वेद प्रमाण करावया गोकुळासि आला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २९
वेद प्रमाण करावया गोकुळासि आला ।
कीं नाटळिचा कुवांसा जाला ।
ब्रह्म आणि गोवळा ।
ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥
गणिका स्वीकारि राहो मांडला ।
कीं दशरथ पतनीं चुकविला ।
एका तें म्हणे जागा ।
एका तें म्हणेरे निजा ।
तैं मुचूकुंदापें काळयवनु आणिला रया ॥१॥
विरोचनसुत । बळी बांधोनि जेणें ।
निगड निबध्द गजा सोडविलें ।
एकाचीं बालकें काळापासूनियां हिरे ।
एका बाळाचे बाप विदारिले ।
शिशुपाळा जैत देऊनियां शेखिं पाहेपां आपणचि जिंकीलें रया ॥ध्रु०॥
गुरुदुर्वास याचिये भक्ति आणि त्याचियेची रथीं देविरुक्मिणीसहित खांदु चालविला ।
तो तेणें मानें फ़ुंदो पाहे तंव कोलतिया भेणें त्रैलोक्य हिंडविला ।
पैजा सारुनि हातीं सुदर्शन वसविलें कीं भीष्मपण ।
साचू केला ।
जितुकाचि कौरवा तितुकाचि पांडवां अचोज हा अमुलारया ॥२॥
जमदग्नी जनकाचा वोल भूमीं न पडावा ।
हाठावो वरि पितृभक्तीची आवडी ।
जेणें साचपणा कारणें माता वधिली ।
कीं पुराणें खोचिलीं तोंडीं ॥
असुरदैत्य संहारितां बापु तयांची पातकें दवडी ।
प्रजासि रायाची आण रायासी कवण नेमु हे तों संततपणाची प्रौढी रया ॥३॥
या परि चराचरींचे दानव गिंवसूनि पुसिले परोपरी ।
तंव यादवांसि अंबुलेपणची आस जाली थोरी ।
प्रभास क्षेत्रीं अवघियातें केली एकसरी ।
देवकी पुतना नोळखिजे । वैर भक्तीसी एकिची वोवरी ।
पवनु काय हा पंथु शोधूनियां चाले समर्थु करिल तें उजरि रया ॥४॥
या गोविंदाची माव । हे तों ब्रह्मदिकांसी कुवाडें ।
तो हा मायेचेनि साचपणें न घेपवे ।
प्रकृतीचे गुण ते याचिये गांवीचे ।
तो करील तें अनुचित बरवें ॥
लाघावियाचे भ्रमु लाघवीच जाणे यांसि कांही नवल नव्हे ।
बाप रखुमादेविवरु जाणीतला तरि उकलेल आघवें रया ॥५॥
अर्थ:-
या श्रीकृष्ण परमात्म्याने वेदप्रमाण करण्याकरिता गोकुळात अवतार घेतला, तो ब्रह्मादिकांना वंद्य असला तरी सर्वप्रकारे खोड्या करणारा म्हणून नाठाळपणाचे घरच होऊन बसला; परब्रह्म श्रीकृष्ण येथे गोकुळात गुरे राखू लागल्यामुळे शास्रांच्या प्रतिपादनाला लाज आली.अशा त्या श्रीकृष्णाने काय काय वाईट गोष्टी केल्या त्या पाहा.गणिका वेश्याचा स्वीकार केला; मग सहजच बाकीच्या लग्नाच्या बायकांशी द्वेष वाढला.यानेच राम अवतारामध्ये आपला बाप दशरथ त्याला नेमका पतनात घातला.एकाला पळ म्हणायचे, एकाला पाठीस लाग म्हणायचे; मुचुकुंदाला मारण्याकरिता काळयवनाला आणले ॥१॥ प्रल्हादाचा नातु म्हणजे विरोचनाचा मुलगा जो मोठा भक्त बळी, त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास पाताळात घातले; आणि यःकश्चित पशु जो गजेंद्र त्याला नक्रापासून सोडविले; आपल्या सांदिपन गुरूचा मेलेला मुलगा काळापासून हिरावून आणला; आणि प्रल्हादाचा बाप जो हिरण्यकश्यपु त्याला पोट फाडून मारला; शिशुपाळ हा चेदि देशचा राजा असून पांडवांचा मावसभाऊ होता.रुक्मिणी यास द्यावी असा तिचा बाप भीमक ह्याचा बेत होता; पण श्रीकृष्णानेच तिला पळवून नेले.धर्मराजाने राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला, तेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाची अतिशय निंदा केली.