त्रिपुटीं भेदूनी मनाच्या मौळी ।
तें आलें भूमंडळीं पंढरिये ॥१॥
नाम लाधलें नाम लाधलें
पुंडलिकें केलें खेवणें देखा ॥२॥
समर्था पाथीं भोजन जालें ।
पंचामृत घेतलें धणीवरी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेसी तृप्ती ।
यथार्थ भावितां कळों येईल चित्तीं ॥४॥
अर्थ:-
ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय इत्यादी त्रिपुटीचा भेद करून जो परमात्मा भक्तांकरिता मनाचा मवाळ होऊन भूमंडळी पंढरीत अवतीर्ण झाला. त्याचे नांव आम्हाला प्राप्त झाले, पण हे सगळे नामालंकार देण्यात उपकार त्या पुंडलिकाचे आहेत. त्यामुळे आज समर्थाच्या पंक्तीला भोजन होउन तृप्ती होईपर्यंत पंचामृताचे पान केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याबरोबर आज आम्हाला तृप्ती झाली आहे. हे यथार्थ भाविकपणाने पाहीले तर चित्तात कळून येईल.असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.