ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

(ओव्या १ ते ७१)

(ओव्या ७२ ते १५२)

(ओव्या १५३ ते २२४)

(ओव्या २२५ ते ३३५)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणार्‍या व परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) हीच कोणी एक तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणार्‍या श्रीगुरो, तुम्हाला माझा नस्कार असो. ॥१०-१॥

नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे (तूर्येचे) स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-२॥

नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
अहो, सर्व जगाचे पालन करणारे, कल्याणरूपरत्नांची खाण असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-३॥

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणार्‍या चंद्रा, ब्रह्मानुभावाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणार्‍या, तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-४॥

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्‌भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तींच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे, अहो श्रीगुरुनाथा तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-५॥

तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु ।
तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥ ६ ॥
तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो, तेव्हा सर्व विद्येमधे बालकाचा देखील प्रवेश होतो. तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-६॥

जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।
तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥ ७ ॥
आपण जे गुरुदेव, त्या आपली उदार वाणी जेव्हा ‘भिऊ नकोस’ असे वचन देते, तेव्हा शांतादि नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात. तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-७॥

जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी ।
तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥ ८ ॥
महाराज आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करील. तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-८॥

हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।
तो जीवचि परि तुके । महेशेंसीं ॥ ९ ॥
हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल. तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-९॥

एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें ।
कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ? ॥ १० ॥
एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात, त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू ? सूर्याचे शरीर चकाकित दिसावे म्हणून त्याच लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे काय ? तुम्हास माझा नमस्कार असो ॥१०-१०॥

केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? ।
कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ? ॥ ११ ॥
कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटावयास पाहिजे ? क्षीरसमुद्राला कशाने पाहुणाचार करावा ? त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे ? ॥१०-११॥

चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें ।
गगनावरी उभवावें । घडे केवीं ? ॥ १२ ॥
चंदनाला कशाची उटी लावावी ? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे ? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय ? ॥१०-१२॥

तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन ? ।
हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥ १३ ॥
त्याचप्रमाणे श्रीगुरूच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे ? हे लक्षात घेऊन मी मुकाट्याने त्यांना नमस्कार केला. ॥१०-१३॥

जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे ।
तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥
जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरूचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे करणे खर्‍या मोत्यांना (चकाकी येण्याकरता) अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. ॥१०-१४॥

कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं ।
उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ १५ ॥
साडेपंधरा दराच्या बावनकशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे. ॥१०-१५॥

मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं ।
म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥
नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामि, चांगल्या प्रेमाने ‘ज्ञानेश्वर आमचा आहे’ या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे कृष्णार्जुनसंवादरूपी गंगायमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग, तेथील मी वड झालो. ॥१०-१६॥

मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी ।
उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥ १७ ॥
मागे ‘दूध दे’अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली ॥१०-१७॥

ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें ।
बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥ १८ ॥
किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव, त्यास अढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले. ॥१०-१८॥

तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ।
ते भगवद्‌गीता वोंविये गावों । ऐसें केलें ॥ १९ ॥
त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांतिस्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवीछंदात गावी असे श्रीगुरूने केले. ॥१०-१९॥

जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता ।
परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥
हे पहा शब्दरूपी अरण्यामधे वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही. परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा कल्पवृक्ष केली. ॥१०-२०॥

होती देहबुद्धी एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी ।
मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥ २१ ॥
माझ्या बुद्धीने जे देहाशी तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला (देहतादात्म्यापासून सोडवून) आनंदरूपी खाजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णु झाले. ॥१०-२१॥

ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें ।
तर्‍ही अनुवादलों धीटपणें । ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥
त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या एक एक लीला आहेत. त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करावयाचे मला कसे कळेल ? असे असूनही बेडरपणे मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन करा. ॥१०-२२॥

आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्‍गीता वोंवीप्रबंधें ।
पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥ २३ ॥
एवढावेळ मी आपल्या कृपेच्या प्रसादाने भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवींच्या छंदात वर्णन केला. ॥१०-२३॥

प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु ।
परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥ २४ ॥
पहिल्या अध्यायामधे अर्जुनाचा खेद सांगितला, दुसर्‍यामधे स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु, ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे ते दाखवून सांगितला. ॥१०-२४॥

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें ।
पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥ २५ ॥
तिसर्‍यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढपणे अष्टांगयोग सांगितला. ॥१०-२५॥

तेचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट ।
जीवात्मभाव एकवट । होती जेणें ॥ २६ ॥
ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून (तो समाधिपर्यंत) स्पष्ट तर्‍हेने (सहाव्यात) उघड केले. ॥१०-२६॥

तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती ।
तें आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥
त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करत असता मध्येच मरण आलेल्याची जी गती होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला. ॥१०-२७॥

तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं ।
करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्‍ही ॥ २८ ॥
त्यानंतर सातव्यात आरंभी (कार्य व कारण अशा दोन प्रकाराने) प्रकृतीचे रूप सांगून, भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केले. ॥१०-२८॥

पाठीं सप्तप्रश्नविधि । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी ।
एवं सकळ वाक्यावधि । अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥
नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात प्रश्नंची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला. याप्रकारे सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्यात ते प्रश्न संपवले. ॥१०-२९॥

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके ।
तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥ ३० ॥
आता असंख्यात असलेल्या वेदामधे जेवढ मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो. ॥१०-३०॥

तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥
आता भारताच्या अठरा पर्वांमधे जो काही अभिप्राय आहे तो कृष्णार्जुनांच्या संवादामधे गीतेत प्राप्त होतो. आणि गीतेच्या सातशे श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या नवव्या अध्यायात आहे. ॥१०-३१॥

म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया ।
बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं ? ॥ ३२ ॥
म्हणून नवव्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला, असे दाखविणारा लेखनसीमेचा शिक्का, त्यावर एकदम द्यावयास भ्यायलेला जो मी तो नवव्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशाकरता धरू ? ॥१०-३२॥

अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे ।
परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥ ३३ ॥
अहो, गूळ साखार व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत, परंतु त्यांच्या गोडीमधे स्वाद जसे निरनिराळे आहेत. ॥१०-३३॥

एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावो जाणविती ।
एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥ ३४ ॥
(त्याप्रमाणे अठरा अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामधे एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे. पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत. (ते असे की) काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जाणून त्याचे वर्णन करतात तर काही अध्याय ठिकच्या ठिकाणीच ‘तू ब्रह्म आहेस’ असे समजावतात व काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो. (ब्रह्मरूप होतो). ॥१०-३४॥

हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें ।
तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥
असे हे गीतेचे अध्याय आहेत. परंतु नववा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे. तो देखील स्पष्ट करून सांगितला. महाराज, ही सर्व आपली शक्ती आहे. ॥१०-३५॥

अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली ।
एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥
एकाच्या (वसिष्ठ ऋषींच्या) काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने (विश्वामित्रांनी) या जगाहून वेगळे जग निर्माण केले. एकाने (नल वानराने) दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले. ॥१०-३६॥

एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें भरिलें ।
तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥
एकाने (मारुतीने) आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने (अगस्तीने) एका घोटातच समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेला नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. ॥१०-३७॥

परि हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे ।
राम रावण जैसे । मीनले समरीं ॥ ३८ ॥
परंतु हे असो. येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे असेल तर जसे रामरावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे (असे सांगावे लागते). ॥१०-३८॥

तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें ।
या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥
त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश, तो नवव्या अध्यायासारखाच आहे. असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्य़ा तत्ववेत्त्याला पटेल. ॥१०-३९॥

एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले ।
आतां उत्तरखंड उवाइलें । ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥
त्याप्रमाणे पहिल्या नऊही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे तो ऐका. ॥१०-४०॥

जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ।
ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥
या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील ती कथा चातुर्याने युक्त व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. ॥१०-४१॥

देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें ।
तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥ ४२ ॥
मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांतरस शृंगाररसाला जिंकील. व ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील. ॥१०-४२॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्‍हाठी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही. ॥१०-४३॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।
तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥ ४४ ॥
ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही. ॥१०-४४॥
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं ।
शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥
त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृतभाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात, त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. ॥१०-४५॥
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप ।
चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥ ४६ ॥
गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादि नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. ॥१०-४६॥
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य ।
मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥
वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठीभाषेचे सौंदर्य घेऊन (नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीतातत्व रचले. (म्हणजे गीतेवर टीका केली). ॥१०-४७॥
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु ।
तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥ ४८ ॥
त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा, असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण, तो बोलला, ते ऐका. ॥१०-४८॥
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें ।
अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥ ४९ ॥
निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने काय भाषण केले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तू सर्व गोष्टीने अंत:करणाचा धड आहेस. ॥१०-४९॥
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, (माझ्या भाषणाने) संतोष पावणार्‍या तुला, तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक. ॥१०-१॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें ।
तंव टाचें नव्हें भलें । पुरतें आहे ॥ ५० ॥
आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले, त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे (असे आढळून आले). ॥१०-५०॥
घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।
ऐसा परिसौनि पाहिलासि तवं परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥
घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळले नाही तर आणखी जास्त भरावे, त्याप्रमाणे तुला ऐकवून पाहिले, तेव्हा तुला आणखी ऐकवावे असेच वाटू लागले. ॥१०-५२॥
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं ॥ ५२ ॥
एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच आपला खजिनदार करावा. त्याप्रमाणे (आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस, अशी आमची खात्री झाल्यामुळे) तू आता आमचे रहाण्याचे ठिकाण झाला आहेस. ॥१०-५२॥
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें ।
गिरी देखोनि सुभरें । मेघु जैसा ॥ ५३ ॥
त्याप्रमाणे सर्वांचा प्रभु जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते. ॥१०-५३॥
तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो ।
सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥ ५४ ॥
त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने) कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाला, अरे आजानुबाहु अर्जुना, ऐक, सांगितलेलाच मतलब पुन्हा सांगतो. ॥१०-५४॥
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे ।
यालागीं नुबगिजे । वाहो करितां ॥ ५५ ॥
प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी, आणि जर ते पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ॥१०-५५॥
पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता ।
म्हणौनि सोनें पंडुसुता । शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥
ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढतो, अर्जुना, ते सोने शुद्ध करावेसेच वाटाते. ॥१०-५६॥
तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा ।
आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ॥ ५७ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही. कारण आम्ही आपल्या स्वत:च्या कार्याकरता बोलत आहोत. ॥१०-५७॥
जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? ।
परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी ॥ ५८ ॥
अरे मुलाला दागिने घालावेत, पण ते मूल त्याप्रमाणे (दागिन्यांना) जाणते काय ? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो, ॥१०-५८॥
तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे ।
तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें आहे ॥ ५९ ॥
त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजेल तसतसा आमचा आनंद दुप्पट होतो. अशी वस्तुस्थिती आहे. ॥१०-५९॥
आतां अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी ।
म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥ ६० ॥
आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलतांना तृप्तीचा शेवट होत नाही. (म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही) ॥१०-६०॥
आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि, तें तुजशीं बोलणें ।
परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं ॥ ६१ ॥
आम्हाला एवढ्याकरता फिरून फिरून तेच ते तुझ्याशी बोलावे लागते. परंतु जे असू दे. तू मनापासून लक्ष दे. ॥१०-६१॥
तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें, परम ।
जें अक्षरें लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥
तर ऐक ऐक, मर्मज्ञ अर्जुना, माझे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे माझे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून आले आहे. ॥१०-६२॥
परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें ।
तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें ॥ ६३ ॥
तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना ? (जर जाणत नसलास तर सांगतो.) येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे विश्वच आहे. ॥१०-६३॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥
देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही. कारण देव व महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. ॥१०-२॥
एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले ।
रातीविण मावळले । रविशशी जेथ ॥ ६४ ॥
या माझ्या स्वरूपी वेदाला बोलता येईना, मन व प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना, सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रिशिवाय मावळले. (ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत.) ॥१०-६४॥
अगा उदरींचा गर्भु जैसा । न देखें आपुलिये मातेची वयसा ।
मी आघवेया देवां तैसा । नेणवे कांहीं ॥ ६५ ॥
पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. ॥१०-६५॥
आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन ।
तेवीं महर्षींचें ज्ञान । न देखेचि मातें ॥ ६६ ॥
आणि ज्याप्रमाणे पाण्यात रहाणार्‍या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलटास आकाश ओलांडता येत नाही त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान माझी ओळख करून घेऊ शकत नाही. ॥१०-६६॥
मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला ।
या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥ ६७ ॥
मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो आहे, या गोष्टीचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. ॥१०-६७॥
कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां ।
मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां ॥ ६८ ॥
मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे, त्यांना कठिण आहे. ॥१०-६८॥
उतरलें उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळीं लागे ।
तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मातें ॥ ६९ ॥
पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वताचर चढेल अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन. ॥१०-६९॥
कां गाभेवनें वटु गिंवसवे । जरी तरंगीं सागरू सांठवे ।
कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥ ७० ॥
अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल अथवा लाटांमधे जर समुद्र साठवला जाईल अथवा पृथ्वी जर परमाणूंमधे सापडली जाईल ॥१०-७०॥
तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां ।
मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥
असे होईल तर अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना मोठाल्या ऋषींना अथवा देवांना माझी ओळख होण्याची सवड मिळेल. ॥१०-७१॥

