सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा
(ओव्या १ ते ६६)
(ओव्या ६७ ते १३५)
(ओव्या १३६ ते २०३)
(ओव्या २०४ ते २७५)
(ओव्या २७६ ते ३४८)
(ओव्या ३४९ ते ४१५)
वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या ।
प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥ १ ॥
अहो सर्व देवांमधे श्रेष्ठ (आत्मविषयक) बुद्धिरूपी प्रात:काळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्रीगुरुमहाराज, आपला जयजयकार असो. ॥१४-१॥
जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥ २ ॥
तुम्ही सर्व जगास विश्रांतिस्थान अहात. ‘मी ब्रह्म आहे’ अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही अहात). तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र अहात. तुमचा जयजयकार असो. ॥१४-२॥
आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू ।
विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥ ३ ॥
पीडितांना संकटातून सोडवणारे, अखंड भरलेले (ओहोटी नसलेले) दयेचे समुद्र, शुद्धविद्यारूप (अध्यात्मविद्यारूप) स्त्रीचे प्रियकर असे महाराज, तुम्ही ऐका. ॥१४-३॥
तू जयांप्रति लपसी । तया विश्व हें दाविसी ।
प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥ ४ ॥
तू ज्यांना लपतोस, त्यांना हे जग दाखवतोस (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते) व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्य़ासंबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता, सर्व तूच दिसतोस.) ॥१४-४॥
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।
परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें ॥ ५ ॥
दुसर्याची नजरबंदी करणे, असा नजरबंदीचा खेळ (गारुडी लोकांस) उत्पन्न करता येतो. (पण त्यास आपली स्वत:ची नजरबंदी करता येत नाही). परंतु आपण आपल्याला चोरून रहाणे (स्वत:स स्वत: विषय न होणे) ही तुझी अद्भुत जादु आहे. (गुरु वा ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण सवत: ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत). ॥१४-५॥
जी तूंचि तूं सर्वां यया । मा कोणा बोधु कोणा माया ।
ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज ॥ ६ ॥
कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस. (म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस). असे असून सुद्धा कोणाचे ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाचे ठिकाणी तुझ्य़ासंबंधी माया (अज्ञान) आहे. असा जो तू स्वभावत: जादुगार, त्या तुला नमस्कार असो. ॥१४-६॥
जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें ।
तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी ॥ ७ ॥
आम्हास असे वाटते की जगामधे पाणी ओले आहे, ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे, ती तुझ्या योगाने आहे. ॥१४-७॥
रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगतीं ।
तें तुझिया दीप्ती । तेज तेजां ॥ ८ ॥
सूर्य व चंद्र इत्यादिक शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज, ते तेज तुझ्यामुळे आहे. ॥१४-८॥
चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें ।
नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी ॥ ९ ॥
वायु जी हालचाल करतो महाराज, ती तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामधे लपंडाव खेळते. ॥१४-९॥
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस ।
असो वानणें सायास । श्रुतीसि हे ॥ १० ॥
फार काय सांगावे ? महाराज अमर्याद असे जे मायाज्ञान (संपूर्ण अन्यथाज्ञान) त्याचेही प्रकाशक तुम्हीच अहात, हे तुमचे वर्णन राहू दे. (कारण) हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे. ॥१४-१०॥
वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझें आंग ।
मग आम्हां तया मूग । एके पांती ॥ ११ ॥
जोपर्यंत तुझ्यास्वरूपापर्यंत पोचला नाही, तोपर्यंत वेद वर्णन करून अब्रूत रहातो, म्हणजे तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला की त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात. (मुकाट्याने बसावे लागते). ॥१४-११॥
जी एकार्णवाचे ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं ।
मा महानदी काई । जाणिजती ॥ १२ ॥
महाराज, प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील ? (तर नाही. महानद्यांचा देखील प्रळयकालच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही). ॥१४-१२॥
कां उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु ।
आम्हां श्रुति तुज आंतु । तो पाडु असे ॥ १३ ॥
अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा, त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदाची अवस्था होते. ॥१४-१३॥
आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे ।
तो तूं मा कोणें तोंडें । वानावासी ॥ १४ ॥
आणि द्वैताचा जेथे जोर नाहीसा होतो, व वैखरीवाचाही परावाणीसह नाहीशी होते, असा जो तू त्या तुझे मग ‘परा, पश्यन्ती’ इत्यादि वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे ? ॥१४-१४॥
यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता ।
चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥ १५ ॥
याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्याने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले. ॥१४-१५॥
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया ।
मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥ १६ ॥
तर अहो गुरुमहाराज, (आपण जसे अहात) तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. (आपण मजवर एवढी कृपा करा की) माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा. ॥१४-१६॥
आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी ।
करीं ज्ञानपद्य जोडी । थोरा मातें ॥ १७ ॥
आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा. ॥१४-१७॥
मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं ॥ १८ ॥
मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे (भिकबाळी) करून ती संतांना घालीन. ॥१४-१८॥
जी गीतार्थनिधान । काढू माझें मन ।
सुयीं स्नेहांजन । आपलें तूं ॥ १९ ॥
महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, せんずり鑑賞 या करता तुम्ही आपले कृपारूपी अंजन (माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात) घाला. ॥१४-१९॥
हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे ।
तैसा उदैजो जो निर्मळें । कारुण्यबिंबें ॥ २० ॥
जेणे करून हे शब्दरूपी जगत एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल. या तर्हेने हे श्रीगुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. ॥१४-२०॥
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सफळ ।
तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी ॥ २१ ॥
हे कृपाळूश्रेष्ठा श्रीगुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल, तो वसंतऋतु आपण व्हा. ॥१४-२१॥
प्रमेय महापूरें । हे मतिगंगा ये थोरें ।
तैसा वरिष उदारें । दिठीवेनी ॥ २२ ॥
ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे. ॥१४-२२॥
अगा विश्वैकधामा । तुझा प्रसाद चंद्रमा ।
करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥ २३ ॥
हे सर्व जगताला एकच आश्रय असणार्या श्रीगुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो. ॥१४-२३॥
जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें ।
वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥ २४ ॥
महाराज, आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता, माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल. ॥१४-२४॥
तंव संतोषोनि श्रीगुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें ।
मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥ २५ ॥
तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिषाने स्तुतीच्या पांधरुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते. ॥१४-२५॥
हें असो आतां वांजटा । तो ज्ञापनार्थ करूनि गोमटा ।
ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥ २६ ॥
हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस. ॥१४-२६॥
हो कां जी स्वामी । हेंचि पाहत होतों मी ।
जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥ २७ ॥
स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे ? मी याचीच वाट पहात होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ‘ग्रंथ सांग’ असे म्हणावे. ॥१४-२७॥
सहजें दुर्वेचा डिरु । आंगेंचि तंव अमरु ।
वरी आला पूरु । पीयूषाचा ॥ २८ ॥
हरळीची मुळी स्वभावत: तर अंगाने अमर आहेच, तशात जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषायी शंका धरणे नको). ॥१४-२८॥
तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें ।
मूळशास्त्रपदें । वाखाणीन ॥ २९ ॥
तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे, ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करीन. ॥१४-२९॥
परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे ।
ना श्रवणीं तरी चाडे । वाढी दिसे ॥ ३० ॥
पण असे वर्णन करीन की जेणे करून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल. (संशय नाहीसे होतील) एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. ॥१४-३०॥
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी ।
माले मागूनि घरीं । गुरुकृपेच्या ॥ ३१ ॥
श्रीगुरूच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून माझ्या भाषणात त्या प्रकारची करी करी गोडी प्रगट होवो. ॥१४-३१॥
तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोठी ऐसी ।
श्रीकृष्ण अर्जुनेंसी । चावळले ॥ ३२ ॥
तर मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट बोलले. ॥१४-३२॥
जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें ।
आत्मा गुणसंगें । संसारिया ॥ ३३ ॥
की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणांच्या तादात्म्याने संसारी झाला आहे. ॥१४-३३॥
आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःख भोगीं हेतु ।
अथवा गुणातीतु । केवळु हा ॥ ३४ ॥
आणि हाच (आत्मा) प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदु:ख भोगण्यास कारण होतो. (त्यास सुखदु:खाचा भोग होतो). एरवी खरोखर पाहिले तर हा केवल गुणातीतच आहे. ॥१४-३४॥
तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु ।
सुखदुःखादि भोगु । केवीं तया ? ॥ ३५ ॥
तर असंगाला संग कसा व क्षेत्र-क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता ? व त्याला सुखदु:खादि भोग कसे ? ॥१४-३५॥
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती ।
नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ? ॥ ३६ ॥
गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात ? अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत ? ॥१४-३६॥
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया ।
विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥ ३७ ॥
या प्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा चौदाव्या अधायाचा प्रतिपाद्य विषय आहे, ॥१४-३७॥
तरी तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा ।
अभिप्रायो विश्वेशा । वैकुंठाचा ॥ ३८ ॥
तर प्रस्तुत जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा अभिप्राय असा आहे तो ऐका. ॥१४-३८॥
तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना ।
मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावें हो ! ॥ ३९ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून ज्ञानास बिलगावे बरे. ॥१४-३९॥
आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्ती ।
तरी आझुनी प्रतीती- । कुशीं न निघे ॥ ४० ॥
आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावला आहे. परंतु अजून तुझी अनुभवाची कुशी बाहेर आलेली दिसत नाही. ॥१४-४०॥
श्रीभगवानुवाच
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यद्ज्ञाःत्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला (श्रुतींनी) ‘पर’ म्हणून म्हटले आहे, जे सर्व ज्ञानांमधे उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धि पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. ॥१४-१॥
म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती ।
पर म्हण म्हणौनि श्रुतीं । डाहारिलें जें ॥ ४१ ॥
या करता श्रुतीने पर (सर्वांच्या पलीकडे) म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. ॥१४-४१॥
एर्हवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐसेनि जालें ।
जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ॥ ४२ ॥
सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे. परंतु संसार (मृत्युलोक) स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे (ते ज्ञान आपले स्वरूप असून) पर म्हणजे परके असे झाले आहे. ॥१४-४२॥
अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें ।
जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥ ४३ ॥
हे ज्ञान अग्नि व इतर ज्ञाने ही गवत आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे. असे मी म्हणतो. ॥१४-४३॥
जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती ।
पारखी फुडी आथी । भेदीं जया ॥ ४४ ॥
जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना ओळख असते, ॥१४-४४॥
तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें ।
जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ॥ ४५ ॥
ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वार्याच्या लाटा अखेरीस आकाशा कडून गिळल्या जातात, ॥१४-४५॥
कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें ।
नाना प्रळयांबुमाजें । नदी नद ॥ ४६ ॥
अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्रादिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात ॥१४-४६॥
तैसें येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया ।
म्हणौनियां धनंजया । उत्तम हें ॥ ४७ ॥
अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लयास जातात. म्हणून अर्जुना हे ज्ञान उत्तम आहे. ॥१४-४७॥
अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता ।
तो मोक्षु हातां येता । होय जेणें ॥ ४८ ॥
अर्जुना, आपली जी अनादि मुक्तता आहे, ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते. ॥१४-४८॥
जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं ।
नेदिजेचि संसृती । माथां उधऊं ॥ ४९ ॥
ज्याच्या अनुभावाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर काढूच देत नाहीत. ॥१४-४९॥
मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें ।
ते देहीं देहाजोगे । होतीचि ना ॥ ५० ॥
ते विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ति मनानेच मागे हटावून, अंगाने विश्रांती (स्वत: ब्रह्मरूप झाल्यावर) जरी देतात असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. (देहाएवढेच आपल्याला समजत नाहीत). ॥१४-५०॥
मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे ।
संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥ ५१ ॥
मग दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देह) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले. ॥१४-५१॥
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २ ॥
या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्याप्रत प्राप्त झालेले (मजशी समानधर्मा होणारे) पुरुष सृष्टि-निर्माण काली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली मरण (दु:ख)पावत नाहीत. ॥१४-२॥
जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥ ५२ ॥
अर्जुना जी माझी नित्यता आहे, त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. ॥१४-५२॥
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु ।
तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥ ५३ ॥
मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे, तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच रहात नाही. ॥१४-५३॥
जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें ।
घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥ ५४ ॥
कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते ॥१४-५४॥
नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं । होय जैसें ॥ ५५ ॥
अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसर्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे समज. ॥१४-५५॥
अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी ।
नांदे नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ॥ ५६ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाचे ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत. ॥१४-५६॥
येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें ।
तेंही तया होणें । पडेचिना ॥ ५७ ॥
या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टि उत्पन्न होते, तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. ॥१४-५७॥
सृष्टीचिये सर्वादी । जयां देहाची नाहीं बांधी ।
ते कैचें प्रळयावधी । निमतील पां ? ॥ ५८ ॥
सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलयकालच्या वेळेस कसे मरतील ? ॥१४-५८॥
म्हणौनि जन्मक्षयां- । अतीत ते धनंजया ।
मी जालें ज्ञाना इया । अनुसरोनी ॥ ५९ ॥
अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. ॥१४-५९॥
ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी ।
तेवींचि पार्थाही गोडी । लावावया ॥ ६० ॥
असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लावण्याकरता देवांनी या प्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. ॥१४-६०॥
तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान ।
सणई अवधान । आतला पां ॥ ६१ ॥
असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर अर्जुनाची वेगळीच स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगावे ? तो अवधानाने संपूर्ण व्यापला गेला. (अवधानाची मूर्तीच बनला). ॥१४-६१॥
आतां देवाचिया ऐसें । जाकळीजत असे वोरसें ।
जें निरूपण आकाशें । वेंटाळेना ॥ ६२ ॥
अर्जुन सर्व अंगाने अवधानरूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याचेकडून आकलन केले जात होते आणि (आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणाले). म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले. ॥१४-६२॥
मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता ।
जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी ॥ ६३ ॥
मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप स्त्रीच्या पति अर्जुना, आमचे एवढे व्याख्यान तेवढेच ज्याचे अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. (कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले). ॥१४-६३॥
तरि एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं ।
त्रिगुणीं लुब्धकीं । कवणेपरी ॥ ६४ ॥
तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो ॥१४-६४॥
कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें ।
तें परिस सांगें । कवणेपरी ॥ ६५ ॥
व मी क्षेत्राच्या योगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो ऐक. ॥१४-६५॥
पैं क्षेत्र येणें व्याजें । यालागीं हें बोलिजे ।
जे मत्संगबीजें । भूतीं पिके ॥ ६६ ॥
माझ्या संगरूपी बीजाने यात (अज्ञानात) प्राणीरूपी पीक येते, याच कारणामुळे याचा (अज्ञानाचा) क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो. ॥१४-६६॥
मम योनिर्महद्ब्र ह्म तस्मिन्गर्भं दधामहम्यम् ।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३ ॥
माया (महद्ब्रह्म) ही माझे (सृष्टिरूप) गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे, तिच्यामधे मी गर्भ ठेवतो. हे भारता त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. ॥१४-३॥
एर्हवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम ।
जे महदादिविश्राम । शालिका हें ॥ ६७ ॥
सहज विचार करून पाहिले तर महतत्वादिक तत्वांना हे विश्रांतिस्थान असल्यामुळे या अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे. ॥१४-६७॥
विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी ।
म्हणौनि अवधारीं । महद्ब्रुह्म ॥ ६८ ॥
अर्जुना, हेच विकारांना पुष्कळसे वाढवते म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज. ॥१४-६८॥
अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती ।
सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥ ६९ ॥
अव्यक्तवादि लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृति असे म्हणतात. ॥१४-६९॥
वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया ।
असो किती बोलों वायां । अज्ञान हें ॥७० ॥
हे बुद्धिमंतांच्या राजा अर्जुना, वेदांती याला माया असे म्हणतात. उगीच पाल्हाळ किती करायचा ? तर हे बोलणे राहू दे. (थोडक्यात सांगायचे म्हणजे) हे अज्ञान आहे. ॥१४-७०॥
आपला आपणपेयां । विसरु जो धनंजया ।
तेंचि रूप यया । अज्ञानासी ॥ ७१ ॥
अर्जुना आपला आपल्याला जो विसर (आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे) तेच या अज्ञानाचे रूप आहे. ॥१४-७१॥
आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे ।
वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥ ७२ ॥
या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे (अज्ञान) विचाराच्या वेळी दिसत नाही. ॥१४-७२॥
हालविलिया जाय । निश्चळीं तरी होय ।
दुधीं जैसी साय । दुधाची ते ॥ ७३ ॥
ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असतांना दिसते व दूध ढवळले असता दिसेनाशी होते ॥१४-७३॥
पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान ।
ते सुषुप्ति कां घन । जैसी होय ॥ ७४ ॥
जीमधे जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही अशी गाढ सुषुप्ति असते. ॥७४॥
कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें ।
तया ऐसें निरुतें । अज्ञान गा ॥ ७५ ॥
अथवा अर्जुना, वायु उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते, त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. (जेथे यथार्थस्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भाव नाही, अशी जी स्फुरणविरहित अवस्था, त्यासच अज्ञान म्हणावयाचे. ॥१४-७५॥
पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु ।
परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥ ७६ ॥
पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही, ॥१४-७६॥
तेवीं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे ।
परी कांहीं अनारिसें । देखिजेना ॥ ७७ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मवस्तु जशी असते तशी खरोखर दिसत नाही ॥१४-७७॥
ना राती ना तेज । ते संधि जेवीं सांज ।
तेवीं विरुद्ध ना निज । ज्ञान आथी ॥ ७८ ॥
रात्र नाही व दिवसही नाही त्य़ावेळेला जशी सांजवेळ म्हणातात, त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूपज्ञानही नसते केवल अज्ञान असते. ॥१४-७८॥
ऐसी कोण्ही एकी दिशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ॥ ७९ ॥
अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात
अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे ।
तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें ॥ ८० ॥
आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. ॥१४-७९॥
हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु ।
सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ॥ ८१ ॥
(आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात) अज्ञानास महत्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समजावे. ॥१४-८०॥
.आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपांचि देखे ।
परी रूपें अनेकें । नेणों कोणें ॥ ८२ ॥
हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबध आहे. तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा) सहज स्वभाव आहे. ॥१४-८१॥
जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला ।
कां मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां ॥ ८३ ॥
आता वस्तु (आपण) आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्यत्वाने व नानात्वाने) पहाते, परंतु कोणत्या (किती) अनेक रूपांनी पहाते ते कळत नाही. ॥१४-८२॥
तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी ।
तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा ॥ ८४ ॥
जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जारे, ‘मी राजा आलो आहे’, अथवा जसा एखादा मूर्च्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो, ॥१४-८३॥
जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखे बहुवा ।
तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ॥ ८५ ॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टि घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टि प्रसवतो. ॥१४-८४॥
हेंचि नीभ्रांती । प्रमेय उपलवूं पुढती ।
परी तूं प्रतीती । याचि घे पां ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थरूपाने पहावा (पाहिला जातो) तीच स्थिती आत्म्याची (आपल्या स्वरूपाच्या) स्मरणावाचून आहे. परंतु हे सर्व (मी सृष्टीला प्रसवतो वगैरे) स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेऊन तू ऐक. ॥१४-८६॥
तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी ।
अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ॥ ८७ ॥
तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे व हिच्यामधे जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही (ती सद्, असद्, विलक्षण, अनिर्वचनीय आहे). ॥१४-८७॥
इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप ।
हें निद्रितां समीप । चेतां दुरी ॥ ८८ ॥
हिला वस्तुत: अस्तित्व नाही, हेच हिचे स्वरूप आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे, ॥१४-८८॥
पैं माझेनिचि आंगें । पहुडल्या हे जागे ।
आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ॥ ८९ ॥
परंतु मी स्वत: झोपलो म्हणजे ही जागृत असते (स्वरूपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येच्या गमज्या चालतात). माझ्या सदत्वाचा आश्रय उपयोगात आणून (उपभोगून) ही (ब्रह्मांडे पोटात साठवलेली) मोठी गरोदर होते. ॥१४-८९॥
महद्ब्रह्मउदरीं । प्रकृतीं आठै विकारीं ।
गर्भाची करी । पेलोवेली ॥ ९० ॥
महद्ब्रह्म आपल्या उदरात प्राकृत आठ विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. ॥१४-९०॥
उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्वें प्रसवलें ।
बुद्धितत्त्व भारैलें । होय मन ॥ ९१ ॥
उभयतांच्या (माझ्या व मायेच्या) संगात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले, ते बुद्धितत्व (रजोगुणाने)भारले गेले, म्हणजे मन तयार होते. ॥१४-९१॥
तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची ।
तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय ॥ ९२ ॥
मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकारतत्व तयार करते व त्यायोगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात. ॥१४-९२॥
आणि विषयेंद्रियां गौसी । स्वभावें तंव भूतांसी ।
म्हणौनि येती सरिसीं । तियेंही रूपा ॥ ९३ ॥
आणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावत:च पंचमाहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात. ॥१४-९३॥
जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें ।
तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों ॥ ९४ ॥
पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्मप्रकृतीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्मरूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे, तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो. ॥१४-९४॥
रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका ।
जीवीं बांधें उदका । भेटतखेंवो ॥ ९५ ॥
ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामधे वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो ॥१४-९५॥
तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें ।
आर घेवों लागे । आणियाची ॥ ९६ ॥
त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते. ॥१४-९६॥
मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया ।
तें परियेसें राया । सुजनांचिया ॥ ९७ ॥
हे सुजनाच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक. ॥१४-९७॥
पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज ।
उमटती सहज । अवयव हें ॥ ९८ ॥
तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जरायुज असे हे अवयव स्वभावत: उमटतात. ॥१४-९८॥
व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें ।
मणिजु उससे । अवयव तो ॥ ९९ ॥
मणीज हा अवयव आकाश व वायु यांच्या योगाने गर्भरस वाढाल्याने जीवन पावतो. ॥१४-९९॥
पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें ।
उठितां निफजे । स्वेदजु गा ॥ १०० ॥
तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता, निश्चयेकरून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. ॥१४-१००॥
आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें ।
स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥ १०१ ॥
आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो. ॥१४-१०१॥
पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं ।
हीं हेतु जारजीं । ऐसें जाण ॥ १०२ ॥
पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहाकारिता करतात व मन व बुद्धि इत्यादि ज्ञानसाधने तरतरीत होतात. ही मनुष्यादि जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज. ॥१४-१०२॥
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ ।
महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ॥ १०३ ॥
या प्रमाणे चार भूतयोनी, हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे ॥१४-१०३॥
प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट ।
सुर योनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं ॥ १०४ ॥
