सत्त्व रज तम प्रकृती अपारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४८
सत्त्व रज तम प्रकृती अपारा ।
याहि भिन्न प्रकारा हरी रया ॥१॥
दिसोनि न दिसे लोकीं व्यापारी ।
घटमठ चार्ही हरी व्याप्त ॥२॥
स्वानुभवें धरी अनुभवें वाट ।
तंव अवचित बोभाट पुढें मागें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची लीला ।
ते निवृत्तीनें डोळां दाविली मज ॥४॥
अर्थ:-
सत्त्व, रज तम या गुणांनी युक्त अशी जी प्रकृति ती सर्व जगाला उपादान धरण आहे. त्या प्रकृतिहून वेगळा श्रीहरि आहे. हरि घटमठात व्यापक उलट असल्यामुळे तो सर्व जगांत भासमान आहे. पण आश्चर्य हे आहे की तो कोणास कोणत्याही व्यवहारांत दिसत नाही. त्याकरिता आत्मस्वरूपाच्या विचाराची वाट धर म्हणजे सहजगत्या कसलीही अडचण न येता तुझ्या मागेपुढे असा सर्वत्र तोच तुला दिसेल. या श्रीहरिची लीला कोणालाही कळणार नाही. पण माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी मात्र ती लीला माझ्या डोळ्याला प्रत्यक्ष दाखविली. माऊली ज्ञानदेव सांगतात.
सत्त्व रज तम प्रकृती अपारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४८
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.