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥
जो मला जन्मरहित, अनादि आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असे जाणतो, तो मानवांमधे ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो ॥१०-३॥
ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये ।
सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥
असा जरी मी जाणण्याला कठिण आहे, तरी कदाचित जो कोणी बाह्य वृत्ती टाकून (देहादी अनात्मतत्वांकडे जाणारी वृत्ती काढून) सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो (वृत्ती अंतर्मुख करतो). ॥१०-७२॥
प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे ।
महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥
देहादि आत्मतत्वाकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो, स्थूल, सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून (विचाराने यांचा निरास करून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो (पंचमहाभूतांचा निरास करतो.) ॥१०-७३॥
तेथ राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें ।
अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां ॥ ७४ ॥
याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष माझे जन्मराहित्य जो जाणतो ॥१०-७४॥
मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु ।
ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें ॥ ७५ ॥
मी आरंभाच्या पलीकडील अनादि आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे. अशा मला जो पुरुष या प्रकारे जाणतो ॥१०-७५॥
तो पाषाणांमाजीं परिसु । जैसा रसाआंतु सिद्धरसु ।
तैसा मनुष्याआंतु तो अंशु । माझाचि जाण ॥ ७६ ॥
तो पुरुष पाषाणांमधे परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज. ॥१०-७६॥
तें चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
येर माणुसपण तें भांब । लौकिक भागु ॥ ७७ ॥
तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटालेले अंकुर आहेत, परंतु त्याचे ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. ॥१०-७७॥
अगा अवचिता कापुरा- । माजीं सांपडला हिरा ।
वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ॥ ७८ ॥
अर्जुना हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर तो त्या पाण्याकडून विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा सापडणार नाही ? (तर पडेल हिरा कापरासारखा पाण्यात विरघळणार नाही.) ॥१०-७८॥
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु ।
तर्‍ही प्रकृतिदोषाची मातु । नेणेंचि कीं ॥ ७९ ॥
त्याप्रमाणे मनुष्यप्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्ममृत्यु आदि करून प्रकृति दोषांची गोष्टही माहीत नसते. ॥१०-७९॥
तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं ।
तेवीं मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घापे ॥ ८० ॥
त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला त्याला वेढा घालून असलेले साप सोडून जातात त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पांकडून टाकला जातो. ॥१०-८०॥
तेंचि आमुतें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।
तरी मी ऐसा हें माझें । भाव ऐकें ॥ ८१ ॥
तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन कल्पील तर मी असा आहे व हे माझ्या पासून झालेले निरनिराळे पदार्थ आहेत ते ऐक. ॥१०-८१॥
जे वेगळालिया भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती ।
विखुरले आहेती त्रिजगतीं । आघविये ॥ ८२ ॥
ते माझे भिन्न भिन्न प्राण्यांमधे त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत. ॥१०-८२॥
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४ ॥
अहिंसा समता तुइष्टास्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥
बुद्धि, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दु:ख, होणे, नसणे भय अभय, ॥१०-४॥ अहिंसा, ममता, तुष्टि, तप दान, यश अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ॥१०-५॥
तेथ प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी ।
असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥ ८३ ॥
त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज. नंतर अगाध ज्ञान, असंमोह (सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ति) सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा, आणि सत्य ही समज. ॥१०-८३॥
मग शम दम दोन्ही । सुखदुःख वर्ते जें जनीं ।
अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥ ८४ ॥
मग शम (मनोनिग्रह) आणि दम (इंद्रियनिग्रह) हे दोन आणि लोकात असलेले सुख व दु:ख आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणाना कर. ॥१०-८४॥
पैं भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।
तुष्टि तप पंडुसुता । दान जें गा ॥ ८५ ॥
अर्जुना, भय व निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष, अर्जुना ही माझीच रूपे आहेत हे तू जाण. ॥१०-८५॥
अगा यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र दिसती ।
ते मजचि पासूनि होती । भूतांचिया ठायीं ॥ ८६ ॥
दान, यश व दुष्कीर्ती, हे जे विकार सर्व ठिकाणी रहातात ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ॥१०-८६॥
जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं ।
एक उपजती माझ्या ज्ञानीं । एक नेणती मातें ॥ ८७ ॥
जशी भूते वेगवेगळाली आहेत तसेच हे भाव वेगवेगळे आहेत. असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात व कित्येक मला जाणत नाहीत. (माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात). ॥१०-८७॥
प्रकाशु आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें ।
प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
अरे अर्जुना, प्रकाश व अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो. ॥१०-८८॥
आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें ।
म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ ८९ ॥
आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे, हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे, म्हणून प्राणिमात्रांच्या ठिकाणी कमीजास्त प्रमाणात ह्या विकारास व्हावे लागते. ॥१०-८९॥
यापरी माझिया भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी ।
गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥ ९० ॥
ह्याप्रमाने माझ्या विकारात ही संपूर्ण सृष्टी सापडली आहे, असे अर्जुना समज. ॥१०-९०॥
आतां इये सृष्टीचे पालक । जयां आधीन वर्तती लोक ।
ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥ ९१ ॥
आता ह्या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्याच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी अकरा विकार तुला सांगेन. ॥१०-९१॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा ।
मद्भषवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥
प्राचीन कश्यपादी सात महर्षी, तसेच चार स्वायंभुवादि मनु हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले आहेत. ही सर्व प्रजा त्यांची सृष्टी आहे. ॥१०-६॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध ।
कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ॥ ९२ ॥
तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ, मोठमोठ्या ऋषींमधे प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादि सात ऋषी ॥१०-९२॥
आणिकही सांगिजतील । जे कां चौदाआंतुल मुद्दल ।
स्वायंभू मुख्य वडील । चारी मनु ॥ ९३ ॥
चौदा मनूंपैकी स्वायंभू आदिकरून मुख्य मूळ जे चार मनु तेही आणखी सांगितले जातील. अगा अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे अकराजण माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. ॥१०-९४॥
ऐसें हे अकरा । माझ्या मनीं जाहाले धनुर्धरा ।
सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां ॥ ९४ ॥
चौदा मनुंपैकी स्वायंभू आदिकरून मूळ जे चार मनु तेही सांगितले जातील ॥१०-९३॥
जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे ।
तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे ॥ ९५ ॥
ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते ॥१०-९५॥
तैंचि हे जाहाले । मग इहीं लोक केले ।
तेथ अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ॥ ९६ ॥
त्याचे वेळी कश्यपादी अकरा उत्पन्न झाले मग त्या अकरा जणांनी इंद्रादी आठ लोकपालांना (दिशांच्या स्वामींना) उत्पन्न केले व त्यांना त्य़ा दिशांचे स्वामी म्हणून नेमले. व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. ॥१०-९६॥
म्हणौनि अकराही हे राजा । मग येर जग यांचिया प्रजा ।
एवं विश्वविस्तारु हा माझा । ऐसेंचि जाण ॥ ९७ ॥
म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादिक हे अकरा राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादिक ते यांची प्रजा आहे, असा हा माझा विस्तार आहे असे समज. ॥१०-९७॥
पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें ।
बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥ ९८ ॥
अर्जुना पहा, पहिल्या प्रथम एक बी असते, मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुड (बुंधा) होते व बुंध्यात फांद्यांचे अंकुर फुटतात. ॥१०-९८॥
खांदियांपासूनि अनेका । फुटलिया नाना शाखा ।
शाखांस्तव देखा । पल्लव पानें ॥ ९९ ॥
त्या फांद्यांपासून कोवळी पालवी व पाने फुटतात असे समज. ॥१०-९९॥
पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ ।
तें निर्धारितां केवळ । बीजचि आघवें ॥ १०० ॥
पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीच आहे. ॥१०-१००॥
तैंसे मी एकचि पहिलें । मग मी तेंचि मनातें व्यालें ।
तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥ १०१ ॥
याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो मग (ते) ‘मी’ त्या मनाला उत्पन्न करते झाले व त्या मनापासून कश्यपादि सात ऋषी आणि स्वायंभू आदि चार मनु उत्पन्न झाले. ॥१०-१०१॥
इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक सृजिले ।
लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥ १०२ ॥
त्यांनी (इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैर्ऋती, वायु, कुबेर व ईशान असे हे) लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या (स्वर्गादी) लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. ॥१०-१०२॥
ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलासें निरुतें ।
परी भावाचेनि हातें । माने जया ॥ १०३ ॥
या प्रमाणे हे प्रत्यक्ष असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच झाले नाही काय ? परंतु हा सर्व माझाच विकार आहे अशा दृष्टीने जो पाहील त्याला पटेल. ॥१०-१०२॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥
हा माझा विस्तार (विभूति) व (अभेद) योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महा (अभेद) योगाने युक्त होतो याविषयी संदेह नाही. ॥१०-७॥
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती ।
आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ १०४ ॥
अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक विकार ह्या माझ्या विभूति आहेत. आणि ह्यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. ॥१०-१०४॥
म्हणौनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी ।
मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥ १०५ ॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत माझ्याचावून दुसरी गोष्टच नाही. ॥१०-१०५॥
ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें ।
म्हणौनि उत्तमाधम भेदाचें । दुःस्वप्न न देखे ॥ १०६ ॥
याप्रमाणे जो खरोखर समजतो, त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून त्याला चांगले व साधारण या भेदाचे स्वप्न पडेल का ? नाही. ॥१०-१०६॥
मी माझिया विभूती । विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती ।
हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥ १०७ ॥
मी आणि माझ्या विभूति व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो ॥१०-१०७॥
म्हणौनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें ।
एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥
म्हणून अशा या संशय रहित महायोगाने ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला आहे यात शंका घेण्याचे कारण नाही. ॥१०-१०८॥
कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी ।
तयाचिये भजनाचे नाटीं । सूती मज ॥ १०९ ॥
कारण की अर्जुना अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो, त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. ॥१०-१०९॥
म्हणौनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु ।
करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ॥ ११० ॥
म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग याजबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता यास जरी थोडा बहुत व्यत्यय आला तथापि त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते, हे तुला सहाव्या अध्यायत (४० व्या श्लोकात) सांगितलेच आहे. ॥१०-११०॥
तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा ।
साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥ १११ ॥
तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याबद्दल मनात ध्वनि (इच्छा) उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. ॥१०-१११॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८ ॥
मी सर्वांचे आदिकरण आहे, माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ति होते. हे ज्ञान होऊन, प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात. ॥१०-८॥
तरि मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा ।
आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥
