पुरुषेविण नारी संचरली शरीरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०९

पुरुषेविण नारी संचरली शरीरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०९


पुरुषेविण नारी संचरली शरीरी ।
आपण्यावरी आळु आला ॥१॥
काय कोण्यासांगे सिणली अनुरागें ।
पडियेले पतिसंगें अवस्थाभूत ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु जैसा तैसा ।
व्यापूनि आकाशा उरला असे ॥३॥

अर्थ:-

साक्षात् श्रीकृष्ण यांच्या संचारावांचून जिच्या शरीरांत कामाने संचार केला अशी विव्हळ झालेली स्त्री मनांत म्हणत आहे. आपल्यावर हा व्यभिचाराचा आळ आला. कोणावर प्रेम ठेवून त्याच्या संगतीने ही इतकी क्षीण पावत आहे.ती त्या पतिच्या संगामुळे अशी विव्हळ होऊन पडली आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसे आहेत तसाच आहे आणि आकाशाला व्यापून उरला आहे.

दुसरा अर्थ- कूटस्थाचे ठिकाणी पुरूषभाव नसताना बुद्धिरूपी स्त्रीने त्याचे शरीरांत प्रवेश केला. म्हणजे कूटस्थाकार झाली. त्यामुळे तिच्या ठिकाणी व्यभिचाराचा आळ आला. काय सांगावे कोणत्या प्रेमा विषयी क्षीण पावत आहे. म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीला सोडत आहे. ती कूटस्थरूप पतिच्या संगतीत पडल्यामुळे अशी अवस्थारूप झाली म्हणजे कूटस्थरूप झाली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसा आहेत तसाच ते आकाशाला व्यापून राहिले आहेत. असे माऊली सांगतात.


पुरुषेविण नारी संचरली शरीरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.