प्रवृत्ति हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ति ही नीट (सरळ) पाठ आहे व अष्ट देवयोनी ही ज्याची वरची (कमरेच्या वरची) अंगे आहेत. ॥१४-१०४॥
कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यभागु ।
अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥ १०५ ॥
आनंदभरित असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ (गळा) आहे, मृत्युलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरेचा पृष्ठभाग आहे ॥१४-१०५॥
ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख ।
जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा ॥ १०६ ॥
अर्जुना, ज्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत असे एक मूल ही प्रसवली पहा. ॥१४-१०६॥
चौर्यांशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी ।
वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥ १०७ ॥
चौर्यांशी लक्ष योनी ह्या ज्याच्या (ज्या बालकाच्या) कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. ॥१४-१०७॥
नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी ।
मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवें ॥ १०८ ॥
(माया ही या बालकाच्या) देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते. ॥१४-१०८॥
सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां ।
भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ॥ १०९ ॥
वेगवेगळ्या सृष्ट्या, त्या या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या होत. ॥१४-१०९॥
हें एकलौतें चराचर । अविचारित सुंदर ।
प्रसवोनि थोर । थोरावली ॥ ११० ॥
स्थावर-जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया थोर झाली (म्हणजे वढली). ॥१४-११०॥
पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो माध्यान्ह वेळु ।
सदाशिव सायंकाळु । बाळा यया ॥ १११ ॥
ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रात:काळ आहे, विष्णु हा हा मध्याह्नकाळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे. ॥१४-१११॥
महाप्रळयसेजे । खिळोनि निवांत निजे ।
विषमज्ञानें उमजें । कल्पोदयीं ॥ ११२ ॥
हे बालक खेळून आले, म्हणजे महाप्रळयरूप शेजेवर निजते व पुन: कल्पाच्या आरंभी भेदज्ञानाने जागे होते. ॥१४-११२॥
अर्जुना इयापरी । मिथ्यादृष्टीच्या घरीं ।
युगानुवृत्तीचीं करी । चोज पाउलें ॥ ११३ ॥
अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पाऊले कौतुकाने टाकते. ॥१४-११३॥
संकल्पु जयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु ।
ऐसिया होय शेवटु । ज्ञानें यया ॥ ११४ ॥
या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट (नाश) त्यावेळी ज्ञानाने होतो. ॥१४-११४॥
आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली ।
तेथ साह्य जाली । माझी सत्ता ॥ ११५ ॥
आता हे फार बोलने राहू दे. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. ॥१४-११५॥
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४ ॥
हे कौंतेया, सर्व योनीमधे ही जी शरीरे निर्माण होतात, त्या सर्वंचे कारण (आई) माया आहे. आणि मी बीजप्रद पिता आहे. ॥१४-४॥
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता ।
अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥ ११६ ॥
या कारणास्तव मी बाप, महद्ब्रह्म ही आई व अर्जुना जगडंबर हे मूल आहे. ॥१४-११६॥
आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेदें हो चित्तें ।
जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥ ११७ ॥
आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस. कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धि, अहंकार व पंचमहाभूते, ही जी जगातील आठ तत्वे आहेत, ती एकच आहेत. ॥१४-११७॥
हां गा एकाचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं ? ।
तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ॥ ११८ ॥
अरे अर्जुना, एकाच देहामधे निरनिराळे (भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाहीत काय ? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे, असे समज. ॥१४-११८॥
पैं उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया ।
येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥ ११९ ॥
ज्याप्रमाणे वरच्या खालच्या व भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात. ॥१४-११९॥
आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा ।
कां पटत्व कापुसा । नातू होय ॥ १२० ॥
आणि आमचा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्तिकेचे मूल जसा घट, अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे ॥१४-१२०॥
नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा ।
आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा ॥ १२१ ॥
अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतति आहे, तसा आमचा व चराचराचा संबंध आहे. ॥१४-१२१॥
म्हणौनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ ।
तेवीं मी गा सकळ । संबंधु वावो ॥ १२२ ॥
म्हणून अग्नि व ज्वाळा हे दोन्ही जसे एक अग्नीच आहेत, त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे. ॥१४-१२२॥
जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके ? ।
किळेवरी माणिकें । लोपिजे काई ? ॥ १२३ ॥
झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो ? माणकाच्या तेजाने माणीक लोपले जाते काय ? ॥१४-१२३॥
अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें ? ।
कीं कमळ फांकलें । कमळत्वा मुके ? ॥ १२४ ॥
सोने हे अलंकारदशेला आले असता त्याचे सोनेपण गेले काय ? अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुकते काय ? ॥१४-१२४॥
सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया ।
आच्छादिजे कीं तया । तेंचि रूप ? ॥ १२५ ॥
अवयवी हा अवयवांकडून झाकला जातो, की अवयव हेच अवयवीचे रूप आहे ? अर्जुना सांग बाबा. ॥१४-१२५॥
कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा ।
वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥ १२६ ॥
जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर (म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर) तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटीने वाढला ? ॥१४-१२६॥
म्हणौनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें ।
तैसा नोव्हें उखितें । आघवें मीचि ॥ १२७ ॥
म्हणून जग पलीकडे सारून (म्हणजे जगाचा निरास करून) मला पहावे तसा मी नाही तर सर्व सरसकट मीच आहे. ॥१४-१२७॥
हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा ।
गांठीं बांध वीरा । जीवाचिये ॥ १२८ ॥
हे वीरा अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस बांधून ठेव. म्हणजे तू आपले अंत:करणात या सिद्धांताचा दृढनिश्चय कर). ॥१४-१२८॥
आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला ।
गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥ १२९ ॥
आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमधे गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. ॥१४-१२९॥
जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण ।
भोगिजे गा जाण । कपिध्वजा ॥ १३० ॥
हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामधे आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दु:ख आपण स्वत:च भोगावे. ॥१४-१३०॥
कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें ।
देखती तेंही कळे । तयांसीचि ॥ १३१ ॥
अथवा एखादी पांढरी वस्तु पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात. (ह्याप्रमाणे डोळ्यांकडून काविळीचे ज्ञान होऊन त्यामुळे दिसणार्या पिवलेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात. ॥१४-१३१॥
नाना सूर्यप्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे ।
तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥ १३२ ॥
अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते. ॥१४-१३२॥
पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया ।
बिहोनि बिहालिया । आन आहे ? ॥ १३३ ॥
अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का ? तर नाही, म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे. ॥१३३॥
तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें ।
तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥ १३४ ॥
त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो. ॥१४-१३४॥
बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें ।
नेणणेनि उपजे । आपलेनि ॥ १३५ ॥
माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध (दिसत) असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारण्भूत होते व आपल्या नेणण्यानेच (आपल्या यथार्थस्वरूपाच्या अज्ञानानेच) (बंध) उत्पन्न होतो. ॥१४-१३५॥
तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा ।
आवडे तें परियेसा । अर्जुनदेवा ॥ १३६ ॥
तर अर्जुनदेवा, कोणत्या गुणाने व कसा मी बंधन आहे असे वाटते ते ऐका. ॥१४-१३६॥
गुण ते किती किंधर्म । कायि ययां रूपनाम ।
कें जालें हें वर्म । अवधारीं पां ॥ १३७ ॥
गुण किती आहेत व त्यांचे धर्म काय ? त्यांचे नाव व रूप काय ? व ते कोठे उत्पन्न झाले ? हे वर्म ऐक. ॥१४-१३७॥
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५ ॥
हे महाबाहो, सत्व, रज व तम हे गुण आहेत व प्रकृति यांची जन्मभूमि आहे. हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही (आत्मा) त्याला बंधन करतात. ॥१४-५॥
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम ।
आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥ १३८ ॥
तरी सत्व, रज व तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृति ही जन्मभूमि आहे. ॥१४-१३८॥
येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम ।
तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥ १३९ ॥
या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे. ॥१४-१३९॥
हें एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं ।
वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥ १४० ॥
ज्याप्रमाणे एका देहाचे ठिकाणी वयाच्या तीन अवस्था (बाल्य, तारुण्य व वार्धक्य) भासतात, त्याप्रमाणे एकाच अंत:करणवृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज. ॥१४-१४०॥
कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे ।
तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥ १४१ ॥
अथवा हिणकस धातु सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते, तसे तसे सोने पाच रुपये तोळा किंमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते. ॥१४-१४१॥
पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें ।
सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥ १४२ ॥
आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते ॥१४-१४२॥
तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे ।
ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥ १४३ ॥
त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ति ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व, रज होऊन तम देखील होते. ॥१४-१४३॥
अर्जुना गा जाण । ययां नाम गुण ।
आतां दाखऊं खूण । बांधिती ते ॥ १४४ ॥
अर्जुना यांना गुण असे म्हणतात, असे समज. आता हे गुण (आत्म्याला) कसे बांधतात ते वर्म दाखवतो. ॥१४-१४४॥
तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे ।
हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ॥ १४५ ॥
तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच (अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो) तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो. ॥१४-१४५॥
आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं ।
ममत्वाची सूती । घे ना जंव ॥ १४६ ॥
जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा (जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा) अभिमान घेतो न घेतो इतक्यात ॥१४-१४६॥
जैसी मीनाच्या तोंडीं । पडेना जंव उंडी ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ॥ १४७ ॥
ज्याप्रमाणे मशाच्या तोंडात आमिष पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो, ॥१४-१४७॥
तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् ।
सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥ ६ ॥
त्यामधे सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रवरहित आहे हे पापरहिता अर्जुना, तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने (या दोन पाशांनी) प्राण्याला बद्ध करतो. (म्हणजे मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो) ॥१४-६॥
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें ।
वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥ १४८ ॥
त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो. ॥१४-१४८॥
मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी ।
स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा ॥ १४९ ॥
मग ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. ॥१४-१४९॥
तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे ।
मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥ १५० ॥
तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो. कोणाताही लाभ झाला तर आनंद पावतो, आपण संतुष्ट आहोत हेही पहातो व आपणास धन्य मानतो. ॥१४-१५०॥
म्हणे भाग्य ना माझें ? । आजि सुखियें नाहीं दुजें ।
विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥ १५१ ॥
आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय ? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो. ॥१४-१५१॥
आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें ।
जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ॥ १५२ ॥
आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो. ॥१४-१५२॥
आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे ।
कीं विषयज्ञानें होये । गगनायेवढा ॥ १५३ ॥
आपण स्वत: ज्ञानरूप आहोत ते आपले ज्ञानरूपत्व) गेले, त्याचे दु:ख मानत नाही तर उलट विषयज्ञानाने आकाशाएवढा होतो. (आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो). ॥१४-१५३॥
रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं ।
तो दों दाणां मानी । इंद्रु ना मी ॥ १५४ ॥
जसा एखादा राजा स्वप्नात आपणा भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन दाणे मिळाले की मी इंद्र नाही काय असे मानतो. ॥१४-१५४॥
तैसें गा देहातीता । जालेया देहवंता ।
हों लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें ॥ १५५ ॥
अर्जुना, देहातीत जो आत्मा, तो देहवंत झाल्यावर (म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर) त्याला बाह्यज्ञानाने तसे होऊ लागते, ॥१४-१५५॥
प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे ।
किंबहुना सुझे । स्वर्गवरी ॥ १५६ ॥
संसारसंबंधी शास्रे तो जाणतो, यज्ञाविद्या त्यास समजते, फार काय सांगावे ? त्यास स्वर्गापर्यंत सर्व दिसते. ॥१४-१५६॥
