जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२

जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२


जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी ।
भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे ।
सदैव सभाग्य तोचि हरीरंगी नाचे ॥ध्रु०॥
आपण न करीं यात्रा दुजियासी जावो नेदि ।
विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुध्दी ॥२॥
ऐसें जन्मोनि नर भोगिती अघोर ।
न करिति तीर्थयात्रा तया नरकीं बिढारे ॥३॥
पुंडलकें भक्तेरे तारिले विश्वजना ।
वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरा पाटणा ॥४॥
कायावाचामनें जिवें सर्वस्वें उदार ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥५॥

अर्थ:-
मनुष्य जन्माला येऊन भगवत्प्राप्तीची मुख्य जोडी जोडावयाची ती दूर हुदांडून देऊन संसाराची जोड जोडण्याची भिकेची आवड ज्याला आहे त्यास पंढरी आवडत नाही. करंटे कपाळ त्याचे की ज्याचे मुखावाटे नाम येत नाही. जे हरिच्या कीर्तनांत देहभाव विसरुन नाचतात. तेच खरे नित्य भाग्यवान म्हणून समजावे. तीर्थयात्रादि धर्मकृत्ये आपण तर करीत नाहीच पण दुसऱ्यालाही करु देत नाही असले विषयलंपट दुष्टबुद्धीचे पुरुष दुसऱ्याची दुष्टबुद्धी करून त्यास विपरित विद्येची शिकवण देतात.असे व्यवहार करणारे नर मनुष्य देहाला येऊन अघोर नरक भोगतात. त्यांना नरकवास मिळण्याचे कारण ते तीर्थ यात्रादि करीत नाहित. अशा जीवाची दया येऊन भक्तराज जो पुंडलीक त्याने वैकुंठाची मूर्ति पंढरपूर नगरांत आणून विश्वातील जनांचा उद्धार केला. काया वाचा मन ल जीव यावर सर्व प्रकारे उदार म्हणजे वमाझे पिता व रखमादेवीचे पती श्रीविठ्ठल ज्यांच्या करता सर्वस्व अर्पण करणारा असा जो तोच खरा विठ्ठलाचा वारकरी होय.


जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.