तरी अर्जुना, या सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. ॥१०-११२॥
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा ।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥ ११३ ॥
लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म, अर्जुना, पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून असते. ॥१०-११३॥
ऐसें आघवाचि ठायीं । तया जळचि जेवीं पाहीं ।
तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥ ११४ ॥
या प्रमाणे पहा सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे माझ्याशिवाय ह्या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. ॥१०-११४॥
ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें ।
परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥ ११५ ॥
याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे भजतात. परंतु ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रगट अशा प्रेमभावनेने केलेले असते. ॥१०-११५॥
देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न ।
जैसा वायु होऊन गगन । गगनींचि विचरे ॥ ११६ ॥
(ते कसे भजतात तर) वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वागतो, तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात. ॥१०-११६॥
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं ।
जगद्‌रूपा मनीं । सांठऊनि मातें ॥ ११७ ॥
अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगद्रूप, त्या मला अंत:करणात साठवून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असतात. ॥१०-११७॥
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥ ११८ ॥
जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. ॥१०-११८॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥
माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे (म्हणून जे मद्रूप झाले) व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत (म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत) असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या (गुणांचे) वर्णन करीत समाधान पावतात. व आनंदात मग्न होतात. ॥१०-९॥
चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले ।
जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ॥ ११९ ॥
अंत:करणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या गुंगीमुळे जन्ममरणाला विसरतात. ॥१०-११९॥
मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचीं भोजें ।
आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥ १२० ॥
मग त्या ज्ञानाच्या मदाने, प्रश्न उत्तररूप चर्चेच्या आनंदाने प्रेमभराने नाचतात. आता ते एकमेकांस ज्ञानच देतात व घेतात ॥१०-१२०॥
जैशीं जवळकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें ।
मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥ १२१ ॥
ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसलली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे होतात ॥१०-१२१॥
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी ।
तेथ बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥
त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते, अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचेच अलंकार मिरवतो. ॥१०-१२२॥
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें ।
ना तरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ ॥ १२३ ॥
ज्या प्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे, किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिसळावेत ॥१०-१२३॥
तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें ।
ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥ १२४ ॥
(प्रयागला जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो) तसा तेथे (म्हणजे भक्त जेव्हा भक्ताला भेटतात तेव्हा) ऐक्यरसाचा संगम होतो व त्या ऐक्यरसाचे पुरावर अष्टसात्विकभावाचे पुराड तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. ॥१०-१२४॥
तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें ।
मियां धाले तेणें उद्‌गारें । लागती गाजों ॥ १२५ ॥
तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर पळून येऊन (देहतादात्म्य टाकून) माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. ॥१०-१२५॥
पैं गुरुशिष्यांचिया एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती ।
ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥ १२६ ॥
गुरु व शिष्य हे उपदेशाकरता एकांत स्थली जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा (ॐ संज्ञक ब्रह्माचा) उपदेश करतात, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमधे गर्जना करून सांगतात. ॥१०-१२६॥
जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें ।
दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥ १२७ ॥
ज्याप्रमाणे पक्व दशेला आलेली (पूर्ण उमलेली) कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेऊ शकत नाही, तर ती राजास अथवा गरीबास सुवासाची मेजवानी देते ॥१०-१२७॥
तैसेंचि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत ।
मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥ १२८ ॥
त्याप्रमाणेच सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात. ॥१०-१२८॥
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें ।
केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥ १२९ ॥
याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस व रात्र यांचे भान नसते. ॥१०-१२९॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥
याप्रमाणे (माझ्या ठिकाणी) सतत युक्त असलेल्या व प्रीतीपूर्वक (माझी भक्ति करणार्‍या, त्यांना मी अशा प्रकारची बुद्धि देतो की जेणेकरून ते मजसमीप येतील ॥१०-१०॥
तयां मग जें आम्ही कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं ।
ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥ १३० ॥
अर्जुना, असे समज की मग त्यांना आम्ही जे काही (निरतिशय प्रेम) द्यायचे तो उत्तम भाग तो आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. ॥१०-१३०॥
कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा ।
ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥
कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा आहेत अशा वाटतात. ॥१०-१३१॥
म्हणौनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें ।
परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणिपे ॥ १३२ ॥
म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे, त्यांनी आपल्या कमाईने मिळावले. (अशा रीतीने) आमचे काम त्यांनीच केले पण ते आम्ही दिले म्हणून त्यांनी जगात प्रसिद्ध केले ॥१०-१३२॥
आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें ।
आणि काळाची दृष्टि न पडे । हें आम्हां करणें ॥ १३३ ॥
आता यानंतर इतके घडून येईल की ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये हे आमचे कर्तव्य आहे. ॥१०-१३३॥
लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी ।
जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥ १३४ ॥
अर्जुना, ज्याप्रमाने आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरूण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असतांना धावते. ॥१०-१३४॥
तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी ।
तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ॥ १३५ ॥
ते बालक जो जो खेळ दाखवील तो तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. ॥१०-१३५॥
जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें ।
हे पाळती मज विशेखें । आवडे करूं ॥ १३६ ॥
उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने अनायासाने ते भक्त मला प्राप्त होतील अशा तर्‍हेने पालन करणे मला विशेष आवडते. ॥१०-१३६॥
पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड ।
कां जे प्रेमळांचें सांकड । आमुचिया घरीं ॥ १३७ ॥
अरे, भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठतेची मला इच्छा असते. कारण की घरी आम्हाला प्रेमळ भक्तांचा दुष्काळ आहे. ॥१०-१३७॥
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपाइले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले ।
आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें । लक्ष्मियेसीं ॥ १३८ ॥
अर्जुना, पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या (स्वर्गेच्छु व मुमुक्षु यांच्या) रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले ॥१०-१३८॥
परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक ।
सप्रेमळालागीं देख । ठेविलें जतन ॥ १३९ ॥
परंतु आपलेपणावाचून (ज्यात मी पणाचा लेश नाही) असे जे एक ताजे प्रेमसुख, ते तसेच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवले आहे. असे समज. ॥१०-१३९॥
हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणयासाठीं ।
या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥
अर्जुना येथपर्यंत (वर सांगितल्याप्रमाणे) आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्त घेतो., ह्या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. ॥१०-१४०॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥
केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंत:करणात राहून मी प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने (त्यांच्या ठिकाणच्या) अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. ॥१०-११॥
म्हणौनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।
एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं ॥ १४१ ॥
म्हणून जो मी आत्मा, त्याविषयींची अखंड प्रेमवृत्ति, ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे, ज्यांनी एक माझ्यावाचून बाकीचे सर्व फलकट मानले आहे, ॥१०-१४१॥
तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
अर्जुना, त्या शुद्धतत्व प्रेमळ भक्तांच्या पुढे (ज्ञानरूपी) कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. ॥१०-१४२॥
अज्ञानाचिये राती- । माजीं तमाचि मिळणी दाटती ।
ते नाशूनि घालीं परौती । तयां करीं नित्योदयो ॥ १४३ ॥
अज्ञानाच्या रात्रीमधे (त्या भक्तांपुढे) दाट काळोख येऊन मिळाला असता त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचा नित्य उदय करतो. ॥१०-१४३॥
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें ।
तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥
याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा जो पुरुषोत्तम तो जेव्हा बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला ‘माझे मन शांत झाले’. ॥१०-१४४॥
हां हो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा ।
जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
अहो महाराज ऐका. (माझा) जन्ममरणरूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा, मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झालो. ॥१०-१४५॥
जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें ।
जीवित हातां चढलें । आवडतसें ॥ १४६ ॥
महाराज, मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पाहिला (आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे व ते मला आज झाले). त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले. असे मला वाटते. ॥१०-१४६॥
आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली ।
जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें ॥ १४७ ॥
आज माझ्या आयुष्याची सफलता झाली. व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले. कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. ॥१०-१४७॥
आतां येणें वचन तेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें ।
म्हणौनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें ॥ १४८ ॥
आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार (स्वत:ला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे हे अज्ञान) व बाहेरील अंधार (प्रपंचाला ब्रह्मरूप न समजता प्रपंचरूप पहाणे हे अज्ञान) हे सर्व नाहीसे झाले. म्हणून तुझे स्वरूप मी खरोखर पहात आहे. ॥१०-१४८॥
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२ ॥
अर्जुन म्हणाला, तू परब्रह्म, (महाभूतांचे विश्रांतिस्थान, श्रेष्ठ स्थान व अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध व दिव्य असा पुरुष, सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित व सर्वव्यापी तू आहेस. ॥१०-१२॥
तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम ।
पवित्र तूं परम । जगन्नाथा ॥ १४९ ॥
अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जागन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. ॥१०-१४९॥
तूं परम दैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा ।
दिव्य तूं प्रकृतिभावा- । पैलीकडील ॥ १५० ॥
देवा, तू ब्रह्मादि तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस, तू चोवीस तत्वांपलिकडचे पंचविसावे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थापलीकडील आहेस. ॥१०-१५०॥
अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं ।
तो तूं हें आम्ही । जाणितलें आतां ॥ १५१ ॥
हे नाथ तू नित्यसिद्ध आहेस व जन्मादिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस. हे आम्हाला आता समजले. ॥१०-१५१॥
तूं या कालत्रयासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री ।
तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें ॥ ५२ ॥
तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस, तू जीवितास आश्रयस्थान आहेस, तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस हे मला निश्चित समजले. ॥१०-१५२॥

