मूळ ना डाळ शाखा ना पल्लव ।
तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥
निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा ।
जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
नकळे याची गती नकळे याची लीळा ।
आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी ।
आपण चराचरीं नांदतसे ॥३॥
अर्थ:-
ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरुप देव आमच्या घरी आहे. तो निर्गुणपणात उभा राहुन सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे. त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहळे भोगतो आहे. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.