तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं ।
वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥
गोविंदु वो पैल गोपाळु माये ।
सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥
आडत्रिपुंड्र शोभत दूमिळ भारेंसि जे जात ।
नागर केशरिचीं पुष्पें कैसा खोप मिरवत ॥२॥
हिरिया ऐशा दंतपंक्ति अधर पोंवळ वेली ।
श्रवणीं कुंडलें ब्रह्म रसाचीं वोतलीं ॥३॥
विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियलें ।
योगी ध्याती ध्यानीं ब्रह्म तेंचि गोकुळासि आलें ॥४॥
आजि धन्य धन्य जालें राया कृष्णासि देखिलें ।
निवृत्तिमुनिरायप्रसादें ध्यान तें ह्रदयासि आलें ॥५॥
अर्थ:-
डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणु व वक्षःस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे. तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर तिनरेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्णरुप उभे आहे. त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत.जे विश्वाचे जीवन आहे ते रुप मी साररुपाने पाहिले ज्या रुपाला योगी ध्यातात तेच रुप गोकुळात अवतरले आहे. आज मी धन्य झालो निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ते रुप पहिले माझ्या ध्यान्यात व नंतर हृदयत स्थापित झाले असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.