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥
असे तुम्हाला सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित, देवल आणि व्यासही म्हणतात. तू स्वत: देखील मला असेच सांगतोस. ॥१०-१३॥
पैं आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी ।
जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥
आणखीही एक प्रकाराने याच अनुभावाचा थोरपणा वाटतो. कारण की मागे मोठ्यामोठ्या ऋषींनी याचप्रमाणे तुझे वर्णन केले होते. ॥१०-१५३॥
परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण ।
जे कृपा केली आपण । म्हणौनि देवा ॥ १५४ ॥
परंतु त्या सांगितलेल्याचा खरेपणा (माझ्या) मनाला हा आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. ॥१०-१५४॥
एर्‍हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनीं गाये ।
परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥
एरवी देवऋषी नारद आमच्याकडे नेहेमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत. परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही गाण्याचा आनंद अनुभवत होतो. ॥१०-१५५॥
जी आंधळेयांच्या गांवीं । आपणपें प्रगटलें रवी ।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥ १५६ ॥
हे देवा, आंधळ्यांच्या गावामधे सूर्य स्वत: प्रगट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कोठून येणार ? ॥१०-१५६॥
परि देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता ।
तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥
एरवी नारदही अध्यात्मपर गाणी गात असतांना त्यांच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वरवरची मधुरता तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती. त्यावाचून चित्ताला त्या गाण्यांपैकी दुसरे काही कळत नव्हते. ॥१०-१५७॥
पैं असिता देवलाचेनि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें ।
परी तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥ १५८ ॥
त्याचप्रमाणे असित, देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप ‘असे आहे’ म्हणून तुझ्याविषयी मी ऐकले. परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. ॥१०-१५८॥
विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू ।
कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥ १५९ ॥
विषयरूप बिषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुत: गोड असणारा परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक विषय हे प्राण्यांना चांगले वाटतात. ॥१०-१५९॥
आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें ।
तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥
आणखी दुसर्‍याचे कशाला सांगू ? व्यास देवांनी आपण स्वत: आमच्या राजवाड्यात येऊन नेहेमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे ॥१०-१६०॥
परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला ।
पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणौनि ॥ १६१ ॥
परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होय. परंतु तो चिंतामणी नसावा अशा समजुतीने त्याविषयी उदास व्हावे व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी. ॥१०-१६१॥
तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्‍रत्‍नांचिया खाणी ।
परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥
त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे, मजपाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या. परंतु कृष्णा तू जो सूर्य त्या तुझ्याशिवाय त्यांचा अनादर केला जात होता. ॥१०-१६२॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥
हे केशवा, हे जे तू मला सांगतोस, ते सर्व मी सत्य समजतो. हे भगवन्, देव अथवा दानव (यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाहीत, ॥१०-१४॥
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले ।
तयां आघवियांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥ १६३ ॥
आता तुझी ती वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते, त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. ॥१०-१६३॥
जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माजीं हृदयभूमिके पडिले सखोल ।
वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणौनि संवाद फळेंशीं उठलें ॥ १६४ ॥
महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर आपल्या कृपेचा ओलावा झाला, म्हणून त्यास (तुम्हा-आम्हांमधील) संवादरूपी फल प्राप्त झाले. ॥१०-१६४॥
अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरितां ।
महोदधीं जाहलों अनंता । संवादसुखाचा ॥ १६५ ॥
अहो देवा, नारदादि संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. ॥१०-१६५॥
प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें ।
तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्‌गुरू तुवां ॥ १६६ ॥
महाराज, या जन्मासह सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्ये केली त्यांच्याकडे माझी कामगिरी राहिली नाही. कारण त्यांनी पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य गुरु जोडून दिला. ॥१०-१६६॥
एर्‍हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें ।
परि कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥
एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहेमी कानाने ऐकत होतो, पण तुम्ही एकट्याने कृपा केली नव्हती, तोपर्यंत मला काहीच कळले नाही. ॥१०-१६७॥
म्हणौनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ ।
तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥ १६८ ॥
म्हणून ज्यावेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्या वेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहेमी फलद्रूप होतात, त्याप्रमाणे गुरूची कृपा झाली असता ऐकलेले व पढलेले सर्व ज्ञान आपले काम करते. ॥१०-१६८॥
जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी ।
परि फळेंसी तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥
महाराज, माळी झाडांविषयी जिवापाड मेहनत करून जन्म काढतो परंतु ज्यावेळेला वसंत ऋतु येतो त्याच वेळेला फळांची भेट होते. ॥१०-१६९॥
अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे ।
पैं रसायनें तैं गोडें । जैं आरोग्य देहीं ॥ १७० ॥
महाराज ज्यावेळेला विषमज्वराला उतार पडतो, त्यावेलेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात. व ज्यावेलेला देहात आरोग्य येते, त्याचवेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. ॥१०-१७०॥
कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण ।
जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ॥ १७१ ॥
अथवा (ज्या वेलेला) जीव आपण होऊन शरीरात प्रवेश करील त्याच वेळेला इंद्रिये, वाचा व प्राण हे सर्व असल्याचे सार्थक होणार आहे. ॥१०-१७१॥
तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें ।
तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानुकूल श्रीगुरु ॥ १७२ ॥
त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगादिक साधने ज्यावेळेला गुरु अनुकूल होतील त्याच वेळी आपली आहेत असे म्हणता येते. ॥१०-१७२॥
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें ।
तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥
असे हे भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अनुभावमदात, निश्चयाच्या संतोषाने नाचत असता, अर्जुन म्हणाला, देवा, आपले बोलणे मला फारच पटले. ॥१०-१७३॥
तरि साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती ।
जे तूं देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥ १७४ ॥
हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर हा अनुभव मला निश्चयाने आलेला आहे की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहीस. ॥१०-१७४॥
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा ।
तो कहींचि नोहे हें मद्‌भावा । भरंवसेनि आलें ॥ १७५ ॥
देवा तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो म्हणेल तर तसा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाणारा तू केव्हाच नाहीस हे (माझ्या मनाला) आता खात्रीपूर्वक पटले. ॥१०-१७५॥
स्वयमेवाऽऽत्मनाऽऽत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५ ॥
हे भूतभावना, भूतनाथा, देवाधिदेवा, जगन्नायका. हे पुरुषोत्तमा, तू स्वत:च यथार्थ रूपाने स्वत:ला जाणतोस. ॥१०-१५॥
एथ आपुलें वाढपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें ।
कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥
ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत. ॥१०-१७६॥
तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणसी लक्ष्मीपती ।
येर वेदादिक मती । मिरवती वायां ॥ १७७ ॥
त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपते देवा, तुला तूच जाणणारा आहेस. बाकी वेदादिक जे इतर आहेत त्यांच्या मति (आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो) अशी व्यर्थ बढाई मारतात. ॥१०-१७७॥
हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें ।
आदिशून्य तरोनि जावें । केउतें बाहीं ॥ १७८ ॥
अहो सर्वात चपल असलेल्या मनालाही शर्यतीत मागे कसे टाकता येईल ? वारा हाताने कसा मोजता येईल ? मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल ? ॥१०-१७८॥
तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणौनि कोणाही ठाउकें नोहे ।
आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें ॥ १७९ ॥
(जे जसे असंभाव्य) त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याचीही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुझ्याच फक्त योग्यतेचे आहे. ॥१०-१७९॥
जी आपणयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही समर्थ होसी ।
तरी आतां एक वेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ॥ १८० ॥
अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसर्‍यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस. तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. ॥१०-१८०॥
हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभुवनगजपंचानना ।
सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥ १८१ ॥
हे प्राणिमात्राची उत्पत्ती करणार्‍या त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणार्‍या सिंहा, अहो सर्व देव व देवता यांना पूज्य असणार्‍या, हे जगाच्या स्वामी, श्रीकृष्णा, हे ऐकले का ? ॥१०-१८१॥
जरी थोरी तुझी पाहात आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों ।
या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥
जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहिली, तर आम्ही तुझ्या पायाजवळ उभे रहाण्यालाही योग्य नाही. या गोष्टीमुळे वाईट वाटून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास तुला विचारण्यावाचून दुसरा उपाय नाही. ॥१०-१८२॥
भरले समुद्र सरिता चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे ।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया ॥ ८३ ॥
जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले आहेत. परंतु ते इतके आरलेले असूनही चातकाला कोरडे ठणठणित असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघातून पाण्याचे थेंब पडतील त्यावेळेलाच त्याला पाणी मिळणार. ॥१०-१८३॥
तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती ।
हें असो मजप्रती । विभूती सांगें ॥ १८४ ॥
त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत परंतु कृष्णा, आम्हाला तूच आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे. मला विभूती सांग. ॥१०-१८४॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥
ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने तू मला सांग. ॥१०-१६॥
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया ।
तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥ १८५ ॥
महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत. परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात. ॥१०-१८५॥
जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहासी अनंता ।
तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥ १८६ ॥
कृष्णा, ज्या विभूतींनी सर्व लोकांस व्यापून टाकलेले आहे, त्या मुख्य मुख्य व नमांकित विभूती सांगाव्या. ॥१०-१८६॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥
हे योगिन्, सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी त्या मी तुला कसे जाणावे ? हे भगवन् कोणकोणत्या भावांमधे (विभूतींमधे मी तुझे चिंतन करणे शक्य आहे ? १०-१७॥
जी कैसें मियां जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें ।
जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥
कृष्णा मी तुला कसे जाणावे ? व काय म्हणून नेहेमी चिंतन करावे ? कारण तू सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही. ॥१०-१८७॥
म्हणौनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें ।
आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥ १८८ ॥
म्हणून मागे (सातव्या व नवव्या अध्याय व या अध्यायाच्या आरंभी) ज्या आपल्या तू विभूती थोडक्यात सांगितल्यास, त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ॥१०-१८८॥
जया जया भावाचिया ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं ।
तो विवळ करूनि देईं । योगु आपुला ॥ १८९ ॥
ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूतीयोग तू मला स्पष्ट करून दे. ॥१०-१८९॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८ ॥
जनार्दना, आपला योग आणि विस्तार (विभूति) पुन्हा विस्ताराने कथन कर. कारण (तो) ऐकणार्‍याची माझी (एकदा ऐकून) तृप्ती होत नाही. ते मला केवळ अमृत आहे. ॥१०-१८॥
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती ।
येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ? ॥ १९० ॥
आणि ज्या विभूति मी विचारल्या त्या देखील जगन्नाथा मला सांगाव्यात. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील ॥१०-१९० ॥
तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना ।
पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जेवीं ॥ १९१ ॥
कृष्णा तर अशी कल्पना तुझ्या मनात येईल, पण ती तू येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. ॥१०-१९१॥
जे काळकूटाचें सहोदर । जें मृत्यूभेणें प्याले अमर ।
तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥ १९२ ॥
जे (अमृत) कालकूट विषाचे सख्खे भावंड आहे व जे (अमृत) मृत्यूच्या भीतीने देव प्यायले, तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात. ॥१०-१९२॥
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु ।
जया वायांचि अमृतपणाचा आभासु ।
तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥
असा कोणी एक क्षीरसमुद्रातील पातळ पदार्थ ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे, त्याची गोडी देखील सेवन करणारांना आता “हे पुरे” असे म्हणू देत नही. ॥१०-१९३॥
तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी ।
मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ॥ १९४ ॥
इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्व आले आहे मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे. ॥१०-१९४॥
जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळितां ।
अनादि स्वभावता । आइतें आहे ॥ १९५ ॥
परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलवता व क्षीरसमुद्राचे मंथन न करता स्वभावत:च मूळचे नित्यसिद्ध आहे. ॥१०-१९५॥
जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध ।
जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥
जे परमामृत पातळ नाही व घट्टही नाही, ज्या परममृतामधे रस (गोडी) व गंध (वास) ही माहीत पडत नाहीत, जे परमामृत नित्यप्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते (अनुभवाला येते). ॥१०-१९६॥
जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो ।
बळिया नित्यता लागे येवों । आपणपेंया ॥ १९७ ॥
ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरास होतो व कधी न ढळणारी अशी नित्यता आपणास प्राप्त होते. ॥१०-१९७॥
जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख ।
आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥ १९८ ॥
ज्या परमामृताची (बोधामृताची) गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढावयास लागते ॥१०-१९८॥
मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे ।
तें तुज देतां चित्त माझें । पुरें म्हणों न शके ॥ २९९ ॥
मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वत: परमामृत होऊन रहातो, असे जे परमामृत ते तू मला देत असतांना माझे चित ‘पुरे’ असे म्हणू शकत नाही. ॥१०-१९९॥
तुझें नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे ।
पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनी ॥ २०० ॥
महाराज आधी आपले नावच आम्हाला अतिशय आवडते. शिवाय आपली भेट होत असून आपले सांनिध्य प्राप्त झालेले आहे. तशात आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत अहात. ॥१०-२००॥
आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें ।
तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥
आता हे सुख कशासारखे आहे म्हणून म्हणावे तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही. (पण ती पुन्हा तुम्ही मला सांगा). ॥१०-२०१॥
हां गा सूर्य काय शिळा ? । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा ? ।
कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ? ॥ २०२ ॥
अहो रोज उगवतो म्हणून सूर्याला शिळा म्हणावे काय ? (अग्नीने स्नान केले नाही म्हणून) अग्नीला ओवळा म्हणता येईल काय ? अथवा नेहेमी वहाणार्‍या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय ? ॥१०-२०२॥
तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें ।
आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां ॥ २०३ ॥
तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच पाहिले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे साक्षात चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेणे आहे. ॥१०-२०३॥
तया पार्थाचिया बोला । सर्वांगें श्रीकृष्ण डोलला ।
म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥ २०४ ॥
अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगान डोलला व म्हणाला हा अर्जुन भक्ति व ज्ञान यांचे चांगले शेत झाला आहे. ॥१०-२०४॥
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु ।
सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ॥ २०५ ॥
याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्याच्या आनंदात प्रेमाचा भर उसळत असतांना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. ॥१०-२०५॥
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा माझ्या ज्या दिव्य विभूति आहेत त्यापैकी मुख्य मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही ॥१०-१९॥
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता ।
कीं म्हणतसे बा पंडुसुता । भलें केलें ॥ २०६ ॥
मी ब्रह्मदेवाचा बाप आहे. हे (श्रीकृष्णास) माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना. व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना ठीक केले. ॥१०-२०६॥
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं ।
आंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ? ॥ २०७ ॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला ‘बाबा’ असे म्हणाले यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही. (हे पहा), तो स्वत: नंदाचे मूल झाला नाही काय ? ॥१०-२०७॥
परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो ।
मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥ २०८ ॥
परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत, तू ऐक. ॥१०-२०८॥
तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती ।
ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥ २०९ ॥
अर्जुना, तू माझ्या विभूति विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. ॥१०-२०९॥
आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती ।
तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥ २१० ॥
आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत, त्याचप्रमाणे माझ्याच विभूति असून मला त्यांची गणना करता येत नाही. ॥१०-२१०॥
एर्‍हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणौनि आपणपयांही नव्हेचि फुडा ।
यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया आइकें ॥ २११ ॥
खरोखर मी कसा व केवढा आहे, हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही, म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. ॥१०-२११॥
जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणवतील किरीटी ।
जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय ॥ २१२ ॥
अर्जुना, ज्या विभूति समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्या सारख्या होतील, ज्याप्रमाणे बी हातात आले की झाडच ताब्यात आल्यासारखे होते, ॥१०-२१२॥
कां उद्यान हाता चढिन्नलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें ।
तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥ २१३ ॥
किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची सहजच प्राप्ती होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय मिळते. ॥१०-२१३॥
एर्‍हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा ।
पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥
एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही. आकाशासारखा अमर्याद विस्ताराच्या पदार्थालाही माझ्यात लपून बसता येते. ॥१०-२१४॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥
हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंत:करणामधे असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदि, मध्य व अंतही आहे. ॥१०-२०॥
आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।
मी आत्मा असें एकैका । भूतमात्राच्या ठायीं ॥ २१५ ॥
मस्तकावर कुरळे केस शोभणार्‍या व धनुविद्येत शंकरासारख्या निष्णात असणार्‍या अर्जुना ऐक. प्रत्येक प्राणिमात्राचे ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. ॥१०-२१५॥
आंतुलीकडे मीचि यांचे अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी ।
आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥ २१६ ॥
आतल्या बाजूने मीच यांच्या अंत:करणात आहे. भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे व मध्यंतरी देखील मीच आहे. ॥१०-२१६॥
जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी ।
आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥
ज्याप्रमाणे या मेघांना खाली वर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे आणि ऐक. ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व ते रहातातही आकाशातच. ॥१०-२१७॥
पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती ।
तेवीं आदि स्थिती गती । भूतांसि मी ॥ २१८ ॥
शेवटी ज्यावेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाशरूप होऊन रहातात, त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, रहाण्याला आणि मरण्याला मीच आश्रय आहे. ॥१०-२१८॥
ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण ।
तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥ २१९ ॥
असे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूतियोगानें जाण. तर आता जीवच (अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक. ॥१०-२१९॥
याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें सुभद्रापती ।
सांगेन म्हणितलें तुजप्रती । त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥
माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूति काही निराळ्या सांगावयाच्या आहेत काय ? (तर नाहीत). परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून मह्टले तर आता तुला मुख्य मुख्य विभूति सांगतो त्या ऐक. ॥१०-२२०॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरूतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१ ॥
बारा आदित्यांमधे मी विष्णु आहे, प्रकाशमान पदार्थांमधे किरणवान मी रवि आहे, मरुद्गणांपैकी मरीची मी आहे, नक्षत्रांमधे मी चंद्र आहे ॥१०-२१॥
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु ।
रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥
हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या बारा देवतात विष्णु नावाची माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थांमधे किरणे असलेला सूर्य माझि विभूती आहे. ॥१०-२२१॥
मरूद्‌गणांच्या वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी ।
चंद्रु मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥ २२२ ॥
मरुद्गणांच्या एकुणपन्नास प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे. असे शारङ्गधर श्रीकृष्ण म्हणाले व आकाशरूपी रंगणात नक्षत्रांमधे चंद्र ही माझी विभूती आहे. ॥१०-२२२॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२ ॥
वेदांमधे सामवेद मी आहे, देवांमधे इंद्र मी आहे, इंद्रियांमधे मन मी आहे, भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ॥१०-२२॥
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु ।
देवांमाजी मरुद्‍बंधु । महेंद्रु तो मी ॥ २२३ ॥
ऋग्वेदादी चार वेदांमधे सामवेद हा माझी विभूती आहे. असे गोविंद म्हणाला. व देवांमधे मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. ॥१०-२२३॥
इंद्रियांमाजीं अकरावें । मन तें मी हें जाणावें ।
भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥ २२४ ॥
इंद्रियांमधे अकरावे असणारे इंद्रिय जे मन ती माझी विभूती आहे. असे समज व सर्व प्राण्यांमधे स्वाभाविक असलेली जी चेतना (बुद्धिवृत्ती) ती माझी विभूती आहे. ॥१०-२२४॥

