निजाचें तेज कीं तेजाचें निज- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८७
निजाचें तेज कीं तेजाचें निज ।
तेथील तें गुज सांग मज ॥१॥
ब्रह्म तें कायी ब्रह्म तें कायी ।
ब्रह्म तें कायी सांगा गोसावी ॥२॥
ब्रह्म सदोदित असे सर्वंभूतीं ॥
म्हणौनि सांगे जनाप्रती ॥३॥
ब्रह्म ऐसें नामयानें जाणितलें ।
ह्रदयीं धरिलें प्राणलिंग ॥४॥
बापरखुमादेविवरु ह्रदयीं प्रगटला ।
निवांत राहिला ज्ञानदेवो ॥५॥
अर्थ:-
आत्म्याचे ज्ञान किंवा ज्ञानाचा आत्मा यांत काय गुह्य आहे ते मला सांगा. तसेच हे गुरूनाथा ब्रह्म म्हणजे काय हेही मला सांगाना. ब्रह्म सदोदित, सर्व भूतमात्रामध्ये आहे. असे जे आपण लोकांना सांगत असता. ब्रह्म म्हणून काय पदार्थ आहे. तो नामदेवाने जाणून ते आपले जीव की प्राण आहे असे समजून हृदयांत धरले. किंवा ब्रह्म म्हणून जे काही म्हणतात. ते भगवंताचेच नाम हेच ब्रह्म असे आपण समजून हृदयांत जीव की प्राण असा धरला. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल तो माझ्या हृदयांत प्रगट झाल्यामुळे मी निवांत राहिलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
निजाचें तेज कीं तेजाचें निज- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८७
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.