मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९७

मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९७


मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें ।
अंतरबाह्य रंगुनि गेलें विठ्ठलची ॥१॥
विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरीं आलें पुण्य माप ।
धाला दिनाचा मायबाप विठ्ठलची ॥२॥
विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला ।
आज म्या दृष्टीनें पाहिला विठ्ठलची ॥३॥
ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानीं ।
अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥
तो हा चंद्रभागे तीरा पुंडलिकें दिधला थारा ।
बापरखुमादेवीवरा जडले पायीं विठ्ठलची ॥५॥

अर्थ:-

त्या भगवन्नामस्मरणामध्ये माझे मन तृप्त झाले याचा अर्थ तें विठ्ठल स्वरूपच होऊन गेले. त्या नामस्मरणांत मी अंतर्बाह्य रंगून गेले. विठ्ठल नामस्मरणाने पापाची निवृत्ति होऊन पुण्य पदरी पडलें त्या नामस्मरणाने दीनांचा मायबाप जो श्रीविठ्ठल तो संतुष्ट झाला. त्या विठ्ठलाशिवाय दुसरे काही नाही. तो जळी स्थळी सर्वत्र एकरूपाने भरला आहे. अशा त्या श्रीविठ्ठलाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. श्रद्धेने त्या श्रीविठ्ठलाला ध्यान करून मनामध्ये आणले, मलाअसे वाटते की माझी वाणी त्या श्रीविठ्ठलनामाचा सतत उच्चार करो. असा हा श्रीविठ्ठल चंद्रभागेच्या तीरी पुंडलिकरायांनी थारा दिल्यामुळे विटेवर उभा राहीला आहे. त्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री पंढरीरायांच्या ठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले आहे. असे माऊली सांगतात.


मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.