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३ ॥
अकरा रुद्रांमधे शंकर मी आहे, यक्षराक्षसांमधे कुबेर मी आहे, अष्ट वसूंमधे अग्नि मी आहे व पर्वतांमधे मी मेरु आहे. ॥१०-२३॥
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी ।
तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥
सगळ्या रुद्रांमधे कामाचा शत्रु जो शंकर, ती माझी विभूती आहे. याविषयी शंका ठेऊ नकोस. ॥१०-२२५॥
यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु ।
तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥ २२६ ॥
यक्षराक्षसांच्या समुदायामधे शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाला ॥१०-२२६॥
मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं ।
शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥ २२७ ॥
मग आठ वसूंमधे जो अग्नि ती माझी विभूती आहे, असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरु पर्वत ती माझी विभूति आहे. ॥१०-२२७॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥
हे पार्था, पुरोहितांमधे मुख्य जो बृहस्पति, तो मी आहे असे जाण. सेनानायकांमधे कार्तिकेय मी आहे, जलाशयांमधे सागर मी आहे. ॥१०-२४॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥
महर्षींमधे भृगु मी आहे, चतुर्विध वाणीमधे एकाक्षर ॐ मी आहे. यज्ञांमधे जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांमधे हिमालय मी आहे. ॥१०-२५॥
जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो ।
तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥ २२८ ॥
जो स्वर्गाच्या राज्याला साह्य आहे आणि जो सर्वज्ञते मध्ये अग्रगण्य आहे, असा जो कुलोपाध्यायांमधे श्रेष्ठ असलेला बृहस्पती, ती माझी विभूती आहे. ॥१०-२२८॥
त्रिभुवनींचिया सेनापतीं- । आंत स्कंदु तो मी महामती ।
जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिकस्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमधे माझी विभूती आहे. ॥१०-२२९॥
सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी ।
महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥ २३० ॥
सर्व जलाशयांमधे पाण्याचा मोठा साठा जो समुद्र ती माझी विभूती आहे आणि महर्षींमधे तपाचा राशि जो भृगु ती माझी विभूती आहे. ॥१०-२३०॥
अशेषांही वाचा- । माजीं नटनाच सत्याचा ।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥
सर्व बोलण्यांमधे ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो, ते एक अक्षर ॐ मी आहे, असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले. ॥१०-२३१॥
समस्तांही यज्ञांच्या पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥
या मृत्युलोकामधे कर्माच्या त्यागात ॐकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात, तो जपरूपयज्ञ सर्व यज्ञांमधे माझी विभूती आहे. ॥१०-२३२॥
नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म ।
नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥
नामजपयज्ञ हा सर्व श्रेष्ठ आहे. यास स्नानादि कर्मे बांधू शकत नाहीत. (स्नानादि कर्मांवाचून नाम घेतले तरी चालते). नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. ॥१०-२३३॥
स्थावरां गिरीआंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु ।
तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥
अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमधे पुण्याचा केवळ राशि जो हिमालय ती माझी विभूती आहे, असे लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण म्हणाले ॥१०-२३४॥
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६ ॥
सर्व वृक्षांमधे पिंपळ वृक्ष, देवर्षींमधे नारद, गंधर्वांमधे चित्ररथ गंधर्व, सिद्धामधे कपिल महामुनी मी आहे. ॥१०-२६॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भोवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७ ॥
अश्वांमधे उच्चै:श्रवा मी आहे असे जाण. गजेंद्रांमधे अमृतप्राप्त्यर्थ केलेल्या मंथनातून उत्पन्न झालेला ऐरावत आणि नरांमधे राजा मी आहे. ॥१०-२७॥
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु ।
तरि ययां वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥
कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमधे जो पिंपळ ती माझी विभूती आहे. ॥१०-२३५॥
देवऋषींआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा ।
चित्ररथु मी गंधर्वां । सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥
अर्जुना देवर्षींमधे जो नारद, ती माझी विभूती आहे. असे समज आणि सर्व गंधर्वांमधे चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. ॥१०-२३६॥
ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा ।
तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमधे कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमधे चौदारत्नातील उच्चै:श्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे. ॥१०-२३७॥
राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु ।
पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥
अर्जुना राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमधे जो ऐरावत नवाचा हत्ती ती माझी विभूती आहे. देवानी मंथन केलेल्या क्षीरसमुद्रातून तो अमृताबरोबर निघाला. ॥१०-२३८॥
ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा ।
जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥ २३९ ॥
ज्याला सर्व लोक आपण प्रजा बनून कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यांमधे राजा आहे, तो माझी महत्वाची विभूति आहे. ॥१०-२३९॥
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ॥
आयुधांमधे वज्र मी आहे, धेनूंमधे कामधेनु मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमधे वासुकि मी आहे. ॥१०-२८॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९ ॥
नागांमधे अनंत नामक नाग मी आहे, जलवासी प्राण्यांमधे वरुण मी आहे, पितरांमधे अर्यमा मी आहे, नियमन करणारांमधे यम मी आहे. ॥१०-२९॥
पैं आघवेयां हातियेरां- । आंत वज्र तें मी धनुर्धरा ।
जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥ २४० ॥
अर्जुना सर्व हत्यारांमधे, जे शंभर यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते ते वज्र माझी विभूती आहे. ॥१०-२४०॥
धेनूंमध्यें कामधेनु । तें मी म्हणे विष्वक्सेनु ।
जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥ २४१ ॥
सर्व गायींमधे स्वर्गातील कामधेनु ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. जन्म देवविणार्‍यांमधे काम तो मी आहे असे समज. ॥१०-२४१॥
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता ।
नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ॥ २४२ ॥
सापांच्या कुळामधे मुख्य असलेला जो वासुकी नावाचा सर्प, तो अर्जुना, माझी विभूति आहे. सर्व नागांमधे अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे. ॥१०-२४२॥
अगा यादसांआंतु । जो पश्चिम प्रमदेचा कांतु ।
तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥ २४३ ॥
अगा अर्जुना, जलचरांमधे पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. ॥१०-२४३॥
आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता ।
तो मी हें तत्त्वता । बोलत आहें ॥ २४४ ॥
आणि सर्व पितरांच्या समुदायामधे अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे, हे मी खरे खरे सांगत आहे. ॥१०-२४४॥
जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती ।
मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥ २४५ ॥
जगाची शुभाशुभे (पुण्यपाप) जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियमिते होतात (कर्मानुरूप सुखदु:खाचा भोग देतात) ॥१०-२४५॥
तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु ।
तो मी म्हणे आत्मारामु । रमापती ॥ २४६ ॥
त्या निग्रहानुग्रह करणारांमधे जो यम, सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे. असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. ॥१०-२४६॥
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥
दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे, हरण करणार्‍यात काल मी आहे, पशूंमधे सिंह मी आहे, पक्ष्यांमधे गरुड मी आहे. ॥१०-३०॥
अगा दैत्यांचिया कुळीं । प्रर्‍हादु तो मी न्याहाळीं ।
म्हणौनि दैत्यभावादि मेळीं । लिंपेचि ना ॥ २४७ ॥
अरे राक्षसांच्या कुळामधे जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे असे समज. आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाच्या संसार्गाने लिप्त झाला नाही. ॥१०-२४७॥
पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु ।
श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण ॥ २४८ ॥
ग्रासणारांमधे महाकाळ, ती माझी विभूती आहे. असे श्रीकृष्ण म्हणाला. आणि हिंस्र पशूंमधे जो सिंह, ती माझी विभूती आहे असे समज. ॥१०-२४८॥
पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं ।
यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥ २४९ ॥
अर्जुना ऐक. सर्व पक्ष्यांमधे गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. ॥१०-२४९॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥ ३१ ॥
वेगवान वस्तूमधे वायु मी आहे, शस्त्रधार्‍यांमधे राम मी आहे, मत्स्यांमधे मकर मी आहे, नद्यांमधे भागीरथी मी आहे. ॥१०-३१॥
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा ।
एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा कीजे ॥ २५० ॥
पृथ्वीच्या विस्तारामधे एक क्षण देखील न लागता अर्जुना, एका उडीसरशी सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो ॥१०-२५०॥
तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पंडुसुता ।
शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥
(असे जे आहेत) त्या अत्यंत वेग असलेल्या गतिवानांमधे जो वारा अर्जुना ती माझी विभूती आहे. ॥१०-२५१॥
जेणें सांकडलिया धर्माचें कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें ।
विजयलक्ष्मिये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥ २५२ ॥
ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच साह्यकारी करून त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळवले ॥१०-२५२॥
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं ।
गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां ॥ २५३ ॥
नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकशात ‘उदो उदो’ म्हणाणारी जी पिशाचे त्यांचे हातात बळी म्हणून दिली ॥१०-२५३॥
जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला ।
सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥ २५४ ॥
ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला ॥१०-२५४॥
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु ।
मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥ २५५ ॥
असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धरणारांमधे माझी विभूती आहे. जलचरांमधे शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. ॥१०-२५५॥
पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥ २५६ ॥
सर्वही जलप्रवाहांमधे जी गंगा, भगीरथ आणीत असता मध्येच जह्नु नावाच्या ऋषीने गिळाली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फोडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली, ती ॥१०-२५६॥
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता ।
जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ॥ २५७ ॥
तिन्ही लोकात एक असलेली जाह्नवी नावाची जी नदी, ती सर्व जलप्रवाहांमधे अर्जुना, माझी विभूती आहे असे समज. ॥१०-२५७॥
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं ।
सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥ २५८ ॥
अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमधे त्या अर्ध्या देखील सांगून व्हावयाच्या नाहीत. हे पक्के समज. ॥१०-२५८॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥
हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदि, अंत व मध्य मी आहे. विद्यांमधे अध्यात्मविद्या मी आहे आणि वादविवाद करणारांचा वाद मी आहे. ॥१०-३२॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥
अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्वसमास मी आहे. क्षयरहित काल मी आहे, सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे ॥१०-३३॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं ।
तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥ २५९ ॥
ज्याप्रमाणे आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंत:करणात इच्छा उत्पन्न होईल त्यावेळेला आकाशाचेच ज्याप्रमाणे गाठोडे बांधणे बरे. ॥१०-२५९॥
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा ।
तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥ २६० ॥
किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पहावयाची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे लागेल. ॥१०-२६०॥
जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ ।
तरी उपडूनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥
फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे ॥१०-२६१॥
तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष ।
तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥ २६२ ॥
त्याप्रमाणे माझ्या मुख्य मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझेच स्वरूप जाणावे. ॥१०-२६२॥
एर्‍हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती ।
म्हणौनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥ २६३ ॥
एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार ? म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे. ॥१०-२६३॥
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी ।
ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥ २६४ ॥
ज्याप्रमाणे वस्त्रांमधे आडवे उभे एक सूतच भरलेले असते, त्याप्रमाणे या सर्व जगाच्या आरंभी मध्ये व शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे. ॥१०-२६४॥
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें ।
परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणौनि असो ॥ २६५ ॥
अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता, मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करावयाच्या आहेत ? परंतु एवढी तुझी योग्यता नाही. म्हणून हे असू दे. ॥१०-२६५॥
कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणौनि तिया आईक सुभद्रापती ।
तरी विद्यांमाजीं प्रस्तुतीं । अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥
किंवा ज्याअर्थी तू विभूती विचारल्यास त्याअर्थी अर्जुना मी सांगतो त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमधे जी अध्यात्मविद्या आहे ती माझी विभूती आहे. ॥१०-२६६॥
अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं ।
जो सकलशास्त्रसंमतें कहीं। सरेचिना ॥ २६७ ॥
अरे बाबा, सर्व शास्त्रांच्या एकमताने कधीच न संपणारा असा जो वक्त्याच्या ठिकाणी असणारा वादविवाद तो मी असे समज. ॥१०-२६७॥
जो निर्वचूं जातां वाढे । आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे ।
जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होतीं ॥ २६८ ॥
वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो, व ज्या तर्कावर बोलणारांची गोड भाषणे होतात ॥१०-२६८॥
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु ।
अक्षरांमाजीं विशदु । अकारु तो मी ॥ २६९ ॥
याप्रमाणे प्रतिपादनांमधे जी वाटाघाट चालते, ती माझी विभूती आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमधे स्पष्ट असे ‘अ’ अक्षर ती माझी विभूती आहे. ॥१०-२६९॥
पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं ।
मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥ २७० ॥
अर्जुना, तत्पुरुष वगैरे सर्व समासांमधे द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. ॥१०-२७०॥
मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी ।
जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथ ॥ २७१ ॥
मेरु, मंदार इत्यादि सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विरवतो व जो जळरूप झालेल्या जगालाही जेथेल्या तेथेच आटून टाकतो ॥१०-२७१॥
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी ।
आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥ २७२ ॥
जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून, अर्जुना, संपूर्ण वार्‍याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते ॥१०-२७२॥
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु ।
मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥ २७३ ॥
याप्रमाणे अमर्याद काळ तो माझी विभूती आहे. असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती माझी विभूती आहे. ॥१०-२७३॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भ”वश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥
सर्वांचा संहार करणारा मृत्यु मी आहे (पुन्हा कल्पांतरी) उत्पत्ती पावणार्‍या प्राण्यांना उत्पन्न करणारा (उद्भव) मी आहे स्त्रीलिंगवाचक वस्तूंमधे कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती व क्षमा या सातजणी मी आहे. ॥१०-३४॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं ।
शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥
आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला या सर्वांचा नाश करतो त्यावेळेला मृत्युदेखील मीच आहे. ॥१०-२७४॥
आतां स्त्रीगणांच्या पैकीं । माझिया विभूती सात आणिकी ।
तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥ २७५ ॥
आता आणखी माझ्या सात विभूती स्त्रीवर्गापैकी आहेत. त्याही सहजच सांगितल्या जातील. त्या तू ऐक. ॥१०-२७५॥
तरी नित्य नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती ।
आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥
तरी नेहेमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे आणि उदारपणाच्या जोडीने असणारी जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. ॥१०-२७६॥
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचा ।
आरूढोनि विवेकाचा । मार्गीं चाले ॥ २७७ ॥
आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. ॥१०-२७७॥
देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें ।
ते स्मृतिही एथें । त्रिशुद्धी मी ॥ २७८ ॥
कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चयेकरून येथे मी आहे. ॥१०-२७८॥
पैं स्वहिता अनुयायिनी । मेधा ते गा मी इये जनीं ।
धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥ २७९ ॥
स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकामधे मी आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. ॥१०-२७९॥
एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मी अवधारीं ।
ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥ २८० ॥
याप्रमाणे स्त्रीवर्गामधे सातही शक्ती मीच आहे असे समज. असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. ॥१०-२८०॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥
(अठरा हजार चौदा) सामांमधे (सामवेदांतर्गत ईश्वरस्तोत्रातील) बृहत्साम मी आहे. (उष्णिक्, अनुष्टुभ् इत्यादी छंदांमधे) गायत्री छंद मी आहे, मासांमधे मार्गशीर्षमास मी आहे, ऋतूंमधे वसंत ऋतु मी आहे. ॥१०-३५॥
वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा ।
तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥ २८१ ॥
अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमधे असलेल्या रथंतरादी सामांमधे बृहत्साम ही माझी विभूती आहे. असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ॥१०-२८१॥
गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें ।
स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥
ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदांमधे माझे स्वरूप आहे असे ती नि:संशय समज. ॥१०-२८२॥
मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु ।
ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥ २८३ ॥
सर्व महिन्यांमधे मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. सहा ऋतूंमधे पुष्पांची खाण जो वसंत ऋतु तो मी आहे. ॥१०-२८३॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६ ॥
छलन करणार्‍या वस्तूंमधे द्यूत मी आहे, तेजस्वी पदार्थातील तेज मी आहे, जय (सिद्धी) मी आहे, उद्यम मी आहे, सात्विक वस्तूंमधे सत्त्व मी आहे. ॥१०-३६॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥
यादवांमधे श्रीकृष्ण मी आहे, पांडवांमधे धनंजय मी आहे, मुनींमधे व्यासमुनी मी आहे, कवींमधे शुक्र मी आहे. ॥१०-३७॥
छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा ।
म्हणौनि चोहटां चोरी परी कवणा । निवारूं न ये ॥ २८४ ॥
हे चतुर अर्जुना, छलकारक कारस्थानांमधे जुगार ती माझी विभूती आहे, म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. ॥१०-२८४॥
अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा ।
विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥ २८५ ॥
अर्जुना एकूण एक तेजस्वी पदार्थांमधे असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारांतील हेतूंमधे विजय आहे, (हातात घेतलेल्या कामात येणारे यश ही माझी विभूती आहे.) ॥१०-२८५॥
जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय ।
माझें स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥
सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो (म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही) तो माझेच स्वरूप आहे असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. ॥१०-२८६॥
सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।
यादवांमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥ २८७ ॥
सत्वगुणसंपन्नांमधे जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला आणि यदुकुळातील पुरुषांमधे ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच मी आहे. ॥१०-२८७॥
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला ।
तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ॥ २८८ ॥
जो देवकी-वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीचे बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचे तिच्या प्राणांसह शोषण केले ॥१०-२८८॥
नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवीं सृष्टि केली ।
करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥ २८९ ॥
बाळपणाची दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला. (म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला.) ॥१०-२८९॥
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।
वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥ २९० ॥
यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाने सलणारा (जो कालिया नाग) त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेले गोकुळ त्याचे रक्षण केले व ब्रह्मदेवाला वेड लावले. ॥१०-२९०॥
प्रथमदशेचिये पहांटे- । माजीं कंसा ऐशीं अचाटें ।
महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥
बाल्यावस्थेच्या सुरवातीमधेच कंसासारखी अचाट धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. ॥१०-२९१॥
हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें ।
तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥ २९२ ॥
हे एक एक वेगवेगळे किती सांगणार ? हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस. तर यादवांमधे हेच (कृष्ण) माझे स्वरूप आहे असे समज. ॥१०-२९२॥
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा ।
म्हणौनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥ २९३ ॥
आणि सोमवंशतील तुम्हा पांडवांमधे जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परांतील स्नेहसंबंधांमधे बिघाड येत नाही. ॥१०-२९३॥
संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी ।
तर्‍ही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ २९४ ॥
या लोकांमधे तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही कारण मी व तू दोघेही एकरूपच आहोत ॥१०-२९४॥
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो ।
कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥ २९५ ॥
सर्व मुनींमधे व्यासदेव ती माझी विभूती आहे. असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले व मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमधे धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. ॥१०-२९५॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८ ॥
दमन कराणारांचा (दमनला साधनीभूत) दंड मी आहे, जयाची इच्छा करणारांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूंमधे मौन मी आहे, ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. ॥१०-३८॥
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं ।
जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥ २९६ ॥
अर्जुना, नियमन करणार्‍यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे. असे समज. ॥१०-२९६॥
पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां ।
सकळ शास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥
सारासार विचार करणार्‍या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणार्‍या अशा सगळ्या शास्त्रांमधे नीतिशास्त्र ते मी आहे. ॥१०-२९७॥
आघवियाचि गूढां- । माजीं मौन तें मी सुहाडा ।
म्हणौनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥
हे अर्जुना, सर्व गुह्यांमधे मौन मी आहे, म्हणून न बोलणारांपुढे ब्रह्मदेवसुद्धा अज्ञानी होतो. ॥१०-२९८॥
अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं ।
आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥ २९९ ॥
अर्जुना ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे. या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. ॥१०-२९९॥
यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदसेति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥
हे अर्जुना सर्व भूतांचे बीज ते मी आहे, स्थावर व जंगम अशी कोणतीही वस्तु नाही की जी माझ्यावाचून अस्तित्वात असू शकेल. ॥१०-३९॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥
हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. ॥१०-४०॥
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा ।
कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥ ३०० ॥
अर्जुना पावसाच्या धारांची गणना करता येईल काय ? अथवा पृथ्वीवर उगवणार्‍या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय ? ॥१०-३००॥
पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा ।
तेवीं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ॥ ३०१ ॥
अर्जुना महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. ॥१०-३०१॥
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।
तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥ ३०२ ॥
माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला सात पाच (पंच्याहत्तर) आमच्या मुख्य विभूती सांगितल्या. पण ते आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना, आमच्या मनाला व्यर्थ वाटले. ॥१०-३०२॥
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं ।
म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥
बाकीच्या आमच्या विभूती-विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय ? ॥१०-३०३॥
यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज ।
तरी सर्व भूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ॥ ३०४ ॥
याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो ते असे की सर्व प्राणिरूप अंकुराने वाढणारे जे बीज आहे ते मी आहे. ॥१०-३०४॥
म्हणौनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे ।
एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥ ३०५ ॥
एवढ्या करता लहानमोठे अशी निवड करू नये. एक कमी योग्यतेचे व एक जास्त योग्यतेचे असली कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तु आहेत त्या मीच एक आहे असे समजावे. ॥१०-३०५॥
तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण ।
तरी अर्जुना तें तूं जाण । विभूति माझी ॥ ३०६ ॥
अर्जुना यापेक्षाही सर्व सामान्य आणखी एक खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. ॥१०-३०६॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ४१ ॥
जी जी वस्तु वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण. ॥१०-४१॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥ ३०७ ॥
अर्जुना, ज्या ज्या (प्राण्याच्या) ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही रहावयास आलेली असतील, तो तो प्राणी माझी विभूती आहे असे समज. ॥१०-३०७॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नतमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान काय करायचे ? कारण असा तू मला कोठवर जाणशील ? तर थोडक्यात सांगतो मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. ॥१०-४२॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं । प्रभा फांके त्रिभुवनीं ।
तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥
अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. ॥१०-३०८॥
तयांतें एकलें झणीं म्हण । तो निर्धन या भाषा नेण ।
काय कामधेनूसवें सर्वस्व हन । चालत असे ? ॥ ३०९ ॥
ज्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर असे म्हणू नकोस. ते ऐश्वर्यशून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नकोस. (जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच). कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते काय ? तर नाही. ॥१०-३०९॥
तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे ।
तेवीं विश्वविभव तया आंगें । होऊनि असती ॥ ३१० ॥
तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्यांचे अंगभूत होऊन रहातात. ॥१०-३१०॥
तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।
ऐसें आथि तें जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥ ३११ ॥
त्यांना ओखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिमान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार समज. ॥१०-३११॥
आणि सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष ।
कां जे मीचि एक अशेष । विश्व हें म्हणौनि ॥ ३१२ ॥
आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. ॥१०-३१२॥
तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु ।
वायां आपुलिये मती वंगु । भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥
तर आता एक साधारण व एक चांगला असा बेद कसा कल्पावा ? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा ? ॥१०-३१३॥
एर्‍हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें ।
हां गा वायूसि काय पां डावें । उजवें आंग आहे ? ॥ ३१४ ॥
नाहीतर तूप कशाला घुसळावे ? अमृताला शिजवून काय अर्धे करायचे ? बाबा अर्जुना वार्‍याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे का ? ॥१०-३१४॥
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी ।
तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥ ३१५ ॥
सूर्यबिंबाबाला पोट-पाठ आहे का ? म्हणून पहावयास गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही. (असे असून ती मानली तर आपलीच बुद्धी बिघडेल). ॥१०-३१५॥
आणि सिनाना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती ।
म्हणौनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥ ३१६ ॥
आणि निरनिराळ्या विभूतींनी जो अमर्याद मी त्या मला किती मोजशील ? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे ? हा विभूति जाणण्याचा प्रकार राहू दे. ॥१०-३१६॥
आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे ।
यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ३१७ ॥
माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे, याकरता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ॥१०-३१७॥
ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें ।
बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥
ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठतेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते या प्रमाणे बोलले. ॥१०-३१८॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलें तुम्हीं ।
जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकीं ॥ ३१९ ॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोलला. ॥१०-३१९॥
हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें ।
तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥
सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा. (नाहीतर मला ठेच लागेल. सूर्यापुढे जसा अंधार, तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही असे असून तुम्ही ‘भेद टाक’ म्हणून अविचाराने सांगता. पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे ? कारण तो अतिप्रसंग होतो. ॥१०-३२०॥
तुझें नामचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां कानां मिळे ।
तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ॥ ३२१ ॥
कोणत्या एखाद्या वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल, त्याच्या अंत:करणाला भेद खरोखर टाकून पळेल. ॥१०-३२१॥
तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें ।
तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ? ॥ ३२२ ॥
असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद कसला, कोठे व कोणी पहावयाचा आहे ? ॥१०-३२२॥
जी चंद्रबिंबाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा ।
परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥
अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर म्हटले तर ते शोभेल काय ? परंतु हे श्रीकृष्णा आपण आपल्या मोठेपणात वरील असंबद्ध भाषण बोलत अहात. ॥१०-३२३॥
तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।
मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥ ३२४ ॥
त्या प्रसंगात देवाने अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले. आणि मग म्हटले, अर्जुना, आमच्या बोलण्याविषयी रागावू नकोस. ॥१०-३२४॥
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी
ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें ॥ ३२५ ॥
आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही ॥१०-३२५॥
हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।
तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥ ३२६ ॥
हेच पहाण्याकरता आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले, तो आम्हास असे आढळाले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. ॥१०-३२६॥
तेथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें ।
परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥ ३२७ ॥
यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही, हे तुमचे तुम्ही समजा. पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे. ॥१०-३२७॥
पैं राया तो पंडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरितु ।
या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥
संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. ॥१०-३२८॥
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें ।
हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तंव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥
संजय हा अंत:करणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय ? हा धृतराष्ट्र अंत:करणाने समजदार आहे, असे मला वाटत होते. पण (त्यास अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे यावरून) मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे तसा अंत:करणातही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे. ॥१०-३२९॥
परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु ।
कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥ ३३० ॥
(ज्ञानेश्वर महरज म्हणतात,) पण हे संजयाचे बोलणें राहूं दे. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवीत आहे. कशावरून ? तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. ॥१०-३३०॥
म्हणे हेचि हृदया आंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती ।
इये आर्तीचिया पाउलीं मती । उठती जाहली ॥ ३३१ ॥
अर्जुन आपल्याशी असे म्हणावयाला लागला की हा (सर्व विश्वात एक भगवंताचेच रूप व्याप्त आहे) माझ्या अंत:करणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा. अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. ॥१०-३३१॥
मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा ।
एवढी हांव तो देवा आगळा । म्हणौनि करी ॥ ३३२ ॥
मी याच दोन डोळ्यांनी (बाह्य चर्माक्षूंनी) सर्व विश्वरूप पहावे, एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. ॥१०-३३२॥
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणौनि वांझोळें न लगती देखा ।
जें जें येईल तयाचि मुखा । तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३३ ॥
आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे. म्हणून त्या फांदीला वांझ फुले येणार नाहीत असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल, ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. ॥१०-३३३॥
जो प्रर्‍हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला ।
तो सद्‍गुरु असे जोडला । किरीटीसी ॥ ३३४ ॥
प्रल्हादाने (माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकशिपूस सांगितल्याकारणाने जो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता. ॥१०-३३४॥
म्हणौनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं ।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५ ॥
म्हणून ‘मला विश्वरूप दाखवा’ हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥१०-३३५॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara