अनंत अनंता परी देखतां अंतरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४१

अनंत अनंता परी देखतां अंतरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४१


अनंत अनंता परी देखतां अंतरीं ।
ह्रदयाभींतरीं मज निववितो माये ॥१॥
चाळवी चक्रचाळ अलमट गोपाळ ।
यानें केला सुकाळ सहज सुखाचा वो माये ॥२॥
सांगवी ते सांगणी उमगूनि चक्रपाणी ।
त्या निर्गुणाचे रहणी मी रिघालें वो माये ॥३॥
भ्रांतिभुली फ़ेडूनियां निवृत्ति ।
रखुमादेविवरु विठ्ठलीं गती जाली वो माये ॥४॥

अर्थ:-

जगांत अनंतरूपाने नटलेला श्रीहरि अंतःकरणांत पाहिला असता तो हृदयांतील संसाराची तळमळ शांत करतो. हे जगत चक्र चालविणारा पोरकट स्वभावाचा श्रीगोपाळकृष्ण याने सहज असणाऱ्या आत्मानंदाचा सुकाळ केला. जीवांच्या आत्यंतिक कल्याणाचा जो योग्य उपदेश केला पाहिजे तोच उपदेश हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण करतो. त्या उपदेशाने मी निर्गुण परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी रिघाले व त्याने संसाराची सत्यत्व भ्रांती नाहीसी होऊन श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या कृपेने माझे पिता व रखुमादेवी पती जे श्रीविठ्ठल, त्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी माझी गति सहज झाली. असे माऊली सांगतात.


अनंत अनंता परी देखतां अंतरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २४१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.