आणि म्हणे आजि आन । मीवांचूनि नाहीं सज्ञान ।
चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें ॥ १५७ ॥
आणि सांप्रत माझ्यावचून दुसरा कोणी जाणाता नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश आहे असे म्हणतो. ॥१४-१५७॥
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कानी ।
बैलाची करी वानी । पांगुळाचिया ॥ १५८ ॥
याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी (नंदीबैलासारखी) त्याची स्थिती करतो. ॥१४-१५८॥
आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी ।
बांधिजे तें अवधारीं । सांगिजैल ॥ १५९ ॥
आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्[रकार सांगण्यात येईल. ॥१४-१५९॥
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥ ७ ॥
रजोगुण हा अभिलाषरूप असून तृष्णा व आसक्ति यापासून उत्पन्न होतात असे समज. हे कौंतेया, तो कर्मसंगतीने प्राण्याला बद्ध करतो (म्हणजे मी अमूक करीन, मी तमूक करीन) अशा इच्छांनी बद्ध करतो. ॥१४-७॥
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे ।
हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥ १६० ॥
रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषाचे (लोभाचे) नेहेमीचे (कधी कमी न होणारे तारुण्य आहे. ॥१४-१६०॥
हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाच्या मदीं लागे ।
मग वारया वळघे । तृष्णेचिया ॥ १६१ ॥
या रजोगुणाने जीवात (अंत:करणात) थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वार्यावर स्वार होतो. ॥१४-१६१॥
घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें ।
आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ? ॥ १६२ ॥
पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले असता त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असे म्हणता येईल काय ? ॥१४-१६२॥
तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड ।
इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ॥ १६३ ॥
त्याप्रमाणे इच्छा खवळते व दु:खासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व इंद्राचे वैभव सुद्धा थोडे वाटू लागते. ॥१४-१६३॥
तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया ।
तर्ही म्हणे एखादिया । दारुणा वळघो ॥ १६४ ॥
तशाप्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरुपर्वत हाती आला तरी असे म्हणतो की याही पेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे स्थान असेल तर तेही मिळावण्याच्या खटपटीस लागू. ॥१४-१६४॥
जीविताचि कुरोंडी । वोवाळूं लागे कवडी ।
मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥ १६५ ॥
जवळचे असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे असा तो अतितृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो ॥१४-१६५॥
आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल ।
ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ॥ १६६ ॥
कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता (जन्माला आल्याचे सार्थक) मानतो. ॥१४-१६६॥
म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें ।
इयालागीं धांवें । याग करूं ॥ १६७ ॥
स्वर्गाला गेले असता तेथे काय खावे असे म्हणतो व याकरता यज्ञ करण्यास धावतो. ॥१४-१६७॥
व्रतापाठीं व्रतें । आचरें इष्टापूर्तें ।
काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं ॥ १६८ ॥
व्रतामागे व्रते आचरण करतो, इष्ट व पूर्त कर्मे करतो व काम्यकर्मावाचून दुसर्या कशाला हाताने स्पर्श करत नाही. ॥१४-१६८॥
पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसांवो नेणें वीरा ।
तैसा न म्हणे व्यापारा । रात्रदिवस ॥ १६९ ॥
हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही. ॥१४-१६९॥
काय चंचळु मासा ? । कामिनीकटाक्षु जैसा ।
लवलाहो तैसा । विजूही नाहीं ॥ १७० ॥
रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे ? जसा स्त्रीचा नेत्रकटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमधे तसा (त्या रजोगुणी पुरुषाइतका) चंचलतेचा वेग नसतो. ॥१४-१७०॥
तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें ।
आगीमाजीं रिगे । क्रियांचिये ॥ १७१ ॥
तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमधे प्रवेश करतो. ॥१४-१७१॥
ऐसा देहीं देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा ।
खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा ॥ १७२ ॥
देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामधे असतो तेव्हा तृष्णेची बेडी (आपल्या पायामधे) अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. ॥१४-१७२॥
हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन ।
परिस आतां विंदाण । तमाचें तें ॥ १७३ ॥
देहधारी जो आत्मा त्यास देहामधे असतांना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते, आता तमोगुणाचे कौशल्य ऐक. ॥१४-१७३॥
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८ ॥
तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो व म्हणून तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो असे जाण. हे भारता, प्रमाद आळस व निद्रा यांनी (या तीन पाशांनी) तो प्राण्याला बद्ध करतो. ॥१४-८॥
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें ।
मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥ १७४ ॥
व्यवहाराचीही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते (असा तमोगुण हा पडदा आहे) व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे. ॥१४-१७४॥
अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें ।
जेणें विश्व भुललें । नाचत असे ॥ १७५ ॥
त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात. ॥१४-१७५॥
अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र ।
हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें ॥ १७६ ॥
अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. (फार काय सांगावे?) जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे. ॥१४-१७६॥
पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म ।
चौखुरी देहात्म- । मानियातें ॥ १७७ ॥
अर्जुना तो तमोगुण अशा प्रकारे युक्ति रचून (तयार करून) देह हाच आत्मा असे समजणार्याला जखडून बांधतो. ॥१४-१७७॥
हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं ।
आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ॥ १७८ ॥
आणि चराचरात कोणत्याही शरीरामधे हा खरोखर एकच माजू लागला की मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. ॥१४-१७८॥
सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य ।
माल्हाती जे दार्ढ्य । आलस्याचें ॥ १७९ ॥
सर्व इंद्रियांचे ठिकाणी जडपणा येतो, मनामधे मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे (मन आणि इंद्रिये) आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात. ॥१४-१७९॥
आंगें आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी ।
नुसती परवडी । जांभयांची ॥ १८० ॥
अंगाने अंग मोडतो (अंगाला आळोखे पिळोखे देतो) व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एकापाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो. ॥१४-१८०॥
उघडियाची दिठी । देखणें नाहीं किरीटी ।
नाळवितांचि उठी । वो म्हणौनि ॥ १८१ ॥
अर्जुना त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता ‘ओ’ म्हणून उठतो. ॥१४-१८१॥
पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी ।
तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें ॥ १८२ ॥
जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसर्या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडीत नाही. ॥१४-१८२॥
पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो ।
परी उठणें हा भावो । उपजों नेणें ॥ १८३ ॥
पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो, परंतु ‘उठावे’ हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहीत नसत. ॥१४-१८३॥
उचितानुचित आघवें । झांसुरता नाठवे जीवें ।
जेथींचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ॥ १८४ ॥
आळसाने स्वस्थ निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंत:करणात आठवत नाही व जेथेच्या तेथे (जेथे पडला असेल तेथे) लोळावे अशी त्याची बुद्धी असते. ॥१४-१८४॥
उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें ।
पायाचें शिरियाळें । मांडूं लागे ॥ १८५ ॥
दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुढघ्यात डोके घालतो. ॥१४-१८५॥
आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु ।
झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ॥ १८६ ॥
आणि निद्रेविषयी अंत:करणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे असे म्हणतो. ॥१४-१८६॥
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ॥ १८७ ॥
ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे व्हावे आणि मग निजूनच रहावे यावाचून दुसरा नाद नाही ॥१४-१८७॥
कां वाटें जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे ।
अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥ १८८ ॥
सहज वाटेने जात असता कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही. ॥१४-१८८॥
तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे ।
निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥ १८९ ॥
जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य त्वेषाच्या आवेशाने कोणात्या एखाद्या वेळी कामास निघाला असता काय करील याचा नेम नाही. ॥१४-१८९॥
केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें ।
हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें ॥ १९० ॥
केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमूक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्य़ास कळत नाही. ॥१४-१९०॥
वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा ।
पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥ १९१ ॥
अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो. ॥१४-१९१॥
तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा ।
किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥ १९२ ॥
त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबल इच्छा असते. फार काय सांगावे ? याप्रमाणे त्यास प्रमाद (भलतेच करणे) आवडतो. ॥१४-१९२॥
एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिबंधीं ।
बांधे निरुपाधी । चोखटातें ॥ १९३ ॥
याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो. ॥१४-१९३॥
जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें ।
व्योम घटें आवरे । तें घटाकाश ॥ १९४ ॥
ज्याप्रमाने अग्नीने लाकुड व्यापले असता, अग्नि हा लाकडाच्या आकाराचा दिसतो अथवा पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात ॥१४-१९४॥
नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें ।
तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे ॥ १९५ ॥
अथवा (ज्यावेळी) सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो (व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो), तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. ॥१४-१९५॥
सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥ ९ ॥
हे भारता, सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ति उत्पन्न करतो. आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ति उत्पन्न करतो. ॥१४-९॥
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥
हे भरतकुलोत्पन्ना, रज व तम यांना जिंकून सत्व प्रगट होतो, रज व सत्व यांना जिंकून तम प्रगट होतो व तम व सत्व यांना जिंकून रज प्रगट होतो. ॥१४-१०॥
पैं हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त ।
तैं करी संतप्त । देह जेवीं ॥ १९६ ॥
परंतु कफ व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते, तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते, ॥१४-१९६॥
कां वरिष आतप जैसें । जिणौनि शीतचि दिसे ।
तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ॥ १९७ ॥
अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून (हे गेल्यानंतर) जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते ॥१४-१९७॥
नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती ।
तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥ १९८ ॥
अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ति सुषुप्तीच (जडमूढ) होते ॥१४-१९८॥
तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी ।
तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी ? ॥ १९९ ॥
त्याप्रमाणेच रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून ‘मी सुखी आहे ना?’ असे म्हणावतो. ॥१४-१९९॥
तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज ।
वळघें तैं सहज । प्रमादीं होय ॥ २०० ॥
त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी (चुका करणारा) होतो ॥१४-२००॥
तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं ।
घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥ २०१ ॥
त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो ॥१४-२०१॥
तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन गोमटें नाहीं ।
ऐसें मानी देहीं । देहराजु ॥ २०२ ॥
तेव्हा कर्मावाचून दुसरे काही सुंदरच नाही असे देहात देहराज जो आत्मा तो मानतो. ॥१४-२०२॥
त्रिगुण वृद्धि निरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण ।
आतां सत्त्वादि वृद्धिलक्षण । सादर परियेसीं ॥ २०३ ॥
तीन गुणांची वृद्धी कशी होते, याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले असे समज. आता सत्वादि वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐका. ॥१४-२०३॥
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११ ॥
या देहामधे सर्व इंद्रियांचे ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे म्हणावे. ॥१४-११॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२ ॥
हे भरतश्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असता लोभप्रवृत्ति (पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल), (अचाट) कर्माचा आरंभ, दुर्धर अभिलाष, विषयाची लालसा ही उत्पन्न होतात. १२.
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३ ॥
हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ति, प्रमाद व मोह ही निर्माण होतात. १३.
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान् प्रतिपद्यते ॥ १४ ॥
सत्त्वगुणाची वाढ असतांना, जर मनुष्य मृत्यु पावला तर तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो. १४.
रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५ ॥
रजोगुणाची वाढ असतांना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा (मनुष्य) लोकी जन्म पावतो; त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धि असतांना मरण पावल्यास पुरुष, (लोह, लोष्ट, पाषाण इत्यादि) ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो. १५.
