पंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे ।
तें मज अंगविजे ऐसें निवृत्तीं केलें वो माये ॥१॥
सहज बोधें बोधलें न विचारीं आपुलें ।
म्हणोनियां मुकलें अवघ्यांसी वो माय ॥२॥
पांचाहूनी परती मी जाहालिये निवृत्ति ।
चिदानंदीं सरती स्वरुपीं वो माये ॥३॥
ऐसें जाहलें चांग अचिर देवांग ।
रखुमादेवीवरें पांग फ़ेडिला वो माये ॥४॥
अर्थ:-
सांख्य शास्त्रामध्ये चोवीस तत्त्वे मानतात त्या चोवीस तत्त्वाहून जो पंचविसावा पुरूष म्हणजे वेदांतमतांत आत्मा हेच मुख्य तत्त्व आहे. ते मला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी अंतःकरणांत जाणून दिले.आणि ते परमतत्त्व सहज व अखंड बोधरूप आहे. असा बोध मला सहज झाला. म्हणून माझ्याहून भिन्न आपले असे म्हणण्यास अवकाशच नसल्यामुळे मी सर्वास मुकलो. मी पंचमहाभूताच्या कार्यापासून निवृत्त होऊन सच्चिदानंदरूपी एकरूप होऊन गेलो. श्रीगुरूनी कृपा केल्यावर व माझी पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी कृृपा केल्यावर अचिर म्हणजे ताबडतोब मी देहभाव, परमात्मरूप होऊन गेलो. अशा रितीने माझ्या अनेक जन्माचा पांग फिटला. असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.