जगत्र धांवताहे सैरा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५७७
जगत्र धांवताहे सैरा
म्हणौनि धांवसी ।
थोर कष्टलासी वायाविण ॥
धांवोनि जावोनि काय करिसी ।
सहज अहिर्निशी भेटी नाहीं ॥१॥
जीव जाणवेना जीव जाणवेना ।
जिवाचें वर्म तें चोजवेना ॥२॥
जिवाशिवा दोन्हि भिन्न भेदु नाहीं ।
विचारुनि पाहि ह्रदयामाजी ॥
जिउ सर्वाठायीं असे
योगिया न दिसे ।
कुडी सांडूनि वसे
कवणे ठायीं ॥३॥
जिउ जैसाचि आला तैसाचि गेला ।
तो कोठें सामावला जाणतेनो ॥
ज्ञानदेवो म्हणे जिउ कोठें गेला ।
जिवा जन्म जाला कवणे ठाई ॥४॥
अर्थ:-
जगातील अविवेकी पुरुष देवप्राप्तीचे खरे साधन काय आहे कळल्यामुळे तीर्थयात्रा वगैरे साधने करण्याकडे सैरावैरा धावत असतात लोकांच्या मागे लागून फुकट भटकून तू फार कष्टी झाला आहेस आशी धावाधाव करुन काय उपयोग? ज्या परमात्म्याच्या प्राप्ती करता ते धावत आहेत तो परमात्मा रात्रंदिवस तुझ्या जवळ आहे. पण त्याची भेट मात्र तुला होत नाही. सर्व जीवांचा जीव जो परमात्मा आहे. तो तुला कळत नाही. जीव व परमात्म्यात भेद नाही. याचे ज्ञान तू आपल्या हृदयामध्ये करुन घे. खरे पाहिले तर परमात्मा जसा व्यापक आहे तसा जीवही व्यापक आहे. हे ज्ञान योगी लोकांना असते सामान्य लोकांना नसते. जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे. असे म्हणशील तर शरीर त्यागानंतर जीव कोठे राहतो ते सांग पाहू ?. साभास बुद्धी. शरीरात जशी आली तशी ती प्रारब्ध संपल्यावर कोठे गेली व जाऊन कोठे सामावली. हे तुम्ही शहाणे म्हणवता तर सांगा पाहु. तसेच जन्माला कोठून आला व तो कोठे गेला याचे उत्तर द्या. तुम्हाला जर ते माहित नसेल तर संतांना शरण जाऊन विचारा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
जगत्र धांवताहे सैरा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५७७
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.