तृप्ति भुकेली काय करुं माये ।
जीवनीं जीवन कैसें तान्हेजत आहे ॥१॥
मन धालें परि न धाये ।
पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥
निरंजनीं अंजन लेइजत आहे ।
आपुलें निधान कैसें आपणची पाहे ॥३॥
निवृत्ति गार्हस्थ्य मांडले आहे ।
निष्काम आपत्य प्रसवत जाये ॥४॥
त्रिभुवनीं आनंदु न मायेगे माये ।
आपेआपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुगे माये ।
देहभाव सांडूनि भोगिजत आहे ॥६॥
अर्थ:-
यथार्थ ब्रह्मज्ञानानंतरही पूर्वी असलेली सगुण भक्तिची सवय राहातेच त्याप्रमाणे या अभंगामध्ये ती सखी म्हणते मला प्राप्त झालेली परमानंदाची जी तृप्ति तिलाच सगुण परमात्म्याच्या उपासनेची भूक लागली. याला आता मी काय करणार? तहान लागली म्हणजे मनुष्य पाणी पितो. पण आता पाण्याला तहान लागली असा प्रकार आहे. माझ्या मनाला बोधाने तृप्ति झाली खरी पण उपासना करण्याविषयी अजून तृप्ति झाली नाही. म्हणून वारंवार सर्व देवादि देव विठ्ठल पुन्हा पहावा असे वाटतेच.निरंजन जो परमात्मा त्याच्या ठिकाणी भक्तिचे अंजन घालून पुन्हा आपले निधान आपणच पाहावे. काय चमत्कार हा आमच्या श्रीगुरू निवृत्तिनाथांनी ग्रहस्थाश्रम मांडला आहे ते निष्काम अपत्याला प्रसवतात. असे यथार्थ जाणले तर त्या गृहस्थाश्रमाचा आनंद त्रिभुवनांत मावत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंद परिपूर्ण भरून ओसंडत आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आत्मा असल्यामुळे त्याचा आनंद मी देहभान विसरून भोगित आहे. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.