वाजतसे बोंब कोण्ही नायकती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३

वाजतसे बोंब कोण्ही नायकती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३


वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं ।
हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें ।
पंढरिवांचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ध्रु०॥
तापत्रयाग्नीचा लागला वोणवा ।
कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥२॥
देखोनि ऐकोनि एक बहिर अंध जाले ।
विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥३॥
आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला ।
देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला ॥४॥
व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं ।
हरिभजन न करितां सगळें घालूं पाहे पोटीं ॥५॥
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा ।
पाठीं लागलासे काळ दांत खातो करकरां ॥६॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण ।
भावे न निघतां न चुके जन्ममरण ॥७॥

अर्थ:-
जीवाचे कल्याण व्हावे म्हणून वेदशास्त्रे व पुराणे जीवांना हरिनाम उच्चार करण्या विषयी बोंब ठोकून सांगत आहे. पण कोणीच कानानी ऐकत नाही. म्हणजे वेदशास्त्राच्या म्हणण्या कडे लक्ष देत नाहीत पण त्यांच्या म्हणण्या प्रमाणे जे वाचेने हरीनामाचा उच्चार करीत नाही. त्याची अतिशय हानी निश्चित झाली आहे. महाराज मोठ्या कळकळीने सांगतात अरे उठा उठा! लवकर जागे व्हा ! तुमच्य पाठीमागे मृत्युचे मोठे भय लागले आहे त्या भयातन सुटण्याला पंढरपूरावाचून दुसरे ठिकाण नाही. अध्यात्मिक, आधिभैतिक आधिदैविक अश तीन प्रकारच्या तापरुपी अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चहूकडून लागला आता तूही कुणाच्या आड जाणार आणि कोणाचा सावाधावा करणार म्हणजे कळकळीने धाऊन येऊन तुम्हाला साह्य कोण करील. विषयाच्या लंपटपणामुळे शास्त्र पाहून व ऐकूनही जे आंधळे व बहिरे झाले. त्यांना काळाने बांधून यमपूरीस नेले. पहा तुझ्या देखत आजा मेला, पणजा मेला, बापालाहि मसनात नेले. पाहता पाहता नातु पंणतु मेले हे पाहून वेडा झालास. अरे हा भोवतालचा गोतावळा व्याघ्रलासी भुत पाठी लागले तसा आहे. हा काळ, तु हरिभजन केले नाहीस तर सगळ्यांनाच आपल्या पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही. याकरता तुम्ही संत संगती धरा,आणि संताच्या संगतीने हरिभजन करा हा पहा दांत करकरा चाऊन काळ तुमच्या पाठीस लागला आहे. माझे पिता व रखुमादेवीवर जे श्री विठ्ठल त्यांना अनन्यभावाने शरण न गेलात तर तुमचे जन्ममरण चुकणार नाही. असे माऊली सांगतात.


वाजतसे बोंब कोण्ही नायकती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.