्या सर्व सामुग्रीच्या प्राप्तीप्रमाणे) त्यांनी काहीही (ज्ञानाचा उपदेश करण्यात) प्रतारण केली नाही. ॥१८-९९७॥
परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? ।
कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥
परंतु औषध घेताक्षणीच रोगाची निवृत्ति होऊन, आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय ? अथवा दिवस उगवता क्षणीच मध्याह्नकाल होतो काय ? ॥१८-९९८॥
सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें ।
तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥
ओल असलेल्या चांगल्या शेतात, चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल. परंतु अर्जुना, काही कालानंतर (पेरल्याबरोबर मिळणार नाही). ॥१८-९९९॥
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु ।
तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥ १००० ॥
सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला, तर मुक्कामाला पोहोचणे होईल. परंतु त्यास काही काल हा पाहिजेच. ॥१८-१०००॥
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला ।
जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥ १००१ ॥
त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ति झाली, शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग आला व अंत:करणात नित्त्यानित्यविचाराचा अंकुरही फुटला. ॥१८-१००१॥
तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती ।
हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥ १००२ ॥
त्या नित्यानित्यविचाराच्या योगाने ब्रह्मच एक (सत्य) आहे, इतर सर्व भ्रांति आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला. ॥१८-१००२॥
परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम ।
मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥ १००३ ॥
परंतु तेच ब्रह्म, जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे, मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते, ॥१८-१००३॥
यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी ।
तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥ १००४ ॥
जे ज्ञान आपल्या पोटात जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्था नाहीशा करते त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तु – ॥१८-१००४॥
ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे ।
कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥ १००५ ॥
ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा लेशमात्र आनंद तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक रहाते. ॥१८-१००५॥
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें ।
तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥ १००६ ॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे, ते (ही स्थिती) त्या साधकाकडून क्रमाने मिळावले जाते. ॥१८-१००६॥
भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं ।
तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥ १००७ ॥
ज्याप्रमाने भुकेलेल्या पुरुषास षड्रस पक्वान्न वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ति होत जाते ॥१८-१००७॥
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा ।
आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥ १००८ ॥
त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचे भरण मिळाले असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. ॥१८-१००८॥
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी ।
जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥ १००९ ॥
तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची (अधिकाराची) सिद्धि ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे ॥१८-१००९॥
तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम ।
तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥ १०१० ॥
तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो, त्या क्रमाचे आता वर्म सांगतो ऐक. ॥१८-१०१०॥
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१ ॥
शुधबुद्धीने युक्त, धैर्याने स्वत:चे मन व इंद्रिये यांचे नियमन करून, शब्दादि विषयांचा त्याग करून, प्रीती व द्वेष सोडून ॥१८-५१॥
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा ।
धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥
तर गुरूने दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन, तेथे साधकाने बुद्धीचा मळ धुवून टाकल्यामुळे ॥१८-१०११॥
मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली ।
तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥
मग (चंद्रग्रहण सुटले असता) राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून आलिंगली जाते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. ॥१८-१०१२॥
सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी ।
द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३ ॥
सासर व माहेर ह्या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री आपल्या पतीस अनुसरते, त्याचप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धि केवळ आत्मचिंतनात रत झाली. ॥१८-१०१३॥
आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर ।
इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥ १०१४ ॥
आणि आत्मज्ञानासारख्या जिव्हाळायाच्या वस्तूला दूर ठेऊन ज्या शब्दादिक विषयांचे स्तोम माजवले ॥१८-१०१४॥
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया ।
तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥ १०१५ ॥
ते इंद्रियांचे पाच विषय ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते, त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दादिक पंच विषयांचा निरास केला. ॥१८-१०१५॥
नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना ।
तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥
न समजून नीच पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे, त्याप्रमाणे इंद्रियांकडून वासनांसह विषयांचा त्याग करविला. ॥१८-१०१६॥
मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।
ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥ १०१७ ॥
मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये, आत्माकारवृत्तिरूपी पवित्र गंगेच्या तीराला आणून ठेवली. याप्रमाणे या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्ते केली ॥१८-१०१७॥
पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें ।
मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥ १०१८ ॥
नंतर साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योगधारणेला लावली. ॥१८-१०१८॥
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे ।
तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥ १०१९ ॥
त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इषानिष्ट भोगाची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही. ॥१८-१०१९॥
ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये ।
तयालागीं न होये । साभिलाषु ॥ १०२० ॥
अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही. ॥१८-१०२०॥
यापरी इष्टानिष्टीं । रागद्वेष किरीटी ।
त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥
याप्रमाणे इष्ट विषयाच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयांच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन, अर्जुना, डोंगराच्या गुहेत दाट वेली व झाडे असलेल्या गुहेत रहातो, ॥१८-१०२१॥
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२ ॥
एकांत सेवन करणारा, मिताहारी, वाणी, शरीर व मन यांचे नियमन केलेला, ध्यानयोगपर, नित्य वैराग्याचा आश्रय केलेला ॥१८-५२॥
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया ।
अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥ १०२२ ॥
जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत रहातो, एकट्या फक्त शरीरावयवंच्या समुदायासह रहातो, (शरीराचे अवयव हेच त्याचे सोबती असतात). ॥१८-१०२२॥
शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे ।
गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥ १०२३ ॥
तो साधक शमदमांनी खेळतो, (तो नेहेमी शमदमाचा अभ्यास करतो. न बोलणेच बोलतो व गुरुवाक्यांच्या विचारात वेळ किती गेला हे जाणत नाही. ॥१८-१०२३॥
आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें ।
कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥ १०२४ ॥
आणि शरीरास शक्ति यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जिव्हेच्या इच्छा पुरवाव्यात ॥१८-१०२४॥
भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी ।
आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥ १०२५ ॥
भोजनाकरता या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही. तो थोडक्या आहारात संतोषी असतो, माप घालत नाही, (म्हणाजे फार खात नाही). ॥१८-१०२५॥
अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे ।
इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥ १०२६ ॥
जठराग्नीच्या भडक्याने नाहीसा होणारा जो प्राण तो खाण्याने जीव धरून राहील, इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. ॥१८-१०२६॥
आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली ।
निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥ १०२७ ॥
आणि परपुरुषाने इच्छा केली असता जशी कुलवान (पतिव्रता) स्त्री आपले शरीर त्याच्या स्वाधीन करत नाही, त्याप्रमाणे तो साधक आपला आहार, निद्रा व आळस याकडे धाडत नाही. (म्हणजे आळस, झोप येईल असा आहार करत नाही). ॥१८-१०२७॥
दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे ।
वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥ १०२८ ॥
देवाला साष्टांग नमस्कार करण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते. (म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो). याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. ॥१८-१०२८॥
देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें ।
किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥ १०२९ ॥
देहाचा निर्वाह होण्यापुरती हातापायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे ! अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य (शरीर व मनादिक इंड्रिये) आपल्या स्वाधीन केले आहे. ॥१८-१०२९॥
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा ।
तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥ १०३० ॥
अर्जुना तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही. (आपल्या वृत्तीला संकल्पाविकल्पापर्यंत येऊ देत नाही). अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला (बोलण्याला) संधि कोठे मिळणार आहे ? ॥१८-१०३०॥
ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश ।
आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥
अशा तर्हेने शरीर, वाणी व मन ही बाहेरची ठिकाने त्याने जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. ॥१८-१०३१॥
गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला ।
न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥ १०३२ ॥
ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पहातो, त्याप्रमाणे गुरूच्या उपदेशाने जागा झालेला जो बोध (ज्ञान) त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूपनिश्चय पहातो. (म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो). ॥१८-१०३२॥
पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं ।
ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥
अर्जुना, ऐक, ध्यान करणारा आपल्याच, परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमधे ध्येयपणाने घेतो, ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. ॥१८-१०३३॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता ।
होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥ १०३४ ॥
अर्जुना, असे ध्यान करत असतांना ध्यान, ध्येय व ध्याता या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे. ॥१८-१०३४॥
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु ।
परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥
म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानाची प्राप्ति करून घेण्याकरता तत्पर झाला. परंतु योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला. (म्हणजे अष्टांगयोगाने तो आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उद्युक्त झाला). ॥१८-१०३५॥
अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया ।
पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥ १०३६ ॥
अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे, तिचा मध्य टाचेने दाबून ॥१८-१०३६॥
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध ।
करूनि एकवद । वायुभेदी ॥ १०३७ ॥
गुदाचे आकुंचन करून व मूळबंधादि तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादि निरनिराळे वायु एकत्र करून ॥१८-१०३७॥
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥ १०३८ ॥
कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून व आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून ॥१८-१०३८॥
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु ।
तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥ १०३९ ॥
सहस्रदलरूपी मेघाच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून ॥१८-१०३९॥
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं ।
मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥ १०४० ॥
आज्ञाचक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून ॥१८-१०४०॥
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां ।
ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥
योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा वर सांगितलेला (तीन बंधांचा) समुदाय पुढे करून, मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले. ॥१८-१०४१॥
आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्त्वज्ञानीं ।
पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥ १०४२ ॥
आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच ॥१८-१०४२॥
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा ।
तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥ १०४३ ॥
वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्याबरोबर चालतो. ॥१८-१०४३॥
पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी ।
तरी कें आहे अवसरी । देखावया ॥ १०४४ ॥
पहावयाची वस्तु दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही, तर ती वस्तु दिसायला वेळ कोठे लागेल ? ॥१८-१०४४॥
तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया ।
तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥ १०४५ ॥
याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ति ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे, त्याला नाश कसला ? ॥१८-१०४५॥
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु ।
करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥ १०४६ ॥
म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला. ॥१८-१०४६॥
ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं ।
राजयोगतुरंगीं । आरूढला ॥ १०४७ ॥
याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला. ॥१८-१०४७॥
वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी ।
तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥
शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल, त्यातील लहान, मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तरवार विवेकरूपी मुठीत धारण केली. ॥१८-१०४८॥
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।
मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥ १०४९ ॥
अंधारात सूर्य जसा बेडर जातो, तसा तो साधक मोक्षविजयरूपी लक्ष्मीला वरणारा भर्ता होण्याकरता संसाररूपी समरांगणात निर्भयपणे जातो. ॥१८-१०४९॥
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३ ॥
अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्वबुद्धिविरहित व शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. ॥१८-५३॥
तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले ।
तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥ १०५० ॥
तेथे (संसाररूपी समरांगणात) प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रु, ज्यास त्याने चांगला मार दिला, त्यामधे पहिला शत्रु हा देहाहंकार होय. ॥१८-१०५०॥
जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि ।
विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥ १०५१ ॥
जो देहाहंकार जीव घेऊन सोडून देता येत नाही, (तर पुन्हा जन्म देतो) आणि जन्मला घालून जगू देत नाही, तर पुन्हा मारतो) याप्रमाणे हाडांच्या खोड्यात (देहात) घालून कुचंबत ठेवतो. ॥१८-१०५१॥
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा ।
आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥ १०५२ ॥
हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकाराचा आश्रय होय. तो पाडाव करून त्याने काबीज केला (विचाराने देहाचा निरास केला). आणि बळ (कामादि रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रु मारला. ॥१८-१०५२॥
जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे ।
जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥
जो बलरूपी शत्रु, विषय म्हटला की, चौपटीपेक्स्जाही जास्त वाढतो, व ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते; ॥१८-१०५३॥
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो ।
परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥
तो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे, परंतु तो ध्यानरूपी तरवारीचा घाव कसचा सहन करणार ? ॥१८-१०५४॥
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती ।
तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥
आणि प्रिय विषयाची प्राप्ती, ज्या सुखाकरता प्रगटता करते त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो, ॥१८-१०५५॥
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं ।
सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥ १०५६ ॥
तो दर्परूपी शत्रु सन्मार्ग चुकवतो व मग अधर्मरूपी रानात घालून नरकादिक वाघांच्या तडाक्यात सापडवून देतो, ॥१८-१०५६॥
तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु ।
आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ १०५७ ॥
तो विश्वास देऊन मारणारा शत्रु जो दर्प, तो मारून टाकला. आणि बापरे, ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप होतो, ॥१८-१०५७॥
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु ।
भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥ १०५८ ॥
क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची (कामाची) परिपक्व अवस्था आहे (अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ति होते) व जो (काम) भरला असता अधिक रिकामा होतो (म्हणजे त्यास जसे जसे विषय द्यावेत तसतसा तो अधिक वाढतो). ॥१८-१०५८॥
तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं ।
कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥ १०५९ ॥
(असा जो काम) तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले. (म्हणजे तो नि:शेष नाहीसा केला). (अशी कामाची स्थिती झाल्यावर) क्रोधाची देखील तीच स्थिति सहज झाली. पहा. ॥१८-१०५९॥
मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें ।
कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥ १०६० ॥
झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात, त्याप्रमाणे काम नाशल्याने क्रोध नाश पावतो. ॥१८-१०६०॥
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी ।
तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥ १०६१ ॥
म्हणून कामरूपी शत्रु जेव्हा (साधकाशी चाललेल्या या) लढाईत मेला तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले. ॥१८-१०६१॥
आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा ।
तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥ १०६२ ॥
आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालायचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वहावयास लावतो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे ॥१८-१०६२॥
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी ।
जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥ १०६३ ॥
जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामधे अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यावयास लावतो (म्हणजे जीवाला स्त्रीपुत्रादि विषयांचे ठिकाणी आसक्ति धरावयास लावतो) ॥१८-१०६३॥
शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें ।
घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥
ज्या परिग्रहाने शिष्यशास्त्रादिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादि लक्षणांच्या निमित्ताने नि:संग पुरुषाला (संगाचे) पाशात घतले आहे, ॥१८-१०६४॥
घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे ।
नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥ १०६५ ॥
जो परिग्रह घरामधे कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनात वन्य (झाडे, गुहा, जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ यांच्या) रूपाने प्रगट होतो व शरीर जरी उघडे असले तरी देखील त्याला जो (परिग्रह) लागलेला असतो. ॥१८-१०६५॥
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो ।
भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥ १०६६ ॥
असा जिंकण्यास कठिण जो परिग्रह, त्याचा ठावठिकाणा नाहीसा करून संसार जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो, ॥१८-१०६६॥
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे ।
ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥ १०६७ ॥
तेव्हा अमानित्वादि ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्षदेशाचे जसे सर्व राजेच आले. ॥१८-१०६७॥
तेव्हां सम्यक्ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया ।
परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥ १०६८ ॥
तेव्हा त्यांनी यथार्थज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून, ते गुण आपण स्वत: त्याचा त्याचा परिवार होऊन राहिले. ॥१८-१०६८॥
प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं ।
कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥ १०६९ ॥
प्रवृत्तिरूपी राजमार्गात असणार्या तीन निरनिराळ्या (जागृतादि) अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली त्याच्या वरून निंबलोण उतरले. ॥१८-१०६९॥
पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी ।
योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ १०७० ॥
त्या साधकाच्यापुढे विवेक हा (चोपदाराप्रमाणे) बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योगभूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन (त्याला ओवाळावयास) येतात. ॥१८-१०७०॥
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें ।
तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥ १०७१ ॥
तेव्हा त्या ऋद्धिसिद्धींचे अनेक समुदाय येतात, त्या ऋद्धिसिद्धिसमुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वत: नहात असतो, ॥१८-१०७१॥
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।
झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ १०७२ ॥
याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असतांना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे. ॥१८-१०७२॥
तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया ।
समानता धनंजया । उरेचिही ना ॥ १०७३ ॥
अर्जुना, तेव्हा ‘हा माझा वैरी आहे’ अथवा ‘हा माझा मित्र आहे’ असे म्हणण्याला त्याला समसाम्यभावामुळे द्वैतच उरत नाही. ॥१८-१०७३॥
हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें ।
तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥
इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो पुरुष द्वैतपणाने त्याच्यापुढे येत नाही. असा तो अद्वितीय (द्वैतरहित) झालेला असतो. ॥१८-१०७४॥
पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता ।
कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥ १०७५ ॥
अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते. ॥१८-१०७५॥
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु ।
अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥ १०७६ ॥
याप्रमाणे शत्रुसमुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण पहात आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोगरूपी घोडा आपोआप स्थिर झाला. ॥१८-१०७६॥
वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें ।
तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥ १०७७ ॥
आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते, तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो. ॥१८-१०७७॥
आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें ।
म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥ १०७८ ॥
आणि ज्या द्वैताला ध्यानरूपी तरवार मारील, ते द्वैत त्याच्यापुढे नसल्यामुळे ध्यान करणार्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. ॥१८-१०७८॥
जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें ।
आपणही नुरे । तैसें होतसे ॥ १०७९ ॥
ज्याप्रमाणे पार्याचे रसायन आपले काम (रोगनिवृत्ति) पुरे करून आपणही उरत नाही, त्याप्रमाणे होते. ॥१८-१०७९॥
देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो ।
तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥
ज्या ठिकाणाला पोहोचायचे ते ठिकाण पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणारे पाय स्थिर होत जातात, त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास बळ टाकतो. (म्हणजे अभ्यास मंदावतो. ॥१८-१०८०॥
घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी ।
कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥ १०८१ ॥
गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वहाण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवर्यापाशी स्थिर होते. ॥१८-१०८१॥
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे ।
कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥ १०८२ ॥
अथवा केळीच्या फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो (संपतो) ॥१८-१०८२॥
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु ।
ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥
त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून (तो साधक) याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच खाली ठेवतो. ॥१८-१०८३॥
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया ।
होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥ १०८४ ॥
म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. ॥१८-१०८४॥
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।
योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १०८५ ॥
मग वैराग्याची जी मावळती वेल आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जी म्हातारपण आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, ॥१८-१०८५॥
ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥
हे भाग्यवंता अर्जुना, ती शांति जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते, तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. ॥१८-१०८६॥
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी ।
कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥ १०८७ ॥
पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राचे ठिकाणी जितके उणेपण असते अथवा सोळा कशी (शंभर नंबरी) सोन्यापेक्षा पंधरा कशी (नव्याण्णव नंबरी) सोने जितक्या कमी कसाचे असते ॥१८-१०८७॥
सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे ।
येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥
समुद्रामधे वेगाने जे पाणी जात असते, ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते ॥१८-१०८८॥
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे ।
तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥ १०८९ ॥
ब्रह्म आणि ब्रह्म होणारा, यांच्या योग्यतेमधे तसे अंतर आहे व अर्जुना, शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. ॥१८-१०८९॥
पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण ।
ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥ १०९० ॥
परंतु तेच ब्रह्म झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते, ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. ॥१८-१०९०॥
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४ ॥
ब्रह्मभावयोग्यता प्राप्त झालेला तो पुरुष आत्मबोधप्रशस्तिपदावर आरूढ होतो. ते वेळी तो शोक करत नाही व इच्छाही करीत नाही सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ (चौथी) भक्ति प्राप्त करून घेतो. ॥१८-५४॥
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता ।
आत्मबोधप्रसन्नता- । पदीं बैसे ॥ १०९१ ॥
अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष, आत्मज्ञानामुळे येणार्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ॥१८-१०९१॥
जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय ।
तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥
ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो, ती उष्णता देखील जेव्हा जाते, तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो. ॥१८-१०९२॥
नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा ।
कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥ १०९३ ॥
अथवा शरद् ऋतूत भरतीची लगबग गंगेला सोडते, अथवा गाणे थांबले असता (मृदंग, तंबोरा वगैरे) गाण्याची उपसाधने मागाहून बंद पडतात ॥१८-१०९३॥
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु ।
तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥
त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तिकरता वैराग्यादि साधनांची खटपट करीत असतांना जे श्रम होतात, ते श्रम सुद्धा जेथे शांत होऊन जातात, ॥१८-१०९४॥
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती ।
ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
‘आत्मबोध प्रसन्नता’ या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य पुरुष ती अवस्था भोगतो. ॥१८-१०९५॥
तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें ।
हें सरलें समभावें । भरितें तया ॥ १०९६ ॥
त्या वेळी अमूक एक वस्तु माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भारतीमुळे संपले. ॥१८-१०९६॥
उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती ।
हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥
सूर्योदय झाल्याबरोबर, स्पष्टपणे चमकणार्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो, ॥१८-१०९७॥
तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था ।
मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥ १०९८ ॥
त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होताक्षणीच ही प्राणिमात्रांच्या भेदाची रचना करीत करीत तो (जिकडे तिकडे) आपल्या स्वरूपाला पहात असतो. ॥१८-१०९८॥
पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें ।
तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥
पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात, त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने (ढृष्टीपुढील) अनेक भेद नाहीसे होतात. ॥१८-१०९९॥
तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें ।
तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥
त्याप्रमाणे अन्यथाज्ञानाकडून ज्या जागृति व स्वप्न ह्या अवस्था दाखवल्या जातात, त्या दोन्ही अवस्था अव्यक्तामधे (अज्ञानामधे) लीन होतात. ॥१८-११००॥
मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत ।
पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥ ११०१ ॥
मग तेही अज्ञान जसजसा बोध वाढत जाईल, तसतसे नाहीसे होते व पूर्णबोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. ॥१८-११०१॥
जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं ।
मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥ ११०२ ॥
ऐक. ज्याप्रमाणे भोजन करीत असतांना (प्रत्येक घासाबरोबर) भूक कमी होत जाते व तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते ॥१८-११०२॥
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी ।
मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥ ११०३ ॥
अथवा चालण्याचा वेग जसजसा वाढेल. तसतशी वाट कमी होत होत मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते (संपते). ॥१८-११०३॥
कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे ।
मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥ ११०४ ॥
अथवा जसा जागृतीचा उदय होईल तसतशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने (पूर्णपणे) नाहीशी होते. ॥१८-११०४॥
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे ।
तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥
हे दृष्टांत राहू दे, पौर्णिमेचे दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे चांदणे वाढणे थांबते, तेव्हा जसा शुक्लपक्ष नि:शेष नाहीसा होतो ॥१८-११०५॥
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु ।
मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥ ११०६ ॥
त्याप्रमाणे पदार्थमात्र नाहीसे करणारे जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात ऐक्याला पावला असता साद्यंत अज्ञान नाहीसे होते. ॥१८-११०६॥
तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें ।
मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥
तेव्हा कल्पाताच्या वेळी नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते, ॥१८-११०७॥
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट ।
कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥ ११०८ ॥
अथवा घट, मठ नाहीसे झाल्यावर, जसे एकटे एकसारखे आकाश रहाते, अथवा काष्ठाकाष्ठांच्या घर्षणाने काष्ठ जळून जाऊन जसे ते काष्ठ अग्नीच होऊन रहाते. ॥१८-११०८॥
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे ।
नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥
अथवा मुशीमधे अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव, रूप, वगैरे भेदाचे प्रकार जसे नाहीसे होतात व सोने मात्र जसे रहाते, ॥१८-११०९॥
हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया ।
मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥ १११० ॥
हा दृष्टांतही राहू दे, पूर्ण जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपणच आपल्याला जसे (एकटे) उरतो ॥१८-१११०॥
तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं ।
हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥ ११११ ॥
त्याप्रमाणे एक माझ्यावाचून त्याला त्याच्याहीसकट दुसरे काहीच नसते, अर्जुना, पहा, यासच चौथी भक्ति असे म्हणतात. ही चौथी भक्ति त्याला प्राप्त होते. ॥१८-११११॥
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं ।
ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
इतर जे आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी भक्त हे मला ज्या मार्गाने भजतात, ते भक्तीचे तीन मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ति म्हणत आहे. ॥१८-१११२॥
येर्हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।
पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥
सहज विचार करून पाहिले तर भक्ति तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही व शेवटली नाही. तर माझ्या सहजस्वरूपस्थितीला भक्ति हे नाव आहे. ॥१८-१११३॥
जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि ।
सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥ १११४ ॥
जी सहजस्वरूपस्थिति मद्विषयक अज्ञानाचे प्रकाशन करून, मला विपरीतपणाने भासवून, सर्वांना सर्व ठिकाणी भक्ति करावयास लाऊन, सर्वांची समजूत घालते. ॥१८-१११४॥
जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे ।
हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥ १११५ ॥
जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो, त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते, ते माझ्या (सहज) अखंड चित्प्रकाशाने दिसते. ॥१८-१११५॥
स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें ।
विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे, हे आपल्या (पहाणाराच्या) अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्याच्या (ज्या प्रकाशाच्या) योगाने प्रकाशते ॥१८-१११६॥
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा ।
तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥ १११७ ॥
हे कपिध्वजा अर्जुना, असा जो माझा सहजप्रकाश, तो भक्ति या रीतीने बोलला जातो. ॥१८-१११७॥
म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं ।
अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥ १११८ ॥
म्हणून आर्ताच्या ठिकाणी ही भक्ति उत्कट इच्छेच्या रूपाने बनून, त्या इच्छेचा जो काही विषय आहे, तो मलाच बनवला आहे. ॥१८-१११८॥
जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा ।
मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥ १११९ ॥
अर्जुना, जाणण्याची इच्छा करणार्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञास्य (जाणण्याची इच्छेचा विषय) असा दाखविला गेलो. ॥१८-१११९॥
हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना ।
करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥ ११२० ॥
हीच भक्ति अर्थप्राप्तीची इच्छा होऊन, मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. ॥१८-११२०॥
एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते ।
ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥ ११२१ ॥
याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ति व्यवहार करू लागली की ती भक्ति मला द्रष्ट्याला दृश्य करून दाखवते. ॥१८-११२१॥
येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके ।
तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥ ११२२ ॥
आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखच दिसते, या म्हणण्यात काही चूक नाही. परंतु प्रतिबिंबरूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो ॥१८-११२२॥
दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें ।
जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥ ११२३ ॥
दृष्टि खरोखर चंद्राला पहाते, परंतु तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. ॥१८-११२३॥
तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया ।
परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥ ११२४ ॥
त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो, परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. ॥१८-११२४॥
तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें ।
निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥
ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे द्रष्टुत्व मला भेटले ॥१८-११२५॥
पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ ।
परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥ ११२६ ॥
तेव्हा हिणकस धातु सोन्यात मिसळलेली असते, तेव्हाही निश्चयाने ते सोनेच आहे. परंतु ती (हिणकस धातु) निघाली असता जसे केवळ सोने उरते. ॥१८-११२६॥
हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? ।
परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥ ११२७ ॥
अरे अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही काय ? परंतु (पौर्णिमेच्या दिवशी) त्याला प्रकाशाच्या दृष्टीने) पूर्णता भेटते. ॥१८-११२७॥
तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें ।
मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥
तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो. परंतु अप्रत्यक्ष अन्यरूपाने (दृश्यरूपाने) दिसतो. मग (ज्ञानाने) दृश्याचा निरास होऊन भिन्नरूपाने दिसणारे दृश्य, एकद्रष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो, ॥१८-११२८॥
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था ।
भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥ ११२९ ॥
अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग, हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले. ॥१८-११२९॥
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५ ॥
या सहजज्ञानभक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वत: जाणतो. तत्वत: जाणले म्हणजे त्यानंतर तो माझ्यामधे प्रवेश करतो. ॥१८-५५॥
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज ।
मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥ ११३० ॥
या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे, तो भक्त केवळ मीच आहे, हे तू ऐकलेही आहेस. ॥१८-११३०॥
जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा ।
हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥
कारण की मागे सातव्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना, हात वर करून बोललो आहे. ॥१८-११३१॥
ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया ।
उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥ ११३२ ॥
अर्जुना, ती ही भक्ति उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली, ॥१८-११३२॥
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती ।
आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
ज्ञानी हिला (चौथ्या भक्तीला) स्वसंविति म्हणतात. शैव हिला शक्ति म्हणतात, आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ति म्हणतो. ॥१८-११३३॥
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे ।
मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥ ११३४ ॥
ही भक्ति त्या मागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते. ॥१८-११३४॥
तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं ।
वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥ ११३५ ॥
तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह आटतो व वृत्ति आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. ॥१८-११३५॥
घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें ।
गिळूनि चार्ही भूतें । आकाश जैसें ॥ ११३६ ॥
(लयाच्या वेळी) आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो ॥१८-११३६॥
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध ।
तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥ ११३७ ॥
त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग आणि साध्यसाधन, यांच्या पलीकडील शुद्ध जो मी, त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. ॥१८-११३७॥
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा ।
तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥ ११३८ ॥
समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे. ऐक. ॥१८-११३८॥
कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा ।
देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥ ११३९ ॥
अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो (म्हणजे पहाणारा व पाहिले जाणारे, हे दोघे द्रष्टेच असतात). तसाच त्या भोगण्यात द्रष्टेपणाचाच भर असतो. ॥१८-११३९॥
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया ।
देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥
जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभवला जातो ॥१८-११४०॥
चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे ।
ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥ ११४१ ॥
हे राहू दे, आरशात पहाणार्यापुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता, ज्याप्रमाणे आपले मुखसौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते ॥१८-११४१॥
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा ।
तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥
तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही, असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो (म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे). ॥१८-११४२॥
तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी ।
कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥ ११४३ ॥
(ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे) त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्य प्रकाशला जात असेल तर नकळे. अथवा त्यांनी आकशाला (आत घेण्याकरता) मांडव उभारला की काय कळत नाही. ॥१८-११४३॥
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? ।
कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ? ॥ ११४४ ॥
राजेपणा अंगी नसता, राजा आपला राजेपणा भोगू शकेल काय ? अथवा अंधार आपण अंधकाररूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय ? ॥१८-११४४॥
आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? ।
रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥
आणि जे आकाश नाही, त्याला आकाश काय आहे हे कसे कळेल ? अथवा गुंजांचा अलंकार (रत्नांच्या अलंकारासारखा) रत्नाच्या अलंकारात शोभेल काय ? ॥१८-११४५॥
म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं ।
मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥ ११४६ ॥
म्हणून जो मी (मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे ? मग तो माझी भक्ति करेल हे बोलायलाच नको. ॥१८-११४६॥
यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी ।
तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥ ११४७ ॥
एवढ्याकरता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते (ती जसा तारुण्याचा उपभोग घेते) तसा तो क्रमयोगी मी (मद्रूप) होऊन मला भोगतो. ॥१८-११४७॥
तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं ।
नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥
लाट जशी सर्वांगांनी पाण्याचाच उपभोग घेते, अथवा प्रभा जशी बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते. ॥१८-११४८॥
तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे ।
अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥
जसा दागिना स्वत: (सोने असून) सोन्याला भजतो, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. (म्हणाजे दागिन्याचे सोन्याशी अभिन्न असणे, हेच त्याचे सोन्यास भजणे, तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे). ॥१८-११४९॥
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी ।
का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥ ११५० ॥
अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावत: भजतो अथवा चांदणे जसे स्वभावत: चंद्राला भजते ॥१८-११५०॥
तैसी क्रिया कीर न साहे । तर्ही अद्वैतीं भक्ति आहे ।
हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोलाऐसें ॥ ११५१ ॥
त्याप्रमाणे (अद्वैतात) क्रिया करणे खरोखर सोसत नाही, तरी अद्वैतात भक्ति आहे ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे. बोलण्यासारखी नाही. ॥१८-११५१॥
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे ।
तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥ ११५२ ॥
तेव्हा पूर्वसंस्कारांच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल, त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. ॥१८-११५२॥
बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे ।
तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥ ११५३ ॥
बोलणार्याला जेव्हा बोलणारा स्वत: भेटतो, तेव्हा ‘बोलला’ हा व्यवहार घडत नाही, ते मौन म्हणजेच माझी उत्तम स्तुति होय. ॥१८-११५३॥
म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां ।
मौन होय तेणें तत्त्वतां । स्तवितो मातें ॥ ११५४ ॥
म्हणून तो बोलत असतांना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी, तो भेटत असल्याकारणाने ते त्याचे बोलणे मौन होते. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. ॥१८-११५४॥
तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी ।
तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥
त्याचप्रमाणे बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पहावयास जातो, त्याचे ते पहाणे, दृश्याला एकीकडे सारून पहाणारासच दाखवते. ॥१८-११५५॥
आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ ।
तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥
आरसा पुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पहाणारे असून तेच प्रतिबिंबरूपाने आपल्यास पहाते. त्याचप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. ॥१८-११५६॥
दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे ।
तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥
जेव्हा दृश्य जाऊन (म्हणजे दृश्यकल्पनेचा निरास होऊन) द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही. ॥१८-११५७॥
तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया ।
ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥ ११५८ ॥
तेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यास गेला असता स्वप्नातील नवरा व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवल आपण मात्र रहातो ॥१८-११५८॥
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी- । माजीं वन्हि एक उठी ।
तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥ ११५९ ॥
अथवा दोन लाकडांच्या घासण्यात एक अग्नि उत्पन्न होतो, तो अग्नि दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच रहातो. ॥१८-११५९॥
नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती ।
बिंबताही असती । जाय जैसी ॥ ११६० ॥
सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊ गेला असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंबसापेक्ष असणारा बिंबाचा बिंबपणा तोही जसा जातो, ॥१८-११६०॥
तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें ।
तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥
त्याप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊ जातो (पहातो), तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच, परंतु दृश्यसापेक्ष असलेला द्रष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो. ॥१८-११६१॥
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता ।
तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥ ११६२ ॥
सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश्य अंधार तर उरत नाहीच, (पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही). त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता (दृश्य मद्रूप झाले असता दृश्यसापेक्ष) द्रष्टेपणाही उरत नाही. ॥१८-११६२॥
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे ।
ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥ ११६३ ॥
मग पहाणॆही नाही व न पहाणेही नाही अशी अवस्था जी उत्पन्न होते, ते माझे खरे दर्शन होय. ॥१८-११६३॥
तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी ।
द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥ ११६४ ॥
अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्षभावरहित असलेल्या (स्वरूपाला) आपल्या दृष्टीने सदा अनुभावतो. ॥१८-११६४॥
आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें ।
मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥ ११६५ ॥
आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून असल्यामुळे जसे ते (इकडे तिकदे) मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले. (त्याच्यासकट सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला जाणे राहिले नाही). ॥१८-११६५॥
कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके ।
तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥ ११६६ ॥
कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वहाण्याचे थांबते त्याप्रमाणे मी जो एक आत्मा, त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला ॥१८-११६६॥
पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? ।
आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥
पाय आपण आपल्यावर कसा चढेल ? अग्नि आपल्या स्वत:लाच कसा लागेल ? पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करील ? ॥१८-११६७॥
म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें ।
तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥ ११६८ ॥
म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्याकारणाने त्याचे येणे जाणे थांबते. मी जो एकाकी (द्वैतशून्य) त्या माझी हीच यात्रा करणे आहे. ॥१८-११६८॥
पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु ।
तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥
पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली, तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही ॥१८-११६९॥
जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें ।
तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥ ११७० ॥
त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे, जे चालणे व ज्याच्या योगाने चालावयाचे ते सर्व एक पाणीच आहे. म्हणून. ॥१८-११७०॥
गेलियाही भलतेउता । उदकपणें पंडुसुता ।
तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥
अर्जुना, ती लाट वाटेल तिकडे गेली असताही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याशी एकरूपता असते, ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही, ॥१८-११७१॥
तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला ।
या यात्रा होय भला । कापडी माझा ॥ ११७२ ॥
त्याप्रमाणे हा (क्रमयोगी) मी (परमात्म) पणाने पूर्ण भरलेला असतो. तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला. (असे होणे, हीच माझी यात्रा होय). या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकारे यात्रेकरू होतो. ॥१८-११७२॥
आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे ।
तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥ ११७३ ॥
आणि शारीरस्वभाववशात् तो काही एक जरी करावयास बसला तरी त्या निमित्ताने मी त्याला भेटतो. ॥१८-११७३॥
तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता ।
मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥ ११७४ ॥
अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हे जाऊन मी जो आत्मा, त्या माझ्याशी ऐक्याला पावून मला पाहिले असता मीच होतो. ॥१८-११७४॥
पैं दर्पणातें दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें ।
सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥
आरशाने आरशाला पाहिले असता ते न पहाणेच होते, अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता, ते न झाकणेच होते. ॥१८-११७५॥
दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे ।
तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशणेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कोठचे ? ॥१८-११७६॥
कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये ।
तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥ ११७७ ॥
तो क्रमयोगी कर्म देखील करतच असतो. परंतु अमूक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा जाते (जेव्हा कर्तृत्वाभिमानरहित कर्म होते) तेव्हा ते त्याचे करणे न करणेच होते. (न केल्याप्रमाणेच आहे). ॥१८-११७७॥
क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें ।
तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥ ११७८ ॥
कर्ममात्र मी झाल्यामुळे (मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय. ॥१८-११७८॥
म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा ।
निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥ ११७९ ॥
म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही अर्जुना ते त्याचे न करणेच उत्पन्न होते. त्या महापूजेने (तो) माझी पूजा करतो. ॥१८-११७९॥
एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन ।
अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥ ११८० ॥
याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे, तो पाहील ते माझे दर्शन आहे, तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझ्याकडे येणे आहे (माझी यात्रा करणे) आहे. ॥१८-११८०॥
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा ।
तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥
अर्जुना, तो जी कर्मे करील, ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करील तो माझा जप होय आणि तो ज्या स्थितीत असेल, ती माझी समाधिअवस्था होय. ॥१८-११८१॥
जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें ।
तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥ ११८२ ॥
ज्याप्रमाणे सोन्याचे कांकण सोन्याशी नेहेमी अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहेमी अभिन्न असतो. ॥१८-११८२॥
उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु ।
रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥
पाण्यात जशी लाट, कापुरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते ॥१८-११८३॥
किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु ।
तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥ ११८४ ॥
फार काय सांगावे ? सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाने मडके अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. ॥१८-११८४॥
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं ।
मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥
हे सुबुद्धि अर्जुना, या स्वयंसिद्ध असलेल्या अभेदभक्तीने, या सर्वच दृश्यमात्रामधे तो ज्ञानी मला द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणतो ॥१८-११८५॥
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें ।
भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥ ११८६ ॥
(जागृति, स्वप्न व सुषुप्ति या) तिन्ही अवस्थांच्या द्वाराने व (स्थूल, सूक्ष्म व कारण या) तीन प्रकारच्या उपाधींच्या व (विश्व, तैजस व प्राज्ञ या) तीन उपहितांच्या आकाराने (अभिमानी जीवांच्या) आकाराने व भावरूपाने जे जागृति व स्वप्न या दोन अवस्थेमधे असणेपणाने) व अभावरूपाने (सुषुप्ति अवस्थेमधे नसणेपणाने) जे हे दृश्य (संपूर्ण विश्व) अनुभवास येते ॥१८-११८६॥
तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा ।
अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, ते हे सर्वच मी द्रष्टा आहे, अशा या बोधाच्या भरात तो (ज्ञानी भक्त) लग्नामधे जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो. ॥१८-११८७॥
रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु ।
रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥ ११८८ ॥
रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार (वास्तविक करा नसून) रज्जूच आहे, असा ज्याप्रमाणे निश्चय होतो ॥१८-११८८॥
भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं ।
हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥ ११८९ ॥
अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही, हे जसे दागिना आटून पक्के करावे. ॥१८-११८९॥
उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें ।
जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥ ११९० ॥
एका पाण्याशिवाय लाट (दुसरे) काही नाहीच, हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानीत नाहीत. (पाण्याहून वेगळी समजली जात नाही). ॥१८-११९०॥
नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां ।
तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥ ११९१ ॥
अथवा स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही, ॥१८-११९१॥
तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती ।
तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥ ११९२ ॥
त्याप्रमाणे आहे, नाही (भावाभाव) या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते, ते मी ज्ञाताच आहे हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव भोगतो. ॥१८-११९२॥
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, वृद्धपणरहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळाणारा आहे, मी अपूर्व (विलक्षण) आहे, मी अपार (अमर्याद) आहे व मी आनंद आहे. ॥१८-११९३॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
मी न ढळणारा आहे, मी अच्युत (आपल्या स्थानापासून भ्रष्ट न होणारा) आहे, मी अंतरहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या आरंभीचा आहे, निराकार व साकारही मीच आहे. ॥१८-११९४॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।
अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
नियम्य मी आहे, नियामकही मीच आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा आश्रय आहे व आश्रितही मीच आहे. ॥१८-११९५॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वत:सिद्ध व अखंड आहे, मी सर्व आहे, सर्वव्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडला आहे. ॥१८-११९६॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे व मी संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे. ॥१८-११९७॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
मी क्रियारहित आहे, मी एक आहे (अद्वितीय आहे). मी संगरहित व शोकरहित आहे. व्याप्य व व्यापक मी आहे, उत्तमपुरुष मी आहे. ॥१८-११९८॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
मी शब्दरहित व कर्णरहित आहे. मी रूपरहित व कुळरहित आहे. मी सारखा व स्वतंत्र आहे. सर्वांहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे. ॥१८-११९९॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥
याप्रमाणे मला एकाला या अद्वयभक्तीने आत्मत्वेकरून (आत्मपणाने) खरोखर जाणतो, आणि याही बोधाला (अनुभवाला) जाणणारा तोही मीच आहे हे जाणतो. ॥१८-१२००॥
पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे ।
तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥
