शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३
शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ ।
पाहोनि चोखाळ आदिपुरुषासी ।
जन्म मरणाचिया उचलुनि पेडी ।
मग तया बिंबडीं ज्ञान पिके ॥१॥
पंढरिचें पिक नसमाये अंबरीं ।
तें शेत सोकरी पुंडलिक ॥ध्रु०॥
ऐहिक परत्र दोन्ही शेताचीं आउतें ।
मुंड मुंड तेथें कुळवाडिये ।
उचलुनि पेंडी कासिया समुळीं ।
मग पुण्यकाळीं वोलवले ॥२॥
गरुडटके दोन्ही शेताची बुझवणी ।
दस कुडपणी नामघोष ।
एकवीस स्वर्गाचा घालुनिया माळा ।
मग तया गोपाळामजीं खेळे ॥३॥
जये शेतीं निवृत्ती भीतरे तये शेतीं साजे पुरे ।
राउळीं निदसुरे दंडीजती ॥
रात्रंदिवस तुम्हीं हरिचरणीं जागा ।
तेणें तरालगा भगसागरु ॥४॥
अठाराही बलौतें तें केलें धडौतें ।
खळें दान देतें सनकादिका ।
ज्ञानदेव म्हणे जगदानीं पिकला ।
पुरोनि उरला पंढरिये ॥५॥
अर्थ:-
शरीर हे स्थळ म्हणजे क्षेत्र, किंवा मळा म्हणजे जन्मरणादि दुःखरुपी संसाराचे तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे अशी दोन्ही पिके करण्याचे मूळ म्हणजे क्षेत्र आहे त्यात शुध्द जो परमात्मा त्यास पाहिल्याने जन्ममरणाच्या मुळ्या, खोडे काढुन टाकून अशी ती जमीन बिवड केली असल्यामुळे त्या जमिनीत ब्रह्माचे पीक आले. असे ते पीक पंढरपूरात आले त्याचा काय नवलाव सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशा सगळ्या शेतांची पिके नवलावा सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशी शेतीची पिके गोळा करणारा पुंडलिक आहे. ऐहिक परत्र ही दोन्ही शेतांची औते आहेत.त्या औतांच्या साधनाने गरीब लोक शेती करणारे शेतकरी आहेत ? शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ह्याच कोणी त्या मुळा सकट काढुन शरीररुपी क्षेत्र स्वच्छ केल्यावर पुण्य कर्माच्या काळी ते चांगले ओलावले. संताच्या दिंडीत गरुडटके असतात. हीच कोणी त्या शेतांची बुजगावणी केली. संताचा जो नामघोष हीच कोणी दशदिशांची कुडपणी/ कुंपण होय. एकवीस स्वर्गाची माळा घातलेला परमात्मा वैष्णवांत खेळत आहे शरीररुपी शेतांत निवृत्ति अंतर्मुखता आहे. तेथे धान्याची रासरुपी शेतात परिपूर्ण आहे. शेताचे काम न करता स्वस्थ निजणारे जे घरांतआहेत. त्यांना दंड केला जातो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस हरीचरणाचे ठिकाणी जागे राहा त्याने भवसागर तराल हो ! अशा तुमच्या भक्तीमुळे अठरा पुराणे हेच कोणी बलुतेदार संतोषतील. तसेच तुम्ही भक्ती करा असे दान मागण्यास आलेले सनकादिक हेही संतुष्ट होतील. सर्वाच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच श्री पांडुरंगराय असून तो पंढरीस भक्तासांठी शिल्लक राहिला आहे. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.
शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.