जयातें पाहतां परतला आगमु ।
निर्गमा नाकळे दुर्गमु ।
सिध्दांसाधक निरुतें वर्मु ।
न पडे ठायीं सर्वथा ॥१॥
तें या पुंडलिका वोळलें ।
प्रेम प्रीतीनें घोळलें ।
भक्तिमातेनें चाळविलें ।
आधीन केले आपणया ॥ध्रु०॥
जे माये अविद्ये वेगळें ।
गुणत्रया नातळे ।
काळें गोरें न सांवळें ।
निर्धारितां नेणवे ॥२॥
जें द्वैताहूनि परतें ।
तें सुखातें वाढवितें ।
योगी लक्षीं लक्षित ज्यातें ।
परि नेणवे सर्वथा ॥३॥
जें अरुपा रुपा वेगळे ।
सहस्त्रनामांहूंनि आगळें ।
परम कृपेचें कोंवळे ।
क्रियाकर्मविरहित ॥४॥
जें ब्रह्मरसाचें गोठलें ।
तें पंढरिये प्रगटलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
नामें आथिलें चोखडें रया ॥५॥
अर्थ:-
ज्या श्रीविठ्ठलाचा विचार करू गेले असता, तो श्रीविठ्ठल वेदशास्त्रालाही कळणे कठीण आहे. म्हणून ‘नेति नेति’ असे म्हणून वेद परत फिरला. सिद्ध साधकांनाही त्याचे वर्म सापडले नाही.असा तो परमात्मा पुंडलिकरायांच्या भक्तिभावाने सहज प्राप्त झाला. त्या भक्ति मातेने त्याला स्वकीय स्वरूपापासून चाळवून आपले स्वाधीन करून घेतले. ज्या परमात्मतत्त्वाचा विचार करू गेले असता त्याचे स्वरूप माया व अविद्या याहून वेगळे असून गुणत्रयांत सापडत नाही त्याच्यात काळे गोरे किंवा सावळे या वर्णाचा निर्धार करता येत नाही. तो द्वैत व अद्वैत याहूनही पलीकडे आहे. तरीपण त्याचे नाव घेतले असता मनाला सुख वाटते. योगी लोक ज्याचे ध्यान करतात पण त्यांनाही त्याचे स्वरूप कळत नाही. तो रुपवान नाही रुपरहितही नाही असा तो सहस्त्रनामा हुन वेगळा आहे तो श्री विठ्ठल कृपावंत क्रियाकर्माहुन वेगळा आहे. असे ते ब्रम्हरसाचे गोठलेले ते रूप श्रीक्षेत्र पंढरी येथे श्री विठ्ठल नावाने सुंदर, सर्वगुणसंपन्न, शुद्धस्वरूप प्रगट झाले आहे. असे ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.