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें ।
वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ॥ २०४ ॥
बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुणा या देहात वाढतो, तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. ॥१४-२०४॥
जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडें ।
वसंतीं पद्मखंडें । द्रुती जैसी ॥ २०५ ॥
की वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो, तशी बुद्धि आतमधे न मावता बाहेर पडते. ॥१४-२०५॥
सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी ।
साचचि करचरणीं । होती डोळे ॥ २०६ ॥
सर्व इंद्रियांचे अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. (म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते). ॥१४-२०६॥
राजहंसापुढें । चांचूचें आगरडें ।
तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे ॥ २०७ ॥
राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळीक करते. ॥१४-२०७॥
तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं ।
नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं ॥ २०८ ॥
त्याप्रमाणे पापपुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारी होतात. व त्यावेळेला अरे अर्जुना, इंद्रियनिग्रह हाच (आपणाहून) सेवाचाकरी करत असतो. ॥१४-२०८॥
नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी ।
अवाच्य तें टाळी । जीभचि गा ॥ २०९ ॥
जे ऐकू नये ते कानच वर्ज्य करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते. ॥१४-२०९॥
वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें ।
निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे ॥ २१० ॥
दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो, त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाहीत. ॥१४-२१०॥
धाराधरकाळें । महानदी उचंबळे ।
तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं ॥ २११ ॥
पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. ॥१४-२११॥
अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं ।
ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ॥ २१२ ॥
अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ति सर्वत्र पसरते. ॥१४-२१२॥
वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे ।
मानस विटे । विषयांवरी ॥ २१३ ॥
वासना एकत्र होतात. (एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते). संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते. ॥१४-२१३॥
एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें ।
आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी ॥ २१४ ॥
याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यु घडला ॥१४-२१४॥
कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें ।
पढियंतें पाहुणें । स्वर्गौनियां ॥ २१५ ॥
तर जशी घरामधे (विपुल) संपत्ती आहे आणि त्याच प्रमाणे त्या संपत्तिवाल्याची उदार वृत्ति असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती व नंतर स्वर्गसुख त्यास का मिळू नये ? ॥१४-२१५॥
तरी जैसीचि घरींची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती ।
मा परत्रा आणि कीर्ती । कां नोहावें ? ॥ २१६ ॥
अथवा सुकाळ (धान्य व जल यांची विपुलता) प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य (जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य) स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे ॥१४-२१६॥
मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया ।
तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा ? ॥ २१७ ॥
अर्जुना मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का ? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो (सत्वगुणाने स्वभावत: युक्त अशा जन्माशिवाय) दुसरीकडे कोठे जाईल ? ॥१४-२१७॥
जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट ।
निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ॥ २१८ ॥
कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण, तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट (शरीर) टाकून निघतो ॥१४-२१८॥
अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये ।
किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ॥ २१९ ॥
असा अकस्मात जो जातो, तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो. (त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो). ॥१४-२१९॥
सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा ।
गेलिया अपुरा । होय काई ? ॥ २२० ॥
राजा हा राजेपणाने (गादीवर असतांना) डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणात काही कमी येईल काय ? अर्जुना, सांग बरे ॥१४-२२०॥
नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ॥ २२१ ॥
अथवा अर्जुना येथील (या गावातील) दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे ॥१४-२२१॥
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी ।
तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी ॥ २२२ ॥
त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व (प्रकाश) ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. ॥१४-२२२॥
पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं ।
विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ॥ २२३ ॥
महतत्वादि अनुक्रमाचा विचार करून अखेरीस (विचार करणारा) त्या विचारांसकट (ज्या ब्रह्मस्वरूपात) लीन होतो ॥१४-२२३॥
छत्तिसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें ।
तिन्ही नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें ॥ २२४ ॥
वेदांतात (गीतेत १३ व्या अध्यायाच्या ५/६ श्लोकात सांगितल्याप्रमाणे) छतीस तत्वे मानली आहेत, त्यांच्या मते हे ब्रह्म सदतिसावे आहे, सांख्यात चोवीस तत्वे मानली आहेत म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म प्ंचविसावे आहे, व सत्वगुणादि तीन गुणांस नाहीसे करून जे स्वभावत: चौथे आहे ॥१४-२२४॥
ऐसें सर्व जें सर्वोत्तम । जालें असे जया सुगम ।
तयासवें निरुपम । लाहे देह ॥ २२५ ॥
असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास (ज्या कुलात) सुलभ झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्यास निरुपम देह मिळतो. ॥१४-२२५॥
इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख ।
बैसोनि जैं आगळीक । धरी रज ॥ २२६ ॥
हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात (कमी होतात) व रजोगुण ज्यावेलेला वृद्धी पावतो ॥१४-२२६॥
आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा ।
माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा ॥ २२७ ॥
तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. ॥१४-२२७॥
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी ।
तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ॥ २२८ ॥
पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे (बरे वाईट न पहाता) एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमधे मोकळीक असते. ॥१४-२२८॥
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे ।
मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ॥ २२९ ॥
परस्त्री वगैरेंशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चरतो. ॥१४-२२९॥
हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु ।
वेंटाळितां अलाभु । तें तें उरे ॥ २३० ॥
येथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसर्याच्या वस्तु लुबाडतांना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते, तेवढ्याच वस्तू शिल्लक रहातात. ॥१४-२३०॥
आणि आड पडलिया । उद्यमजाती भलतिया ।
प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥ २३१ ॥
आणि अर्जुना, कोणाताही धंदा समोर आला असता (करण्याचा प्रसंग आला असता) तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही. ॥१४-२३१॥
तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु ।
ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥ २३२ ॥
त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नाद घेऊन उठतो. ॥१४-२३२॥
नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं ।
महावनें लावावीं । नानाविधें ॥ २३३ ॥
शहरेच वसवावीत, जलाशय (तळी विहिरी) वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत ॥१४-२३३॥
ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं ।
आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥ २३४ ॥
अशा अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याचे कामात पुरे म्हणत नाही. ॥१४-२३४॥
सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे ।
ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व ॥ २३५ ॥
समुद्र दुर्लभ खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी, त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे. खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या इतकीही किंमत नाही, असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. ॥१४-२३५॥
स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा ।
विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥ २३६ ॥
विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातले जाते. ॥१४-२३६॥
इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं ।
आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ॥ २३७ ॥
याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे टवटवीत (व्यक्त) होतात. व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर (मृत्यु आला) ॥१४-२३७॥
तरी आघवाचि इहीं । परिवारला आनी देहीं ।
रिगे परी योनिही । मानुषीचि ॥ २३८ ॥
तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो रजोगुणी पुरुष दुसर्या देहात प्रवेश करतो परंतु त्या देहाची मनुष्याचीच योनी असते. ॥१४-२३८॥
सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं ।
तरी काय अवधारीं । रावो होईल ? ॥ २३९ ॥
हे पहा एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का ? तर तेवढ्यावरून तो राजा होईल का ? ॥१४-२३९॥
बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें ।
नेईजो कां वर्हाडें । समर्थाचेनी ॥ २४० ॥
बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी (गाडीला जोडून नेला) तरी त्याच्या कपाळाचा कडबा खाणे काही चुकत नाही. ॥१४-२४०॥
म्हणौनि व्यापारा हातीं । उसंतु दिहा ना राती ।
तैसयाचिये पांती । जुंपिजे तो ॥ २४१ ॥
म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जात नाही. (तशांच्या कुळात तो जन्मास येत नाही). ॥१४-२४१॥
कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं ।
जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥ २४२ ॥
फार काय सांगावे ? जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो, तो काम्य कर्मे करणार्या लोकांच्या कुळात जन्म पावतो. ॥१४-२४२॥
मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती ।
गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥ २४३ ॥
त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो (म्हणजे वाढतो). ॥१४-२४३॥
तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें ।
तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ॥ २४४ ॥
त्या वेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो. ती चांगल्या श्रोत्रबळाने ऐक. ॥१४-२४४॥
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन ।
रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥ २४५ ॥
तर जसे अमावास्येच्या रात्रीचे आकाश सूर्य, चंद्र यांनी रहित असते तसे त्याचे मन होते. ॥१४-२४५॥
तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस ।
विचाराची भाष । हारपे तैं ॥ २४६ ॥
त्याप्रमाणे अंत:करण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंत:करणात सारासारविवेकाची गोष्ट नाहीशी होते. ॥१४-२४६॥
बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी ।
आठवो देशधडी । जाला दिसे ॥ २४७ ॥
बुद्धि जडपणात धोंड्यालाही दाद देत नाही. (मागे सरते). येथेपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोधडी झालेली असते. ॥१४-२४७॥
अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे ।
एकलेनि घेपे दीजे । मौढ्य तेथ ॥ २४८ ॥
शरीराच्या आतबाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळित दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते. ॥१४-२४८॥
आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियांपुढें ।
मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय ॥ २४९ ॥
(ज्याप्रमाणे महारवाड्यापुढे हाडे रोवलेली पाहून पहाणारा जसा हा महारवाडा आहे असे समजतो) त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियरूपी महारवाड्यावर आचारभ्रष्टतारूपी हाडे रोवलेली असतात. (त्यावरून हा तमोगुणी आहे असे समजले जाते). व हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचारभ्रष्टतेकडे जातात. (म्हणजे तो मरेपर्यांत भ्रष्टाचरणच करतो. ॥१४-२४९॥
पैं आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे ।
आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें ॥ २५० ॥
पहा, आणखी त्याचे ठिकाणी एक लक्षण दिसते. ते हे की जसे घुबडास अंधारातच दिसते त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते. ॥१४-२५०॥
तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे ।
तियेविषयीं धांवे । घेती करणें ॥ २५१ ॥
त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता इंद्रिये धाव घेतात. ॥१४-२५१॥
मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे ।
निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें ॥ २५२ ॥
हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो, सन्निपात वायूशिवाय बरळतो आणि वेडा मनुष्य जसा प्रेमावाचून भुलतो तसा हा भुलतो.॥१४-२५२॥
चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे ।
ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि ॥ २५३ ॥
त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते. पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात. ॥१४-२५३॥
किंबहुना ऐसैसीं । इयें चिन्हें तम पोषीं ।
जैं वाढे आयितीसी । आपुलिया ॥ २५४ ॥
फार काय सांगावे ? जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने (पूर्णपणे) वाढतो, तेव्हा तो अशी ही चिन्हे पोसतो. ॥१४-२५४॥
आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी पडे खागें ।
तरी तेतुलेनि निगे । तमेंसीं तो ॥ २५५ ॥
आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असतांना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले, तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. ॥१४-२५५॥
राई राईपण बीजीं । सांठवूनियां अंग त्यजी ।
मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे ? ॥ २५६ ॥
मोहोरीचे झाड आपला मोहोरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकील (ते मोहोरीचे झाड मरेल) मग त्य़ा बीजापासून जो अंकुर फुटेल, त्याला मोहोरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय ? ॥१४-२५६॥
पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां ।
कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥ २५७ ॥
अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन (अग्नीपासून दिवा लावल्यावर) मग तो पहिला अग्नी जरी विझला तरी विझेना का ? कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नि आहे. ॥१४-२५७॥
म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें ।
देह जाय तैं मागौतें । तमाचेचि होय ॥ २५८ ॥
म्हणून तमाच्या मोटेत संकल्पाला बांधून (म्हणजे तामस संकल्प करीत असतांना) ज्याचा देह जातो त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो. ॥१४-२५८॥
आतां काय येणें बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे ।
तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ॥ २५९ ॥
आता हे पुष्कळ बोलून काय करायचे आहे ? जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशु अथवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. ॥१४-२५९॥
