सुखीं सुख मुरे तेथें कोण झूरे ।
जळी लवण विरें तैंसे जालें ॥१॥
ज्ञान ते विज्ञान प्रंपचेंसि भान ।
तेजोरुप गगन बिंबलें दिसे ॥२॥
आत्मा आत्मरुप परमात्मा समीप ।
कोटि कोटिरुप एकलेंचि दिसें ॥३॥
नाना तेजी भासे प्रपंचप्रकाशे ।
विरुळा समरमें ध्याये त्यासी ॥४॥
ऐसे जालें तुज प्रगटलें निज ।
कासवीचें बीज अंकुरलें ॥५॥
निवृत्ति निजबोध आनंदादि कंद ।
शाखाद्वमभेद हरि जाला ॥६॥
अर्थ:-
वैषयीकसुख परमात्मसुखामध्ये मुरले असता, पाण्यात जसे मीठ विरून जाते. त्याप्रमाणे विषयसुखही बह्मरूपच होते. आत्मस्वरूप ज्ञान अंतःकरणांत प्रतिबिंबित झाले असता त्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असे म्हणतात. आणि विशेष ज्ञानाने जसे प्रपंचाचे भान होते. अत्यंत समीप असणारा जो जीवात्मा तो कोट्यवधी रूपाने एकटाच बनलेला परमात्मा आहे.असे दिसते.अरे ज्ञानदेवा, प्रपंच्यांत अनेक रूपाने भासणारा हा परमात्मा एकरूपच आहे असे समजून त्याचे ध्यान करणारा अत्यंत विरळा. पण काय सांगावे तुझ्या परमभाग्याने आज तुला कासवी जसी आपल्या मुलाकडे कृपादृष्टीने पाहून आपले पोर वाढविते. त्याप्रमाणे मी जो तुला आनंदाचा आत्मबोध आणि आनंदाचा कंद दिला. त्यायोगाने तुझ्या ठिकाणी त्या आनंदरूप वृक्षाला शाखा फुटून हरिरूप झाला आहेस. असे माऊलींना निवृत्तीनाथ सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.