विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु ।
पूर्णे पूर्ण भरिला घटु हळुहळु बिंदु उदारु ।
वरुषला लिंगावरि तेणें तुष्टला श्रीगुरु ।
प्रसन्न निवृत्तिराजा ज्ञान देउनि उदारु ॥१॥
यालागिं ज्ञानदेवो नाम गुरुकृपेनें पावलों ।
असतां इये देहीं संसारा हारपलों ।
ज्ञानविज्ञान कळो आलें अद्वैतरुप बुझालों ।
विठ्ठल नाम माझे वाचे तेणें वागपुष्प पावलों ॥२॥
नित्य गळति नामें जालीं गेला प्रपंच अनिवार ।
उपरती देहीं जाली निमाली वासना संसार ।
तपन जालें ब्रह्ममूर्ति दिननिशीं साचार ।
आठवितां मागिल भावो अवघा पारुषला उदारु ॥३॥
विज्ञानेंसि ज्ञान गेलें एकरुप परिचार ।
ज्योतिमाजि कळिका गेली एकदीप जाला आकार ।
वृत्ति ते निवृत्ति जाली माया मारुनि केलें घर ।
निवृत्ति गुरु माझा घट स्थापिला त्या समोर ॥४॥
ज्ञानदेवें घटमठ निरोपिली हरिभक्ति ।
उडाली पक्षपाती इंद्रिया तेथें नाहीं गती ।
विराले अभिमान ममता जाली समाप्ती ।
खुंटलिया उर्मी दाहि स्त्रपन जालें लिंगाप्रती ॥५॥
अर्थ:-
शंकराच्या पिंडीवर सतत पाण्याची धार रहावी म्हणून एका कळसीला लहानसे भोक पाडून त्यांत पाणी भरून ते शंकराच्या पिंडीवर अडकवून ठेवतात. त्यास गळती असे म्हणतात.माऊली या अभंगामध्ये गळतीच्या रूपकाने वर्णन करीत आहेत. शरीरभावरहित जो आत्मा तेच कोणी एक शंकराचे लिंग अशी कल्पना करून त्या लिंगावर परमात्मरूप जो श्रीगुरू त्याची कृपा हेच कोणी एक उदक घटांत परिपूर्ण भरून हळुहळु या आत्मलिंगा वर गळती सुरू केली. त्याने भगवान श्रीगुरू संतुष्ट झाले व श्रीगुरूनिवृत्तीराय प्रसन्न झाले. ते ज्ञान देण्यांत उदार आहेत. श्रीगुरूंनी कृपा करून मला पूर्ण ज्ञान दिले म्हणूनच मला ज्ञानदेव हे नांव प्राप्त झाले आहे. शास्त्रीय ज्ञान आणि अपरोक्षानुभवरूपी विज्ञान प्राप्त झाले म्हणून अद्वैतरूप जो परमात्मा त्याचे स्वरूप माझे अनुभवास आले आणि म्हणूनच संसार नष्ट झाला. आता फक्त जीवन्मुक्तिच्या सुखार्थ श्रीविठ्ठल नामांची पुष्पे वाणीस प्राप्त झाली. त्या नामाच्या गळतीने नष्ट करण्यास फार कठीण असा जो जन्ममरणरूपी संसार तो नाहीसा होऊन गेला. उपरती होऊन वासनात्मक. संसारही नष्ट झाला. आणि रात्रंदिवस ब्रह्मरूपी श्रीगुरूचा प्रकाश लाभला असता पूर्वीचा महान संसारभाव आठवू गेले तरी तो दूर झाला पुढे येतच नाही. विज्ञान है अविद्याकार्यच आहे. ते ज्ञानासह वर्तमान नष्ट होऊन एक परमात्मरूपच शिल्लक राहिले. परमात्मज्योतीमध्ये उपाधिच्या योगांने आत्म्याला लहान कलीकेचे रूप आले होते ती दोन्ही एक झाली. परमात्मा व आत्मा ही दोन्ही एकच दीप झाला. मायेचा नाश झाल्यामुळे वृत्तीची निवृत्ती झाली. माझा श्रीगुरू जो निवृत्ती त्याचे समोर अशा प्रकारचा घट स्थापन केला. ज्ञानदेवांनी घटमठ ही दोन्ही हरिभक्तिस अर्पण केली. यामुळे अनंतपक्ष नाहीसे होऊन त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियाची गती, अभिमान किंवा देहादिकांच्या ठिकाणी ममता आणि दहा इंद्रियद्वारा उत्पन्न होणाऱ्या उर्मी या सर्व नाहीशा होऊन गेल्या ह्यामुळे परमात्मरूपी जे आत्मलिंग ह्याला स्नपन म्हणजे शुद्धता प्राप्त झाली.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.