वाराणशी यात्रे जाईन ।
प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणिये स्नान करीन ।
परि मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पाईची वीट ।
मी कईबा होईन ॥ध्रु०॥
गोदावरी यात्रे जाईन ।
बारा वरुषाचें फळ लाहीन ।
अब्जकतीर्थी स्नान करीन ।
परि मी वीट नव्हेन ॥२॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन ।
श्रीशैल्यशिखर पाहीन ।
पाताळगंगें स्नान करीन ।
परि मी वीट नव्हेन ॥३॥
मातापुर यात्रे जाईन ।
सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगेम स्नान करीन ।
परी मी वीट नव्हेन ॥४॥
कोल्हापुरीं यात्रे जाईन ।
महालक्ष्मी पाहीन ।
विशाळतीर्थी स्नान करीन ।
परि मी वीट नव्हेन ॥५॥
एका अंगुष्ठीं तप करीन ।
पृथ्वीपात्रचि लाहीन ।
देह कर्वतीं देईन ।
परि मी वीट नव्हेन ॥६॥
बहुता पुण्यांच्या सायासीं ।
चरण जोडले विटेसी ।
निवृत्ति दासु म्हणे परियेसी ॥
परी मी वीट नव्हेन ॥७॥
अर्थ:-
परमात्मा हीच कोणी वीट अशी भावना करुन माऊली म्हणतात. मी, काशी प्रयाग इत्यादी क्षेत्रात जाऊन त्रिवेणीचे स्नान करीन परंतु त्यामुळे वीट म्हणजे परमात्मरुप होणार नाही. हे पांडुरगा, मी परमात्मस्वरुप केव्हा होईल. तसेच गोदावरी यात्रेला जाईन, बारा वर्षे साधने करुन काही मायिक फळ मिळविन तसेच अब्जक तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे वीट मात्र होणार नाही मल्लिकार्जुन क्षेत्राला जाऊन श्रीशैल्य पर्वताचे शिखर पाहीन, तसेच पाताळ गंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही.मातापूर यात्रेला जाऊन सह्याद्री पर्वत पाहीन आणि त्याठिकाणी असलेल्या गहनगंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. कोल्हापूर यात्रेला जाईन, महालक्ष्मीचे दर्शन घेईन, शिंगणापूर विशाल तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करीन, सर्व पृथ्वी प्राप्त करुन घेईन, देह करवतीने कापन देईल. पण या करण्याने मी वीट मात्र होणार नाही. भगवत्प्राप्तीची उत्सुकता लागलेला भक्त म्हणत आहे. की, अनेक जन्मीच्या महान पुण्याईन मला पांडुरंगरायांचे दर्शन झाले. तरी पण त्याच्या पायाखालची वीट होणार नाही. म्हणजे मला ती वीट होण्याचे भाग्य सहसा लाभणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.