म्हणून श्रीकृष्णाने आपणच त्यास मारले. ॥धृ॥ अतिश्रेष्ठ गुरु जे दुर्वास ऋषी, त्यांची श्रीकृष्णावर फार भक्ती होती,; त्यामुळे त्यास आपल्या रथात बसवून श्रीकृष्णाने रुक्मिणीसहित तो रथ घोड्याप्रमाणे ओढून नेला,त्या योगाने दुर्वासास मोठा अभिमान उत्पन्न झाला.त्या अभिमानाने त्याने महाभागवत भक्त जो अंबरीष राजा त्त्याला तीर्थ घेऊन द्वादशीचे पारणे सोडल्याबद्दल शाप दिला.तेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्राचे कोलीत लाऊन त्याला त्र्यैलोक्यात हिंडावयास लाविलें श्रीकृष्णाने भारतीयुध्दात मी आता हातात शस्र धरणार नाही, अशी पैंज मारली होती.ती पैज एका बाजूस सारून हातात सुदर्शन घेतले; आणि भीष्मांचा पण खरा केला.हा जितका पांडवांना प्रिय होता तितकाच दुर्योधनासही प्रिय होता. ॥२॥ परशुरामाचा बाप जो जमदग्नी, त्याची बायको रेणुका हिला एकदा नदीहून येण्यास विलंब झाला; त्यामुळे जमदग्नीने रागावून आपला पुत्र जो परशुराम त्याला आपल्या आईस ठार मारण्यास सांगितले.आपल्या पित्याचा शब्द व्यर्थ न व्हावा अशी पितृभक्ती परशुरामाच्या ठिकाणी असल्यामुळें आपल्या पित्याच्या वाणीला सत्यपणा येण्याकरिता त्याने आपल्या आईस ठार मारले.मातृवध वाईट खरा, तरीही परशुरामाची कीर्ति पुराणाच्या रूपाने वर्णन केली.बाप !बाप!धन्य!धन्य!त्या श्रीकृष्णाची.त्याने जितके दैत्य मारले, त्या सर्वांची पातके नाहींशी करून टाकली.प्रजेच्या व्यवहारात सत्यपणाच्या निर्धाराकरिता राजाची शपथ घालतात, पण राजाच्या वागणुकीला नियम कसला घालावा ? त्याप्रमाणे जीवाला जगदीश्वर श्रीकृष्णाचे भय आहे खरे; परंतु श्रीकृष्णाला कोणाचे भय असणार ?अशी त्याच्या वागणुकीची प्रौढी आहे. ॥३॥ याप्रमाणे चराचरातील दैत्य शोधून,निरनिराळ्या प्रकाराने मारले.त्यामुळे सर्व यादवांना संपन्नतेची मोठी घमेंड झाली.म्हणून त्यांनाही प्रभासक्षेत्री नेऊन त्यांचाही नाश केला.ही आपली आई देवकी किंवा ही विष पाजण्याला आलेली पुतना, अशा द्वैतभाव त्याच्या मनात राहिला नाही.वैर आणि भक्ती ही एकाच किंमतीने त्याच्या ठिकाणी राहतात.वारा हा कधी चांगला किंवा वाईट मार्ग शोधून चालत असतो काय ? त्याला बरे वाईट कोणतेही मार्ग सारखेच.समर्थ भगवान श्रीकृष्ण, जे करील ते सर्व उत्तमच. ॥४॥ या भगवान गोविंदाची माय म्हणजे माया, काय आहे हे ब्रह्मादिकाला कळणेसुध्दा कठिण आहे.असा परमात्मा श्रीकृष्ण मायेच्या स्वाधीन होत नाही.त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे सत्वरजादि गुण ते जणूंकाय याच्याच घरचे.त्या गुणाच्या साहाय्याने याने लोकदृष्ट्या एखादे अनुचित कृत्य केले तरी ते चांगलेच.बहुरुप्याने दाखविलेला खोटा व्यवहार बहुरुपीच जाणतो.; यात काही नवल नाही.रखमादेवीवर जो बाप श्रीविठ्ठल त्याला यथार्थ जाणले तर ही सर्व कोडी उकलतील रे बाबा ! ॥५॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥
वेद प्रमाण करावया गोकुळासि आला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २९
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.