तळवे तळवटीं असे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७५

तळवे तळवटीं असे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७५


तळवे तळवटीं असे ।
विटें फ़ावलें अनयासें ॥१॥
आम्हां न संडवे पंढरी ।
विठ्ठलराज विटेवरी ॥ध्रु०॥
जानु जघन बरवे दिसे ।
ते देखोनि मन उल्हासे ॥२॥
पदकमळ जोडिलें ।
तेथें मुनिजन रंगलें ॥३॥
कासे कसिला पितांबरु ।
चरणीं ब्रिदाचा तोडरु ॥४॥
नाभीकमळीं जन्म असे ।
ब्रह्मादिंका अपैसे ॥५॥
हस्तकडगे बाहुवटे ।
विठोबा शृंगार गोमटें ॥६॥
अंगीं चंदनाची उटी ।
ते देखोनि मन संतुष्टी ॥७॥
गळा वैजयंती माळा ।
मणीमंडित वक्षस्थळा ॥८॥
कानीं कुंडलें झळाळा ।
श्रीमुख दिसतें वेल्हाळा ॥९॥
वदन सकुमार गोजिरें ।
जैसे पोवळिवेल साजिरे ॥१०॥
दंतपंक्ति झळाळ ।
जैसी मणिकाची किळ ॥११॥
नाशिक मनोहर दिसे ।
जैसें वोतिलेंसे मुसें ॥१२॥
लोचन बरवें विशाळ ।
श्रवणीं कुंडलें झळाळ ॥१३॥
टिळक रेखिला मृगनाभीचा ।
बाप राजा मन्मथाचा ॥१४॥
माथां मुगुट झळाळित ।
बाप पुंडलिका न्याहाळित ॥१५॥
निवृत्तिदास शरणांगत ।
विठ्ठला चरणींचे आरत ॥१६॥

अर्थ:-
या श्रीहरिचे तळवे तळवटी म्हणजे तळपायाचे खाली विट असून त्या विटेवर समचरणाने आम्हांला अनायासाने प्राप्त झाले. म्हणुन आम्हाला पंढरी सोडून जावेसे वाटत नाही. विटेवर पाय असलेल्या विठ्ठलाचे हात, मांड्या शोभून दिसत आहे. व ते पाहिल्याबरोबर मनाला आनंद होतो. ज्याच्या चरणकमळाच्या ठिकाणी ऋषी, मुनी रंगुन गेले.जो पितांबर नेसला असून ज्याच्या पायात तोडरअलंकार घातला आहे. ज्याच्या नाभिकमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ति झाली आहे. ज्याच्या हातातील कडे तसेच इतर अलंकार त्या सुंदर शृंगाराने तो सुशोभित दिसत आहे. ज्याच्या अंगाला लावलेली चंदनाची उटी पाहून मनाला मोठे समाधान होते. ज्याच्या गळ्यांत वैजयंती माळा घातलेली असून छातीवर रत्नमणी शोभत आहे. कानात रत्नजडित कुंडले झळकत असून ज्याचे श्रीमुख सुंदर दिसत आहे.ते मुख पोवळ्याप्रमाणे सुंदर शोभत आहे. माणिकाच्या कांतीप्रमाणे ज्याचे दांत चकचकीत आहे.ज्याचे नाक मनोहर सर्व सौदर्यांनी भरलेले असे दिसत आहे. ज्याचे डोळे सुंदर व विशाल आहेत. ज्याच्या कानांत कुंडले झळकत असून यांच्या कपाळालां मृगनाभिच्या कस्तुरीचा टिळा शोभत आहे. असा तो पंढरीराय मदनाचा पुतळा दिसत आहे.ज्याच्या मस्तकावर झळझळित रत्नमुकुट आहे व तो आपल्या आवडत्या पुंडलिकाला कृपादृष्टीने पाहात आहे. मी माझ्या श्री गुरु निवृतीरायांना अन्यन्य शरण गेल्याने माझे विठ्ठल स्वरुप पाहण्याचे मनोरथ पुर्ण झाले असे माऊली सांगतात.


तळवे तळवटीं असे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.