वोल्हावले मन परतोनो पाही ।
तंव प्रपंच दिसे आया गेले ।
पिटुनी बाह्या वैराग्याची गुढी ।
उभऊनी म्हणे म्यां जिंकिलें ॥
पपर न दिसे शेखी ।
चरणी स्थिरावलें ।
जळतरंग लहरी ।
सरिता संगम जीवनीं ।
जीवन ऐक्य ठेलें रया ॥
तेंचि ब्रह्मज्ञान बोधिता पाहातां ।
सगुण निर्गुण आता भेदु नाहीं ।
वाउगाचि शिणसी विचारी मानसीं ।
वायां कल्पना करूनि दाही दिशी रया ॥
हणोनि तंतु ओतप्रोत होतु ।
तैसे विश्वजात ब्रह्मी असे ॥
तीं कल्पिसी भेद सगुण निर्गुण ।
तेणे कल्पने प्रत्यया नये ।
सर्वस्वे उदासीन होई तुं निश्चय ।
जाण एक सगुणींचि काय न लभे रया ॥
म्हां सगुण निर्गुण समान ।
नेणो जन्म जातक भान ।
दृश्य द्रष्टा दर्शन ।
त्रिपुटी नलगे ।
महावाक्यादि शब्द ।
तत्त्वमस्यादि बोध ।
हेही आम्हा सकळ वाउगें रया ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतितां ।
सुख सगुणींच जोड़े येणें अंगे रया ॥
अर्थ:-
समाधी ठिकाणी असलेले मन परत मागे पाहते तर तो प्रपंच दिसत नाही.मग तो दोन्ही बाह्या उभारुन वैराग्याची गुढी उभी करुन मी जिंकलो असे म्हणतो. मग सर्व प्रपंचच त्याला एकमय दिसतो त्याचे आपपरभाव निघुन जातात तो त्या सगुण चरणांवर मन स्थिर करतो जशा लहरी सागरात व नद्या संगमात एकत्व पावतात. मग तोच ब्रह्म ज्ञानाने बोधित झालेला असतो. सगुण निर्गुणाचे भेद मावळतात वेगळा विचार करुन शिणत नाही व वेगळी कल्पना त्याला दशदिशेला हिंडवत नाही.जसा कापडात तंतु ओतप्रोत असतो तसे ह्या विश्वात ब्रह्म आहे हे समजतो कल्पित भेद, सगुण निर्गुणात अडकत नाही. कल्पनेचा ही प्रत्यय करत नाही. तो प्रपंचाविषयी उदासिन होतो. हेच त्याला सगुण भक्तीत प्राप्ता का नाही होणार? दृष्य द्रष्टा द्रर्शत्व ही त्रिपुटी तेथे लोप पावते सगुण निर्गुण हे समान होतात. तत्वमस्यादी महावाक्याचा बोध उरत नाही. त्याची तिथे आम्हाला गरजच उरत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चिंतन केले तर सगुण निर्गुण तेच आहेत हे कळते व महासुख तेंव्हा प्राप्त होते असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.