भेटि जाली धुरेसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४४

भेटि जाली धुरेसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४४


भेटि जाली धुरेसी ।
पालटु जाला या जीवासी ।
लोहो लागलें परिसेसीं ।
तें सुवर्ण जालें । ऐसा गुणागुणाचा दाता ।
तो विश्व व्यापिलेरे अनंता ।
काय पाहतोसि आतां ।
विमानीं वाट पाहातुसें ॥१॥
तरि मी गुंतलों दातारा ।
येऊनियां संसारा ॥ध्रु०॥
नट घेऊनियां अंगवणीं ।
वरुं नेणे संपादणी ।
एकत्र जालें लवण पाणी ।
तें मिळोनी गेलें ।
ऐसा बहुतां गुणांचा दाता ।
तो विश्व व्यापिलें रे अनंता ।
काय बा पाहातोसि आतां
आपुल्या सारिखें करी बापा ॥२॥
चंद्र वेंचितासि खडे ।
परिस म्हणोनि ठेविसी ।
आतां असो हा गाडोरा ।
शरण रिघे रखुमादेविवरा ।
अरे अरे विठोजी दातारा ।
नवजे घरा आणिकांच्या ॥३॥

अर्थ:-

ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला असता त्याचे सोने होते त्याप्रमाणे परमात्मस्वरुपाची भेट झाली असता जीवाच्या स्वरुपांचा परमात्म स्वरुपांत पालट होतो. म्हणजे जीव परमात्मरुप होतो. गुणागुणाचा दाता जो परमात्मा तो तू सर्व व्यापून राहिला आहेस आणि मी तर या संसारात येऊन गुंतून पडलो आहे. मला यातून बाहेर काढण्यास उशीर का करतोस? विमानातून येऊन तू मला काढशील अशी मी तुझी सारखी वाट पाहात आहे. एखाद्याने नटाचा वेष घ्यावा. परंतु त्याला सोंगाची संपादणी करता येऊ नये अशी माझी स्थिती झाली आहे. तथापि तुं जीवावर अनंत उपकार करणारा आणि विश्वव्यापक असल्यामुळे, पाणी मीठ जसे एक होऊन जातात. त्याप्रमाणे तू मला एकरूप करण्यांत कशाची वाट पाहात आहेस. आपल्या सारखे मला लवकर करुन टाक.चकोराला चंद्र काय आवडत नाही. पण चंद्रोदय होई पावेतो तो काय करणार? केव्हां तरी चंद्रोदय होऊन त्याला आनंद होणारच. त्याप्रमाणे भक्तांना तुझी प्राप्ती होणारच पण भेटी देण्याला वेळ लावून त्या भक्तांना तुझ्या भेटीचे वेड विनाकारण लावित आहेस म्हणजे परीस म्हणून त्यांच्यापुढे खडे ठेवीत आहेस. तेंव्हा या सर्व भानगडी बाजूला राहू द्या. रखुमादेवीपती,तुला आम्ही शरण आलो आहोत. हे दातारा, आम्हां भक्तांवर दया कर आणि आमची चित्तवृत्ति दुसरीकडे जाऊ देऊ नकोस अशी तुला आमची प्रार्थना आहे. असे माऊली सांगतात.


भेटि जाली धुरेसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३४४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.