जागे झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एकपण जे उरते, तेही आपल्याला जसे आपल्या ठिकाणीच काही काळ स्फुरते. ॥१८-१२०१॥
कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु ।
तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥ १२०२ ॥
अथवा सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो, तेव्हा सूर्यच प्रकाशक होतो व या प्रकाशक व प्रकाश्य यांच्या अभेदालाही दाखवणारा ज्याप्रमाणे तोच आहे. ॥१८-१२०२॥
तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं ।
तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥
त्याप्रमाणे वेद्याचा (ज्ञेय वस्तूचा) लय झाला असता केवळ वेदक (द्रष्टा जाणणारा) उरतो, पहा. तो वेदकही (जाणणाराही) त्या वेदकाकडून जाणला जातो, हेही जो जाणतो (वेद्याच्या निरासाअंती उरलेला जो वेदक, तो त्यावेळी आपण आपल्याला जाणतो, त्या वेळेला वेद्य व वेदक यांचा अभेद आहे हेही जाणतो). ॥१८-१२०३॥
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया ।
ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥ १२०४ ॥
अर्जुना, त्या आपल्या अद्वयपणाला जाणणारे जे ज्ञान ते ज्ञान ईश्वर आहे व तो ईश्वरच मी आह, हे त्याच्या अनुभवाला येते. ॥१८-१२०४॥
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत ।
हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥
मग द्वैत व अद्वैत यांच्या पलीकडला मीच एक आत्मा नि:संशय आहे हे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवात प्रवेश करते, (म्हणजे ज्या अनुभवात जाणण्याची ऊर्मि उरत नाही) ॥१८-१२०५॥
तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण ।
तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥ १२०६ ॥
तेव्हा जागे झाल्यावर (स्वप्नातील अनेकत्व जाऊन) आपले एकपण जसे आपल्याआपण दिसते व तोही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर, ज्याप्रमाणे काय होऊन रहाते हे कळत नाही. ॥१८-१२०६॥
कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं ।
नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥ १२०७ ॥
सोन्याच्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अलंकार न आटता आटणी होते ॥१८-१२०७॥
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे ।
तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥ १२०८ ॥
अथवा पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर मग त्या मिठाचा खारेपणा जसा पाण्याच्या रूपाने रहातो व तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले, हा व्यवहारही संपतो. ॥१८-१२०८॥
तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें ।
कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥ १२०९ ॥
त्याप्रमाणे मी देव व तो भक्त जहे जे द्वैत आहे, ते (द्वैत) स्वानंदानुभवाच्या ऐक्याने कालवून माझ्याचमधे तो प्रवेश करतो. ॥१८-१२०९॥
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे ।
ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥
आणि तो ही भाषा जेथे (ज्या अनुभावात) संपते, तेथे मी हे कोणाला म्हणावयाचे ? (कारण ‘तो’ च्या सापेक्ष मी आहे व जेथे तो नाही, तेथे मी कोण आहे ?) याप्रमाणे जेथे मी नाही, व तोही नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. ॥१८-१२१०॥
जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी ।
मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥ १२११ ॥
जेव्हा कापूर जळून संपतो, त्याच वेळेला अग्नीचीही समाप्ति होते. मग दाह्य कापूर व दाहक अग्नि यांच्याहून वेगळे असलेले एक आकाशमात्र उरते. ॥१८-१२११॥
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु ।
तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥ १२१२ ॥
अथवा एकांत वजा केला असता केवळ शून्य उरते, त्याप्रमाणे आहेनाहीचा शेष (आहे व नाही हे सापेक्षभाव गेल्यावर जे उरते ते) मग मीच आहे. ॥१८-१२१२॥
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु ।
न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥ १२१३ ॥
त्या स्वरूपी ब्रह्म, आत्मा, ईश, या शब्दांचा काही लाग लागत नाही. (कारण एकरस स्वरूपात अल्प, अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म, आत्मा, ईश, हे जे बोलणे त्याच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्यालादेखील तेथे अवकाश रहात नाही. ॥१८-१२१३॥
न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी ।
जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥ १२१४ ॥
न बोलणे देखील न बोलून, ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोन्हींचे भान टाकून ते जाणावे. ॥१८-१२१४॥
तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंदु घेपे आनंदें ।
सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥
त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणावयाचा, आनंदानेच आनंद घ्यावयाचा व सुखानेच केवळ सुख भोगायचे. ॥१८-१२१५॥
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा ।
विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥
तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला, प्रभा प्रभेकडून आलिंगली गेली व आश्चर्यात आश्चर्य बुडाले. ॥१८-१२१६॥
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला ।
अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥
तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला, विश्राम विश्रांतीला आला, अनुभव अनुभावाने वेडा झाला., ॥१८-१२१७॥
किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ ।
सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥
फार काय सांगावे ? असे शुद्ध मीपण हे फळ त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून (क्रमयोगाचे आचरण करून) मिळाले. ॥१८-१२१८॥
पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं ।
मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥ १२१९ ॥
अर्जुना, क्रमयोगरूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरूप रत्न ते, तो क्रमयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून होतो. ॥१८-१२१९॥
कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा ।
तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥ १२२० ॥
अथवा क्रमयोगरूपी मंदिराचा कळस, त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. ॥१८-१२२०॥
नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी ।
जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥ १२२१ ॥
अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोगरूपी चांगली वाट मिळाली आहे, ती क्रमयोगरूपी वाट माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. ॥१८-१२२१॥
हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें ।
मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥
हे राहू दे, त्या भक्तिरूपी गंगोदकाने, या क्रमयोगरूपी ओघाने, जो मी स्वानंदरूपी सागर, त्या मला वेगाने गाठले. ॥१८-१२२२॥
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा ।
म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥
हे चांगले मर्म जाणणार्या अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे, म्हणून आम्ही हा क्रमयोग तुम्हाला वारंवार सांगतो. ॥१८-१२२३॥
पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें ।
तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥
देशाने, कालाने आणि पदार्थाने मला प्राप्त करून घ्यावे असा (म्हणजे योग्य देश, योग्य काल, व योग्य पदार्थ ह्यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे एरवी नाही असा) मी नाही, तर मी स्वयंसिद्ध सर्वांचे सर्वही आहे. (म्हणजे सर्वांच्या सर्वरूपाने मीच आहे). ॥१८-१२२४॥
म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं ।
मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥ १२२५ ॥
म्हणून माझ्या ठिकाणी (माझ्या प्राप्तिविषयी) काही श्रमावयाची जरुरी नाही. या उपायाने (क्रमयोगाने) खरोखरच मी प्राप्त होतो. ॥१८-१२२५॥
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु ।
तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥ १२२६ ॥
एक शिष्य व एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरता आहे. ॥१८-१२२६॥
अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी ।
वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥ १२२७ ॥
अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात ठेवा आयता आहे, लाकडात अग्नी आयताच आहे व कासेत दूध आयतेच आहे ॥१८-१२२७॥
परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें ।
येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥ १२२८ ॥
एरवी पाहिले तर जी गोष्ट स्वत:सिद्ध असते, तीच प्राप्त होते. परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. त्याप्रमाणे मी स्वत:सिद्ध आहे खरा, परंतु मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय करावे लागतात. ॥१८-१२२८॥
हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो ।
हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥
(१२१८ ओवीत उपाय सांगून) फळ सांगितल्यानंतर देखील, हा साधनप्रकार सांगण्याचा देव पुन: का उपक्रम करीत आहेत असे कोणी विचारले तर या (साधनप्रकार) सांगण्याचा अभिप्राय असा आहे. ॥१८-१२२९॥
जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें ।
आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥
कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र मोक्षप्राप्तीचा उपाय सांगणारे आहे. आणि (दुसर्या) शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. ॥१८-१२३०॥
वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी ।
कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥ १२३१ ॥
वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा बनवीत नाही, अथवा पाण्यावर आलेले गोंडाळ हात दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करत नाही. ॥१८-१२३१॥
तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु ।
तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥
त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबद्धक असा जो अविद्येचा मल आहे, तो मळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढेच, याशिवाय मी जो स्वत:सिद्ध निर्मळ, तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. ॥१८-१२३२॥
म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें ।
वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥ १२३३ ॥
म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत, याशिवाय ती आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. ॥१८-१२३३॥
तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी ।
तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥ १२३४ ॥
त्या तत्वज्ञानप्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न उत्पन्न होतो तेव्हा त्यांना (आपला खरेपणा सिद्ध करण्यास) ज्या ठिकाणास यावे लागते ते ठिकाण गीताशास्त्र होय. ॥१८-१२३४॥
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया ।
तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥
पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता, सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. ॥१८-१२३५॥
हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें ।
सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥
हे राहू दे, या गीताशास्त्रेश्वराने जसा आत्मा घेता येईल, असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला ॥१८-१२३६॥
परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे ।
हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥
परंतु पहिल्या ऐकण्याबरोबर हे देवांचे सांगणे अर्जुनला क्वचितच समजेल असा अभिप्राय सकरुण अशा श्रीहरीने मनात धरून ॥१८-१२३७॥
तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ ।
सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥ १२३८ ॥
तोच विचार शिष्याच्या अंत:करणात पक्का दृढ होण्याकरता, श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन: एकवेळ (तोच विचार) सांगत आहेत. ॥१८-१२३८॥
आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता ।
म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥ १२३९ ॥
आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे. म्हणून प्रसंगानुसार (गीतेच्या) आरंभापासून तो शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवीत आहेत. ॥१८-१२३९॥
जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं ।
निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥
या गीताग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले ॥१८-१२४०॥
तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत ।
हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥
तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिलेले आहेत असे जर कोणी या ग्रंथाचा मागलापुढला संबंध न जाणून मानील ॥१८-१२४१॥
तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका ।
भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥ १२४२ ॥
तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत, (अनेक सिद्धांताची एकवाक्यता आहे) असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत. ॥१८-१२४२॥
एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ १२४३ ॥
या गीतेत अविद्येचा निरास करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल (प्रयोजन) आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. ॥१८-१२४३॥
हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं ।
तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥ १२४४ ॥
हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितले आहे. ते आता दोन अक्षरात (थोडक्यात) पुन्हा सांगावे. ॥१८-१२४४॥
म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती ।
देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥ १२४५ ॥
म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन: सांगण्यास देव याच (वर सांगितलेल्या) अभिप्रायाने प्रवृत्त झाले. ॥१८-१२४५॥
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६ ॥
(बुद्धि-काया-वाचा यांनी) माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा कर्मे करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असे पद मिळवतो. ॥१८-५६॥
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा ।
मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥
मग देव म्हणतात अर्जुना, तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. ॥१८-१२४६॥
स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं ।
तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥
स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. ॥१८-१२४७॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे ।
तिया भजन समरसें । सुखिया होय ॥ १२४८ ॥
तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो, तेव्हा माझी भक्ति प्रगट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकरस होऊन सुखी होतो. ॥१८-१२४८॥
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया ।
अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥
आणि विश्वाचे प्रकशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझे सर्वव्यापित्व जाणून अनुसरतो. ॥१८-१२४९॥
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ ।
कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥ १२५० ॥
आपला कठिणपणा टाकून जसे मीठ पाण्याशी मिळते अथवा इकडे तिकडे वाहून वायु जसा आकाशात शांत रहातो ॥१८-१२५०॥
तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये ।
तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥ १२५१ ॥
त्याप्रमाणे जो बुद्धीने, वाचेने, व शरीराने माझा आश्रय करून रहातो तो चुकूनही निषिद्ध कर्म करो – ॥१८-१२५१॥
परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी ।
येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥
परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वहाणारे पाणी व महानदीचे पाणी जसे (दोन्ही गंगारूप झाल्यामुळे) एक होतात, त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपापाची तशी ऐक्यस्थिती होत असते. ॥१८-१२५२॥
कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे ।
जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥
अथवा बावन चंदन व घुरे (एक घाणेरडे लाकूड) हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळली नसतात, तेथेपर्यंतच रहातो. ॥१८-१२५३॥
ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें ।
जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥ १२५४ ॥
अथवा पाच कसाचे व सोळा कसाचे सोने हे (फरक) सोन्यात तेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगस्पर्शाने त्या दोन्ही सोन्यांना एक कसाचे करीत नाही. ॥१८-१२५४॥
तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे ।
जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥ १२५५ ॥
त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासते की जोपर्यंत केवळ एक जो मी, तो सर्वव्यापीपणाने अनुभवाला येत नाही. ॥१८-१२५५॥
अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो ।
जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥ १२५६ ॥
अरे अर्जुना, रात्र व दिवस हा भेद तेथेपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही. ॥१८-१२५६॥
म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी ।
जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥ १२५७ ॥
अर्जुना, म्हणून माझी भेट (अपरोक्षानुभव) झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या (मोक्षाच्या) पदावर बसतो. ॥१८-१२५७॥
देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे ।
तें पद माझें पावे । अविनाश तो ॥ १२५८ ॥
देशाने, कालाने, स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही त्या माझ्या अविनाशपदाला तो प्राप्त होतो. ॥१८-१२५८॥
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता ।
लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, त्याला मी जो आत्मा, त्याची प्रसन्नता (सुख) प्राप्त होते. त्या योगाने न मिळणारा असा कोणता लाभ राहिला आहे ? ॥१८-१२५९॥
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७ ॥
विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून मत्पर होत्साता (मदनन्यतारूप) वुद्धियोगाचा आश्रय करून सर्वकाल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा हो. ॥१८-५७॥
याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया ।
माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥ १२६० ॥
अर्जुना, या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर. ॥१८-१२६०॥
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा ।
आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥
हे वीरा अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू कृत्रिम करशील तर तसे करू नकोस हो. तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असतांना तू आपली चित्तवृत्ति आत्मविचाराकडे लाव. ॥१८-१२६१॥
मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें ।
माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥ १२६२ ॥
मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्माहून निराळा असा माझ्या निर्मल स्वरूपी पहाशील. ॥१८-१२६२॥
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे ।
ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥ १२६३ ॥
आणि कर्माची जन्मभूमि जी प्रकृति आहे, ती (प्रकृति) आपल्या स्वरूपापासून फार दूर (म्हणजे अगदी भिन्न) अशी तू पहाशील. ॥१८-१२६३॥
तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया ।
रूपेंवीण का छाया । जियापरी ॥ १२६४ ॥
अर्जुना, तेव्हा प्रकृति आपणहून (तुझ्याहून) वेगळी उरणार नाही. ती कशी तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे. ॥१८-१२६४॥
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु ।
निफजेल अनायासु । सकारणु ॥ १२६५ ॥
याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल. ॥१८-१२६५॥
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां ।
तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥ १२६६ ॥
मग कर्ममात्र नाहीसे झाल्यावर, केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धि पतिव्रता (एकनिष्ठ) करून ठेव. ॥१८-१२६६॥
बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे ।
तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥ १२६७ ॥
जेव्हा अनन्ययोगाने बुद्धि माझ्यामधे प्रवेश करते, तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच भजते. ॥१८-१२६७॥
ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें ।
ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥ १२६८ ॥
याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत, असे चित्त माझ्या ठिकाणी नेहेमी जडलेले राहील असे तू लवकर कर. ॥१८-१२६८॥
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्क्ष्यसि ॥ ५८ ॥
मच्चित्त झालेला तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे (सर्व दु:खास कारण असलेली जन्ममरणरूप संकटे) तरून जाशील, परंतु जर तू अहंकाराने मी सांगतो ते ऐकणार नाहीस तर नाश पावशील ॥१८-५८॥
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां ।
माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. ॥१८-१२६९॥
तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में ।
तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज ॥ १२७० ॥
तेव्हा सकल दु:खाची घरे जी मृत्यु व जन्म, (सर्व जीवांकडून) भोगली जातात, ती कठिण असून देखील तुला सोपी होतील. (कठिण अशा जन्ममृत्यूतून तू सहज तरून जाशील). ॥१८-१२७०॥
सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये ।
तैं अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥ १२७१ ॥
सूर्याच्या सहाय्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही किंमत आहे काय ? ॥१८-१२७१॥
तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे ।
तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥
त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्पजीवदशा नाश पावते, तो संसाररूपी बागुलबोवाकडून कसा पीडला जाईल ? ॥१८-१२७२॥
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया ।
तरसील माझिया । प्रसादास्तव ॥ १२७३ ॥
म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. ॥१८-१२७३॥
अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें ।
कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥
अथवा हे माझे बोलणे तू अभिमानाने कानाच्या व मनाच्या हद्दीवर टेकू न देशील ॥१८-१२७४॥
तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो ।
देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥
तर तू नित्यमुक्त व अव्यय (अविनाश) असा आहेस ते व्यर्थ होऊन देहतादात्म्याचा तडाका तुझ्या अंगावर आदळेल. ॥१८-१२७५॥
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु ।
भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥
ज्या देहतादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असतांना विसावा कधीच मिळत नाही. ॥१८-१२७६॥
येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें ।
पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥ १२७७ ॥
जर तू माझ्या बोलण्याचा विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसतांना एवढे भयंकर तुझ्या अंगावर आदळेल. ॥१८-१२७७॥
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९ ॥
अहंकाराचा आश्रय करून ‘मी युद्ध करणार नाही’ असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. (कारण तुझी) प्रकृति तुला (युद्धाचे ठिकाणी) प्रवृत्त करीत आहे. (ती तुला तिच्याविरुद्ध करू देणार नाही). ॥१८-५९॥
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु ।
विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥
पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो, अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो, त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून ॥१८-१२७८॥
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु ।
संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥ १२७९ ॥
आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक कृत्य असे नाव देऊन ॥१८-१२७९॥
इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां ।
ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥
अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना तीन नावे ठेऊन (मी) लढणार नाही असा ॥१८-१२८०॥
जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु ।
तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥
जो अंत:करणामधे तू पक्का निश्चय करशील, त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील. ॥१८-१२८१॥
आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक ।
हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥
आणि मी अर्जुन, हे माझे सर्व नातलग व यांचा वध करणे हे पाप, या कल्पना ही भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय ? ॥१८-१२८२॥
आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें ।
कां न जुंझावया करावें । देवांगण ॥ १२८३ ॥
(वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन, हे माझे आप्त व यांना मारणे हे पातक ही सर्व भ्रांति असल्यामुळे तू युद्ध करणाराच ठर नाहीस, म्हणून) अगोदर तू लढणारा व्हावास (ठारावास) आणि मग लढण्याकरता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस ॥१८-१२८३॥
म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें ।
ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥
म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते (तात्विक दृष्ट्या) व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणारा आहेस असे जर घतकाभर मानले ॥१८-१२८४॥
तर्ही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें ।
तें प्रकृति अनारिसें । करवीलचि ॥ १२८५ ॥
तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस, तो निश्चय तुझा क्षात्रस्वभाव उलट करवील ॥१८-१२८५॥
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥ ६० ॥
हे कौंतेया, स्वत:च्या स्वभावजकर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे (कर्म) करू इच्छित नाहीश ते तू (पूर्वसंस्काराने) परतंत्र आहेस, म्हणून करशीलच. (म्हणजे तुला करणे भाग आहे. ॥१८-६०॥
पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं ।
तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥
पूर्वेकडील दिशेने पाणी जोरात वहात असतांना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल. बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील. ॥१८-१२८६॥
कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें ।
तरी आहे आन करणें । स्वभावासी ? ॥ १२८७ ॥
अथवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला, तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे काय ? ॥१८-१२८७॥
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा ।
आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥
त्याप्रमाणे हे बुद्धिमंता अर्जुना, क्षात्रसंस्कारांनी सिद्ध झालेल्या प्रकृतीने (स्वभावाने) तू उत्पन्न झालेला आहेस. आता ‘मी युद्ध करण्यास उठत नाही” असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून (तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे) तू उठवला जाशीलच. ॥१८-१२८८॥
पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता ।
गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज ॥ १२८९ ॥
अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता, वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्रप्रकृतीने जन्मत: दिल्यामुळे ॥१८-१२८९॥
तरी तयाचिया समवाया- । अनुरूप धनंजया ।
न करितां उगलियां । नयेल असों ॥ १२९० ॥
तर अर्जुना, त्या क्षात्रगुणांच्या समुदायानुरूप (युद्ध) न करताना मुकाट्याने रहाता यावयाचे नाही. ॥१८-१२९०॥
म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी ।
त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया ॥ १२९१ ॥
म्हणून हे अर्जुना, तू त्या शौर्यादि क्षात्रगुणांनी बांधला गेला आहेस, त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघात तू खरोखर पडशील. ॥१८-१२९१॥
ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ ।
न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥
अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता ‘मी लढणार नाही’ असे केवळ अढळ व्रत जर घेशील ॥१८-१२९२॥
तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये ।
तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥
तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे, तो चालला नाही तरी (रथाबरोबर) दूर देशात जाणारच. ॥१८-१२९३॥
तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि ।
ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी ॥ १२९४ ॥
त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून रहाशील, परंतु खात्रीने तूच (युद्धादिक सर्व) करशील. ॥१८-१२९४॥
उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा ? ।
हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥ १२९५ ॥
विराट देशाचा राजा उत्तर, तो युद्धाच्या वेळी पळत असता, तू लढाईला का निघालास ? तोच तुझा क्षात्रस्वभाव तुला आता लढवयास लावील. ॥१८-१२९५॥
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं ।
तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥
अकरा अक्षौहिणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्यानेच रणांगणावर शस्त्ररहित केलेस, अर्जुना, तो तुझा क्षात्र स्वभाव तुला लढण्यास लावील. ॥१८-१२९६॥
हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? ।
परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥
अर्जुना, रोग्याला रोग आवडतो काय ? दरिद्री मनुष्यास दारिद्र्य आवडते काय ? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ॥१८-१२९७॥
तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें ।
तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥
ते अदृष्ट (प्रारब्ध) ईश्वराच्या आधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच. ॥१८-१२९८॥
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१ ॥
हे अर्जुना, (शरीररूप) यंत्रावर जणूकाय चढवलेल्या सर्व भूतांना (आपल्या) मायेच्या योगाने फिरवणारा (हालवणारा) ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात स्थित आहे. ॥१८-६१॥
सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं ।
चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥ १२९९ ॥
सर्व प्राण्यांमधे हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीच्या सहस्रकिरणांनी युक्त असा जो (ईश्वररूपी सूर्य) उगवलेला आहे. ॥१८-१२९९॥
अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख ।
अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥ १३०० ॥
