माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे ।
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण ।
रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
अर्थ:-
माऊली म्हणतात, माझ्या मनात पंढरपूरास हातात पताका घेऊन वारीला जावे अशी फार आवड आहे. त्याचे कारण माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. ज्याच्या ध्यासामुळे मी जागृतित आहे किंवा स्वप्नात की झोपेत आहे याची आठवण मला राहिली नाही. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यावर आनंद हृदयांत साठवतो. असा ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल समचरण ठेऊन उभे आहेत. व आपल्या समचरण ठेवण्यामध्ये सगुण व निर्गुण ही दोन्ही ही रुपे एकआहेत. अशी तो आपली खूण दाखवित आहे.असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.