सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें ।
तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥
कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें ।
मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥
संकोचला संसार । पारुषला व्यवहार ।
ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥२॥
मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं ।
तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥३॥
यापरतें बोलणें । न बोलणें होणें ।
तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥४॥
ऐसियाते वोटी । लागलें तयाचे पाठी ।
रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥५॥
अर्थ:-
नितांत सुंदर अश्या त्याचे तेज परब्रह्म स्वरुपानी पसरले आहे.ते व्योम म्हणजे आकाशा येवढे आकाशभर व्यापले आहे. कमळा सारखे नेत्र व फुला सारखा सुगंध त्याला आहे. त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रीत अविष्कार आहे.त्याच्या ठायी संसार संकोचतो, व्यवहार दुर जातो व त्याच्या जवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो. मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करु शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते. या बाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो ब्रह्मस्वरुपपणे मीच आहे. हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्या जणु काही पाठी लागले आहे. तो रखुमाईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.