जागृति इत्यादि तीन अवस्था हेच कोणी स्वर्गादि तिन्ही लोक, ते संपूर्ण प्रकाशून ‘देह मी’ अशा विपरीतज्ञानाने भुललेले (देह मी व देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे) वाटसरु (त्या सूर्याने) जागे केले. ॥१८-१३००॥
वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं ।
इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥
दृश्य जगद्रूपी पण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंच ज्ञानेंद्रिये व सहावे मन हे सहा पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवतो. ॥१८-१३०१॥
असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु ।
पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥ १३०२ ॥
हे (सूर्याचे) रूपक राहू दे. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी ‘मी अमूक आहे’ अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार (समष्टि अहंकार) तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रगट आहे. ॥१८-१३०२॥
स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र ।
बाहेरी नटी छायाचित्र । चौयाशीं लक्ष ॥ १३०३ ॥
तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला चौर्याऐंशी लक्ष (योनीरूपी) छायाचित्रे नाचवतो. ॥१८-१३०३॥
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां ।
देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥ १३०४ ॥
ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणिमात्रांना त्यांची योग्यता पाहून देहाकार (शरीराकार) दाखवतो. ॥१८-१३०४॥
तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे ।
तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥
तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुरूप त्याच्यापुढे मांडला जातो, त्या देहाकारावर तो प्राणी ‘देहच मी आहे’ अशा अभिमानाने स्वार होतो. ॥१८-१३०५॥
सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें ।
कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं ॥ १३०६ ॥
सुताची गुंडी जशी सुताने अडकलेली असते, अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते, अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जसे आपणच आहोत असे समजते. ॥१८-१३०६॥
तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें ।
देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥
त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीने प्रगट होतो. ॥१८-१३०७॥
ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं ।
वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥ १३०८ ॥
ऐक, याप्रमाणे शरीराकाररूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवतो. ॥१८-१३०८॥
तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र ।
तें तिये गती पात्र । होंचि लागे ॥ १३०९ ॥
तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्धकर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते, तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो. ॥१८-१३०९॥
किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा ।
-माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा ॥ १३१० ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवतो, त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्गसंसारामधे फिरवतो. ॥१८-१३१०॥
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ १३११ ॥
लोहचुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागते, त्याप्रमाणे ईश्वरसत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात. ॥१८-१३११॥
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया ।
चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥
अर्जुना, जसे एका चंद्राच्या सांनिध्याने समुद्रादिक आपापली हालचाल करतात ॥१८-१३१२॥
तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे ।
कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥ १३१३ ॥
त्या समुद्राला भरती येते, चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो, चंद्रविकासी कमलांचा व चकोर पक्षांचा संकोच नाहीसा होतो ॥१८-१३१३॥
तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें ।
चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥
त्याप्रमाणे कारणरूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टावले जातात व तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. ॥१८-१३१४॥
अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता ।
उठतसे तें तत्त्वता । तयाचें रूप ॥ १३१५ ॥
अर्जुना, (देहसंबंधीय) अर्जुनपण न घेता तुझ्या हृदयात ‘मी’ असे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे. ॥१८-१३१५॥
यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें ।
आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जर्ही ॥ १३१६ ॥
याकरता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे खरे आहे आणि तू जरी लढणार नाहीस, तरी ती (प्रकृति) तुला लढायला लावील. ॥१८-१३१६॥
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी ।
तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥
म्हणून तो ईश्वर हा मालक आहे. तो ह्या प्रकृतीवर हुकमत चालवतो व ती प्रकृति प्राण्यांच्या इंद्रियांकडून ज्यांची त्यांची कामे अनायासे करून घेते. ॥१८-१३१७॥
तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं ।
प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया ॥ १३१८ ॥
करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेऊन ती प्रकृतीदेखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे. ॥१८-१३१८॥
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ ६२ ॥
त्यालाच हे भरतकुलोत्पन्ना, सर्व भावाने (मनाने, वाणीने व शरीराने) शरण जा. त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांती व शाश्वत स्थान (निजात्मपद) पावशील. ॥१८-६२॥
तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग ।
महोदधी कां गांग । रिगालें जैसें ॥ १३१९ ॥
गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते, त्याप्रमाणे अहंकार, वाचा, चित्त व शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जा. ॥१८-१३१९॥
मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे ।
कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥
मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जिच्यामधे होतो, अशा स्वरूपशांतिरूपी तरुण स्त्रीचा पति होऊन, तू आत्मानंदाने स्वरूपातच रममाण होशील. ॥१८-१३२०॥
संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे ।
अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥ १३२१ ॥
उत्पत्ति ज्याच्याकडून उत्पन्न होते, विश्रांति जेथे विसावा घेते, अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो, ॥१८-१३२१॥
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो ।
म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा ॥ १३२२ ॥
अर्जुना त्या आपल्या आत्मस्थितीचा तू अक्षय राजा होऊन रहाशील असे लक्ष्मीपती (श्रीकृष्ण) म्हणाले. ॥१८-१३२२॥
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३ ॥
गूढहून गूढ, असे हे ज्ञान मी तुला सांगितले. याचा पूर्णपणे विचार करून (मग) तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाने कर. ॥१८-६३॥
हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित ।
आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥ १३२३ ॥
हे ‘गीता’ नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयाचे सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरूपी धन स्वाधीन होते (अनुभवाला येते) ॥१८-१३२३॥
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी ।
वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं ॥ १३२४ ॥
वेदांताने ‘ज्ञान’ या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली ॥१८-१३२४॥
बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें ।
मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया ॥ १३२५ ॥
बुद्ध्यादिक डोळस (ज्ञानवान) पदार्थ हे ज्या (गीताशास्त्राच्या ज्ञानाकडून प्रकाशले गेले आहेत) व मी सर्व द्रष्टा देखील ज्या गीताशास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो. ॥१८-१३२५॥
तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन ।
परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं ? ॥ १३२६ ॥
अरे ते हे (गीतारूपी) आत्मज्ञान जो मी गूढ, त्या गूढाचाही गुप्त ठेवा आहे. परंतु तू (अर्जुन माझा सखा) म्हणून प्रतारणा कशी करू ? ॥१८-१३२६॥
याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा ।
तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥
म्हणून अर्जुना, आम्ही आपला हा गुप्त ठेवा करुणेने व्याप्त झाल्यामुळे तुला दिला आहे. ॥१८-१३२७॥
जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें ।
प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो ॥ १३२८ ॥
परंतु प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून ( माझा बाबा, माझी आई असे अयथार्थ) बोलते. आमचेही तुझ्यावर तसे अलोट प्रेम आहे. परंतु आम्ही तसे करीत नाही. (अयथार्थ बोलत नाही). ॥१८-१३२८॥
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे ।
कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे ॥ १३२९ ॥
येथे आकाश अतिसूक्ष्म असताही ते जसे गाळून घ्यावे, अमृताची देखील साल जशी काढावी अथवा शपथेकडून जशी शपथ करवावी ॥१८-१३२९॥
जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे ।
तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें ॥ १३३० ॥
ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळातील परमाणु दिसतो, त्या सूर्याला देखील अंजन घालावे ॥१८-१३३०॥
तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां ।
निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज ॥ १३३१ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी, त्या सर्वज्ञाने देखील सर्व गोष्टींचा विचार करून जे चांगले आहे ते तुला सांगितले. ॥१८-१३३१॥
आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं ।
निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥ १३३२ ॥
आता यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले, याचाच चांगल्या रीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला वाटेल तसे कर. ॥१८-१३३२॥
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला ।
तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥ १३३३ ॥
या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. (तेव्हा त्याच्या उगीच राहाण्यात देवांना असे वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे. हे मनाता येऊन) देव अर्जुनाला म्हणतात. तू खरोखर चांगला आपण आपल्याला न फसवणारा आहेस. ॥१८-१३३३॥
वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला ।
तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥
वाढणारापुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडेने ‘मी तृप्त झालो’ असे म्हणाला, तर त्याला स्वत:लाच भुकेची पीडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही लागतो. ॥१८-१३३४॥
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु ।
न पुसिजे जैं आभारु । धरूनियां ॥ १३३५ ॥
त्याप्रमाणे सर्वज्ञ श्रीगुरु भेटला असता, भीड धरून जेव्हा त्याला आत्मचिचार विचारला जात नाही. ॥१८-१३३५॥
तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें ।
आपणयाचि साचें । चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥
तेव्हा तो (न विचारणारा) आपल्यालाच फसवतो व फसवल्याचे पातकही त्यालाच लागते आणि त्याने आपल्यालाच सत्यस्वरूपाला मुकवले. ॥१८-१३३६॥
पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया ।
जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥
पण अर्जुना, तुझ्या निवांत रहाण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते की पुन: एकवेळ ज्ञान सांरांशरूपाने (थोडक्यात) सांगावे. ॥१८-१३३७॥
तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा ।
हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥
यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण माझे मन चांगले जाणत अहात, आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्ह्णावे तर तुमच्याशिवाय दुसरा कोणी ज्ञाता आहे काय ? ॥१८-१३३८॥
येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें ।
मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥
तुझ्या शिवाय इतर जे हे सर्व आहे, ते ज्ञेय आहे, त्यास जाणणारा स्वभावत: तूच एक आहेस. मग सूर्य म्हणून सूर्याचेच काय वर्णन करावे ? ॥१८-१३३९॥
या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें ।
हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥
या अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे वर्णन कशाला ? आम्ही सांगितलेले तू समजतोस, हेच काय आमचे थोडे वर्णन आहे ? ॥१८-१३४०॥
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४ ॥
सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन: ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस, म्हणून तुला मी हित सांगतो. ॥१८-६४॥
तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ ।
वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥ १३४१ ॥
तर आपले लक्ष विस्तृत करून माझा उपदेश आणखी एक वेळ ऐक. ॥१८-१३४१॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे ।
तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असे हे नाही. परंतु तुझे भाग्यच चांगले आहे. ॥१८-१३४२॥
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया ।
कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
अर्जुना, (दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही, पण) कासवीच्या पिलाकरता (कासवीच्या) दृष्टीला पान्हा फुटतो व (आकशाच्या पोकळीत काही साठवले जात नाही, पण) चातकाच्या घरचे (चातकाला लागणारे) पाणी आकाश वहाते (धारण करते). ॥१८-१३४३॥
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे ।
काय दैवें न सांपडे । सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
जो व्यवहार जेथे घडत नाही, तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते. दैव अनुकूल जर असेल तर काय मिळणार नाही ? ॥१८-१३४४॥
येर्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं ।
भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥ १३४५ ॥
ऐक, याविषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची येरझार नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगावयाची (ती ही होय). ॥१८-१३४५॥
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा ।
तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आणि प्रियत्तमा अर्जुना, जे निर्निमित्त प्रेमाचा विषय असते, ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय, असेच समजावे. ॥१८-१३४६॥
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया ।
तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥ १३४७ ॥
अर्जुना, आरशात पाहण्याकरता, जे आरशाला चांगले (धुणे, पुसणे इत्यादिक) करावयाचे ते त्या आरशाकरता नाही, तर ते जसे आपल्या (पाहणार्या) करिता असते, ॥१८-१३४७॥
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें ।
माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, तुझ्या निमित्ताने मी आपल्याकरताच बोलतो. माझ्या व तुझ्या ठिकाणी मी-तूपणा असा भेद आहे काय ? ॥१८-१३४८॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज ।
हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥ १३४९ ॥
म्हणून माझ्या जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तू जो माझा जीव, त्या तुला सांगत आहे. हे अनन्यभक्तीचे वेड मला लागले आहे. ॥१८-१३४९॥
पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता ।
कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥ १३५० ॥
अर्जुना, आपल्या स्वत:ला पाण्याला देतांना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते व (मीठ) आपण सर्व त्या पाण्याचे होतांना (जलरूप होतांना) ते लाजतच नाही. ॥१८-१३५०॥
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं ।
तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाहीस तर आता मी तुजपासून गुप्त ठेवीन काय ? (माझे ज्ञान किती जरी गुप्त असले तरी तुला चोरून कसे ठेवीन ?) ॥१८-१३५१॥
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें ।
तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥ १३५२ ॥
म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत, तो माझा गूढ व शुद्ध उपदेश ऐक. ॥१८-१३५२॥
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५ ॥
माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, मला नमस्कार कर, (म्हणजे) माझ्याप्रतच येशील, तू मला प्रिय असल्यामुळे जे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे. ॥१८-६५॥
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा ।
मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥ १३५३ ॥
तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर (इंद्रियांकडून) आणि आतून (मनादिकांकडून) होणार्या कर्मांना, मी जो व्यापक त्या मला विषय कर. ॥१८-१३५३॥
आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा ।
तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस ॥ १३५४ ॥
ज्याप्रमाणे वायु सर्वांगांनी आकाशाशी मिळून असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मांमधे तू माझ्याशी मिळून रहा. ॥१८-१३५४ ॥
किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन ।
माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
फार काय सांगावे ? तू आपले मन माझ्या एकट्याचेच रहाण्याचे ठिकाण कर. व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. ॥१८-१३५५॥
आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं ।
तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने (कामुकाची) दृष्टि पडते, तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. ॥१८-१३५६॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें ।
तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
मी सर्व जगाच्या रहाण्याचे ठिकाण आहे, त्या माझी जी चांगली नावे आहेत, ती अंत:करणी उतरण्याकरता वाचेच्या वाटेला लाव. ॥१८-१३५७॥
हातांचें करणें । कां पायांचें चालणें ।
तें होय मजकारणें । तैसें करीं ॥ १३५८ ॥
हाताने करावयाची कामे अथवा पायाचे चालणे ते माझ्याकरता होईल तसे कर. ॥१८-१३५८॥
आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा ।
तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
अर्जुना, आपल्या ठिकाणी अथवा दुसर्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो ॥१८-१३५९॥
हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं ।
उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
हे एक एक (वेगवेगळॆ) काय शिकवू ? तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊन इतर सर्व जग मद्रूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज. ॥१८-१३६०॥
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु ।
ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहीन. असे केले म्हणजे माझा परम आश्रय (अति जवळाचे सांनिध्य) तुला प्राप्त होईल. ॥१८-१३६१॥
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु ।
होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसर्याची गोष्ट जाऊन आम्हा तुम्हांला एकांत होऊन राहील. ॥१८-१३६२॥
तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें ।
भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख ॥ १३६३ ॥
त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल, असे आयते सुख वाढेल. ॥१८-१३६३॥
आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें ।
तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
आणि अर्जुना, प्रतिबंध करणारे तिसरे (जगत्कल्पना) जेव्हा नाहीसे होईल, तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील. ॥१८-१३६४॥
जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा ।
येतां गाभागोभा । कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येतांना काही प्रतिबंध आहे काय ? ॥१८-१३६५॥
पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा ।
मिळतां आडवारा । कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
अरे वारा आकाशाला मिळत असतांना अथवा लाट समुद्राला मिळातांना त्यास कोणता प्रतिबंध आहे ? ॥१८-१३६६॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं ।
मग ययाच्या विरामीं । मीचि होसी ॥ १३६७ ॥
म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देह-उपाधिमुळे दिसत आहे. मग देहाचा निरास झाल्यावर तू मद्रूपच होशील. ॥१८-१३६७॥
यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं ।
येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥ १३६८ ॥
या माझ्या सांगण्यामधे मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल, अशी कदाचित शंका घेशील, तर तशी शंका घेऊ नकोस हो. या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझी शपथ. ॥१८-१३६८॥
पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें ।
प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी ॥ १३६९ ॥
तुझी शपथ वहाणे म्हणजे आम्ही आपली शपथ वहाण्यासारखे आहे. (मी स्वभावत:च सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहाणे ही लज्जेची गोष्ट आहे). परंतु प्रेमाची जातच अशी आहे की ती लज्जेची आठवण होऊ देत नाही. ॥१८-१३६९॥
येर्हवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु ।
आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें ॥ १३७० ॥
सहजच विचार करून पाहिले तर वेदांनी निष्प्रपंच (भेदशून्य) असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खरा वाटतो व ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो ॥१८-१३७०॥
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु ।
मा आणेचा आक्षेपु । कां करावा ? ॥ १३७१ ॥
तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे. असे जर आहे तर मग शपथेचा आग्रह मी का करावा ? ॥१८-१३७१॥
परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें ।
सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
परंतु अर्जुना, तुझ्या वेधाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत. तुझ्या वेधाने मी हा अर्धा (जवळ जवळ जीव) झालो आहे. व तू माझ्या वेधाने पीर्णपणे (ईश्वर) झाला आहेस. ॥१८-१३७२॥
पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया ।
आण वाहे धनंजया । तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
अर्जुना, आपल्या कामाकरता राजा आपली शपथ आपण वहातो, त्याप्रमाणे हे आहे. ॥१८-१३७३॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें ।
जे आमचें काज नांवें । तुझेनि एके ॥ १३७४ ॥
यावर अर्जुन म्हणाला, देवाने हे अचाट बोलू नये. महाराज, तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते. ॥१८-१३७४॥
यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी ।
या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
असे असून तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असतांना शपथही घेतोस, महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे काय ? ॥१८-१३७५॥
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु ।
तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥ १३७६ ॥
सूर्याचे (केवळ) एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे. असे असता देखील कमलाचे निमित्त करून तो (सूर्य) आपला सर्व प्रकाश (जगाला) नित्य देत असतो. ॥१८-१३७६॥
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर ।
वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं ॥ १३७७ ॥
मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील, एवढी मोठी पर्ज्यन्यवृष्टि करतो, त्या मेघाच्या वृष्टि करण्याच्या कामात चातक हा निमित्तमात्र असतो. ॥१८-१३७७॥
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया ।
प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥ १३७८ ॥
म्हणून तुझ्या औदार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय ? हे राजा, कृपानिधे, तुझ्या या (ज्ञान -) दानात (जगाला) प्राप्ति (लाभ) होणारी आहे. ॥१८-१३७८॥
तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे ।
पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें ॥ १३७९ ॥
तेव्हा देव म्हणाले, थांब, आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही, पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील. ॥१८-१३७९॥
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया ।
तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी ? ॥ १३८० ॥
अर्जुना, ज्या क्षणात मिठाचा खडा समुद्रात पडतो, त्या क्षणीच तो विरावयास लागतो. त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय ? ॥१८-१३८०॥
तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता ।
निःशेष जाऊनि तत्त्वता । मीचि होसी ॥ १३८१ ॥
त्याप्रमाणे सर्व पदर्थमात्राचे ठिकाणी मला भजले असता व सर्व मद्रूप व्हावयास लागले आसता देहाहंकार नि:शेष होऊन तू खरोखर मीच होशील. ॥१८-१३८१॥
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं ।
दाविली तुज उजरी । उपायांची ॥ १३८२ ॥
याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूपप्राप्तिपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. ऐक. ॥१८-१३८२॥
जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां ।
सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
कारण की अर्जुना, अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल ॥१८-१३८३॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी ।
तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
माझा यो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चयेकरून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल. ॥१८-१३८४॥
मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं ।
किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना ॥ १३८५ ॥
अर्जुना, मग त्या ठिकाणी साध्य व साधन ही नाहीशी होतात. फार काय सांगावे ? तुला काही उरणारच नाही. (तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावयाचे रहाणार नाही). ॥१८-१३८५॥
तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं ।
तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥ १३८६ ॥
तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे. ॥१८-१३८६॥
म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें ।
न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज ॥ १३८७ ॥
म्हणून (जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे तरी) या प्रसन्नतेच्या बलाने हा लढाईचा प्रतिबंध, तुला सांगण्याच्या आड येतच नाही, असा मी एकवार तुझ्यावर भुलून गेलो नाही काय ? ॥१८-१३८७॥
जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये ।
तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें ॥ १३८८ ॥
(तर आता) ज्या योगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो. ते आपले गीतारूपी ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी ॥१८-१३८८॥
मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें ।
येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥
मी तुला नाना प्रकारांनी सांगितले. या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्माचे मूळ कारण जे अज्ञान, ते सर्व टाकून दे. ॥१८-१३८९॥
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥
सर्व धर्माचा (धर्माधर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान, त्याचा) त्याग करून मला एकट्यालाच (अद्वैतभावाने) शरण ये. मी तुला सर्व पापांपासूनमुक्त करीन. तू शोक करू नकोस. ॥१८-६६॥
आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें ।
हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व ॥ १३९० ॥
आशा जशी दु:खाला प्रसवते, निंदा जशी पापाला प्रसवते, हे राहू दे, ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते ॥१८-१३९०॥
तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक ।
तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥
त्याप्रमाणे स्वर्ग व नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म, त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवते. ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक. ॥१८-१३९१॥
हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु ।
कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥
हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे (त्या दोरीवर भासणारी) सर्पाची कल्पना टाकून द्यावी, अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा, ॥१८-१३९२॥
नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें ।
व्याधित्यागें कडुवाळें- । पण मुखाचें ॥ १३९३ ॥
किंवा काविळीने टाकल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा (भासणारा) पिवळेपणा नाहीसा होतो अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा जातो ॥१८-१३९३॥
अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी ।
कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥
अरे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे होते अथवा लाकडाच्या त्यागाने जसा अग्नि टाकला जातो, ॥१८-१३९४॥
तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ ।
तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥ १३९५ ॥
त्याप्रमाणे मिथ्या धर्माधर्माला दाखवणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून धर्ममात्राचा त्याग कर. ॥१८-१३९५॥
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया ।
सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें ॥ १३९६ ॥
मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मी एकटाच राहातो. ॥१८-१३९६॥
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।
सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥ १३९७ ॥
त्याप्रमाणे मग मी एकट्यावाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही, (असे जे माझे स्वरूप) त्याच्या ठिकाणी ‘तोच मी आहे’ अशा ज्ञानाने अनन्य हो. ॥१८-१३९७॥
पैं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण ।
तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥ १३९८ ॥
अर्जुना, आपल्याला माझाहून भिन्न न मानता जे माझे एकपण जाणावयाचे, त्याचेच नाव मला शरण येणे होय. ॥१८-१३९८॥
जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे ।
मज शरण येणें तैसें । ऐक्य करी ॥ १३९९ ॥
म्हणून (ज्याप्रमाणे) घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाशात ऐक्याने प्रवेश करते, त्याप्रमाणे ऐक्याने मला शरण ये.(म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव, असा मला शराण ये). ॥१८-१३९९॥
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ १४०० ॥
अर्जुना, सोन्याचा मणि जसा सोन्याला शरण येतो (ऐक्याला पावतो, अथवा लाट जशी पाण्याला शरण येते (ऐक्याला पावते) , त्याप्रमाणे तू मला (अभिन्नत्वाने) शरण ये. ॥१८-१४००॥
वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी ।
जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥
याशिवाय (ऐक्याने शरण न येता) अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण आला खरा, पण तो समुद्रास (समुद्रापासून भिन्न राहून त्यास) जाळीत नाही काय ? तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्य़ाच्या त्या गोष्टी टाकून दे. ॥१८-१४०१॥
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे ।
धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥
मलाही शरण यावयाचे आणि जीवपणानेच असावयाचे, धिक्कार असो या बोलण्याला ! या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही ? ॥१८-१४०२॥
अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया ।
तें दासिरूंहि कीं तया । समान होय ॥ १४०३ ॥
अरे अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो ती बटीक देखील असली तरी त्या राजाच्या बरोबरीची होते. ॥१८-१४०३॥
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे ।
हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं ॥ १४०४ ॥
मग मी जो विश्वाचा स्वामी, तो भेटतो आणि जीवाची ग्रंथी (जीवदशेचे बंधन) मात्र सुटत नाही, असल्या ओंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. ॥१८-१४०४॥
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें ।
तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥
मद्रूप होऊन माझी सेवा करणे ही सहजभक्ति आहे. ती माझी सहजभक्ति या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर. ॥१८-१४०५॥
मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें ।
परी न घेपेचि कांहीं केलें । तेणें जेवीं ॥ १४०६ ॥
मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले, परंतु ते लोणी जसे ताकात काही एक केल्याने मिसळत नाही. ॥१८-१४०६॥
तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज ।
धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥ १४०७ ॥
लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो, पणा तेच लोखंड परीसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही ॥१८-१४०७॥
लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं ।
सोनें जालया पुढती । न शिविजे मळें ॥ १४०८ ॥
हे राहू दे, काष्ठापासून मंथन करून अग्नि उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनीही कोंडून रहात नाही ॥१८-१४०८॥
हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही ।
मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा ॥ १४०९ ॥
त्याप्रमाणे अद्वैतभावाने मला शरण आल्यास तुला धर्माधर्म जे सहजच बाधक होणार नाहीत. (कारण तुझी सर्व कर्मे मद्रूप होतील). ॥१८-१४०९॥
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु ।
कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥ १४१० ॥
अर्जुना सूर्याला अंधाराची खबर असते काय ? अथवा जागृत अवस्थेत स्वप्नभ्रम दिसेल काय ? ॥१८-१४१०॥
तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां ।
आन कांहीं उरावया । कारण असे ? ॥ १४११ ॥
त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्वरूप त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे काय ? ॥१८-१४११॥
म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं ।
तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥ १४१२ ॥
म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माधर्माविषयी काही काळजी करू नकोस. तुझे पुण्य व पाप मीच होईन. पहा. ॥१८-१४१२॥
तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें ।
तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल ॥ १४१३ ॥
हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते. मला अनन्यभावाने शरण येणारा जो तू त्या तुला मी त्याप्रमाणे होईन. (म्हणजे तुझे सर्वच मी होईन). ॥१८-१४१३॥
जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा ।
तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥ १४१४ ॥
तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणे, हे जे सर्व बंधरूपी पाप आहे ते (द्वैतभावरूपी) पाप माझ्या बोधात नाहीसे होईल. ॥१८-१४१४॥
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया ।
घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥
अर्जुना, एवढ्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने समजून घे म्हणजे मी तुला युक्त करीन. ॥१८-१४१५॥
याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं ।
मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥ १४१६ ॥
या कारणास्तव येथून पुढेही चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धि अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. ॥१८-१४१६॥
ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें ।
सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥
सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात रहाणारा आहे त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले ॥१८-१४१७॥
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
मग शामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. ॥१८-१४१८॥
न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें ।
बोंलणें मागौतें । वोसरलें ॥ १४१९ ॥
ज्या ठिकाणी प्राप्त न होता, वाचाही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली, ॥१८-१४१९॥
ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक ।
तें द्यावया मिष । खेवाचें केलें ॥ १४२० ॥
असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठिण, ते अर्जुनास देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले, (म्हणजे वाचेला व बुद्धीला अगम्य असे जे ब्रह्मस्वरूप त्याचा अनुभाव अर्जुनास आणून देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले). ॥१८-१४२०॥
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।
द्वैत न मोडितां केलें । आपणाऐसें अर्जुना ॥ १४२१ ॥
तेव्हा आलिंगनाचे वेळी देवांचे हृदय व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त, हे द्वैत न मोडता, देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. ॥१८-१४२१॥
दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही, त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे द्वैत (देवभक्तपणा) न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतला. ॥१८-१४२२॥
तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया ।
तेथ वाडु तर्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥ १४२३॥
तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरात (त्याजबरोबर देवासही सुखाचा पूर आला, तो इतका मोठा होता की) देव जरी सर्व शक्तिमान होते तरी बुडून राहिले. ॥१८-१४२३॥
सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये ।
वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥ १४२४ ॥
समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो, तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहाते व पाणी दुप्प्ट होते व शिवाय भरणीला आकाशात वर वाढते. ॥१८-१४२४॥
तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें ।
किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥
त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघास आवरत नव्हते, ते कोणी जाणावे ? फार काय सांगावे ? नारायणाने विश्व कोंदून भरले. ॥१८-१४२५॥
एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र ।
श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥ १४२६ ॥
याप्रमाणे वेदाचे सूत्ररूपाने असलेले मूळ व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र ठिकाण असे जे गीताशास्त्र, ते श्रीकृष्णाणे प्रगट केले. ॥१८-१४२६॥
येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा ।
हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥
येथे वेदाला मूळ गीता आहे हे कसे समजण्यात आले असे जर म्हणाल तर त्याचा कार्यकारण संबंध युक्तिपूर्वक सांगतो. ॥१८-१४२७॥
तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी ।
तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥
तर ज्याच्या निश्वासात वेदारशी उत्पन्न झाले, तो सत्यप्रतिज्ञ श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक (जाणून बुजून) आपल्या मुखाने बोलला ॥१८-१४२८॥
म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित ।
आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥ १४२९ ॥
म्हणून वेदाला मूलभूत गीता आहे, हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखीही एक युक्ति आहे. ॥१८-१४२९॥
जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे ।
तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥ १४३० ॥
जे स्वरूपाने नाश न पावता, ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन रहातो, ते बीज असे जगात म्हणतात. ॥१८-१४३०॥
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।
गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥ १४३१ ॥
तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामधे सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमधे सूक्ष्मरूपाने आहे. ॥१८-१४३१॥
म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज ।
गमे आणि सहज । दिसतही आहे ॥ १४३२ ॥
म्हणून वेदाचे मूळ श्रीगीता आहे, असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. ॥१८-१४३२॥
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग ।
भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥ १४३३ ॥
कारण की अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते, त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. ॥१८-१४३३॥
तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं ।
गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक ॥ १४३४ ॥
तीच कर्मादिक तीन कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमधे आहेत ती डोळ्यांना (स्पष्ट दिसतील) अशी दाखवतो. ऐक. ॥१८-१४३४॥
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो ।
द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥ १४३५ ॥
तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसर्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. ॥१८-१४३५॥
मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र ।
येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें ॥ १४३६ ॥
हे गीता शास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसर्या अध्यायात सांगितले आहे. ॥१८-१४३६॥
मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया ।
साधनारंभु तो तृतीया- । ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥
मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ति होण्याकरता साधनांचा आरंभ (कर्ममार्ग) तो तिसर्या अध्यायात सांगितला आहे. ॥१८-१४३७॥
जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें ।
विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें ॥ १४३८ ॥
कारण की देहाहंकाररूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे, परंतु, त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत. ॥१८-१४३८॥
ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें ।
निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥
अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे हा जो तिसर्या अध्यायात देवांनी निर्णाय केला, ते या गीतेत कर्मकांड जाणावे. ॥१८-१४३९॥
आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक ।
आचरतां मोंचक । केवीं होय पां ॥ १४४० ॥
आणि तेच नित्यादिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे (अज्ञानाचा नाश करणारे) कसे होईल ? ॥१८-१४४०॥
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया ।
देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली ॥ १४४१ ॥
अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षतेला आला असता (बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता) त्याच्या करता देवांनी ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितले आहे. ॥१८-१४४१॥
जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें ।
तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥
ते असे की शरीर, वाचा व मन ह्यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे जसे उत्पन्न होईल ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले. ॥१८-१४४२॥
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें ।
आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥
कर्मयोगाने ईश्वराचे ठिकाणी उपासना कशी करावी ह्या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. ॥१८-१४४३॥
तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा ।
तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥
चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा अकरावा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा (ईश्वराची उपासना करावी) हे जे सांगितले ॥१८-१४४४॥
तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड ।
शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥
या गीतेमधे त्या आठ अध्यायात स्पष्ट देवताकांड आहे, असे गीताशास्त्र सांगत आहे, हे पडदा दूर करून (मी) स्पष्ट सांगतो. ॥१८-१४४५॥
आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें ।
साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें ॥ १४४६ ॥
आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे (अदृढ) ज्ञान अनुभवाला येते, ॥१८-१४४६॥
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं ।
वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं ॥ १४४७ ॥
ते कोवळे ज्ञान ‘अद्वेष्ट’ वगैरे बाराव्या अध्यायाच्या भागाने दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून आम्ही बाराव्या अध्यायाची गणाना ज्ञानकांडात करतो. ॥१८-१४४७॥
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी ।
ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं ॥ १४४८ ॥
तो बारावा अध्याय पहिल्यांदा धरून आणि पंधराव्या अध्याय शेवटी करून या चार अध्यायात निरूपणाला, ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता, हा विषय आहे. ॥१८-१४४८॥
म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं ।
ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे ॥ १४४९ ॥
म्हणून ‘ऊर्ध्वमूल’ हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय (१५वा) शेवटी धरून या चार (१२ ते १५) अध्यायांनी या गीतेत ज्ञानकांड सांगितले आहे. ॥१८-१४४९॥
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी ।
गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥ १४५० ॥
याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजिरवाणी श्रुतीच आहे. व ह्या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. ॥१८-१४५०॥
हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक ।
बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥
हे राहू द्या, हे तीन भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे ॥१८-१४५१॥
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं ।
तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥
त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी नेहेमी वैर करणारा जो (दंभादि सहा) अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. ॥१८-१४५२॥
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा ।
हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥ १४५३ ॥
(आपल्या स्वरूपरूपी) मुक्कामावर पोहोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञानगुणांचा समुदायरूपी वैरीच जिंकावा, हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे, तोच या गीतेतील सतरावा अध्याय होय. ॥१८-१४५३॥
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी ।
आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें ॥ १४५४ ॥
याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट सतराव्या अध्यायापर्यंत, देवांनी आपला नि:श्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखवला. ॥१८-१४५४॥
तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका ।
तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥ १४५५ ॥
त्या पहिल्या अध्यायापासून तो सतराव्या अध्यायाअखेरपर्यंत सतरा अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे, तो हा अठारावा शेवटला अध्याय आहे. ॥१८-१४५५॥
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु ।
हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥ १४५६ ॥
याप्रमाणे श्रीभगवद्गीतारूपी काव्यग्रंथ हा सर्वज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. ॥१८-१४५६॥
वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।
जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥
वेद मूळचाच संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही. कारण की तो (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या) तीन वर्णांच्याच कानाला लागला. (म्हणजे वेद तीन वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. ॥१८-१४५७॥
येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।
अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥ १४५८ ॥
संसारदु:खात सापडलेल्या इतर स्त्रीशूद्रादिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्य़ास अधिकार नाही, असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. ॥१८-१४५८॥
तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें ।
वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥ १४५९ ॥
तर मग विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्याला योग्य होण्यासाठी वेद गीतारूपाने प्रकट झाला आहे. ॥१८-१४५९॥
ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं ।
जपमिषें वदनीं । वसोनियां ॥ १४६० ॥
(कारण की पुढे सांगितल्याप्रमाणे वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय ? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून व जपाच्या (पारायणाच्या) निमित्ताने मुखात वास्तव्य करून ॥१८-१४६०॥
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें ।
गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥
गीतेचा जो पाठ जाणणारा आहे, त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तकरूपाने बाळगणे ॥१८-१४६१॥
ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा ।
गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥
अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्षसुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. ॥१८-१४६२॥
परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया ।
रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥ १४६३ ॥
परंतु अंतरिक्षात विहार करण्यास पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसे आकाश आहे, ॥१८-१४६३॥
तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे ।
कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ १४६४ ॥
त्याप्रमाणे गीता सेवन करीत असतांना ती कोणाही सेवन करणाराविषयी उत्तम, अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते. ॥१८-१४६४॥
यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं ।
रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥ १४६५ ॥
याकरता मागील अपवादाला भिऊन वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे. ॥१८-१४६५॥
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता ।
श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥ १४६६ ॥
म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशलेली गीता आहे. ॥१८-१४६६॥
परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें ।
जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥ १४६७ ॥
परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गाईचे दुभते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. ॥१८-१४६७॥
चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे ।
तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं ॥ १४६८ ॥
चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावून येतो, तेव्हा जसे सर्व स्थावरजंगमात्मक जग शांत होते. ॥१८-१४६८॥
कां अनन्यगतिकमळा- । लागीं सूर्य ये वेळोवेळां ।
कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥
अथवा अनन्यगतीच्या कमळाकरता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की त्याच्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते. ॥१८-१४६९॥
तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें ।
संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥
त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपति श्रीकृष्णांनी गीता प्रगट करून जगाचे जन्ममरणाएवढे ओझे दूर केले. ॥१८-१४७०॥
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं ।
सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥
सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज प्रगट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय ? ॥१८-१४७१॥
बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र ।
जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा ॥ १४७२ ॥
जो अर्जुन, या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशात्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला, ते कुळ पवित्र व धन्य आहे. ॥१८-१४७२॥
हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें ।
पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥
हे राहू द्या. मग त्या सद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले. (अर्जुन देहबुद्धीवर आला). ॥१८-१४७३॥
पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा ।
तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥
नंतर देव अर्जुनास म्हणाले, अर्जुना, हे गीताशास्त्र तुझ्या अंत:करणाला पटले ना ? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपल्या कृपेने (हे शास्त्र) मला पटले. ॥१८-१४७४॥
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया ।
परी जोडिलें भोगावया । विपायें होय ॥ १४७५ ॥
तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याचे भाग्य असते, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. ॥१८-१४७५॥
पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें ।
सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥ १४७६ ॥
क्षीरसमुद्राएवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करतांना देवांना व दैत्यांना किती तरी सायास पडले ! ॥१८-१४७६॥
तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें ।
परी वरिचिली चुकलें । जतनेतें ॥ १४७७ ॥
त्या केलेल्या कष्टाला देखील फळ आले ! कारण की त्यांनी (देव व दानवांनी) अमृत देखील डोळ्यांनी पाहिले. परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करण्य़ास ते चुकले. ॥१८-१४७७॥
तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें ।
भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे ॥ १४७८ ॥
जेव्हा जे अमृत अमरत्व येण्याकरता वाढले ते (अमृत दैत्यांना) मरणाला कारण झाले. म्हणजे असे (उलट परिणामाला कारणीभूत) होते. ॥१८-१४७८॥
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला ।
तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥
नहूष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली, तेव्हा तो सर्पत्वाला पावला. हे तुला माहीत नाही काय ? ॥१८-१४७९॥
म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया ।
आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥ १४८० ॥
म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठशास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. ॥१८-१४८०॥
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि ।
शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥
तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर हो. ॥१८-१४८१॥
येर्हवीं अमृतमंथना- । सारिखें होईल अर्जुना ।
जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥
नाहीतर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृतमंथनासारखी स्थिती होईल. ॥१८-१४८२॥
गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥ १४८३ ॥
गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येईल की जेव्हा धार कढण्याची हातवटी कळेल. ॥१८-१४८३॥
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे ।
परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ॥ १४८४ ॥
त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. ॥१८-१४८४॥
म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे ।
तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं ॥ १४८५ ॥
म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. ॥१८-१४८५॥
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७ ॥
तपोहीन, गुरुदेवाविषयी भक्तीत ढिला, जो हे ऐकण्यानिंदा ची इच्छा करत नाही व जो माझी करतो, त्याला हे (ज्ञान) कधीही सांगू नये. ॥१८-६७॥
तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था ।
तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो ॥ १४८६ ॥
तर हे अर्जुना, हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे, ते तपोहीन मनुष्याला मुळीच सांगू नको हो. ॥१८-१४८६॥
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला ।
तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं ॥ १४८७ ॥
अथवा एखादा मनुष्य तपी असेल, परंतु जर गुरुभक्तीमधे तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे, तसा त्याचा त्याग कर. ॥१८-१४८७॥
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा ।
गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥
अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष प्रसाद घालीत नाहीत, त्याप्रमाणे जो गुरुभक्तिहीन असेल, तो मग कितीही मोठा तपी असेना त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. ॥१८-१४८८॥
कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं ।
परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥ १४८९ ॥
अथवा एखाद्याने शरीराने तपही केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भजतोही आहे, पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल ॥१८-१४८९॥
तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं ।
परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे ॥ १४९० ॥
तर तो मागल्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल, परंतु तो या गीताश्रवणाला योग्य नाही. ॥१८-१४९०॥
मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे ।
तंव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥ १४९१ ॥
मोती वाटेल तसे उत्तम असेल, परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सूत (सोन्याची तार) प्रवेश करील काय ? ॥१८-१४९१॥
सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे ।
परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ॥ १४९२ ॥
समुद्र गंभीर आहे, हे कोण नाही म्हणतो ? परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर व्यर्थ जातो. ॥१८-१४९२॥
धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें ।
तें आर्तीं कां न करावें । उदारपण ॥ १४९३ ॥
तृप्त झालेल्या मनुष्याला दिव्यान्न वाढून मग ते व्यर्थ घालावे (त्याऐवजी) ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये ? ॥१८-१४९३॥
म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे ।
तरी झणें वानिवसें । देसी हें तयां ॥ १४९४ ॥
म्हणून (इतर बाबतीत) वाटेल तसा योग्य असो, परंतु त्याच्या ठिकाणी जर गीताश्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस. हो. ॥१८-१४९४॥
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा ? ।
जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा ॥ १४९५ ॥
रूपविषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग ? म्हणूण जेथे जे योग्य असेल, ते तेथेच फळाला येते. ॥१८-१४९५॥
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती ।
परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते ॥ १४९६ ॥
म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पहावेच पण त्यांच्या ठिकाणी गीताशास्त्रश्रवणाविषयीची अनावड असेल तर त्यांचा त्याग करावाच. ॥१८-१४९६॥
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति ।
आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥ १४९७ ॥
अथवा तप व गुरुभक्ति असून गीताश्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामुग्री जरी तू पाहिलीस ॥१८-१४९७॥
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता ।
तया मातें सामान्यता । बोलेल जो ॥ १४९८ ॥
तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी, त्या मला जो य:कश्चित् म्हणून समजेल, ॥१८-१४९८॥
माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें ।
येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
माझ्या भक्तांना व मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत, त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस. ॥१८-१४९९॥
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी ।
दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥ १५०० ॥
(माझ्यावीषयी व माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्य बुद्धि नसेल तर) त्यांची असलेली इतर सर्व सामुग्री म्हणजे दिव्यावाचून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. ॥१८-१५००॥
अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें ।
परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥
शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे ॥१८-१५०१॥
सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर ।
परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे ॥ १५०२ ॥
सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे, परंतु त्याचे दार नागिणीने अडविलेले असावे ॥१८-१५०२॥
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट ।
असो मैत्री कपट- । गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥
सुंदर दिव्यान्न तयार केलेले आहे परंतु त्यामधे कालकूट विष मिसळलेले असावे, हे राहू दे. अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी ॥१८-१५०३॥
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा ।
जो माझयांची कां निंदा । माझीचि करी ॥ १५०४ ॥
हे प्रबुद्धा अर्जुना, जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो, त्याचे तप, गुरुभक्ति व धारणाशक्ति तशा आहेत असे समज. ॥१८-१५०४॥
याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया ।
तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥
अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. ॥१८-१५०५॥
काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा ।
गीता हे कवतिका- । लागींही नेदीं ॥ १५०६ ॥
फार काय सांगू ? निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला, तरी त्याला कौतुकानेही हे गीताशास्त्र देऊ नकोस. ॥१८-१५०६॥
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा ।
वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥
म्हणून अर्जुना, खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट घालून, त्यावर गुरुभक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले ॥१८-१५०७॥
आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा ।
वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥
आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर निंदा न करणेरूपी रत्नांचा कळास ठेवला गेला आहे. ॥१८-१५०८॥
य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८ ॥
हे परम गुह्य (ज्ञान) माझ्या ठिकाणी पराकाष्ठेची भक्ति करून (माझा लोभ धरून) जो माझ्या भक्तांना सांगेल, तो नि:संशय मजप्रतच येईल. ॥१८-६८॥
ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं ।
मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं ॥ १५०९ ॥
अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, त्याची प्राणप्रतिष्ठा कर. (अशा योग्य अधिकार्यास गीता सांग). मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. ॥१८-१५०९॥
कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं ।
प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला ॥ १५१० ॥
कारण की ओंकार हा ॐ या एका अक्षराच्या रूपाने अ उ म या त्रिमात्रकेच्या पोटात गर्भावस्थेत अडकला होता, ॥१८-१५१०॥
तो गीतेचिया बाहाळीं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् ।
कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥
तो वेदाचे बीज जो ॐकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला. अथवा गीता म्हणजे जणु काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली. ॥१८-१५११॥
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता ।
अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥ १५१२ ॥
आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही, त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे जो माझ्या भक्तांची व त्या ह्या गायत्रीमंत्राचे रहस्य सांगणार्या गीतेची ओळख करून देईल ॥१८-१५१२॥
तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं ।
तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥ १५१३ ॥
वरील आई व बालक ह्या दृष्टांताप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपातानंतर मद्रूपच होईल. ॥१८-१५१३॥
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९ ॥
मनुष्यांमधे त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. ॥१८-६९॥
आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें ।
असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये ॥ १५१४ ॥
आणि शरीररूपी अलंकार घालून तो (गीता सांगणारा) माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो, तेव्हाही जीवप्राणांने मला तोच आवडतो. ॥१८-१५१४॥
ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां- ।
माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज ॥ १५१५ ॥
ज्ञानी, कर्मठ व तापसी, ही जी माझी अंतरंग माणसे आहेत, त्यामधे तो (गीता सांगणारा) एकच मला जसा आवडतो ॥१८-१५१५॥
तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा ।
जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा ॥ १५१६ ॥
अर्जुना, जो भक्तजनांच्या समुदायामधे गीता सांगतो. तसा या सर्व पृथ्वीतलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. ॥१८-१५१६॥
मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें ।
जो मंडन होय सभे । संतांचिये ॥ १५१७ ॥
मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता, केवळ केवळ मी जो ईश्वर, त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असतांना संतांच्या सभेला भूषण होतो ॥१८-१५१७॥
नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु ।
आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥
झाडास फुटणार्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळू हळू वाहणार्या वार्याने हालणार्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत, आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात, त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत ॥१८-१५१८॥
कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें ।
वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥
कोकीळ पक्ष्याच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत जणु काय माझ्या भक्तरूपी बगिच्यात हा गीताव्याख्यातारूपी वसंतच प्रवेश करतो. ॥१८-१५१९॥
कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा ।
नाना नवघन मयूरां । वो देत पावे ॥ १५२० ॥
अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र उगवतो, अथवा नवा मेघ मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो ॥१८-१५२०॥
तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं ।
वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥
त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामधे जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीताश्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो (म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो) ॥१८-१५२१॥
मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें ।
नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां ॥ १५२२ ॥
अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामधे तो गीता सांगणारा जितका मला आवडतो, तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. ॥१८-१५२२॥
अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं ।
जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां ॥ १५२३ ॥
अर्जुना, जो सतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो, तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंत:करणात ठेवतो. ॥१८-१५२३॥
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७० ॥
या आपल्या (मोक्ष) धर्मासंबंधीच्या संवादाचे (गीतेचे) जो अध्ययन करील, त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने यजन केले असे मी समजतो. ॥१८-७०॥
पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी ।
मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें ॥ १५२४ ॥
माझ्या व तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले ॥१८-१५२४॥
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु ।
न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥
तो हा सकळार्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता, जो आवर्तन करतो, (नुसती गीता पाठ म्हणतो) ॥१८-१५२५॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती ।
तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥ १५२६ ॥
हे सुमति अर्जुना, त्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमधे मूळ अविद्येची आहुति देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. ॥१८-१५२६॥
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा ।
ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥
हे चतुरा अर्जुना, गीतेच्या अर्थांचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात, ते ठिकाण (ब्रह्मस्वरूप), त्याला (मागल्या ओवीत सांगितलेला गीतेचा केवळ पाठ करणाराला) गीतेच्या गाण्याने (पठनाने) व वर्णनाने प्राप्त होते. ॥१८-१५२७॥
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें ।
गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥ १५२८ ॥
याप्रमाणे गीतापाठ करणाराला गीतेचा अर्थ जाणण्यासारखेच फल मिळते. गीता ही आई आहे, म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही. ॥१८-१५२८॥
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१ ॥
श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सरहीन, असा मनुष्य हे श्रवण करील तर तो देखील (सर्व पापातून मुक्त होईल व (मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून) पुण्यकर्म करणारांचे (करणारांना प्राप्त होणारे) शुभ लोक (स्वर्गादि) पावेल. ॥१८-७१॥
आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा ।
गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो ॥ १५२९ ॥
आणि परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेऊन रहातो ॥१८-१५२९॥
तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं ।
होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप ॥ १५३० ॥
त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तात्काळ पळून जाते. ॥१८-१५३०॥
अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा ।
लंघिती का दिशा । वनौकें तियें ॥ १५३१ ॥
जसा अरण्यामधे अग्नि एकदम शिरला असता, त्या अरण्यात रहाणारे प्राणी वाट सापडेल तिकडे पळतात. ॥१८-१५३१॥
कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी ।
तिमिरें अंतराळीं । हारपती ॥ १५३२ ॥
अथवा उदयपर्वताच्या रांगांवर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो. ॥१८-१५३२॥
तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी ।
तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥ १५३३ ॥
त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होतो, तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते. ॥१८-१५३३॥
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट ।
याहीवरी अचाट । लाहे फळ ॥ १५३४ ॥
याप्रमाणे पुढील जन्मपरंपरा स्वच्छ, शुद्ध व पुण्यरूप होते. याहीपेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते. ॥१८-१५३४॥
जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें ।
रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥
कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंत:करणात शिरतील तितके अश्वमेध पूर्ण होतात. ॥१८-१५३५॥
म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती ।
तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥
म्हणून गीताश्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होतेच. ॥१८-१५३६॥
तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं ।
मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥
तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो. मग जेथेपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्गभोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो. ॥१८-१५३७॥
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया ।
फळे महानंदें मियां । बहु काय बोलों ॥ १५३८ ॥
अर्जुना, ऐकणाराला व वाचणाराला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद, त्या रूपाने फलद्रूप होते. (यावर) फार काय सांगू ? ॥१८-१५३८॥
याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो ।
केला तें तंव तुज पुसों । काज तुझें ॥ १५३९ ॥
एवढ्याकरता हे राहू दे. परंतु ज्या कारणाकरता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते तर तुझे काम तुला विचारू का ? ॥१८-१५३९॥
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥ ७२ ॥
हे पार्था, तू एकाग्र चित्ताने हे (सर्व) श्रवण केलेस ना ? हे धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला ना ? ॥१८-७२॥
तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा ।
तुज एकचित्तें फावा । गेला आहे ? ॥ १५४० ॥
तर अर्जुना, हा सर्व शास्त्रसिद्धांत तू एकाग्रचित्ताने श्रवण केल्यावर, तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही ? सांग बरे. ॥१८-१५४०॥
आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं ।
येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥
आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानाला हिशेब दिला, तसाच तो तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तात आणून दिला की नाही ? ॥१८-१५४१॥
अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी ।
किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें । ॥ १५४२ ॥
अथवा मध्येच त्याची सांडलवंड झाली ? किंवा ते अनादराने टाकून दिले ? ॥१८-१५४२॥
जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें ।
तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी ॥ १५४३ ॥
जसे आम्ही तुला सांगितले, तसेच जर तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग. ॥१८-१५४३॥
तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें ।
भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥
अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते, (कर्तव्यपराङ्मुख केले होते) तो मोह अजून आहे की नाही ? ॥१८-१५४४॥
हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं ।
कर्माकर्म कांहीं । देखतासी ? ॥ १५४५ ॥
हे फार काय विचारू ? सांग. अमूक एक कर्म मी करीन अथवा अमूक एक कर्म मी करणार नाही, हे केवळ आपल्या हाती (तुझ्या हाती) आहे, असे तुला अद्याप वाटते काय ? ॥१८-१५४५॥
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे ।
आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
अर्जुन हा आत्म्याच्या पूर्ण आनंदरूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला. ॥१८-१५४६॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु ।
मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
अर्जुन, पूर्णा ब्रह्म झाला, तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरता (देहस्मृतीची) मर्यादा श्रीकृष्ननाथ उल्लंघू देईनात. ॥१८-१५४७॥
येर्हवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें ? ।
परी केलें पुसणें । याचि लागीं ॥ १५४८ ॥
एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय ? परंतु वर सांगितलेल्या कारणाकरता देवांनी प्रश्न विचारला ॥१८-१५४८॥
एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण ।
आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥
याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुनपण (नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार) आणून, देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्णस्थिती स्वत: अर्जुनाला बोलायला लावली. ॥१८-१५४९॥
मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु ।
निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥
मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो ॥१८-१५५०॥
तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे ।
हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥
त्याप्रमाणे (प्रथम) ‘मी ब्रह्म आहे’ अशा समजुतीवर असतो, त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते, मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते. नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो. तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप विरून जाते. (म्हणजे कधी मी ब्रह्म अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहज स्थितीवर असा) ॥१८-१५५१॥
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे ।
मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥ १५५२ ॥
याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत तो देहाच्या हद्दीवर ‘मी अर्जुन’ या नावाने मोठ्या दु:खाने उभा राहिला. ॥१८-१५५२॥
मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी ।
पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां ॥ १५५३ ॥
मग थरथर कापणार्या तळहातांनी रोमांच उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून ॥१८-१५५३॥
प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया ।
सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां ॥ १५५४ ॥
प्राणक्षोभाने श्वासोच्छ्वास अव्यवस्थित होत होत) डोलणार्या अंगाला अंगाचाच आधार देऊन (आपणच आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून) चलनवलनाला (हालचालीला) विसरून स्तब्ध राहिला. ॥१८-१५५४॥
नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें ।
वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥ १५५५ ॥
दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रुरूप अमृताचे लोट वहात होते, त्यांना आवरून ॥१८-१५५५॥
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं ।
ते करूनियां पैठी । हृदयामाजीं ॥ १५५६ ॥
नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता, (कंठ दाटला होता) त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून ॥१८-१५५६॥
वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें ।
अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥
वाचा विस्कळित झाली होती, ती प्राणाने सांवरून, क्रमरहित श्वासोच्छ्वासजागच्या जागी व्यवस्थित करून ॥१८-१५५७॥
अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ ७३ ॥
अर्जुन म्हणाला, (माझा) मोह नष्ट झाला, (मला माझ्या खर्या स्वरूपाचे) स्मरण प्राप्त झाले. हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे मी संशयरहित झालो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल तसे मी करीन. ॥१८-७३॥
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो ।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
मग अर्जुन म्हणाला, ‘तुझ्या ठिकाणी मोह आहे का असे तुला वाटते का’ असे देवा तुम्ही मला काय विचारता ? (तर महाराज) तो मोह आपले ठिकाण (अज्ञान) घेऊन परिवारासह गेला. ॥१८-१५५८॥
पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें ।
पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥
सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्याला विचारावे, हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल काय ? ॥१८-१५५९॥
तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां ।
गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव ॥ १५६० ॥
त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत अहात, ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही ? (म्हणजे तुमचे केवळ दर्शनच, वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे) ॥१८-१५६०॥
वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी ।
जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये ॥ १५६१ ॥
शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही, ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस. ॥१८-१५६१॥
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई ।
कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥ १५६२ ॥
आता महाराज माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही, असे आपण काय विचारता ? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा. ॥१८-१५६२॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें ।
आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
‘मी अर्जुन आहे’ अशा देहतादात्म्याने अडकलो होतो, तो तुझ्याशी ऐक्य पावून मुक्त झालो. आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. ॥१८-१५६३॥
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें ।
मोहाचे तया कांदे । नेदीच उरों ॥ १५६४ ॥
तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ (अज्ञान) मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. ॥१८-१५६४॥
आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें ।
तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा ॥ १५६५ ॥
आता हे देवा, अमूक एक करावयाचे अथवा अमूक एक करावयाचे नाही, हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होत, त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नाही. ॥१८-१५६५॥
ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं ।
त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों ॥ १५६६ ॥
याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही तर निश्चयेकरून जेथे कर्माचा संबंध नाही ते (ब्रह्मस्वरूप) मी झालो. ॥१८-१५६६॥
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी ।
परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥
तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन, माझे कर्तव्य नि:शेष गेलेच, परंतु आता प्रभो, तुमच्या आज्ञेवाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही. ॥१८-१५६७॥
कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी ।
जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा ॥ १५६८ ॥
कारण की जे दृश्य (कृष्णस्वरूप) आहे, ते इतर दृश्याचा नाश करते, जे (कृष्णस्वरूप) दुसरे असून द्वैताचा नाश करते जे (कृष्णस्वरूप) एकच आहे, पण सर्व देशात सर्वकाळ वास्तव्य करते, ॥१८-१५६८॥
जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे ।
जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि ॥ १५६९ ॥
ज्याच्या संबंधाने संसारबंध नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते. ॥१८-१५६९॥
तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें ।
जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥ १५७० ॥
ज्याच्या प्रेमाकरता अद्वैतबोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते, अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस. ॥१८-१५७०॥
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम ।
मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥ १५७१ ॥
आपणच स्वत: ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजनच नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी, ॥१८-१५७१॥
गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली ।
तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची ॥ १५७२ ॥
गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली. (समुद्राने जसे तिला आपले पद दिले) ज्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला, ॥१८-१५७२॥
तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु ।
मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं ॥ १५७३ ॥
तो तू माझा निर्निमित्त (कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा) व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस. (व आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे, त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली), तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर ॥१८-१५७३॥
जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड ।
तें फेडोनि केलें गोड । सेवासुख ॥ १५७४ ॥
याचे कारण असे की) माया व तुमच्यामधे जो भेदाचा प्रतिबंध (पडदा) होता तो दूर करून तुम्ही सेवासुख गोड केलेत. ॥१८-१५७४॥
तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा ।
करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥
हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे. मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन. ॥१८-१५७५॥
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला ।
म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥ १५७६ ॥
अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले (व म्हणाले की सदा सफळ असणारा, विश्वाचे फळ व साध्य) जो मी त्या मला हा अर्जुन फळ झाला. ॥१८-१५७६॥
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु ।
मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥ १५७७ ॥
आपला मुलगा जो चंद्र त्याने उणेपणा टाकलेला आहे (तो पूर्ण झाला आहे) असे पाहून क्षीरसमुद्र आपली मर्यादा विसरतच नाही काय ? ॥१८-१५७७॥
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला ।
लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघामधे लग्न लागलेले (ते दोघे स्वरूपैक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला. ॥१८-१५७८॥
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे ।
जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ? ॥ १५७९ ॥
त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला महाराज, आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो ? ऐका, ॥१८-१५७९॥
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा ।
कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥ १५८० ॥
आज जगातील पदार्थ पहाण्याची जी चर्मदृष्टी, तीही ज्या तुम्हास नाही, त्या तुम्हाला अतींद्रिय पदार्थ दाखवणार्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले. ॥१८-१५८०॥
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं ।
तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥ १५८१ ॥
आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात, त्या घोड्यांसाठी (घोड्यांची परीक्षा करून ते घेण्यासाठी) तुम्ही ज्या आम्हाला ठेवले, त्या आम्हाला या गोष्टी (कृष्णार्जुनांचा संवाद) व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे. ॥१८-१५८१॥
वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण ।
दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें ॥ १५८२ ॥
शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभला आहे की या युद्धामधे उभायपक्षापैकी कोणीही पराभूत झाले तरी आपलाच पराभव होईल. (कारण दोन्ही सैन्ये एकाच कुळातील आहेत). ॥१८-१५८२॥
येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा ।
जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥ १५८३ ॥
व्यासाचा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारख्या एवढ्या संकटात पण निरावरण आनंद (आपल्याकडून) भोगवीत आहेत. ॥१८-१५८३॥
ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला ।
चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा ॥ १५८४ ॥
असे संजय बोलला. परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणांने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे (पाझार न फुटता) निर्विकारपणे स्वस्थच राहिला. ॥१८-१५८४॥
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा ।
परी सुखें जाला पिसा । बोलतसे ॥ १५८५ ॥
ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून, मग कृष्णार्जुनाच्या संवादासंबंधाने त्याने बोलण्याचे सोडून दिले होते, परंतु सुखाने वेडा झाला असल्याकारणाने तो तसाच बोलत राहिला. ॥१८-१५८५॥
भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे ।
येर्हवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें ॥ १५८६ ॥
आनंदाच्या वेगाने बेहोष झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता, एरवी हे धृतराष्ट्राजोगे नाही, हे तो निश्चयाने जाणत होता. ॥१८-१५८६॥
सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४ ॥
संजय म्हणाला, महात्मा अर्जुन व वासुदेव यांचा हा अद्भुत व रोमहर्षण (म्हणजे शरीरावर रोमांच उभे रहातील इतका हर्ष देणारा) संवाद मी ऐकला. ॥१८-७४॥
मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा ।
बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें ॥ १५८७ ॥
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, की याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा (अर्जुन) बोलला, ते श्रीकृष्णाला गोड वाटले. ॥१८-१५८७॥
अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार ।
येर आघवें तें नीर । एक जैसें ॥ १५८८ ॥
अहो महाराज, पूर्वसमुद्र व पश्चिमसमुद्र या नावाचाच काय तो वेगळेपणा आहे. बाकी सर्व पाणी जसे एकच आहे, ॥१८-१५८८॥
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे ।
मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु ॥ १५८९ ॥
त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे (असा भेद) त्यांच्या देहासंबंधानेच दिसते. मग महाराज, संवादाच्या ठिकाणी त्यांच्या काहीच भेद रहात नाही. ॥१८-१५८९॥
पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें ।
तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें ॥ १५९० ॥
आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर आले तर एकमेक जसे एकमेकात आपण आपल्याला पहातात, ॥१८-१५९०॥
तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु ।
पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं ॥ १५९१ ॥
त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पहात होता व श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पहात होता. ॥१८-१५९१॥
देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं ।
येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे ॥ १५९२ ॥
श्रीकृष्ण ज्या (ब्रह्म) स्वरूपात देव व भक्तांकरता अवकाश पहात होते, अर्जुनही त्याच (ब्रह्म) स्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पहात होता. ॥१८-१५९२॥
आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई ।
दोघे येकपणें पाहीं । नांदताती ॥ १५९३ ॥
आणखी (त्या दोघांशिवाय) काहीच नाही म्हणून काय करतील ? दोघे एकपणाने नांदत आहेत, पहा. ॥१८-१५९३॥
आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे ? ।
ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां ? ॥ १५९४ ॥
आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसे घडेल अथवा भेदच जर नाही तर संवादसुख कसे प्राप्त होईल ? ॥१८-१५९४॥
ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें ।
तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां ॥ १५९५ ॥
असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले (असे संजय म्हणाला). ॥१८-१५९५॥
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे ।
कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां ? ॥ १५९६ ॥
दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पहातो, म्हणून कल्पना करावी ? ॥१८-१५९६॥
कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु ।
कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥ १५९७ ॥
अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाचा कोणाला उपयोग आहे हे कोणी जाणावे ? ॥१८-१५९७॥
नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु ।
कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥ १५९८ ॥
अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण व प्रकाश्य कोण हे कोणी सांगावे ? ॥१८-१५९८॥
हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे ।
ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे ॥ १५९९ ॥
याचा पक्का निश्चय करावयास गेले तर, निश्चय कुंठित होतो. ते दोघे (कृष्णार्जुन) संवादाने इतके सारखे झाले. ॥१८-१५९९॥
जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके ।
कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥ १६०० ॥
(संजय म्हणतो) महाराज, पाण्याचे दोन ओघ मिळात असतांना, त्या दोन ओघांना मिळण्याचे थांबवण्याकरता जर मध्ये मीठ उभे राहिले, तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल. ॥१८-१६००॥
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं ।
धरितां मजही वानी । तेंचि होतसे ॥ १६०१ ॥
त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करत असता माझाही तोच प्रकार झाला आहे. ॥१८-१६०१॥
ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें ।
आठव नेला नेणों कें । संजयपणाचा ॥ १६०२ ॥
असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणाचा आठव (मी संजय अशी देहस्मृति) हरण करून कोठे नेला ते कळेना. ॥१८-१६०२॥
रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके ।
स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु ॥ १६०३ ॥
जसजसे अंगावर रोमांच उभे रहात होते, तसतसे शरीर संकोचित होत होते व एकटा कंप, स्तंभ व स्वेद यांना जिंकीत होता. ॥१८-१६०३॥
अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे ।
ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि ॥ १६०४ ॥
अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टि जलमय झाली (डोळे डबडबून पाण्याने भरले), ते अश्रू नव्हते तर जसे डोळ्यांना (प्रेम) पाझरच फुटले होते. ॥१८-१६०४॥
नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं ।
वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥ १६०५ ॥
पोटात काय मावत नव्हते कोणास माहीत ? गळ्यात काय अडकत होते हे माहीत नाही, पण हुंदक्यांमुळे वाचा उमटण्याचे बंद पडले होते ॥१८-१६०५॥
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा ।
संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥ १६०६ ॥
फार काय सांगावे ? अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवादसुखाचा चव्हाटा झाला. ॥१८-१६०६॥
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती ।
मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें ॥ १६०७ ॥
त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊनच शांती धरते (म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो). मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देहस्मृति मिळाली. ॥१८-१६०७॥
व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥ ७५ ॥
प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वत: सांगत असतांना व्यासांच्या कृपेने हे अत्यंत योगरूप गुह्य मी श्रवण केले. ॥१८-७५॥
तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें ।
नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां ॥ १६०८ ॥
तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहीत नाही, ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ॥१८-१६०८॥
ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी ।
मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली ॥ १६०९ ॥
ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मीतूपणासह अज्ञानदृष्टि नाहीशी झाली. ॥१८-१६०९॥
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग ।
तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें ॥ १६१० ॥
हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत, त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले आहे. ॥१८-१६१०॥
अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें ।
नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव ॥ १६११ ॥
अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे (अर्जुन) असे बनून आपल्याच करता जे देव बोलले ॥१८-१६११॥
तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र ।
काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१२ ॥
महाराज, येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले. गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू ? ॥१८-१६१२॥
राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६ ॥
हे राजा (धृतराष्ट्रा), या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मी पुन्हा पुन्हा हर्ष पावत आहे. ॥१८-७६॥
राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये ।
रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥ १६१३ ॥
(राजाशी) हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला व त्यायोगाने त्याची देहस्मृति गेली. ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते, ॥१८-१६१३॥
हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें ।
मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये ॥ १६१४ ॥
हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होतात व नंतर सूर्योदय झाला की त्यास पुन्हा पाझर फुटतात. ॥१८-१६१४॥
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं ।
धरी आणि पुढती । तेंचि होय ॥ १६१५ ॥
त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणी, पुन्हा त्याची तीच (देहविस्मृतीची) अवस्था होत होती. ॥१८-१६१५॥
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७ ॥
हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन हे राजा मला अतिशय आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे. ॥१८-७७॥
मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा ।
देखिलया उगा कां पां । असों लाहसी ? ॥ १६१६ ॥
मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा, श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिले असता तू उगा कसा राहू शकलास ? ॥१८-१६१६॥
न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे ।
विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां । ॥ १६१७ ॥
न पहाण्याने जे दिसते, नाहीपणाने जे आहे, विसरण्याने (विसरू म्हटले तरीही) जे आठवते, ते आता कसे चुकवू ? ॥१८-१६१७॥
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु ।
मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥ १६१८ ॥
श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो नुसता चमत्कार मानण्याससुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. ॥१८-१६१८॥
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान ।
करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ॥ १६१९ ॥
याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संवादरूपी संगमात स्नान करून, संजय अहंकाराला तिलांजली देत आहे. ॥१८-१६१९॥
तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे ।
श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां ॥ १६२० ॥
तेव्हा न सावरणार्या आनंदाने त्याला काही अलौकिकही गहिवर येऊन सद्गदित कंठाने ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’ असे वेळोवेळा म्हणत होता. ॥१८-१६२०॥
या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं ।
म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव ॥ १६२१ ॥
या अष्टसात्विक भावांचा प्रकार (अवस्था) धृताराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता. म्हणून (संजयाची अशी अवस्था का झाली) त्याची जी काही कल्पना धृरताष्ट्राने करावी. ॥१८-१६२१॥
तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु ।
बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥ १६२२ ॥
इतक्यात त्या संजायाने आपणास झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून, अष्टसात्विक भावांचा फुंज जिरवला. ॥१८-१६२२॥
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी ।
रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥ १६२३ ॥
तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवला आहे. ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस ? ॥१८-१६२३॥
तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें ।
अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई ? ॥ १६२४ ॥
त्या व्यासांनी तुला येथे कशाकरता बसवले ? प्रसंग नसतांना मध्येच असे काय बोलतोस ? ॥१८-१६२४॥
रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया ।
कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥ १६२५ ॥
रानात रहाणारा मनुष्य राजमंदिरात नेला असता त्याला दाही दिशा उदास वाटतात, अथवा उजाडले असतांना पिशाचांना रात्र होते. ॥१८-१६२५॥
जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें ।
म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ॥ १६२६ ॥
ज्याला जेथेचे महत्व माहीत नाही, ते त्याला विपरीतच वाटते. म्हणून (त्या महत्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास) तो अप्रसंग आहे असे म्हणणारच. (यात नवल काय ?) ॥१८-१६२६॥
मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित ।
तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं ? ॥ १६२७ ॥
(मग) धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे, ते शेवटी कोणाला जय देईल ? ॥१८-१६२७॥
येर्हवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक ।
जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥ १६२८ ॥
सहज विचार करून पाहिले तर विशेषे करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहेमी विशेष असतो. ॥१८-१६२८॥
आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें ।
म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें ? ॥ १६२९ ॥
आणि प्रतिपक्षी पांडवांच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्यही दीडपट आहे. म्हणून ते सैन्य निश्चयेकरून जय मिळवील ना ? ॥१८-१६२९॥
आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें ।
तें नेणों संजया असे । तैसें सांग पां ॥ १६३० ॥
आम्हाला तर असे वाटते. मग तुझे भविष्य कसे आहे, ते आम्हास कळात नाही. तर संजया तुझे भाविष्य जसे असेल तसे सांग. ॥१८-१६३०॥
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ ७८ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ असतील, तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि नीति ही अढळ आहेतच अशी माझी समजूत आहे. ॥१८-७८॥
यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें ।
परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा ॥ १६३१ ॥
या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, त्यांचे एकमेकांचे काय होईल, हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे, तेथे जगणे निश्चित आहे, ॥१८-१६३१॥
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका ।
संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥ १६३२ ॥
महाराज, चंद्र तेथे चांदणे असावयाचे, शिव तेथे शक्ति व संत तेथे सुविचार असावयाचाच. ॥१८-१६३२॥
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक ।
वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥ १६३३ ॥
राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध व अग्नि तेथे जाळण्याची शक्ति असावयाचीच ॥१८-१६३३॥
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु ।
सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥ १६३४ ॥
दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ति आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो, ॥१८-१६३४॥
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें ।
सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥ १६३५ ॥
जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी व नवी पालवी तेथे फुले, फुले तेथे भ्रमरांचे समुदाय असावयाचेच. ॥१८-१६३५॥
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन ।
दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥ १६३६ ॥
जेथे गुरु तेथे ज्ञान. जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन व जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते. ॥१८-१६३६॥
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु ।
हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥ १६३७ ॥
जेथे भाग्य तेथे सुखोपभोग, व जेथे सुखोपभोग तेथे प्रसन्नता, असो हे राहू दे, जेथे सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच ॥१८-१६३७॥
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ ।
तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥ १६३८ ॥
त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने सर्व पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम व मोक्ष) सनाथ झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे, तेथे लक्ष्मी असावयाचीच. ॥१८-१६३८॥
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं ।
अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ? ॥ १६३९ ॥
आणि ज्याच्या जवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, अणिमादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत काय ? ॥१८-१६३९॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें ।
तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥ १६४० ॥
कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे, तो ज्या पक्षाला राहिलेला आहे अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावयाचाच. ॥१८-१६४०॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु ।
श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥ १६४१ ॥
‘विजय’ नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्णनाथही विजयाची मूर्ति आहे. लक्ष्मीसुद्धा सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. ॥१८-१६४१॥
तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी ।
न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां ? ॥ १६४२ ॥
त्याला (अर्जुनाला) एवढे (श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे) मायबाप असता, त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने जिंकू नये का ? ॥१८-१६४२॥
ते पाषाणही आघवें । चिंतारत्नें कां नोहावे ? ।
तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ? ॥ १६४३ ॥
त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणि का होऊ नयेत ? आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये ? ॥१८-१६४३॥
तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया ।
नवल कायि राया । विचारीं पां ॥ १६४४ ॥
त्याच्या गावच्या नद्या अमृताने (भरून) का वाहू नयेत ? राजा, विचार कर. यात काही आश्चर्य आहे काय ? ॥१८-१६४४॥
तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद ।
सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते ? ॥ १६४५ ॥
त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंदरूप का होऊ नये ? ॥१८-१६४५॥
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं ।
तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥ १६४६ ॥
ज्याला श्रीकृष्ण बाप आहे व आई लक्ष्मी आहे, त्याच्या आधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. ॥१८-१६४६॥
म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा ।
तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें ॥ १६४७ ॥
म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे, तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत, याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. ॥१८-१६४७॥
आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु ।
तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये ॥ १६४८ ॥
आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असून उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे, त्याप्रमाणे संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणीच आहे. (देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे). ॥१८-१६४८॥
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू ।
परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें ॥ १६४९ ॥
लोखंडाला सोनेपणाची दीक्षा (रूप) देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोसणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. ॥१८-१६४९॥
येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे ।
वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥ १६५० ॥
या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो, असे कदाचित कोणी म्हणेल (पण तसे नाही, तर असे आहे की) अग्नि हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. ॥१८-१६५०॥
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती ।
परी माने इये स्तुती । गौरव असे ॥ १६५१ ॥
त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे. परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळप्रकारे आवडते, असे या स्तुतीचे गौरव आहे. ॥१८-१६५१॥
आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी ।
तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥ १६५२ ॥
आणि मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा ही बापाला आवड असते. ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. (आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती, ती सफळ झाली). ॥१८-१६५२॥
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा ।
तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥ १६५३ ॥
फार काय सांगावे ? धृतराष्ट्र राजा, अर्जुन हा कृष्णकृपेने असा (कृतकृत्य झाला. तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून जाणूनबुजून आहे, ॥१८-१६५३॥
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? ।
तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥ १६५४ ॥
हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय वाटत आहे ? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जय खोटाच ठरेल. ॥१८-१६५४॥
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु ।
तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥ १६५५ ॥
म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पंडूचा मुलगा (अर्जुन) हे तीन आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तेथेच आहे. ॥१८-१६५५॥
जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें ।
तरी या बोलाचें । ध्रुवचि माना ॥ १६५६ ॥
व्यासाच्या बोलण्यावर जर तुमचा खरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. ॥१८-१६५६॥
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु ।
तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥ १६५७ ॥
जेथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे (अनायासे) सुखाची व कल्याणाची प्राप्ती आहे. ॥१८-१६५७॥
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे ।
ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें ॥ १६५८ ॥
या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासाच्या शिष्य मी म्हणवणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला. ॥१८-१६५८॥
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका ।
संजयें कुरुनायका । दिधला हातीं ॥ १६५९ ॥
याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. ॥१८-१६५९॥
जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी ।
आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥ १६६० ॥
जसा अग्नि केवढा तरी मोठा आहे, हे काय सांगावे ? परंतु तो वातीच्या टोकावर ठेऊन सूर्याची गैरहजेरी भरून काढण्याकरता आणावा ॥१८-१६६०॥
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत ।
भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥ १६६१ ॥
त्याप्रमाणे अनंत वेद, सव्वालक्ष भारत झाले व भारताचे सार सातशे श्लोकात गीता झाली. ॥१८-१६६१॥
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा ।
व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥ १६६२ ॥
व्यासांचा शिष्य जो संजय, त्याचा जो पूर्णोत्गार, तो हा गीतेचा शेवटला श्लोक, या सातशे श्लोकांचेही तात्पर्य आहे. ॥१८-१६६२॥
येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें ।
अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय ॥ १६६३ ॥
या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेऊन राहील, त्याने संपूर्ण विद्यामात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. ॥१८-१६६३॥
ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत ।
पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें ॥ १६६४ ॥
याप्रमाणे या सातशे श्लोकांना गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे ? ॥१८-१६६४॥
कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे ।
मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥ १६६५ ॥
अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे सातशे श्लोकरूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला असे येतात. ॥१८-१६६५॥
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥ १६६६ ॥
अथवा गीता ही सप्तशातीच्या मंत्रांनी (सातशे श्लोकरूपी मंत्रांनी) प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे, व ती मोहरूप महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. ॥१८-१६६६॥
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥ १६६७ ॥
म्हणून जो मनाने, शरीराने अथवा वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल, त्याला ही गीता स्वानंदरूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करेल. ॥१८-१६६७॥
कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें ।
ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें ॥ १६६८ ॥
अथवा अविद्यारूपी अंधारावर चाल करून गीतेचा एकेक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो. असे सातशे श्लोक श्रीकृष्णराजाने प्रगट केले आहेत. ॥१८-१६६८॥
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता ।
संसारपथश्रांता । विसंवावया ॥ १६६९ ॥
अथवा संसाररूपी रस्त्यावर चालतांना श्रमलेल्यांना विश्रांति घेण्याकरता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे, ॥१८-१६६९॥
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं ।
श्रीकृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे ॥ १६७० ॥
अथवा भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमळरूपता आणली, अशा श्लोककमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर त्यामधे ही गीतारूप वेली भरास आली आहे. ॥१८-१६७०॥
कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान ।
वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥ १६७१ ॥
किंवा हे श्लोक नव्हेत. मला तर यासंबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणाजे जणु काय गीतेचा महिमा वर्णन करणारे भाटच आहेत. ॥१८-१६७१॥
कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा ।
सर्वागम गीतापुरा । वसों आले ॥ १६७२ ॥
अथवा सातशे श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात रहावयास आली आहेत. ॥१८-१६७२॥
कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया ।
श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥ १६७३ ॥
अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पति जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय ? ॥१८-१६७३॥
कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग ।
कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥ १६७४ ॥
अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत अथवा गीतारूपी समुद्रावरील हे श्लोक म्हणाजे लाटा आहेत. अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत. ॥१८-१६७४॥
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु ।
जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥ १६७५ ॥
अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला, म्हणून श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्रीगीतारूपी गंगेत आला. ॥१८-१६७५॥
कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी ।
कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची ॥ १६७६ ॥
अथवा ही श्लोकांची पंक्ति नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणि आहे. अथवा निर्विकल्प ब्रह्माला देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत. ॥१८-१६७६॥
ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका ।
आतां कोण वेगळिका । वानावां पां । ॥ १६७७ ॥
असे सातशे श्लोक आहेत परंतु एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे ? ॥१८-१६७७॥
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी ।
सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥ १६७८ ॥
दिव्याला आधीचा व मागचा भेद कसला ? सूर्याला धाकटा व वडील हा भेद कसला ? अमृताच्या समुद्राला खॊल व उथळ हा भेद कसला ? ॥१८-१६७८॥
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥ १६७९ ॥
ही तान्ही आहे अथवा पारठी (वयस्कर) आहे या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत, ॥१८-१६७९॥
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते ।
जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई ? ॥ १६८० ॥
त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले (उत्तम) व हे शेवटले (कमी योग्यतेचे) असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय ? ॥१८-१६८०॥
आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई ।
येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥ १६८१ ॥
आणि श्लोकांमधे कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखार काय समर्थन करू ? या गीतेत वाच्य व वाचक हीही निवड होत नाही. ॥१८-१६८१॥
जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु ।
हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥ १६८२ ॥
कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत, हे प्रसिद्ध आहे व वाटेल त्या मनुष्यालाही हे माहीत आहे. ॥१८-१६८२॥
येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें ।
वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र ॥ १६८३ ॥
गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते. जसे गीतेचे अर्थज्ञान व पठण हे फलदृष्ट्या सारखेच आहेत, तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. (म्हणजे या गीताशास्त्रात वाच्य व वाचक एक श्रीकृष्ण परमात्माच आहे असे दाखवले आहे). ॥१८-१६८३॥
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं ।
गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८४ ॥
म्हणून मला आता समर्थन करण्यास विषय राहिला नाही. गीता ही प्रभूची शब्दमय सुशोभित मूर्ति आहे असे समजा. ॥१८-१६८४॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे ।
तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥ १६८५ ॥
इतर शास्त्र, आपल्या विषयांचे अर्थज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही. तर हे सगळे परब्रह्म आहे. ॥१८-१६८५॥
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा ।
अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें ॥ १६८६ ॥
देवांनी विश्वाच्या करुणेने, ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रगट केला आहे. ॥१८-१६८६॥
चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें ।
निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं ॥ १६८७ ॥
ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले. ॥१८-१६८७॥
कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें ।
पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला ॥ १६८८ ॥
अथवा कळिकालरूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला ॥१८-१६८८॥
तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें ।
दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ १६८९ ॥
त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतेचे दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे. ॥१८-१६८९॥
येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल ।
नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी ॥ १६९० ॥
या गीतारूपी गंगेत जर तुम्ही जीवाने (अंत:करणाने) स्नान कराल (म्हणजे या गीतेच्या अर्थाचा जर तुम्ही मनाने चांगला विचार कराल) तर हेच (गीतारूपी ब्रह्मच) तुम्ही व्हाल. अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभच ओली कराल ॥१८-१६९०॥
तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें ।
येरीकडे अपैसें । सुवर्ण होय ॥ १६९१ ॥
तरी परिसाने लोखंडाच्या इतर सर्व भागाचे जसे आपोआप सोने होते ॥१८-१६९१॥
तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं ।
तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥ १६९२ ॥
त्याप्रमाने पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल. ॥१८-१६९२॥
ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें ।
तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख ॥ १६९३ ॥
अथवा गीतेकडे कंटाळ्याने तोंड वाकडे करून एका अंगाला पडून रहाल तरी कानाने गीता घेतली (ऐकली) असता तोच हिशोब होतो. (तीच फलप्राप्ती होते.) ॥१८-१६९३॥
जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें ।
जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे ॥ १६९४ ॥
कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला ‘नाही’ असे म्हणत नाही, त्याप्रमाणे गीताही आपल्या ऐकण्याने पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. ॥१८-१६९४॥
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा ।
काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं ॥ १६९५ ॥
म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एक गीतेचेच सेवन करावे. इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करावयाचे आहे ? ॥१८-१६९५॥
आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी ।
ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥ १६९६ ॥
आणि श्रीकृष्णार्जुन हे धागा न लागेल इतकी कठिण अशी जी मोकळी कथा बोलले ती व्यासांनी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली. ॥१८-१६९६॥
बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे ।
तैं तया ठाकती तैसे । घांस करी ॥ १६९७ ॥
जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेऊ घालावयास बसते, तेव्हा त्या मुलाला घेता येतील इतके असे जसे घास करते ॥१८-१६९७॥
कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा ।
केलें जैसें विंजणा । निर्मूनियां ॥ १६९८ ॥
अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वार्याला (वाटेल तेव्हा घेता यावा असा) आपल्या स्वाधीन केला ॥१८-१६९८॥
तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें ।
स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें ॥ १७९९ ॥
तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून स्त्रीशूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असे (श्रीव्यासांनी) केले. ॥१८-१६९९॥
स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें ।
तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें ? ॥ १७०० ॥
स्वाति नक्षत्राचे पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कोठून शोभली असती ? ॥१८-१७००॥
नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता ।
फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं ? ॥ १७०१ ॥
नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला आता ? व फुले जर सुवास झाला नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेतला असता ? ॥१८-१७०१॥
गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें ? ।
दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे ? ॥ १७०२ ॥
गोडी जर पक्वान्ने झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती ? आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल काय ? ॥१८-१७०२॥
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं ।
तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥ १७०३ ॥
द्रष्टा जो गुरुमूर्ति, तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता (निर्गुण जो श्रीगुरु तो जर सगुण झाला नसता) तर तो उपासनेस कसा स्वाधीन झाला असता ? ॥१८-१७०३॥
तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात ।
न होती तरी कोणा येथ । फावों शकतें ? ॥ १७०४ ॥
त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म आहे ते जर सातशे श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त झाले असते ? ॥१८-१७०४॥
मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे ।
कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा ॥ १७०५ ॥
मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पहाता मेघाकडेच पहाते. का तर जे अमर्य़ाद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही. ॥१८-१७०५॥
आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे ।
तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें ? ॥ १७०६ ॥
आणि वाचेला जे प्राप्त होत नाही असे जे ब्रह्म ते ब्रह्म जर हे सातशे सुंदर श्लोक होते ना तर ते ब्रह्म कानाने, मुखाने भोगता येईल असे का झाले असते ? ॥१८-१७०६॥
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु ।
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥ १७०७ ॥
म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला. ॥१८-१७०७॥
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां ।
आणिला श्रवणपथा । मर्हाठिया ॥ १७०८ ॥
आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता, मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणाला. ॥१८-१७०८॥
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक ।
तेथ मीही रंक येक । चावळी करीं ॥ १७०९ ॥
व्यासादिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्तच वावरतात, त्या गीतेच्या बाबतीत एक गरीब मनुष्य बडबड करीत आहे. ॥१८-१७०९॥
परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा ।
तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं ॥ १७१० ॥
परंतु हा भोळा शंकर आहे, तो व्यासवचनरूपी फुलांची माळ धारण करतो, तरी माझ्या दुर्वादळांना(मराठी ओव्यांना) खास नाही म्हणणार नाही. ॥१८-१७१०॥
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा ।
तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥ १७११ ॥
आणि क्षीरसमुद्राच्या किनार्याला पाणी प्यावयास हत्तीचे समुदाय येतात, तेथे चिलटांना क्षीरसमुद्र येऊ नको म्हणतो की काय ? ॥१८-१७११॥
पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू ।
गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥ १७१२ ॥
नुकतेच पंख फुटलेले पाखरू करी फार उडले नाही तरी आकाशातच उडते व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरूडही (आकाशातच) उडत रहातो. ॥१८-१७१२॥
राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें ।
आणिकें काय कोणें । चालावेचिना ? ॥ १७१३ ॥
राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले तर आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नये की काय ? ॥१८-१७१३॥
जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें ।
चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे ? ॥ १७१४ ॥
महाराज, आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते, म्हणून चुळीत चुळीच्या लहान पोकळीइतके पाणी भरून निघत नाही काय ? ॥१८-१७१४॥
दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी ।
वाती आपुलिया परी । आणीच कीं ना ? ॥ १७१५ ॥
मशाली चा आकार मोठा असतो म्हणून तॊ पुष्कळ उजेड धारण करते आणि वात (दिवा) जरी लहान असली तरी आपल्या मानाने प्रकाश धारणा करतेच की नाही ? ॥१८-१७१५॥
जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे ।
थिल्लरीं थिल्लराऐसें । बिंबेचि पैं ॥ १७१६ ॥
महाराज समुद्रात विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व डबक्यात डबक्याएवढे आकाशाचे प्रतिबिंब पडते. ॥१८-१७१६॥
तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं ।
मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर ? ॥ १७१७ ॥
त्याप्रमाणे व्यासादिकांसारखे विशालबुद्धि, या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात. मग आम्ही (आपल्या अल्पबुद्धीने) या गीताग्रंथाचे विवरण करावे हे युक्तीला जुळणारे नाही का ? ॥१८-१७१७॥
जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें ।
तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती ? ॥ १७१८ ॥
ज्या पर्वतामधे मंदारपर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात, त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते. ॥१८-१७१८॥
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें ।
मा भूतळींची न देखे । मुंगी काई ? ॥ १७१९ ॥
अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो, म्हणून तो सूर्यास पहातो. मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पहात नाही काय ? ॥१८-१७१९॥
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता ।
म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ॥ १७२० ॥
म्हणून आहासारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत (मराठी भाषेत) गीता आणता येते, हे म्हणणे अयोग्य आहे, असे म्हणण्याला कारण नाही. ॥१८-१७२०॥
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये ।
बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ? ॥ १७२१ ॥
आणि बाप पुढे जात असता त्याच्या पाऊलाच्या अनुरोधाने जर मूल आले, तर त्या मुलाला (बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी) पोहोचता येणार नाही काय ? ॥१८-१७२१॥
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु ।
अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ? ॥ १७२२ ॥
त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य मनुष्यही तेथे (गीतार्थाच्या ठिकाणी) प्राप्त न होता कोठे जाईन ? ॥१८-१७२२॥
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा ।
जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग ॥ १७२३ ॥
आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, ॥१८-१७२३॥
जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें ।
आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे ॥ १७२४ ॥
ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, ॥१८-१७२३॥
समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य ।
माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥ १७२५ ॥
समुद्राला ज्याचे पाणी आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे, व माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे, ॥१८-१७२५॥
पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ ।
ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥ १७२६ ॥
वार्यातील सामर्थ्य ज्याचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे, ॥१८-१७२६॥
वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास ।
हें असो रूपस । विश्व जेणें ॥ १७२७ ॥
ज्याच्या योगाने वेद चांगले बोलणारा आहे, ज्याच्या योगाने सुख भरभराटीत आहे, हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्व रूपवान झाले आहे, ॥१८-१७२७॥
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु ।
राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां ॥ १७२८ ॥
तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ श्रीगुरु निवृत्तिनाथ माझ्यामधेही प्रवेश करून वागत आहे. ॥१८-१७२८॥
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मर्हाठिया भंगीं ।
येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ॥ १७२९ ॥
ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूपासून आयते (मी श्रम न करता) मिळाले आहे, ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारे सांगतो. यात आश्चर्याला जागा कोठे आहे ? ॥१८-१७२९॥
श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती ।
तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ॥ १७३० ॥
डोंगरावर मातीचा पुतळा करून त्यास श्रीगुरु (द्रोणाचार्य) असे नाव ठेऊन, त्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला, त्या (एकलव्य) कोळ्याने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एकवाक्यता केली. ॥१८-१७३०॥
चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें ।
वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी ॥ १७३१ ॥
चंदनाने (परिमळाने) व्यापलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली, वसिष्ठाने सूर्याच्या जागी ठेवलेली जी आपली काठी, ती काठी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली. तिने सूर्यासारखा प्रकाश केला). ॥१८-१७३१॥
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।
जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं ॥ १७३२ ॥
थोरांनी निर्जिवाचाही अंगीकार केला असता एवढी योग्यता येते). मग मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवतो त्या श्रीगुरुसारखा मालक माझे शिरावर आहे. ॥१८-१७३२॥
आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी ।
तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ? ॥ १७३३ ॥
मूळची दृष्टि स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला नाही अशी गोष्ट कोठे झाली आहे काय ? ॥१८-१७३३॥
म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे ।
श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३४ ॥
म्हणून माझे नेहेमी वहाणारे श्वासोच्छ्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही ? असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥१८-१७३४॥
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मर्हाठिया ।
केला लोकां यया । दिठीचा विषो ॥ १७३५ ॥
या कारणास्तव ही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला. ॥१८-१७३५॥
परी मर्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें ।
तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ॥ १७३६ ॥
परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल, तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशित्व येणार नाही. ॥१८-१७३६॥
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें ।
ना मोकळे तरी उणें । गीताही आणित ॥ १७३७ ॥
म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल. (संस्कृतात अर्थ खुलवील). अथवा माझी नुसती टीका जर सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारील. ॥१८-१७३७॥
सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये ।
ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ? ॥ १७३८ ॥
सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो (दागिना) मोकळा नुसता शोभतो अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणीक कोठे आहे ? ॥१८-१७३८॥
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती ।
नातरी मानविती । अंगेंचि सडीं ॥ १७३९ ॥
अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की ती सोन्यालाही शोभा देतात अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात. ॥१८-१७३९॥
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं ।
वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ॥ १७४० ॥
अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले, गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात कमीजास्तपणा नसतो ॥१८-१७४०॥
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं ।
तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ॥ १७४१ ॥
त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली तरी शोभा आणील अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरी शोभा दाखवणारच. असा दोन्ही प्रकारे लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे. ॥१८-१७४१॥
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें ।
ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ॥ १७४२ ॥
मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणार्या त्या ओवीच्या वृत्तात ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत. ॥१८-१७४२॥
आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं ।
पारुखणें जियापरी । लागेना कीं ॥ १७४३ ॥
आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरता फुले येईपर्यंत रहावे (थांबावे) लागत नाही ॥१८-१७४३॥
तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी ।
ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥ १७४४ ॥
त्याप्रमाणे ही माझी ओचीबद्ध टीका कानावर येता क्षणीच श्रोत्याला समाधि आणते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचा नाद लावणार नाही काय ? ॥१८-१७४४॥
पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे ।
तैं अमृतातें नेणिजे । फावलिया ॥ १७४५ ॥
माझी टीका वाचण्यास लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्यावेळी त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला की मग अमृताची देखील आठवण होत नाही. ॥१८-१७४५॥
तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें ।
मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां ॥ १७४६ ॥
त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व (सर्वांना) विश्रांतीचे स्थान झालेले आहे. त्यामुळे आता याच्या श्रवणाने, मन व निदिध्यास यास जिंकले आहे. ॥१८-१७४६॥
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल ।
सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं ॥ १७४७ ॥
ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंदभोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करील. ॥१८-१७४७॥
चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे ।
परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही ॥ १७४८ ॥
आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला (चंद्राच्या अमृताला) भोगून चकोरपक्षी चतुर ठरला आहेच. परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला जसे भोगावयास सापडते, ॥१८-१७४८॥
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये ।
परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया ॥ १७४९ ॥
त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतमुखवृत्ति झालेलेच अधिकारी आहेत. परंतु शब्दचातुर्याने सर्व लोक सुखी होतील,. ॥१८-१७४९॥
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें ।
ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥ १७५० ॥
त्याप्रमाणे महाराज, श्रीनिवृत्तिनाथांचा खरोखर मोठेपणा आहे, हा ग्रंथ नव्हे तर हे त्या (निवृत्तिनाथांच्या) कृपेचे वैभवच आहे. ॥१८-१७५०॥
क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं ।
नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ॥ १७५१ ॥
क्षीरसमुद्राच्या सन्निधभागी पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत हे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही. ॥१८-१७५१॥
तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु ।
होता तयाचा हातु । पैठें जालें ॥ १७५२ ॥
ते क्षीरसागराच्या लाटांमधे माशाच्या पोटात जो (भगवान विष्णु) गुप्त होता, त्याच्या हातात सापडले. ॥१८-१७५२॥
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी ।
भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला ॥ १७५३ ॥
तो मत्स्येंद्र सप्तश्रृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला, की तो चैरंगीनाथ सर्वांगांनी संपूर्ण झाला. ॥१८-१७५३॥
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया ।
ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ॥ १७५४ ॥
मग समाधि न उतरता (एकसारखी) भोगावी या वासनेने (इच्छेने) ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिले. ॥१८-१७५४॥
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु ।
तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥ १७५५ ॥
त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर, असे जे गोरक्षनाथ, त्यास समाधिपदाचे ठिकाणी अभिषेक केला. ॥१८-१७५५॥
मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव ।
संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥ १७५६ ॥
मग गोरक्ष नाथांनी ते शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य, सामर्थ्यासह श्रीगहिनीनाथास दिले. ॥१८-१७५६॥
तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता ।
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥ १७५७ ॥
कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून गहिनीनाथांनी श्रीनिवृत्तिनाथांना आज्ञा दिली ती अशी ॥१८-१७५७॥
ना आदिगुरु शंकरा- । लागोनि शिष्यपरंपरा ।
बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें ॥ १७५८ ॥
की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्यपरंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला ॥१८-१७५८॥
तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां ।
सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं ॥ १७५९ ॥
तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळाल्या जाणार्या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर. ॥१८-१७५९॥
आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू ।
जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां ॥ १७६० ॥
मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टि करतात, त्याप्रमाणे स्वभावत: कृपाळू असलेल्या श्रीनिवृत्तिनाथांना त्यावर गुरुआज्ञेचा निरोप मिळाला. ॥१८-१७६०॥
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें ।
वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ॥ १७६१ ॥
मग पीडित प्राण्यांच्या (दयेने, गीतेचा अर्थ) जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तिनाथांकडून ही जी शांतरसाची वृष्टि झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. ॥१८-१७६१॥
तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया ।
कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा ॥ १७६२ ॥
तेव्हा मी चातकपक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो. या कारणामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो आहे. ॥१८-१७६२॥
एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें ।
तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज ॥ १७६३ ॥
याप्रमाणे गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले समाधिरूपी धन, ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने (निवृत्तिनाथाने) मला दिले. ॥१८-१७६३॥
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची ।
ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ? ॥ १७६४ ॥
नाही तर मी शिकलो नाही व मला वाचण्याचा अभ्यास नाही व मी गुरूची सेवाही जाणत नाही. असा जो मी त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कोठून असणार ? ॥१८-१७६४॥
परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें ।
प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा ॥ १७६५ ॥
परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथरचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले, असे समजा. ॥१८-१७६५॥
तर्ही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें ।
तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी ॥ १७६६ ॥
तरी गुरूंचा पुरोहित म्हणून, मी काही कमी जास्त बोललो असेन ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाने सहन करावे. ॥१८-१७६६॥
शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।
अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १७६७ ॥
शब्द कसा बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याखायन कसे करावे व (साहित्यशास्त्रातील) अलंकार म्हणजे काय, ते मी जाणत नाही. ॥१८-१७६७॥
सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।
तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६८ ॥
कळसूत्राचे बाहुले त्याला चालवणार्या सूत्राने चालते, त्याप्रमाणे मला दाखवीत (पुढे करून) ते माझे गुरु बोलत आहेत. ॥१८-१७६८॥
यालागीं मी गुणदोष- । विषीं क्षमाविना विशेष ।
जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥ १७६९ ॥
या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण की माझ्या गुरूंनी उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली. ॥१८-१७६९॥
आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें ।
तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें ॥ १७७० ॥
आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव कायमच राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागावता येईल. ॥१८-१७७०॥
सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे ।
न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु । ॥ १७७१ ॥
परीसाचा स्पर्श झाला असताही लोखंडाच्या हीनदशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाचा ? ॥१८-१७७१॥
वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें ।
मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी ? ॥ १७७२ ॥
ओहोळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला (जाऊन) मिळावे. मग देखील तो गंगा झाला नाही तर त्याने काय करावे ? ॥१८-१७७२॥
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये ।
पातलों आतां कें लाहे । उणें जगीं । ॥ १७७३ ॥
म्हणून बहुत भाग्ययोगाने मी तुम्हा संतांच्या पायांजवळ प्राप्त झालो असतां मला जगामधे उणे कोठे आहे ? ॥१८-१७७३॥
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं ।
दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों ॥ १७७४ ॥
अहो महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्ही संत प्राप्त करून दिलेत. त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो आहे. ॥१८-१७७४॥
पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें ।
ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥ १७७५ ॥
पहा की मला तुम्हांसारखे माहेर आहे, त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. ॥१८-१७७५॥
जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ ।
चिंतारत्नीं कुळाचळ । निर्मूं येती ॥ १७७६ ॥
महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची ओतता येईल अथवा सात मोठमोठ्या महेंद्रादि पर्वतांप्रमाणे चिंतामणीरत्नांचे डोंगर निर्माण करता येतील. ॥१८-१७७६॥
सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें ।
दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां ॥ १७७७ ॥
सातही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे, तार्यांचे चंद्र करणे कठिण नाही. ॥१८-१७७८॥
कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम ।
परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये ॥ १७७८ ॥
कल्पतरूचे बगीचे लावणे कठिण नाही, परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट करता येणार नाही. ॥१८-१७७८॥
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मर्हाठिया भाखा ।
करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें ॥ १७७९ ॥
तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका, मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो करतो, ॥१८-१७७९॥
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा ।
कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां ॥ १७८० ॥
हा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्तिविजयाचा धेंडा जो नाचतो, ॥१८-१७८०॥
गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु ।
रचूनि माजीं श्रीगुरु- । लिंग जें पूजीं ॥ १७८१ ॥
गीतार्थाच्या आवारात अठरावा अध्यायरूपी कळसासह महामेरु पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्रीगुरुमूर्तीची (शिवपिंडीची) मी पूजा करत आहे. ॥१८-१७८१॥
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय ।
तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥ १७८२ ॥
गीतारूपी निष्कपट आईला चकून, जे मी लेकरू संसाररूपी रानात व्यर्थ हिंडत होते, त्या मायलेकांची भेट होते, ही तुमची पुण्याई आहे. ॥१८-१७८२॥
तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें ।
ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें ॥ १७८३ ॥
महाराज, तुम्ही सज्जनांनी केलेले समजून मी बोलत आहे, हे काही लहानसहान आहे असे म्हणता येत नाही. ॥१८-१७८३॥
काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा ।
ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥ १७८४ ॥
फार काय सांगू ? जो हा तुम्ही ग्रंथसमाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखविला, त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिलेत. ॥१८-१७८४॥
मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा ।
ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा ॥ १७८५ ॥
महाराज, मी जसजशा आशेने तुमच्याविषयी खात्री बाळगली, ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत. ॥१८-१७८५॥
मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही ।
तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही ॥ १७८६ ॥
महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टि केलीत तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. ॥१८-१७८६॥
जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें ।
तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं ॥ १७८७ ॥
कारण की मूळची सृष्टि असून ब्रह्मदेवाला, उणे आणण्याकरता व त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टि नाश पावणारी होती, ही ग्रंथरूप सृष्टि अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. ॥१८-१७८७॥
शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे ।
येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं ॥ १७८८ ॥
शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही येथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. ॥१८-१७८८॥
अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां ।
धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो ॥ १७८९ ॥
अंधाकाररूपी निशाचर (चराचराला) गिळीत असता सूर्याने चराचराला त्या संकटातून सुटण्याला मदत केली खरी, पण ती जगाला ताप देऊन. ॥१८-१७८९॥
तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें ।
तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें ॥ १७९० ॥
संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला, त्या कलंकयुक्त चंद्रासारखे हे आहे असे कसे म्हणता येईल ? ॥१८-१७९०॥
म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं ।
उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥ १७९१ ॥
महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला, तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात अनुपम आहे, असे दिसते. ॥१८-१७९१॥
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें ।
येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥ १७९२ ॥
महाराज फार काय सांगावे ? तुम्ही केलेले हे धर्मव्याख्यान तुमच्याच हातून शेवटाला गेले. या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाच उरला. ॥१८-१७९२॥
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९३ ॥
आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला हे पुढील प्रसाददान द्यावे. ॥१८-१७९३॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९४ ॥
की खलांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. ॥१८-१७९४॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९५ ॥
पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणिमात्रात जो जे इच्छील ते त्याला प्राप्त व्हावे. ॥१८-१७९५॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ १७९६ ॥
ईश्वरनिष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत, या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो. ॥१८-१७९६॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९७ ॥
चालणार्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलणारे सागर आहेत, ॥१८-१७९७॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९७ ॥
जे कलंकरहित चंद्र आहेत व जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना नेहेमी आवडते व्हावेत. ॥१८-१७९८॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८९९ ॥
फार काय सांगावे ? तिन्ही लोकांनी स्वर्ग, मृत्यु व पाताळ यांनी) सर्वसुखाने पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजन करावे. ॥१८-१७९९॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०० ॥
आणि महाराज, या लोकात विशेषे करून हा ग्रंथच ज्यांचे जीवन आहे (अत्यंत प्रिय होऊन राहिला आहे) त्यांनी इहलोकींच्या व परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे. ॥१८-१८००॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०१ ॥
तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्रीनिवृत्तिनाथ म्हणाले की हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंत:करणात सुखी झाला. ॥१८-१८०१॥
ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं ।
श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं ॥ १८०२ ॥
याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्रदेशात श्रीगोदावरीच्या दक्षिणतीरावर – ॥१८-१८०२॥
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ।
जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ १८०३ ॥
त्रैलोक्यामधे जे एक पवित्र पाचकोसाचे अनादि क्षेत्र आहे व जेथे (ज्या नेवाशात) जगातील सर्व जीवांची चालक श्रीमहालया (श्रीमोहिनीराज) आहे ॥१८-१८०३॥
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु ।
न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ १८०४ ॥
तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे रहाण्याचे ठिकाण, जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र, तो न्यायाने राज्य करीत होता. ॥१८-१८०४॥
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें ।
केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ १८०५ ॥
तेथे (त्या नेवाशामधे) आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्रीनिवृत्तिनाथसुत (शिष्य) जो ज्ञानदेव, त्याने गीतेवर देशी भाषेचा (मराठी टीकेचा) अलंकार चढवला. ॥१८-१८०५॥
एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं ।
श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली ॥ १८०६ ॥
याप्रमाणे श्रीभारतरूपी गावात भीष्मनाम प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्णार्जुनांनी जो चांगला संवाद केला ॥१८-१८०६॥
जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर ।
परमहंसीं सरोवर । सेविजे जें ॥ १८०७ ॥
जो (कृष्णार्जुनांचा संवाद) उपनिषदांचे तात्पर्य आहे व सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने रहाण्याचे जज्न्मस्थान आहे व परमहंसरूपी राजहंसांनी सेवन करण्याचे मानस सरोवर आहे. ॥१८-१८०७॥
तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु ।
म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥ १८०८ ॥
त्या गीतेचा अठरावा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्रीनिवृत्तिनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. ॥१८-१८०८॥
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती ।
सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥ १८०९ ॥
या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी, सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे. ॥१८-१८०९॥
शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥ १८१० ॥
शके बाराशे बारा चालू होते, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. ॥१८-१८१०॥
॥ पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
Pingback: सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा:18(sarth-dnyaneshwari-adhyay-atharava) "A Literary Treasure"