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६ ॥
सात्विक (सुकृत) कर्माचे निर्मल सत्वप्रधान फल मिळते, असे ज्ञाते सांगतात. राजस कर्माचे फल दु:ख व तामस कर्माचे फल अज्ञान असते. ॥१४-१६॥
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें ।
तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौत समो ॥ २६० ॥
याच कारणाकरता जे सत्वगुणापासून उत्पन्न होते ते पुण्यकर्म असे श्रुतीचा संकेत सुचवतो. ॥१४-२६०॥
म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा ।
अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ॥ २६१ ॥
म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय. ॥१४-२६१॥
मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी फळलिया ।
जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें ॥ २६२ ॥
मग राजस ज्या क्रिया आहेत, त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे आहेत कारण की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात तरी त्या क्रियांचे फळ दु:ख हे असते. ॥१४-२६२॥
कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख ।
तैसें तें राजस देख । क्रियाफळ ॥ २६३ ॥
अथवा कडूनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर असतात, पण आत विषासारख्या कडू असतात. त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज. ॥१४-२६३॥
तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके ।
विषांकुर विखें । जियापरी ॥ २६४ ॥
ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते. ॥१४-२६४॥
सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७ ॥
सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून केवल लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही तर अज्ञान सुद्धा उत्पन्न होते. ॥१४-१७॥
म्हणौनि बा रे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना ।
जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं ॥ २६५ ॥
म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनमानाला हेतु आहे, तसा सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे, ॥१४-२६५॥
आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण ।
आपुलें विस्मरण । अद्वैता जेवीं ॥ २६६ ॥
ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप-विस्मरण हे जसे जीवदशेस येण्य़ाचे कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे. ॥१४-२६६॥
मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा ।
पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ ॥ २६७ ॥
हे शहाण्या अर्जुना. मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन दोषसमुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे. ॥१४-२६७॥
ऐसें विचाराच्या डोळां । तिन्ही गुण हे वेगळवेगळां ।
दाविले जैसा आंवळा । तळहातींचा ॥ २६८ ॥
तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले. ॥१४-२६८॥
तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढ पतनीं ।
सत्त्वावांचूनि नाणीं । ज्ञानाकडे ॥ २६९ ॥
तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले. ॥१४-२६९॥
म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती ।
सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी ॥ २७० ॥
म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा (आर्त जिज्ञासु, अर्थार्थी या तीन भक्तींचा) त्याग करून (ज्ञानी भक्त) ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणपर्यंत सात्विक वृत्तीने रहाण्याचा निश्चय करतात. ॥१४-२७०॥
ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८ ॥
सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी (स्वर्गादि लोकी) जातात, रजोगुणी पुरुष मध्येच (मनुष्यलोकी) रहातात. निंद्य गुणांमधे असलेले तामसी पुरुष अधोगतीला (पशुपक्ष्यादिकांच्या जन्माला जातात). ॥१४-१८॥
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें ।
ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ॥ २७१ ॥
त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने त्यांचे जगणे व मरणे असते, ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. ॥१४-२७१॥
इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे ।
तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं ॥ २७२ ॥
याचप्रमाणे जे रजोगुणात जगतात व मरतात ते मृत्युलोकात मनुष्य होतात. ॥१४-२७२॥
तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें ।
जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ॥ २७३ ॥
त्या मृत्युलोकात सुखदु:खाची खिचडी, देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते. व जेथे (ज्या मृत्युलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही. ॥१४-२७३॥
आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं ।
ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥ २७४ ॥
व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात, ते नरक भूमीला जाण्याचा दाखला घेतात. ॥१४-२७४॥
एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता ।
दाविली सकारणता । आघवीचि ॥ २७५ ॥
अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादि तिन्ही गुण ऊर्ध्वादिगतींना कसे कारण आहेत, हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले. ॥१४-२७५॥
पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें ।
देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ॥ २७६ ॥
वस्तु ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तु (विस्मृतीने) आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते. ॥१४-२७६॥
जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे ।
तैं हारी जैत होईजे । आपणपांचि ॥ २७७ ॥
आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्यावेळेस राजा स्वप्न पहातो, त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी ढडलेला जय अथवा पराजय आपणच होतो. (त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे) राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे), ॥१४-२७७॥
तैसे मध्योर्ध्व अध । हे जे गुणवृत्तिभेद ।
ते दृष्टीवांचूनि शुद्ध । वस्तुचि असे ॥ २७८ ॥
त्याप्रमाणे (वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे) उत्तम गति, मध्यम गति व अधोगति हे गतीचे भेद गुणवृत्तींच्या भेदामुळे आहेत. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तु शुद्ध आहे तशीच आहे. ॥१४-२७८॥
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टाऽनुपश्यति ।
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९ ॥
जेव्हा गुणातीत पुरुष (गुणांचा) द्रष्टा होऊन गुणांवाचून इतर कर्ता नाही (म्हणजे गुणच कर्मे करतात) असे जाणतो व गुणांहून वेगळा जो (साक्षी) आत्मा त्याला जाणतो तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मत्स्वरूप त्याप्रत पावतो. ॥१४-१९॥
परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो ।
परिसें तें सांगतसों । मागील गोठी ॥ २७९ ॥
परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो. ऐक. ॥१४-२७९॥
तरी ऐसें जाणिजे । सामर्थ्यें तिन्ही सहजें ।
होती देहव्याजें । गुणचि हे ॥ २८० ॥
तर हे तिन्ही गुणाच आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावत:च देहाच्या निमित्ताने होतात. (देहच बनतात) ॥१४-२८०॥
इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे ।
कां आंगवे तरुवरें । भूमिरसु ॥ २८१ ॥
लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो. ॥१४-२८१॥
नाना दहिंयाचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें ।
कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं ॥ २८२ ॥
अथवा दह्याच्या रूपाने जसे दूधच परिणाम पावते अथवा उसाच्या रूपाने गोडीच जशी प्रगट होते. ॥१४-२८२॥
तैसें हे स्वांतःकरण । देहचि होती त्रिगुण ।
म्हणौनि बंधासि कारण । घडे कीर ॥ २८३ ॥
त्याप्रमाणे हे तीन गुण अंत:करणासह देहच (सूक्ष्म व स्थूल देह) होतात. म्हणून खरोखर (जीवाच्या) बंधाला कारण घडते. ॥१४-२८३॥
परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा ।
मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥ २८४ ॥
परंतु अर्जुना, आश्चर्य हे आहे की येवढे हे बंधन जिवास असताही जिवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. ॥१४-२८४॥
त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें ।
चाळितांही न खोमें । गुणातीतता ॥ २८५ ॥
तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे पुढे हालचाल करीत असताही आत्म्याच्या गुणातीततपणास धक्का लागत नाही. ॥१४-२८५॥
ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज ।
जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ॥ २८६ ॥
अशी (आत्म्याची) स्वभावत: मुक्त स्थिती आहे, ती आता तुला ऐकवतो. कारण तू (अर्जुन) ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर (भोक्ता) आहेस. ॥१४-२८६॥
आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें ।
बोलिलों तें खागें । तेवींचि हें ॥ २८७ ॥
आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते, ही जी मागे (अध्याय १३-३ मधे) तुला गोष्ट सांगितली तशीच गोष्ट आहे. ॥१४-२८७॥
तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे ।
स्वप्न कां जैसें । चेइलेनी ॥ २८८ ॥
तरी अर्जुना ज्यावेळेस अंत:करणात समजूत पटून याप्रमाणे ज्ञानप्रतीती होईल (त्यावेळेला जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते. ॥१४-२८८॥
नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनी न्याहळी ।
चळण होतां कल्लोळीं । अनेकधा ॥ २८९ ॥
अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून (एखादा मनुष्य) पहातो, ॥१४-२८९॥
कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे ।
तैसें गुणजात देखावें । न होनियां ॥ २९० ॥
आपण घेतलेल्या सोंगाने जसा नट फसला जात नाही, त्याप्रमाणे गुण न होऊन (साक्षित्वाने) सर्व गुण पहावेत. ॥१४-२९०॥
पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें ।
नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥ २९१ ॥
अथवा आकाश हे तिन्ही ऋतूस आपल्या पोटामधे धारण करून आपल्या वेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही. ॥१४-२९१॥
तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें ।
तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये ॥ २९२ ॥
त्याप्रमाणे गुणात असून जे गुणांच्या पलीकडे असे आपल्या ठिकाणी स्वत:सिद्ध आहे त्या मूळच्या स्वरूप-अहंपणावर (ब्रह्मस्वरूप-अहंतेवर) जेव्हा अहंकार बसतो (देहाहंता जाऊन स्वरूप-अहंता येते) ॥१४-२९२॥
तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता ।
हे गुणचि क्रियाजातां । नियोजित ॥ २९३ ॥
तेव्हा तेथून (स्वरूप-अहंतेहून) पहात असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत. ॥१४-२९३॥
सत्त्वरजतमांचा । भेदीं पसरु कर्माचा ।
होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥ २९४ ॥
सत्व-रज-तमांच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होते आहे, तो हा गुणांचा विकार आहे. ॥१४-२९४॥
ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा ।
वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥ २९५ ॥
वनामधे जसा वसंतऋतु वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो, तसा मी या गुणांच्या विकारांमधे (साक्षी असा कारणीभूत) आहे. ॥१४-२९५॥
कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें ।
कमळीं विकासावें । जावें तमें ॥ २९६ ॥
अथवा तार्यांच्या समुदायांनी लोपावे, सूर्यकांतमण्याने अग्नि उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे ॥१४-२९६॥
ये कोणाचीं काजें कहीं । सवितिया जैसी नाहीं ।
तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥ २९७ ॥
यापैकी कोणाच्याही कार्यामधे सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही, त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित, केवळ साक्षित्वाने, अधिष्ठानरूप होऊन राहिलो आहे. ॥१४-२९७॥
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे ।
ययाचेनि निःशेखें । उरे तें मी ॥ २९८ ॥
मी गुणांचे प्रकाशन करून परत गुणांस पहातो, गुणांच्या ठिकाणी गुणांस पहातो, गुणांच्या ठिकाणी (असणारा) गुणपणा माझ्याकडून पोसला जातो व या गुणांचा निरास झाल्यावर जे उरते ते मी आहे. ॥१४-२९८॥
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया ।
ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें ॥ २९९ ॥
अर्जुना अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्यास गुणातीतपणा (उच्च) स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो. ॥१४-२९९॥
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २० ॥
देहाला कारण असणार्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यु, जरा व इतर दु:खे यांनी मुक्त होत्साता, मनुष्य मोक्ष अमृतत्व पावतो. ॥१४-२०॥
आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक ।
जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ॥ ३०० ॥
आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे ते तो बिनचूक जाणतो. कारण की ज्ञानाने आपले (रहाण्याचे) ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. ॥१४-३००॥
किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता ।
पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥ ३०१ ॥
फार काय सांगावे ? अर्जुना, जशी नदी समुद्रापणाला पावते, त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. ॥१४-३०१॥
नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला ।
तैसा मूळ अहंतें वेढिला । तो मी म्हणौनि ॥ ३०२ ॥
जसा राघु नळिकेवरून उठून (मोकळेपणे) झाडाच्या फांदीवर बसावा, तसा तो देहाहंता सोडून स्वरूप (ब्रह्म) हेच मी आहे. म्हणून तो स्वरूप-अहंतेने वेष्टिला गेला. ॥१४-३०२॥
अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा ।
तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ॥ ३०३ ॥
अज्ञानरूपी निद्रेने जो बदाबदा घोरत होता तो हे शहाण्या अर्जुना, आत्मस्वरूपी जागा झाला. ॥१४-३०३॥
पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा ।
म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥ ३०४ ॥
अर्जुना भेदप्रतीती हाच कोणी एक आरसा, तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो (पुरुष) प्रतिबिंबाच्या (जीवपणाच्या) भासास मुकला. ॥१४-३०४॥
देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा ।
तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ॥ ३०५ ॥
हे वीरा आता ह्या पुरुषाचे ठिकाणी जीवाचे जसे ईशाशी ऐक्य होते ॥१४-३०५॥
म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी ।
वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं ॥ ३०६ ॥
म्हणून त्या पुरुषाला लागलीच मद्भावाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप होतात ॥१४-३०६॥
तेवीं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां ।
नागवे देहसंभूतां । गुणांसि तो ॥ ३०७ ॥
त्याप्रमाणे वस्तुत: मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणार्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. ॥१४-३०७॥
जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे ।
कां न विझेचि सागरें । वडवानळु ॥ ३०८ ॥
ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही ॥१४-३०८॥
तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा ।
तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं ॥ ३०९ ॥
त्याप्रमाणे गुणांच्या येण्याजाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो. ॥१४-३०९॥
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं ।
तो पाहोंही न धाडी । अहंतेतें ॥ ३१० ॥
तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामधे नाना प्रकारच्या चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पहाण्यासही पाठवत नाही. ॥१४-३१०॥
हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरीं ।
आतां काय वर्ते शरीरीं । हेंहीं नेणे ॥ ३११ ॥
