एकांति बाळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६

एकांति बाळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६


एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा ।
पाहे चरणकमळा । सुंदराचे ॥
तेथें अरुण उदेला । कीं सुमन प्रगटला ।
कमळणी जाला । अंतरीं विकासु ॥
तें चरण कमळकेवळ । भक्त आळिउळ ।
सेविती सकळ । योगिजन । तेणें तृप्त जालें ।
कीं ह्रदय वोसंडले । म्हणोनि वाहावलें ।
ज्ञानडोहीं । तेचि ते परमानंद गे माय ॥१॥
न संगवे माय । परा पारुषली ।
दोंदिल दृष्टी जाली देखणेंपणें ॥
मनाचा अंकुर उगीच मुराला ।
तो कृष्णचि होऊन ठेला । अनुभविया ॥ध्रु०॥
तये पदांघ्रीचे रज । तेणें तृप्ति वो सहज ।
वरि त्रिवेणी ऊर्ध्व व्रज । मज पाहतां ॥
ते तंव रेखा । वरि सखोल देखा ।
त्यावरी वोळले पीयूषपाणी ॥
तयेचेनि मागें । उध्दरणें जगें ।
म्हणोनि संतसंगें । तया सोई ॥
ते दोहीं भागीं । विस्तारलें जगीं ।
म्हणोनि तया भागीं । चरणांगुष्ठ ॥
दृष्टीचा डोळा । न निवडेच बाळा ।
तेथें जाला एकवेळा । मुनिजनां गे माये ॥२॥
तेथें बिंबलीं नखें । कीं विवळणी विशेखें ।
काळेपणाचेनि द्वेषें । वाहावलीं पुढां ॥
उगमींच संचले । कीं वियोगें वाहावले ।
पुनरपि जडले । कृष्णपदीं ॥
गंगा अंगुष्ठधार । कीं वांकिचा बडिवार ।
तेथें सप्तही स्वर । उमटताती ॥
स्वरुपीं रमली । म्हणोनि अधोमुख जाली ।
शोभती घाघुरली । पायीं प्रभावळी गे माये ॥३॥
तंव ते निजानंद भरितें । नेणती आणिकांतें ।
विसरली आपणातें । हास्यवदनें ॥
म्हणती नेति नेति गर्जना । कीं माणिका खेवणा ।
घोट्या अनुमाना । बाळसूर्यो ।
पोटरिया निवाळा । कीं उभलिया सरळा ।
जानुद्वय सोज्वळा । उच्चस्तंभ ॥
उंच युगुळ कटीं । माज सामावे मुष्टीं ।
सोहं समदृष्टी । दोहीं भांगीं गे माये ॥४॥
वरि वेढिला पिंवळा । कीं मिरवे सोनसळा ।
कीं कल्पतरु फ़ुलेला । नाभिस्थानीं ॥
तेथें वेधु गोपिबाळा । कीं अंतरीं सांवळा ।
पालवी मेखळा । अभिळाखिया ॥
तेथें मदनु गूढपणें । रतिशये रमणे ।
दुजे अनुभउ अनुभवणें । न निवडे केंही ॥
सखोल नभमंडळ । तै ब्रह्मस्थान केवळ ।
कैसे पाहाले विवळ । तेथें जगामागी गे माये ॥५॥
रोमराजवेळा । कीं वेणी एकवळा ।
दावि निराळा । उदरामध्यें ॥ ह्रदय निर्मळ ।
तेथें ध्येय ध्यान केवळ । वरि चरणकमळ ।
द्विजोत्तम ॥ वैजयंति माळा । शोभतसे गळां ।
उभलेनि वक्षस्थळा । उभारली ॥
सरळ बाहुदंड । न कळे कानवड ।
अंगोळिया धडफ़ुड । खुणा दावितो गे माये ॥६॥
ऐसा खुणा दावितसे एका । तंव दावी अनेका ।
अंगोळिया देखा । दशावतावरी ॥
नखाची मंडणी । तेथें तेज तारांगणी ।
होत असे प्रवणी ॥ त्रिमिर द्वैत ॥
शुक्लपक्ष । कीं अंतरीं लक्ष ।
सारुनियां साक्ष । दृशदिसर्वी ॥
एकाएकीं संचरे कीं माजिघरीं दुसरे ।
स्वयें एकसरे । नवल चोज गे माये ॥७॥
तेथ सानुसान स्वर । दोहिलें अंबर ।
हास्यवदन सुंदर । पावया छंदें ॥
निमासुरा नेटका । न कळे ब्रह्मादिका ।
वेधुनि गोपिका । मोहियलें जग ॥
समदृष्टी नासापुटीं । नेत्रद्वय निघाले भेटी ।
रविशशि कोटी । लोपले तेथें ॥
मना मारुनि मेळा । कीं कुंडलें शोभे किळा ।
तेथें जाला एकवळा । योगिजना गे माये ॥८॥
व्योमींचा मणीं । तया तळीं सहस्त्रफ़णी ।
तो लाधला निर्वाणी । आराधितां ॥
शेष वर्णिता श्रमला । ह्मणोनि शरण आला ।
शयन होऊनि ठेला । तया तळीं ॥
ऐसी सुमन सेजा । कीं मवाळपण बरविया वोजा ।
तेथें रातली रमा भाजा । न निवडे केंही ॥
ऐसा झाला एकवळा । शेष म्हणे दैव आलें फ़ळा ।
आतां पाहेल सुनीळा । कायें सेज माजी ॥९॥
ऐसयाचें ध्यान । जरि हें न करी मन ।
तरीच पतन । जन्ममरण ॥
चिंता साठीं फ़ेडी । कीं उभारुनियां गुढी ।
स्वयें सुखाचिया आवडी । कां सांडितासी ॥
आतां करुं पाहे ध्यान । तरि सहजेंचि उन्मन ।
म्हणोनि समाधान । होय जीवा ॥
तीर्थ व्रत तप दान । जरी न करी हें मन ।
तरि सहजचि साधन । गोपिनाथु ॥१०॥
तीर्था जातां सायासी । तूं काय एक देसि ।
म्हणोनि स्तविलासी । बहुतांपरी ॥
तंव परापश्यंती मध्यमावैखरी । या युक्तिनो बोलवेसी ॥
निवृत्ति म्हणे लीळा । विश्वव्यापक निराळा ।
पाहे उघडा डोळां परब्रह्म ॥
ज्ञानदेवा मीपणीं । निवृत्ति ऐक्य चरणीं ।
सरो दुजेपणीं । हांव जीवा ॥११॥

अर्थ:-
जीनरुपीबाळा एकांतात सोहंसुखशयनात असताना त्या सुंदर परमात्म्याचे चरणकमळ पाहयचे असतात.तेथे सुर्य उगवला की फुल फुलले किंवा कमळदळ विकासले तसा अंतरीचा विकास करायचा. ते चरणकमळ भक्त व योगी सतत सेवीत असतात. त्यातुन मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त होतात त्यांचे हृदय आनंदाने वोसांडते व ज्ञानडोहात ते वाहात जातात तेथे तो परमानंद त्यांना मिळतो. त्याचे वर्णन करताना पराही खुंटली त्याला पाहुन दृष्टीला ही समाधान झाले. मनाचा अंकुर मनातच मुराला व तो अनुभव कृष्ण होऊनच ठाकला.त्याच्या पायधुळीने सहज तृप्ती होते. चरण, पायधुळ,व भक्त ह्या त्रिवेणीमुळे मला उर्ध्व पाहता येत आहे. ती उर्ध्वरेखा जर सखोलपणे पाहिली तर ती अमृतरेखाच वाटते.म्हणुनच त्या योगाने व संतसंगामुळे जग उध्दरते. ते दोन भाग जरी विस्तारले तरी ते चरणागुष्टापाशीच पोहचतात.पण ते दृष्टीला येणे कठिण आहे तरी मुनीजनांच्या योगे तेथे एकत्व येते.त्या चरणांची नखे ही विशेष आहेत पण त्या काळेपणाच्या वाहणीत ती पुढे निघाल्यासारखी वाटतात. उगमालाच एकत्र झाले की वियोगात वाहले पण ते तर कृष्णरुपातच जडले आहे.ही गंगेची धार की त्याला त्या अंगुष्टामुळे मिळालेले अलंकाररुप की सप्त स्वरच तेथे उमटतात. त्या स्वरुपात ती मनोवृती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व ती ही त्या पायात घोळली व पायाची प्रभावळ झाली. तेंव्हा ती निजानंदाने भारली स्वतःलाच हसत हसत विसरली दुसऱ्याचा काय पाड.नेती नेती गर्जना करत त्याला माणिकाच्या कोंदणात ठेवले त्याचे घोटे म्हणजे जणु बाळसुर्यच.त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ हे सरळ व ते जानुद्वय उंचस्तंभासारखे आहेत.उंच आशा कटीवर दोन्ही मुष्टी आवळुन तो सर्वाठायी समदृष्टी दोन्हीागात समच आहे.त्यावर वेढलेला पिवळा पिंतांबर व सोनसळा मिरवत आहे.जणुकाही नाभीपर्यंत फुललेला कल्पवृक्षच आहे.त्याचा वेध लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणुकाही मेखळाच झाल्या आहेत.त्यारुपात गुढपणे तो मदन आला आहे. त्यामुळे त्या गोपीना रतीसुखाची इच्छा होत आहे. तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत. त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे. असे विवळ होऊन जगात पाहणे सुरु आहे. त्याच्या पोटावरील केस वेणी सारखे दिसत आहेत.त्याचे हृदय निर्मळ आहे तेथे ध्येय व ध्यान एकच झाले आहे.व दोन चरणकमळे सर्वोत्तम आहेत. त्याच्या छातीवर ती वैजयंतीमाला उन्नत होऊन रुळत आहे.


एकांति बाळा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

sant dnyaneshwer abhnag 26