सुनीळ गगना पालटु ।
तैसा दिसे अंगीं नटु ।
कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥
यमुनेच्या पाबळीं ।
तनु घेउनि सांवळि ।
पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥
पांवयाचेनि नादें ।
कृष्णाचेनि वेधें अमृतघनु वोळला ।
आकाश वोळुनि वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आलारे ॥२॥
कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेविती अनिवाररे आयो ॥३॥
चंदनादिटिळकुलल्लाटीं जया साजे मोर विसावेटी रेआयो ।
सुरतरु कुसुमें कबरीं भारुरे कुंडलें झळकति कपोळीं रे आयो ॥४॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ।
त्रिभुवनजनमोहन रे आयो ॥५॥
अर्थ:-
जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचा ही बदलत असतो. तोच कृष्ण पावा वाजवत यमुनेच्या तटावर उभा आहे. त्या पाव्याच्या सुरु मुळे तो अमृतघन अनावर होऊन आकाशातुन वर्षाव करत आहे त्यामुळे ब्रह्मरसाचा पुर आला आहे. त्या सुंदर मुखकमळावर भक्त लुब्ध असुन ते भ्रमर बनुन त्याचा स्वाद चाखत आहेत. त्यांने सुगंधी चंदन टिळा रेखला असुन केसा मध्ये मयुरपुच्छ खोवले आहे. सुंदर सुरतरुंची फुले घातली असुन त्याच्या कानातील कुंडल झळाऴत आहेत. रखुमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्यांने जगावर मोहनास्त्र चालवले आहे. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.