येथेपर्यंत तो अंत:करणात निश्चयाचा जोर करून राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही. ॥१४-३११॥
सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं ।
ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें ॥ ३१२ ॥
आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यानंतर ती त्याची कात कोणी सांभाळावी ? तसे (त्या पुरुषाच्या देहाचे) झाले आहे. ॥१४-३१२॥
कां सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा ।
माघारा कमळकोशा । नयेचि तो ॥ ३१३ ॥
अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही, ॥१४-३१३॥
पैं स्वरूपसमरसें । ऐक्य गा जालें तैसें ।
तेथ किं धर्म हें कैसें । नेणें देह ॥ ३१४ ॥
अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाची तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे, हे तो जाणत नाही. ॥१४-३१४॥
म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण ।
ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया ॥ ३१५ ॥
म्हणून जन्म, म्हातारपण व मरण इत्यादि देहाचे जे सहा गुण. ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले. त्याला (तो आत्मस्वरूप असल्यामुळे) त्यांचा काही एक संबंध राहिला नाही. ॥१४-३१५॥
घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया ।
महदाकाश अपैसया । जालेंचि असे ॥ ३१६ ॥
घट फुटल्यावर व घटाच्या खापर्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते. ॥१४-३१६॥
तैसी देहबुद्धी जाये । जैं आपणपां आठौ होय ।
तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी ? ॥ ३१७ ॥
त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण होते, तेव्हा आत्मस्वरूपावाचून दुसरे काही आहे काय ? ॥१४-३१७॥
येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें ।
म्हणूनि तो मी म्हणें । गुणातीत ॥ ३१८ ॥
अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त असे त्याचे देहामधे असणे असते, म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो. ॥१४-३१८॥
यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला ।
मेघें संबोखिला । मोरु जैसा ॥ ३१९ ॥
जसा काही मेघांच्या गर्जनेने वोलावलेला मोर सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या भषणाने अर्जुन अतिशय आनंदित झाला. ॥१४-३१९॥
अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणात्नेरतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथंचैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ २१ ॥
अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा ? त्याचे आचरण कसे असते ? या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो ? ॥१४-२१॥
तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे ।
जयामाजीं वसे । ऐसा बोधु ॥ ३२० ॥
त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज, ज्या पुरुषामधे असा बोध रहातो, तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? ॥१४-३२०॥
तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे ।
हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि ॥ ३२१ ॥
तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो ? व तो गुणांचे निवारण कसे करतो ? आपण कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला सांगावे. ॥१४-३२१॥
यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा ।
परिहारु आकर्णा । बोलतु असे ॥ ३२२ ॥
ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी सहा गुणांचा राजा (श्रीकृष्ण) उत्तर देत आहे ऐका. ॥१४-३२२॥
म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई ।
तें नामचि तया पाहीं । सत्य लटिकें ॥ ३२३ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्मे करतो व गु्णातीत कसा तरून जातो हे एवढेच असंबंद्ध काय विचारतोस ? हे तुझे विचारणे ‘खरे हे कसे खोटे आहे ?’ असे विचारण्यासारखे विसगंत आहे ? ॥१४-३२३॥
गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे ।
ना होय तरी नांगवे । गुणां यया ॥ ३२४ ॥
(अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात). गुणातीत ज्याला म्हणतात, तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच अथवा तो जरी गुणात असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही. ॥१४-३२४॥
परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें ।
गुणांचिये रवरवे- । माजीं असतां ॥ ३२५ ॥
या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नंची दुरुस्ती करतात) पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असतांना तो गुणांच्या आधीन आहे किंवा तो गुणांच्या आधीन नाही हे कसे ओळखावे ? ॥१४-३२५॥
हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी ।
परिस आतां तयासी । रूप करूं ॥ ३२६ ॥
हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तू ऐक. ॥१४-३२६॥
श्रीभगवानुवाच
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥ २२ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, (सत्वगुणाचे कार्य) प्रकाश, (रजोगुणाचे कार्य) प्रवृत्ति आणि (तमोगुणाचे कार्य) मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही व प्राप्त झाली नसतांना तो त्यांची इच्छा करत नाही. ॥१४-२२॥
तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें ।
प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळुनि ॥ ३२७ ॥
तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्यावेळेला प्रवृत्तीने वेढला जातो, त्या वेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. ॥१४-३२७॥
तैं मीचि कां कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ ।
दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं ॥ ३२८ ॥
तेव्हा (त्या गुणातीत पुरुषाला) ‘मी एक कर्मठ आहे’ असा अभिमान चढत नाही अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही. ॥१४-३२८॥
अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके ।
तैं सुविद्यता तोखें । उभजेही ना ॥ ३२९ ॥
अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने (मी ज्ञानी आहे असा) हर्षभरित होत नाही. (अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही) तरी त्याला खेदही होत नाही. ॥१४-३२९॥
कां वाढिन्नलेनि तमें । न गिळिजेचि मोहभ्रमें ।
तैं अज्ञानत्वें न श्रमे । घेणेंही नाहीं ॥ ३३० ॥
अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष, मोह व भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही, (त्याचप्रमाणे) तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही, अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही. ॥१४-३३०॥
पैं मोहाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी ।
ज्ञानें कर्में नादरी । होतां न दुःखी ॥ ३३१ ॥
मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही. ॥१४-३३१॥
सायंप्रातर्मध्यान्हा । या तिन्ही काळांची गणना ।
नाहीं जेवीं तपना । तैसा असे ॥ ३३२ ॥
ज्याप्रमाणे सूर्याला प्रात:काल, मध्याह्न काल व सायंकाल या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष आतो. (म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते). ॥१४-३३२॥
तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असें ।
कायि जळार्णव पाउसें । साजा होय ? ॥ ३३३ ॥
त्याला काही वेगळ्याच (सत्वगुणाच्या शास्त्राचा वगैरे) प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय ? (तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे). ॥१४-३३३॥
ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तयां कां गमे ।
सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायी ? ॥ ३३४ ॥
अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ति झाली तर त्याला कर्मठत्व (मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान) वाटेल काय ? अर्जुना, सांग पाहू. हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय ? ॥१४-३३४॥
नातरी मोह आलिया । काई पां ज्ञाना मुकिजैल तया ।
हो मा आगीतें उन्हाळेया । जाळवत असे ? ॥ ३३५ ॥
अथवा (तमाधिक्याने)त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय ? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय ? ॥१४-३३५॥
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ २३ ॥
उदासीनासारखा रहाणारा, जो गुणांच्या (गुणकार्य जे सुखदु:खादिक यांच्या) येण्याजाण्याने चलन पावत नाही, गुण आपापली कर्मे करीत आहेत (माझा त्यांच्याशी संबंध नाही) असे जाणून तटस्थ रहातो (जो गुणांच्या हालचालीबरोबर डोलत नाही, ॥१४-२३॥
तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे ।
म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥ ३३६ ॥
त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे. म्हणून एक एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळित होत नाही. ॥१४-३३६॥
येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती ।
वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ॥ ३३७ ॥
वाटेने जाणारा वाटसरु संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला (धर्मशाळेत वगैरे) रहातो, तसा तो गुणातीत पुरुष (प्रारब्धभोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे) एवढ्या थोर अनुभावाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. ॥१४-३३७॥
तो जिणता ना हरवी । तैसा गुण नव्हे ना करवी ।
जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ॥ ३३८ ॥
ज्याप्रमाणे युद्धाची भूमी (उदास) असते, (म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते अथवा पराभव पावणारी नसते), त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून करवीत नाही. ॥१४-३३८॥
कां शरीराआंतील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु ।
नाना चोहटांचा स्थाणु । उदासु जैसा ॥ ३३९ ॥
अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो (त्याप्रमाणे जो देहादि गुणाकार्यावर उदास असतो). ॥१४-३३९॥
आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा ।
मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥ ३४० ॥
आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरुपर्वत यत्किंचितही हलत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्याजाण्याने गडबडत नाही, ॥१४-३४०॥
हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे ।
कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें ? ॥ ३४१ ॥
हे फार बोलून काय करावयाचे आहे ? आकाश जसे वार्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही ॥१४-३४१॥
स्वप्न कां गा जियापरी । जागतयातें न सिंतरी ।
गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो ॥ ३४२ ॥
जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, तसा अर्जुना तो गुणांकडून बांधला जात नाही, असे समज. ॥१४-३४२॥
गुणांसि कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहे कोडें ।
तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा ॥ ३४३ ॥
गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु तो जेव्हा गुणांचा कमीजास्तपणा पहातो, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ (प्रेक्षक) हालणार्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पहातो, तसा गुणांचे कमीजास्तपण दुरून कौतुकाने (साक्षीरूपाने) पाहातो. ॥१४-३४३॥
सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं ।
तम मोहादिकीं । वर्तत असे ॥ ३४४ ॥
सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुण मोहादिक तामसी कर्मे करतो. ॥१४-३४४॥
परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता ।
हें फुडें जाणे सविता । लौकिका जेवीं ॥ ३४५ ॥
अर्जुना ऐक. जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या (गुणातीत पुरुषाच्या) सत्तेने चालतात, हे तू पक्के समज. ॥१४-३४५॥
समुद्रचि भरती । सोमकांतचि द्रवती ।
कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा ॥ ३४६ ॥
(चंद्रोदयाने) समुद्रांना भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाझर फुटतो व चंद्रविकासी कमळे फुलतात पण चंद्र तर काही हालचाल करत नाही. ॥१४-३४६॥
कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे ।
तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ॥ ३४७ ॥
अथवा वाराच वहातो अथवा वहाण्याचा बंद होतो, पण आकाश स्थिर असते, त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही ॥१४-३४७॥
अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें ।
परिस आतां आचरणें । तयाचीं जीं ॥ ३४८ ॥
अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे ती ऐक. ॥१४-३४८॥
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियोधीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४ ॥
सुखदु:खाचे ठिकाणी समान (दृष्टी ठेवणारा) स्वस्वरूपी स्थित माती दगड व सोने ही सारखीच मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वत:ची निंदा, स्तुति समान मानणारा ॥१४-२४॥
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी ।
ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ॥ ३४९ ॥
तर अर्जुना, वस्त्राच्या आतबाहेर जसे सुताशिवाय काही नसते त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पहातो. ॥१४-३४९॥
म्हणौनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें ।
रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ॥ ३५० ॥
म्हणून ज्याप्रमाणे हरीचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते, तसे तो सुखदु:खाला सारख्या ताजव्यात घालून (सारखे मानून) वागतो. ॥१४-३५०॥
एर्हवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे ।
देहजळीं होईजे । मासोळी जैं ॥ ३५१ ॥
सहज विचार करून पाहिले तर देहरूपी जलामधे जेव्हा मासोळी होऊन राहावे (पूर्णा देहतादात्म्य घ्यावे) तेव्हाच सुखदु:ख भोगावे लागते. ॥१४-३५१॥
आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ॥ ३५२ ॥
ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देहतादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. ॥१४-३५२॥
कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग ।
निस्तरली लगबग । खळाळाची ॥ ३५३ ॥
अथवा गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहाण्याची लगबग नाहीशी केली ॥१४-३५३॥
तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया ।
तया देहीं अपैसया । सुख तैसें दुःख ॥ ३५४ ॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी (आत्मस्वरूपी) झाली, त्याला सजहच देहामधे जसे सुख तसेच दु:ख असते. ॥१४-३५४॥
रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें ।
आत्माराम देहीं आतलें । द्वंद्व तैसें ॥ ३५५ ॥
जशी रात्र तसेच उजाडणे, हे खांबाला जसे एकसारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदु:खादि द्वंद्वे आहेत. ॥१४-३५५॥
पैं निद्रिताचेनि आंगेंशीं । सापु तैशी उर्वशी ।
तेवीं स्वरूपस्था सरिशीं । देहीं द्वंद्वें ॥ ३५६ ॥
ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे, त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. ॥१४-३५६॥
म्हणौनि तयाच्या ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं ।
रत्ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु ॥ ३५७ ॥
म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमीअधिकपणा नाही व रत्न व दगड यामधे त्यास काही फरक वाटत नाही. ॥१४-३५७॥
घरा येवों पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ ।
परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥ ३५८ ॥
घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. ॥१४-३५८॥
निवटलें न उपवडे । जळीनलें न विरूढे ।
साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ॥ ३५९ ॥
ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही, अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्यबुद्धी मोडत नाही. ॥१४-३५९॥
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणौनि निंदिजो ।
परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी ॥ ३६० ॥
‘हा ब्रह्मदेव आहे’ असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा ‘नीच’ म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही ॥१४-३६०॥
तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती ।
नाहीं अंधारें कां वाती । सूर्या घरीं ॥ ३६१ ॥
त्याप्रमाणे निंदा व स्तुती ही (खेद व संतोष अशा) कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत. सूर्याच्या घरी अंधार वा उजेड नाही (म्हणजे सूर्याच्या घरी अंधार वा उजेड ही कल्पना नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदु:खाची कल्पना नाही). ॥१४-३६१॥
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५ ॥
मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रु दोन्ही समान (बुद्धी ठेवणारा) (प्रकृति सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बर्यावाईट) सर्व कर्मांचा आरंभ न करणे हे ज्याचे शील, असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. ॥१४-२५॥
ईश्वर म्हणौनि पूजिला । कां चोरु म्हणौनि गांजिला ।
वृषगजीं वेढिला । केला रावो ॥ ३६२ ॥
तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे, म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला ॥१४-३६२॥
कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले ।
परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं ॥ ३६३ ॥
अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रु अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही, त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. ॥१४-३६३॥
साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें ।
तेवीं वैशम्य मानसें । जाणिजेना ॥ ३६४ ॥
आकाशाच्या पोटात जरी सहा ऋतु येतात, तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. ॥१४-३६४॥
आणीकही एकु पाहीं । आचारु तयाच्या ठायीं ।
तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ॥ ३६५ ॥
आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा. तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. ॥१४-३६५॥
सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळले ।
जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥ ३६६ ॥
सर्व आरंभांना त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते. (संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते). अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नि तो गुणातीत पुरुष आहे. ॥१४-३६६॥
दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवें ।
सेवी जें कां स्वभावें । पैठें होये ॥ ३६७ ॥
आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंत:करणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. ॥१४-३६७॥
सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें ।
तैसी सांडीमांडी मनें । वर्जिली असे ॥ ३६८ ॥
ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दु:खही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग (अमूक एक कर्म करावयाचे नाही) व स्वीकार (अमूक एक कर्म करावयाचे) टाकलेला असतो. ॥१४-३६८॥
आतां किती हा विस्तारु । जाणें ऐसा आचारु ।
जयातें तोचि साचारु । गुणातीतु ॥ ३६९ ॥
आता ह्या बोलण्याचा कोणी विस्तार करावा ? ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. ॥१४-३६९॥
गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें ।
तो आतां आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥ ३७० ॥
ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता आणखी ऐक. असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥१४-३७० ॥
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६ ॥
अव्यभिचारी (अभेद) भक्तियोगाने जो माझी उपासना करतो, तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. ॥१४-२६॥
तरी व्यभिचाररहित चित्तें । भक्तियोगें मातें ।
सेवी तो गुणातें । जाकळूं शके ॥ ३७१ ॥
तर माझ्यावाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो, तो गुणांना ताब्यात ठेऊ शकतो. ॥१४-३७१॥
तरी कोण मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती ।
हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥ ३७२ ॥
तर मी कोण आहे, भक्ति ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे. ॥१४-३७२॥
तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा ।
रत्नीं किळावो जैसा । रत्नगचि कीं तो ॥ ३७३ ॥
या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो). तर अर्जुना, ऐक. मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे ॥१४-३७३॥
कां द्रवपणचि नीर । अवकाशचि अंबर ।
गोडी तेचि साखर । आन नाहीं ॥ ३७४ ॥
अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही. ॥१४-३७४॥
वन्हि तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ ।
रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥ ३७५ ॥
अग्नि तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या, फळे वगैरे आहे, ॥१४-३७५॥
अगा हिम जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें ।
नाना दूध मुरालें । तेंचि दहीं ॥ ३७६ ॥
अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, ॥१४-३७६॥
तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें ।
घेईं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेवीं ॥ ३७७ ॥
त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही (चंद्र पहाणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या कराव्या लागत नाहीत) ॥१४-३७७॥
घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण ।
कां नाटितां कांकण । सोनेंचि तें ॥ ३७८ ॥
तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तूपच आहे अथवा (सोन्याचे) कडे हे आटवले नसतांना ते सोनेच आहे. ॥१४-३७८॥
न उकलितां पटु । तंतुचि असे स्पष्टु ।
न विरवितां घटु । मृत्तिका जेवीं ॥ ३७९ ॥
वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळावता जशी ती घागर मातीच आहे. ॥१४-३७९॥
म्हणौनि विश्वपण जावें । मग तैं मातें घेयावें ।
तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ॥ ३८० ॥
म्हणून विश्वपण काढून टाकावे (विश्वाचा निरास करावा) व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे. ॥१४-३८०॥
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे ।
येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥ ३८१ ॥
अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ति असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. ॥१४-३८१॥
याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें ।
आपणया सकट मातें । जाणावें गा ॥ ३८२ ॥
या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्यासकट (आपणास माझ्या वेगळे न मानून ) मला जाणावे. ॥१४-३८२॥
पार्था सोनयाची टिका । सोनयासी लागली देखा ।
तैसें आपणपें आणिका । मानावें ना ॥ ३८३ ॥
अर्जुना सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते पहा त्याप्रमाणे आपल्याला (माझ्याहून) वेगळे मानू नये. ॥१४-३८३॥
तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजींचि असे लागला ।
तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ॥ ३८४ ॥
किरण हे तेजोमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते, त्या किरणांसारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. ॥१४-३८४॥
पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं ।
मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ॥ ३८५ ॥
पृथ्वीवर असलेला अल्प परमाणु जसा पृथ्वीरूप आहे अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे (तू आपला) मीपणा माझ्या ठिकाणी पहा. ॥१४-३८५॥
हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।
तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा ॥ ३८६ ॥
समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराचे ठिकाणी दुसरा (ईश्वराहून वेगळा) खरोखर नाही. ॥१४-३८६॥
ऐसेनि बा समरसें । दृष्टि जे उल्हासे ।
ते भक्ति पैं ऐसे । आम्ही म्हणों ॥ ३८७ ॥
बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टि विकसित होते त्याला आम्ही भक्ति असे म्हणतो. ॥१४-३८७॥
आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टि नांवें ।
योगाचेंही आघवें । सर्वस्व हें ॥ ३८८ ॥
हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे. ॥१४-३८८॥
सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा ।
तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ॥ ३८९ ॥
मेघ व समुद्र ह्यांच्यामधे जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याप्रमाणे (त्या पुरुषाची) वृत्ती वहावत असते, म्हणजे जेथून वृत्ति उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रहरूप असते). ॥१४-३८९॥
कां कुहेसीं आकाशा । तोंडीं सांदा नाहीं तैसा ।
तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा ॥ ३९० ॥
अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही (तर जसे आडातले आकाश हे महाकाशाशी नेहेमी मिळालेलेच असते), त्याप्रमाणे अर्जुना, तो परमरसाशी (परब्रह्माशी) ऐक्याला पावतो. ॥१४-३९०॥
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी ।
ते सोऽहंवृत्ती अवधारीं । तैसी होय ॥ ३९१ ॥
प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो. तशी ती सोऽहंवृत्ती आहे असे समज. ॥१४-३९१॥
ऐसेनि मग परस्परें । ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे ।
तैं तियेहि सकट सरे । अपैसया ॥ ३९२ ॥
याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत (जीवाच्या ठिकाणी) जेव्हा सोहंऽवृत्ति (ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती) प्रगट होते, तेव्हा ती सोहंवृत्तीसुद्धा आपोआप सरते (नाहीशी होते). ॥१४-३९२॥
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पांडवा ।
विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥ ३९३ ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळावा हेही थांबते (नाहीसे होते). ॥१४-३९३॥
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण ।
तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञानही नुरे ॥ ३९४ ॥
अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान रहात नाही. ॥१४-३९४॥
माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये ।
अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे ॥ ३९५ ॥
मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो. (आणि माझ्यात व भक्तांमधे अनादि जे ऐक्य आहे तेच प्रगट होते. ॥१४-३९५॥
आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी ।
जे एकपणाही मिठी । पडों सरली ॥ ३९६ ॥
अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच रहात नाही, कारण की आता एकपणाही सरला. ॥१४-३९६॥
किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा ।
हें तो पावें जो ऐसा । मातें भजे ॥ ३९७ ॥
फार काय सांगावे ? अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना, ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते. ॥१४-३९७॥
पुढतीं इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं ।
हे ब्रह्मता तयालागीं । पतिव्रता ॥ ३९८ ॥
शिवाय आणखी या लक्षाणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याच्या करता ब्रह्मता पतिव्रता आहे. ॥१४-३९८॥
जैसें गंगेचेनि वोघें । डळमळित जळ जें निघे ।
सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं ॥ ३९९ ॥
ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही. ॥१४-३९९॥
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी ।
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न ॥ ४०० ॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुगुटात अग्रभागी असणारे रत्न (मुकुटामणी) होतो. ॥१४-४००॥
यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था ।
याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा ॥ ४०१ ॥
अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे. ॥१४-४०१॥
परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान ।
एथ मी हन साधन । गमेन हो ॥ ४०२ ॥
परंतु माझी (श्रीकृष्णाची) भक्ति ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी (पोहोचण्याचे) साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी (कृष्ण) साधन आहे असे कदाचित तुला वाटेल ॥१४-४०२॥
तरी झणीं ऐसें । तुझ्या चित्तीं पैसें ।
पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि ॥ ४०३ ॥
तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल तर ती येऊ देऊ नकोस. अरे माझ्यावाचून ब्रह्म दुसरे नाही. ॥१४-४०३॥
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगोनाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
नित्य, अमृत, शाश्वत, धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात रहाते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे. ॥१४-२७॥
अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रायो मी पांडवा ।
मीचि बोलिजे आघवा । शब्दीं इहीं ॥ ४०४ ॥
अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी (म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी) मीच बोलला जातो. ॥१४-४०४॥
पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा ।
तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं ॥ ४०५ ॥
चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. ॥१४-४०५॥
अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप ।
सुख जें उमप । अद्वितीय ॥ ४०६ ॥
अर्जुना जे ब्रह्म नित्य. अचल, प्रगट, धर्मरूप, अमर्याद सुख व अद्वितीय (असे आहे). ॥१४-४०६॥
विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम ।
निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी ॥ ४०७ ॥
विचार (अज्ञान नष्ट करण्याचे) आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे ? सिद्धांताचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे समज. ॥१४-४०७॥
ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा ।
सांगतसे वीरा । पार्थासी ॥ ४०८ ॥
अहो महाराज, ऐका. अशा अशाप्रमाणे, तो अनन्य भक्तांचा आवडता (श्रीकृष्ण परमात्मा) वीर अर्जुन त्याला सांगता झाला. ॥१४-४०८॥
येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें ।
पुसलेनिविण वायाणें । कां बोलसी ? ॥ ४०९ ॥
तेव्हां धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्यावाचून तू व्यर्थ का बोलतोस ? ४०९.
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यया ॥ ४१० ॥
(माझ्या मुलांच्या) विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर, तेव्हां संजय मनात म्हणतो की, तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. ४१०.
संजयो विस्मयो मानसीं । आहा करूनि रसरसी ।
म्हणे कैसें पां देवेंसी । द्वंद्व यया ? ॥ ४११ ॥
(धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून) संजय आश्चर्यचकीत होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो, काय आश्चर्य आहे ! याचे देवाशी कसे वैर आहे ! ४११.
तरी तो कृपाळु तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो । महारोगु ॥ ४१२ ॥
तरी तो कृपाळू (श्रीकृष्ण परमात्मा) संतुष्ट होवो आणि यास (धृतराष्ट्रास) हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो ! आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो. ४१२.
संजयो ऐसें चिंतितां । संवादु तो सांभाळितां ।
हरिखाचा येतु चित्ता । महापूरु ॥ ४१३ ॥
संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णर्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता, त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. ४१३.
म्हणौनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें ।
श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजैल ॥ ४१४ ॥
म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल. ४१४.
तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो ।
आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ४१५ ॥
त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन (तुम्हाला सांगेन) तो तुम्ही ऐका; असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर (महाराज) म्हणतात. ४१५.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara