पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५४३

पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५४३


पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें ।
तें कैसें आकळे म्हणतोसि ॥१॥
आहे तें पाहीं नाहीं तें होई ।
ठायींच्या ठायीं तुंची होसी ॥२॥
स्वरुपीं समता ह्रदयस्था आप ।
तयाचें स्वरुप आदि मध्यें ॥३॥
बापरखुमादेविवरु सगुणी समाये ।
निर्गुण दिसताहे जनीं रया ॥४॥

अर्थ:-

दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीहून ब्रह्म निराळे आहे. ते या त्रिपुटीस कसे आकलन होईल. त्या परमात्म्याला तु पहा. त्याच्या ठिकाणी काही नाही. त्या गगनाच्या पायी म्हणजे परमात्म स्वरूपी तद्रुप होशील. परमात्म्याच्या ठिकाणी तू एकरूप झालास म्हणजे जगाच्या उत्पत्ति स्थिती व लय यांना तूच अधिष्ठान होशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुणच नसून जनावनामध्ये निर्गुणरूपानेही मला तोच दिसत आहे. असे माऊली सांगतात.


पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५४३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.