नेणो विठो मार्ग चुकला ।
उघडा पंढरपुरा आला ।
भक्तें पुडलिकें देखिला ।
उभा केला विटेवरी ॥१॥
तो हा विठोबा निधान ।
ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान ।
पाउलें समान ।
विटेवरी शोभती ॥२॥
रुप पाहतां तरी डोळसु ।
सुंदर पाहतां गोपवेषु ।
महिमा वर्णितां महेशु ।
जेणें मस्तकीं वंदिला ॥३॥
भक्तिसुखें लांचावला ।
जाऊं नेदी उभा केला ।
निवृत्तिदास म्हणे विठ्ठला ।
जन्मोजन्मीं न विसंबे ॥४॥
अर्थ:-
माऊली म्हणतात आज चुकून ते परब्रह्म प्रत्यक्ष पंढरपूरास आले असे वाटते. ते परब्रह्माचे रूप पाहून त्याला पुंडलिकरायांनी विटेवर उभे राहाण्यास सांगितले.तो हा विठोबा सर्वसुखाचा ठेवा असून ज्याचे ध्यान ब्रह्मदेवादिक करत असतात. अशी ती समान पाऊले विटेवर शोभत आहे.त्याचे रूप जाणते डोळस पुरूष पाहतात. त्याचे रूप गोपवेष धारण केलेले आहे. ज्याचे माहात्म्य एवढे आहे की, भगवान शंकर ज्याला वंदन करतो. तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तिला लाचावल्यामुळे पंढरपुरास आला. पुंडलिकरायांनीही त्याला दुसरीकडे कोठे न जाऊ देता विटेवर उभा केला. हे श्रीविठ्ठला तुला मी जन्मोजन्मी विसरणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.